असेही एक पैलतीर भाग दोन

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
23 May 2008 - 1:40 pm

पहिला भाग येथे मिळेल.----> http://www.misalpav.com/node/1865
सामाजिक मालिका --- काही आराखडे

टी व्ही ऑल टाईम
सिरीयल्स प्रोड्युसिंग कोर्सवेअर डिसेंबर २००८

वेगवेगळ्या चॅनेल्सवर टीव्ही सिरीयल्स उदंड झाल्या आहेत. सिरीयल्स बघून बरेचदा नवीन विद्यार्थ्यांचा गैरसमज होऊ शकतो की हे काय सोपे काम आहे. पुर्वीच्या अनुभवांवरून ह्या सिरीयल्स तयार करण्याचे काही आराखडे आता बनून गेलेले आहेत. सामाजिक सिरीयल्सचे हे आराखडे ह्या लेखात विद्यार्थ्यांना संदर्भ मिळावा म्हणून एकत्रित दिले आहेत.

सिरीयलचा प्लॉट आणि डायनॅमिझम
शक्यतोवर अमुक एक प्लॉट रचून सिरीयल सुरू करणे टाळावे. कारण पुढे कथा कोठे वळेल, वळेल की पळेल, पळेल की पडेल, हे काहीच माहीत नसते. त्यामुळे उगाच कथा लेखनात वेळ घालवू नये. पॉप रेटींग पाहून हवी तशी कथा वळवत कोलांट्या उड्या मारणे सोपे असते. सिरीयलला फ्लेक्सीब्लीटी येते. उदाहरणार्थ, एका मालिकेत पात्राचा मृत्यु दाखवला. अगदी स्मशानात प्रेत जळतांना दखवले. वेलीन्ग म्युझीक्चे सूर दोन मिनटे टाकले. मॅनडेटरी पांढर्‍या शुभ्र कपड्यात शोकसभा झाल्या. ह्या रडारडीत तीन पूर्ण एपिसोड पाडता आले.

त्यानंतरच्या एपिसोड्मधे, ते पात्र मेल्यावर देखील हजर करता आले. कारण प्रोड्युसरने फ्लेक्सीब्लीटी फॉरम्युला वापरला. एपिसोड्च्या सुअरवातीला पात्राच्या बायकोला झोपेतून उठतांना दाखवले, आणि "काय हे भयानक स्वप्न!" येवढ्या वाक्याने मेलेले पात्र नव्ह्त्याचे होते केले.

आजच्या युगात डायनॅमिझमचे फार महत्व आहे. कथा डायनॅमिक नसेल तर प्रेक्षक स्टॅटीक होऊन थिजतो. वर टीआरपीचे स्टॅट बिघडते. टी व्ही ऑल टाईमची प्रथितयश मेगा प्रोड्युसर कुकी कोपरे हिने डायनॅमिक प्लॉटचे तंत्र चांगले वापरले आहे.

सिरीयल स्टोरी रायटिंगच्या प्रतियोगिता ठेवायच्या. होतकरू रायटर्सला बोलाउन आधिच्या एपिसोडचे रशेश दाखवायचे, व सर्वांना त्यापुढचा एपिसोड लिहायला सांगायचा. सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे स्टोरी अजीबात पुढे सरकायला नको. त्यातील जे लिखाण कथा सर्वात कमी पुढे घेऊन जाईल, ते निवडायचे. त्यानंतरचे एपिसोड असेच निवडायचे. हे लक्षात ठेवायचे कि तोच लेखक पुढच्या पाच एपिसोडला रिपीट होणार नाही. मागच्याने काय लिहीले, ते पुढच्याला कळायला नको. ह्याने क्रीयेटिव्हीटी वाढते. तसेच ह्या तंत्राने, कथा लंगड्या कासवाच्या गतीने स्टॅटिकली पुढे जाते. सात आठशे एपिसोड गॅरंटीड होतात. आणि वेगवेगळे लेखक असल्याने, सिरीयल डायनॅमिक पण होते.

प्रथितयश मेगा प्रोड्युसर कुकी कोपरे हिने लेखनाला मार्क्स कसे द्यायचे ह्याचे स्टॅन्डर्डच आखले आहे. एका एपिसोड मधे कथा १% पुढे गेली, तर दहा पैकी नऊ मार्क्स. १०% पुढे जाणार्‍या कथेला दहा पैकी दोन मार्क्स. पंखा गरगर फिरवून कथा फ्लॅश फॉरवर्ड केली तर कथा स्पर्धेतून बाद. कथेत नवीन व्हीलन अचानक उगवला, तर चार बोनस गुण. नवीन व्हीलन पुर्वी सद् गुणी असेल, व सडनली वाईट बनला, तर आठ बोनस गुण. अशा पद्धतीने प्रथितयश मेगा प्रोड्युसर कुकी कोपरे लेखकाचे कलागुण जोखते.

बॅक ग्राऊंड मूझीक
सिरीयलमधे वाद्यांचा उपयोग कौशल्याने करुन घ्यायचा. कॅरेक्टरची इमोशन्स ध्वनीत होणे हे इमोशन्स दाखवण्या पेक्षा जास्त महत्वाचे. अभिनेते कुशल असण्याची आता गरज राहिलेली नाही. इमोशन्स ध्वनीत करायचे म्हणजे, वाद्ये प्रसंगानुसार योग्य सुरावटीत वाजवायची. टेन्शन, धमकी, वैफल्य, क्रोध, दु:ख ह्या सगळ्या भावना अभिनयाने दाखवण्याची गरज नसते. सुरंनी ही इमोशन्स मस्त दाखवता येतात.

ह्याचा आणखी एक फायदा मम्हणजे रियुजेब्लीटी मिळते. अभिनयाने भावना दाखवायच्या म्हणजे अभिनेता कुशल हवा. आणि प्रत्येक एपिसोडला तोच कुशल अभिनेता मिळेल ह्याची गॅरंटी काय? त्यापेक्षा तीच ध्वनीफित योग्य ठिकाणी वाजवली म्हणजे हव्या त्या अभिनयाचा इफेक्ट तयार! अभिनेत्याने फक्त कोरा चेहरा ठेवायचा. जी कोणती भावना दाखवायची, ती ढणाढण बॅक ग्राउंड म्युझीक मधून तयार करायची. प्रेक्षकांना वाटते, भावनेचे अत्त्युच्च शिखर गाठल्यामुळे ह्याचा चेहरा असा दिसतो. प्रेक्षकांना हे तंत्र आवडते, कारण स्पेसीफीक म्युझीक पीसेस बरोबर ते फॅमिलीयर होऊन जातात. पात्राबरोबर येणारे म्युझीक ऐकले, कि पुढे काय होणार ह्याचा अंदाज येऊन डोक्याचा त्रास वाचतो.

व्हिलनिश पात्राच्या प्रत्येक एन्ट्रीबरोबर विशीष्ट सिग्नेचर ट्युन्स वाजवायच्या. ह्यासाठी मांजराच्या फिसकारण्याचा, भुताच्या रडण्याचा, हडळीच्या हसण्याचा असे चित्रविचित्र आवाज टाकावेत. हे आवाज इलेक्ट्रॉनिकली डिस्टॉर्ट केले कि उत्तम परिणाम साधतो. असे आवाज एकले कि हे पात्र व्हिलन आहे वा नाही असा संभ्रम प्रेक्षकांना रहात नाही.

समाजसुधारणा
प्रेक्षक आपला ७० ते ८० % रिकामा वेळ सामाजिक सिरीयल्स बघण्यास देतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. हा प्रचंड प्रतिसाद बघता टी व्ही माध्यमाची सामाजिक जबाबदारी नाकारता येणार नाही. समाजात हवा तो बदल घडवून आणण्याची क्षमता टी व्ही माध्यमात आहे. आपल्याला असे दिसून येते कि, समाजात अजुनही काही जुन्या, बुरसट चालिरिती टिकून आहेत. कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय त्यात बदल होणार कसा? हे नमूद करण्यास आनंद वाटतो कि टी व्ही ऑल टाईम वरच्या सामाजिक सिरीयल्स ही जबाबदारी उत्तम रित्या पार पाडत आहेत. उदहरणेच द्यायची झाली, तर सिरीयल्स मधे प्रमोट केलेल्या काही समाजसुधारणा येथे देत आहोत. त्यापैकी काही समाजात प्रस्थापित झाल्या आहेत, तर बाकीच्या लवकरच होतील असे दिसत आहे.

  • आपल्या सारख्या गरम हवेच्या देशात हवेशीर असे कमीत कमी कपडे घालून रहाणे.
  • नवरेशाही व सासुरवास चालू न देणे आणि ह्या सत्ताकेन्द्रांना हाणून पाडण्यासाठी बायकांनी सासरच्या माणसांविरुद्ध कारस्थाने रचणे. पहा--- "पिया जा मर"
  • निटनेटकेपणा जोपासण्यासाठी घरात फूल्ल मेकअप व दागीन्यांसकट सदैव वावरणे.
  • जीवन क्षणभंगूर आहे. म्हणून शक्य आहे तोवर जीवनाचा आनंद लुटा आणि प्रेम वाटा. हा प्रेमाचा संदेश घरोघर पोहोचविण्यासाठी मुक्त जीवन दाखवणे. वहिनी-दिर, मामा-भाची, बॉस- सेक्रेटरी, ह्या जोड्या दाखवून झाल्या, आता पुढे काय असा प्रश्न पडला असेल तर पहा----- "एका घरात जास्तीत जास्त लफडी" ह्या स्पर्धेत यशस्वी झालेले सिरीयल- "तुम उसके, मै सबकी".
  • हायटेक तंत्रे वापरून दुर्दैवी निपुत्रीकांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरोगेट मदरिझमचा प्रचार. पहा-- "घर आना देख लुंगा", "घर घरमे लफडा", "प्रेमकहानी एक चक्र" इत्यादी.
  • कितीही मोठा यशस्वी उद्योगपती असला, तरी त्याने निकटच्या नातेवाइकांनी दिलेल्या कागदपत्रांवर न बघता सही करणे आणि माणसाच्या मुलभूत चांगुलपणावर विश्वास निर्माण करणे.
  • पुढे विश्वासघात होऊन एका रात्रीत दिवाळे निघाले तरी, गेलेली सर्व संपत्ती दुसर्‍या रात्रीत पुन्हा मिळवून कर्तबगारीची मिसाल समाजात उभी करणे.

क्रमशः

कथाविडंबनभाषाविनोदतंत्रज्योतिषशिक्षणप्रकटनविचारलेखमाहितीसंदर्भ