काय मिळवायचंय तुम्हाला ?.........२

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 Mar 2011 - 3:24 pm

१/प्रकरण२

२/प्रकरण१

त्यांनी जे सांगितले त्याच्यावरुन सगळा उलगडा झाला..........

काल रात्री १०.३० च्या सुमारास, त्यांना ओसवालांचा फोन आला. हे ओसवाल म्हणजे ओसवाल ऑटोचे मालक - मॅनेजिंग डायरेक्टर ! ओसवाल ऑटो हा आमचा एक महत्वाचा ग्राहक आहे. ओसवाल महाशयांनी ही मोठी ऑर्डर आम्हाला त्यांच्या अंतर्गत विरोधाला डावलून दिली होती. त्यात अर्थातच आमच्या जोशीसाहेबांचा महत्वाचा सहभाग होताच. काल रात्री ओसवालसाहेब त्यांच्या ग्राहकांबरोबर जेवण घेत असताना त्या लोकांनी त्यांना बरेच ऐकवले होते. कारण त्यांना ओसवाल ऑटोकडून माल मिळत नव्हता. आणि त्याला कारणीभूत आम्हीच होतो. मग काय, त्यांनी जोशीसाहेबांना चांगलेच सुनावले. थोडीशी त्यांना जास्त झालीच असणार पण त्यांनी जे काही जोशीसाहेबांना सुनावले त्यात काहीच खोटे नव्हते. जोशीसाहेबांनी, कुठल्याही परिस्थितीत तो माल आज जाईल असे वचन देऊन त्यावेळी स्वत:ची सुटका करुन घेतली होती.

"हं असं होतं तर !”

मी पटकन माझी चूक कबूल करुन टाकली. नाहीतरी सगळं चुकलंच होतं त्या ऑर्डरमधे. आणि त्यांना ते काम मी आता स्वत:च बघेन असे सांगितले. पण एवढ्यासाठी एवढा गोंधळ घालायची काय जरुरी होती ?
“आणि तुम्ही काल रात्री कुठे होता ? मी तुम्हाला तुमच्या सेलवर तीनदा फोन केला म्हणून विचारतोय. तुम्ही माझ्याशी बोलला असतात तर मी इथे आलोही नसतो.” आता काय सांगू ह्यांना ? पहिल्या दोनवेळा मी फोन घेतला नाही कारण माझे त्यावेळी बायकोशी कडाक्याचे भांडण चालले होते. भांडणाचा विषय नेहमीचाच होता. पण यावेळी भांडणाला जरा वेगळीच धार होती. हल्ली माझे तिच्याकडे लक्षच नाही असे तिचे ठाम म्हणणे होते. आणि तिसर्‍या वेळी फोन आला तेव्हा भांडण मिटले होते आणि फोन घ्यायच्या स्थितीत आम्ही नव्हतो. अरेच्च्या, आम्हाला काही वैयक्तिक खाजगी आयुष्य आहे की नाही ? पण हे उघडपणे बोलायचीही सोय नव्हती.

ते म्हणाले ’साने मला या प्लॅंटचा आता कंटाळा आलाय . इथे एकही गोष्ट धड होत नाही. तुमची कुठलीही ऑर्डर वेळेवर जातच नाही. माझ्याकडे त्याबद्दल तर तक्रारींची रीघ लागली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. या प्लॅंटला कोणी जबाबदार आहे का नाही ? कोणाचे ह्यावर नियंत्रण आहे, असे मला तर वाटत नाही.”
“साहेब तीन महिन्यापूर्वी जी कामगार कपात तुम्ही आमच्या इथे केलीत त्यानंतरच हा सगळा गोंधळ चालू झाला आहे. त्यानंतर इथे उत्पादन होतंय हेच खूप आहे.”
’साने तुम्ही फक्त उत्पादन करा हो. मला फालतू कारणे सांगू नका.”
“मग मला पाहिजेत तेवढी माणसे द्या.”
“तुमच्याकडे भरपूर माणसे आहेत. ते काय आणि किती काम करतायत ते बघा. देवाशप्पथ सांगतो, इथे सुधारणेला भरपूर म्हणजे भरपूर वाव आहे. आणि माझ्याकडे सारखे रडत येऊ नका. जे आहे त्यात काही जमतंय का बघा करायला.”
मी काहीतरी बोलणार तेवढ्यात त्यांनी माझ्याकडे बघून “बस झालं ! बोलू नका” अशा अर्थाची खूण केली. “बसा जरा.”
मग लक्षात आले आपण इतका वेळ उभेच होतो. मी आज्ञाधारक मुलासारखा पटकन खुर्चीत बसलो.
“हे बघा साने उगाच वाद घालण्यात काय अर्थ आहे ? तुमचा शेवटचा रिपोर्टच सांगतोय ना सगळं !”
“ठीक आहे ! ओसवाल ऑटोच्या ऑर्डरचाच प्रश्न आहे ना ........
जोशीसाहेबांचा आवाज आता मात्र चढला. त्यांच्या आवाजातील कंपही आता जाणवायला लागला.
“काहीतरी मूर्खासारखं बोलू नका. ती ऑर्डर तुमच्या गैरव्यवस्थेचे फक्त एक लक्षण आहे. तुला काय वाटले मी त्या ऑर्डरसाठी इथे आलोय ? मला काय कामं नाहीत की काय ? तुमच्या कार्यक्षमतेची लाज वाटायला हवी तुम्हाला. ओसवाल ऑटो मरु देत. तुमचा प्लॅंट माझे पैसे खातोय. हो नेट लॉस!”
मग ते थोडावेळ थांबले. जणूकाही माझ्या डोक्यात हे सगळे शिरण्याची ते वाट बघत होते.
मग त्यांनी एकदम टेबलावर त्यांची मूठ आपटली आणि माझ्याकडे बोट दाखवून ते किंचाळले.
“आणि जर तू ते करु शकत नसलास तर मला ते करुन दाखवायला लागेल. आणि त्यानंतरही हे असेच चालू राहणार असेल तर मला ह्या प्लॅंटची आणि तुमची गरज नाही. चालायला लागा सगळे इथून.”
मी “एक मिनिट ........”
“माझ्याकडे एक काय, अर्धा मिनिटसुध्दा नाही, तुमची फालतू कारणं ऐकायला. मला माल बाहेर जायला पाहिजे बस ! मला, साने, पैसे पाहिजेत या प्लॅंटमधून.
"“कल्पना आहे मला त्याची.”
“तुम्हाला काहीच कल्पना नाही . तुम्हाला माहिती आहे का ? गेल्या कित्येक वर्षात झाला नसेल एवढा तोटा सध्या आपल्या डिवीजनला होतोय. तुमचा प्लॅंट खड्ड्यात पडतोय आणि आम्हाला घेऊन पडतोय.” माती टाकायला भागधारक सुध्दा येणार नाहीत. समजले का ?
हे सगळे ऐकून खरं तर माझे डोकेच चालायचे बंद झाले होते. हताश स्वरात मी म्हणालो
“बरं आता मग मी काय करावं असं म्हणणं आहे तुमचं ? मला इथे येऊन सहा महिनेच झाले आहेत. त्या काळात परिस्थिती बिघडली, हेही मला मान्य आहे. पण मी इथे जीव ओतून काम करतोय.”
“साने, शेवटचं सांगतो. आजपासून मी तुम्हाला बरोबर तीन महिने म्हणजे नव्वद दिवस देतोय. त्या काळात हा प्लॅंट फायद्यात आला तर ठीक नाहीतर .......”
“नाहीतर काय ?”
“नाहीतर मी मॅनेजमेंट कमिटीकडे हा प्लॅंट बंद करण्याची शिफारस करणार आहे.” माझी तर वाचाच गेली. आज सकाळी असे काही घडेल असे स्वप्नात पण वाटले नव्हते. पण गंमत म्हणजे आत कुठेतरी हे अपेक्षित होतं त्यामुळे आश्चर्याचा धक्का वगैरे असले काही नव्हते. मला भीती वाटत होती ती आपण निगरगट्ट झालो की काय, या विचाराची. माझी नजर खिडकीतुन बाहेर पार्किंगमधे गेली. मन मात्र निर्विकार होते. तेवढ्यात जोशीसाहेव टेबलाला वळसा घालून माझ्या शेजारी येऊन बसले. माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. हं sssss आता हे गोड बोलणार. ठरलेलेच असते ते.
“हे बघा साने, मला मान्य आहे की तुमच्या हातात हा प्लॅंट देताना तो काही फार चांगल्या स्थितीत नव्हता. पण मी तुम्हाला याचा प्रमुख बनवताना तुम्ही तो फायद्यात आणाल हीच आमची अपेक्षा होती. फायदा जाऊ देत, किमान तोट्यातून तरी बाहेर पडायला पाहिजे तो. साने तुम्ही तरुण आहात. या कंपनीत तुम्ही फार पुढे जाऊ शकता पण त्यासाठी मॅनेजमेंटला तुम्हाला चांगली बॅलन्सशीटच दाखवायला लागेल. बाकी काही उपयोगी पडेल असे वाटत नाही.”
“पण साहेब त्याला थोडा वेळ लागेल.”
“माफ कर मित्रा ! ३ महिनेच देऊ शकतो मी. आणि आत्तापेक्षा जर हालत खराब झाली तर तेवढेही देऊ शकेन की नाही, याची शंकाच आहे. चला, मी निघतो आता. आत्ता निघालो, तर पुढची एकच मिटींग बुडेल, नाहीतर मग कठीण होईल. “असं म्हणून त्यांनी दरवाजा उघडला आणि तो तसाच हातात धरुन ते म्हणाले “ओसवल ऑटोचे काम मी मार्गी लावलेच आहे. मला वाटतं आज तो माल जायला हरकत नाही. तो जाईल एवढे बघा..”
“ती ऑर्डर आज जाईल ! निश्चित !”
हसून त्यांनी दरवाजा बंद केला.

माझी नजर परत एकदा खिडकीबाहेर गेली आणि ते मला त्या मर्सिडीजमधून गेटकडे जाताना दिसले. मी सुटकेचा नि:श्वास टाकला.

तीन महिने ! त्याशिवाय माझ्या मनात दुसरा विचारच येत नव्हता. माझी मतीच गुंग झाली होती. मी केव्हा खिडकी सोडली आणि माझ्या जागेवर येऊन बसलो माझे मलाच कळले नाही. नजर शून्यात आढ्याकडे लावून बसलो होतो. किती वेळ कोणास ठाऊक ! भानावर आलो तेव्हा ठरवले, चला इथे बसून तरी काय होणार ? त्या ओसवालच्या मालाचे काय झाले ते तरी बघून येऊ ! कपाटावरचं हेल्मेट आणि चष्मा उचलून मी बाहेर पडलो. बाहेरच माझी सेक्रेटरी उषा बसते, तिला कुठे चाललो आहे ते सांगितले
“उषा, मी जरा फ्लोअरवर जाऊन येतो.”
“मगाशी तुमच्या पार्किंगमधे जी गाडी होती ती, कोणाची होती.?”
“जोशीसाहेबांची”
“मला वाटलं तुम्ही नवीन घेतलीत की काय ! पण काय हो साहेब, काय किंमत असेल त्या गाडीची ?”
“असेल चाळीस एक लाख, का गं ?”
“बापरे, सारे घरदार विकूनसुध्दा ही गाडी ह्या जन्मात घेता येईल असे वाटत नाही.”
उषाने हसता हसता कॉंप्युटर चालू केला आणि ती कामाला लागली.

उषा एक चांगली सेक्रेटरी आहे. सदा हसतमुख आणि सांगितलेले काम अचूक करणारी. किती वय असेल तिचं ? असेल चाळीस एक. पण वाटत नाही. उषा घटस्फोटीत आहे. तिने, ती कामाला आली त्याच्या दुसर्‍याच दिवशी मला सगळं सांगितलं होतं. दारुड्या होता तो. मी तिला चांगली पगारवाढ दिली आहे. अर्थात तिचे प्रशिक्षण संपल्यावर. पण आता बिचारीकडे फक्त तीनच महिने आहेत. सांगावे का तिला दुसरी नोकरी बघायला ? मी तो विचार झटकायचा प्रयत्न केला. पण तो परत परत माझ्या मनात येतच होता. विचार करताकरता प्लॅंटच्या दारात केव्हा येऊन पोहोचलो कळलेच नाही.

शॉप फ्लॊअर म्हणजे मला मंगल-अमंगल, चांगल्या-वाईट ह्यांच्या युतीचे अंगण वाटते. आणि गंमत म्हणजे एवढी वर्षे त्यावर काढल्यावर माझा या गोष्टीवरचा विश्वास अधिकच वाढायला लागला आहे. तुम्हीच बघाना, जरा नजर टाकलीत तर काय दिसेल ? काही गोष्टी तुम्हाला असं वाटेल, की खास देवानेच पाठवल्यात की काय ! पृथ्वीवरच्या वाटतच नाहीत त्या आणि काही तर अत्यंत मर्त्य आणि अतिसामान्य असतात. कसेही असले तरी शॉपफ्लोअरचे मला नेहमीच आकर्षण वाटते. आणि त्याला माझ्या मनात एक खास स्थान आहे.
पण बर्‍याच लोकांचा दृष्टिकोन असा नसतो ना ! बंद करायला निघतात ते.
शॉपफ्लोअर मला एकदम जवळचे वाटायला लागले. मी ते प्रथमच बघतोय, असे बघायला लागलो.

ऑफिसमधून प्लॅंटमधे शिरलो की एका वेगळ्याच जगात शिरल्याचा भास होतो. पिवळ्यादिव्यांची रांग डोक्यावर स्वच्छ प्रकाश टाकत असते. त्या ऊबदार प्रकाशात सर्व शॉप न्हाऊन निघते. एका बाजूला जमिनीपासून छताला भिडणारी उंचच उंच स्वयंचलीत कपाटांची रांग, त्यात आम्हाला लागणारा अनेक प्रकारचा कच्चा माल भरलेला आहे. त्या कपाटांच्या रांगामधून शांतपणे फिरणार्‍या फोर्क्लिफ्ट फिरताना बघून मला तर नेहमी मुंग्यांच्या वारुळाची आठवण येते. तेथेच चमकणार्‍या स्टेनलेस स्टीलच्या पत्र्याचे तुकडे करणार्‍या मशीनमधून येणारा आवाज मला तर संगीताएवढाच सुमधूर वाटतो.
मशिन्स ! यंत्रे ! आमच्या कारखान्याचा अविभाज्य घटक, शॉप फ्लोअर म्हणजे, एक एकराची मोठी खोलीच होती. ती सगळी यंत्रे छानपणे वेगवेगळ्या तुकड्यात रांगेत लावलेली आहेत. त्यांना चार रंगात रंगवलेले, त्या प्रकाशात फार छान दिसतात ती . त्यांचे यांत्रिक हात तालबध्द हालचाली करताना बघायला फार आवडते मला. आणि त्या ते माझ्या प्रोग्रॅमच्या आज्ञेनुसार करत आहेत हे आठवून थोडासा गर्वही वाटला. ह्या सगळ्यामधून शिंपडावी तशी माणसे दिसतात. मी जाताना कोणी मला हात करतोय तर कोणी हसून हॅलो करतोय. मी सगळ्यांना जमेल तसा प्रतिसाद देत पुढे निघालो. असे वाटत होते हे सगळे प्रथमच किंवा शेवटचे पाहतो आहे. तेवढ्यात मागून फोर्कलिफ्ट गेली. कोणीतरी जाड्या चालवत होता. त्यापलीकडे लांबट टेबलावर काही स्त्री कामगार वायर्सचे हारनेस बांधत होत्या. त्यांच्या हातात जणू अनेक इंद्रधनुष्येच. तेवढ्यात एका कामगाराने त्याचा वेल्डींग टॉर्च पेटवला आणि त्या प्रकाशात ते इंद्रधनुष्य अजूनच उजळून निघाले. शेजारीच काचेच्या केबीनमध्ये त्या सोनेरी केसाच्या सुंदर बाईने नाजूकपणे कीबोर्डवर बोटे आपटली. फारच मजेशीर वाटले मला ते सगळे. या सगळ्याला पार्श्वसंगीत पाहिजे म्हणुन की काय, शॉपवरच्या सगळ्या मोटर्स, मोठाले पंखे, कॉंप्रेसर, व्हेंटीलेटर्स यांनी एक खर्जातला सूर लावला होता. मधेच कसलातरी एकदम मोठा आवाज येत होता. जणूकाही ड्रमच वाजतोय. या सगळ्याच्या वर तेवढ्यात सिस्टीमवरुन कसलीतरी घोषणा झाली, जशीकाही आकाशवाणीच.

या सगळ्या आवाजातूनसुध्दा मला एक शीळ ऐकू आली. वळून बघितले तर ओळखीचं कोणीतरी येतंय असं वाटलं. हो ! पवारच होता तो. कोण ओळखणार नाही ? आमचे पवार म्हणजे सहा फूटावर उंची. धिप्पाड व्यक्तीमत्व ! मला तर वाटायचे त्याचा न्हावी निश्चितच फौजेचा असणार. कारण त्याची कटींग पण त्याच प्रकारची असते. पण माणूस फणसासारखा. बाहेरुन काटे असले तरी आतून साधा, सरळ. थोडी थोडकी नाही गेली नऊ वर्षे या प्लॅंटला प्रॉडक्शन मॅनेजर आहे तो ! तुम्हाला काही पाहिजे असल्यास पवारांना सांगितले की बास. काम झालेच समजा. मी पवारांच्या दिशेने पाऊल टाकले आणि दोनच मिनिटात आम्ही समोरासमोर आलो.
“गुड मॉर्निंग सर” पवार.
“आज सकाळी काही चांगले घडेल असे मला तरी वाटत नाही. सकाळचा गोंधळ माहीती आहे ना ?
“सगळीकडे तीच चर्चा चालली आहे.”
“मग ४१४२७ किती महत्वाची आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे असे वाटत नाही.”
“हं sssssss ! त्याच संदर्भात बोलायचे आहे मला. आहे का वेळ ?
“काय विशेष ?”
“अहो ज्याच्या अंगावर जोशीसाहेब ओरडले होते तो मशिनिस्ट आज आलाच नाही. त्याने राजीनामा पाठवून दिला आहे.”
“पंचाईतच आहे आता” मी.
“सानेसाहेब अशी माणसे मिळणे फार कठीण आहे. मी स्वत: त्याला तयार केले होते.”
“त्याला परत बोलवा. मी बोलावले आहे म्हणून सांगा.”
“त्याला बोलावण्याची गरज नाही लगेच. जाधवनी सांगितल्यावर त्याने त्या नवीन जॉबचा सेटअप पूर्ण केला होता. आणि त्या मशिनवर प्रॉडक्शन चालू पण झाले होते. पण हे सगळे करताना त्याने फिक्शरचे दोन नटबोल्ट‍ सैल ठेवले होते. आत्ताच पाच मिनिटांपूर्वी सगळे टूलबिट‍ तुटून त्याचे तुकडे शॉपभर पसरले. नशीब कोणी जखमी झाले नाही.”
“किती जॉब्ज आपल्याला फेकून द्यावे लागतील ?” मी.
“पण त्यातले काही तुकडे मशीनमधे जाऊन मशिन बंद पडलंय ते आता दुरुस्तीला घेतलंय.”
“कुठले मशिन आहे ते ?”
“PNQ– 10”
माझ्या पोटात मोठा खड्डा पडला..........

२/प्रकरण १ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
जर याचा कंटाळा आला तर पुढेमागे ही लेखमाला बंद करायचा हक्क लेखक राखून ठेवत आहे.
ह.घे.

वाङ्मयकथाजीवनमानतंत्रविज्ञानअर्थकारणअर्थव्यवहारविचारसमीक्षाअनुभवमाहितीसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2011 - 4:26 pm | पिलीयन रायडर

आई शप्पथ खूप मजा येतेय... कारण
१. मी स्वतः सध्या शोप फ्लोर वर माझा काम करून घेण्यासाठी मर मर करतेय....
२. आमच्या माहितीत एक "क्ष " व्यक्ती अशाच डूबत चालेल्या प्लांट वर काम करत आहे.. त्याला फायद्यात आणण्याचा मनसुबा घेवून रोज लोकांच्या (client) शिव्या खात आहे!!! फक्त त्या व्यक्तीचं नाव साने नसून "जोशी" आहे!!!

छोटा डॉन's picture

1 Mar 2011 - 4:35 pm | छोटा डॉन

>>जर याचा कंटाळा आला तर पुढेमागे ही लेखमाला बंद करायचा हक्क लेखक राखून ठेवत आहे.

कंटाळा येऊ नये हीच सदिच्छा :)
पुस्तक छानच आहे, अनुवादही वाचतो आहे.

- छोटा डॉन

जयंत कुलकर्णी's picture

1 Mar 2011 - 6:30 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना मनापासून धन्यवाद !

हि लेख मालिका बन्द करु नका !!!!!!!!!!!!!!!!!
उत्तम आहे ...............