गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
22 Feb 2011 - 7:21 pm

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता. पण त्यापुढे जाऊन ‘गुरुदत्तच्या चित्रपटांनी नक्की काय साध्य केलं?’, ‘भारतीय चित्रपटांत गुरुदत्तचं नक्की स्थान काय?’ आणि ‘गुरुदत्तच्या चित्रपटांत जागतिक आणि भारतीय कलाविचार कसे दृग्गोचर होतात?’ अशा काही मूलगामी प्रश्नांविषयीचे मूलगामी विचार मराठीमध्ये काही दशकांपूर्वी अतिशय प्रभावी विश्लेषणाच्या माध्यमातून अरुण खोपकर या चित्रपट दिग्दर्शक-शिक्षक-लेखकानं मांडले होते. आता मात्र त्या पुस्तकाचं विस्मरण झालेलं आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आहे. ‘प्यासा’विषयीच्या अभिमानप्रदर्शनाच्या या ताज्या निमित्तानं मराठीतल्या या अभिजात पुस्तकाची मराठी आंतरजालावर आठवण काढावी यासाठीचा हा धागा.

‘गुरुदत्त – तीन अंकी शोकांतिका’ या पुस्तकात खोपकर ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘साहिब, बीबी और गुलाम’ या तीन रसिकप्रिय चित्रपटांविषयी विवेचन आणि विश्लेषण करतात. इतर समाजांप्रमाणे मराठी समाजातदेखील एका काळापर्यंत चित्रपट ही कमी दर्जाची कला समजली जायची. त्यामुळे अनेक प्रकारची हानी झाली. साहित्याचं गांभीर्यानं विश्लेषण करण्याची, म्हणजे समीक्षेची, जशी परंपरा अस्तित्वात होती, तशी चित्रपटाच्या समीक्षेची किंवा रसग्रहणाची परंपरा मराठीत त्यामुळे निर्माण झाली नाही. पण आपल्याला ते करायचं आहे, असं खोपकर प्रस्तावनेतच सांगतात आणि पुढे दाखवूनसुद्धा देतात. त्यांच्या विश्लेषणपद्धतीला मात्र एक जागतिक वळण आणि परंपरा आहे हेही ते कबूल करतात. सिनेमाविषयी सकस लिहिण्यासाठी मुळात इतर कला, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याशीच भिडावं लागतं हे ते सांगतात. ‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’ हा कळीचा विचार ते मांडतात.

प्रत्यक्ष विश्लेषण करताना खोपकर अनेकविध संकल्पना आणि परंपरांचा अगदी लीलया फेरफटका मारत या तीनही चित्रपटांची वेगवेगळी अंगं उलगडतात. त्यात ‘रोमँटिसिझम’ या युरोपिअन परंपरेत गुरुदत्त कसा बसतो याचं विवेचन आहे. पात्रं, प्रसंग यांच्याद्वारे चित्रपटांचं रसग्रहण आहे. त्या बरोबरच चित्रपट या माध्यमाची जाण आणि तीमधून गुरुदत्त या व्यक्तित्वाची उकलही केलेली आहे. त्यात ‘जिनिअस’ आणि समाज यांच्यातल्या द्वंद्वाची ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ मधली मांडणी आणि ‘साहिब, बीबी...’ मधली छोटी बहू यांचा संबंध कसा लागतो हेही दाखवलं आहे.

क्षोभनाट्य (मेलोड्रामा) हा भारतीय चित्रपटांचा आत्मा आहे. भारतीय कलापरंपरेचा प्रवाह क्षोभनाट्याच्या आधारानं जातो. गुरुदत्तचे चित्रपट या पठडीतले असल्यामुळे सत्यजित रायसारख्या अधिक वास्तववादी दिग्दर्शकाच्या तुलनेत कधीकधी गुरुदत्तला कमअस्सल मानलं जातं. पण पारंपरिक मेलोड्रामा आणि गुरुदत्तचे चित्रपट यांत फरक काय आहे हे खोपकर विशद करतात. तसंच योगायोग, गाणी वगैरे आपल्या बाजारू चित्रपटांमध्ये वापरले जाणारे घटक गुरुदत्त कशा ताकदीनं वापरतो याचंही त्यात विश्लेषण केलेलं आहे.

काळोख आणि प्रकाश हा चित्रपटासारख्या दृश्यमाध्यमातला एक अतिशय प्रभावी घटक आहे. त्याचा प्रसंगानुरुप वापर आणि चित्रपटाच्या एकंदर रचनेशी असलेलं त्याचं नातं खोपकर उलगडून दाखवतात. अवकाशाचा चित्रपटीय वापर आणि त्यातून उभा राहणारा ऱ्हास यांचंही असंच विश्लेषण ते करतात.

असं सगळं उलगडून दाखवत असताना विवेचनातल्या प्रत्येक घटकाचा पाश्चिमात्य परंपरेतला वापर आणि गुरुदत्तनं केलेला वापर यांतली साम्यस्थळं खोपकर दाखवतात आणि त्याचं वेगळेपणसुद्धा दाखवतात. त्यामुळे वाचकाला आपोआप एक सखोल आणि व्यापक ज्ञान मिळत जातं.

र.कृ. जोशी यांचं रचित मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि एकंदर मांडणी ही देखणी आणि तरीही आशयाला साजेशी आहे. पानोपानी असणारी छायाचित्रं ही पुस्तकाचा आशय उलगडून दाखवण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात. त्यामुळे १९८५ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची निर्मितीमूल्यं काळाच्या पुढची आहेत.

हे पुस्तक म्हणजे निव्वळ गुरुदत्तची स्तुती नाही. त्याला नीट न जमलेल्या गोष्टींचं विवेचनही त्यात आहे. त्याशिवाय अतिशय हृद्य वाटावी अशी एक तुलना त्यात आहे. ती ऋत्विक घटक यांच्याशी केलेली आहे. शोकनाट्य (ट्रॅजेडी) हा गुरुदत्तच्या तीनही चित्रपटांचा गुणविशेष आहे. तोच क्षोभनाट्याच्या घाटातून मांडणारे ऋत्विक घटक हे गुरुदत्तव्यतिरिक्त अजून एक भारतीय दिग्दर्शक आहेत. या दोघांची कलात्मक तुलना आणि आपापल्या कलाकृतीतून महाकाव्य (एपिक) साकारण्याचे दोघांचे प्रयत्न यांविषयीचं सखोल आणि महत्त्वपूर्ण विश्लेषण पुस्तकात आहे.

गुरुदत्तच्या व्यक्तिगत आयुष्याचा लेखाजोखा घेणं पुस्तकात अभिप्रेत नाही. पण त्याची कला आणि त्याची जीवनदृष्टी यांचं नातं सांगता सांगता गुरुदत्तचा करुण अंत टळण्यासाठी काय व्हायला हवं होतं याचाही थोडा अंदाज खोपकर देतात. आत्मनाशाच्या प्रेरणेविषयी फ्रॉईडनं जे मनोविश्लेषणात्मक विवेचन केलं आहे त्याचाही आधार ते घेतात, आणि आपल्या अंतर्मनाला गुरुदत्त का स्पर्श करू शकतो हेही सांगतात.

सरतेशेवटी हेही नोंदलं पाहिजे की निव्वळ गुरुदत्तचे सिनेमे कळण्यासाठी पुस्तक उपयोगी नाही तर त्याचं मूल्य त्याहून खूप अधिक आहे. आंतरजालावर आणि बाहेरही आज अनेक जण चित्रपट किंवा पुस्तक यांचं रसग्रहण करणारे लेख लिहीत असतात. त्यांना पुष्कळ स्तुतीही अनुभवायला मिळते. पण तीमुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याऐवजी ज्यांना सखोल आणि सघन रसग्रहणात्मक लिखाण कसं करावं याचे धडे हवे असतील, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक वस्तुपाठ आहे. असं लिखाण करण्यासाठी जो चौफेर अभ्यास लागतो तो कसा हवा, हेसुद्धा त्यात दिसेल. निव्वळ ‘टाईमपास’ करण्यासाठी पुष्कळ चित्रपट/पुस्तकं जगात असताना गंभीर चित्रपट/पुस्तकं यांच्याकडे का वळावं, याचंही उत्तर कदाचित त्यात मिळू शकेल.

पुन्हापुन्हा वाचावंसं वाटणारं, प्रत्येक वाचनात एखादा सुहृद भेटल्याचा अनुभव देणारं आणि काहीतरी नवीनही उलगडून दाखवणारं हे पुस्तक अभिजात मराठी पुस्तकांच्या यादीत समाविष्ट करण्याला मला तरी काही पर्याय दिसत नाही.

गुरुदत्त – तीन अंकी शोकांतिका
लेखकः अरुण खोपकर
प्रकाशकः ग्रंथाली (१९८५)

कलासंस्कृतीनाट्यवाङ्मयइतिहाससमाजचित्रपटलेखशिफारसमाध्यमवेधप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Feb 2011 - 7:38 pm | बिपिन कार्यकर्ते

पुस्तक वाचणे आलं आता!!!

धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

22 Feb 2011 - 8:23 pm | श्रावण मोडक

हेच म्हणतो. आणखी असेही म्हणतो की, बिका तुझे वाचून झाले की दे मला. मी प्रामाणिकपणे पुस्तके परत करतो हे तुला माहिती आहेच. :)

निखिल देशपांडे's picture

22 Feb 2011 - 8:40 pm | निखिल देशपांडे

बिका तुझे वाचून झाले की दे मला. मी प्रामाणिकपणे पुस्तके परत करतो हे तुला माहिती आहेच. Smile

असेच म्हणतो.. पुस्तक वाचावेसेच लागणार
फक्त बिका पुस्तक द्यायला किती वेळ लावेल याचे उत्तर माहिती नाही

मुक्तसुनीत's picture

22 Feb 2011 - 8:14 pm | मुक्तसुनीत

धन्यवाद. पुस्तक कॉलेजात असताना वाचलेलं होतं. आता परत त्याची स्मृती उजळून निघाली. हे पुस्तकही मिळवून वाचावे . "अम्हांस आम्ही पुन्हा पहावे" या मर्ढेकरांच्या ओळीप्रमाणे :-)

जाताजाता : या पुस्तकातल्या अनेक गोष्टी विखंडित स्वरूपात आठवताएत. एक थरारून टाकणारी आठवण : प्यासा (की इतरही ?) चित्रपटातल्या येशू ख्रिस्ताच्या पोझ मधे उभ्या असलेल्या गुरुदत्तच्या विविध प्रतिमा. (आठवा : विजय चे लायब्ररीत पुस्तकांच्या रॅकला टेकून उभे असणे.) पुस्तकातला हा भाग अविस्मरणीय आहे.

विजुभाऊ's picture

22 Feb 2011 - 11:24 pm | विजुभाऊ

पुन्हापुन्हा वाचावंसं वाटणारं, प्रत्येक वाचनात एखादा सुहृद भेटल्याचा अनुभव देणारं आणि काहीतरी नवीनही उलगडून दाखवणारं हे पुस्तक अभिजात मराठी पुस्तकांच्या यादीत समाविष्ट करण्याला मला तरी काही पर्याय दिसत नाही.

असहमत .पुस्तक अभिजात वगैरे असे काही वाटले नाही. गुरुदत्तची चित्रपट बनवण्यामागची विचारसरणी जाणवले हे मात्र महत्वाचे.
नायकाचे न नायकत्व लिहिणे असा प्रकार काही ठीकाणी झालाय.
पुस्तकातील चित्रे सुम्दर आहेत.
एखाद्या कथेवर चित्रपट निर्मान होत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो हे देखील उमजते.
पुस्तक एकदम फालतू नाही एकदा वाचायल बरे आहे. पारायणे करावे असे नक्कीच नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2011 - 11:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. पुस्तक परिक्षण म्हणून सदर लेख आवडला.
२. पुस्तक वाचावं असंही त्यापुढे वाटलं.
३. पुस्तक समजण्यासाठी गुरूदत्तचे निदान हे तीन चित्रपट पुन्हा पहावेत अशी इच्छाही निर्माण झाली.

०.१४ कोणी पुस्तक आणि चित्रपटांच्या व्हीसीडी/डीव्हीडी उधार देणार का?

सन्जोप राव's picture

23 Feb 2011 - 4:21 am | सन्जोप राव

वुडहाऊस आणि बालगंधर्वांसारखा गुरुदत्तही अतिशय आवडतो किंवा अजिबात आवडत नाही. गुरुदत्तला समजून घेणे हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीचा आणि कुवतीचा भाग आहे. परीक्षण / रसग्रहणावरुन पुस्तक वाचावेसे (कदाचित पुन्हापुन्हाही) वाटत आहे. अशा प्रकारच्या काही पुस्तकांनी ('एक होता गोल्डी', '....and Pran')अपेक्षाभंग केलेला असला तरीही.
चिंजं यांचे लिखाण (मुक्तसुनितांच्या लिखाणासारखे) स्कॉच व्हिस्कीसारखे आहे. 'ऑन दी रॉक्स' वाचायचे असेल तर मग एखाद्या शास्त्रीय संगीताच्या लाँग प्लेच्या पार्श्वभूमीवर दोन तासात दीड पेग घ्यावा लागेल. आमच्यासारख्या 'एक क्वार्टर, ठंडा सोडा, बरफ और पानी, दो रोस्टेट पापड, एक पिलेट बुर्जी, दो गोल्डफ्लेक' अशा पार्श्वभूमीवर गुत्त्यात पिणार्‍यांना त्यात वारंवार पाणी घालून ते प्यावे लागते. पण तरीही स्कॉच ती स्कॉचच.

साहब - बीवी और गुलाम खूप आवडला होता. फार स्ट्राँग कॅरॅक्टरायझेशन (व्यक्तीचित्रण) आहे म्हणून. फारच आवडला होता.
प्यासा आणि कागज के फूल पहावेसे वाटतात.
परीक्षण आवडले.

सहज's picture

23 Feb 2011 - 6:55 am | सहज

कृपया पुस्तक वाचायला द्यावे, पास्तीसचा नजराणा पोहोचवला जाईल.

सिनेमाविषयी सकस लिहिण्यासाठी मुळात इतर कला, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याशीच भिडावं लागतं हे ते सांगतात. ‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’ हा कळीचा विचार ते मांडतात.

तरी हे पुस्तकातील वाक्य आहे (१९८५ मधे लिहले होते) का धागालेखकाचे? १९८५ मधे लिहले असले तर मसंवरच्या सोकॉल्ड समिक्षकांच्या मर्यादा इथेच स्पष्ट झाल्या आहेत. २५ वर्षे होउनही शिवराळ अतिवैयक्तिक समिक्षा करणारे, संग्रहात कितीही पुस्तके भरली तरी डोक्यात अक्कल येतेच असे नाही वगैरे वगैरे.. असो मोठे वक्ते यायच्या अगोदर गल्लीतल्यांनी माईकवर वटवट करुन घेतली समजायचे. श्रोत्यांची सुटका केल्याबद्दल चिंजं यांना अनेक धन्यवाद. आशा आहे की किरकोळ गल्लीसमिक्षक आता निवृत्त होतील.

श्री चिंजं आदर आहेच व वाढतच आहे.

चिंतातुर जंतू's picture

23 Feb 2011 - 10:14 am | चिंतातुर जंतू

एक थरारून टाकणारी आठवण : प्यासा (की इतरही ?) चित्रपटातल्या येशू ख्रिस्ताच्या पोझ मधे उभ्या असलेल्या गुरुदत्तच्या विविध प्रतिमा. (आठवा : विजय चे लायब्ररीत पुस्तकांच्या रॅकला टेकून उभे असणे.) पुस्तकातला हा भाग अविस्मरणीय आहे.

हे खरं आहे. रोमँटिक नायक ही संकल्पना आणि ख्रिस्ताच्या मिथक-प्रतिमेचा पाश्चिमात्य परंपरेत तिच्याशी असणारा संबंध हे खोपकर उकलून दाखवतात. मुळातच ख्रिस्ताचा विद्रोह रोमँटिक पठडीतला कसा होता हे ते सांगतात. ख्रिस्तानं देवळातून व्यापार्‍यांना हाकलून देणं हा प्रसंग आणि 'ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है' म्हणणारा 'प्यासा'मधला कवी विजय यांच्यातलं साम्यही ते दाखवतात.

‘विश्लेषणाची थंडगार सुरी आणि ऐंद्रिय अनुभवाचं उबदार अखंडत्व यांच्या द्वंद्वातून सहृदय टीका निर्माण होते’

हे वाक्य पुस्तकातलं आहे. उद्धृत केलं आहे म्हणून अवतरण चिन्हांत टाकलं आहे.

गुरुदत्तची चित्रपट बनवण्यामागची विचारसरणी जाणवले हे मात्र महत्वाचे

ओह. तरीही प्यासाचा नायक निष्कर्मवादी वाटला हे रोचक आहे.

swatee rathod's picture

25 Feb 2011 - 7:03 pm | swatee rathod

Where can I get this book ? I want to read it.