अगत्यार जीव नाडी (पुर्वरंग) भाग १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
25 Feb 2010 - 9:14 pm

अगत्यार जीव नाडी (पुर्वरंग) भाग १
"

"माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. मी देवाला मानत नाही. या नाडी ग्रंथ भविष्यावर तर माझा बिलकुल विश्वास नाही. तरीही तुमच्या महर्षींची कसोटी घ्यावी व जमलेच तर माझ्या समस्येचे निराकरण करावे म्हणून मी इथे आलो आहे."

तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई उर्फ मद्रास. तमिळ संस्कृतीची देखील ती राजधानी आहे असे म्हटले तर फार अतिशयोक्ती होणार नाही. त्या ठिकाणी वडपळणी उपनगर आहे. पूर्वी फार लोकप्रिय, बालपणातील आठवणींचे "चांदोबा" हे मुलांचे मासिकाचे प्रकाशन, याच भागातील कार्यालयातून अनेक वर्षांपासून होत असे. तो प्रभाग नाडी भविष्यासाठी ही असाच लोकप्रिय आहे.

पूर्वी ओम उलगनाथन त्यांच्या ईरटै जीवनाडीचे अदभूत वाचन या भागातील एका मंदिरापाशी करत असत. त्याचे अनुभव, पत्ता माझ्या हिंदी मराठी पुस्तकात आहेत. आता सध्या अगत्यार किंवा (अगस्त्य) जीव नाडीचे वाचन श्री.हनुमत दासन या भागातील करत असतात. त्यांच्या जीव नाडीवाचनात आलेले काही अनुभव, किस्से "दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचे स्वैर भाषांतर श्री.विश्वनाथ गोपी करतात. मराठी वाचकांना त्यातील काही अनुभवांची ओळख करून देणे हा य़ा लेखाचा उद्देश आहे. त्या अनुरोधाने नाडी ग्रंथ भविष्याची सामान्य ओळख करून देऊन नाडी लेखनकर्त्या महर्षींचा भविष्य लेखनामागील उद्देश स्पष्ट करण्याचे कार्यही घडेल.

नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.

ज्यांना नाडी ग्रंथ भविष्याची काहीच माहिती नाही त्यांच्या सोईसाठी थोडक्यात असे सांगता येईल की या महर्षींनी आपल्या प्रज्ञाचक्षूंच्या सामर्थ्यावर अनेकांचे जीवनपट पाहिले व आपल्या निर्देशनाखाली शिष्यगणांकडून त्याची काटेकोरपणे नोंद केली व अनंत काळपर्यंत मानवाला उपयोगी पडणाऱ्या नाडी ग्रंथ भविष्याची निर्मिती केली.

नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो. त्या रेषांच्या ठेवणीवरून महर्षींनी १०८ विभाग पाडलेले आहेत. नाडीकेंद्रात त्यापैकी उपलब्ध पट्यांशी त्या ठशांना पडताळून त्यांच्याशी जुळणाऱ्या पट्यांचे पॅकेट आणले जाते. नंतर त्यातील एकएक पट्टीतील थोडा थोडा मजकूर वाचून तो जातकाच्या माहितीशी जुळतो का, ते पाहिले जाते. बऱ्याच न जुळणाऱ्या पट्या बादकरून शेवटी एक अशी पट्टी येते की त्यातील सर्व माहिती जातकाशी तंतोतंत जुळते. उदाहरणार्थ स्वतः नाव, आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, जन्मतारीख, वार, महिना, साल, व त्यावेळची आकाशस्थ ग्रहांची स्थिती, शिक्षण. नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, मुलाबाळांची संख्या व अशी काही माहिती जी केवळ त्याच व्यक्तीला ताडता येऊ शकते. त्यानंतर जेंव्हा व्यक्ती आपणहून मान्य करते की पट्टीतील सर्व माहिती १००टक्के जुळते आहे. तेंव्हाच त्या पट्टीतील कूट तमिळ लिपितील मजकूर एका ४० पानी वहीत सध्याच्या तमिल भाषेत उतरवला जातो. त्यावरून भाषांतरकाराच्या मदतीने एकएक वाक्याचा सावकाश अर्थ लाऊन ते सर्व एका ऑडिओ कॅसेटमधे रेकॉर्ड करून मग ती वही व कॅसेट ग्राहकाला सुपुर्त केली जाते व मग मेहनताना पूजारुम मधील शिव-पार्वतीच्या, महर्षींच्या फोटो समोर ठेवायला सुचवले जाते.

कुंडलीतील बारा स्थाने व्यक्तीच्या जीवनातील महत्वाच्या अंगांचा विचार करतात. त्याच धर्तीवर लग्न स्थानाच्या भविष्याला जनरल किंवा पहिल्या नंबरचे कांडम असे म्हटले जाते. त्यात सर्व स्थानांचे त्रोटक भविष्य कथन केले जाते. एखाद्याला कोणा एका विशिष्ठ स्थानाचे जास्त भविष्य जाणून घ्यायचे असेल तर उदा. विवाह विषयक ७ नंबरचे, नोकरीसाठी १० नंबरचे कांड काढून त्यातून विशेष माहिती मिळवता येते. नाडी ग्रंथ भविष्याचा पाया पुनर्जन्म व कर्मविपाक सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे पुर्वजन्मातील पाप-पुण्यांच्या कमीजास्त प्रमाणात व्यक्तीला विविध मंदिरांना भेटी तेथे पुजा-अर्चना, अन्न-वस्त्र-जलदान, अपंगांना मदत करण्याला सुचवलेले असते. शिवाय जपसाधनाही सुचवली जाते. सध्याच्या धामधुमीच्या जीवनरहाटीत तो जप करण्याचा भार आपण नाडी केंद्राला सांगून करवून घेता येतो. त्याच्यासाठी वेगळा मेहनताना घेतला जातो.

हा झाला नाडी भविष्य जाणण्याचा सामान्य प्रकार. या शिवाय जीव नाडी असा एक विशेष नाडीचा एक प्रकार आहे. त्यात महर्षींशी आपण सद्यपरिस्थितीत आपल्या समस्या कथनकरून, त्यावर सल्ला-विचार विनिमय करून त्यातून वाट शोधू शकतो. सामान्य नाडी पट्टीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर करून सांगताना अनेकदा तात्कालिक समस्यांवर महर्षी काही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांचा विरस होतो. नाडी ग्रंथ भविष्याबद्दल नाही नाही त्या शंका येऊ लागतात. जीवनाडीतून अशा समस्यांचे-शंकांचे समाधान होते. असो.
अगत्यार जीव नाडीचे अनुभव भाग २ मधे वाचा...

स्वैर अनुवादक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१०४९.

मांडणीसंस्कृतीवाङ्मयकथाभाषाव्युत्पत्तीसमाजजीवनमानज्योतिषआस्वादअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

II विकास II's picture

25 Feb 2010 - 10:14 pm | II विकास II

मन लावुन वाचला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

---
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

नितिन थत्ते's picture

25 Feb 2010 - 10:50 pm | नितिन थत्ते

तात्या, यांना आणि युयुत्सुंना एक वेगळं संकेतस्थळ काढून द्या बरं !!
नितिन थत्ते

शुचि's picture

25 Feb 2010 - 10:51 pm | शुचि

आपला व्यासंग दांडगा वाटतो. लेख आवडला.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)