Jack_Bauer भाऊंचे उसगावच्या दौर्याचे प्रवास वर्णन वाचून आम्हालाही आमी लिहीलेल्या एका प्रवासवर्णनाची आठवण झाली. तेव्हा मुक्तपिठ नामक मुक्तपिठल्यावर गाजत असलेल्या कुणा काकुंच्या अमेरिकेचे प्रवासवर्णन वाचून आम्हालाही प्रेरणा झाली होती. (प्रवासवर्णन लिहिण्याची प्रेरणा)
आता ते इथे टाकावं की नको, पोस्टू की नको करत एकदाचं पोस्टूनच टाकलं.
********************************************************
मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो. (आमच्याकडे आजकाल प्रत्येक वळणावर आढळणार्या भाजीच्या गाडीला मंडई म्हणण्याची प्रथा आहे. कसं भारदस्त वाटतं). आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो. आधी सौ बाहेर पडल्या नंतर मी. (लोक म्हणतात बायकोच्या तालावर नाचतो, पण हा जमाना Woman Empowerment चा आहे याचा कोणी विचारच करत नाही). दाराला कुलूप लावून शेजारीच असलेल्या लिफ्टचे बटन दाबले. तशी सौ ने हाक दिली, “अरे, आपले आता नेहमी जिन्यानेच उतरायचे आणि चढायचे ठरलेय ना. शेजारच्या गोडबोलेकाकूंनी ,”तुझ्या नवर्याची तब्येत सुधारलीय हो आजकाल.” असे सांगितल्यापासून सौ. कायम सारख्या माझ्या पोटाकडे (त्याला ती ढेरी म्हणते) नजर ठेवून असतात. चक्क दोन इंच आणि दिड सेंटीमीटर वाढलीय तुझी ढेरी. असे ती मला येता जाता सांगत (हिणवत) असते. मी विरोध करायचा प्रयत्न केला पण या आधी कधीच मी माझ्या पोटाचा आकार मोजलेला नसल्याने ते आधी किती इंच आणि किती सेंटीमीटर वगैरे होते हे नक्की माहीत नाही. त्यामुळे खात्रीने नक्की किती वाढलेय हे मी सांगू शकत नाही. ती याचाच गैरफायदा घेते.
असो तर आम्ही (थोड्या-थोडक्या नव्हे) तब्बल साडे तेवीस पायर्या उतरून खाली आलो. जिन्याची सगळ्यात खालची पायरी अर्धी तुटलेली आहे म्हणुन साडे तेवीस. शेजारच्या गोडबोलेकाकूंच्या हातातून सुटलेला त्यांच्या मुलीचा गाऊन त्या पायरीवर पडला होता म्हणे. ( आमची ही फणकार्याने म्हणते, त्या गाऊनमध्ये गोडबोल्यांची सुमी पण होती हे नाही सांगत मेली) असो, तर साडे तेवीस पायर्या उतरून आम्ही आमच्या दुचाकीकडे निघालो.
रस्त्यात मध्येच पसरलेल्या जगतापांच्या टिप्या*कडे पाहात आम्ही हळूच स्मित केले तर त्याने चक्क मान फिरवली. (जगतापांची सुशी वाईट्ट मारु दिसते आणि ती कायम टिप्याबरोबर खेळत असते).
“परवा तू देशपांडे काकांना ऐकवण्याच्या मिशाने त्या चकण्या सुशीला आपली नवीन कविता (खरे तर सौ. ‘नव-कविता’ म्हणाली होती) ऐकवत होतास ना, तेव्हा ती कविता टिप्याने पण ऐकली होती. त्यामुळेच कदाचित त्याने मान फिरवली असावी."
(कधी कधी मला शंका येते, मी हापिसाला गेल्यावर आमची ही त्या गुप्तहेर खमणरावांची सेक्रेटरी म्हणून पार्टटाईम काम करते की काय? कमाई बरी होत असावी. कारण गेल्या आठवड्यात माझ्या पायजम्याच्या खिश्यात असलेल्या अकरा रुपये पंचाहत्तर पैशापैकी फक्त ९ रुपये आणि ३५ पैसेच गायब झालेत)
असो, दुचाकी पाशी पोचल्यावर लक्षात आले की कुलूपाची चावी वर घरातच राहिली आहे. आमच्या दुचाकीचे कुलूप गेल्यावर्षी चोरीला गेले, तेव्हापासून मी दुचाकी नेहमी साखळीने बांधून ठेवतो. (खरे सांगायचे तर मी चावी मुद्दामच विसरून आलो होतो. दुचाकीचे टायर खुप लवकर झिजतात हो आजकाल. गुणवत्ता म्हणून कसली ती राहीलेली नाहीये बघा). सुदैवाने आमच्या बिल्डींगीपासून भाजी मंडईपर्यंत यायला कुणीही टांगेवाला यायला तयार नसल्याने आम्ही चालतच जायचे ठरवले. तसेही आमच्या कॉलनीच्या फाटकाबाहेर पडले की डाव्या हाताला शंभुसाचे मिरची कांडप यंत्र आहे, त्याच्या शेजारीच झोप्या मारुती. (नाही..नाही, इतिहास वगैरे काही नाही. रिकामटेकडे लोक दुपारची जेवणं झाली की तंगड्या पसरायला या मारुतीचा पार गाठतात म्हणून तो झोप्या मारुती) तर आम्ही तेथपर्यंत चालत जाऊन (तेवढ्येच क्यालरी बर्नींग पण होते हो) भाजी आणायची असे ठरवले. चालत चालत, रमत गमत, आजुबाजुचे निसर्गसौंदर्य (म्हणजे ती निसर्ग पाहत होती आम्ही सौंदर्य पाहात होतो) न्याहाळत आम्ही मंडईपर्यंत येवून पोचलो.
त्या कोपर्यावर बसलेल्या आज्जीबाईला मिरच्या आणि कोथिंबीर कडिपत्ता मागताच…
“मुडद्या, आतपाव मिरच्या मिळायचे दिस हायेत का हे? आन रुपयात कोतमीर कडिपत्ता तुझ्या काकानं तरी दिला व्हता का रे?” असे तीक्ष्ण शरसंधान करत चारचौघात आमची XXX काढली. आम्ही पण अजिबात ऐकून घेतले नाही. “थांब थेरडे, तुझी तक्रारच करतो मुक्तपिठल्याच्या चौकीत म्हणजे कळेल तुला?” असा सज्जड दम दिला आणि सौभाग्यवतीच्या चेहर्यावरचे कौतुकाचे भाव बघत पुनश्च घराच्या दिशेने परतीच्या प्रवासास लागलो. त्यानंतर काही दिवसांनी त्यावेळी आमच्या सौभाग्यवतींच्या डोळ्यातले भाव कौतुकाचे नसुन कुत्सीतपणाचे असतील असा अतिकुत्सीत शेरा गोडबोलेकाकूंनी मारलाच. त्यावर मीही त्यांना ,”आजकाल तुमच्या सुमीचे वजन कमी झाल्यासारखे वाटतेय” असे म्हणून सुड घेवूनच टाकला. तर अशाप्रकारे आमचे हे मंडईप्रवासाचे प्रवासवर्णन पुर्ण झाले.
आगामी आकर्षणः पुढच्या वेळी, मागच्या वेळेस आम्ही दुचाकीच्या चाकात हवा भरून घेण्यासाठी शेजारच्या गल्लीतल्या वरल्ड्फेमस “मर्चीडेस सायक्ल शॉप’ मध्ये गेलो होतो, त्या प्रवासाचे साद्यंत प्रवासवर्णन सादर करु.
वि.सु. : आमच्या शेजारच्या गोडबोलेकाकुंचा जर तुम्हाला फोन आला तर त्या सांगतील की आमच्या बिल्डींगीला लिफ्टच नाहीये. तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण ते खरेच आहे. बिल्डींगीला लिफ्ट असली की स्टेटस वाढतो असे एका थोबडापुस्तिकेवरच्या स्नेह्याने सांगितल्याकारणे आम्ही तसा उल्लेख केलेला आहे. पण गोडबोलेकाकुंचा तुम्हाला फोन येणारच नाही कारण त्यांच्याकडे फोन नाहीये आणि त्या शेजार्यांकडे फोन करायला गेल्या की लगेच शेजार्याचा (आमचा पण) फोन बिघडतो. ठेंगा !
*टिप्या : हा जगतापांचा अतिशय गोंडस कुत्रा आहे.
पूर्वप्रकाशित
ईरसाल म्हमईकर
प्रतिक्रिया
30 Jun 2015 - 8:35 pm | एक एकटा एकटाच
आमची ही फणकार्याने म्हणते, त्या गाऊनमध्ये गोडबोल्यांची सुमी पण होती हे नाही सांगत मेली
हे मस्त होत
30 Jun 2015 - 8:48 pm | श्रीरंग_जोशी
'पूर्वीचं मिपा राहिलं नाही आता' असे म्हणता येणार नाही आता :-) .
विडंबन आवडलं.
30 Jun 2015 - 9:17 pm | अत्रुप्त आत्मा
@असे म्हणता येणार नाही आता.>>> +++१११ अगदी सहमत.. ह्ही ह्ही ह्ही!
30 Jun 2015 - 9:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त खुसखुशीत लिहिता ! अजून लिहा.
30 Jun 2015 - 9:14 pm | मुक्त विहारि
छान लिहिले आहे...
30 Jun 2015 - 9:15 pm | पैसा
पुलंची आठवण यावी असं लिहिलंस! =))
1 Jul 2015 - 8:55 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी _/\_
1 Jul 2015 - 10:02 am | नाखु
फुडचा कट्टा झोप्या मारूती पाशी ...
वि.सू. पथारी आपली आपण आणणे विशाल्या फक्त खादाडीची सोय करणार है.
पहिली गोष्ट : विडंबन झक्कास.
"न्युय्यार्क फ्लोअर मिल " व "इंटर्नॅशनल स्टोव रिपेरिंग मार्ट" ची प्रवास वर्णण लवकर टाकावे.
याचकांची पत्रे.
1 Jul 2015 - 10:47 am | विशाल कुलकर्णी
वि.सू. पथारी आपली आपण आणणे विशाल्या फक्त खादाडीची सोय करणार है.
मान्य, जे कोणी महाशय झोप्या मारुतीची झोपण्याची जागा शोधून काढतील त्यांना माझ्यातर्फे (वरील प्रवासात आणलेल्या) कोथिंबीरीची वडी आणि तोंडी लावायला हवाबाण हर्डा सप्रेम.
बाकी याचकांच्या पत्रांवर प्रायोजक मिळाले की लगेच विचार करण्यात येइल.
1 Jul 2015 - 10:25 am | अजया
झक्कास प्रवासवर्णन!!
1 Jul 2015 - 11:00 am | आदूबाळ
प्रवासवर्णनात (गो० सुमीचे आणि ज० सुशीचे) फोटो नाहीत??
1 Jul 2015 - 12:22 pm | विशाल कुलकर्णी
प्रवासवर्णनात (गो० सुमीचे आणि ज० सुशीचे) फोटो नाहीत??
आम्हांस वाटलेच अजून हा प्रश्न कसा आला नाही? हा घ्या फोटो...
वरच्या अंगाला उजव्या बाजूस हिरव्या लुगड्यात दिसत्येत ती गोडबोल्यांची सुमी आणि तिच्या शेजारी दोन म्हशी (त्यातल्या एक सौ. गोडबोले आणि दुसरी त्यांची दुरची मैत्रीण आहे) सोडून लाल लुगडे नेसलेली ती जगतापांची सुशी आहे.