अकिला & दी बी ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
13 Oct 2011 - 9:11 am

शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही.
लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्‍या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत. आणि दुसर्‍या बाजुला अत्यंत कठिण आणि शिक्षणाला बिलकुल 'अयोग्य' अशा परिस्थीतीतही धैर्याने व चिकाटीने अभ्यास करुन गुणवत्ता यादीत झळकणारे गुणवंत आहेत.
वर्षानुवर्षे शिक्षणाचा अधिकार नाकारल्या गेलेल्या किंवा न मिळालेल्या समाजातुन दैनदिन जगण्यातला संघर्षही संभाळुन यश मिळवणार्‍यांची अनेक उदाहरणे आहेत.

'Akeelah and the Bee*' ही गोष्ट आहे अशाच एका लढ्याची आणि त्यात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाची...

'अकिला अँडरसन', केवळ ११ वर्षाची, चारचौघींसारखीच म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा थोडी कमीच असलेली निग्रो वंशाची साधी मुलगी. घरात नवर्‍यापासुन वेगळी झालेली आई, २ बहिणी आणि १ उडाणटप्पु भाऊ असल्यावर कुटुंबाची सर्वसाधारण जी आर्थिक आणि सामाजिक स्थिती असेल अगदी तशीच ह्या कुटुंबाची असते. आपल्या मुलीने भरपुर शिकावे आणि एखादे मानाचे पद मिळवावे अशी अपेक्षा तिच्या आईची असते व म्हणुनच अशा हालाखीच्या परिस्थीतीतही अकिलाचे शिक्षण सुरु राहते.
मात्र अकिलाला वेड असते ते 'शब्दांचे स्पेलिंग पाठ' करण्याचे, ह्या वेडाच्या नादात तिचे अर्थातच इतर शिक्षणाकडे जरासे दुर्लक्षच होत असते व त्यानंतर आई नाराज होणे वगैरे सोपस्कार घडतात.
मात्र अकिलाची पॅशन एकच ... शब्दांचे स्पेलिंग अचुक सांगणे / घोकणे / पाठ करणे.

घरातल्या काही निमित्ताने ती टिव्हीवर चालु असलेल्या 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी' ह्या स्पर्धेचा शेवटचा भाग पाहते व आपणही हे बक्षिस मिळवु शकतो अशी एक इच्छा तिच्या मनात निर्माण होते.
अकिलाच्या शिक्षिका व खासकरुन त्या शाळेचे मुख्याध्यापक तिला शाळेतल्या शाळेत होणार्‍या 'दी बी( स्पेलिंग स्पर्धा)' मध्ये भाग घ्यायला लावतात.
ह्या शाळेच्या स्पर्धेत लाजणारी, जनसमुदायासमोर येऊन स्पेलिंग सांगताना आतुन घाबरलेली, समोर होणार्‍या टिंगलटवाळीला वैतागुन गेलेली आणि त्यामुळे थोडी नर्व्हस अन विचलीत होणारी 'अकिला'...
आणि त्या नंतर आधी शाळा, मग जिल्हा, मग राज्य अशा सर्व पातळ्या पार करत थेट 'राष्ट्रीय स्पर्धेला' धैर्याने, मोकळेपणाने आणि एका जबरदस्त आत्मविश्वासाने सामोरी जाऊन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी अकिला ...
असा हा प्रवास आणि त्याचेच हे चित्रण असलेला 'Akeelah and the Bee' ...

ह्या प्रवासात आपल्याला भेटतात ते स्पेलिंग तज्ज्ञ आणि अकिलाचे कोच असणारे डॉ. लॅरबी, अकिलाबरोबर ह्या विजेतेपदासाठी झुंझणारे झेवियर आणि डिलन नावाचे परस्परांविरुद्ध अ‍ॅटिट्युड असणारे २ विद्यार्थी.
कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग तयार करताना नुसते पाठांतर न करता त्यामागची पार्श्वभुमी, शब्दाचा उगम असलेली भाषा, जोडाक्षरांचे महत्व, शब्दाची व्याख्या आणि तो शब्द वाक्यात वापरताना त्यामागे असलेले साधारण नियम आणि त्यामागची भुमिका प्रथम समजावुन घेणे आवश्यक असते ह्या तत्वाला चिटकुन राहणारे डॉ. लॅरबी. शब्दाचे स्पेलिंग सांगताना एक लय प्राप्त व्हावी, एकाग्र व्हावे म्हणुन त्याचाही सराव करुन घेणारे डॉ. लॅरबी.
आणि ह्याउलट केवळ स्पेलिंग 'पाठ' करण्याच्या घोकमपट्टी पद्धतीवर विश्वास असणारा डिलन आणि त्याचे वडिल. ह्यासाठीच सर्व इतर छंद आणि विरंगुळा ह्यांना फाटा देणारे डिलन आणि त्याचे वडिल, मजेतल्या खेळातही एकदम खालच्या स्तरातुन आलेल्या अकिलाने चक्क २ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता असलेल्या डिलनला चांगलेच झुंजावल्याने नाराज आणि अस्वस्थ असणारे डिलनचे वडिल.
ह्या आणि अशा इतर व्यक्तिरेखांद्वारे आपण ह्या संपुर्ण प्रवासात अकिलाबरोबर असतो.

राष्ट्रीय स्पर्धेत शेवटच्या फेरीतला अकिला आणि डिलनचा सामना पाहण्यासारखा आहे. डिलनला ह्यावेळी स्पर्धा जिंकणे आवश्यक असण्याचे प्रेशर समजलेली अकिला, त्यासाठी जी काही मदत करता येईल ते करु म्हणुन मुद्दाम स्पेलिंग चुकणारी अकिला आणि अकिला स्पेलिंग मुद्दाम चुकली आहे हे जाणुन स्वतःही पुढचा शब्द चुकीचा स्पेल करणारा डिलन आणि त्यानंतर दोघांच्यातला संवाद हे सर्व मजेशीर आहे.
अशा चित्रपटचा शेवट नक्की काय होणार हे सर्वांनाच माहित असेल, पण तो कसा होतो हे पाहणे रंजक ठरेल.

ह्या चित्रपटाचे गुणवत्तामुल्य, निर्मीतीमुल्य किंवा अन्य भव्यदिव्यता किती ह्यावर मला काही लिहायचे नाही, ते महत्वाचे नाही.
पण २ तास निखळ मनोरंजन करणारा आणि 'स्पेलिंग बी' सारख्या वेगळ्या विषयाला हाताळणारा हा चित्रपट पाहणे नक्कीच एक चांगला अनुभव असेल ...

टीप : छायाचित्र आंतरजालावर साभार

विकिपेडियावर असलेली ह्या चित्रपटाची माहिती
आयएमडीबीवर ह्या चित्रपटाचे परिक्षण

बालकथाभाषाशब्दक्रीडाशब्दार्थसमाजजीवनमानराहणीमौजमजाचित्रपटलेखशिफारसआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

13 Oct 2011 - 10:13 am | प्रभाकर पेठकर

छायाचित्रे दिसत नाहीएत.

मन१'s picture

13 Oct 2011 - 10:37 am | मन१

बघावा लागणार....

फारएन्ड's picture

13 Oct 2011 - 11:27 am | फारएन्ड

सुंदर परीक्षण. अतिशय चांगला चित्रपट आहे हा. मला खूप आवडला. थोडे स्टीरीओटाईप्स आहेत पण मुलांची कामे इतकी मस्त झाली आहेत की त्यासाठी आणि प्रत्येक "बी" चे जे भाग आहेत त्यासाठी आवर्जून बघावाच.

शेवटही सहज अंदाज लावता येइल असा वाटला नाही.

बाकी हा चित्रपट आवडला तर हे दोनही बघा:
Freedom Writers
The Ron Clark Story

सर्वप्रथम कळफलकावरील धूळ झटकून लिहिता झाल्या बद्दल अभिनंदन. ;)

छायाचित्रांबाबत पेठकर काकांशी सहमत.

चित्रपट पहायचा हे ठरवल्या मुळे केवळ सुरवातच वाचली आहे त्याबद्दल क्षमस्व.

वेगळ्या पठडीतील चांगला चित्रपट सुचवल्या बद्दल आभार. :)

छोटा डॉन's picture

13 Oct 2011 - 11:42 am | छोटा डॉन

अरे बाबांनो एकच छायाचित्र आहे, ते पण सिनेमाचे पोस्टर आहे, ते कुठेही पाहता येईल, बाकी अजुन काही दाखवण्यासारखे नाही.
बाकी परिक्षणात(?) मी जास्ती काही डिटेल लिहलेच नाही, जस्ट संक्षिप्त स्टोरी लिहली आहे, असो.

पिक्चर जरुर पहा असे सुचवतो :)

- छोटा डॉन

मृत्युन्जय's picture

13 Oct 2011 - 1:33 pm | मृत्युन्जय

चित्रपट पहावासा वाटावा इतके चांगले परीक्षण :)

आत्मशून्य's picture

13 Oct 2011 - 3:30 pm | आत्मशून्य

सर्वप्रथम जेव्हां या स्पर्धेविषयी यूएसे नेटवर्कच्या एका डिटेक्टीव्ह सीरीयलमधे ऐकलं होतं (स्पेलींगसाठी शब्द घालणार्‍या व्यक्तीचा मूडदा पडलेला असतो) तेव्हा "नर्ड" बावळटांचा छंद इतकीच याप्रकाराची संभावना केली होती.... पण परीक्षण वाचून उत्सूकता निर्माण झाली आहे, चित्रपट ट्राय करायची.
बाकी हे अशा धाटणीचे चित्रपट आवडणार्‍यांनी The Great Debaters(२००७) अवश्य ट्राय क्रावा.... डंझेल वॉशिंगटन ने गूर्जीची मस्त भूमीका निभावली आहे.. चित्रपटही मनोरंजक.

फारएन्ड's picture

13 Oct 2011 - 7:19 pm | फारएन्ड

तो ही सुंदर आहे.

चांगले परिक्षण!
हा शिनेमा बघणार.

पैसा's picture

13 Oct 2011 - 7:27 pm | पैसा

चित्रपटाचा विषय नेहमीच्या पठडीतला नाही. पण वास्तवातला आहे. चित्रपट पहायलाच हवा.

व्वा!!!!
ह्या परिक्षणानं चित्रपट पाहण्याची ओढ लावली.
तस्मात आता टॉरंटास शरण गेलो आहे.

अवांतरः परिक्षणे लिहीण्याची ही डॉनरॉव ही ढब कॉपी करावी काय ;-)

प्राजु's picture

13 Oct 2011 - 8:38 pm | प्राजु

डोन्राव इज ब्यॅक!!
मस्त परिक्षण..

बघतो आता हा पिच्चर डाउनलोड करून..

चिंतामणी's picture

14 Oct 2011 - 9:17 am | चिंतामणी

एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

अवांतर- ही स्पर्धा टेलेव्हिजनवर वेळ मिळेल तेंव्हा बघत होतो. गेल्या काही वर्षात भारतीय वशांच्या मुलामुलींचे वर्चस्व आनंद देउन गेले.