तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०६
बुधवार सकाळ - मी उठेपर्यंत, नेहमी प्रमाणे आईचं आवरुन झालेलं होतं. मी अंथरुणं आवरली, खोली झाडुन सकाळचं सगळं आवरुन किचनमध्ये आले. आईचा स्वयंपाक चालु झाला होता. माझी चाहुल लागताच मागे न वळता म्हणाली ’ किती वाजेपर्यंत येशील दुपारी ? तिला बहुधा आज या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावायचा होता. मी म्हणाले ’ शाळा दोनला सुटते, मला यायला अडिच-तिन होतील.’ आई ’ ठिकय, काकांना पण सांग, त्याचवेळी यायला, आणि तु पण त्यांच्याबरोबरच ये. त्याला फक्त पत्ता दे’ मी - ’पण मला त्यांची साईट माहित नाही कुठंय ते? आम्ही फक्त फाट्यावरच भेटलोय, बाकी कुठं नाही.’ ’मग काकांना पण तुझ्याबरोबरच येउ दे, उगा सोसायटित चर्चा नकोत नसत्या.’ इति आई. मी खाली मान घालुनच ’ हो’.
आई आज लवकर येणार असल्याने डबा नेणार नव्हती, माझा डबा भरला आणि ती गेली दुकानात. महादेवकाका सकाळिच येउन चाव्या घेउन गेले होते. माझी पण वेळ झाली होती, मी आवरायला बेडरुम मध्ये आले. आज कोणता ड्रेस घालावा हा प्रश्न नेहमीपेक्षा मोठा होता. कालपर्यंत सगळं कसं मजेत होतं, तो माझ्याकडे पाहायचा, मी त्याच्याकडे, काहीतरी बोलणं, हसणं असं सगळं होतं, अर्थात आमचं भेटणं हे नेहमी जिपमध्येच असल्यानं सगळं एका मर्यादेत होतं, पण काल हे सगळं माझ्या मनातुन बाहेर पडलं होतं, आईला सांगितलं होतं आणि तिनं विश्वास ठेवला होता, त्यामुळं आता एक जबाबदारी वाटत होती,भिति होती. काल पर्यंत मी माझी मीच होते पण आता मी आमच्या घराला रिप्रेझेंट करत होते.
त्याला मी तशी काही आजपर्यंत या लग्नाच्या विषयावरच काय पण प्रेमाबद्द्ल पण कधी बोलले त्याला, आमचं बोलणं व्हायचं ते नेहमी पिक्चर, हिरो हिरोईन, गाणि, शेती पार अगदि आम्हि मेडिकल दुकानात गोळया ऒषधं ठेवतो कशी आणि नंतर ते बरोबर आठवतं कसं इथपर्यंत झाली होती. बार्शीतल्या जवळपास सगळ्या डॊक्टरांच्या हस्ताक्षरांची चेष्टा करुन झाली होती. पण प्रेम आणि लग्न छे कधीच नाही बोललो या विषयावर.
खरंच, का नाही बोललो आम्ही? का माझं त्याच्यावर प्रेमच नाहीये? उगा काल आई म्हणाली म्हणुन मी पण तयार झालेय? का आहे माझं त्याच्यावर प्रेम? अशावेळी मला माझी हक्काची मैत्रिण आठवली. गौरिताई, आता सौ.गौरी. लगेच बाहेर हॊल मध्ये येउन तिला फोन लावला. तिनंच उचलला,
मी - तायडे कशी आहेस ?
गॊरी - का ग ? काय झालं, कालच तर बोलले की अर्धा तास, काय झालंय, काही झालंय का ?
लग्नाआधीच्या मुली लग्नानंतर बायको झाल्यावर एवढ्या आत्मज्ञानी कशा होतात काय ठाउक.? म्हणजे मी पण अशीच होणार की काय आता? मला भिती वाटायला लागली होती.
मी - काही खास नाही ग, सहज केला फोन
गौरी - काल आपण बोललो,त्यावेळी आई बोलली नाही, आज ती दुकानात लवकर गेली आणि तु सहज फोन केलास? खरं सांग काय झालंय घरी ?
मी - अगं काका काकु आले होते काल घरी.
गौरी - त्या काकुच्या बहिणिच्या मुलाबद्दल का? मधे गधे लक्षात ठेव उगा काकांच्या झाशात येउन हो बि म्हणालिस तर. आईला काय ते काही बाही सांगुन पटवतील पण तु फसु नकोस. आपल्या दुकानावर डोळा आहे त्यांच्या आधीपासुनच.
मी - नाही ते नाही, प्रकरण वेगळं आहे, म्हणजे..
गौरी - म्हणजे तुला तुझा अजिंक्य देव भेटला की काय ग मधे ? खरं खरं सांग हं.
मी - अगदि तसंच नाहीये, पण काका काकुंनी आईच्या डोक्यात काहीतरी वेगळंच भरवलंय, - आणि मी पुढं कालचा सगळा प्रसंग सांगितला.
गौरी - मग काय, शायद मेरी शादि का खयाल दिल में आया है’ अगं माजं शोनं गं ते, छोटूकली परी गं ती माझी, मोठी झाली आता, तिला मोठा बाहुला बघायचा आता.
हे बोलता बोलता तिचा आवाज जड झाला, तिकडं ती आणि इकडं मी रडत होते. काहितरी बोलावं हे सुचायच्या पलिकडे गेलो होतो आम्ही. दोन-तिन मिनिटांनी गौरीचा आवाज आला.
गौरी - आता आपली आई किति एकटी पडेल ना ग?
मी - तायडे, मी मुळी त्याला बोलवणारच नाही आज. मला आईला सोडुन जायला नकोच वाटतंय ग ? काल मी तिच्या कुशीतच झोपले होते, लहानपणि झोपायचे ना तिच्या तोंडात बोट ठेवुन तसं.
गौरी - किति दुष्ट आहेस ग, आणि वर सांगते आहेस सगळं मला. मी आता लांब आले ना इकडं लातुरला म्हणुन मुद्दाम सांगतेस ना. - आता तिचा आवाज पुन्हा जड झाला होता. तिला उगाच हसवायचं म्हणुन मी म्हणाले
मी - आई नसली म्हणुन काय झालं आता
गौरी - गप गं लगेच सुरु झाली तुझी बडबड, इकडं माझं आंघोळीचं पाणि गेलं ना गार होवुन.
मी - आत्ता येवढ्या उशीरा आंघोळ, हां काय करत होतीस, एवढा वेळ. पाटलांच्या घरी कसं सडा सारवण झालं पाहिजे सुर्य उगवायच्या आत. फोन करु काय मांजरसुंब्याला ?
गौरी - ए चल गं उशीर होतोय, अजुन सगळं व्हायचंय, हे येतील आत्ता, आज डबा नेला नाही त्यांनी.
मी- ठेव ठेव आता काय आम्ही परके ते जवळचे ना, ठेव.
फोन ठेवला आणि लक्षात आलं की बराच उशीर झाला आहे. शाळा कारखान्याच्या हंगामी कामगारांच्या मुलांची असल्याने वेळेचं फार बंधन नसायचंच, पण तरी वेळेवर जावं लागायचं. त्यात सध्या ही परिस्थिती, तिथं काकांना कळालं मी आली नाहिये तर लगेच आईला दुकानात फोन करतील, आणि आता दहा वाजुन गेले म्हणजे आज एस्टिनंच जावं लागणार होतं, तो नवाच्या ठोक्याला चौकातुन जिप पुढं घ्यायचा. मग पटकन आवरलं आणि लगेच निघाले. एस्टि स्टॆंडपर्यंत ट्म्ट्म्ने येउन लगेच कारखान्याकडे गेले. फाट्यावरुन आत जाताना काकु दिसली, कारखान्याच्या जिपनं बार्शीला चालली होती. मनांत विचार आला, हिला बोलावलं की काय आईनं फोन करुन घरी? पण तेवढ्यात ती खाली उतरुन म्हणाली, ’ माधवी आज सोलापुरला चालले आहे गं, काही आणायचं आहे का तुला, माझं काम चाटिगल्लितच आहे.’ मी तिला दोन ओढण्या आणायला सांगितल्या. ती गेली आणि माझं टेन्शन कमी झालं.
कारखान्याजवळ गेल्यावर आत न जाता डायरेक्ट शाळेत गेले, बाकीचे सगळे जण आपलं आपलं काम करत होते. आता खरी धडधड सुरु झाली होती, इथलं काम झालं की फाट्यावर जायचं, मग तो येणार जिप घेउन, मग त्याला सांगायचं तुम्हाला घरी बोलावलं आहे म्हणुन. जिपमध्ये सांगावं की बाहेरच बोलवावं त्याला ? त्याला वेळ असेल का आज ? तो येईल का ? पुन्हा काल रात्रीचे प्रश्न रिपिट होत होते. बरोबर काम करण-या एका मुलीच्या हे लक्षात आलं. ति पण हातातलं काम आटोपुन माझ्याकडे आली आणि विचारलं ’ माधवी, बरं वाटत नाही का ग? काही हवंय का? काही होतंय का ?’ या होतंय का चा रोख माझ्या लक्षात आला, उगाचच बावरल्यासारखं होवुन गेलं आणि मनातल्या मनात तारखा मोजु लागले.
एक तास झाला, आता मनाचा हिय्या करुन उठले, विचार केला काय होईल ते होईल, आता मागं फिरुन चालणार नाही. बाकीच्यांना सांगुन कारखान्याच्या आत गेस्ट हाउसच्या टॊयलेट मध्ये जाउन कपडे निट केले आणी तशीच बाहेर पडले, चालत फाट्यावर आले. फाट्यावर एक दोन शाळेतल्या मुली होत्या, बाकी कुणि नाही. एक-दोन मिनिटात एक पॆसेंजरची जिप आली, थांबली, एकदा वाटलं जावं यातुनच, ते विचारणं नको आणि ती नकाराची भिती पण नाही मग. पण आता मन ऐकत नव्हतं. गुपचुप उभी राहिले, जिप गेल्यावर जाणवलं की एका अनोळखी पण मोहक रस्त्यावर जातेय आता, भुलभुलैया वाट्तोय खरा पण समोरच्या झाडावरची फुलं पण बोलवतातय. आणि तेवढ्यात त्याची जिप आली. बहुधा माझं लवकर येणं त्याला अनपेक्षित असावं. धुराळा खाली बसल्यावर नीट पाहिलं, आज त्यानं चक्क पांढरा शर्ट घातला आहे, इस्त्रीचा आणि इनशर्ट. काही तरी वेगळं आहे असं वाटलं. काही न बोलता जिपमध्ये चढले, आज मुद्दाम तो पुढच्या सिटला टेकुन बसला होता, त्यामुळं चढताना जिपचा पाईप पकडताना त्याच्या खांद्याला हात लागत होता, त्याच्या अंगावरचा शहारा मला आतपर्यंत थरथरवुन गेला. आधी पण हा स्पर्श झाला होता एक दोन वेळा, पण हे असं आत कुठंतरी काही होत नव्हतं.
आत बसले, त्या दोन मुली दुस-या बाजुनं बसल्या. माझी ओढणी बाहेर उडायला लागली म्हणुन थोडी आत सरकले, आज त्यानं हात सिटच्या पाठिवर ठेवला होता, बार्शी- वैराग रस्ता हा असा, आता हात धरावा पुढं तर हाताला लागतोय नाही धरावा तर नीट बसता येत नाहि. आज सगळंच काहीतरी वेगळं होतय एवढंच फक्त जाणवत होतं बास. मधल्या शिंदेवस्ती फाट्याला त्या दोन पोरी उतरल्या आणि मागं मीच एकटी उरले. आता माझा उतरायचा स्टॊप फक्त १० मिनिटाच्या अंतरावर होता. तोंड कोरडं पडत होतं, मी पुढं हात सिटला हात धरला की तेवढ्यापुरता तो हात खाली घ्यायचा, पुन्हा वर. मला तर आता राग यायला लागला होता, पण बोललं तर पाहिजे होतं. आम्ही गावात वळणार त्याच्या आधीच त्यानं विचारलं ’ तुम्हाला घराकडं सोडु देत का ? आज आम्हाला आहे थोडा वेळ. ’ माय गॊड, माझा विश्वासच बसत नव्हता जे मी ऐकलं त्यावर. आजच आईनं त्याला बोलवायला सांगावं, आजच काकु सोलापुरला जावी, आज मी लवकर निघावं, आज याच्या जिपमध्ये कोणि जास्त गर्दी असु नये, हे सगळं काय चाललंय. आणि त्यात आजच त्यानं विचारावं घराकडं सोडु का ?
जसं सुखाच्या ओझ्याखाली स्वताला हरवुन बसायला होतं ना तशी मी आता झालं होते. तेवढ्यात त्याच्या ड्रायव्हरचा आवाज आला ’ लवकर सांगा काय ते, एकदा सिटित गेलं की लई गर्दी होतिय परत उलटं यायला.’. एकदम भानावर आले आणि मनात पहिला विचार आला, याला कसं माहित एकदा गावात गेलं की आमच्या घराकडे यायला खुप गर्दीच्या आणि बोळाबोळातुन यावं लागतंय ते ? लगेच त्याचा प्रश्न,’ सोडुना तुम्हाला घराकडं?’ माझं उत्तर गेलं अभावितपणे ’ हो, चालेल. ’ त्यावर त्याचा पुढचा प्रश्न ’ मग सांगा कसं जायचं ते, उजवीकडं की डाविकडं ?. मनात म्हणलं,(मला काय विचारताय, तुमच्या ड्रायव्हरला विचारा की माहित असेलच त्याला सगळं) आणि मग मागुनच आता उजवीकडं, त्या वखारीच्या थोडं आधी खालच्या बाजुला जायचंय सुरु झालं, एकतर ह्या इथं मागं बसुन काही दिसत नव्हतं, आणि त्यामुळं सारखं पुढं वाकावं लागत होतं. पण तो आणि ड्रायव्हर, दोघांपैकी कोणिही माझ्याकडं पाहत नव्ह्तं, ड्रायव्हरला तर शक्यच नव्हतं रस्त्यावरच्या कोंबड्या, शेळ्या आणि डुकरातुन वाट काढतानाच त्याची सर्कस होत होती, पण तो सुद्धा फक्त पुढंच पाहत होता. का जाणे मला त्याचं हे वागणं आवडुन गेलं. शेवटी एकदाचं घर आलं, म्हणजे आमचं घर रस्त्यापासुन थोडं आत आहे.
आता उतरणं भाग होतं, जिभ हलतच नव्हती तोंडात. कशीबशी उतरले, सगळा जीव गोळा केला आणि फटकन बोलुन गेले ’ चला ना घरी चहा घेउन जा’ उत्तराची वाट न पाहता किंवा तो येईलच अशा आशेनं सरळ त्याच्याकडं पाठ फिरुन घराकडं जायला लागले. पर्समध्ये किल्ली पाहिली तर नव्हती, आज त्या बरोबरच्या मुलीला शाळेत किल्ल्या दिल्या होत्या, त्या परतच घेतल्या नव्हत्या. मागे पाहिलं, अंदाज घेतला तो जिपमधुन उतरत होता, मी माझा वेग उगाच थोडा कमी केला. त्यानं दोन -चार पावलातच गाठलं मला. आता मी पुढं आणि तो मागं चालायला लागलो. कुणिच बोलत नव्हतं. माझ्या मनात निवडुंग पिक्चर मध्ये रविंद्र मंकणि आणि अर्चना जोगळेकर चालत असतात तो सिन येत होता. आता बनसोडे काकुंकडे चावी मागायला गेले, त्याला वाटलं हेच आमचं घर, म्हणुन त्यानं जरा केस नीट केले वगैरे. मी काकुंकडुन किल्ली घेतली, पुढं निघालो, मागे पाह्ते तो अपेक्षेप्रमाणे बनसोडे काका व अमित उभे होते, त्यांची बघण्याची त-हा काही वेगळीच होती, आई काल रात्री अशाच बघण्याबद्दल बोलत होती बहुधा.
घरी आले,गेट उघडुन आत आलो.आईला हाक मारली. तिनं दरवाजा उघडला, मागं त्याला पाहुन थोडी गोंधळलीच. बहुधा मी त्याला घरी बोलावेन यावर तिचा विश्वास नसावा किंवा मी असला लगा बघेन असं तिला वाटलं नसावं. होते तेंव्हाही त्याचे केस पांढरे होते थोडे पण अगदि लक्षात येण्यासारखं नसले तरी आईच्या नजरेतुन कसे सुट्तील बरे. मी आत आले, त्याला काहीच बोलले नव्हते, या वगैरे. परत मागे वळले, तेवढ्यात त्याचा आवाज आला ’ नमस्कार’ एव्हाना आई पण सावरली असावी, तिनं त्याला आत बोलावलं.
आई आत आली, हळुच म्हणाली ’ हेच का ते ? मी खाली मान घालुनच मान डोलावली. आई म्हणाली’ जा हात पाय धुवुन कपडे बदलुन ये जरा’ मी हात पाय धुतले आणि नेहमीच्या सवयीनं टॊवेल हातात घेउनच बाहेर गेले, तो अजुन उभाच होता,’ बसा ना तुम्ही उभे का ? त्याला म्हणलं. मला लागलेल्या वेळावरुन आत आईच्या लक्षात आलं की मी तशीच वेंधळ्यासारखी बाहेर आली आहे. माझ्या घरात आणि आई बरोबर असताना माझा नर्व्हसपणा पण आता गेला होता.आईनं आत बोलावलं तशी आत गेले. कपडे बदलुन बाहेर जाउन त्याला विचारलं ’तुम्ही काय घेणार, चहा की सरबत? ’चहा’ त्याचं उत्तर आणि देताना चेहरा असा की ’ चहा साठी बोलावलं ना मग सरबत काय विचारताय वेड्यासारखं?’. सवयीनं पटकन पलंगावर बसता बसता आईला सांगितलं ’ आई चहाच टाक आम्हाला’.
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ५http://misalpav.com/node/17011
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ४ http://misalpav.com/node/16771
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ३ http://misalpav.com/node/16697
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - २ http://misalpav.com/node/16340
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - १ http://misalpav.com/node/16083
प्रतिक्रिया
4 Mar 2011 - 11:06 pm | विजुभाऊ
हर्शद छान लिहीले आहेस.
तू नक्की हर्शद आहेस की हर्शदा?
4 Mar 2011 - 11:45 pm | प्रशांत
छान लिहीले
भाग ०७ कधि येणार..?
5 Mar 2011 - 2:00 am | नि३
एकच प्रसंग पण दोघांच्या वेगवेगळ्या रितीने फुलवीला हे विशेष..
आवडले..
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..
5 Mar 2011 - 10:53 am | प्राची
सहमत..
5 Mar 2011 - 2:28 am | Mrunalini
पुढचा भाग कधी??? लवकर येउद्या.. :)
5 Mar 2011 - 8:56 am | प्रचेतस
हाही भाग मस्तच जमलाय. एकदम सुरेख, प्रवाही, संगतवार लिखाण. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतो आहे हे सांगणे न लगे.
5 Mar 2011 - 9:38 am | प्रास
.
5 Mar 2011 - 9:37 am | प्यारे१
अय्या हर्षू,
कशी आहेस गं ....???
बोलली नाहीस इतके दिवस कधी?? कित्ती कित्ती छान लिहितेस गं?
जरा जपून रहा गं बाई. ही हल्लीची मुलं म्हन्जे ना.
अर्थात त्यांना तरी काय बोलणार? आपणच वेडेपणा करतो झालं.
अशा वेळी कुणी सल्ले दिलेले आवडत नाहीत माणसाला. म्हणजे तसा बरा वाटतोय पण तरी सांभाळूनच हो.
5 Mar 2011 - 10:23 am | नगरीनिरंजन
छान लिहीलंय. भाग ७ च्या प्रतीक्षेत.
5 Mar 2011 - 11:24 am | हरिप्रिया_
मस्त...
सगळ डोळ्यांसमोर उभं राहतंय..
लवकर लवकर पुढचा भाग टाका...
5 Mar 2011 - 12:15 pm | पिंगू
दोन्ही हृदयांच्या भावनेतील लेखमाला सहजपणे उतरली आहे.
पु.ले.शु.
- पिंगू
5 Mar 2011 - 12:39 pm | धनुअमिता
छान लिहिले आहे.हा भाग सुद्धा उत्तम झाला आहे.पुढील भाग लवकर येउ द्या.सगळं डोळ्यांसमोर उभं राहतंय..पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
5 Mar 2011 - 2:53 pm | RUPALI POYEKAR
तुम्हि खुपच छान लिहिता, अगदि डोळ्यासमोर सर्व चित्र उभं राहतं, लिहित रहा वाचत आहोत.
5 Mar 2011 - 3:42 pm | पिलीयन रायडर
मजा येतेय... फक्त लवकर लवकर टाक पुढचे भाग...
5 Mar 2011 - 4:09 pm | स्पा
हर्षद सारखा एक उत्कृष्ट लेखक मिपाला गवसलाय, एवढेच म्हणतो
जियो.. मस्त
5 Mar 2011 - 5:42 pm | विनायक बेलापुरे
कथाभाग न वाटता एक सलग कादंबरी वाटत आहे.
पुढचा भाग वाचायला अत्यंत उत्सुक आहे.
5 Mar 2011 - 8:15 pm | पैसा
दोघांच्या आत्मनिवेदनातून पुढे सरकणारी कादंबरी..
6 Mar 2011 - 11:31 am | शिल्पा ब
मीसुद्धा हेच म्हणते.
5 Mar 2011 - 5:32 pm | स्वाती२
छान जमलाय हा भागही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
5 Mar 2011 - 10:52 pm | क्रान्ति
हर्षू, छानच लिहितोस रे!
6 Mar 2011 - 12:23 am | निनाद मुक्काम प...
कांदबरी प्रकाशित करायला काहीच हरकत नाही .प्रचंड सफाईदार आणे अजिबात विस्कळीत न वाटणारे लिखाण ( ह्या गोष्टीचा हेवा वाटतो )
आमचे लिखाण असे असते तर ............
तुम्ही असे चांगले लिखाण लिहितात म्हणून आमच्या नावाने शिमगा होतो .
निवडुंग च्या प्रसंगाची उपमा सरस
लग्न झाल्या नंतर बायाकांमधील बायकांमधील वैचारिक प्रगल्भतेचा चढता आलेख ही संकल्पना मान्य .. (स्वानुभव )
6 Mar 2011 - 1:19 pm | पियुशा
आवडेश !:)
6 Mar 2011 - 2:45 pm | मुलूखावेगळी
छान लिहिलेय
6 Mar 2011 - 3:09 pm | इंटरनेटस्नेही
मस्त! आवडला. खरोखर कादंबरी येऊनंदेत याची! :)
पु. ले. शु.
6 Mar 2011 - 4:18 pm | स्पंदना
का ओढुन धरताय इतक? आता येउदे पुढ काय झाल ते ! काय हुर हुर भुर भुर वाटत नाही होय आम्हाला?
9 Mar 2011 - 10:27 am | नितीन बोरगे
आवडला.
(पण आज पुढच्या भागाची तारीख नाही टाकली?)
9 Mar 2011 - 10:28 am | भरत
भरपुर भागाची कादबरी आहे असे वाटते
9 Mar 2011 - 12:10 pm | माझीही शॅम्पेन
ग्रेट !!!
खरोखर प्रतिभवान लेखक आहेस :) , कल्पनाविलास नसावा इतक खर आणि धारधार लेखन
मला तुझ्या सहज शैलिचा हेवा वाटतोय.. पुढचा भाग लवकर चढवा हर्षद
11 Mar 2011 - 9:44 pm | किशोरअहिरे
अरे भौ पुढील भाग कधी टाकतोय :(
21 Mar 2011 - 10:50 am | ५० फक्त
http://misalpav.com/node/17341