तुमचं आमचं सेम -- भाग ०९
कालचा रविवार माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा रविवार ठरला, माझं लग्न ठरलं. म्हणजे नक्की काय झालं? कळत नकळत मी त्याच्यावर प्रेम तर केलं होतंच, फक्त त्याला एक अर्थ मिळाला, एक संमती मिळाली.या संमतिशिवाय त्या प्रेमाला काही अर्थच उरला नसता ना, त्याचं महत्व माझ्या आणि त्याच्या मनातच राहिलं असतं. मनोमनी मी त्याची आणि तो माझा झाला असता पण, शरीरानं आम्ही वेगळेच राहिलो असतो. मग जुळलेल्या मनांची कथा या समाजानं मान्य करावी म्हणुन हा शरीरं जुळवुन येण्यासाठी परवानगी देण्यासाठी केलेला उद्योग.एखाद्या दुस-या मुलाला तास - अर्धा तास भेटुन, घरातल्या सगळ्या मोठ्या समजुतदार मंडळीनी घेतलेल्या निर्णयानुसार लग्न झालं असतं तरी पण नंतर प्रेम करता आलंच असतं ना, का ते प्रेम नसतं झालं ? ती फक्त एक कर्तव्यापुर्तता झाली असती. आलिया भोगासी असावे सादर अशी. प्रेम करणं ही लग्न करण्यासाठि आवश्यक गोष्ट आहे की, लग्नाबरोबरच प्रेम आपोआप येतं. एकावर एक फ्री.
सकाळी सकाळी उठुन, गच्चीवर येउन गुलमोहोराचा कचरा काढ्त हे असं काहीतरी डोक्यात येत होतं, कालपर्यंत तो हवा होता आणि आज मिळणार आहे याची खात्री झाल्यावर ही अशी चिरफाड चाललीय. काल संध्याकाळी परत येताना ताईला असंच काहीतरी विचारल्यावर ती म्हणाली ’ मधे, अजुन गद्धेपंचविशी यायचीअ तुझी, असलं काहीतरी डोक्यात आणु नकोस. आता लग्न होणार आहे तुझं, थोडी मोठ्यासारखी वाग आता.’ तरी बरं हे मोठ्यासारखं वागायला शिकवायला ती येणार आहे इथं, आणि या मोठं होणं प्रशिक्षणवर्गाचा कालावधी पण थोडाच आहे, मोजुन ३३ दिवस. मग दुसरा अंक सुरु. ’मधे, गधडे वर काय करतेस सकाळी सकाळी, खाली ये पटकन’ आईच्या हाकेला ओ देखील न म्हणता खाली गेले. महादेवकाका आले होते, आज ते थांबले होतं,काल काय काय ठरलं त्या चर्चा झाल्या. मी आत आले ’नमस्कार कर काकांना’ नमस्कार केल्यावर.काकांनी डोक्यावर हात ठेवला, असाच हात ते दर पाड्व्याला, दस-याला आणि दिवाळीला ठेवायचे, एक मिनिट्भर. त्यांच्या अंगात गावाकडचे कोणि बाबा यायचे म्हणे. हात काढुन महादेवकाका म्हणाले ’ तुझ्या मनासारखं होतंय सगळं, पण एक सांगतो आईची जबाबदारी तुझीच आहे, कमी पडलीस तर बघ, बाबा फार रागावेल तुझ्यावर,आणि आता त्याचा मार कसा बसेल तुला कळणार सुद्धा नाही’. महादेवकाका, मला समजायला लागलं तेंव्हापासुन बाबांच्या बरोबर होते. घरातल्या प्रत्येक निर्णयात सहभागी होते, ब्रम्हचारी असल्यानं त्यांना एक वेगळंच महत्व घरात होतं, त्यांच्याही आणि आमच्याही.
लग्न रजिस्टर करायचं ठरलं होतं, पुण्याच्या कुण्या शाळेच्या स्त्रीपुरोहित वैदिक पद्धतीनं लग्न लावणार होत्या. मला असल्या तपशीलात फार इंटरेस्टच नव्हता. पण या मागचं महत्वाचं कारण दोन्ही घरची आर्थिक परिस्थिती होती हे खरं. घेणं देणं असं काही नव्हते. कपडे ज्यांनी त्यांनी करायचे होते फक्त एकमेकांच्या पसंतीनं, हे कलम मी घुसवलेलं, अन्याच्या आडुन. त्याची कपड्यांची निवड माझ्याएवढीच अन्याला पण नापसंत होती. माझ्याच वयाचं त्या घरात कुणितरी असणं खुप फायद्याचं होतं माझ्यासाठी. महादेवकाकांच्या बरोबर आई चर्चा करत असताना मी पोहे करत होते, आणि एक एक अडचणी समजत होत्या. लग्न आमच्या घरासमोरच करायचं होतं, तरीपण मांडव, जेवणं, पाहुणे, ओळखीचे सगळं मिळुन खर्च ७०-८० हजारात जाणार होता. पुन्हा आग्रहाचे आणि मानापानाचे आहेर करणं भाग होतं. आम्हां दोघींच्या लग्नासाठीच्या सोन्याची तयारी बाबांनी करुन ठेवलेली होती. साठवलेला पैसा पुरेसा पडणार नव्हताच, त्यामुळं पैशाची जुळवाजुळव कशी करायची ते ठरत होतं. काका, काहीतरी देणारच होते. कन्यादान तेच करणार होते ना, मामा काही आला नसता, आणि आला तरी आईला ते आवडलं नसतं.
दोन-तीन दिवसांनी ताई आली, जिजाजीपण आले होते. एक रात्र थांबले. त्यांनी स्वताहुन ५ हजार रुपये दिले, वर पाहुण्यांसाठी दोन टेम्पोची व्यवस्था करतो म्हणाले. सकाळी ते गेल्यावर आई त्यांचं कौतुक काका-काकुंना सांगत होती, तेंव्हा ताई मला आत सांगत होती ’मग, काय झालंय न द्यायला, लग्नात चांगले २० हजार घेतलेत की सरकारी नोकरी आहे म्हणुन’. पुढच्या काही दिवसात अशा ब-याच गोष्टी ऐकायला आणि शिकायला मिळणार याची ही सुरुवात होती. प्रेम आणि लग्न सोपं असलं तरी, सासरी ते सासर आपलं होईपर्यंत नांदणं फार कठिण आहे, असा माझा समज होत होता.
दररोज, सकाळी न चुकता येणारा अन्याचा फोन. काय काय झालं याची उजळणी. दोन -तीन दिवसातुन एक फोनवर चर्चा आईची व त्याच्या आईंची. यात पंधरा दिवस गेले. कपड्यांची खरेदी आम्ही इकडंच केली होती, त्यांच्या खरेदीच्या दिवसाचा प्रत्येक तासाचा रिपोर्ट मला अन्याकडुन कळाला होता, तिला एकदा लाडोबा म्हणाले तर त्याचा मात्र तिला राग आला होता. स्त्री पुरोहित या प्रकाराची आमच्याकडे थट्टाच जास्त होत होती, ते सगळं त्याच्या आईच पाहात होत्या, त्या पुण्याला जाउन ठरवुन आल्या होत्या. घरातलं मंडप, आचारी हे सगळं महादेवकाका व काका करत होते. माझी पसंती फक्त शालु व पाच साड्यांपुरती विचारण्यात आली होती. मला शालु त्याच्या कोटाच्या रंगाला मॅच होणारा घ्यायचा होता, पण इथंही तायडिचा अनुभव मध्ये आला. ’ दोन महिन्यात त्याला कोट लहान व्ह्यायला लागेल, काही मॅचिंग बगैरे पाहु नकोस. तुला जो आवडेल तो घे.’ इति ताई. मग त्यातच गुपचुप त्याला एक शर्ट घेउन आले होते. पण तो त्याला द्यायचा कसा हा प्रश्न होताच. शेवटच्या चार पाच दिवसात तर जाम गडबड होती, कारण काका बाहेरच्या कामातुन कटाप होते, देवदेवक त्यांना व काकुला करावं लागणार होतं, म्हणुन ते तिकडं परांडेकर गुरुजींच्या हाताखाली नाचत होते.
ताई घरातलं सगळं पाहात असल्यानं आई दुकान व बाह्रेरचं सगळं पहात होती. महादेवकाका, त्यांच्या पुतण्याला घेउन आले होते. तो आणि त्याची बायको, हाताखाली होते त्यामुळं काही वाटत नव्हतं, आणि मला तसंही काही काम नव्हतं. त्याच्याशी दोन -तीनदा फोनवर बोलणं झालं होतं आणि एकदा भेटलो आणि दिदिएलजे पहिला होता . पण जसजसा लग्न दिवस जवळ जवळ येत होता, तसं तसं मला अजून अवघड होत होती. हे सगळं सोडुन जायचं, का? त्याच्यासाठी का माझ्या स्वार्थासाठी ? माझ्या प्रेमासाठी मी हे आई बाबांचं घर का सोडायचं? तो जर मला प्रेम देणार असेल तर हया घरानं पण मला प्रेमच दिलं होतं ना. उलट प्रेम म्हणजे काय ते या घरानंच मला शिकवलं होतं.
तीन वर्षांपुर्वी जेंव्हा मागचा गुलमोहोर वादळी पावसांत वेडावाकडा झाला होता, रात्रभर आम्ही सगळे हॉलमध्येच बसुन होतो. सकाळी उठुन पाहिलं तर त्याची एक मोठी फांदी भिंतीवर टेकली होती पण त्यामुळं खिडकीच्या काचा फुटायच्या वाचल्या होत्या. ते पाहुन बाबा म्हणाले होते ’ तुझ्या आईच्या गुलमोहोराचं घरावर प्रेम आहे, भिंतीला तडा गेलाय पण काच नाही फुटु दिली नाही लेकरानं ’.
आता दररोज रात्री मी, ताई व आई एकत्रच झोपायचो.लहानपणी सारखं, इकडं मी, तिकडं ताई आणि मध्ये आई, आणि आईनं तोंड कुणाकडं करायचं यावरुन भांडण व्हायचं आमचं. पण आता भांडण होत नव्हतं. ताईच आता आईकडं पाठ करुन झोपायची.
लग्न चार दिवसावर येउन ठेपलं, त्याचा रात्री फोन आला. खुप पाहुणे आलेले, त्यामुळं फोनवर काहीच ऐकु येत नव्हतं. शेवटी आई सगळ्यांना रागावल्यावर सगळे शांत झाले. जिजाजी,काहीतरी सिरियस बोलत होते, शेवटी बरं बघतो मी म्हणुन फोन ठेवला. ’काही नाही. बारातियोंका स्वागत पानपरागसे होना चाहिये। अशी फर्माईश आहे तिकड्ची.’ असं बोलुन टाळलं. नंतर जेवण झाल्यावर कळालं की आजिचिर नावाचा जो काही प्रकार असतो, तो आहेर आमच्याकडुनच व्हायला हवा होता,त्याची एकुलती एक आत्या जी हैदराबादकडं कुठंतरी राहायची तीचा आहेर आणि पोटझाकण पण आम्हीच घ्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. असले बरेच प्रकार ताईच्या लग्नात झालेलं असल्यानं फारसं काही टेन्शन नव्हतं पण ते जमवलेलं लग्न होतं आणि हे प्रेमातुन झालेलं त्यामुळं इथं हे असलं काही होणार नाही असं आम्हाला वाटत नव्हतं. आम्ही तर याद्या वगैरे पण केलेल्या नव्हत्या, सगळं तोंडिच ठरलं होतं.
यानंतर मात्र कोणत्याही गोष्टित मी लक्ष घालायचं नाही असं ताईनं बजावल्यावर मी सुद्धा माझ्याच विश्वात रमुन गेले. माझी मेंदी, मैत्रिणिंनी आणलेले मेकपचं सामान. साखरपुड्याची साडी, तिच्यावर पडलेला सुपारीचा डाग नि-यात लपवायची धांदल, एक ना दोन. माझ्या मैत्रिणिंच्या मध्ये लग्न झालेली एकच सुमति आणि आता कॅरिंग सुद्धा, त्यामुळं गच्चीवर सुमतिबरोबर बोलत बसले की, ताई येउन विचारायची ’ झाली का २१ अपेक्षितची उजळणी,पाठ करा पुन्हा एकदा मोस्ट आयएमपि, ऐनवेळी घोळ नको.’ त्यावर सुमति हसत म्हणायची ’ होय तायडे,फक्त डायग्राम काढायच्यात येतिय का काढायला? आणि दोघी जाम हसायच्या मी मात्र हसु येत असुन हसु का नको या गोंधळात पडायची. त्यातच अजुन एक अनुभवी मैत्रिण आली, सोलापुरची अनघा. तिचं लग्न होवुन दिड वर्ष झालेलं. आणि मग तर या तिघी मिळुन रात्री गच्चीवर झोपायला गेल्यावर बराच वेळ गप्पा मारत बसायचो. मला मात्र ’ उघड्या आभाळाखाली झोपु नको, ये खाली’ या महादेवकाकांच्या आदेशानुसार खाली घरातच झोपायला जावं लागायचं.
आज दुपारी व-हाड येणार होतं काल जिजाजी पण आले होते, ताईचे सासु सासरे पण आले होते, आमचं घर पुन्हा एकदा लग्नघर झालं होतं, एका वर्षातच. आमच्याकडचे मुक्कामी येणारे सगळे पाहुणे आले होते. आता तर मी घराच्या बाहेरच पडायचं नव्हतं, त्यामुळं आलेल्या पाहुण्यांबरोबर गप्पा, आहेर दाखवणे,बघणे मंगळसुत्राच्या डिझाईनचं कॊतुक, शालुचा रंग, मॅचिंग चपला, मला सगळं सगळं ताईच्या लग्नासारखंच हवं होतं,आणि ताईला तिच्या लग्नात राहिलेल्या काही गोष्टी पुर्ण करायच्या होत्या.
संध्याकाळी साखरपुडा,आणि परवा लग्न. साखरपुड्याला परांडकर गुरुजी येणार होते पण लग्नाला ज्ञानप्रबोधिनीच्या ज्या स्त्रिपुरोहित येणार होत्या, त्या दुपारीच आल्या, त्यांनी आई,काका,काकु,जिजाजी,ताई, तिचे सासु सासरे,महादेवकाका आणि मी असं सगळ्यांना बसवुन लग्न कसं लावणार आहेत ते १ तासभर समजावलं.त्यांच्या पुस्तकाच्या ५-१० कॉप्या देउन त्या गेल्या. मी ते पुस्तक वाचत होते, तेवढ्यात जिजाजी येउन म्हणाले ’ छे, फार अवघड आहे हा प्रकार. आधि त्या बाई काहितरी सांगणार मग हे दोघं काहितरी म्हणणार, मग आपण काहितरी म्हणायचं. मॅडम तुमचा नटुन थटुन मिरवायचा चान्स गेला बरं का वाया, आता गप्प बसायचं एका ठिकाणि.’ शेवटचे वाक्य ताईला उद्देशुन होतं. तसं तर ताईच्या सासु-सासरे, महादेवकाका, काका-काकु आणि आई कोणालाच हे फारसं पसंत नव्हतं, पण या सगळ्यांच्या तोंडावर पैशाची बचत हा हुकुमाचा एक्का त्याच्या आईनं टाकल्यानं सगळे गप्प होते.
दुपारीची जेवणं झाली, आता फायनल तयारी चालु होति. सगळं घरासमोरच असल्यानं कुठं उचलुन न्यायचं नव्हतं पण तरी खास लग्नघराचा जो असतो तो गोंधळ होताच. हळदीकुंकु सापडलं तर ओटीच्या सुपा-या सापडत नव्हत्या, चिवडा लाडुचे पाकिट सापडले तर आहेराला आणलेले पिस सापडत नव्हते. आलेले पाहुणे, शेजार-पाजारचे सगळे मदतीला होते. व-हाडाची आज रात्री रहायची सोय,कॉलनीतल्याच एक-दोन रिकाम्या घरात केली होती. आमचे ३०-४० पाहुणे आलेले होते, इथले सगळे उद्याच येणार होते, लग्नाला. साखरपुड्याचं सामान काढता काढता ताईच्या सासुनं विचारले ’ किती जण येणार आहेत ग तिकडुन’ ताई म्हणाली ’ साधारण ३०-४० च असतील येणारे.’ ’ का ग ? एवढेच का?’ ताईची सासु. ’ अहो फक्त नातेवाईक यायचेत,ओळखीच्या पाळखिच्यांसाठी सोलापुरला रिसेप्श्न करणार आहोत आम्ही, तळ्याच्या काठावर हो किनई ओ चिसॊकांमाधवी.
फोन वाजला,काकांनीच घेतला,मग तिथुनच जोरात ओरडुन सांगितलं’ निघालं बरं का व-हाड, बाळ्याला खंडोबाला जाउन येतील पुढं,चला आवरा आवरा आवरा, आणि घराचि घाई घाई अजुन वाढुन आता खरोखरीची लगीनघाई झाली.
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -८ http://misalpav.com/node/17421
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -७ http://misalpav.com/node/17341
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -६ http://misalpav.com/node/17104
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ५ http://misalpav.com/node/17011
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ४ http://misalpav.com/node/16771
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ३ http://misalpav.com/node/16697
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - २ http://misalpav.com/node/16340
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - १ http://misalpav.com/node/16083
प्रतिक्रिया
5 Apr 2011 - 10:14 am | प्रीत-मोहर
ह्म्म्म...मस्त ....लग्नापर्यंत आल गाड :)
5 Apr 2011 - 10:40 am | गवि
काय लिहू..
एकदम इन्वॉल्व करुन टाकलं आहेत या सीरीजमधून आम्हाला..
अफलातून..
5 Apr 2011 - 12:17 pm | स्पा
काय लिहू आता
तुफान ...
5 Apr 2011 - 11:57 am | सुरमईश्याम
अप्रतिम.......
5 Apr 2011 - 12:00 pm | प्रचेतस
हर्षद, सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभा करायची तुझी हातोटी जबरदस्तच आहे रे.
असो. लग्नाची जोरदार तयारी आता थेट लग्नापर्यंत येउन पोचलीय. अंतरपाटाची वाट पाहतोय आता.
5 Apr 2011 - 12:08 pm | सविता००१
अप्रतीम
5 Apr 2011 - 12:12 pm | sneharani
लग्नघरातील लगीनघाई आली आता मंडपातीलपण येऊ दे!
येऊ दे पुढचा भाग!!
5 Apr 2011 - 12:34 pm | विनायक बेलापुरे
सकाळी सकाळी उठुन, गच्चीवर येउन गुलमोहोराचा कचरा काढ्त हे असं काहीतरी डोक्यात येत होतं, कालपर्यंत तो हवा होता आणि आज मिळणार आहे याची खात्री झाल्यावर ही अशी चिरफाड चाललीय.
अगदी अचूक उपमा दिली आहे ....... मस्त
5 Apr 2011 - 3:40 pm | इरसाल
जाम भारी , लै भारी, एक्दम भारी ................................अजुन काय ?
5 Apr 2011 - 4:13 pm | स्पंदना
शालुचा रंग नाही सांगितला? अन कोणता हे ही नाही सांगितल, म्हणजे बनारसी, कांजीवरम ?
हॅ हॅ हॅ!! भारी येउद्या अजुन! एव्हढ्या अक्षता सुखरुप पडु देत रे देवा!
5 Apr 2011 - 4:24 pm | पियुशा
येऊ दे पुढचा भाग!!
:)
5 Apr 2011 - 5:12 pm | वपाडाव
अव्वल रे मित्रा....
चला.. भर मे मध्ये लग्न न होता... एप्रिलातच पार पडेल असं वाट्टंय...
कामं करताना जास्त थकवा येणार नाही...
आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे..
आहेर आणावा... स्विकारल्या जाईल...
दादाच्या लग्नाला यायचं हं !!!!
- वप्या, स्पा, इंट्या, वल्ली
5 Apr 2011 - 6:12 pm | मुलूखावेगळी
खुप मस्त जमलाय हा भाग पन
आम्ही अक्षता घेउन तयार आहेत हो :)
लवकर टाका पुढचा भाग
5 Apr 2011 - 7:28 pm | धमाल मुलगा
चित्रदर्शी लेखन आहे.
प्रत्येकाला आपल्या घरातल्या लग्नाच्या धावपळीची, धांदलीची आठवण आलीच पाहिजे असं कऽऽडक लिहितोयस.
मस्त मजा येतेय :)
आणि ह्या सगळ्या धांदलीच्या दरम्यानचे हळूवार, हळवे क्षण टिपण्याचं कसब तर लाऽऽजवाब!
6 Apr 2011 - 3:48 pm | पैसा
सहमत.
5 Apr 2011 - 11:39 pm | निनाद मुक्काम प...
हम आपके हे कौन ( मराठीतून )
पु ले शु
6 Apr 2011 - 2:36 am | किशोरअहिरे
पुढचा भाग लवकर येऊदेत..
फार वाट पाहायला लावतो :)
तिच्या आईचे काय होईल हिच्या लग्ना नंतर हा क्लायमेक्स भारी जमला हाय .. काय नाय काय.
6 Apr 2011 - 12:34 pm | चावटमेला
एखादा चित्रपट झरझर डोळ्यासमोरुन सरकत जावा असे वाटतेय अगदी :) छानच, पुढील भाग येवुदे लवकर..
8 Apr 2011 - 2:14 pm | ५० फक्त
ह्या भागाच्या प्रतिसादांसाठी अतिशय धन्यवाद, पुढचा भाग http://misalpav.com/node/17575 इथं टाकला आहे.