तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०७
आई चहा घेउन आली तोपर्यंत कोणिच काही बोललं नाही, तो इकडं तिकडं पाहात होता, मी कॉटवर बसुन होते, हातातली बांगडी फिरवत होते. आई चहा घेउन आली, तिच्यासाठी सरबत केलं होतं. मला वाटलं सगळ्यानांच सरबत करायला हवं होतं. चहा घेताना त्याच्या मनात हेच आलं असणार म्हणुन त्यानं काहि विचारायच्या आधीच मी बोलले ’ बाबा गेल्यापासुन आईनं चहा सोडलाय’ त्याला काहितरी बोलायचं होतं, किंवा त्यानंच काहीतरी बोलणं सुरु करावं असं मला वाटत होतं. मला असं सगळं गप्प बसुन असले की फार भिती वाटते. आता काय होईल काय नाही असं वाटत राहतं. अगदि परवा परवा पर्यंत आई माझ्याशी बोलायची नाही माझ्याशी शिक्षा म्हणुन, त्यामुळं कुणि बोलत नसलं की मला माझंच काही चुकलं आहे असं वाटायला लागतं. आत्त्ता ही तसंच झालं होतं. काय चुकलं असावं याचा विचार करत होते. याच्यावर प्रेम केलं हे का आईला सगळं सांगितलं ते का याला घरी बोलावलं ते का अजुन काही. छे कालपासुन नुसते प्रश्न पडताहेत आणि कशाचीच उत्तरं मिळत नाहीयेत.
’तुम्ही मुळचे बार्शिचेच का?’ त्याचा आवाज आला आणि मी हुश्श केलं. लगेच संवाद पुढं नेला, थोडी माहिती दिली. पण आईला आवड्लं नसावं. तिनं मला कप बशा घेउन आत जायला सांगितलं. किचनमध्ये येउन खिडकीपाशी उभी राहिले, मी त्याला बघु शकत होते तिथुन पण त्याला मी दिसणार नव्हते किंवा तसं दिसेन हे त्याच्या लक्षात यायला हवं. हे सिक्रेट गौरीताईचं होतं. तिनं लग्नाआधी अशी काही सिक्रेट माझ्याबरोबर शेअर केली होती. आता पुन्हा तिलाच शरण जायची वेळ येईल का ? पुन्हा प्रश्न. बाहेर आईनं उलटतपासणी सुरु केली होती. जे काल मी सांगितलं होतं ते वेगळया प्रकारानं त्याच्याकडुन काढुन घेत होती. हा असा प्रकार बाबा करायचे, मला आणि गौरीला एकएकटीला विचारायचे आणि मग नंतर मार खावा लागायचा, कुणाला तरी एकीला,बहुधा गौरीताईलाच. ’ मधु फार काही बोलली नाही कधी, पण ठिक आहे, तिच्यावर विश्वास आहे माझा, काही वेडंवाकडं नाही करणार ती.’ हे आईचं बोलणं ऐकुन एकदम भरुन आलं. आपलं कुणितरी कौतुक करावं बाहेरच्या समोर ह्याचा सारखा आनंद नसतो. पण तो बाहेरचा होता का आता का अजुन होता बाहेरचा? वाटलं जर एवढा विश्वास आहे तर काल उगाच मला का बोलली एवढं.
’चला मी निघतो, अजुन साईटवर जायचं आहे’ त्याचा आवाज आला, आता बराच नॉर्मल होता पण चक्क खोटं बोलत होता. आई आत आली, दोन मिनिटं देवासमोर उभी राहिली,मग बेडरुम मध्ये जाउन काहितरी घेउन बाहेर गेली, मागं मागं मी पण. तो दरवाज्याजवळ उभा होता, आई बोलायला लागली ’आता आम्ही दोघिच आहोत एकमेकिंना, हिचे बाबा गेले आणि आत्ता गॊरीचं लग्न झालं मागच्या महिन्यात,वर्षात करायचं असतं म्हणुन आटोपलं. तुम्हाला मधु आवडली असेल तर आधी तुमच्या घरी बोला आणि कुणा मोठ्यांना घेउन या पुन्हा येताना, पत्रिका पाहणार असाल तर हि घ्या, बाकी मागे फोन नंबर लिहिला आहेच.’
त्याच्या चेह-याकडं बघुन मला खुप हसु येत होतं, पण कशीबशी गप्प होते. तो आपला बळेबळेच हसला आणि बाहेर पडला. आई आत गेली, मी काय करु मलाच कळेना. हळुच मी पण दरवाज्याजवळ गेले, तो बुट घालत होता. एका पायावर उभं राहुन बुट घालताना गंमतशीर धडपडत होता, पटकन वर पाहिलं. एकदम बावरले, आत पाहिलं आई मागं नव्हती. ’ मी बोलतो आईला आणि फोन करतो तुला ’ तो म्हणाला, एकदम बोलुन गेले’ चालेल पण लवकर कर’. तो निघत होता, आणि वळुन विचारलं ’ रस्ता सांगशील का मेन रोडवर जाईस्तोवर’ आणि लहानपणी शाळेतुन आल्यावर द्प्तर टाकुन खेळायला जायचे तशी आईला सांगुन ती काय म्हणते ते न ऐकताच चपला घालुन निघाले. त्याला जिपपर्यंत सोडुन परत आले.
आई हॉलमध्येच उभी होती, खिडकीत. म्हणजे मला येताना तिनं पाहिलं होतं. मी सरळ आत गेले. कपडे बदलुन दुकानात जाउन यावं असा विचार केला. आई पण आत आली आणि विचारलं ’ कुठं निघालीस? ’ मी - ’ दुकानावर, तु येणार आहेस ? आई’नकोस जाउ, बोलायचंय मला तुझ्याशी. थांब इथंच’ जे मला टाळायचं होतं तेच होत होतं. आई बाहेर जाउन कॉटवर बसली, बाबांच्या स्टाईलमध्ये. मी गुपचुप एका बाजुला बसले. आता कालच्या पेक्षा जास्त टेन्शन आलं होतं. परिक्षेच्या आधीचं टेन्शन पेपर कसा असेल हे असतं तर नंतरचं निकाल काय लागेल याचं. दोन्ही वेगळे पण टेन्शनच.दोन मिनिटं गप्प राहुन आई बोलली ’ बोलाचालायला ठिक वाटला मुलगा, कमावता आहे पण घरची सगळी जबाबदारी आहे त्याच्याबर, एक बहीण आहे लग्नाची,घराचं कर्ज फेडायचं आहे.’ ह्या गोष्टी चांगल्या का वाईट हेच कळत नव्हतं. नक्की आईला काय म्हणायचं आहे. ती पण माझ्यासारखंच याची तुलना काकुच्या बहिणिच्या मुलाशी करते आहे असं जाणवलं. तो एकटाच होता, स्वताचं घर, नोकरी होती आणि घरचा धंदा, शेती होती आणि सगळ्यात महत्वाचं इथं बार्शितच होता.
दोन दिवस गेले, आईनं माझं कारखान्याच्या शाळेत जाणं बंद केलं होतं, मी तिच्याबरोबरच दुकानात जायचे. तिस-या दिवशी सकाळी आई पुजा करत होती, फोन वाजला. आई ’ मधु उचल तायडीचा असेल तर मला दे’ . चहाचा कप एका हातात आणि खारी दुस-या हातात घेउन मी फोन घेतला,’ पाट्लांचं घर ना ? मालतीबाई आहेत का ? ’ मी फोन खाली ठेवला आणि आईला हाक मारली ’ तुझा फोन’ - आई ’ कोण आहे ?’ तो पर्यंत मी किचन मध्ये आले होते, ’ माहित नाही’ असं म्हणुन अजुन एक खारी घेउन बेडरुम मध्ये गेले. एकदम डोक्यात प्रकाश पडला, इथं बार्शीत आईला मालतीबाई कोणिच म्हणत नाही, मग कोण असेल विचारायला हवंय, म्हणुन परत बाहेर गेले, जाता जाता आईला धडकले. ती ओरडलीच ’ पारुषे, शिवलीस का तशीच बिन आंघोळीची ’ मी लक्ष न देता फोन उचलला ’ आपण कोण बोलताय ?’ आता आई मागं उभी होती. पलिकडुन आवाज आला ’ मी हर्षद बोलतोय, तु ....... ’ . फोन आईला दिला आणि गुपचुप किचनमध्ये जाउन कालच्या जागी उभी राहिले.
आई - ’ हो मी मालती पाटिल बोलतेय, आपण कोण ?
तिकडुन - ....
आई - हो हो, नमस्कार ...
तिकदुन - .....
आई - मधु बोलली आहे मला सगळं, तसंच हर्षद पण येउन गेला आहे इथं, तुम्ही आलात तर बरं होईल. या मुलांच्या हातात असे निर्णय द्यावेत एवढी मोठी नाहीत ती अजुन. निदान माझी मधु तरी.
तिकडुन - ....
आई - ठिक आहे, दुकानाचं सगळं पाहुन वगैरे आणि दिरांना, मोठ्या जावयांना बोलुन कळवते तुम्हाला, ठेवु आता. नम्स्कार.
कट
आई आत आली, मी गप्प होते. ’ त्याची आई होती, आधी विचारता नाही आलं आणि मला सांगितलं ही नाहीस कोण बोलतंय ते ?
मी विचारलं ’ काकांना काय विचारयचंय, मी जाउ निरोय सांगायला कारखान्यावर ’ आणि आई हो म्हणाली ’ भावोजींना घेउन ये तु काही बोलु नकोस जास्तीचं’ चल आणि आता ताईला फोन लावुन दे प्रकाशराव परत जातील बाहेर त्याआधी बोलुन घेते. ’
मी लगेच फोन लावला तायडीला, तिनंच उचलला, मला काही बोलायच्या आधीच आवाज आला ’ अहो सोडाना, फोन घेतलाय मी, जा बरं आंघोळ करुन घ्या असंच बसु नका. ’ मग ताईचा आवाज आला ’ हॅलो, कोण आहे’ मी ’ झालीस का मोकळी, सकाळच्या कामातुन ’
ताई - ’ ए गढडे, नीट बोल’ ’ एक नाही दोन नाही, आधी आंघोळ करा मग बघु’ - शेवटचं वाक्य बहुधा जिजाजिंना असावं.
मी - ’ आईला बोलायचंय जिजाजींशी, दे त्यांना. तुला बघते नंतर’
मी फोन आईला दिला, ती जिजाजींशी डिटेल बोलली, दुपारी काका-काकु आले परत चर्चा झाली. काकुचं थोडं रागराग झालं. काका शांत होते, हे सगळं बहुधा अपेक्षित होतं. संध्याकाळी पुन्हा जिजाजींशि बोलुन कार्यक्रम पक्का झाला. आम्ही सगळे रविवारी सोलापुरला जाणार होतो.
म्हणजे उद्याचा एकच दिवस उरला मध्ये. दुपारी दुकानात गेले तेंव्हा आई महादेवकाकांशी बोलत होती, मी गेल्यावर एकदम सगळं शांत झालं. मग संध्याकाळ पर्यंत दुकानात होतो. आईनं आमच्या सोलापुरच्या सप्लायरला माहिती काढायला सांगितलं होतं. रात्री घरी आले, जेवणं झाली. काही केल्या झोप येइना, सारखं सकाळचे दोन फोन डोक्यात वाजत होते, एक त्याचा आणि दुसरा ताईचा. वाटत होतं काय करत असेल त्यावेळी ती आणि जिजाजी. ताई असंच बसु नका म्हणाली होती म्हणजे ते तसंच. शी कसले घाणेरडे विचार करतेय मी, पण माझ्याबाबतीत पण हे असंच होईल तेंव्हा मला आवडेलच ना ते ? तायडी एक नाही दोन नाही म्हणाली ते काय , चहा बिस्किटं तर नसणार निश्चित. का उद्या आई दुकानात गेली की विचारावं तिलाच. असले भलते सलते विचार मनात घेउनच पडले होते.
शनिवार उजाडला तो उद्या सोलापुरला जायचंय या कल्पनेनंच, सकाळी काका आले तेंव्हाच विषय निघाला होता, ते सांगत होते सकाळी ९ च्या गाडीनं निघु म्हणुन. जिजाजी लातुरहुन थेट येणार होते तिकडं. तायडीचं काय माहिती नव्हतं. दुकानातली आवराआवरी करण्यात दिवस पटकन गेला. आज रात्री मात्र आई माझ्या जवळच झोपली, मी अगदि कुशित नव्हते पण कुठल्याही क्षणि जाउ शकत होते. झोप आज पण नव्हती. थोड्या वेळानं आईनंच कुशीत घेतलं आणि ’ लाडाची गं बाई माझी, कशी मोठी झाली ग एवढी एकदम. दोघी चाललात एका मागं एक, जा ग बायांनो आपापल्या घरी सुखी राहा गं, त्यातच माझं सगळं आलं ग बाई.’ ह्या पुढं काय बोलली मला ऐकवेना, मी रडायला लागले आणि मग आई पण.
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -६ http://misalpav.com/node/17104
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ५ http://misalpav.com/node/17011
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ४ http://misalpav.com/node/16771
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ३ http://misalpav.com/node/16697
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - २ http://misalpav.com/node/16340
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - १ http://misalpav.com/node/16083
हा दहापैकी ७वा भाग. येत्या तीन भागात ही दिर्घकथा संपेल. माझा प्रयत्न राहील की एप्रिलच्या मध्यावर एखादं शुभकार्य पार पडावं, पण....... असो.
५० फक्त.
प्रतिक्रिया
21 Mar 2011 - 12:45 am | नि३
छान ...वाट पाहतोय पुढील भागांची.
21 Mar 2011 - 1:50 am | विनायक बेलापुरे
काय होणार याची उत्सुकता ताणली गेली होती पण कथानायकाचे नाव पाहिले आणि सुखांत व्हावा अशी मनोमन अपेक्षा वाढायला लागली. शेवट्च्या ओळीतील शुभकार्याचा उल्लेख वाचल्यावर जीव भांड्यात पडला. :)
सुखांत आहे हे माहिती झाले म्हणून काय झाले ?
उरलेल्या ३ भागातील नाट्य वाचायची वाट पहातोय.
लवकर येउद्या.
21 Mar 2011 - 7:10 am | प्रीत-मोहर
लौकर येउदेत पुढचे भाग
21 Mar 2011 - 7:32 am | नगरीनिरंजन
हा भागही चांगला झाला, पण काही काही गोष्टींचा उल्लेख अप्रस्तुत आणि अनावश्यक वाटला.
पु.भा.प्र.
21 Mar 2011 - 8:44 am | स्पंदना
शेटच्या तीन ओळी वाचताना डोळे भरले हर्षद!
सुन्दर!! आता लावा ना लग्न...
अर्थात सगळ सांगुन मगच, पण भर भर सांगा
21 Mar 2011 - 9:03 am | स्पा
हर्षद सुंदर झालाय रे हा भाग सुद्धा
21 Mar 2011 - 9:20 am | प्रचेतस
म्हणतात ना, इंतझार का फल मीठा होता है.
हा भाग तसा उशिरानेच आला पण एकदम फक्कड झालाय.
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहातोय हेवेसांनल.
21 Mar 2011 - 9:21 am | पिलीयन रायडर
सत्य कथा आहे का हि?
21 Mar 2011 - 10:27 am | किशोरअहिरे
झकास जमला आहे रे ..
पुढील भाग लवकर टाका लवकर वाट बघतोय:)
21 Mar 2011 - 10:28 am | वपाडाव
कथनाची श्टाईल जबरदस्त ......
चक्क प्वरीच्या भौना मांडताना सरळ सोप्या भाशेत ....
सुंदर्....अव्वल...
21 Mar 2011 - 10:35 am | हरिप्रिया_
नेहमी सारखंच मस्त...
सुखांत आहे हे वाचून खूपच छान वाटल...
आणि नेहमी प्रमाणेच,पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
21 Mar 2011 - 11:07 am | इरसाल
साहेब जरा लवकर लवकर लिहाल काय ? छान वाटत आहे .........असेच लिहित राहा.
21 Mar 2011 - 3:42 pm | प्रशांत
लै भारी
21 Mar 2011 - 4:22 pm | RUPALI POYEKAR
हा भागही तितकाच सुंदर, अप्रतिम आहे
21 Mar 2011 - 5:12 pm | धमाल मुलगा
मजा येतेय वाचायला.
(काही प्रमाणात सोत्ताचीच स्टुरी वाचतोय की काय असा भास होतोय ;) )
बाकी, ह्या भागाचा शेवट एकदम अलका कुबल? :)
५० फक्त, एकदम जक्षान टर्न मारलासा की वो.
21 Mar 2011 - 6:37 pm | निनाद मुक्काम प...
मुंबई पुण्याच्या पलीकडे उर्वरीत महारष्ट्रातील जीवनदर्शन मराठी सिनेमातून जे झाले त्यात तमाशा असायचा नाहीतर ग्राम्य संवाद असलेले फुटकळ विनोद
.
ह्या कथेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जीवन दर्शन घडत आहे .
बार्शी ,लातूर ही नावे कथानकात आल्याने तेथील जीवनशैली व मानसिकतेचे यथार्थ वर्णन झाले आहे .हे आवर्जून नमूद करत आहे .
21 Mar 2011 - 8:52 pm | पैसा
लेखन आवडलं. आत्मकथा आहे का?
21 Mar 2011 - 9:21 pm | प्राजु
लवकर लिहा... वाट बघतेय.
22 Mar 2011 - 2:01 pm | धनुअमिता
हा भाग सुद्धा उत्तम.पुढील भागाच्या प्रतिक्षेत.पुढील भाग लवकर येऊ द्या.
24 Mar 2011 - 3:34 pm | स्वप्नाळू
खूप छान लिहिले आहे.
25 Mar 2011 - 10:44 am | विजुभाऊ
हर्शद साल्या तू पोरगी आहेस की पोरगा.....
मुलीच्या भावना मस्त व्यक्त करतो/करते आहेस.
मस्त जमलय .
26 Mar 2011 - 5:17 am | इंटरनेटस्नेही
मस्त! पुलेशु.