तुमचं आमचं सेम नसतं -- भाग ११
खरं सांगु का लग्नाआधीची रात्र फार अवघड जाते,उद्याची सकाळ नेहमीसारखीच उगवणार असते,पण त्यानंतरच्या सगळ्या सकाळी बदलुन टाकणारी असते. या अशाच सकाळी मी उठलो, म्हणजे झोपलो असं नव्हतोच पण आडवा पडलो होतो तो उठलो. बरोबर आलेल्या व-हाडाचे लाड पुरवुन घेणं चालु होतं, आम्ही प्रमुख भुमिकावाले आतच आवरत होतो. आठ वाजले असावेत. कोणितरी चहा घेउन आलं, चहा घेतला, सकाळची सगळी कामं आवरली. आज चॊकात आंघोळी होत्या त्यामुळं निदान मला आणि लाडोबाला काही गडबड नव्हती, ती सकाळीच माधवीची मेहंदी किती रंगली आहे हे बघायला निघुन गेली होती. ति येईपर्यंत आई, मावशी, आत्या सगळ्यांनी आवरुन घेतलं होतं. तयार झालेले व-हाडी लग्नाच्या मंडपात चालले होते, नाष्ट्याची सोय तिकडंच होती.मी एका पोराला पेपर घेउन यायला सांगितलं. त्याच्याबरोबर गौरीताईचे सासरे आणि महादेवकाका आले. जरा आवराआवरी केली. काय, कसं विचारपुस झाली. पुन्हा एकदा चहा झाला. त्या दोघांच्या चेह-यावरुन अंदाज बांधता येत नव्हता नक्की कशासाठी आलेत.
मग एकदाची महादेवकाकांनी सुरुवात केली, ’आई काय आहे, आपलं ठरल्याप्रमाणे मानपानाची सोय केली आहे, तुमच्या आग्रहाप्रमाणे स्त्री पुरोहित बोलावले आहेत, पण काय आहे अजुन हे गाव फार सुधारलेलं नाही. काही गोष्टी आम्हाला पण पाळाव्या लागतील, त्याबद्दल बोलायचं होतं.’ एक पॉज घेउन पुढं बोलायला लागले,’ तसं आम्ही बोललो आहोत माधवीच्या आईला पण आता तुम्हाला सांगावं असा विचार आहे, त्या आणि तुम्ही थोडावेळ घरातच थांबलात तर बरं होईल. काका-काकु आहेतच सगळं करायला, काय देवण्णा पाटील, बरोबर ना?’ असं बोलुन त्यांनी गौरीताईच्या सास-यांना यात ओढलं. ’ हो तर, काय आहे, तुम्ही, ही पोरं,शिकली सवरली आहेत पण इथं खेडेगावात येणारे लोकं, काय तोंडानं बोलतील कुणी सांगावं, आणि पुन्हा आपण हे लेकरांच्या सुखासाठीच करायचं की.’ महादेव काकांनी विषय पुढं नेला ’ तसं काही फार वेळ नाही लागणार नाही का, वैदिक पद्धतीनं म्हणजे २ तासात आटपेलच.’ - ’ मग काय आमच्याकडं लातुरात बघा सगळं मोजमापात करुन ३ तासात संपवलं होतं, तेंव्हा पण विहिणबाई आत घरातच बसल्या होत्या, पण काका काकुंनी सगळं व्यवस्थित केलं, अगदि पोटच्या पोरीसारखं. खुप माया करतात दोघींवर.’ देवण्णा पाटील, गौरीताईचे सासरे म्हणाले. मी, मावशी आणि आत्या सगळे आईकडं पाहात होतो, आमच्या घरातलं हे पहिलंच मोठं कार्य, घर घेतलं तेंव्हा फक्त सत्यनारायण केलेला त्यामुळं असा काही प्रश्न आलेला नव्हता. ’ बरं आम्ही जरा बोलुन कळवतो तुम्हाला’ मावशीनं तिढा तात्पुरता सोडवला. ते दोघंही निघुन गेले, आता मलाच आईकडं पहायला नको वाटत होतं. सगळेच गप्प होतो. ’दाद्या, माधवी वहिनीनं सांगितलं आहे तिची आणि आपली आई मंडपातच थांबेल,म्हणजे कुठं जाणार होता का तुम्ही दोघी ?’ एखाद्या विषयाचं गांभिर्य माहित असुनही, आपण त्या गावचेच नाही हे दाखवणं लाडोबाला फार छान जमायचं. प्रश्न सुटला असला तरि एक मळभ सोडुन गेला. पुन्हा मनं होतील तेवढी ताजी करुन आम्ही पुढ्च्या कामाला लागलो. गौरीताई आणि एक दोन बायका, हळद घेउन आल्या होत्या. गौरीताईच्या लक्षात काय झालंय ते आलं असावं पण जर बिनलग्नाची लाडोबा सावरुन घेउ शकत होती तर ति एक पाउल पुढंच असणार होती.
मग हळद लावायचा कार्यक्रम झाला, कालचे साखरपुड्याचे कपडे बदलुन आल्यावर मला एका चौरंगावर बसवलं आणि हळदिचा अक्षरश: लेप चढवण्यात आला माझ्यावर. दिवाळीला उटणं लावलं तर बोंबाबोंब करणारा मी गुपचुप हळद लावुन घेताना विचारलं ’संपवता का काय सगळी इथंच, उष्टी हळद घेउन नाही का जायची परत?’ गौरीताई हसत म्हणाली ’ करुन द्या की मग थोडी उष्टी, चव घेउन बघा जरा’-’अहो म्हणजे तशी उष्टी नाही हो’ मी सावरुन घेतलं.थोडा ताण कमी होईल असं वाटलं. तेवढ्यात पुन्हा महादेवकाका आणि आता आईपण बरोबर होत्या. गौरीताई आणि बाकीच्या बायका पटकन निघुन गेल्या. तिची आई आणि माझी आई आतल्या खोलित गेल्या, पाच मिनिटात बाहेर आल्या.’महादेवकाका,चला झालं बोलणं आमचं’ आईचा चेहरा आता बराच खुलला होता, माझ्याकडं पहात म्हणाली’ काही नाही चल आवर तुझं, कोणि काही बोललं तर तुझं नाव पुढं करणार आहेत तुला काही बोलणार नाही आज कोणी’ अर्थात मला कोणी काही विचारणार नाही हे खरंच होतं.
एक पोरगा ओरडत आला,’ जिज्याजी आंघोळीला थांबलेत सगळे’.निघालो तसाच अंगावर अंगभर हळद घेउन पुन्हा चादरीच्या खालुन. माधवीच्या घराच्या मागच्या बाजुला फरश्या घातलेल्या होत्या तिथंच अंगणात चार तांबे ठेवुन त्याला धागा गुंडाळुन चौक केला होता, आत ५-६ पाट ठेवले होते. बाजुला ३-४ बादल्या वाफा येणारं पाणि होतं, आता येवढ्यात ५-६ जणांना हात पाय पण धुवायला आले नसते हे असल्या हळदिच्या अंगाच्या आंघोळी कशा व्हायच्या असा प्रश्न मला पडला. मग एका बाजुला लाडोबा आणि मी बसलो तर माझ्या शेजारी काका, काकु आणि शेवटच्या पाटावर पिवळी माधवी येउन बसली अगदि पिवळी धमक साडी आणि डोक्यपासुन पायापर्यंत जिथं दिसत होतं तिथं हळद होती, म्हणजे मला हळद लावली होती तर इकडं हळद खेळले होते. मागं पुढं चार-आठ बायका गोळा झाल्या आणि साबण नाही का काही नाही, भडाभडा पाणि ओतायल्या लागल्या, आणि अचानक माझ्या डोक्यावर कुणितरी झम्म गार पाण्य़ाची बादली उपडि केली, मि एकदम ओरडलो आणि तेवढ्यात हाच प्रयोग माधवीवर पण केला ती एकदम चिडुन उठली आणि निघुन चालली.’ए मधे,थांब ग ओवाळु दे, बस खाली’ गौरीताईचा खास ताईगिरी टाईपचा आवाज आला.’हे काय ग तायडे कसलं गार पाणी माहितिय का? माधवी चिडक्या आवाजात म्हणाली.’आम्हाला काय माहित, विचार ज्यांच्या अंगावर टाकलं त्यांनाच, काय हो गार होतं का काय पाणि?’ गौरीताई माझ्याकडे वळत म्हणाली. मी कुडकुडत कुडकुडणा-या पिवळ्या माधवीकडं पाहात होतो रागानं नाक लाल होतं पण आता तिचं नाक पिवळं दिसत होते आणि तोच चिडवण्याचा सुर ठेवुन बोललो,’नाही गार नाही पाणि, ठिक आहे’, ’बघ तुलाच काय मुद्दाम घालतो का काय गार पाणि, बस खाली.’गौरीताईच्या आवाजानं माधवी खाली बसली,ओवाळणं झालं, आता नंतर मात्र व्यवस्थित आंघोळीचं पाणि होतं. ५-६ तांबे घेउन पंचा गुंडाळुन मि परत व-हाडाच्या घरी आलो, पुन्हा आंघोळी केल्या.
पुन्हा एकदा चहा व नाष्टा आवरुन लग्नाचा मोतिया कलरचा झब्बा सरवार घालुन मंडपात आलो,हातात पुन्हा मोतीवाला नारळ होता, हा नारळ नक्की कशाला होता ते मला अजुन कळालं नव्हतं.मंडपात गेल्यावर सगळ्या मोठ्यांच्या पाया पडुन स्टेजवर गेलो, बसायला पाट मांडलेले. सकाळी आंघोळीला दोन्ही गुडघे समोर घेउन पाटावर बसणं सोप्पं होतं पण आता थोडीशी तंग अशी सरवार घालुन पाटावर मांडी घालुन बसणं जरा अवघडच होतं. तरी कसा बसा बसलो मी आणि सरवार दोन्ही सुरक्षित, म्हणलं आता सगळं झाल्यावरच उठवा एकदाच. मी पाहिलेल्या लग्नांपेक्षा हा प्रकार बराच सुटसुटीत होता, व्यबस्थित मांडणी, डाव्या उजव्या बाजुला लागणारं सामान एका ओळीत ठेवलेलं. पाटावर बसल्यावर मंडपात नजर फिरवली, लग्नापेक्षा एक बाई लग्न कशी लावतेय याचीच सगळ्यांना नवलाई होती. परांडेकर गुरुजी पण येउन बसले होते. पुरोहित बाईंनी काही मोजक्या नातेवाईकांना स्टेजवर आणि इतर काही नातेवाईकांना समोरच्या रांगेत बसायला सांगितलं. सगळ्यांना पुस्तकं दिली, कुणि, काय, कधी आणि कसं म्हणायचं आहे त्याची कल्पना दिली. आता काका काकु पण येउन बसले स्टेजवर, महादेवकाका आणि गौरीताईचे सासरे थोडे नाराजच होते. जिजाजी, मागे पुढे ओरडाओरडी करुन बसलेल्यांना कामाला लावत होते आणि कामात असलेल्यांना पकडुन आणुन मंडपात बसवत होते. स्टेजवर माझ्याबरोबर लाडोबा आणि मावशी होती. माझी आई आणि माधवीची आई समोर शेजारी शेजारी बसल्या होत्या.
पुरोहित बाईंनी मी आणि काका काकु, आमचे जे कार्यक्रम चालु केले. पुढे काही तरी करता करता, मध्येच पुस्तक बघुन काहीतरी वाचायचं यात काकांची धांदल उडत होती. काकु पुस्तक धरायची आणि मग काका वाचायचे असा प्रकार चालु होता, एक वेळ अशी आलि की सगळा उद्योग पुरोहितबाईंच्या हाताबाहेर जाईल असं वाटत होतं, परांडेकर गुरुजी लगोलग वर आले आणि त्यांच्या पद्धतीनं काका काकुंना समजावुन सांगायला लागले. आता सगळं सुरळीत होतं. २०-२५ मिनिटं झाली आणि जेवढं आम्ही करु शकत होतो तेवढं करुन झालं, एवढ्या वेळात होमातली लाकडं आणि अग्नी,आणि पुरोहित बाई व परांडेकर गुरुजी यांनी एकमेकांशी जुळवुन घेतलं होतं. आता पुरोहित बाईंनी पुकारा केला ’वधुला बोलवा, मुहुर्ताची वेळ जवळ येत आहे’. आत्तापर्यंतच्या होमाच्या धुरानं माझे डोळे स्वच्छ झाले होतेच ते आणखी मोठे करुन घराच्या दरवाज्याकडे पहायला लागलो, मागुन लाडोबा मला कोपरानं ढोसत होती.
दोनच मिनिटात केशरी रंगाचा शालु नेसलेली माधवी बाहेर येताना दिसली,भाजपच्या झेंड्याला मॅचिंग केलेलं होतं, केशरी साडी अन हिरवा ब्लाउज फक्त डोक्यात एक कमळ हवं होतं, मागं गौरीताई अन मैत्रिणि होत्या. शालु तिला जड होत होता हे नक्की, त्यात तिला स्टेजवर आल्या आल्या पुरोहित बाईंनी काका काकुंना नमस्कार करायला लावला. मी पाहिलं तर एका रात्रीत तिचे केस बरेच लांब झालेले,त्यावर मोत्यांची वेणी,वर गजरे. आमच्या घरी आल्यापासुन आजपर्यंत, साडी नेसुन नमस्कार करायची बरीच प्रॅक्टीस झालेली होती बहुतेक. माझ्या बाजुला येउन उभि राहिली खरी पण आता पंचाईत होती पाटावर बसायची, त्याची प्रॅक्टिस करणं शक्य झालं नसावं. एका हातात फुलांचा गुच्छ, दुस-या हातात रुमाल आणि त्याच हातानं शालुचा ताठ आणि ति स्थिती सोडत नसलेला भरजरी पदर सरळ करण्याची धडपड, बहुधा त्या पदरावरच्या मोराचा कणा फार ताठ असावा. एकदा वाटलं पटकन हातानं सरळ करावा, पण मोह आवरला, तो माझा अधिकार माधवीनं मानला असता पण असं आत्ता बरं दिसलं नसतं आणि हो,तो मोर चावला बिवला चिडुन तर काय करा.
पुरोहित बाईंनी त्याच वेळी बोलावल्यामुळं तिकडं लक्ष द्यावं लागलं. पुन्हा एकदा कालच्या सारखेच फारसे न कळुन घ्यावेत असे विधी चालु झाले, काहि मंत्र आधी कुणाच्या तरी लग्नात ऐकल्यासारखे होते, पण एकुणच त्याकडे लक्ष जरा कमीच होतं. मध्येच एकट्यानं तर कधी दोघांनी तर कधी ब-याच जणांनी म्हणायचे काही मंत्र असं सगळं छान चाललं होतं. त्यात एक झालं,मी आणी माधवी दोघंही एकमेकांच्या स्पर्शाला सरावलो,लाज गेली नव्हती पण मोकळेपणा आला होता. आता हात पुढं करताना मागं पुढं पाहात नव्हती. मंगळसुत्र घालायची वेळ आली, हे म्हणजे कसं आपला हक्क स्थापित झाल्यासारखं वाटतं. बसुनच मंगळसुत्राचे मळसुत्रं फिरवायचा अयशस्वी प्रयत्न केल्यावर उठणं भाग होतं, आता माधवीच्या मागं उभा राहुन मंगळसुत्र घातलं,वर पाहताना तिच्या आईकडं लक्ष गेलं, त्यांचे डोळे भरले होते आणि त्यांनी माझ्या आईचा हात घट्ट धरुन ठेवला होता. एक क्षण उगाचच अपराध्यासारखं वाटलं. कुणाचं तरी काही तरी त्याच्या परवानगीनं का होईना पण आपण आपलं करतोय, त्याच्यापासुन लांब घेउन जातोय ही भावना कुठंतरी खुपत होती. पण या खुपण्याला माझ्याकडं या वेळेला तरी उत्तर नव्हतं. ती सल तशीच मनात ठेवुन पुढचॆ विधि पुर्ण केले.
मंगलाष्ट्कांसाठी उभं राहिलो, समोरचा अंतरपाट हा शेवटचा अडसर आम्हां दोघांच्या एक होण्यातला. तो दुर झाला की ती माझी अन मी तिचा. मंगलाष्टकं सुरु झाली, त्या मंगल अष्टकांना साथ मात्र अंतरपाटाच्या त्या बाजुच्या ह्ळुवार हुंदक्यांचीच होती. स्टेजवरुन खाली पाहिलं, सगळे उभे होते, तिच्या आईनं माझ्या आईचा हात अजुनही धरलेलाच होता. डाव्या बाजुला परांडेकरांच्या मागे काका माधवीच्या बाबांची भुमिका जगत होते. मागं लाडोबा पण कसंबसं रडणं आवरत होती, आणि सगळ्याच्या मध्ये मी, मला या सगळ्याचं काहीच वाटत नव्हतं? का माधवी आता माझी होणार या मोहानं माझ्या सामान्य भावनाच दडपुन टाकल्या होत्या,मी एवढा स्वार्थि झालो होतो? आणि झालो होतो तर का? पुरा अभ्यास करुन परिक्षेला जावं आणि ऐनवेळी प्रश्नांची उत्तरंच आठवु नयेत तसं होत होतं. ५ मंगलाष्टकं झाली, अंतरपाट बाजुला झाला, माधवीचा चेहरा खालीच होता ती रडतेय हे कळत होतं. नशीबवान आहे, मोकळेपणानं रडु शकत होती. मी त्या बाबतीत कमनशिबी, पुरुष ना. असो, मागुन गौरीताई आणि तिच्या मैत्रिणींनी आपले डोळे कोरडे करत तिला सावरलं,तिच्या पण मोहानं आसवांना मागं सारलं, चेह-यावर बळेच हसु आणलं, ते हसु ओठांपर्यंतच येउन थांबलं, तिथुन डोळ्यांचा रस्ता त्याला सापडला नव्ह्ता. तिनं तसाच हार माझ्या गळ्यात घातला, त्याबरोबर तिची सगळी स्वप्नं आणि ती पुर्ण करायची जबाबदारी पण. माझी स्वप्नं मी तिच्या गळ्यात मगाशीच मंगळसुत्राबरोबर बांधली होती. फरक एवढाच होता हा हार मी थोड्या वेळानं काढुन ठेवणार होतो, मंगळसुत्र तिच्या गळ्यात कायमचं राहणार होतं. आता हार घालायची पाळी माझी होती, तिचा चेहरा पुन्हा खालीच होता, पुन्हा गौरीताईनं तिला चेहरा वर करायला लावला मी पटकन हार घातला. तिच्या एवढीच हसण्याची उसनवारी केली, तिच्या नजरेला मी फार जास्त वेळ नजर देउ शकलो नसतो,हे समजुन तिनंच पटकन नजर खाली केली.
बाहेर लोकांनी फटाके उडवले, बार उडाल्याचं जगजाहीर झालं. आम्ही न मागता अन कुणी प्रत्यक्ष न देता आमच्या या नात्याला एक पावित्र्य आलं, समाज मान्यता मिळाली. एकमेकांवर प्रेम करणारे आम्ही आतापर्यंत वधु वर होतो आता पति पत्नी झालो. पुन्हा एकदा त्या पाटांवर बसायची कसरत केली. आणि सप्तपदी चालताना लक्षात आलं की त्या पाटावर बसणं एक वेळ सोपं होतं त्याच पाटांवरुन माझा आणि मागुन येणा-या माधवीचा, तिच्या शालुसहित तोल सांभाळणं थोडं जास्तच कठीण आहे. पण हा ही भाग पार पडला. उरलेले विधी पुर्ण झाले आणि आमच्या लग्नाचा धार्मिक भाग संपला.
आता एका बाजुला आहेर देणं घेणं चालु होतं, आम्हांला दोघांनाही मोजणं शक्य नव्ह्तं एवढे नमस्कार करुन झाले होते, अजुन बरेच करायचे होते. पोटात भुक लागली होती. कुणितरी दया दाखवली पाणि आणि एका ताटलीत गुलाबजामुन व भजी आणुन दिल्या. मंडपातली पोरं शक्य तिथुन पडलेल्या अक्षता गोळा करुन आणुन आमच्या अंगावर उडवत होती. आज गर्दी बरीच होती. कारण दोन पंगती एकदम बसल्या तरी मंडप भरुन माणसं होती. मी माझ्या नातेवाईकांची ओळख माधवीला करुन देत होतो आणि ती पण. कुणाला नुसताच हात जोडुन नमस्कार करावा आणि कुणाला वाकुन हे दोघांनाही कळत नव्हतं, किंवा मुद्दाम मी वाकलो की माधवी निवडणुकत उभी राहिल्यासारखी उभी राहायची अन ती वाकली मी माझं लक्ष कुणीकडं दुसरीकडंच असायचं. तिची एक मैत्रिण तिच्यापेक्षा जरा आधि भेटायला पाहिजे होति असं पण वाटुन गेलं एकदा. पण अर्ध्या तासापुर्वी बायको झालेली माधबी हे लक्षात घेउन म्हणाली’ ती मीना बडवे, तिचं लग्न आहे १८ तारखेला सोलापुरलाच, जाउयात आपण.’
प्रथेप्रमाणे जवळपास सगळ्यांची जेवणं झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. पुन्हा ताटाभोवती मोत्यांच्या पट्टुया. समोर उदबत्त्या. नाव घेणं आणि घास घालणं हे प्रकार करुन २०-२५ मिनिटांत होणारी जेवणं चांगली तासभर चालली. दोन वाजले होते. जेवण झाल्यावर चिसौकां मीना आणि इतर अशा ४-५ जणी मला रुखवत बघायला घेउन जायला आल्या. माधवीला आत घरात जायचं होतं,तिनं लगेच लाडोबाला माझ्या मागं लावलं’अन्या, तुला बघायचं होतंं ना ते साखरेचं महादेव अन तुळशी व्रुंदावन कसं केलंय,मीने सांग ग जरा तिला प्लिज.’ मी आपलं जाउन रुखवत बघुन आलो. मग अजुन एक कसली तरी पुजा होति घरात ती केली, आणि या आमच्या लग्नाच्या दिवसाच्या सगळ्यात अवघड गोष्टीसाठी तयारी सुरु केली. व-हाडाच्या घरी येउन कपडे बदलले. आमचं सामान बांधुन झालं होतं. माझे साहेब जाताना ईंडिका ठेवुन गेले होते, त्यामुळे आम्ही तरी निवांत घरी जाणार होतो. जिजाजींनी एक दोन समज असलेल्या पोरांना गाडीला फुलं चिकटवायला लावलं होतं.
आमच्या व-हाडाचं सामान आणि एक टेम्पो भरुन व-हाडी पुढं गेले, दुसरा टेम्पो आमच्याबरोबर यायचा होता. पुन्हा घरी गेलो. माझी आत जायची तयारीच नव्हती, आता मी रडलोच असतो. मी लाडोबाला तसं बोललो, तशी ती माझ्याआधीच रडायला लागली. साडेचार होत आलेले, पाचपर्यंत निघायलाच हवं होतं. जिजाजी आणि परांडेकर गुरुजींनी घाई घाई करण्याचं आपलं काम पुन्हा सुरु केलं. मावशी, आई आणि लाडोबा घरात गेले. दहा मिनिटं गेली. हळूच लाडोबा दारात आली, मला आत बोलावलं. आत गेलो, माधवी तिच्या आईजवळ बसलेली, बाजुला गौरीताई, तिची सासु उभ्या होत्या. ’माधवी,चला आता किती वेळचं खोळंबुन बसलेत सगळे, असा हट्टीपणा करुन कसं चालेल.’ गौरीताईच्या सासु तिला समजावत होत्या. ती बळंबळंच उठली.’जा तोंड धुवुन ये बरं,जा ग गौरी तिच्याबरोबर’.हा त्यांच्या अनुभवाचा खेळ होता.मला काय होतंय कळत नव्हतं, तिचा चेहरा पाहुन तर वाटत होतं, बाई इथंच रहा पण रडु नकोस पण असं म्हणावसं अजिबात वाटत नव्हतं. गौरीताईच्या सासुबाई मला व आईला बाहेर घेउन आल्या ’येईल ती चला तुम्ही’ आणि खरंच पाच मिनिटात माधवी,गौरी ताई, तिची आई, काका, काकु सगळे बाहेर आले. पुन्हा एकदा गळाभेटी झाल्या, आणि एकदाचं आम्ही गाडीपर्यंत आलो पुन्हा चादरीखालुन. मी सगळ्य़ात मागं होतो. ईंडिकात मागं तिघी बसल्या मला पुढं बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. गाडित बसल्यावर पुन्हा एकदा पाच मिनिटं सगळ्यांना टाटा बाय बाय करण्यात गेली. मी ड्रायव्हरला चला म्हणालो, तसा त्याने स्टार्टर दिला आणि निघता निघता माधवीला म्हणाला ’ वहिनी तुम्हाला बोललो होतो ना, चहा काय पुन्हा आल्यावर घेउ, बघा आता जेवुनच चाललोय.’ आम्ही निघालो, गाडी सोलापुर रोडला येई पर्यंत मागं त्या तिघी अॅडजेस्ट झाल्या होत्या, फक्त मला एका बाजुला ठेवुन.
भाग ११/१२.
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -१० http://misalpav.com/node/17575
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -९ http://misalpav.com/node/17518
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -८ http://misalpav.com/node/17421
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -७ http://misalpav.com/node/17341
तुमचं आमचं सेम नसतं - भाग -६ http://misalpav.com/node/17104
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ५ http://misalpav.com/node/17011
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ४ http://misalpav.com/node/16771
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ३ http://misalpav.com/node/16697
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - २ http://misalpav.com/node/16340
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - १ http://misalpav.com/node/16083
प्रतिक्रिया
13 Apr 2011 - 9:51 am | प्यारे१
वाजवा रे वाजवा.......!!!
धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धा त्ता धा त्ता धा त्ता धा.....!!!
कार्यमालकांची विनंती.....
पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये.
वधु वरांना शुभाशिर्वाद द्यायला आलेल्या सर्व मान्यवरांचे विशेषतः मा. जि. प. सदस्य ......, मा. मेहेरबान साहेब, मा. .....
मा. .... यांचे हार्दिक आभार.
वधुवरांना त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत आनंदाचे... कोण? हा. मा. नगरसेवक श्री.....रावजी .... यांचे आत्ताच मंडपात आगमन झालेले आहे. कार्यमालकांतर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार होत आहे.
ट्यूई ट्यूई ट्यूई ट्यूई ट्यूई ट्यू ssssssssss ई
मा. नगरसेवक श्री. .... राव्जी .... आले त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार.
वधुवरांना त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत आनंदाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
13 Apr 2011 - 10:20 am | आदिजोशी
१ नंबर कथा भावा. पुढचा भाग कधी????????????
13 Apr 2011 - 10:28 am | गवि
उद्याची सकाळ नेहमीसारखीच उगवणार असते,पण त्यानंतरच्या सगळ्या सकाळी बदलुन टाकणारी असते.
वा..
एकदम हुरहुरीत कथा. लग्नकाळातली अस्वस्थता मस्त आलीय.
झकास चाललंय हो भाऊ..
13 Apr 2011 - 10:32 am | स्पा
एकदम मस्त
13 Apr 2011 - 10:35 am | पिलीयन रायडर
"मी एका पोराला पेपर घेउन यायला सांगितलं" ???????
पेपर???? कमाल आहे...
"तिच्या नजरेला मी फार जास्त वेळ नजर देउ शकलो नसतो,हे समजुन तिनंच पटकन नजर खाली केली."
क्या बात है......
जे जे आवडलं ते जर उद्ध्रुत करायचं झालं तर सगळा लेख चोप्य पस्ते करावा लागेल....
खरं तर सगळ्यांची कहाणी थोडी बहुत अशीच असते..पण नेमकं काय वाटत हे शब्दात मांडता येत नाही... तु आमच्या सगळ्यंच्या लग्नाची गोष्ट लिहित आहेस असं वाटतय...
सकाळ पासुन नवर्यावर फार चिड चिड होत होती... तुझा लेख वाचुन नुकतेच सरलेले, पण जणु काही युगं लोट्ली अस वाटाव इतके लांब गेलेले "just married" वाले दिवस आठवले... आज ह्या बद्दल celebrate केलच पाहिजे...
धन्यवाद....
13 Apr 2011 - 10:45 am | प्रास
हर्षदजी,
एकदम मस्त लग्न लावलंत बघा! लग्नाच्या विधिंचे चांगले नियमन केलेत. त्या दरम्यानच्या अनेक प्रकारच्या भावनांना चांगली वाट करून दिलीत.
हे तर प्रचंड म्हणजे प्रचंड भारी आहे.... असलं कसं काय सुचतं बुवा?
त्या घाईगर्दीच्या वेळीही रसिकता लपत नाही ती अशी.....
असं होताना खूपदा पाहिलंय.... :-)
एकूण काय तर हर्षदरावांचं माधवींशी फर्मास लग्न लागलेलं आहे हो...... :-D
नांदा सौख्य भरे!
:-)
13 Apr 2011 - 11:30 am | मी ऋचा
हर्ष्या लेका एकीकडे मला लिहायला प्रवृत्त करतो आणि एकीकडे असे अचाट भाग टाकून कॉम्प्लेक्स देतोस हां? कळतेय लबाडी तुझी..आम्ही नाही लिहिणार आता जा...
13 Apr 2011 - 11:39 am | प्रचेतस
काय सांगू आता..? हाही भाग एकदम सुरेख. प्रसंग तंतोतंत डोळ्यांसमोर उभे राहिलेत. एकदम प्रभावी लेखनशैली.
13 Apr 2011 - 11:53 am | sneharani
मस्त, सुरेख झालाय हा भाग!
13 Apr 2011 - 12:55 pm | धनुअमिता
एकदम मस्त. सुरेख.प्रसंग एकदम डोळ्यासमोर उभे राहिले.जणू स्वतः तिथे हजर आहोत.
खुपच मस्त.
पु.भा.ल.ये.दे.
13 Apr 2011 - 1:11 pm | पियुशा
छान छान
शेवटी वाजल एक्दाच !
:)
13 Apr 2011 - 3:46 pm | विशाखा राऊत
मस्तच..
वाजवा रे वाजवा :)
13 Apr 2011 - 4:53 pm | गणेशा
आज वेळात वेळ काढुन पुर्ण पहिल्यापासुन कादंबरी वाचली ...
अतिशय छान लिहिले आहे.. काय बोलु आणि कसे असे झाले आहे.
शब्दाशब्दात इतके सामर्थ्य आहे की मी वाचक आणि तुम्ही लेखक हे नातेच संपले .. आणि या सर्व पात्रांमध्ये कोठे तरी आपणच होतो असा भास होत राहिला ..
अगदी पहिल्यांदा घरी गेलेला ड्रायवर पण मीच होतो की काय असे वाटले .. इतके समरसुन व्हायला झाले होते...
'लाडोबा; हे पात्र थोडकेच पण मस्त जशास तसे रंगवले आहे, एकदम माझ्याच घराची आठवण आली
या भागाच्या शेवटी मात्र स्वताच्या बहिनीचे लग्न आठवले ... त्यावेळेस निरोपाच्या वेळेची गडबड .. डोळ्यात साठलेले पाणी .. तायडीचा रडवेला आवाज .. गाडीत बसतानाचा केलेला टाटा .. आणि पुन्हा आवरा आवरी साठी कार्यालयात फिरलेलो मी .. सगळॅ आठवले .. डोळ्यात हलकेच पाणी दाटले ...
सर्व भाग विशेष आवडले .. विशेषता एकाच घटनेच्या जिपमधील दोघांनी सांगितलेल्या गोष्टी जास्तच आवडल्या
एकदाच सर्व भाग वाचताना खरेच खुप छान लिंक लागली . .असे वाटत होते संपुच नाही हे .. वाचतच रहावे .. बस्स वाचतच रहावे..
अवांतर : तुमच आमच .. खुप दिवसा पासुन वाचेन वाचेन म्हणुन राहिले होती.. आता जेवन बाजुला ठेवून वाचली.. खुप भुक लागली आहे पण आता कँटीन चे जेवनच संपले आहे.. त्यामुळे या वेळचे जेवन तुमच्यावर उधार ...
असेच लिहित रहा.. वाचत आहे
13 Apr 2011 - 4:58 pm | मृत्युन्जय
मस्त रे. तुम्हाला कोनी डेयरी मिल्क, लवंग, बडीशेप खायला दिली नाही का? ;)
माझ्या एका मित्राने तर त्याच्या लग्नाला जाताना कॅडबरी घेउन ये रे नक्की असे बजावुन सांगितले होते :)
13 Apr 2011 - 5:05 pm | यशोधरा
मस्तच सुरु आहे लिखाण. आवडलं.
13 Apr 2011 - 5:56 pm | प्रीत-मोहर
मस्त रे !!!!!
लव्कर्टाक पुढचा भाग
13 Apr 2011 - 10:25 pm | अतुल पाटील
झालाय हा पण भाग
13 Apr 2011 - 10:59 pm | प्राजु
>>>गाडी सोलापुर रोडला येई पर्यंत मागं त्या तिघी अॅडजेस्ट झाल्या होत्या, फक्त मला एका बाजुला ठेवुन.<<<
म्हणजे आता पुढे या बायका घरात अॅडजस्ट होऊन राज्य करणार ते ही तुम्हाला व्यवस्थित बाजूला बसवून!! शेवटचं वाक्य सुपर्ब!!
13 Apr 2011 - 11:08 pm | इरसाल
छान मागील सर्व भागांप्रमाणेच उत्कृष्ट.
14 Apr 2011 - 10:58 am | मनराव
या भागात फुल टू एकता कपूर टच दिला आहेस........ वाचताना तिच्या क-सिरीयलस मढलाच एखादा एपिसोड पहातो आहे असं वाटलं.........
अवांतरः तु "एकता कपूर"चा खूप म्हणजे खूप मोठ्ठा पंखा आहेस का..........??
14 Apr 2011 - 3:19 pm | मुलूखावेगळी
मस्त हो हा भाग पन
18 Apr 2011 - 8:30 pm | क्रान्ति
हर्षू, खूपच छान झालाय हा भाग. अगदी सगळं डोळ्यांपुढं उभं केलंस लिखाणातून. :)
18 Apr 2011 - 11:59 pm | इंटरनेटस्नेही
मस्त!
20 Apr 2011 - 3:31 pm | वपाडाव
नोंदी घेत रहाव्यात अशी वाक्यं.....
माईच्यान, लै भारी....