तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ०४
माधवीच्या मागं मागं चाललो होतो,तिनं एका घराचा दरवाजा वाजवला, दोन मिनिटं काहिच आवाज नाही, आणि नंतर एकदम आमच्या मागुन आवाज आला,” कोणय रे ", मी वळालो आणि पाहिलं बहुधा तिची आई असावी अशा वयाची एक बाई घराकडे येत होती, समोरच्या घरात गप्पा मारायला गेली होती बहुतेक. मी जरा कावराबावरा झालो कारण ज्या घराकडुन त्या येत होत्या त्याच्या कंपाऊंड्मधुन एक काका माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत होते. माझ्या मनात उगाचच नाहि नाहि ते विचार येत होते.
तेवढ्यात माधवि पाय-यावरुन खाली उतरली आणि म्हणाली ”किल्ली हवी आहे घराची ”, त्या काकु झपकन घरात गेल्या, किल्ली घेतली आणि माधविच्या हातात देत विचारलं "आई गेली का आहे घरीच". माधवीचं काहीच उत्तर नाही, आणि त्यामुळं माझी अस्वस्थता वाढत चाललेली. ती सरळ त्या घराच्या मागच्या दिशेनं चालायला लागली. मी ह्ळुच काकुंकडं पाहिलं, त्यांच्या नजरेत ’कुठुन आणलंय हे खुळ पकडुन’ असे भाव होते. मनाचा हिय्या करुन मी चालु लागलो.
तो कच्चा रस्ता एक शंभर मिटर मागे असलेल्या घराकडे जात होता, आणि आत्ता माझं लक्षात आलं की या सगळ्या गोंधळात त्या छोट्याश्या बंगलीवजा घराकडे आपलं लक्षच गेलं नव्हतं. गुंठेवारीतलं असलं तरी व्यवस्थित घर होतं, निदान बाहेरुन तरी. रंग पण नविनच होता. गेट समोर आल्यावर दिसलं की गेटच्या कॊलमवर दोन द्वारपाल रंगवलेले आहेत, म्हणजे अशातच घरात काहीतरी मंगल कार्य लग्न वगैरे पार पडलेलं होतं. गेट उघडंच होतं, ते ढकलुन दोघं आत गेलो, दरवाजा पण उघडाच होत्ता, माझं थोडं टेन्शन कमी झालं, चला दुसरं, खरंतर तिसरं कुणितरी असणार होतं इथं.
मागं वळुन पाहिलं आणि आता, बापरे आता आमची जिप डायरेक्ट कुठुनच दिसत नव्हती. पुन्हा धडधड वाढली. माधवीचा आवाज ऐकुन भानावर आलो, ” आई ए आई, झोपलीस की काय? - आतुन काही आवाज आला नाही, पण लगेचच दार उघडलं गेलं, एक साधारण ४५ च्या आसपासची बाई, घरगुती पण व्यवस्थित अवतारात दरवाज्यात उभी. माझ्याकडे लक्ष गेल्यावर डोळ्यांनीच माधवीला ”हे कोण?” हा प्रश्न गेला हे मी पाहिलं. यावर तिचं उत्तर बहुधा” चल आत सांगते” असं असावं, कारण त्या माउलीच्या चेह-यावर अजुन काही लिंक लागल्याचं दिसत नव्हतं,म्हणजे या ठिकाणि मी जेवढा नवखा होतो तेवढेच हे सगळे, जे कोणि आणि जे किती असतील ते मला नवखे असणार होते. या अनोळखि पणाची एक गंमत असते, माणुस या अनोळखी पणातच जास्त खुलतो, मोकळा होतो. मी स्वताला सावरत पटकन त्यांना नमस्कार म्हणलं, माधवी आत गेली, मला काय करावं कळेना, मी तिथंच ” पायरिशि होवु दंग ” या थाटांत. पण तेवढ्यात तिच्या आईनं मला आत यायला सांगितलं.
घर साधंसंच, एक हॊल, त्याच्या बाजुला किचन, त्या भिंतिवरची हॊटेल मध्ये असते तशी सर्व्हिंग खिडकी, मागं घरात जाणारा पॆसेज, त्यात एका बाजुला दिसणारा बाथरुमचा दरवाजा. बाहेर प्रमाणेच आत पण घर टापटिप, छान रंगकाम केलेलं होतं. बसायला दोन खुर्च्या, एक लोखंडी कॊट, त्यावर दोन गाद्या, सोलापुरी चादर अंथरलेली होती. एका कोप-यात टिव्हि, दिल्लि मेड साउंड सिस्टिम, त्याचे स्पिकर वर चारी कोप-यात लावलेले. एका भिंतिवर हिरो होंडाचं घड्याळ व एक फॆमिली फोटो, "हम दो हमारी दो". नकळत माझं मन गरज नसताना या सगळ्याची तुलना माझ्या घराबरोबर करु लागलं, जोड्या लावा सुरु झालं, हे आहे, ते नाही वगैरे वगैरे. हि विचार मालिका तुटली ” बसाना तुम्ही का उभे ? " या माधवीच्या प्रश्नानं. दरवाज्याजवळच्याच खुर्चित बसलो. तोवर तिची आई, आत गेली होती आणि आतुन आवाज आला ” मधु, इकडं ये ग जरा ” आता ही आवाजाची पट्टी साधारण नॊर्मल होती.
मधु आत गेली आणि मी पुन्हा तुलना सुरु केली. अजुन एक साम्य माझ्या आणि त्या घरातलं जे मगाशी निसटलं होतं ते ठळकपणे समोर आलं, घरातल्या कुटुंबप्रमुखाचा भिंतिवरचा फोटो हार घातलेला. आता हार सुकला होता, पण जेंव्हा घातला होता तेंव्हा मायेनं घातलेला असणार हे निश्चितच. मला एकदम बाबा आठवले, ते असते तर एव्हाना माझं लग्न लावुन दिलं असतं त्यांनी. पुन्हा माधवीच्या आवाजानं माझी तंद्रि भंग पावली, ” तुम्ही चहा घेणार की सरबत?’ पाच मिनिटात दोनदा बोलली ते पण प्रश्नच!, मी हलकंच हसत उत्तर दिलं ’चहा’,आणि हा आदेश असावा तसा आत पाठवला गेला ’आई, चहाच टाक”आम्हाला’.
ती समोर पलंगावर बसली, तिच्याच घरात असल्यानं जरा निवांत होती. ’ मागच्या महिन्यांत गॊरी ताईचं लग्न झालं, तेंव्हाच ही रंगरंगोटी केली होती’ मी फक्त ’हुं, छान आहे तुमचं घर’ एवढंच बोललो असेन, तेवढ्यात तिची आई बाहेर आली, हातात ट्रे घेउन त्यान दोन कप चहाचे आणि एक सरबताचा ग्लास. मी चहा घेतानाच माधवीचा आवाज आला ’ बाबा गेल्यापासुन आईनं चहा सोडलाय’ हा मनकवडेपणा होता की टेलिपथि की अजुन काही हे कोडं मला आजपर्यंत सुटलेलं नाही. जे प्रश्न माझ्या मनात ज्या क्रमाने होते त्याच क्रमाने त्यांची उत्तरे न मागता मिळत होती. आत्ता पहिल्यांदाच तिच्या आईच्या गळ्याकडं निट पाहिलं, एक न सांगता येणारी भावना दाटुन आली. कसातरी चहा संपवला आणि काहितरी बोलायचं म्हणुन विचारलं ’ तुम्ही बार्शिचेच का?’ माधवी -’ नाही, मुळचे कर्नाटकातले,माझे आजोबा इकडे आले होते माझे, आणि तुम्ही इथलेच की ? - पुन्हा प्रश्न - मी ’ नाही, मुळ गाव सोलापुर, इकडं कामानिमित्त फक्त’.
तिच्या आईनं तिला आत जायला सांगितलं, आणि अगदी स्पष्ट विचारलं ’ तुमची ओळख कशी झाली, मधुबरोबर, तिच्या कॊलेजात होतात की? - मी मग सगळी हकिकत सांगितली. तिची आई ’ मधु फार काही बोलली नाही कधी, पण ठिक आहे, तिच्यावर विश्वास आहे माझा, काही वेडंवाकडं नाही करणार ती’ , मला उगीचच सिट्वर मुद्दाम हात ठेवल्याची लाज वाटल्यासारखं झालं. ’ घरी कोण असतं? - पुन्हा प्रश्न - मी माहिती पुरवली. नक्की कुठल्या दिशेला चाललंय हे सगळे काही हिशोबच लागत नव्हता. माधवि पुन्हा बाहेर आली, तशा तिची आई पुन्हा आत गेली . आता शांतता होती ती फार सुखद नव्हती पण भयाण पण नव्हती. ’ चला निघतो मी, अजुन साईटवर जायचं आहे’ असं म्हणुन उठलो.
तेवढ्यात तिची आई बाहेर आली , आत जाउन बोलण्यासाठी बळ उसनं घेउन आलेल्या असाव्यात अशा बोलायला लागली ’ आता आम्ही दोघिच आहोत एकमेकिंना, हिचे बाबा गेले आणि आत्ता गॊरीचं लग्न झालं मागच्या महिन्यात,वर्षात करायचं असतं म्हणुन आटोपलं. तुम्हाला मधु आवडली असेल तर आधी तुमच्या घरी बोला आणि कुणा मोठ्यांना घेउन या पुन्हा येताना, पत्रिका पाहणार असाल तर हि घ्या, बाकी मागे फोन नंबर लिहिला आहेच.’ एका दमात सगळं सांगुन मोकळ्या झाल्या व शेवट्चा शब्द असाअ आला की, निघा आता, उगाच लोकांना चर्चा करायला विषय नको.
मी कसंनुसं हसुन, पुन्हा निरोप घेतला, पत्रिका जपुन खिशांत ठेवली आणि बाहेर येउन बुट घालायला लागलो, काही हालचाल जाणवली,वर पाहिलं माधवी दारात उभी होती, तिच्या चेह-याकडं पाहणं मला मुश्किल होत होतं, त्यात थोडि अगतिकता आणि बराच आपलेपणा बराच, मुग्ध प्रेम नाही. मी हळुच आत पाहिलं, तिची आई आत गेली होती, शक्य तेवढ्या हळु आवाजात कुजबुजलो ’मी बोलतो आईशी आणि फोन करतो तुला’ ’चालेल, पण लवकर कर’ - अवघ्या दहा मिनिटांत मी ’तुला’ आणि ती ’कर’ वर आली होती.
मला परत जायला रस्ता सापड्णार नव्हताच, मग तिला विचारलं, ’रस्ता सांगशील का जरा मेन रोडवर जाइस्तोवर’ ’आई, मी सोडुन येते मेन रोडपर्यंत’ एवढं बोलुन चपला घालुन ती निघाली. आईनं मगाशी दाखवलेल्या विश्वासाला जागत माझ्या पुढंच चार पावलं जात होती. जिप दिसेपर्यंत काही बोलणं झालं नाही,मी जिपमध्ये बसल्यावर आमच्या ड्रायव्हरला म्हणाली, ’तुम्ही पण यायचं ना चहा घ्यायला’ आमच्या ड्रायव्हरनं थेट सिक्सर मारला ’ आता काय येणं जाणं होईलच की घेउ पुन्हा आल्यावर’.
चुपचाप जिप मध्ये बसलो, ड्रायव्हरनं विषय काढलाच ’ मग यंदा आहेत वाटतं लाडु’, मी काहिच बोललो नाही. रुमवर आलो आणि मग एक एक विचार यायला लागला, आपण आईला ,बहिणीला काही सांगितलंच नाही आणि एवढा मोठा निर्णय घ्यायचा विचार करतोय. तिच्या आईनं केलं तेच बरोबर होतं "आधी तुमच्या घरी बोला आणि कुणा मोठ्यांना घेउन या पुन्हा येताना". आता हेच मोठं लफडं होतं घरी विषय काढायचा कसा आणि सांगायचं कुणाला, थेट आईला की लाडोबाला,म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीला. तशी ती माझ्या पेक्षा दोन वर्षांनीच लहान आहे, पण तरी देखील आमच्यात एक अंतर आहेच. रुममधुन बाहेर आलो, जेवायला मेस मध्ये गेलो, तिथंही डोक्यात हाच विचार होता. मग सरांना (बॊसला) घरी फोन केला आणि उद्या सोलापुरला घरी काम आहे असं सांगितलं. तिथुनच डायरेक्ट एसटी स्टॆंडला आलो आणि एसटि पकडुन थेट सोलापुरला. घरी यायला रात्र झाली होती, त्यामुळं आई पण चमकली ” आत्ता कसा आलास रे अचानक? जेवणार आहेस की कसं? काही भांड्णं झाली का साईटवर?, पुन्हा नुसते प्रश्न. सगळ्याला नाही म्हणुन झोपलो. डोळ्यासमोरुन दरवाज्यात उभारलेली माधवी जात नव्हती तसेच तिची आई पण. उद्या सकाळी आईला सगळं सांगावं असा विचार करत कधीतरी झोप लागली.
सकाळी उठलो आणि आई स्वयंपाकघरात काहीतरी करत होती, तिथं जाउन बसलो. आई म्हणाली ” बोल काय सांगायचंय तुला, रात्री दोन-तिन वेळा बडबडत होतास, उद्या सांगतो उद्या सांगतो. एक पाच मिनिटं धीर जमवण्यात गेली आणि नंतर दहा मिनिटं गेल्या दोन महिन्यात काय काय झालं ते सांगितलं अर्थात सेन्सॊर करुनच, आणि हे संपतय तोच लाडोबा आली तिच्या लक्षात आलं की काहितरी गंभिर बाब आहे. ती पण तिथंच बसली. थोडा वेळ असाच शांततेत गेला, मग आईनं विचारलं” मुलगी शिकतेय अजुन की नोकरी करतेय’. आई स्वतः नोकरी करत असल्यानं बायकांनी नोकरी करणं हा आमच्या घरातला अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता, आणि लाडोबाला लगेच मुद्दा सापडला माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, ’ कोण रे मुलगी आणि कुणासाठी? आईनं डोळे वटारलेलं मी पाहिलं आणि लाडोबा बाहेर निघुन गेली. आता आईच्या आवाजात तसाच प्रॊढपणा होता जो काल माधवीच्या आईच्या आवाजात होता,संथ पण अजिबात गोंधळ नसलेला. अर्धा तास या विषयावर चर्चा करुन उठलो. खिशातली पत्रिका आणुन आईला दाखवली, ती आजच जाते म्हणाली साठेंकडे . मग संध्याकाळी पुढचं बोलु असं म्हणुन चर्चेचा एक भाग संपला.
मी पुन्हा बाहेर येउन बसलो, पेपर वाचला, आवरलं मग ऒफिसमध्ये गेलो. सर आल्यावर थोडं कामाचं बोलुन घरी आलो जेवायला. लाडोबानं अपडेट केलं,"आई मगाशीच गेलीय साठॆंकडं,तिचा म्हणे मनुष्य गण आहे आणि तुझा राक्षस, असं कसं रे होणार मग? साठेंची पोरगी हिच्या बरोबर कॊलेजात त्याचा परिणाम अजुन काय? मी काहीच बोललो नाही, गप्प बसलो. लाडोबाचा पुढचा प्रश्न ” तिचे पण बाबा नाहीत का रे?”. मी मानेनंच हो म्हणलं. लाडोबा - पण आई आपल्या आईसारखीच आहे का रे, न रडणारी? तिचे हे प्रश्न ऐकुन दोघांचे डोळे भरुन आले, तेवढ्यात आई आली, आम्ही सारवासारव केली, लाडोबानं पाणि आणुन दिलं, पाणि पिउन आई म्हणाली. ” साठे म्हणाले पत्रिका जुळतीय, पण १९च गुण जुळताहेत ,मुलगी, माणसं आणि घरदार पाहुन निर्णय घ्या "
” हो का आणि दाद्याचा राक्षस गण आहे ना आणि तिचा मनुष्य असं कसं चालेल? इति लाडोबा. आई हसुन म्हणाली,”तुझा पण राक्षस गणच आहे, तुला बघु एखादा राक्षस त्या चंद्रकांताच्या यक्कुसारखा, आधि तुमच्या दादासाहेबांचं तरी आट्पुद्या मला, मग ते बघितील तुला काय करायचं राक्षस का देव. चहा टाक जरा”,
आणि पुढचा प्रश्न मला होता, फोन नंबर आहे का बार्शिकरांचा, मी पत्रिका साठॆंकडेच विसरलेय.
क्रमश:
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ३ http://misalpav.com/node/1६६९७
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - २ http://misalpav.com/node/16340
तुमचं आमचं सेम नसतं - भाग - १ http://misalpav.com/node/1६०८३
प्रतिक्रिया
14 Feb 2011 - 9:00 am | निनाद मुक्काम प...
वाक्यातून नुसता प्रसंगच नाही तर घरातील पार्श्व भूमी डोळ्यासमोर उभी राहिली .
आता हे लग्न झाले .तर ते अरेंज मेरेज असेल .(पण ते तू तुझे स्वताचे स्वत अरेंज केले असेल .)
प्रेम व अरेंज ह्या मधील हा सुवर्ण मध्य ठरेन
14 Feb 2011 - 8:34 am | नितीन बोरगे
छान झाला आहे.
14 Feb 2011 - 9:08 am | प्रचेतस
हाही भाग सुरेखच. ओघवती आणि सहज भाषा. सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.
14 Feb 2011 - 9:13 am | गुंडोपंत
छान मस्त लिहिले आहे.
आधीच्या भागातला बिनधास्तपणा थोडा वाह्यातपणा आणि मग घर पाहणे झाल्यावर हलकेच बदलेला दृष्टीकोन अतिशय सुंदर टिपलाय. अपेक्षांचे काहीसे झालेले पण सुखद असे ओझे लेखनात जानवत राहिले.
दोन्ही घरातले 'आई चे असणे' फारच सुरेख जमले आहे.
एकुणच लिखाण आवडते आहे. पुढील भागाची वाट पाहणे आहे.
14 Feb 2011 - 11:43 am | स्पा
हेच म्हणणार होतो.
हर्षद राव, काय झकास लिहिता हो तुम्ही,
हि फक्त कथा आहे कि सत्य कथा ?
14 Feb 2011 - 11:16 am | मुलूखावेगळी
अरे वा १४ फेब ला बरोबर टाकलात लेख. बायको माधवीच असेलतर दाखवा तिला.
लेख तर टर्निन्ग पॉइन्ट वर आलाय आता.
छान वातावण निर्मिती केलिये २ही घरात.
14 Feb 2011 - 1:03 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख !!!
14 Feb 2011 - 2:09 pm | sneharani
मस्त लिहलय!
14 Feb 2011 - 2:25 pm | पिंगू
सत्यकथन आवडेश... बाकी आमच्या आयुष्यात असे काही घडणे नाही.. याची तीव्र खंत आहे..
- पिंगू
14 Feb 2011 - 3:16 pm | पियुशा
+१
आवड्ल
14 Feb 2011 - 3:37 pm | धमाल मुलगा
गेल्या भागातल्या माझ्या प्रतिसादातला 'चालू आहात' हा शब्द माफीसकट मागे! :)
आवडलं. नाहीतर, एव्हढं सरळमार्गी आणि चांगला विचार करणारं कोण असतं हल्ली?
>>आणि पुढचा प्रश्न मला होता, फोन नंबर आहे का बार्शिकरांचा, मी पत्रिका साठॆंकडेच विसरलेय.
बोंबला! घातला का गोंधळ! आता हो?
14 Feb 2011 - 4:48 pm | स्वाती२
सुरेख झालाय हा भागही!
14 Feb 2011 - 10:51 pm | निनाद मुक्काम प...
शीर्षक वाचून डोक्यात किडा वळवळला .उगाच
काहीतरी व्हणार .
ह्यात लेखकाची आई नोकरी करते त्यामुळे नोकरीचा प्रश्न जिव्हाळ्याचा हा एक उल्लेख
आणि माधवीचे कॉलेजातून घरी येतांना चावी मागतांना '' आई गेली का आहे घरीच"
हा उल्लेख
माधवीची आई नोकरी करते असे कुठेही उल्लेख नाही .
.
14 Feb 2011 - 11:23 pm | ५० फक्त
नमस्कार,
सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार तसेच वाचनमात्रांचेही आभार.
पुढचा भाग शनिवारी रात्री टाकत आहे. लोकहो क्रमशः बद्दल माफि असावि. लेकाबरोबर खेळण्या-बागडण्यात वेळ एवढा छान जातो की लिहायचं डोक्यात येईपर्यंत निघुन जातं.
@ निनाद, http://misalpav.com/node/16697 वरुन सहावी ओळ पहा.
पुन्हा एकदा सर्वांचे अतिशय धन्यवाद.
हर्षद.
15 Feb 2011 - 9:52 am | मनराव
मस्त........... जमलाय......
15 Feb 2011 - 12:08 pm | टारझन
ए क णं ब र्स !!
26 Feb 2011 - 4:05 am | नितीन बोरगे
दुसरा शनिवार उजाडला कि राव. कधी येतोय पुढचा भाग?
28 Feb 2011 - 10:12 am | ५० फक्त
मित्र मैत्रिणिंनो,
पुढचा भाग टाकला आहे, वाचुन प्रतिक्रिया द्या.
http://misalpav.com/node/17011