परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो.
१९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती. पोलिस मात्र गवळीच्या हेतुंबद्दल संशय बाळगुन होते, दगडी चाळीतुन राजकीय हालचाली करणार्या गवळीवर तर त्यांचे बारीक लक्ष होतेच पण त्याच्या पक्षात सामील झालेल्या आणि होवु इच्छिणार्यांवरही नजर होती. अखिल भारतीय सेनेच्या वाढत्या प्रभावाबद्दल राज्यभर बरीच कुजबुज चालु होती. पुणेही त्याला अपवाद नव्हते. पुण्यात अखिल भारतीय सेनेच्या २५ शाखा महिन्याभरात सुरु होणार आहेत, वेगवेगळ्या कर्मचारी संघटनातुन पाठिंबा मिळवण्याचे गवळीचे प्रयत्न सुरु आहेत, हा नवा पक्ष म्हणजे गँगचाच नवा अवतार आहे अश्या बर्याच चर्चा सुरु होत्या. परंतु या चर्चांच्या आधाराने बातम्या देण्यात काहीच अर्थ नव्हता कारण त्यासाठी आवश्यक पुरावा मिळत नसल्याने त्यांची किंमत बाजारगप्पांपेक्षा जास्त करता येत नव्हती.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील तत्कालीन पोलिस अधिकार्यांनी अश्या वावड्यांची खातरजमा करण्याचे ठरवले आणि जुन महिन्यात पोलिसांनी याबाबत काम सुरु केल्याची खात्रीशीर माहिती हाती आली. खाजगीत बोलताना एका वरिष्ठ अधिकार्यानेही असे सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि याबाबत बातमी देण्याचा मार्ग मला खुला झाला.
तो काळ मोक्का, पोटा यासारखे कायदे अस्तित्वात येण्यापुर्वीचा होता. मुंबईतल्या अनेक पत्रकार अंडरवर्ल्ड मध्ये शोधपत्रकारीता करण्याबद्दल नाव कमावुन होते. पोलिसांना गुंगारा देणार्या फरार गँगस्टरच्या चटपटीत मुलाखती नेहमी वृत्तपत्रांमधे छापुन येत असत आणि येरवडा तुरुंगात बरेच गँगस्टर असल्याने अशी शोधपत्रकारीता करण्याची अन नाव कमावण्याची संधी पुण्यासारख्या छोट्या शहरातल्या क्राईम रिपोर्टरनापण उपलब्ध झाली होती. त्यामुळे आम्हीपण उत्साहात होतो, नवे नवे प्रयोग करत होतो. अंडरवर्ल्डच्या बातम्या धडाक्यात छापत होतो. अर्थातच अरुण गवळीबाबतची बातमी छापण्याची संधी मी गमावणार नव्हतोच. अश्या मनस्थितीत मी या सर्व प्रकरणावर दणदणीत बातमी दिली अन जुन १९९७ च्या अखेरीस ती छापुन पण आली. गवळी अन त्याच्या जवळचे लोक वृत्तपत्रात काय छापुन येते याकडे बारीक लक्ष ठेवुन असतात हे माहिती असल्याने त्या बातमीवर प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते अन दोन-तीन दिवसात ती आली.
३० जुनला संध्याकाळी उशीरा ऑफिसात मला फोन आला अन पलीकडुन बोलणार्याने सांगीतले, "मी दगडी चाळीतुन बोलतोय. तुम्ही अखिल भारतीय सेनेविरोधात बातमी दिली आहे ती चुकीची आहे." खोटे कश्याला बोला, माझ्या छातीत धडधडत होते पण शांतपणाचा आव आणुन मी उत्तरलो, "मी लिहिले ते पुर्णपणे खरे आहे. जर त्याला काही हरकत असेल तर लेखी द्या." "तसे कश्याला? तुम्हीच डॅडींना भेटा. तेच सर्व सांगतील. आम्ही उद्याच गाडीची व्यवस्था करतो तुम्ही अन इतर काही पत्रकारांना डॅडींची मुलाखत घ्यायला आणण्यासाठी," समोरुन उत्तर आले.
ताबडतोब वरिष्ठांशी बोललो अन त्यांची संमती घेऊन होकार दिला. मी दोन अटी घातल्या होत्या - पहिली म्हणजे मी काहीही प्रश्न विचारला तरी त्याला उत्तर मिळेल अन दुसरी म्हणजे वृत्तपत्रात काय छापायचे त्याचा निर्णय सर्वस्वी माझाच असेल. एक जुलैला सकाळी सातवाजता आम्ही चारपाच पत्रकार कोथरुड भागात मुंबईची नंबर प्लेट असलेल्या एका सुमोमधे बसलो अन चार तासात मुंबईला पोहोचलो.
दगडी चाळीत आम्ही पोहोचलो तर तिथे मेन गेटवरच पोलिस चौकी. आत जाणार्या प्रत्येकाचा नाव पत्ता पोलिस लिहुन घेत होते. रजिस्टरमधे एंट्री करुन आत गेलो तर गवळीच्या घरासमोरच्या पटांगणात जवळपास राज्यभरातुन दीड हजार तरुण जमलेले. प्रत्येकाच्या हातात काही अर्ज. "पक्षात भरती सुरु आहे त्यासाठी हे लोक आलेत. डॅडी स्वतः मुलाखती घेताहेत," आमच्या दिमतीस दिलेल्या दिलीप नावाच्या माणसाने आम्हाला सांगितले.
मुलाखती इमारतीच्या दुसर्या मजल्यावरच्या एका अंधार्या, कुबट, छोट्याश्या खोलीत सुरु होत्या. तिथे जायचे तर पहिल्या मजल्यावरच्या एका घराला (बहुधा गवळीचे स्वतःचेच ते असावे) ओलांडुन जावे लागायचे. इमारतीत शिरताच एक अरुंद (सुमारे दोन फुट रुंदी असेल) जिना होता. त्या जिन्याला प्रत्येक पाच सात पायर्यांवर वळावे लागत होते. पहिल्याच टप्प्यावर पाहिले तर एक डोअर फ्रेमचा मेटल डिटेक्टर. गवळीचे काही कार्यकर्ते तिथे उभे होते. "गर्दीचा फायदा घेऊन कुणी हल्ला करु नये म्हणुन ही व्यवस्था," दिलीपने सांगितले.
दुसर्या टप्प्यावर पोहोचलो तर तिथे अजुन काही कार्यकर्ते हातात मेटल डिटेक्टर घेऊन उभे. ते जिना चढणार्या प्रत्येकाची झडती घेत होते. अगदी व्यावसायीक सफाईने सगळे चालले होते. प्रत्येकाला ते थांबवत; बॅगा, हार, गुच्छ, अगदी नारळांवरुन सुद्धा मेटल डिटेक्टर फिरवत. ते झाले की भेटायला येणार्याच्या अंगावरुन मेटल डिटेक्टर फिरे. त्यानंतर अगदी मेटल डिटेक्टरचा क्लिअरन्स मिळाला तरी प्रत्येकाच्या सामानाची बारकाईने झडती होई अन त्यानंतर भेटणार्यांची अंगझडती. अगदी पादत्राणे काढुन, खिशात हात घालुन, अंगभर (गुप्तांगासुद्धा) चाचपुन. अन त्यानंतरच पुढे जाऊ दिले जात होते.
होता होता आम्ही तिथे पोहोचलो अन कार्यकर्ते आमची झडती घ्यायला सरसावले. ते बघितले अन एकदम किळसच आली, कुणीतरी परका माणुस आपली हॅन्डबॅग उघडुन बघणार, सर्वांग चाचपुन बघणार अन ते ही का तर कुणी एक गँगस्टर सुरक्षित रहावा म्हणुन. अन हे सगळे आपल्याला इथे बोलावुन घेवुन. असा अनुभव घेण्याची कल्पनाही मला सहन होत नव्हती.
"मी नाही देणार झडती. मला गवळीला भेटायची हौस नाही. त्यानंच आम्हाला इथे बोलावलंय. त्यालाच आमच्याशी बोलायचंय, आम्हाला नाही. गरज असेल तर त्याने भेटावे आम्हाला पण झडती घेऊन नाही. मी निघालो परत पुण्याला," नकळत माझा आवाज चढला होता ते ऐकुन कार्यकर्ते चमकलेच. काही जणांचे हात बेल्टकडे वळलेले जाणवले पण धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. सुदैवाने बरोबरचे सर्व पत्रकारसुद्धा जिडर अन अभिमानी होते. त्यांनीही मला साथ दिली अन आम्ही तसेच मागे वळालो, ताडताड पायर्या उतरुन इमारतीच्या बाहेर आलो.
आमचे आवाज ऐकुन इमारतीत बरीच धावपळ सुरु झालेली जाणवत होती. "काय झाला रे आँ! कोण ओरडला आँ," आम्ही इमारतीतुन आवाज ऐकला. अन काही सेकंदातच दिलीप आमच्याकडे धावत आला. "डॅडींनी वर कार्यकर्त्यांना सांगितलेय तुमची झडती घ्यायची नाही म्हणुन. मुलांना माहिती नव्हते म्हणुन असे झाले. प्लीज वर चला. एव्हढे लांबुन आलाय तर मुलाखत घेवुनच जा," त्याने विनवले.
शेवटी झाली एकदाची मुलाखत. एक तासभर चालली. मुलाखत संपली अन गवळीने आम्हाला जेवुन जायची विनंती केली पण तिथुन कधी बाहेर पडतो असे आम्हाला झाले होते. आम्ही तिथे जेवत नाही म्हणल्यावर गवळीने आम्हाला जेवण्यासाठी पैसे देवु केले पण आम्ही ते नाकारले अन आम्ही निघालो. "तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. पुण्याला परत पोहोचेपर्यंत बरोबरचे पत्रकार मित्र बाणेदारपणाबद्दल माझे कौतुक करत होते पण माझ्या कानात मात्र गवळीचे शेवटचे वाक्य घुमत होते.
प्रतिक्रिया
26 Jul 2009 - 2:57 pm | विनायक प्रभू
भारी
26 Jul 2009 - 2:58 pm | श्रावण मोडक
"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले.
शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची. शब्द नाहीत म्हणून शहारा म्हणायचे. अयोध्याकांडानंतरच्या दंगलीवेळची एक आठवण जागी झाली आणि आत्ताही शहारा आला. त्या आठवणीकडे नीट पाहिले आत्ता पुन्हा तेव्हा कळले की, भीती म्हणजे काय असू शकते ते. वळणदार लेखन.
26 Jul 2009 - 6:12 pm | स्वाती२
>>शहारा? त्यापलीकडची स्थिती असते ती काही क्षणांची.
+१
तुमचाही अनुभव लिहाना.
26 Jul 2009 - 3:49 pm | दत्ता काळे
भारी.
लेखनही फार सुंदर झालेय.
26 Jul 2009 - 3:51 pm | विंजिनेर
च्या भले!!... येउद्या असेच एकेक अनुभव पोतडीतून:)
26 Jul 2009 - 5:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दचकले ... तुम्ही ओरडल्याचं लिहीलं आहेत तिथे! सलाम ...
अदिती
26 Jul 2009 - 6:21 pm | स्वाती२
जबरदस्त अनुभव!
वाचन संपले आणि लक्षात आले छातीत धडधडतेय!
27 Jul 2009 - 12:06 am | ऋषिकेश
अगदी अगदी!! स्वातीताईंसारखेच म्हणतो
तुमचे एकापेक्षा एक सरस अनुभव माझ्यासारख्या तुलनेने साजूक तुपातलं जीवन जगणार्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाताहेत.. अजून येऊ दे
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
26 Jul 2009 - 6:29 pm | विकास
धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला.
मानलं!
काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ,
हा जो भाग आहे तो "डॅडींनी" सांगितला म्हणून नाही, पण लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्यामधे नारायण पण अडलाकी गाढवाचे पाय धरतो. इथे तर आधीच मर्कट त्यात...
26 Jul 2009 - 10:52 pm | शाहरुख
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला.
हे वाक्य मलाही खूप आवडले.
27 Jul 2009 - 11:38 am | एकलव्य
>>धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला.
आग्राच्या दरबारातील शिवाजीराजाचा फ्यान - एकलव्य
27 Jul 2009 - 9:12 pm | llपुण्याचे पेशवेll
हेच म्हणतो. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
26 Jul 2009 - 7:13 pm | प्रकाश घाटपांडे
दगडी चाळीत जायला पोलिस अधिकारी पण टरकायचे. भायखळ्याला नोकरीत असताना एमटीच्या एका एसीपीचा चॅनेल वर रिपोर्ट केला होता कि खोटा डीआर(बिनतारी संच बिघडल्याचा रिपोर्ट) दिला. योगायोगाने सीपी चॅनेलवर होते. त्यांनी एसीपीवर कारवाई केली. तेव्हा सहकार्याने त्याचे दगडीचाळी शी संबंध आहेत म्हणुन असच टरकावला होता मला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
26 Jul 2009 - 7:29 pm | मराठमोळा
>>राज्यभरातुन दीड हजार तरुण जमलेले. प्रत्येकाच्या हातात काही अर्ज. "पक्षात भरती सुरु आहे त्यासाठी हे लोक आलेत. डॅडी स्वतः मुलाखती घेताहेत,"
ही गोष्ट अगदी खरी आहे. कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म भरलेले आठवत आहेत. अ.भा.वि.प. सुद्धा असेच फॉर्म भरुन घेत होती कधी काळी. फॅशनच आली होती म्हणा ना!!
बाकी अनुभव एकदम जबरा!! त्याकाळी दगडी चाळ म्हंटल तरी लोकांची बोबडी वळत होती आणी त्यात आत जाऊन आवाज चढवुन बोलणे म्हणजे कमालच.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
26 Jul 2009 - 7:45 pm | प्रकाश घाटपांडे
व्हीआयपी/व्हीव्हीआयपी बंदोबस्तात डीएफएमडी (डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर )हे आमच्याकडुन लावले जात. एसबीचा(विशेष शाखा) एक माणुस हे तपासण्याचे काम करण्यास नियुक्त असे. टॅ आवाज आला की तपासायचे आम्ही सेटिंग करुन ठेवत असु .पण अनेक तांत्रिक कारणाने एकतर तो उगीचच वाजायचा, खिशात किल्ली असेल तरी वाजायचा किंवा अजिबात वाजायचा नाही. नियोजित कार्यक्रमाच्या अगोदर दोन तास ही यंत्रणा बसवावी लागे. अधिकारी रिवॉल्वर घेउन तपासत असत. त्यावेळी वॉकी टॉकी प्रेस करायची कि त्यातुन टॅ आवाज येई. त्याला वाटे ही यंत्रणा सुरळीत चालू आहे. खरी परिस्थिती आम्हालाच माहित असे. खर तर हा देखावा म्हणजे बुजगावणे असते. जिथे भरपुर गर्दी आहे व अनेक येण्याजाण्याच्या वाटा आहेत अशा ठिकाणि त्याचा काही उपयोग नसतो. प्रत्येकाला चेक करणे शक्य नसते. पण बंदोबस्त गॅजेट मधे वर्षानु वर्षे डीएफएमडी पुरव्याव्यात असे ठरावीक साच्याचे वाक्य असे.बालगंधर्वला फुलांचा गुच्छ घेउन एक विक्रेता आत जायला लागला. "ए ए नीट चौकटीतुन जा! " तो म्हणाला तुम्ही आहात म्हणुन इथुन चाललोय नेहमी इतर वाटांनी जातो. एका पुणेरी आजोबांना चौकटीतुन जायला सांगितले तर ते खवळले. तिकडे अतिरेकी मोकळे कुठुनही येतात आणि तुम्ही आम्हाला तपासा वा वा!
दगडी चाळीतला डीएफएमडी आन एच एच एम डी चांगलाच असणार याची आम्हाला खात्री आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
26 Jul 2009 - 11:13 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय भेदक वास्तव.
बिपिन कार्यकर्ते
26 Jul 2009 - 11:11 pm | बिपिन कार्यकर्ते
मुजरा!!!
बिपिन कार्यकर्ते
26 Jul 2009 - 11:45 pm | कशिद
तुम्हाला जो बाना व साभिमान आहे तू अब्दुल कलामाना किंवा त्यांचा बरोबर असलेल्याना का बरे वाटला नाही?
मी कलामाना दिलेल्या वाग्नुकिचा तीव्र निषेद करतो. X( X(
26 Jul 2009 - 11:58 pm | योगी९००
छान लिहिलयं..
धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला.
हे वाक्य छानच..
खादाडमाऊ
27 Jul 2009 - 8:30 am | क्रान्ति
३० जुनला संध्याकाळी उशीरा ऑफिसात मला फोन आला अन पलीकडुन बोलणार्याने सांगीतले, "मी दगडी चाळीतुन बोलतोय. तुम्ही अखिल भारतीय सेनेविरोधात बातमी दिली आहे ती चुकीची आहे."
या वाक्यापासून जो थरार सुरू झालाय, तो शेवटपर्यंत! काय खतरनाक अनुभव घेतलाय तुम्ही! वाचतानाच अवस्था कठीण होती. तुमच्यासारख्या नीडर आणि "धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला." अशा बाण्याच्या व्यक्तिमत्वाला दंडवत!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
27 Jul 2009 - 9:19 am | भडकमकर मास्तर
लेख आवडला...
सनकीत असलेल्या कार्यकर्त्याची आठवण पुन्हापुन्हा होत असेल तुम्हाला...( काहींचे हात बेल्टकडे गेले...बाप रे...)
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
27 Jul 2009 - 10:40 am | चिरोटा
लेख आवडला.
बापरे. दगडी चाळीत जायला पोलिसही घाबरत असे म्हणत्.ह्या चाळीला 'वलय' लाभण्याआधी माटुंग्याला वरदराजन मुदलियार(वरदादा) ह्याचे मोठे प्रस्थ होते. इकडेही पोलिस जायला घाबरत!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
27 Jul 2009 - 11:28 am | निखिल देशपांडे
पहिल्या वाक्या पासुन शेवटचा वाक्या पर्यंत मस्त थरार
उमटलाय....
बाकी
धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला.
हे वाक्य मस्तच
निखिल
================================
27 Jul 2009 - 2:41 pm | विशाल कुलकर्णी
ग्रेट भाऊ,
मानलं तुम्हाला ! तुमच्या निस्पृहतेला मानाचा मुजरा !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
27 Jul 2009 - 2:49 pm | परिकथेतील राजकुमार
ज ह ब र्या !!
अनुभव एकदम शॉल्लीडच हो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
27 Jul 2009 - 2:55 pm | धमाल मुलगा
डायरेक्ट डॅडीच्या बालेकिल्यावर नडिंग?
_/\_
जबरा अनुभव!
अवांतरः अरे बाबा, जरा कडंकडंनं खेळत जा ना भौ, तुझ्या असलेसुरस-चमत्कारीक अनुभव नुसते ऐकले तरी टेंशन येतं ना..आणि तुझं काय रे जिथंतिथं नडानडी चालु असतं?
27 Jul 2009 - 4:35 pm | लक्ष्मणसुत
जेव्हा बातम्या यायच्या तेव्हा त्या वाचताना विशेष काही जाणवत नव्हतं. पण तुमचा अनुभव वाचल्यावरब घामच् फुटला.
लक्ष्मणसुत उवाच्
27 Jul 2009 - 4:40 pm | सूहास (not verified)
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते...
अजुन येऊ द्या..
सुहास
27 Jul 2009 - 4:40 pm | सूहास (not verified)
सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते...
अजुन येऊ द्या..
सुहास
27 Jul 2009 - 5:46 pm | छोटा डॉन
प्रस्सनदा, लेख कम अनुभव मस्तच आहे.
आता ह्याला मस्त म्हणावे की सुरस आणि चमत्कारिक म्हणावे हा प्रश्नच आहे ...
एनी वे, वेल डन ...!!!
>>सत्य अस ही आहे की आपण घाबरतो म्हणुन " गु॑डगिरी" चालते...
हा हा हा, असे काही नाही हो.
चिल्लर आणि भुरटी "भाईगिरी" तुम्ही म्हणता तसे आपण घाबरतो म्हणुन चालत असावी, पण इथे किस्सा वेगळा आहे.
खुद्द डॅडी जेव्हा एखादा सल्ला देतात तेव्हा तो नक्की सत्य मानुन चालायला हरकत नाही, एखाद्याची खरचं सनकली तर काय ?
असो, अनुभव आवडला व कौतुकही वाटले ...
------
छोटा डॉन
अत्यंत भयंकर आणि निष्ठुर असत्य हे बहुदा मौनातुनच सांगितले जाते...
27 Jul 2009 - 5:07 pm | स्वाती दिनेश
"तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले.
वाचताना अंगावर शहारे आले..
थरारक अनुभव!
स्वाती
27 Jul 2009 - 8:46 pm | धनंजय
काय अनुभव आहे!
बाकी गँगची अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन तांत्रिक दृष्टीने उत्तम असते असे ऐकले होते. त्यामुळे पोलिसांपेक्षा त्यांचे मेटल डिटेक्टर चांगले असतील - शक्यता खूपच आहे.
याबद्दल सुधीर वेंकटेशन यांनी अभ्यास केला आहे. कोणाला अधिक माहिती असल्यास हा यूट्यूब दुवा बघावा (वेंकटेशनचे सहकारी लेव्हिट यांचे भाषण).
27 Jul 2009 - 9:16 pm | रामदास
एका पाठोपाठ एक सरस लेख लिहीता आहात.प्रत्येक लेख उत्कंठा वाढवत नेतो आहे.असेच नियमीत लिहीत रहा.पुढच्या लेखाची वाट बघत आहे.
धनंजय, फ्रिकॉनॉमीक्स वाचले होते तेव्हा लेवीटची ओळख झाली होती.आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद.
भेंडी, आपण म्हटल्याप्रमाणे वरदादादा हे फार मोठे गुन्हेगारी प्रस्थ होते.त्यांना वाय.सी.पवारांनी संपवले.
27 Jul 2009 - 11:22 pm | भाग्यश्री
बापरे ! काय लिहीलेय ! घाम फुटला वाचताना!
ते वाक्य मलाही आवडले!
http://www.bhagyashree.co.cc/
28 Jul 2009 - 7:53 pm | संदीप चित्रे
आधी 'टरकवणारा अनुभव' वाचला आणि मग मुद्दाम शोधून हा लेख वाचला. दोन्ही अनुभव खतरनाक. 'धोक्याची जाणीव बोथट...' हे वाक्य खूपच आवडलं.
आता नकळत वाट बघतोय तुमच्याकडून असे अजून काही अनुभव ऐकण्याची.
28 Jul 2009 - 10:13 pm | लिखाळ
थरारक ! तुमच्या बाणेदारपणाचे आणि निर्भयतेचे कौतुक वाटले.
उत्तम सकस लेखन. अजून लिहा.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
28 Jul 2009 - 11:13 pm | अमृतांजन
तुमच्या लेखांनी मिपाला एक वेगळीच शान आली आहे.
28 Jul 2009 - 11:31 pm | प्राजु
सॉल्लिड अनुभव आहे हा..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Jul 2009 - 9:48 am | श्रीयुत संतोष जोशी
थरारक अनुभव!
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
29 Jul 2009 - 1:15 pm | पूजादीप
दगडी चाळ बाहेरुन बघताना सूद्धा धडधडत, आणि तुम्ही बेधड्क आत संतापलात, धन्य आहात... एकंदरीत थरारक अनुभव आहे