झडती
परवा दूरचित्रवाणी बघताना माजी राष्ट्र्पती ए पी जे अब्दुल कलाम यांची कॉन्टीनेंटल एअरलाईन्सच्या कर्मचार्यांनी अवमानकारक पद्धतीने झडती घेतल्याची बातमी बघितली आणि अंगावर सरसरुन काटा आला. अचानक मन भूतकाळात गेले आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण येवुन मी शहारलो.
१९९७ सालच्या जुन महिन्यात ते सगळे सुरु झाले. अरुण गवळीची नुकतीच तुरुंगातुन सुटका झाली होती आणि त्याने अखिल भारतीय सेनेची स्थापनाही केली होती. त्यामुळे राज्यात बरीच राजकीय खळबळ माजली होती. पोलिस मात्र गवळीच्या हेतुंबद्दल संशय बाळगुन होते, दगडी चाळीतुन राजकीय हालचाली करणार्या गवळीवर तर त्यांचे बारीक लक्ष होतेच पण त्याच्या पक्षात सामील झालेल्या आणि होवु इच्छिणार्यांवरही नजर होती. अखिल भारतीय सेनेच्या वाढत्या प्रभावाबद्दल राज्यभर बरीच कुजबुज चालु होती. पुणेही त्याला अपवाद नव्हते. पुण्यात अखिल भारतीय सेनेच्या २५ शाखा महिन्याभरात सुरु होणार आहेत, वेगवेगळ्या कर्मचारी संघटनातुन पाठिंबा मिळवण्याचे गवळीचे प्रयत्न सुरु आहेत, हा नवा पक्ष म्हणजे गँगचाच नवा अवतार आहे अश्या बर्याच चर्चा सुरु होत्या. परंतु या चर्चांच्या आधाराने बातम्या देण्यात काहीच अर्थ नव्हता कारण त्यासाठी आवश्यक पुरावा मिळत नसल्याने त्यांची किंमत बाजारगप्पांपेक्षा जास्त करता येत नव्हती.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील तत्कालीन पोलिस अधिकार्यांनी अश्या वावड्यांची खातरजमा करण्याचे ठरवले आणि जुन महिन्यात पोलिसांनी याबाबत काम सुरु केल्याची खात्रीशीर माहिती हाती आली. खाजगीत बोलताना एका वरिष्ठ अधिकार्यानेही असे सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि याबाबत बातमी देण्याचा मार्ग मला खुला झाला.
तो काळ मोक्का, पोटा यासारखे कायदे अस्तित्वात येण्यापुर्वीचा होता. मुंबईतल्या अनेक पत्रकार अंडरवर्ल्ड मध्ये शोधपत्रकारीता करण्याबद्दल नाव कमावुन होते. पोलिसांना गुंगारा देणार्या फरार गँगस्टरच्या चटपटीत मुलाखती नेहमी वृत्तपत्रांमधे छापुन येत असत आणि येरवडा तुरुंगात बरेच गँगस्टर असल्याने अशी शोधपत्रकारीता करण्याची अन नाव कमावण्याची संधी पुण्यासारख्या छोट्या शहरातल्या क्राईम रिपोर्टरनापण उपलब्ध झाली होती. त्यामुळे आम्हीपण उत्साहात होतो, नवे नवे प्रयोग करत होतो. अंडरवर्ल्डच्या बातम्या धडाक्यात छापत होतो. अर्थातच अरुण गवळीबाबतची बातमी छापण्याची संधी मी गमावणार नव्हतोच. अश्या मनस्थितीत मी या सर्व प्रकरणावर दणदणीत बातमी दिली अन जुन १९९७ च्या अखेरीस ती छापुन पण आली. गवळी अन त्याच्या जवळचे लोक वृत्तपत्रात काय छापुन येते याकडे बारीक लक्ष ठेवुन असतात हे माहिती असल्याने त्या बातमीवर प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते अन दोन-तीन दिवसात ती आली.
३० जुनला संध्याकाळी उशीरा ऑफिसात मला फोन आला अन पलीकडुन बोलणार्याने सांगीतले, "मी दगडी चाळीतुन बोलतोय. तुम्ही अखिल भारतीय सेनेविरोधात बातमी दिली आहे ती चुकीची आहे." खोटे कश्याला बोला, माझ्या छातीत धडधडत होते पण शांतपणाचा आव आणुन मी उत्तरलो, "मी लिहिले ते पुर्णपणे खरे आहे. जर त्याला काही हरकत असेल तर लेखी द्या." "तसे कश्याला? तुम्हीच डॅडींना भेटा. तेच सर्व सांगतील. आम्ही उद्याच गाडीची व्यवस्था करतो तुम्ही अन इतर काही पत्रकारांना डॅडींची मुलाखत घ्यायला आणण्यासाठी," समोरुन उत्तर आले.
ताबडतोब वरिष्ठांशी बोललो अन त्यांची संमती घेऊन होकार दिला. मी दोन अटी घातल्या होत्या - पहिली म्हणजे मी काहीही प्रश्न विचारला तरी त्याला उत्तर मिळेल अन दुसरी म्हणजे वृत्तपत्रात काय छापायचे त्याचा निर्णय सर्वस्वी माझाच असेल. एक जुलैला सकाळी सातवाजता आम्ही चारपाच पत्रकार कोथरुड भागात मुंबईची नंबर प्लेट असलेल्या एका सुमोमधे बसलो अन चार तासात मुंबईला पोहोचलो.
दगडी चाळीत आम्ही पोहोचलो तर तिथे मेन गेटवरच पोलिस चौकी. आत जाणार्या प्रत्येकाचा नाव पत्ता पोलिस लिहुन घेत होते. रजिस्टरमधे एंट्री करुन आत गेलो तर गवळीच्या घरासमोरच्या पटांगणात जवळपास राज्यभरातुन दीड हजार तरुण जमलेले. प्रत्येकाच्या हातात काही अर्ज. "पक्षात भरती सुरु आहे त्यासाठी हे लोक आलेत. डॅडी स्वतः मुलाखती घेताहेत," आमच्या दिमतीस दिलेल्या दिलीप नावाच्या माणसाने आम्हाला सांगितले.
मुलाखती इमारतीच्या दुसर्या मजल्यावरच्या एका अंधार्या, कुबट, छोट्याश्या खोलीत सुरु होत्या. तिथे जायचे तर पहिल्या मजल्यावरच्या एका घराला (बहुधा गवळीचे स्वतःचेच ते असावे) ओलांडुन जावे लागायचे. इमारतीत शिरताच एक अरुंद (सुमारे दोन फुट रुंदी असेल) जिना होता. त्या जिन्याला प्रत्येक पाच सात पायर्यांवर वळावे लागत होते. पहिल्याच टप्प्यावर पाहिले तर एक डोअर फ्रेमचा मेटल डिटेक्टर. गवळीचे काही कार्यकर्ते तिथे उभे होते. "गर्दीचा फायदा घेऊन कुणी हल्ला करु नये म्हणुन ही व्यवस्था," दिलीपने सांगितले.
दुसर्या टप्प्यावर पोहोचलो तर तिथे अजुन काही कार्यकर्ते हातात मेटल डिटेक्टर घेऊन उभे. ते जिना चढणार्या प्रत्येकाची झडती घेत होते. अगदी व्यावसायीक सफाईने सगळे चालले होते. प्रत्येकाला ते थांबवत; बॅगा, हार, गुच्छ, अगदी नारळांवरुन सुद्धा मेटल डिटेक्टर फिरवत. ते झाले की भेटायला येणार्याच्या अंगावरुन मेटल डिटेक्टर फिरे. त्यानंतर अगदी मेटल डिटेक्टरचा क्लिअरन्स मिळाला तरी प्रत्येकाच्या सामानाची बारकाईने झडती होई अन त्यानंतर भेटणार्यांची अंगझडती. अगदी पादत्राणे काढुन, खिशात हात घालुन, अंगभर (गुप्तांगासुद्धा) चाचपुन. अन त्यानंतरच पुढे जाऊ दिले जात होते.
होता होता आम्ही तिथे पोहोचलो अन कार्यकर्ते आमची झडती घ्यायला सरसावले. ते बघितले अन एकदम किळसच आली, कुणीतरी परका माणुस आपली हॅन्डबॅग उघडुन बघणार, सर्वांग चाचपुन बघणार अन ते ही का तर कुणी एक गँगस्टर सुरक्षित रहावा म्हणुन. अन हे सगळे आपल्याला इथे बोलावुन घेवुन. असा अनुभव घेण्याची कल्पनाही मला सहन होत नव्हती.
"मी नाही देणार झडती. मला गवळीला भेटायची हौस नाही. त्यानंच आम्हाला इथे बोलावलंय. त्यालाच आमच्याशी बोलायचंय, आम्हाला नाही. गरज असेल तर त्याने भेटावे आम्हाला पण झडती घेऊन नाही. मी निघालो परत पुण्याला," नकळत माझा आवाज चढला होता ते ऐकुन कार्यकर्ते चमकलेच. काही जणांचे हात बेल्टकडे वळलेले जाणवले पण धोक्याची जाणिव बोथट होण्याएवढा संताप आला होता मला. सुदैवाने बरोबरचे सर्व पत्रकारसुद्धा जिडर अन अभिमानी होते. त्यांनीही मला साथ दिली अन आम्ही तसेच मागे वळालो, ताडताड पायर्या उतरुन इमारतीच्या बाहेर आलो.
आमचे आवाज ऐकुन इमारतीत बरीच धावपळ सुरु झालेली जाणवत होती. "काय झाला रे आँ! कोण ओरडला आँ," आम्ही इमारतीतुन आवाज ऐकला. अन काही सेकंदातच दिलीप आमच्याकडे धावत आला. "डॅडींनी वर कार्यकर्त्यांना सांगितलेय तुमची झडती घ्यायची नाही म्हणुन. मुलांना माहिती नव्हते म्हणुन असे झाले. प्लीज वर चला. एव्हढे लांबुन आलाय तर मुलाखत घेवुनच जा," त्याने विनवले.
शेवटी झाली एकदाची मुलाखत. एक तासभर चालली. मुलाखत संपली अन गवळीने आम्हाला जेवुन जायची विनंती केली पण तिथुन कधी बाहेर पडतो असे आम्हाला झाले होते. आम्ही तिथे जेवत नाही म्हणल्यावर गवळीने आम्हाला जेवण्यासाठी पैसे देवु केले पण आम्ही ते नाकारले अन आम्ही निघालो. "तुम्ही माझ्या पोरांवर ओरडला. बरोबरच होते तुमचे. पोरं चुकलीच होती. खरेतर तुम्ही असा करायला नको होता. काय आहे पोरं आहेत सनकीत. सटकला असता त्यातला एखादा तर? आँ," निघताना गवळी म्हणाला अन अंगावर शहारे आले. पुण्याला परत पोहोचेपर्यंत बरोबरचे पत्रकार मित्र बाणेदारपणाबद्दल माझे कौतुक करत होते पण माझ्या कानात मात्र गवळीचे शेवटचे वाक्य घुमत होते.
वाचने
10344
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
लय
शहारा
In reply to शहारा by श्रावण मोडक
>>शहारा?
जबरदस्त आठवण
च्या भले!!...
दचकले ...
जबरदस्त
In reply to जबरदस्त by स्वाती२
सहमत
मानलं!
In reply to मानलं! by विकास
+१
In reply to +१ by शाहरुख
+१००००
In reply to +१०००० by एकलव्य
+१
अरे बापरे!
>>राज्यभरात
मेटल डिटेक्टर
In reply to मेटल डिटेक्टर by प्रकाश घाटपांडे
दगडी
मुजरा!!!
तुम्हाला
छान अनुभव..
जबरदस्त!
लेख
मस्त लेख
पहिल्या
ग्रेट
ज ह ब र्या
अगाबाबो!!!
घामच् फुटला.
वेल डन...प्रसनदा..
वेल डन...प्रसनदा..
In reply to वेल डन...प्रसनदा.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
हम्म् ...
बापरे..
बापरे
पुनेरीदादा
बापरे ! काय
जबरा अनुभव
थरारक !
तुमच्या
सॉल्लिड
खरोखर
थरारक