सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १)
अर्जुनाने केलेल्या ‘सुभद्राहरणा’तून सरतेशेवटी अर्जुनाचा दारूण पराभव आणि यादवांचा सर्वनाश कसा घडून आला, याची ही कथा:
------------------------------------------------------------------------
१. अभिरमन्यु उवाच:
सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली.
… माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी. मी तिच्याशी लग्न लावण्याची, आणि मग त्या आधारे सर्व अभीरांची यादवांच्या दास्यातून सुटका करण्याची स्वप्ने बघत होतो.… अर्थात सुभद्रेला याची काहीच कल्पना नव्हती, पण यादवांच्या कृष्णाला याचा सुगावा लागला, आणि त्याने लगोलग त्या चांडाळ अर्जुनाला कानमंत्र दिला. त्याप्रमाणे मग तो नराधम सुभद्रेला रथात घालून पळवून घेऊन गेला. मी तेंव्हाच प्रतिज्ञा केली, की आता माझ्या जगण्याचे प्रयोजन एकच. कृष्ण आणि अर्जुनाचा सूड, आणि यादवांचा सर्वनाश.
२. अर्जुन उवाच…
संध्याकाळच्या भोजनानंतर प्रासादाच्या बागेत जरा फ़ेरफ़टका मारणे, हा माझा हल्लीचा रोजचाच दिनक्रम. आता वय बरेच झाले, पूर्वीसारखे दूर दूर मृगयेला जाणे आता काही जमत नाही खरे. . फिरताना जुन्या आठवणी मनात गर्दी करतात … … हिमालयातले बालपण, गुरुवर्य द्रोणांकडे धनुर्विद्या शिकणे… द्रौपदीला स्वयंवरात जिंकणे, उलूपी, चित्रांगदा, युधिष्ठिराच्या द्यूत-वेडापायी द्रौपदीची भर सभेत झालेली विटंबना, कीचक-सैरंध्री प्रसंग… …….
अर्जुनाचा मत्स्यभेद आणि द्रौपदी वस्त्रहरण :
कीचक आणि सैरंध्री, अर्जुन-उलूपी:
महाभारत युध्द, घटोत्कच वध:
… शेवटी युद्धात कौरवांचा पाडाव करून आम्हाला हस्तिनापुराचे राज्य मिळाले, त्यालाही आता पस्तीसेक वर्षे झाली असतील. एवढे मोठे युद्ध झाले, अठरा अक्षौहिणी सेना रणात पडली, आणि शेवटी युधिष्ठिर सम्राट बनला…
पाच पांडव आणि द्रौपदी
सम्राट !!! … हजारो-लाखो विधवांचा सम्राट. संपूर्णपणे मोडकळीला आलेल्या साम्राज्याचा सम्राट. रित्या अर्थ- कोषाचा, रित्या धान्य-भांडारांचा, उजाड- उदास- शापित नगरींचा सम्राट. गिधाडा- कोल्ह्यांच्या भक्षस्थानी पडलेल्या लाखो कलेवरांच्या भुतावळीचा सम्राट …
... आत्तासुद्द्धा सम्राट द्यूतशालेत द्यूताचा डाव मांडून बसलेले आहेत. शेजार-पाजारची लहान-सहान राज्ये द्यूतात जिंकून घेण्याच्या प्रयत्नात दंग आहेत…. नकुल-सहदेव बिचारे अश्वशाळेत उत्तम अश्वांची पैदास वाढवण्याचा कसून प्रयत्न करत आहेत… भीम आमची जवळ जवळ सगळी सेना बरोबर घेऊन अनार्यांच्या विविध टोळ्यांना लांबवर थोपवून धरण्यासाठी तिकडे दूर पूर्वेकडे गेलेला आहे… आणि द्रौपदी ?? ती तर महिना-महिना तिच्या कक्षातून बाहेर पडत नाही. गेल्या तीन महिन्यात मला ती दिसली सुद्धा नाही … तिचे पाची पुत्र, भाऊ धृष्टद्युम्न आणि पिता द्रुपद युद्धात पडले, त्या धक्क्यातून ती अजूनही सावरलेली नाही … तिच्या रित्या आयुष्याची पोकळी भरून काढेल, असे आता काहीही आता शिल्लक नाही ….
आणि मी ? सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन. गांडीवधारी महान अस्त्र-शस्त्रवेत्ता पार्थ. आता केवळ एका शापित, उदास नगरीचा व्यवस्थापक. शस्त्रागारात मी माझे गांडीव केंव्हा नेऊन ठेवले, हेही आता लक्षात नाही माझ्या.…
अरे, हे कोण येत आहे इतक्या घाईने इकडे ? ही तर सुभद्रा… आणि तिच्याबरोबर ते दोन उंच पुरुष कोण ?
"सुभद्रे, काय झाले ? घाबरलीशी दिसतेस ?? "
"अर्जुना घात झाला रे, भयंकर संकट ओढवले आहे तिकडे द्वारकेत… सगळे यादव सुरापान करून एकमेकांचा संहार करत आहेत… कुणीच कुणाचे ऐकेनासे झाले आहे. बलरामदादा आणि कृष्णपण हतबुद्ध झाले आहेत, आणि त्यांनी तुला तातडीने मदतीसाठी बोलावले असल्याचा संदेश घेऊन हे दोघे द्वारकेहून आलेले आहेत …
हे ऐकून मी हतबुद्धच झालो. मग लगेच आम्ही युधिष्ठिराकडे जाऊन त्याला सर्व परिस्थिती सांगितली, आणि उद्याच द्वारकेला जायला निघतो, असे मी म्हणालो.
" असा उतावळा होऊ नकोस अर्जुना, 'पृथ्वीपाल: सदा विवेकेन निर्णयं कुर्यात' असे शास्त्रवचन आहे. आता असे बघ, हे दोघे द्वारकेहून निघाले, त्याला दहा-बारा दिवस लोटले असणार. एव्हाना नक्कीच कृष्णाने यादवांची समजूत घातली असेल. आणि मद्याचा अम्मल राहून राहून किती वेळ राहणार? तो उतरल्यावर यादव शांत झालेच असतील ना ? काळजी करण्यासारखे काहीच नसेल आता तिकडे. बरे, समजा तू अगदी जायचे जरी ठरवलेस, तरी तू एकटा जाऊन तिथे असे काय करणार ? सेना कुठे आहे आपल्याकडे? भीम नेमका कुठे आहे, हेही आपल्याला ठाऊक नाही. इथे असलेली सेना घेऊन गेलास, तर इथल्या सुरक्षेचे काय? चारी बाजूंनी दबा धरून बसलेल्या अनार्यांना आयतीच संधी मिळेल. 'प्रजानाम हितं एव नृपस्य आद्य कर्तव्यं’ असेही शास्त्रवचन आहेच. तस्मात सध्या आपण स्वस्थ राहू. या दोघा संदेशवाहकांनी पुनश्च द्वारकेस जाऊन तेथील सद्यस्थिती काय आहे, ते पुन्हा इकडे येऊन सांगावे, मग त्याप्रमाणे आपण पुढील बेत ठरवावा, हेच इष्ट… "
मलाही युधिष्ठिराचे म्हणणे पटले. त्याची विद्वत्ता, शास्त्राभ्यास, धर्माचरण, यांना तोड नाही. उगाच नाही धर्मराज म्हणवला जात तो…
पण हे सर्व ऐकून सुभद्रा मात्र भयंकर खवळली.
पस्तीस वर्षांमागे आमचा लाडका अभिमन्यु युद्धात मारला गेला, त्याचे दु:ख आणि युधिष्ठिराबद्दल तिरस्कार अजूनही तिच्या मनात आहे.
… "षंढांनो, तुम्ही बसा बांगड्या भरून इथेच. पूर्वी द्रौपदीताईला भर सभेत ओढून आणताना बसले होताच की. तसेच बसा आताही … माझे माहेर, माझे यादवकुळ संकटात असता तुम्हाला स्वस्थ बसवले तरी कसे जाते? आता मी एक क्षणही इथे थांबणार नाही…. या दोघांबरोबर आत्ताच मी द्वारकेला प्रयाण करते.…
तिचे हे उद्गार युधिष्ठिराच्या अगदी वर्मी लागले. "अप्रबुद्ध स्त्रिये, तोंड सांभाळून बोल, सम्राटाशी बोलते आहेस … आणि तुला ज्या यादवांचा एवढा पुळका, ते युद्धात दुर्योधनाकडून लढले होते हे तू विसरली असशील, पण मी कधीच विसरणार नाही. चालती हो इथून".
अपमान, दु:ख, वंचना, काळजी, संताप यांनी वेडीपिशी झालेली सुभद्रा धावतच अंत:पुरात शिरली.…
… सम्राट सावकाशीने पुन्हा द्यूतागाराकडे वळले…
… मी गोंधळल्यासारखा तिथेच स्तब्ध उभा होतो…
" महाराज, श्रीकृष्ण महाराजांनी तुम्हाला अगदी तातडीने बोलावलेले असताना आम्ही जर तुम्हाला न घेताच द्वारकेला गेलो, तर आमची काय दशा होईल? बलभद्र तर क्षणात आमची चामडीच लोळवतील… दया करा महाराज, कसेही करून आमच्याबरोबर चला".
मी संभ्रमात पडलो. आता करावे तरी काय ? पूर्वी मी असाच संभ्रमात पडलो होतो, तेंव्हा कृष्णाने मला युक्तीच्या चार गोष्टी सांगून युद्ध करायला लावले खरे, पण त्याचा परिणाम काय झाला? सर्वनाशाच ना? मग आता मी काय करावे ???
तेवढ्यात सुभद्रा बाहेर आली. आता ती सावरलेली होती. "अर्जुना, मी जाते आहे, पण लक्षात ठेव, आता मी इथे कधीच परतणार नाही… चला बंधुंनो"…
" सुभद्रे थांब, असा अविचार करू नकोस, अश्या रात्रीच्या वेळी तू फक्त दोघांसोबत नगरीबाहेर पडणे योग्य नाही. तू फक्त रात्रभर धीर धर. उद्या पहाटेच मी द्वारकेला प्रयाण करेन. सैनिकांना तयार व्हायला, मला माझे गांडीव घासून पुसून सज्ज करायला, बाणांचा साठा रथात भरायला एवढा वेळ हवाच. प्रिये, तुझा हा वीर अर्जुन द्वारकेचा प्रश्न चुटकीसारशी सोडवील, आणि लवकरच शुभवर्तमान घेऊन परतेल, याची खात्री बाळग".
…. मग मी भल्या पहाटे दहा घोडेस्वार बरोबर घेऊन रथातून निघालो. बाणांचा मोजकाच साठा बरोबर घेता आला. निरोप देण्यापुरती द्रौपदी बाहेर आली होती. किती जर्जर, क्षीण, मलूल दिसत होती ती... या द्रौपदीसाठी एवढा नरसंहार झाला? की राज्यासाठी? की दुर्योधनाच्या हट्टापायी? … की युधिष्ठिराच्या द्यूतापायी?
थोड्या दिवसांच्या प्रवासानंतर दूरवर द्वारकेची तटबंदी, गोपुरे दिसू लागली, तेंव्हा मला वाटले की सर्व काही कुशल आहे. मात्र वेशीतून प्रवेश केल्यावर काही वेगळेच वाटू लागले. अगदी निर्मनुष्य रस्ते, घरा-घरातून ऐकू येणारे अस्पष्ट हुंदके, रस्त्यांवर इतस्तत: पडलेल्या मानवी अस्थि चघळणारी कुत्री, आसमंतात दाटलेली असह्य दुर्गंधी आणि वर आकाशात घिरट्या घालणारी गिधाडे… काहीतरी भयंकर, अमंगल घडले असल्याची ग्वाही माझे मन देऊ लागले.
मी तातडीने श्रीकृष्णाचा महाल गाठला. तिथे ना द्वारपाल, ना प्रहरी, ना उद्यानपाल, ना रक्षक. कोणीही पुरुष तिथे दिसत नव्हता. काही दीनवाण्या स्त्रिया घोळक्या-घोळक्याने इतस्तत: वावरत होत्या. मी धावतच प्रासादाच्या पायर्या चढून श्रीकृष्णाच्या कक्षात शिरलो. त्याचा मधुर पावा वा निर्मळ हास्य कानावर येईल, त्याचे साजरे-गोजरे रूप नजरेस पडेल, ही आशा व्यर्थ ठरली. महालात कुणीही नव्हते. .
माझ्यासोबत आलेले दोन संदेशवाहक म्हणाले, की ते द्वारकेहून निघाले,तेंव्हा समुद्रतीरी तंटा चालला होता. मग आम्ही लगेचच समुद्रतीरी पहुचलो.
तिथले दृष्य भयचकित करणारे होते. सर्वत्र यादवांची क्षतविक्षत कलेवरे पडलेली होती. मोडकी शस्त्रे, लाकडी दंड, फुटकी सुरापात्रे, जिकडे तिकडे पसरलेली होती.… विनाश. संपूर्ण विनाश…
यादवांचा सर्वनाश झाल्याचे स्पष्टच दिसून येत होते.
-------------------------------------------------------------
३. अभिरमन्यु उवाच:
माझ्या पित्याने माझे नाव ‘अभीरमन्यु’ ठेवले - अभिरांचा मुकुटमणि.
(कृष्णाची द्वारका)
अगदी लहानपणी मी अभीर - राज्यातच होतो, परंतु मी पाच-सात वर्षाचा असताना द्वारकेच्या यादवांनी अचानक हल्ला करून शेकडो स्त्रिया आणि लहान मुलांना पळवून नेले, तेंव्हापासून मी द्वारकेत वाढलो. माझी हुशारी आणि चुणचुणीतपणा बघून बलरामाने मला प्रासादात नेले, आणि लहानग्या सुभद्रेचा सवंगडी म्हणून ठेवले. हळूहळू आम्ही मोठे होऊ लागलो, आणि यौवनात शिरल्यावर आम्हाला एकमेकांबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटू लागले.…मात्र कृष्णाच्या पुढाकाराने पुढे सुभद्राहरणाचा प्रसंग घडला, त्यावेळी जो गोंधळ उडाला, त्याचा लाभ घेऊन मी द्वारकेतून निसटलो, आणि दूर जंगलातील आमच्या अभीर-वस्तीत पहुचलो. इतक्या वर्षांनी मी आलेला बघून सर्वांना खूप आनंद झाला.
अर्जुनाकडून सुभद्रेला सोडवून आणण्याचा आणि यादवांचा नायनाट करण्याचा माझा निश्चय होता खरा, पण तेवढे सामर्थ्य आमच्यात नव्हते. यादवांनी पूर्वी आमची हाकालपट्टी करून त्याजागी द्वारका वसवली, तेंव्हा अभिरांच्या निरनिराळ्या टोळ्या दूर-दूरवर पसरल्या, आणि त्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला. त्यांना पुन्हा एकत्र करून अभिरांचे सामर्थ्यशाली राज्य पुन्हा स्थापित करणे गरजेचे होते. माझ्या वयाच्या तरुणांना एकत्र करून मी तेच काम हाती घेतले. मी माझ्या अगदी विश्वासू तरूण-तरुणीना द्वारका, हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थात नट- नर्तक, विदुषक, गणिका, लोहार, सुतार, वनौषधी वा कस्तुरी विकणारे म्हणून पाठवून त्यांच्या मार्फत तिकडली बित्तंबातमी मिळवू लागलो.
आमचे पूर्वज समुद्राचे मीठ काढून ते सर्वांना पुरवत, मात्र यादवांनी आमच्या सर्व मिठागारांवर कब्जा करून ते मीठ अभीरांच्या सुंदर युवतींच्या मोबदल्यातच काय ते देण्याचा नीच उद्योग सुरु केला होता, हेही एक कारण माझ्या यादवांचा संपूर्ण नायनाट करण्याच्या निश्चयामागे होते.
सुभद्रा आणि अर्जुनाच्या वयात खूप फरक होता. तिला जरी मूल झालेले असले, तरी अजुनही तिच्या मनात माझ्याविषयी प्रेमा असेल, असे मला वाटत होते. पुढे तिकडे पांडवांना वनवासात जावे लागले, तेंव्हा मी सुभद्रेची दासी म्हणुन काम करणार्-----या माझ्याच हस्तिकेकरवी तिला निरोप दिला, की तिने आता इकडे माझ्याकडे निघून यावे. यावर तिने दासीला काहीच उत्तर दिले नाही, पण मग लवकरच ती तिच्या मुलाला घेऊन द्वारकेला आली. मला पुन्हा आशा वाटू लागली, की आतातरी माझी सुभद्रा मला मिळेल. त्या दृष्टीने मी एकदा गुप्तपणे द्वारकेत जाऊन तिला भेटलो सुद्धा. पण आता ती पूर्वीची गोड, लाजरी - बुजरी, अल्लड, स्वप्नाळू सुभद्रा राहिलेली नव्हती, आणि तिचा जीव तर तिच्या लहानग्या मुलात पूर्णपणे गुंतलेला होता. मला बघून तिचे डोळे क्षणभर चमकले, आणि लगेच विझले. मी काय ते समजलो. माझी ती अल्लड सुभद्रा मला आता कायमचीच दुरावली होती.… मग मी माझ्या अभीरांच्या एकीकरणाच्या प्रयत्नात असताना योगायोगाने भेटलेल्या एका अभीर मुलीशी लग्न केले. तिचे आधीचे ‘शतगोणी’ हे नाव बदलून ‘अभिराणी’ ठेवले. ती पण माझ्या कार्यात मनापासून समरस झाली.
पांडवांच्या वनवासानंतर त्यांचे दुर्योधनाशी मोठे युद्ध होणार, देशोदेशीचे राजे त्यात सामील होणार अश्या बातम्या येऊ लागल्या. खरेतर सर्वसामान्य लोकांनाच काय,पण देशोदेशीच्या सैनिकांनासुद्धा कौरव-पांडवांच्या भांडणात काहीच स्वारस्थ्य नव्हते. परंतु दुर्योधनाने त्यांच्या राजांना उत्तमोत्तम दासी, जडजवाहीर, धन-संपत्ती देऊन आपल्याकडून लढण्यास राजी करून घेतले. युधिष्ठिराने सुद्धा आपण जर युद्धात जिंकून सम्राट बनलो, तर दुर्योधनापेक्षाही जास्त देण्याचे वचन दिले. अर्थात आत्ता जे काही पदरात पडते आहे, ते भविष्यातल्या जर- तर च्या घबाडापेक्षा मौल्यवान, हे ओळखून जास्त राजे दुर्योधनाकडेच गेले. कृष्ण, सात्यकी वगैरे अर्जुनाचे मित्र पांडवाच्या पक्षात गेले, अन्य यादवप्रमुख मात्र दुर्योधनाच्या घोळात आले.
युध्दमग्न अर्जुन
अर्जुनाचा सूड घेण्याची ही नामी संधी आहे, हे ओळखून मी बलरामाला भेटलो. तो दुर्योधनाचा गदायुद्धातील गुरु, हे मला ठाऊक होते. आधी मला बघताच तो संतापला, पण जेंव्हा मी माझे अभीर दुर्योधनाकडून लढतील असे सांगितले, तेंव्हा त्याचा राग मावळला. पुढे युद्धाचे वेळी जी यादव सेना दुर्योधनाकडून लढली, ती मुख्यत: आम्हा अभीरांचीच होती. पांडव सेनेचा संहार करण्यात आम्हाला काहीच स्वारस्थ्य नव्हते. आम्ही फक्त अर्जुनाच्या मागावर होतो. मात्र अर्जुनाला ठार करण्याचा माझा बेत काही सफल होण्यासारखा नाही, हे स्पष्ट झाल्यावर मात्र आम्ही एका रात्री गुपचूप कौरव सेनेतून पळ काढून परतलो. आमच्यासारखेच अनेक सैनिक दोन्ही पक्षातून पळ काढून रात्रीच्या अंधारात आपापल्या देशी परत जात होते. त्यांचे राजे वैभवशाली शिबिरातून सुखोपभोगात दंग होते, तर सैनिकांच्या नशिबी धड दोन वेळचे भोजन सुद्धा नव्हते.
शेवटी युद्ध संपले. लाखो सैनिक मृत्युमुखी पडले. जे पळून गेले, ते वाचले. खरेतर एवढा खटाटोप करण्याची काही गरजच नव्हती. सुभद्रेचे जर माझ्याशी लग्न झालेले असते, तर मी पांडवांचा पक्ष घेऊन दुर्योधनाच्या सर्व सेनेचा सहज नायनाट केला असता. पांडवांच्या सेनेला वाहत्या नदीतून पाण्याचा पुरवठा होत होता, तर कौरव सैन्य एका मोठ्या सरोवराच्या साचलेल्या पाण्यावरच अवलंबून होते. त्या पाण्यात आम्ही वनात सहजपणे पकडायचो, त्या अत्यंत जहरी नागांचे विष जर मिसळले असते, तर युद्ध न करताच सर्व कौरव त्यांच्या अकरा अक्षौहिणी सेनेसह मृत्युमुखी पडलले असते.… अर्थात माझे लग्न जर सुभद्रेशी झालेले असते, तरच.
युद्धानंतर पांडवांना राज्य मिळाले खरे, पण भरभराट मात्र यादवांचीच झाली. त्यांनी मिठाचा व्यापार आणि समुद्रावर चांचेगिरी करून अमाप संपत्ती मिळवली. मोठे सैन्य उभारले. अर्थात ही संपत्ती हळू हळू काही मोजक्या धनाढ्यांकडेच एकवटली, आणि सर्वसामान्य यादवांचे जीवन हलाखीचे झाले.
यादवांवर सरळ चाल करून जाणे तर अशक्यच होते. शिवाय आमची खूप माणसे युद्धात दगावली असती. त्यापेक्षा यादवांमधे भेद पाडून त्यांना आपापसातच लढवून मारण्याची कूटनीति अवलंबण्याचे मी ठरवले.
मग ठिकठिकाणच्या अभीर टोळ्यांना भेट देऊन, त्यांच्या गावात ‘अभीर-भैरव’ देवाची स्थापना करून, सर्वांना एक होण्याची निकड मी समजावून सांगितली. आता यादव फार मत्त होऊन वेळोवेळी अभीरांच्या वस्त्यांवर धाड टाकून, पुरुषांना ठार मारून स्त्रियांना पळवून नेऊ लागले होते, त्यामुळे आता सर्वांनी एक होऊन, आपणच पुढाकार घेऊन यादवांना कायमचे संपवणे निकडीचे होते, हे सर्वांना पटले. अर्थात हे सर्व करण्यात अनेक वर्षे खर्ची पडली.
‘अभीर-भैरव’
क्रमश: .......
प्रतिक्रिया
28 Jul 2013 - 8:40 pm | मनिम्याऊ
पटत नाहीयं...
28 Jul 2013 - 9:35 pm | चित्रगुप्त
@ मनिम्याऊ:
......पटत नाहीयं...
खरे आहे. लहानपणापासूनच आपण पांडवांचे उदात्तीकरण करणार्या कथा वाचत आलेलो असतो. माझेही तसेच झाले, परंतु महाभारत वाचताना काही प्रश्न पडतात. यादव एकमेकात मारामार्या करून अगदी सगळे कसे मृत्युमुखी पडले असतील? अर्जुनाला सुभद्रा आवडली, तेवढ्यावरूनच श्रीकृष्णाने तिला पळवून न्यायला अर्जुनाला सांगितले? अर्जुन एवढा महापराक्रमी धनुर्धर, मग त्याला रानटी अभीरांनी कसेकाय पराभूत केले? त्याकाळी अनेक दासी,दासीपुत्र वगैरे असत, ते कुठून येत? द्वारका समुद्रात कशी बुडाली? श्रीकृष्णाने पांडवांचा, तर इतर यादवांनी दुर्योधनाचा पक्ष घेण्यामागे काय कारण असावे? दुर्योधनाकडे जास्त राजे का गेले? .... वगैरे. या आणि अश्या प्रश्नांची उत्तरे महाभारताकडे एका वेगळ्या नजरेतून बघण्यात मिळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. अर्थातच हा कल्पनाविलास आहे. व्यास, वैशंपायन आणि सौतीच्या महाभारतात याचे संदर्भ वा स्पष्टीकरण मिळणार नाही. पूर्वग्रह बाजूला ठेऊन वाचण्यात एक वेगळा वाचनानुभव मिळेल, अशी आशा आहे.
22 May 2019 - 4:16 pm | राघव
सुभद्रेचं मन अर्जुनावर जडलंय आणि अर्जुनालाही सुभद्रा पसंत आहे हे कृष्णाला माहित होतं. बलरामांच्या मनात स्वतःचा शिष्य दुर्योधनाशी सुभद्रेचं लग्न लावून देण्याचं होतं. त्यावर उपाय म्हणून तातडीनं काही करण्यायोग्य, असा हा उपाय अनायास उपलब्ध होता. सरळ सांगूनही बलराम ऐकतीलच असं नाही ह्याची कल्पना असलशिष्य, कृष्णानं अर्जुनास सुभद्रेला पळवून नेऊन गांधर्व विवाह करायचा सल्ला दिलेला असावा.
यादवांचा अधःपात हे समाज उन्नतीच्या शिखरावर असतांना तारतम्य न बाळगता वागला तर काय होतं ह्याचं प्रतीक आहे. सर्व सुखं पायाशी लोळतांना आणि संपत्तीचा गर्व असतांना त्यांना पुढचा मार्ग दाखवणारा कृष्ण नसला तरी चालला असता. तेच शेवटी झालं. उद्वेग आणि खिन्नता यातून बलरामांनी प्रायोपवेशनानं देह सोडला. त्याचा संताप येऊन उरल्यासुरल्या भांडणार्या यादवांना कृष्णानं स्वतः मारून टाकलं. जेव्हा अर्जुन द्वारकेला पोहोचला तेव्हा कृष्णाचं आधीच निर्वाण झालेलं होतं. अर्जुन द्वारकेला पोहोचल्यावर वसुदेव आणि देवकी यांनीही देह सोडला. त्यांचं सर्व और्ध्वदेहिक करून मग उरलेल्या सगळ्यांसोबत अर्जुन निघाला.
अक्षय भाता आणि गांडीव यांचं प्रयोजन संपलेलं असूनही अर्जुन स्वतःचा अभिमान कुरवाळत राहिला.. त्या गर्वाचा या परतीच्या प्रवासात पुरता बिमोड झाला. त्याच्या समोर कित्येक लोक मारल्या गेले.. कित्येक लुटल्या गेले.. कसाबसा गांडीव वाचवून काही उरलेल्या लोकांसह आणि सामानासह अर्जुन हस्तिनापुरास पोहोचला. तो कुठे पकडला गेला असं मात्र कुठं माझ्या वाचनात आलं नाही.
यानंतर लवकरच सर्व पांडव द्रौपदीसह वानप्रस्थाला निघाले, बहुदा व्यासांच्या सांगण्यावरून. तेव्हा एका सरोवरात सर्व पांडवांनी आपापली शस्त्रं शिरवली. तेव्हाही अर्जुन गांडीवाला अंतर द्यायला तयार नव्हता, पण शेवटी युधिष्ठिराच्या उपदेशानुसार त्यानं त्याचा त्याग केला. यानंतर सर्व पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहिणी मार्गावर निघाले.
माझ्या वाचनांत इतकीच माहिती आहे. थोडं आणिक विस्तृत असेल पण गाभा असाच.
अभीरांचा इतिहास माहित नाही मला. त्यामुळे त्याबद्दल काही लिहिणे योग्य नाही. पण अभिमन्यू या नावाची उत्पत्ती मात्र आत्ता वाचनात आली.
मला असलेले काही प्रश्न यात असे -
या सर्व यादवीच्या प्रकारात वा नंतरही, उद्धव कुठे होते? उद्धवगीता म्हणतात ती केव्हा सांगीतली गेली? कृष्ण - बलरामांचं और्ध्वदेहिक उद्धवानं केलं की वसुदेवानं की अर्जुनानं?
28 Jul 2013 - 9:13 pm | शिल्पा ब
स्टोरी इंटरेस्टींग वाटते आहे...महाभारताचं सगळंच इंटरेस्टींग वाटतं म्हणा !
28 Jul 2013 - 9:44 pm | पैसा
चित्रे नेहमीप्रमाणेच उत्तम. महाभारताने अनेकाना अनेक विषयांवर लिहायला लावले आहे. त्यातील पात्रे घेऊन नव्याने रचलेली गोष्ट आवडली. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
28 Jul 2013 - 9:53 pm | मन१
मस्त वाचतोय
28 Jul 2013 - 10:02 pm | रमेश आठवले
तर मग आपण द्रौपदी ला हेलन ऑफ destroy म्हणू शकतो का ?
28 Jul 2013 - 10:41 pm | अत्रन्गि पाउस
पुढचा भाग अगदी लगेच येवू द्यात
28 Jul 2013 - 10:48 pm | लॉरी टांगटूंगकर
उत्कंठा प्रचंड वाढते आहे,
पुढच्या भागांवर प्रतिक्रिया देणार नाही कारण समाप्त पहिल्याशिवाय पुर्ण वाचणार नाही असं ठरवलंय..
28 Jul 2013 - 10:49 pm | लॉरी टांगटूंगकर
उत्कंठा प्रचंड वाढते आहे,
पुढच्या भागांवर प्रतिक्रिया देणार नाही कारण समाप्त पहिल्याशिवाय पुर्ण वाचणार नाही असं ठरवलंय..
28 Jul 2013 - 10:56 pm | धन्या
हे मुळ महाभारतात असेल असं वाटत नाही.
"महाभारताचे" नांव वापरुन आम्हा वाचकांची फसवणूक करण्यात आली आहे. व्यास आता वाद घालायला येणार नाहीत म्हणून त्यांच्या सोन्याच्या मंदीराला हा वीटा लावण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
29 Jul 2013 - 12:09 am | बॅटमॅन
चित्रगुप्तांनी अगोदरच सांगितलंय की कल्पनाविलास आहे म्हणून, व्हाय वरी/नाचणी :)
29 Jul 2013 - 10:53 am | धन्या
आमच्या
ह्या कमेंटीबद्दलही काही लिहा की.
आपल्या सोयीचे तेव्हढे उचलून गैरसोयीच्या मुद्द्यांना फाटयावर मारण्याची कला आपण कुठून अवगत केली आहे हे आम्हांस चांगले ठाऊक आहे. ;)
29 Jul 2013 - 11:05 am | चित्रगुप्त
@ धन्या:
...हे मुळ महाभारतात असेल असं वाटत नाही...
असे मी म्हणतच नाहिये, हा सर्व कल्पनाविलासच आहे.
शिवाय "मूळ" महाभारतात काय आहे अन काय नाही, ते मुळात किती मोठे होते, याविषयी तर जुन्या काळापासून अनेकांनी आपापले तर्क लढवलेले आहेत. एकंदरित महाभारतातील पात्रे आणि एकूण कथानक एवढे विशाल आहे, की त्यात अनंत काळपर्यंतचे लेखक, कवी, चित्रकार, सिनेमावाले यांना आपापल्या परीने काहीतरी काढ-घाल, निर्मिती करता येईल.
बारकाईने बघणार्याला या 'सोन्याच्या' मंदिरातही अनेक चोरवाटा, गुप्त भुयारे, गूढ-अंधारी तळघरे इ. दिसून येतात. त्यातून मुशाफिरी करण्यातील आनंद पण काही और आहे.
29 Jul 2013 - 11:42 am | धन्या
यू आर राईट सर.
माझा प्रतिसाद दुनियादारीच्या धाग्याचं छोटेखानी विडंबन होतं.
नुकतंच आनंद जातेगांवकरांचं "व्यासांचा वारसा" म्हणून महाभारताचं एका वेगळ्या कोनातून दर्शन घडवणारं नितांत सुंदर पुस्तक वाचलं.
महाभारताबद्दल ओढा असणार्या प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे.
29 Jul 2013 - 12:14 am | बॅटमॅन
कल्पनाविलास आवडला चित्रगुप्तजी. चित्रांमुळे अजून मजा येतेय. तुमचे इंटरप्रिटेशन आवडले. पर्व चा प्रभाव जाणवतोय :)
29 Jul 2013 - 12:13 pm | प्रचेतस
लिखाण आणि लेखनशैली बेहद्द आवडले.
बॅट्या म्हणतोय तसा पर्वचा प्रभाव जाणवतोय पण फारसा नाही.
पुभाप्र.
3 Aug 2013 - 12:07 am | डॉ सुहास म्हात्रे
वेगळ्या दृष्टीकोनातून मांडलेली महाभारताची सचित्र कथा आवडली. पुभाप्र.
17 Jan 2023 - 9:31 am | कर्नलतपस्वी
चित्रगुप्त, सांप्रत धागाकर्ते यांची ओळख माधुरी दिक्षित यांच्या वर केलेल्या काव्याने झाली. यांचे काही जुने धागे वाचले, प्रतिसादले. चांगले मनोरंजक लिहीतात.
प्रथमदर्शनी शिर्षक खुपच भारी वाटले. कदाचित दोन महान संस्कृती मधे काही साम्य,दुवा शोधण्याचा प्रयत्न असेल असे वाटले व कुतूहल वाढले. माझ्या माहितीनुसार,
स्पार्टाची राणी हेलन व सुभद्रा या दोघी घरच्यांच्या मनाविरुद्ध आपल्या प्रियकरा बरोबर पळून गेल्या होत्या.
या दोन्ही महान संस्कृती झालेल्या भयंकर महायुद्धा मुळे रसातळाला गेल्या,
अवास्तव पुत्रमोह हे दोन्हीही महायुद्धाचे मुख्य कारण ठरले असे मानण्यास भरपुर वाव आहे.
दोन्ही महायुद्धामुळे वर्णसंकर होऊन नवीन संस्कृती निर्माण झाली असेही म्हणू शकतो.दोन्ही
महायुद्धाच्या मागे दैवी शक्तीचा हात होता असेही वाटते.
असे जरी असले मुख्य फरक ,हेलन मुळे महायुद्ध झाले पण सुभद्रा महाभारतातील युद्धाला कारणीभूत नव्हती.
धागाकर्त्यांनी स्वतःच कबूल केले की हा केवळ कल्पना विलास आहे.
अभीरमन्यू बद्दल कधीच वाचले नव्हते. पण अभीर ही एक यदुवंशी क्षत्रिय जमात असल्याचे माहीत होते. अभीर हे सुद्धा गोपालक सर्वत्र पसरलेले व वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात.
हरियाणा-अहीर,महाराष्ट्र-गवळी उत्तर भारत-गोप, ग्वाला गुजरात,दक्षिण भारत - आयर, गौल्ला,कोनार (कोणार) बुंदेलखंड- दाऊ (दौवा)
अभीरांनी सातवाहन राज्याचा काही भाग जिंकला व नाशिक जवळच आपले राज्य स्थापले.
अभीरमन्यू उवाच,
माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी. मी तिच्याशी लग्न लावण्याची, आणि मग त्या आधारे सर्व अभीरांची यादवांच्या दास्यातून सुटका करण्याची स्वप्ने बघत होतो.… अर्थात सुभद्रेला याची काहीच कल्पना नव्हती,
अभीरमन्यू हा बलरामाचा अश्रीत, त्याने सुभद्रे बरोबर विवाहाची स्वप्न म्हणजे फक्त स्वप्न रंजनच म्हणावे लागेल. हे म्हणजे मुक्कदर का सिकंदर मधल्या बच्चन आणी राखी च्या प्रेमा सारखेच वाटते.
महाभारत या महाकाव्यात एक सुसूत्रता आहे. प्रत्येक घडामोडीला मागील संदर्भ आहे. जसे यादवांना दुर्वास ऋषीचा शाप.
द्वारकेत यादव उन्मत्त झाले होते. यातूनच यादवी माजणे हा वाक्प्रचार आला असावा.
महाभारत या महाकाव्यात एक सुसूत्रता आहे. प्रत्येक घडामोडीला मागील संदर्भ आहे. कल्पनाविलास करणे म्हणजे वडाची साल पिपंळाला लावणे असे वाटते.
मनोरंजन म्हणून लेख चांगला आहे पण अतिरंजित वाटतो.
चित्रे खुपच छान आहेत.
कल्पना आणी विलास यांच्या मिलनातून होणाऱ्या सृजनाला अंत नाही त्यामुळे प्रथमदर्शनी चांगले वाटले.
असाच एक कल्पनाविलास १९९७ मधे ललित बहल यांनी दूरदर्शनवर वेद व्यास के पोते या नावाने प्रसारीत केला होता.