सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)
७. अर्जुन उवाच :
कृष्णाला शोधायला मी रथ हाकारून नगराकडे निघालो. जिकडे तिकडे शोकमग्न स्त्रियांचे जथे हिंडत होते. त्या सर्व स्त्रियांना एकत्र व्हायला मी सांगत गेलो. एके ठिकाणी बर्याचश्या बैलगाड्या दिसल्या. माझा रथ तिथे पोचताच तिथून काही स्त्रियांनी पोबारा केला. "अभीर स्त्रिया आहेत त्या" कुणीतरी म्हणाले. जवळ जाऊन बघतो, तो गाड्यांमधे मूल्यवान वस्त्राभूषणे, सोन्या-चांदीची भांडी वगैरे भरलेले होते. त्या अभीर स्त्रियांनी हे सर्व गोळा करून जमवलेले दिसत होते, याचा अर्थ आता ते नेण्यासाठी अभीरांची टोळी येणार. अर्थात माझ्यापुढे ते काय करू शकणार म्हणा… तरी मी माझ्या सैनिकांना त्या गाड्यांभोवती पहार्यासाठी ठेवून एकटाच नगरात शिरलो. आधी पुन्हा एकदा कृष्णाच्या प्रासादात जाऊन बघावे, असा विचार करून प्रासादात शिरलो, पण तिथे तो नव्हता.
... तेवढ्यात मला आठवले, की कृष्णाच्या शयनकक्षात एक गुप्त द्वार होते, आणि त्याची कळ दाबून द्वार उघडल्यावर आत आणखी एक कक्ष होते. त्या कक्षात त्याने अत्यंत मौल्यवान रत्ने, आभूषणे ठेवलेली होती. हे रहस्य फक्त आम्हा दोघांनाच ठाऊक होते. त्या गुप्त कक्षात तर नसेल तो बसलेला? मी लगेच ती गुप्त कळ दाबून कक्षात प्रवेश केला. तिथेच कुणीच नव्हते. तिथे ठेवलेली संपत्ती बघून माझे डोळे दिपले... कृष्ण जर परतला नाही, तर ही संपत्ती इथेच पडून वाया जाणार, त्यापेक्षा आपणच ती का नेऊ नये? द्वारकेचे आता काही खरे नाही, आणि आपल्याला हस्तिनापुरात एवढ्या विधवांची सोय लावण्यासाठी आहेच संपत्तीची निकड...
... मग मी तिथलेच एक वस्त्र घेऊन त्यात ती सर्व रत्ने, आभूषणे भरली, आणि बाहेर पडलो. बाहेर ते दोघे दूत उभे होते. "महाराज, आम्ही द्वारकेत उरलेल्या सर्व लोकांना त्या बैलगाड्यांजवळ एकत्र केलेले आहे, आणि ते सर्व तुमचीच वाट बघत आहेत". ते म्हणाले.
बैलगाड्यांजवळ निरनिराळ्या वंशांच्या, वर्णांच्या, वयाच्या आणि रंगरुपांच्या हजारो स्त्रिया गोळा झालेल्या होत्या. काही धडधाकट, काही निर्बल, काही अगदी खचून गेलेल्या, तर काही उत्साहर्याणार्या. मी सर्वांना सांगितले, की आपण उद्या सकाळी हस्तिनापुराच्या दिशेने प्रवास सुरु करू. तोपर्यंत ज्याला जे जे सामान न्यायचे असेल, ते घेऊन सकाळी पुन्हा इथे एकत्र व्हावे. नगरातील मोठमोठ्या वाड्यातून जेवढी धन-संपत्ती हाती लागेल, ती गाड्यांमधे भरून घ्यावी. हे धन हस्तिनापुरात सर्वांची सोय लावायला कामास येईल. हे ऐकताच सर्व स्त्रिया पांगल्या. वाड्यांमधून संपत्ती काढतेवेळी तिथे भांडणे, हिसकाहिसकी होण्याची शक्यता माझ्या लक्षात आली, पण मला त्यावर काहीही करणे शक्यच नव्हते.
ही सगळी जत्रा घेऊन पायी हस्तिनापुरास पोहोचायला सुमारे दोन महिने तरी लागले असते. एवढ्या लोकांसाठी भोजन, स्नानादिकाची सोय, औषध-पाणी, हे सर्व माझ्या कुवतीबाहेरचे होते. मी पूर्णपणे हतबल होतो. कृष्ण माझा प्रियसखा, गुरु खरा, पण एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकून तो स्वत परांगदा झाला होता, त्याबद्दल आता माझ्या मनात वारंवार संताप दाटून येत होता, आणि पुन: पुन: आपण कुठून इथे आलो, असे वाटत होते.
सकाळी हळूहळू गाठोडी, बोचकी घेतलेल्या स्त्रिया जमू लागल्या. काहींनी दुभत्या गायी, शेळ्या, पोपट, कोंबड्या हेही बरोबर घेतले होते. गोळा केलेली संपत्ती मी गाड्यांमधे ठेवायला सांगितले, परंतु तिकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. आम्ही निघालो. सर्वात पुढे माझा रथ, त्यामागे संपत्ती आणि अन्न-धान्य भरलेल्या, तसेच रुग्ण आणि अतिवृद्ध लोकांसाठीच्या बैलगाड्या, आणि त्यामागे हजारो स्त्रियांचा जथा. मी माझ्या दहा घोडेस्वार सैनिकांपैकी दोघांना पुढे जाऊन पाण्याची, मुक्कामाची जागा शोधायला, तर उरलेल्यांना जथ्याभोवती रक्षणासाठी नेमले. माझा रथ पुष्कळ पुढे होता, एवढे बरे, नाहीतर त्या हजारो स्त्रियांच्या अखंड वटवटीने, रडण्याने माझे मस्तक खचितच बधीर झाले असते.
तिसर्या दिवशी सकाळी अचानक शहराच्या दिशेने अनेक कुत्री, मांजरे, आणि आजूबाजूच्या वनातून कोल्हे, लांडगे, हरिणे वगैरे वन्य प्राणी वेगात रैवतक पर्वताकडे धावू लागल्याचे दिसून आले. कुणाला कळेना काय झाले असावे ते. जथ्यातील एक वृद्ध म्हणाला, की ही सर्व 'तस्युनामी' नामक भयंकर प्रलयी वादळाची लक्षणे आहेत. 'तस्युनामी' नामक ऋषीने निरिक्षण करून असे सांगून ठेवलेले आहे…
दुपारचे सुमारास खरोखरच समुद्राच्या दिशेने प्रचंड वेगात वारा येऊ लागला. मागोमाग जोराचा पाउसही कोसळू लागला. आम्ही सर्व भिजून चिंब झालो. रैवतक पर्वतावरून खळाळत येणार्या मातकट पाण्याचे लोट चुकवत चालणे कठीण होऊन बसले. कसेबसे आम्ही एका जरा उंच पठारावर थांबलो. खाली बघतो, तो समुद्रातून अति प्रचंड लाटा येऊन द्वारका नगरीला धडका देत होत्या. बघता बघता द्वारकेतील सर्व घरे, प्रासाद, मंदिरे जलमग्न झाली आणि घटकाभरात द्वारकेतील प्रचंड प्रासादांचे केवळ उध्वस्त अवशेष उरले.
-
'तस्युनामी' वादळानंतरची उध्वस्त द्वारका चित्रकार: Gustave Dore (1832-93)
आम्ही सर्व भयाने, विस्मयाने सुन्न झालो. प्रवासाच्या सुरुवातीलाच अपशकुन झाला, या विचाराने स्त्रिया मोठमोठ्याअने रडू लागल्या. गाडक्या-मडक्यातून कसेबसे आणलेले पीठ, सत्तू, लाह्या आणि धान्याच्या गोण्या सर्व भिजून चिंब झाले. सर्वत्र एवढा चिखल माजला होता, की रात्री झोपायला, आणि प्रातर्विधीसाठी कोरडी जागासुद्धा मिळणे कठीण होते.
कशीबशी रात्र पार पडली, आणि आम्ही पुन्हा वाटचालीला लागलो. पुढे अभीरांचा प्रदेश होता. एवढी संपत्ती आणि स्त्रिया बरोबर असता तिकडून जाणे सुरक्षित नसल्याने मी जरा दूरचा वळसा घेऊन जाण्याचे ठरवले. माझा रथ तिकडे वळताच स्त्रियांमधे खळबळ माजल्याचे दिसले. काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी मी जातो, तो बर्याचश्या स्त्रिया तावातावाने अभीरांच्या भाषेत बोलत असलेल्या दिसल्या. त्या काय म्हणत आहेत, हे संदेश वाहकांना विचारले, तर ते म्हणाले की त्या सगळ्या अभिर स्त्रिया होत्या, आणि त्यांना त्यांच्या अभीर वस्तीत जायचे होते. हस्तिनापुरास जायला त्या मुळीच तयार नव्हत्या.
"बरेच झाले, तेवढाच भार कमी" असा विचार करून त्यांना मी "तुम्ही खुशाल तुमच्या वस्तीत जा, माझी काही ना नाही" असे सांगितले. तरी त्यांचा गोंधळ कमी होइना. "महाराज, त्या म्हणत आहेत, की त्यांनी त्यांची संपत्ती ज्या गाड्यांमधे भरून ठेवली होती, त्या घेतल्याशिवाय त्या इथून हलणार नाहीत".
हे ऐकून मी विलक्षण संतापलो. " कुलटांनो, दास्या-बटक्यांकडे कुठून आली संपत्ती ?? ही सर्व संपत्ती आता माझी आहे. त्यातील तुम्हाला काहीही मिळणार नाही. हा वीर अर्जुन स्त्रियांवर शस्त्र उगारणार नाही, पण उपासमारीने मरायचे नसेल, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता चालत्या व्हा इथून " असे निक्षून बजावताच त्यांनी आपसात काहीतरी विचार विनिमय केला, आणि त्या हळूहळू मुकाट्याने रानाकडे निघून गेल्या.
आणखी दोन दिवस मार्गाक्रमण केल्यावर अचानकच चाळीस - पन्नास तरूण अभीर स्त्रिया रानातून माझ्या रथासमोर प्रकटल्या. त्या म्हणाल्या, "महाराज, आम्हाला आमच्या घरच्यांनी स्वीकारले नाही, सबब आम्हाला आता तुमच्याबरोबर हस्तिनापुरास येण्याशिवाय तरणोपाय नाही. आमच्यापुरते पीठ आम्ही आणले आहे, ते आमचे आम्ही रांधून खाऊ. तुम्हावर आमचा भार येणार नाही. हस्तिनापुरास आम्ही बटकी, दासी बनून तुमची सेवा करू, पण महाराज, आता आम्हाला अव्हेरू नका".
... मी बघितले, तो खरोखरच प्रत्येकीकडे एकेक गच्च भरलेले जड गाठोडे होते. त्या सर्व तरुणी सुस्वरूप, टवटवीत आणि घट्ट-मुट्ट होत्या. हस्तिनापुराचा व्यवस्थापक मीच असल्याने वाड्यावर नवीन तरूण दासी नियुक्त करणे, जुन्यांची रवानगी राज्याच्या सीमावर्ती भागातील शेतांवर कामासाठी करणे, हे काम माझेच होते. अनायासेच या सुंदर दासी आपणहून चालून आल्याचे बघून मला बरेच वाटले. भीम त्याच्या स्वार्यांमधून तगडे दास आणि तरूण दासी अधून मधून आणायचा खरा, पण या बाबतीत माझी कर्तबगारी शून्यच होती. आता द्वारकेतून मी एवढी संपत्ती आणि सुस्वरूप दासी आणल्याचे बघून युधिष्ठिराने नक्कीच माझी पाठ थोपटली असती. हा विचार करून मी त्या सर्व जणींना जथ्थ्यात सामावून घेतले. त्या रात्रीच्या मुक्कामात त्या अभीर तरुणींनी मोठी शेकोटी पेटवून त्याभोवती उत्तम नृत्य-गायन केलेले बघून तर मला माझा निर्णय अगदी योग्य असल्याची खात्रीच पटली.
या घटनेच्या दुसर्याच दिवशी सकाळी अचानक समोरच्या रानातून अभीरांची एक मोठी टोळी आमच्यावर चालून आली. त्यांच्याकडे गोफ़णी आणि धनुष्यबाण होते खरे, पण या अजानबाहु पार्थासमोर ते काय टिकाव धरणार ? मी बाणांचा मारा सुरु करताच ते पळपुटे धीर सोडून रानाच्या दिशेने धावत सुटले. मला वीरश्री चढून मी त्यांच्यामागे माझा रथ भरधाव सोडून बाणांचा मारा अविरत चालूच ठेवला. मात्र ते सर्व अभीर दाट रानात अदृश्य झाल्याने त्यातले किती ठार झाले, हे कळले नाही. रथातील बाणांचा साठा पण संपलेला बघून मी माघारी फिरतो, तो समोर अभीर स्त्रियांचा घोळका. काल जथ्थ्यात सामील झालेल्या याच त्या स्त्रिया, हे मी ओळखले. "घाबरू नका, ते सगळे भित्रट मला घाबरून पळून गेले आहेत. आता कुणी तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही".… असे बोलतो, तोच त्या स्त्रियांनी आपापल्या गाठोड्यांमधून गोफ़णी काढून माझ्यावर दगडांचा मारा सुरु केला….
… माझ्या हातातून गांडीव गळून पडले, आणि मी खाली कोसळलो.…
----------------------------------------------------------------------------------
८. अभीरमन्यु उवाच :
प्राचीन अभीरांचे पश्चिमेकडे गमन: चित्रकार :Cormon, Fernand १८८०
फार पूर्वी आमचे पूर्वज त्यांच्या मूळ जागेपासून पश्चिमेकडे जात जात शेवटी समुद्रापर्यंत येऊन येऊन स्थायिक झाले होते, हे मला आठवले.
.. आता समुद्रतीरी यादवांमधे मोठी हाणामारी होऊन जवळ जवळ सर्व यादव त्यात ठार झाले. आम्ही रानातून शेकडो सर्प पकडून समुद्रतीरी आणून सोडले होते, पुष्कळश्या यादवांना त्यांनी दंश करून मारले.
--
यादवी: (डावीकडील-)Titian 1542-44.(उजवीकडील-) Palma il Giovane इ. स. १६०३
यादवांचा सर्पदंशाने मृत्यु: चित्रकार: Gustave Dore (1832-93)
... माझ्या प्रतिज्ञेचा एक भाग तर पूर्ण झाला, आता कृष्ण आणि अर्जुनांचा समाचार घेणेच काय ते राहिले होते. अर्जुनाला घेऊन माझे दोन विश्वासू हस्तक लवकरच पोहोचतील, याची मला खात्री होती, पण इथल्या गोंधळात कृष्ण कुठे गेला,कळले नाही. मग पंधरा-वीस बैलगाड्या तयार करून त्यात द्वारकेच्या मुख्य मुख्य धनी लोकांच्या वाड्यांमधील संपत्ती गोळा करून भरण्याचे काम काही स्त्री-पुरुषांवर सोपवून मी कृष्णाच्या शोधासाठी निघालो.
दुसरे दिवशी खूप दूरच्या रानात कृष्ण एका वृक्षाखाली गुडघ्यावर पाउल टेकवून उदास बसलेला दिसला. त्याच्यावर बाण रोखून मी म्हणालो:
" कृष्णा, ओळखलेस मला ? मी अभीरमन्यु. लहानपणी मी सुभद्रेबरोबर एकत्र खेळलो, वाढलो. माझे तिच्यावर प्रेम होते, आणि मी तिच्याशी विवाह करणार होतो. यात माझ्या प्रेमाचा तर भाग होताच, शिवाय त्यामुळे तुम्हा यादवांनी आम्हा अभीरांवर चालवलेल्या जुलुमातून सर्वांची सुटका मी करून घेईन, असे मला वाटत होते. परंतु तुला ते नको होते म्हणून की काय, तू त्या अर्जुनाला तिला पळवून न्यायला लावलेस. अरे, अर्जुन-सुभद्रा विवाहातून तू यादवांचे असे कोणते हित साधलेस ?
… आणि तू एवढा महान तत्ववेत्ता, यादवांचा अग्रणी, कर्तबगार नरपुंगव. पण समुद्रातून मीठ काढण्याची विद्या ज्यांच्याकडून तुम्ही शिकलात, त्यांनाच परांगदा करून, त्यांनी मोठ्या कष्टाने निर्मिलेली मिठागारे बळकावून त्यांच्या सुंदर कुमारिकांच्या मोबदल्यातच फक्त त्यांना मीठ देण्याचे नीच कृत्य करण्यापासून यादवांना तू परावृत्त करू शकला नाहीस.…
… कौरव-पांडव युद्धाचे वेळी तू मारे अर्जुनाला "युद्धात जिंकलास, तर पृथ्वीचे साम्राज्य उपभोगाशील, आणि धारातिर्थी पडलास, तर स्वर्गाचे राज्य भोगशील" असे आमिष दाखवून, "तू खुशाल गांडीव चालव, हत्येचे पाप तुला लागणार नाही" असे सांगून युद्धाला जुंपलेस.… परिणामी पांडवांना राज्य मिळाले खरे, पण त्यांची प्रजा कोण, तर वृद्ध, अपंग, रुग्ण पुरुष, लहान मुले आणि हजारो विधवा स्त्रिया. त्या सर्वांची जबाबदारी पांडवांवर टाकून तू मात्र नामानिराळा झालास.
... अरे, तू अगदी लहान असता मुष्टिक-चाणूरांस लोळवलेस, पुतनेचा वध केलास, कंसाला मारलेस, कालियामर्दन केलेस. एवढे तुझे सामर्थ्य असता, राजसूय यज्ञाचे वेळी तुझ्यापेक्षा अनेक वयोवृद्ध, थोर पुरुष उपस्थित असूनही अग्रपूजेचा मान मात्र तुला मिळावा, यावर शिशुपालाने हरकत घेतली म्हणून जसा तू तडकाफडकी त्याचा वध केलास, तसा तू दुर्योधन, दु:शासन, शकुनी वगैरे मुख्य कौरवांचा करतास, तर सर्व प्रश्न तिथेच संपला असता. एवढा नर-संहार झाला नसता, आणि पांडवांना राज्य करण्यास निदान धडधाकट प्रजा आणि सौभाग्यवती स्त्रियांनी, आनंदी मुला-बाळांनी गजबजलेली वैभवशाली नगरे तरी मिळाली असती...
कालियामर्दन: कांगडा शैली.
-
शिशुपाल वधः १. कंबोडियातील शिल्प. २. चाणूर-मुष्टिक वध (तपशील अनुपलब्ध)
... अर्जुनाला तू सांगितलेस, की एक दिवस हे सर्व मरणारच आहेत, तर तू आत्ताच त्यांना मार. अरे, मग त्यांच्या विधवांनी, मुलाबाळांनी काय करायचे ? त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची ? एका द्रौपदीचा सभेत अपमान झाला, म्हणून तू लाखो निरपराध स्त्रियांना वैधव्याच्या खाईत लोटलेस ? आणि खुद्द तुझ्या द्वारकेत हजारो स्त्रिया दासी-बटकींचे अपमानास्पद जीणे जगत असल्याचे तुला काहीच वाटले नाही ? कृष्णा, मी लहानपणी द्वारकेत असताना मला तुझ्याविषयी अतिशय आदर वाटत असे. परंतु नंतर तू त्या आदरास पात्र राहिलास का?
बरे, ते असो. द्वारकेतील सर्व मिठागारांवर, संपत्तीवर, व्यापारावर काही मोजक्या पुंडांनी ताबा मिळवला, आणि बाकीचे यादव मात्र जास्त जास्त दरिद्री होत गेले, हे तुला कधीच दिसले नाही ? त्यावर आपण काही उपाय करावा, हे तुला कधी सुचलेच नाही ? जरासंधाचा वध करवून त्याच्या बंदीतल्या राजांची मुक्तता करणार्या, नरकासुराच्या तावडीतून हजारो स्त्रियांची सुटका करून त्यांना आश्रय देणार्या परमवीराला आपल्याच बांधवांचे दु:ख दिसू नये ? की तू सुद्धा त्या पुंडांपैकीच एक होतास ? दिवसभर काबाडकष्ट करणार्या बांधवांना निदान पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा मिळेल, अशी सोय केली असतीस, तर आज यादवांचा संपूर्ण विनाश झाला असता का ?
... आता जरी तुला आपल्या चुका उमगल्या, तरी त्याचा काय उपयोग ? कृष्णा, तुझे लाघवी, प्रेमळ, सुंदर रूप, तुझे चातुर्य, गोकुळातील तुझ्या बाळ-लीला, तू अर्जुनाला रणभूमीवर केलेला उपदेश, हे कदाचित पुढील शेकडो पिढ्या आठवतीलही. तुझ्यावर कवने रचण्यात महाकवि धन्यता मानतील... तुझ्या हजारो प्रतिमा घरा-घरातून देव म्हणून पूजल्याही जातील कदाचित, तू केलीस तशी रासक्रीडा, दहिहंडी लोक सण म्हणून करतील ... पण या सर्वात तुझी ही कर्तव्य-विन्मुखता कुणाच्या लक्षात तरी येईल की नाही, कुणास ठाऊक. 'संभवामि युगे युगे' असे तू सांगितलेस, ते कश्यासाठी ? जगाच्या कल्याणासाठी, की ती एक पोकळ वल्गनाच ?
... आता मी जातो, मला माझ्या बांधवांसाठी खूप काही करायचे आहे. तुझे ऐकून अर्जुनाने केलेल्या युद्धातून सर्वनाशच झाला, पण आता तू माझे ऐक. तू योगेश्वर म्हणवला जातोस, असे मी ऐकले आहे. आता अजूनही योग-सामर्थ्याने तुला जगाचे खरे कल्याण करता येत असेल, तर ते तू अवश्य करावेस.पण तू हे करू शकत नाहीस, हेही मला ठाऊक आहे, कारण तुझा अंतकाळ आता जवळ आलेला आहे...
जाता जाता लहानपणी मला तुझ्याविषयी वाटणार्या प्रेमादरास स्मरून एक बाण मी तुझ्या पावलात मारून जात आहे. 'अश्मसर्प' नामक सापाची अगदी ताजी कात सत्तावीस दिवस अहोरात्र उकळत ठेऊन त्या द्रव्यापासून मिळणारी औषधी या बाणास लावलेली आहे, त्यामुळे तुला यापुढे कोणतीही वेदना जाणवणार नाही, उलट आनंदाच्या डोहातच जणु तू तरंगत आहेस, असे तुला वाटत राहील, आणि यथावकाश तुला वेदनारहित, आनंदमय मृत्यू लाभेल ".
… एवढे बोलून मी बाण सोडला. क्षणभर कृष्णाच्या चर्येवर विस्मयाचा भाव दिसला, आणि त्यानंतर मात्र एक शाश्वत आनंद त्याच्या मुद्रेवर झळकू लागला.
द्वारकेकडे जाताना संध्याकाळी मला माझे मित्र वाटेतच भेटले. त्यांच्याकडून मला अर्जुन माझ्या दूतांबरोबर द्वारकेस येऊन पहुचल्याचे, आणि तो द्वारकेत उरलेले सर्व वृद्ध, हजारो स्त्रिया, आणि हाती लागलेली संपत्ती घेऊन हस्तिनापुराच्या मार्गी लागला असल्याचे समजले. द्वारका नगरी समुद्रात बुडाली, पण तिथली संपत्ती मात्र अर्जुनाबरोबर हळूहळू आमच्या वस्तीच्या दिशेने येत होती. तो जथा वस्तीजवळ येताच आम्ही त्याच्यावर हल्ला करणार होतो, आणि आमच्या सर्व स्त्रियांना सोडवून आणणार होतो. मात्र अर्जुनाने आमच्या वस्तीला टाळून, वळसा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, हे आमच्या पथ्यावरच पडले, कारण त्या बाजूला घनदाट अरण्य होते, शिवाय अर्जुनाने आमच्या अभीर स्त्रियांना पाठवून दिले होते. त्यातील निवडक पन्नास तरूण स्त्रियांना गोफ़णी आणि दगडांनी भरलेली गाठोडी बरोबर देऊन मी अर्जुनाकडे परत पाठवले. त्याने त्यांचा स्वीकार केल्याचेही मला समजले.
आता माझ्या योजनेचा अंतिम टप्पा जवळ आलेला होता. योग्य ठिकाणी अर्जुनाचा काफ़ला येताच रानातून शंभर अभीर त्याच्यावर चालून गेले. अर्जुनाने लगेच बाणांचा वर्षाव सुरु केला. आमचा एकही माणूस आम्हाला गमवायचा नव्हता, मात्र अर्जुनाचे बाण संपवणे गरजेचे होते, त्यामुळे ते तरूण रानातून अर्जुनाला हुलकावण्या देत झाडाआडून धावत नुसता हल्लकल्लोळ तेवढा करत होते. अर्जुनाला चेव येऊन तो बाणावर बाण मारत सुटला, पण एकाही अभीर त्याच्या बाणाला बळी पडला नाही. अर्जुनाचे रथातील बाण संपले. पूर्वी अर्जुनाचा भाता 'अक्षय' असल्याचे सांगितले जायचे, कारण युद्धाचे वेळी शेकडो लोहार रात्रंदिवस काम करून बाणांचा सतत पुरवठा करत असायचे. आता मात्र त्याच्याकडे मोजकेच बाण होते. तसेच युद्धासंबंधी 'मंत्र' म्हणजे युद्धाचे नियम, जसे पदातिने पदातिशीच लढायचे, महारथीने महारथीशी, निशस्त्रावर शस्त्र चालवायचे नाही वगैरे, ते तर इथे कुचकामाचेच होते.
शत्रू घाबरून पळाला, असे समजून मोठ्या ऐटीने अर्जुन मागे वळला. आमच्या स्त्रियांनी लगेचच गोफ़णीतून त्याच्यावर दगडांचा वर्षाव करून त्याला रथातून खाली पाडले. त्याच्या दहा घोडेस्वारांना पण दगड मारून जायबंदी करून त्यांचे घोडे आणि अर्जुनाचा रथ आम्ही ताब्यात घेतले.
माझ्या माणसांनी अर्जुनाच्या मुसक्या बांधून त्याला माझ्यासमोर आणले. मी त्याला म्हणालो, "अरे, आजवर तू स्वत:ला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणवून घेत होतास, आज तू एका क्षुल्लक अभीरासमोर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत दीनवाणा उभा आहेस. ज्या श्रीकृष्णाने तुला सुभद्रेला पळवून न्यायला सांगितले, त्याचीपण मी यथायोग्य सोय लावून आलो आहे. यादवही सर्व संपलेच. आता उरला तूच. प्राख्यात धनुर्धर, महापराक्रमी वीर अर्जुन".
" पण तू कसला रे पराक्रमी वीर ? जिथे जाशील, तिथून कोवळ्या मुली हस्तगत करण्याएवढाच काय तो तुझा पराक्रम. उलूपी, चित्रांगदा, या तुझ्यापेक्षा अगदी लहान वयाच्या कुमारिकांशी तू जबरदस्तीने लग्न लावलेस, हे यावरूनच सिद्ध होते, की त्या तुझ्याबरोबर इंद्रप्रस्थास आल्या नाहीत. आणि सुभद्रा, तीही वनवासाचे वेळी माहेरी निघून आली".
... "अरे, तुझ्यापेक्षा तुझा तो महाबली भाऊ भीम, ज्याने तुमचे मुख्य शत्रू जे शंभर कौरव, त्या सर्वांना एकट्याने संपवले, तो खरा पराक्रमी वीर. आणि अर्जुना, त्या कर्णाच्या हातून तुझा वध होण्यापासून मीच तुला वाचवले, हे तुला ठाऊकही नसेल. त्या दिवशी कर्ण तुला निश्चितच ठार करणार होता. परंतु तू माझी शिकार होतास. तुझी शिकार करण्याचे स्वप्न जन्मभर उराशी बाळगूनच मी जगत आलो होतो, म्हणून कर्णाच्या रथाचे चाक ऐन वेळी मोडेल, याची सोय मीच त्या दिवशी करून ठेवली होती. आणि अधमा, तो रथातून उतरला, त्यावेळी तो निशस्त्र होता. अश्या स्थितीत तू त्याचा वध केलास, कारण तो सशस्त्र असता, तर तसे करणे तुला शक्य नव्हते, हे तुला आणि कृष्णाला चांगलेच ठाऊक होते".
... "आणि तू त्या कृष्णाचे ऐकून एवढे युद्ध केलेस, त्यातून तुम्हाला काय मिळाले, तर हजारो-लाखो विधवा, आणि मरणपंथाला लागलेल्या वृद्धांचे, मोडकळीला आलेले राज्य. आर्यांचे राज्य. तुम्ही आर्य स्वत:ला एवढे श्रेष्ठ समजता, पण जुगार , द्यूत, मद्यपान, एका स्त्रीचा पाच-पाच जणांनी उपभोग घेणे, संपत्तीला वा राज्याला वारस हवा म्हणून परपुरुषांकडून स्त्रियांना गर्भवती करवणे, मिठासारख्या सर्वांना आवश्यक असलेल्या वस्तूच्या मोबदल्यात अनार्यांच्या कोवळ्या तरुणी आणून त्यांना भोगदासी बनवणे, असले नीच उद्योग तुम्ही खुशाल करता.… त्यापेक्षा आम्ही अभीर बरे.
सुभद्रेने तिला झालेल्या मुलाचे 'अभिमन्यु' असे विचित्र अनार्य नाव का ठेवले, याचे सर्वांना आश्चर्य वाटले होते ना ? त्याचे उत्तर 'अभीरमन्यु' म्हणजे 'अभीरांचा मुकुटमणि' या माझ्या नावात आहे. तो पर्यंत तरी माझी आठवण सुभद्रेला नित्य होत होती, याचा पुरावा. मला सुभद्रेशी लग्न करून आम्हाला होणार्या मुलाचे नाव अभिमन्यु असेच ठेवायचे होते. परंतु अभिर-भैरव देवाच्या मनात वेगळेच काही होते म्हणायचे. सुभद्रा मला मिळाली नाही, पण त्यामुळेच त्या मस्तवाल यादवांचा नायनाट होऊन आमची त्यांच्यापासून कायमची सुटका झाली".
..."मला वाटले, तर आता एका क्षणात मी तुझे मस्तक धडावेगळे करू शकतो, पण मी तसे करणार नाही. एकतर तू निशस्त्र आहेस. दुसरे म्हणजे मला सुभद्रेला विधवा करायचे नाही. त्याशिवाय आजवर तू स्वत:ला एक महायोद्धा, महान धनुर्धर समाजात आलास, पण आता मात्र यापुढले उर्वरित आयुष्य आजच्या अपमानाची खंत उरी बाळगत जगण्याची शिक्षा मी तुला देणार आहे, तुला आता इथून निशस्त्र, निर्वस्त्र अवस्थेत पायीच परत जावे लागेल. पण घाबरू नकोस. तुला सोबत असावी, आणि अनुभवाचे चार शब्द सांगणारे वडीलधारे कुणी बरोबर असावे, म्हणून या सर्व वृद्ध यादवांना तुझ्यासवे येऊ देत. तसेच अपंग, रुग्ण हेही तुझ्यासोबत असावेत. त्यांची सेवा करून काहीतरी पुण्य तुझ्या गाठीस लागेल. दोन मास पायी चालल्यावर तुम्ही हस्तिनापुरास पोहोचाल. वाटेत तुमच्यावर हल्ले होऊ शकतात, पण तुझ्यासारखा परमवीर बरोबर असताना कसले भय ? तरीसुद्धा या यादव स्त्रियांपैकी कुणाला आमच्याबरोबर इथे राहायचे असेल, तर त्या राहू शकतात. मात्र इथे त्यांना द्वारकेतल्याप्रमाणे सुखासीन जीवन लाभणार नाही. प्रत्येकाला काबाडकष्ट करूनच उपजीविका करावी लागेल.
... राहता राहिली तू द्वारकेतून आणलेली संपत्ती. मी तुला इथून जिवंत सोडत असलो, तरी यापुढील वाटेत भेटणार्या टोळ्या तसे करणार नाहीत. संपत्ती लुटण्यापूर्वी ते तुम्हा सर्वांना ठार करतील, त्यापेक्षा ती इथेच राहू दे. तुझ्यापेक्षा त्या संपत्तीवर आमचाच जास्त हक्क आहे. यादवांनी आम्हाला पिढ्यान पिढ्या नागवले, त्याची अंशत: तरी भरपाई त्यातून होईल. तुम्ही सर्वांनी हस्तिनापुरास जिवंत पोचावे, म्हणून मी शेळ्या-मेंढ्यांचा एक मोठा कळप तुझ्याबरोबर देत आहे. त्यातून तुमची दुधाची, अन्नाची सोय होइल.
...आणि हो, तू हस्तिनापुरास पोहोचल्यावर तुझ्या प्रजेला, आणि विशेषत: सुभद्रेला अभीर-भैरवाचे सतत स्मरण होत रहावे, म्हणून तुझ्या कपाळावर मी त्याचे निशाण कायमचे उमटवणार आहे"
...एवढे बोलून मी धारदार खड्गाने अर्जुनाचे पूर्ण मुंडण केले, आणि त्याच्या कपाळावर अभीर-भैरवाची तप्त लोहमुद्रा उमटवून त्याला वृद्ध-अपंगांच्या जथ्यासह हस्तिनापुराच्या दिशेने रवाना केले.
अर्जुनाचे मुंडण: (चित्रकार अज्ञात) १८५१ -१८६० मधील वुडकट छापा.
-------------------------------------------------------- समाप्त ---------------------------------------------------------
प्रतिक्रिया
7 Aug 2013 - 4:15 am | स्पंदना
सगळे भाग वाचले.
काहीतरी वेगळं वाचायला मिळाले. याला थोडा बहुत इतिहासाचा (किंवा महाभारत वेगवेगळ्या शैलीत लिहीले गेले त्याचा ) आधार असावा असे वाटते आहे. कदाचित अभिरांचा इतिहास असावा.
एकुणच खुप रसरशीत कलाकृती.
7 Aug 2013 - 9:42 am | सामान्य वाचक
खूपच छान लेख
7 Aug 2013 - 12:31 pm | बॅटमॅन
वेगळे इंटरप्रिटेशन लैच आवडले. हे वारंवार वाचण्यात येईल!!!!!
12 Aug 2013 - 10:37 am | विश्वनाथ मेहेंदळे
मिपावरील सध्याचे २ धागे बघितल्यावर इथल्या वाचकांचे वागणे थोडे paradoxical वाटले.
इथे महाभारतावर आधारीत पण बरेच स्वातंत्र्य घेऊन लिहिलेली कथा उचलून धरली गेली आहे, मात्र दुनियादारीच्या नशिबी ते भाग्य नाही…:-)
असो, पहिले दोन भाग जितके आवडले तितका हा आवडला नाही.
12 Aug 2013 - 12:30 pm | बॅटमॅन
हम्म....आवड आपली आपली, जे जास्त जवळचे म्हणून जास्त अपील होते त्यात शक्यतोवर बदल तसा चालत नाही.
12 Aug 2013 - 5:39 pm | चित्रगुप्त
@ विश्वनाथ मेहेंदळे:
...पहिले दोन भाग जितके आवडले तितका हा आवडला ...
पहिल्या दोन भागातील काय आवडले, आणि शेवटल्यातील काय नाही, हे जरा तपशीलवार लिहिल्यास मदत होईल.
17 Aug 2013 - 3:05 am | विश्वनाथ मेहेंदळे
थोडक्यात सांगायचे तर…
शेवटची अभिरमन्युची दोन भाषणे अजिबात नाही आवडली. उगाच ओढून ताणून केलेली वाटली. शिवाय ते गोफण वगैरे पण तर्कसंगत नाही वाटले.
तपशीलवार हवे असेल तर… नंतर लिहितो.
17 Aug 2013 - 9:20 pm | चित्रगुप्त
अर्जुनाबरोबर काही सैन्य होते का ? किती ? की तो एकटा होता? रथात की पायी ? तो रथात असल्यास हजारो स्त्रियांसाठी पण रथ होते का ? नसल्यास सर्व एकाच गतीने कसे जात होते? सुमारे दोन महिन्यांच्या प्रवासासाठी (द्वारका ते हस्तिनापूर अंतरः १४०० - १५०० किमी.) अन्न-पाण्याची काय सोय होती? अर्जुनाबरोबर असलेली यादवांची संपत्तिपण अभीरांनी लुटली, तर ती अर्जुनाने कशी एकत्र केली होती ? ती बैलगाड्यांमधे भरली होती की कश्यात ?
अर्जुन अभीरांकडून का आणि कसा पराजित झाला ? त्याचा 'अक्षय' भाता रिकामा का आणि कसा झाला ? कृष्णाच्या पावलात व्याधाने बाण का मारला? (त्याचे पाऊल हे हरिणाच्या तोंडासारखे वाटले, हे मलातरी पटत नाही) यादवांचा आपापसातल्या मारामारीमुळे संपूर्ण नाश कसाकाय झाला ?
कृष्णाने सोळा हजार एकशे आठ स्त्रिया त्यांच्या मुलांसकट आणून त्यांना आश्रय दिला (प्रत्येकीचे एकेकच मूल म्हटले, तरी बत्तीस हजार तोंडे होतात), त्यांचे भरण-पोषण करण्याची जबाबदारी कृष्णाची वैयक्तिक होती की सामूहिक ? वैयक्तिक असल्यास त्याच्या मिळकतीचा स्त्रोत काय होता? सामूहिक असल्यास त्यांचा खर्च चालवण्याच्या मोबदल्यात त्या स्त्रियांना काय करावे लागे ?
...या आणि अश्या प्रश्नांची उत्तरे महाभारत काय देते ? ती तर्कसंगत वाटतात का?
......अर्थात मुळात हे सर्व सुद्धा जर काल्पनिकच असेल, तर प्रश्नच मिटला, मग आता कुणीही काहीही कल्पना लढवाव्यात ...
व्यासांच्या 'जय' नामक इतिहासात वैशंपायनाने भर टाकून 'भारत' आणि सौतीने भर टाकून 'महाभारत' बनवले, ती सर्व भर काल्पनिक की खरी? खरी असल्यास मुळात व्यासांनीच का लिहिले नाही ?
अमूक भाग व्यासांचा, अमूक वैशंपायनाचा आणि अमूक सौतीचा, असे पृथक्करण उपलब्ध आहे का?
17 Aug 2013 - 9:42 pm | प्रचेतस
अर्जुनाबरोबर यादवांचे उरलेसुरले सैन्य होतेच. श्रीकृष्णाचा पणतू वज्र यांस युधिष्ठिराने इंद्रपस्थाचे राज्य दिले होतेच. वज्रासह द्वारकेतील सर्व प्रजानन, उरलेसुरले सैन्य शश्त्रधारी सैनिकांसह अर्जुनाच्या आधिपत्याखाली द्वारका सोडून पुढे निघाले. पर्वताच्या पायथ्यांशी, नदीकाठी सोयीस्कर ठिकाणे पाहून मुक्काम करत हे सर्व दरमजल करत निघाले. रथ, घोडे, बैल इत्यादींवर द्वारकेतील संपत्ती, धनधान्य इत्यादी लादले गेले होते.
अशातच पंचनद प्रांती अभीरांनी त्या ताफ्यावर हल्ला केला. अर्जुनाला शस्त्रांचे स्मरण होईनासे झाले. तरीही त्याने कित्येक अभीर टिपून ठार मारले. अशातच अर्जुनाचे अक्षय्य भात्यातले बाण संपून गेले, बरोबरीचे वीर यादवसैन्याच्या नाशामुळे, कृष्णार्जुनांच्या मृत्युमुळे आधीच सैरभैर झाले होते त्यामुळे हे उरलेसुरले हतवीर्य सैनिक संख्येने कित्येक जास्त असलेल्या अभीरांना प्रतिकार करू शकले नाहीत.
हे बर्यापैकी तर्कसंगतच वाटते. कृष्णाचा मृत्यु सुद्धा तसा तर्कसंगतच वाटतो. बलरामाचा देहत्याग, यादवांचा प्रभासक्षेत्री झालेला विनाश यामुळे कृष्ण विषण्ण मनस्थितीत भटकत असता मरण पावला.
21 May 2019 - 4:58 pm | चित्रगुप्त
अवघ्या विश्वाला गीतेतून समत्व, योग, स्थितप्रज्ञता वगैरेंचा उपदेश करणारा श्रीकृष्ण विषण्ण मनस्थितीत ???
7 Aug 2013 - 1:11 pm | मालोजीराव
आफ्टर वॉर कथा आवडली !
जर महाभारत इ.स. पूर्व १५००० ते ७००० मध्ये घडल असेल तर सुनामी ची गोष्ट खरी असायला पाहिजे…त्या काळात समुद्राची पातळी सुमारे ५० ते १०० मीटर्स ने वाढली होती. (ice एज संपत होता म्हणे)
द्वारके समोरच्या समुद्रात अवशेष सापडलेत म्हणे…खरं आहे काय ?
7 Aug 2013 - 2:43 pm | बॅटमॅन
सर्वप्रथम- तस्युनामी नाव लैच जबरी.
आता:
दोन गोष्टी आहेत. अवशेष सापडलेत हे खरंय पण डेटिंग केल्यावर दीडेक हजार वर्षांपेक्षा मागे जात नाहीत ते.
हे वगळता मध्ये एक बातमी वाचली असेल- कोकणात सुमारे ८००० वर्षांपूर्वीची अंडरवॉटर तटबंदी सापडली इ.इ. त्या मोहिमेचे नेतृत्व केलेले डेक्कन कॉलेजचे अशोक मराठे यांचे मंडळात एक लेक्चर होते २०१२ मध्ये ते अटेंड करायचा चान्स मिळाला. त्यांनी त्यात सांगितले की भूजजवळ अख्खी अंडरवॉटर टौनशिप त्यांनी आयडेंटिफाय करून ठेवली आहे परंतु पैसे इ.इ. कारणास्तव ते पुढे चालवता आले नाही.
त्यामुळे द्वारकाच का, त्याच्या आसपासही जुने पाण्याखाली गेलेले अवशेष सापडलेत ही गोष्ट खरीच आहे-पण मरीन आर्किऑलॉजी अजून तितकी जोरात नाही असे वाटते.
7 Aug 2013 - 3:15 pm | बॅटमॅन
द्वारका आणि अन्य ठिकाणी नक्की कधी आणि काय काय उत्खनने झाली याचा आढावा या पेपरमध्ये उत्तम घेतलेला आहे. विजयदुर्ग किल्ल्याजवळची अंडरवॉटर तटबंदी मराठाकालीन असावी असा तर्कही तिथे लावल्या गेला आहे.
http://drs.nio.org/drs/bitstream/2264/30/3/Man_Environ_29_28.pdf
7 Aug 2013 - 3:18 pm | बॅटमॅन
इथे या पेपरमध्ये पान क्र. ३ ते ७ वाचावे. द्वारकेत बुद्धपूर्वकालीन अवशेष मिळाले नाहीत. पण बेट द्वारका इथे हडप्पाकालीन अवशेष सापडतात. दोन्ही ठिकाणी सापडलेली जहाजे रोमन काळ ते मध्ययुगीन काळातली आहेत असे दिसते.
7 Aug 2013 - 5:17 pm | प्रचेतस
ही तटबंदी पूर्णपणे नैसर्गिक आहे असे हल्लीच प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले गेले आहे. आता तसा दुवा मजजवळ नाही.
7 Aug 2013 - 5:30 pm | बॅटमॅन
हे रोचक आहे! मी वर दिलेली लिंक २००४ च्या पेपरची आहे.
८००० वर्षांपूर्वीच्या कोंकण संस्कृतीवाल्या व्याख्यानात अशोक मराठ्यांनी सांगितले होते की मानवनिर्मित असण्याचे एक मुख्य कारण म्हंजे कोकणपट्टीत सापडणारे २ प्रकारचे दगड नैसर्गिकपणे एकसाथ कधीच सापडत नाहीत ते तिथे एकसाथ सापडले. रचनेची रेग्युलॅरिटी हा निकष लावला नव्हता, पण तोही लावता येऊ शकेल.
7 Aug 2013 - 6:11 pm | मालोजीराव
बर्याच किल्ल्यांवरील बुरुज हे नैसर्गिक आहेत पण आपल्या गरजेप्रमाणे त्यांना शिवकाळात आकार दिला गेला, तसाच काहीसा प्रकार ह्या भिंतीचा वाटतो जरी नैसर्गिक नसली तरी ती गरजे प्रमाणे कमी अधिक केली गेली ,तासली गेली असावी कारण भिंतीची रचना आणि ठिकाण सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे.
7 Aug 2013 - 7:42 pm | बॅटमॅन
हम्म. पण जिथे विशेषतः दरवाजा असतो त्याच्या शेजारचे बुरुज नैसर्गिक नसावेत असे वाटते. असो.
हे पूर्ण पटलं!!
7 Aug 2013 - 3:19 pm | मालोजीराव
मस्त माहिती दिलीस रे !
विचारणा एव्हड्याचसाठी कि जर नंतरच्या काळात द्वारकेचे अवशेष सापडले आणि ते ७००० वर्षे किंवा जास्त जुने असतील तर द्वारका पृथ्वीतलावरील सर्वात जुनी सिविलायजेशन ठरेल. (सुमेर पेक्षा जुनी )
इसापूर्व सुमारे २०० वर्षांपूर्वी च्या ग्रीक राजाचे नाणे त्यात चक्रधारी श्रीकृष्ण दिसत आहे
7 Aug 2013 - 3:34 pm | बॅटमॅन
धन्स :)
अर्थातच, सुमेरियन पेक्षा जुनी ठरेलच द्वारका मग-पण मेहेरगढ इथे तितके जुने अवशेष ऑलरेडी सापडलेले आहेतच.
नाणे इथे दिसत नैये, घरी गेलो की पाहतो. ग्रीकांपैकी काहीजणांनी भागवत धर्म स्वीकारल्याने तशी नाणी येणे क्रमप्राप्तच आहे म्हणा.
7 Aug 2013 - 3:47 pm | चित्रगुप्त
@माल्जीरावः ....इसापूर्व सुमारे २०० वर्षांपूर्वी च्या ग्रीक राजाचे नाणे त्यात चक्रधारी श्रीकृष्ण दिसत आहे...
हे चित्र बघण्याची उत्सुकता आहे, पण चित्र दिसत नाहिये.
7 Aug 2013 - 4:12 pm | चित्रगुप्त
हीच ती नाणी का? यावर काय लिहिले आहे?
7 Aug 2013 - 9:51 pm | बॅटमॅन
डावीकडच्या फटूत अनुक्रमे डावीकडून "आगाथॉक्लेऑस" आणि "वासिलेइस" (यातली एक-दोन अक्षरे लागली नाहीत पण संदर्भाने सांगतोय) असे लिहिले आहे. लिपी ग्रीक आहे.
उजवीकडच्या फटूत "आगाथॉक्लेऑस" हेच नाव ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहे. त्यातले वरून तिसरे टेनिसच्या रॅकेटीत एक पॉइंट असल्यागत दिसणारे अक्षर म्हणजे थ आहे. विकीवरील ब्राह्मी अक्षरांचा तक्ता पडताळून पाहिल्यास हे सहज लक्षात यावे. ब्राह्मीचे रीडिंग "अगथकलुस/ष" असे करता यावे. ते क आहे की कु ते तेवढे नीट कळत नाहीये.
आगाथाक्लेऑस हे नाव, तर वासिलेइस म्हणजे राजा.
अशाच एका नाण्यावरून जेम्स प्रिन्सेपला ब्राह्मी लिपीचा उलगडा झाल्याचे ऐकले होते.
8 Aug 2013 - 9:09 pm | प्रचेतस
या संदर्भाने विसुनानांचे हे उपक्रमावरील दोन लेख आवर्जून वाचावे असे आहेत.
गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१
गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२
10 Aug 2013 - 10:18 pm | चित्रगुप्त
आगाथॉ क्लेऑस 'अगस्त्य- कलश'
वासि ले इस : वंशी ले ईश : बासरी धारी देव.
पुनांचा वारसा चालवणारा हवा ना कोणी.
10 Aug 2013 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
खणखणीत (त्या नाण्याच्या आवाजा सारख्या) पुराव्यासकट केलेला दावा मान्य केला गेला आहे ;)
10 Aug 2013 - 10:59 pm | बॅटमॅन
क्या बात!!!!!!
यावनी शब्द शेवटी संस्कृतापासूनच आलेले आहेत हे त्रिवार सत्य आपण पुन्हा एकदा अधोरेखित केलेत. लगे रहो!!
आपला,
चं.पी.कर्तक.
7 Aug 2013 - 3:13 pm | मनिम्याऊ
होय... द्वारका (किंवा तत्सम समुद्रात बुडालेले शहर) सापडली आहे.
डॉ. एस. आर. राव, यांच्या नेतृत्वा खालील सहावे 'मराइन आर्कियोलॉजिकल एक्सपेडीशन ऑफ द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा,' भारतीय वैज्ञानिक चमूने नोवेंबर १९८७ ते फेब्रुवारी १९८८ या कालावधीत या बुडालेल्या नगरीला शोधून काढण्यात यश मिळवले आहे. समुद्राच्या अंतर्भागात वालुकाश्मात बांधकाम केलेल्या इमारतींचे अवशेष आढळून आले आहेत.
महाभारतात द्वारकेचा उल्लेख जोड-द्वीप असा येतो. एक मुख्य द्वीप तर एक राणीवशाचे द्वीप असा. त्यानुसारच संशोधनात देखील दोन वेगवेगळी द्वीपे सापडल्याने महाभारतीय संदर्भाला पुष्टी मिळाली आहे.
१.
२.
३.
४.
मूळ अवशेषान्चा सन्गणकीकृत आराखडा
7 Aug 2013 - 5:14 pm | प्रचेतस
माफ करा पण हा उल्लेख महाभारतात नेमका कुठे येतो? माझ्या माहितीप्रमाणे उपरोक्त उल्लेख महाभारतातील नसून 'युगंधर' पुस्तकातला आहे.
पश्चिम समुद्राच्या तीरावर रैवतक पर्वताच्या सान्निध्यात पुरातन कुशस्थली नगरावर तीन योजने लांब व एक योजन रूंद अशी भक्कम कोटबंद द्वारकानगरी तयार केली असे महाभारत म्हणते.
7 Aug 2013 - 7:51 pm | मनिम्याऊ
माफ करा पण हा उल्लेख महाभारतात नेमका कुठे येतो? माझ्या माहितीप्रमाणे उपरोक्त उल्लेख महाभारतातील नसून 'युगंधर' पुस्तकातला आहे.
सन्दर्भ बघुन सान्गते
7 Aug 2013 - 8:24 pm | मनिम्याऊ
सम्पूर्ण संदर्भ मिळणे कठीण आहे.
आजची द्वारका ही मूळ द्वारकेपासून जवळ जवळ ३० किमी दूर आहे. मूळ श्रीकृष्णाची द्वारका आजच्या 'ओखा' बन्दराजवळील 'बेट द्वारका' असावी. बेट द्वारकेचा सध्याचा आकार पाहता (चिन्चोळ्या भूपट्टीने जोडलेली दोन बेटे) जोड-द्वीप ही संकल्पना खरी असावी असे वाटते.
बेट -द्वारका
7 Aug 2013 - 9:36 pm | बॅटमॅन
मी दिलेल्या पेपरात बेट द्वारकेबद्दल उल्लेख आहे. तिथे हडप्पा काळापासून वस्ती असल्याचे अवशेष आहेत. तस्मात "आर्यन" काळ हा पोस्ट-हडप्पा काळ असे धरले तर तिथे द्वारका होती असे म्हणायला हरकत नसावी. तत्कालीन पॉटरी ला पेंटेड ग्रे वेअर असे साधारणपणे नाव आहे. नेटवर पाहताना दिसते, की तिथे ती पॉटरी अल्प प्रमाणात सापडते. तस्मात योग्य त्या टाईम फ्रेममध्ये योग्य ते अवशेष आहेत इतके तरी नक्कीच. त्या पलीकडे पाहिले पाहिजे काय ते.
7 Aug 2013 - 9:38 pm | प्रचेतस
नकाशाबद्दल धन्यवाद.
सद्यस्थितीनुसार ती बेट द्वारका असू शकते पण महाभारतात ती समुद्रकिनार्यावरच वसलेली होती असाच उल्लेख आहे
8 Aug 2013 - 8:46 pm | मनिम्याऊ
या पेपरमधे बरीच द्वारकेसांदर्भातील बरीच उपयुक्त माहिती आहे... जिज्ञासूंनी जरूर वाचावे.
http://drs.nio.org/drs/bitstream/2264/507/1/Migration_Diffusion_6_56.pdf
8 Aug 2013 - 3:27 pm | स्मिता चौगुले
महाभारतात द्वारकेचा उल्लेख जोड-द्वीप असा येतो. एक मुख्य द्वीप तर एक राणीवशाचे द्वीप असा. त्यानुसारच संशोधनात देखील दोन वेगवेगळी द्वीपे सापडल्याने महाभारतीय संदर्भाला पुष्टी मिळाली आहे.
हो, हा उल्लेख 'युगंधर' पुस्तकातलाच आहे
5 Jan 2014 - 2:03 pm | विवेकपटाईत
हिस्ट्री chanal वर बेट द्वारका वर आधारित कार्यक्रम वर्षातून एक दोन दा तरी येतो. समुद्र खाली द्वारका नगरीचे अवशेष सापडलेले आहे. द्वारका नागरी तीन वेळा तरी कमीत कमी वसली असावी. महाभारतात वर्णन केलेली द्वारकेची मुद्रा तिथे सापडली आहे. अर्थात द्वारका नगरी पुरातन आहे, इसवी सन १५०० पर्यंतचा इतिहास तिथे सापडतो. अर्थात महाभारताच्या कृष्णाच्या अस्तित्व नंतर ही नगरी अस्तित्वात होती. समुद्राच्या वाढत्या पातळी मूळेच द्वारका लोकांनी सोडली. शिवाय अन्य परिवर्तन ही झाले सरस्वती नदी ही या काळात नष्ट झाली, रेगीस्तान ही वाढले. (कदाचित जंगलतोड आणि पशूंच्या चराई मुळे, असे ही एक मत आहे. कारण त्या वेळची अर्थव्यवस्था पशु आणि गायींवर आधारित होती. महाभारतात खांडववन करण्याचे वर्णन आहे). वेदांमध्ये अकाल, दुभिक्ष या मुळे कुत्र्याचे मांस भक्षण करण्याची परीस्थित एका कुशिक गोत्रीय ऋषी व आली होती. असे ही वर्णन आहे. असो इतिहासकारांचे मत.
7 Aug 2013 - 1:37 pm | चित्रगुप्त
"The Temple Fort of Dwarka, at the entrance of the Gulf of Kutch," from the Illustrated London News, 1860
7 Aug 2013 - 1:42 pm | सौंदाळा
जबरदस्त लेखमाला.
7 Aug 2013 - 2:09 pm | प्रचेतस
खूप सुंदर लेखमाला झाली.
लेखनशैली अतिशय सुरेख.
7 Aug 2013 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर
महाभारताचा अभ्यास आणि हाती असणारी विविध छायाचित्रे ह्याच्या अनुषंगाने केलेला कल्पनाविलास वाखाणण्याजोगा आहे. अभिनंदन.
7 Aug 2013 - 2:57 pm | स्पा
कल्पना विस्तार म्हणून आवडली
7 Aug 2013 - 4:21 pm | पिशी अबोली
+१
7 Aug 2013 - 5:04 pm | तिमा
लेखमाला तर आवडलीच आणि त्यानिमित्ताने बॅटमन, मनिम्याऊ आणि चित्रगुप्त यांची माहितीपूर्ण चर्चाही तेवढीच आवडली. मिपावरील ज्ञानी सदस्यांचा अभिमान वाटतो.
7 Aug 2013 - 5:47 pm | sagarpdy
+१
8 Aug 2013 - 9:13 pm | अर्धवटराव
>>मिपावरील ज्ञानी सदस्यांचा अभिमान वाटतो.
-- या वाक्याला +१०००.
अर्धवटराव
7 Aug 2013 - 6:07 pm | प्रचेतस
श्रीकृष्ण उवाचः
हे अभीरमन्यो,
मी तुला ओळखू शकलो नाही असे तुला वाटले तरी कसे? वास्तविक तुला द्वारकेत आणायचा एकमात्र उद्देशच हा होता की तुला शिक्षित करून,राज्यव्यवहाराचे धडे देऊन तुला परत तुम्हा अभीरांमध्ये पाठवावे व तुझ्या माध्यमातून तुम्हा अभीरांची अज्ञानाच्या अंधकारातून मुक्तता करावी. आता मूळात आही यादवच जरासंधाच्या सततच्या हल्ल्यांपासून मुक्त होण्यासाठी इथवर येऊन ही नगरी स्थापन केली. सतत त्रासलेल्या, गरिबीत पिचलेल्या यादवांना नव्या नगरीची ही संधी फारच मोठी वाटली. साहजिकच तुमच्यावर अत्याचार सुरु झाले. द्वारकेचा राजा वसुदेव, युवराज बलराम. मी मात्र कनिष्ठच. अर्जुनापेक्षा प्रिय मला दुसरे कोणीही नाही. साहजिकच अर्जुनाकडे, पर्यायाने पांडवांकडे माझा सततच ओढा राहिला, साहजिकच मी द्वारकेत कमी व हस्तिनापुरात व त्यानंतर इंद्रपस्थातच जास्त राहिलो, तस्मात यादवांकडून तुम्हा अभीरांवर होणार्या अन्यायाबाबत माझे तुम्हांकडे दुर्लक्षच झाले. अर्जुन व माझ्या मैत्रीचे हे नातेसंबंध अधिक गहिरे करण्याची माझी इच्छा होती त्यामुळेच माझी प्रिय भगिनी सुभद्रा हिचा विवाह मी इतरांशी पर्वा न करता अर्जुनाशी लावून दिला. द्वारकेच्या पाठीशी पांडवांचे प्रचंड सामर्थ्य उभे राहावे हा उद्देशही होताच पण तो तसा दुय्यमच. अर्थात सुभदेच्या बाबतीत तुझ्यावर अन्यायच झाला पण तत्कालिन परिस्थितीचा विचार करता हे शक्य तरी झाले असते का याचा विचार कर. माझ्या कोपिष्ट बंधूने तुला तेव्हाच मृत्युदंड दिला असता. एका परीने मी तुझे तेव्हा प्राणच वाचविले आहेत.
राजसूय यज्ञात मी केलेल्या शिशुपाल वधाबद्दल तू मला दोष देत आहेस पण शिशुपाल आम्हा यादवांचा कट्टर वैरी होता हे तू ध्यानात घेत नाहीस. आपल्या वैर्याने आपला काटा काढण्याआधी आपणच त्याचा काटा काढावा हे तर समाजमान्यच आहे. जरासंधाचा जावई असलेला हा शिशुपाल जरासंधाच्या वधानंतर आम्हा यादवांना सुखाने जगू देणार नाही हे तर उघडच होते. निमित्त मिळताच मी त्याचा काटा काढला पण यात मजकडे यत्किंचितही दोष जात नाही. दोष असलाच तर इतकाच त्यासाठी मी जागा आणि वेळ चुकीची निवडली. पांडवांच्या यज्ञात व्हायचा तो अपशकुन झालाच. पण या निमित्ताने आम्हा यादवांचा दरारा वाढायलाही सुरुवात झाली.
तू म्हणतोस की शस्त्रयाग केलेल्या अर्जुनाला मी युद्धासाठी प्रवृत्त केले. मला तसे करणे भागच होते. वास्तविक मी युद्ध थांबवण्याचा निकराचा प्रयत्न केला. शिष्टाईसाठी मी खुद्द हस्तिनापुरात जाऊन आलो, इतकेच नव्हे तर पांडव संपूर्ण इन्द्रपस्थासाठी आग्रही असताही मी केवळ माझ्या जबाबदारीवर पांडवांसाठी फक्त ५ गावांची मागणी केली पण सत्तांध दुर्योधन तेव्हढीसुद्धा द्यायला तयार झाला नाही. अंध राजा, हतबल भीष्म, पुत्रमोही द्रोण, मदांध दुर्योधन त्याचे कुटील सल्लागार कर्ण, शकुनी आणि दु:शासन. एकूण युद्ध अटळच बनले होते. आणि ऐन युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी माझा सखा अर्जुन हात गाळून बसला. अर्जुनासारखा प्रबल वीर जेव्हा असा शस्त्रत्याग करतो तेव्हा सैन्याचे मनोधैर्यच त्याला सोडून जाते. साहजिकच पांडवांचा पराभव तसेच त्यांचा वंशविच्छेदही दुर्योधनाच्या हातून झाला असता. तेव्हा अर्जुनाला पुनः युद्धसंमुख करणे मला भागच होते. विजय हा पूर्णपणे विजयच असतो, जरी तो कुठल्याही परिस्थितीत मिळाला तरी. प्रचंड संहार झाल्याने पांडवांना जरी वृद्ध, अपंग प्रजाच प्राप्त झाली तरी अंतिमत: विजय त्यांचाच झाला. परिक्षिताच्या रूपाने त्यांचा वंश अंकुरु लागला आहे त्याचबरोबर त्यांची प्रजासुद्धा लवकरच बहरेल.
युद्दानंतर मात्र आम्हा यादवांना कोणी शत्रूच न उरल्याने आम्ही यादव मात्र कमालीचे सामर्थ्यशाली झालो. अनिर्बंध सत्ता ही नेहमीच षडविकारांना निमंत्रण देते. युद्धातल्या भीषण संहारानंतर मी सुद्धा द्वारकेतील माझे उरलेसुरले लक्ष सुद्धा काढून घेतले व हळूहळू विरक्तीच्या मार्गावर लागलो. यादवांचा विनाश अटळ होताच. त्यांच्या मरणाने ते गेले. मला त्याबद्दल यत्किंचीतही दु:ख वाटत नाही, किंबहुना मी आता सर्वच सुखदु:खांच्या पलीकडे गेलो आहे. आता माझा मृत्यु तुझ्या रूपाने माझ्या समोर उभा ठाकला आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. माझ्या वधाच्या रूपाने तुझ्यातील खदखदता ज्वालामुखी तरी शांत व्हावा.
7 Aug 2013 - 7:16 pm | मनिम्याऊ
जे बात वल्लीबाबू, जियो..
सडेतोड उत्तर त्या अभिरमन्यू ला
7 Aug 2013 - 7:17 pm | मनिम्याऊ
जे बात वल्लीबाबू, जियो..
सडेतोड उत्तर त्या अभिरमन्यू ला
7 Aug 2013 - 7:43 pm | बॅटमॅन
क्या बात, क्या बात!!!!!!! फिक्शनमध्येही डॉ.वल्ली जोन्स यांची ही जबरी एंट्री पाहून मस्त वाटलं एकदम.
अशा काही लेखनाची तुमच्याकडून अपेक्षा आता वाढली आहे.
7 Aug 2013 - 7:44 pm | चित्रगुप्त
वाहवा वल्लीशेठ. एकदम छान.
एकादा धागा अश्या रीतिने समृद्ध होत जाऊन त्या विषयावर वेगवेगळ्या दिशेने प्रकाश पडत जावा, हे थोरच. धन्यवाद.
7 Aug 2013 - 9:41 pm | लॉरी टांगटूंगकर
प्रचंड आवडलं!
7 Aug 2013 - 6:57 pm | राघवेंद्र
चित्रगुप्त आणि सर्व मिपाकरांना या माहितीपुर्ण लेखामाल व प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!
7 Aug 2013 - 7:56 pm | पैसा
चित्रगुप्तांचा कल्पनाविलास आवडला. आणि इतर माहितीपूर्ण चर्चा आणि वल्लीचा दुसरी बाजू दाखवणारा संवाद सगळंच आवडलं! एकूणात ज्ञान आणि मनोरंजन युक्त मस्त धागा!
7 Aug 2013 - 8:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अत्यंत सुंदर मालिका... मनापासून आवडली.
7 Aug 2013 - 9:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
वेगळ्या कोनातून महाभारताकडे बघणारी चित्रमय कथा आवडली.
व्यासांनी साधारणपणे "जसे घडले तसे" लिहून ठेवले आहे... प्रसंगाचे विश्लेशण अथवा मानसिकता उलगडायचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे चित्रगुप्तजी आणि वल्लीसाहेब दोघांचेही दृष्टीकोन किंवा दोघांच्या दृष्टीकोनांतले थोडेथोडे असे काहिही खरे असू शकते किंवा सत्य अजून काही वेगळे सुद्धा असू शकेल... आणि ह्याच गोष्टीने हजारो वर्षांनंतरसुद्धा महाभारताचे आकर्षण कायम आहे.
मूळ लेख आणि प्रतिसाद वाचताना खूप मजा आली.
7 Aug 2013 - 9:58 pm | शिल्पा ब
आवडलं बॉ ! चित्र अन गोष्ट दोन्ही छान.
8 Aug 2013 - 9:43 pm | अर्धवटराव
महाभारत कथेची पार्श्वभूमी, पीडीतांचे क्रांतीकारी विचार, अत्योत्तम चित्रसंगती... हे सर्व मिळुन अफलातुन कलाकृती तयार झाली. एकदम झकास.
पण शेवट फारसा रुचला नाहि.
अभिरमन्यु चाचा नेहरु व्हायला हवा होता, तो विनाकरण बॅ. जीना झाला.
यादवांचं आयुष्य एकुणच वादळी होतं. पहिले तर क्षत्रीय समाजात मान्यता मिळवायला संघर्ष. मग मिळवलेलं स्थान टिकवुन ठेवायला संघर्ष. अभिरमन्यु पहिल्या दोन भागात जितका बुद्धीमान रंगवला गेलाय, त्यातुन त्याला जंगली आदिवासी समाज व्यवस्था व (सो कॉल्ड) सुसंस्कृत शहरी राज्यव्यवस्था यातील भेद ठसठशीतपणे जाणवायला हवा होता. शहरी राज्यव्यवस्था अपरिहार्य आहे हे उमगायला हवं होतं. अभिरमन्यु शेवटी पोथीनिष्ठ कम्युनिझम व अरुंधती रॉय/मेधा पटकर या मायबापांचं कन्फ्युस्ड अपत्य ठरला.
श्रीकृष्णाने कंसापासुन गोकुळाचे रक्षण केले. ते केवळ मानवाधिकार कॅटॅगरीचे नव्हते, तर सुदृढ ग्रामीण अर्थव्यवस्थेला मास बिझनेस टाईप शहरी अर्थव्यवस्था भारी पडत होती, ति ग्रामीण व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न कृष्णाने केला. कर्मकांडात अडकुन पडलेला भक्तीभाव त्याने निसर्गाकडे वळता केला (गोवर्धन पूजा). प्रसंगी पशुपालनाला बाधक ठरणारे नागवंशीय जीवन त्याने गोकुळापासुन दूर लोटले (कालिया मर्दन). पुढील काळात राजकारणाच्या प्रवाहाचा वापर करुन सामाजीक अभिसरण घडवुन आणाण्याचा प्रयत्न केला (जांबुवंताच्या मुलीशी लग्न करणे, १६००० बायका करणे). तत्कालीन जनसामान्यांच्या भल्यासाठी त्याने जे काहि प्रयोग केले चाणाक्ष्य अभिरमन्युला उमगायला हवे होते. हीच पायवाट पुढे अभिरांच्या उत्थानाचा राजमार्ग बनवणे त्याला शक्य होते/ते जास्त प्रॅक्टीकल होते.
असो. शेवटी हा कल्पनाविलास आहे. कोणते पात्र मनाच्या कुठल्या दशेत काय करेल हे सर्वस्वी लेखक ठरवणार.
वल्लीशेठचा "श्रीकृष्ण उवाच" लय भारी.
अर्धवटराव
8 Aug 2013 - 9:48 pm | प्रसाद गोडबोले
ठीक आहे पण बर्याचश्या वाक्यांवर हसु आवरता आले नाही उदा.
राजसूय यज्ञाचे वेळी तुझ्यापेक्षा अनेक वयोवृद्ध, थोर पुरुष उपस्थित असूनही अग्रपूजेचा मान मात्र तुला मिळावा, यावर शिशुपालाने हरकत घेतली म्हणून जसा तू तडकाफडकी त्याचा वध केलास,
या दिवशी कर्ण तुला निश्चितच ठार करणार होता. परंतु तू माझी शिकार होतास.
मी धारदार खड्गाने अर्जुनाचे पूर्ण मुंडण केले, आणि त्याच्या कपाळावर अभीर-भैरवाची तप्त लोहमुद्रा उमटवून त्याला वृद्ध-अपंगांच्या जथ्यासह हस्तिनापुराच्या दिशेने रवाना केले.
=)) =)) =))
11 Aug 2013 - 9:10 am | स्पा
=))
12 Aug 2013 - 7:07 pm | आदिजोशी
भयानक विनोदी लिखाण. लेखन स्वातंत्र्याच्या नावावर जी काय तोड फोड केली आहे ती भन्नाटच आहे.
असे सुचते तरी कसे म्हणतो मी. श्रीकॄष्णाचा सर्व खजीना एका वस्त्रात भरणे काय, हजारो सैनीकांना कंठस्नान घालणार्या अर्जुनाला दगड मारून जायबंदी करणे काय, अर्जुनाचा चुकणारा नेम काय, कुठची कुठची चित्र शोधून बादरायण संबंध जोडणे काय... अशा भरपूर विनोदी घटनांनी हा भाग ठासून भरला आहे.
इतिहास स्वतःच्या नजरेतून बघायच प्रयत्न सगळेच करतात. पण इतका विनोदी प्रयत्न दुसर्या कुणाला जमला नसता आणि जमणारही नाही.
गोविंदाच्या सिनेमांसारखी भरदोल एंटरटेनमेंट :)
13 Aug 2013 - 7:15 pm | चित्रगुप्त
कृष्णाने सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी लग्न करणे, ऐन युद्धाचे वेळी तासन तास गीतेचे श्लोक ऐकवणे, 'पाच जणात भिक्षा वाटून घ्या' असे आईने सांगितले, म्हणून द्रौपदीला पाच जणांनी वाटून घेणे, परपुरुषांकडून 'नियोग' करवणे, बाण सोडून पाऊस पाडणे, मडक्यातून शंभर मुलांचा जन्म, दोन वर्षे गर्भात रहाणे, अश्या अनेक तुफान विनोदी गोष्टी महाभारतात आहेत, त्यात आमची थोडीशी भर.
अर्जुन द्वारकेतील स्त्रिया व संपत्ती घेऊन निघाला होता, त्याला अभीरांनी हरवून स्त्रिया व संपत्ती लुटून नेली, त्यावेळी अर्जुनाचा 'अक्षय भाता' काम करेनासा झला, तो 'मंत्र' विसरला, कृष्णाला पारध्याने पावलात बाण मारल्याने त्याचा अंत झाला, वगैरे सर्व महाभारतात आहेच, ते कसे घडले असावे, याबद्दल कल्पना केली आहे.
17 Aug 2013 - 2:57 am | विश्वनाथ मेहेंदळे
नियोगात नेमके काय विनोदी आहे असे तुम्हाला वाटते?
शिवाय सोळा हजार स्त्रियांशी लग्न करण्याची कथा तुम्हाला सविस्तर माहित आहे असे दुसर्या धाग्यातील प्रतिसादातून दिसते. मग त्याची संभावना इथे विनोदी म्हणून का केली ते ही सांगितलेत तर आवडेल.
12 Aug 2013 - 8:14 pm | स्पा
=)) =))
12 Aug 2013 - 11:47 pm | चित्रगुप्त
भरदोल एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट
... बेशर्त स्वीकृती.
13 Aug 2013 - 8:34 pm | कंस
अतीशय सूदंर कल्पनाविस्तार
4 Jan 2014 - 8:33 pm | चित्रगुप्त
नवीन मिपाकरांसाठी.
4 Jan 2014 - 11:22 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त, अत्यंत कष्टपुर्वक महाभारत कालीन घटना चक्राच्या कचाट्यातील चक्रावून टाकणाऱ्या सूत्रांना लीलया गुंफून तयार केलेली लेखमाला वाचनीय व मननीय होती . त्यामुळे आपल्या कष्टांचे कौतुक व आभार! अनेक लोकांनी विविध प्रतिसादातून आपले कौतुक केले आहे. या लेखमालेला वल्ली यांच्या माहिती पुर्ण कलाबतूंनी मालेला हाराचा भारदस्त पणा आणला त्यांचे ही आभार
6 Jan 2014 - 9:23 pm | विवेकपटाईत
महाभारत एक महासागर आहे. आपापल्या दृष्टीकोनातून प्रत्येक सर्जक मोती वेचतो. आतापर्यंत विभिन्न भाषेत हजारो लेखकांनी आपापल्या दृष्टीने महाभारतातील पात्रांना रंगविले आहे. चित्रगुप्त यांनी आपली कथा सुंदर रीतीने मांडली आहे. मला ही कथा आवडली.
21 May 2019 - 4:29 pm | महासंग्राम
अगदी जहबरदस्त लेख माला महाभारताचा एक वेगळा पैलू कळाला
20 Aug 2021 - 8:07 am | चित्रगुप्त
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा...
20 Aug 2021 - 5:37 pm | नीलस्वप्निल
धन्यवाद धागा वर आण्ल्याबद्द्ल :)