निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
18 Jun 2018 - 5:10 pm

निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.
निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे. पन्नास वर्षे एखादा उद्योग जगवणे, वृद्धिंगत करणे हे अतिशय अवघड आव्हान असते.कोणताच उद्योग आपोआप वाढत नाही. एकदा बऱ्यापैकी वाढला की काही झाडांसारखा आपोआप फळे देत नाही.प्रत्येक दिवस तो जिवंत ठेवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करावे लागतात. मुल झाल्यावर माउलीला अधिक पण आख्या कुटुंबाला त्या मुलाच्या प्रत्येक अवस्थेत कशी आणि किती कसरत करावी लागते हे सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी तसंच किंवा त्याहूनही अधिक कठीण एखादा उद्योग जागविण्याचे काम आहे. त्यामुळे भोगले कुटुंबियांच्या आख्ख्या दोन पिढ्यानी आपले तन मन धन सगळं निर्लेपच्या उभारणी मध्ये गुंतवलं आणि आज दिसणारा पाचशे लोकांचा हा उद्योग समूह उभा राहिला.

हाडाचे व्यावसायिक असल्याने श्री राम भोगले आणि त्यांचे बंधू श्री मुकुंद भोगले यांनी काही कारणांनी त्याचा हा ब्रँड आजच्या संपूर्ण व्यवहारांसकट बजाज इलेक्ट्रिकल या आणखी एका नामांकित कंपनीला विकायचा असे ठरविले आणि तशी बातमी शक्य त्या ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था केली. पण लोकसत्ताने नोटबंदी आणि जीएसटीपुढे शरण जाऊन भोगलेंना हा व्यवसाय विकावा लागतो आहे असा आपला टिपिकल बार उडवून देऊन भोगले कुटुंबीयायांच्या क्षमतेवर आघात केला आहेच पण सद्य सरकारच्या नावाने जमेल तसा जमेल तितका शंख करण्याची गमजा केली आहे. लोकसत्ताला जर निर्लेपला नोटबंदी आणि जीएसटीमुळे घात झाला असे वाटत असेल तर तशीच काहीशी अडचण बजाज इलेक्ट्रिकल या निर्लेप विकत घेण्याऱ्या कंपनीला देखील होऊ शकते याची जाणीव नसेल झाली ? किंवा बजाज इलेक्ट्रिकलने त्यांना या दिव्यांमधून जावे लागणार नाही असा विचार करून साठ सत्तर कोटी रुपये गुंतवले असतील असे लोकसत्ताला वाटते का ? काहीही !

भोगलेंनी निर्लेप विकण्याचा कठोर निर्णय घेतला असेल त्याची कारणे स्पष्ट आहेत. १) भोगलेंच्या तिसऱ्या पिढीतल्या उद्योजकांचे अन्य काही व्यवसाय आहेत आणि त्यांना त्या व्यावसायांमध्ये अधिक रस आहे, भांडी व्यवसायात नाही. २) अनेक कारणांनी शंभर कोटी रुपयांची उलाढाल असलेला निर्लेपचा व्यवसाय गेल्या दोनचार वर्षात अर्ध्यावर म्हणजे पन्नास कोटीवर येऊन पोहोचला होता. माणसांची संख्या बहुदा तेवढीच राहिल्याने हा व्यवसाय परवडणे कठीण जात होते. ३) गेल्या काही वर्षात जगभरचे अनेक उद्योग मोठाल्या गुंतवणुकीकरून भारतातल्या भांडी बाजारात आपली उत्पादने विकण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्या उद्योगांच्या गुंतवणुकीशी आणि तयार भांड्यांच्या किमतींशी लढण्याची कुवत निर्लेपकडे विशेषतः अलीकडच्या काळात उरली नसावी. ४) हल्ली शेकडो टीव्ही चॅनेल्स आहेत. भांड्यांचा ग्राहक टीव्हीवरच्या जाहिरातीवर भाळून भांडी खरेदी करतो. त्यामुळे आपले ब्रँड ग्राहकाच्या लक्षात राहू देण्यासाठी सगळ्या चॅनेल्सवर सतत महागड्या जाहिराती आदळाव्या लागतात. ही अतिशय खर्चिक बाब आहे. हा खर्च हल्ली निर्लेपला परवडणार नव्हता. जाहिरात दाखवल्या नाहीत तर दाखवणारा स्पर्धक पुढे जाणारच. ५ ) हल्ली आरोग्याच्या कारणांनी प्लास्टिक कोटेड भांड्यांऐवजी लोखंडी आणि मातीची भांडी वापरण्याकडे जनतेचा कल वाढलाय. या अशा कारणांनी भोगले कुटुंबीयांनी भावनिक न होता निर्लेप हा मराठी आणि अन्य भारतीय मनांवर ठसलेला ब्रँड मरू नाही दिला हे नशीब. त्यामुळे समस्त भोगले कुटुंबियांचे कौतुकच केले पाहिजे. विकण्याचा निर्णय निर्लेपकरानी चार पाच वर्षे आधीच घेतला होता. पण लोकसत्ताने या व्यवहाराचे बिल नोटबंदी आणि जीएसटीवर फाडून आपलीपण पोळी खरपूस भाजून घेतली. लोकसत्तासारखे सारखे आणखीही काही महाभाग ठोकण्याची संधी मिळाली की आपली सामाजिक जबाबदारी विसरून ठोकून देताना पाहता आले.

मांडणीसमाजजीवनमानतंत्रअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकराजकारणप्रकटनप्रतिसादलेखमाहितीवाद

प्रतिक्रिया

बातमीला वळण दिले हे खरेच. यावर संपादक त्यांच्या अर्थरंगच्या/एक्सप्रेस लोकांचं मत घेत नाहीत का?
लोकमतच्या मुलाखतीत भोगले यांनी हया शक्यता हसण्यावरी नेलेल्या पाहिल्या.
गोदरेजनेही फुडस डिविजन हर्शे चॅाकलेट्सना विकले, आरकॅाम जिओवाले घेणार आहेत हेपण मराठीच आहेत.

सुचिता१'s picture

18 Jun 2018 - 8:25 pm | सुचिता१

लोकसत्ता चा मोदी द्वेश / भाजप विरोध अगदी उफाळुन आला आहे. त्यामुळे वड्याचे तेल वाग्यां वर , असला प्रकार सतत वाचायला लागतोय.

चौथा कोनाडा's picture

18 Jun 2018 - 9:58 pm | चौथा कोनाडा

खरं आहे. लोकसत्ता आजकाल ओरिएन्ट होऊन मथळे / बातम्या देतोय. त्यांच्यांशी असंतांच्या संतांनी संग केलाय.
पण, भोगले यांनी त्यांच्या निवेदनात सर्वच गोष्टी स्पष्ट केल्यामुळे लोकसत्तावाल्यांना कुठं तोंड लपवायंच असा प्रश्न पडला असणार.
भोगले यांच्या स्पष्टीकरणामुळे आपल्या लोकांमध्ये काही किंतू राहिला नाही.
निर्लेप हे मराठी उद्योगजगताच्या इतिहासातले सुवर्णपान म्हणुनचकायमच नावाजले जाईल.

टर्मीनेटर's picture

18 Jun 2018 - 10:21 pm | टर्मीनेटर

गिरीश कुबेर हा महान संपादक अजून काही दिवसांनी एक्स्प्रेस ग्रुपला लोकसत्ता हा ब्रांड दुसऱ्या कोणाला विकण्यायोग्य पण न ठेवता कायमचा बंद करण्याची वेळ आणणार आहे असंच एकंदरीत चित्र दिसतंय.

लोनली प्लॅनेट's picture

19 Jun 2018 - 9:29 am | लोनली प्लॅनेट

अगदी बरोबर
अधर्मयुद्ध..तेल नावाचा इतिहास..युद्ध जीवांचे अशी अप्रतिम पुस्तके लिहिणारे गिरीश कुबेर आपली बुद्धी नको तिथेच वापरून वाया घालवत आहेत

manguu@mail.com's picture

18 Jun 2018 - 10:41 pm | manguu@mail.com

मूळ बातमी कुठे आहे ?

सोमनाथ खांदवे's picture

18 Jun 2018 - 10:48 pm | सोमनाथ खांदवे

यस ! यस !!!
मुतालिक सायब , भोगा आता कर्माची फळ तुमच्या या धाग्याच पण पोस्टमार्टेम व्हणार . मंगुशेठ आलेत .☺☺

मराठी_माणूस's picture

19 Jun 2018 - 12:32 pm | मराठी_माणूस

दुर्दैवी घटना.