आजोळच्या आठवणी
खुप वर्षापुर्वीची गोष्ट, आम्ही तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात एका गावात रहात होतो. माझ्या वडिलांची नोकरी तिथे होती. आमचं आजोळ चौल आणि आईच माहेर अलिबागच्या कुशीतील वरसोली. वर्षांतून एकदा मे महिन्यात शाळेच्या सुट्टीत आम्ही सगळे आजोळी जात असु, आगगाडी, लाल एष्टी असा आमचा आठ एक तासाचा प्रवास असे किंवा व्हाया मुंबई असा. मुबंईत, किंवा डोंबिवलीत एक थांबा आत्या, काकांकडे आणि मग कधी भाऊच्या धक्क्या वरून लाँच अथवा लाल एष्टी. त्यावेळी एष्टी वाटेतील सगळ्या गावात थांबे. एस्टी खचा खच प्रवाशांनी भरलेली असे. सामान, टोपल्या, माश्यांचा वास. कंडक्टर आणि प्रवाशांचा कलकलाट.