अमेरिका 13 - फोबिया ते युफोरिया
अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर इमिग्रेशन काउंटरवर 'इंग्रजीचा फोबिया' मोफत मिळतो.. आणि आपण भारतीय 'मुफ्त' या शब्दाचे इतके भुकेले का असतो कळत नाही..पण नको असणाऱ्या मोफत वस्तूही आपण सहज गोळा करतो. 'लागेल कधीतरी!' 'देईन कोणालातरी!' ह्या आणि अशा विधानांचे पांघरूण घेऊन आपण असंख्य - अगम्य वस्तू केवळ मोफत मिळाल्याने, न नाकारता घरी आणतो. विमान प्रवासात दिलेले आणि न वापरलेले डिस्पोजेबल काटे - चमचे किंवा केक, बटर इत्यादी वस्तू सॅक मध्ये घेतलेल्याच असतात. काहीजण तर विमान प्रवासात थंडीसाठी किंवा झोपताना घेण्यासाठी दिलेली शाल निरोप समारंभात - सत्कारात मिळालेली शाल समजून घरीच घेऊन येतात.