अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर इमिग्रेशन काउंटरवर 'इंग्रजीचा फोबिया' मोफत मिळतो.. आणि आपण भारतीय 'मुफ्त' या शब्दाचे इतके भुकेले का असतो कळत नाही..पण नको असणाऱ्या मोफत वस्तूही आपण सहज गोळा करतो. 'लागेल कधीतरी!' 'देईन कोणालातरी!' ह्या आणि अशा विधानांचे पांघरूण घेऊन आपण असंख्य - अगम्य वस्तू केवळ मोफत मिळाल्याने, न नाकारता घरी आणतो. विमान प्रवासात दिलेले आणि न वापरलेले डिस्पोजेबल काटे - चमचे किंवा केक, बटर इत्यादी वस्तू सॅक मध्ये घेतलेल्याच असतात. काहीजण तर विमान प्रवासात थंडीसाठी किंवा झोपताना घेण्यासाठी दिलेली शाल निरोप समारंभात - सत्कारात मिळालेली शाल समजून घरीच घेऊन येतात. आस्मादिकांनीही पहिल्या परदेश प्रवासावेळी हे सकृत्य केलेले आहे. 'मोफत मिळालं तर विषही खातील' असे काही महाभागही मी पाहिले आहेत.... तसाच हा मोफत मिळालेला फोबिया - इंग्रजीचा !
अगदी फाडफाड नाही पण संवाद साधता येईल इतकं इंग्रजी मला बोलता येते... समोरच्याचे प्रश्न कळले आहेत इतपत भाव मी माझ्या चेहऱ्यावरून उमटवू शकते.. तरीही इमिग्रेशन ऑफिसरचे प्रश्न ना माझ्या नवऱ्याला कळले ना मला ! लेखी परीक्षेत अभ्यास झालेला नसताना सुतावरून स्वर्ग गाठत काहीतरी उत्तर ठोकता येतं पण एकतर इथे तोंडी परीक्षा आणि प्रश्नही असा की 'हे कधी आपल्या सिलॅबसमध्ये होते?' अशी शंका यावी.. इतका 'ओ कि ठो' न समजणारा प्रश्न! बरं 'प्लीज.. आय एम नॉट गेटिंग यु!' म्हटलं तरी प्रश्नकर्त्याने अधिक कडक भाव धारण करून प्रश्न तोच विचारला ! इथे प्रश्न ऑप्शनला टाकून 'नेक्स्ट !' असेही म्हणता येत नाही. कानाला तरी इंग्लिश वाटणाऱ्या भाषेत हा 'थांबा म्हणतोय की जा म्हणतोय' तेही कळेना..
अखेरीस आदीमानवाची हातवारे भाषा कामी आली... आम्हालाच दुसऱ्या केबिन कडे पाठवून त्यांनेच 'नेक्स्ट' म्हटले. नव्या काकांचे इंग्रजी मात्र बरोबर समजले आणि प्रश्नांची उत्तरं नक्की माहिती होती त्यामुळे इथे केवळ 2 प्रश्नांमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवल्यासारखे आम्ही विजयी मुद्रेने बाहेर आलो. पण, हे काय? पहिल्या काकांनी पासपोर्टला हातही न लावता अमेरिकन इंग्रजीचा ' फ्रि फोबिया' चिकटवलाच होता.
खरं तर इंग्रजी ही आपली भाषा नाही... ज्ञानभाषा म्हणून ती भारतात जास्त वाढली ती इंग्रजांच्या आक्रमणामुळे. पूर्वी आपली ज्ञानभाषा संस्कृत-पाली होत्या तेव्हा चिनी-जपानी किंवा अन्य विदेशी भारतीयांकडे शिक्षणासाठी आल्यावर त्यांना त्रास झालाच असेल.. खरं तर अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांना सामान्यतः तीन भाषा येतात आणि हे ऐकूनच त्यांना आपलं फार कौतुक वाटतं. इथे इंग्रजी आणि काहींना स्पॅनिश येते. आपल्याला मात्र स्पॅनिश - चिनी ' जपानी येत नाही याचे काही वाटत नाही. पण इंग्रजी येत नाही याची मात्र कुठेतरी कमीपणाची भावना आहे.
याबाबतीत प्रामुख्याने चिनी लोक अजिबात इंग्रजी येत नसतानाही कुठलाही न्यूनगंड न बाळगता जमेल तेवढे इंग्रजी शब्दांचे ज्ञान घेऊन येतात आणि इथे काम मिळवतात. मालक आणि कामगार दोघेही हल्ली गुगल ट्रान्सलेटर वापरून एकमेकांना शब्द ऐकवतात.
इथले काही शब्द आणि आपल्याला शिकवलेले अर्थ मात्र आपली गंमत उडवतात. रेस्टॉरंट मध्ये 'फाॅर हियर' म्हणजे 'इथेच खाणार का?' तर 'टू गो' म्हणजे 'घेऊन जाणार का ?', 'टेक अवे' आणि 'डाईन' म्हणजे 'नेणार की इथेच खाणार', 'चेक आणा' म्हणजे 'बिल आणा' असे चकवा देणारे शब्द आणि त्यांचे उच्चार यामुळेच खरा न्यूनगंड येत असावा. इंग्रजी अजिबात न येणारे, अजिबात स्पॅनिश न समजणारे जसे इथे वावरतात तसं आपण का करत नाही? हे कळत नाही! कदाचित... येत नाही म्हणावं तर येतंय आणि बोल म्हटलं तर जमत नाही असं काहीस धेडगुजरी होत असावं!
काही ठिकाणी नक्की काय म्हणायचं असतं हेच कळत नाही... म्हणजे गर्दी असेल तर 'प्लीज मूव्ह' म्हणायचं की धक्का मारून पुढे जाऊन 'सॉरी' टाकायचं? काहीजण 'एक्सक्युज मी!' म्हणताना ऐकूनही ते वेळेवर आठवत नाही. बरं 'तुमची भाषा येत नाही, तरी आलोय ना तुमच्याकडे...तर घ्या ना समजून' असं सांगणार तरी कसं ? या सगळ्याचा एकूण परिणाम असा होतो की, 'आपल्याला चांगलं वळणच नाहीये, नीट वागायचं कसं हेच शिकवलं नाहीये' असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उठतात..उमटतात. हे मात्र मला नक्की वाचता येतात, समजतात आणि हो, लक्षातही राहतात !
प्रतिक्रिया
22 Sep 2023 - 11:39 am | राजेंद्र मेहेंदळे
लेख आवडला.
अमिताभ चा संवाद--ईंग्लिश इज अ व्हेरी फन्नी लँग्वेज, TO इज टू, बट GO इज नॉट गू
जास्त टेन्शन घ्यायचे नाही, जमतील तसे ठोकुन द्यायचे. या बाबती युरोपियन लोक भारी, ईतके चित्र विचित्र उच्चार की आपले भारतीय ईंग्लिश बरे
22 Sep 2023 - 2:39 pm | निमी
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल.. रेटून इंग्रजी बोलता येईल पण प्रश्न तर कळला पाहिजे अशी काही वेळा मजेदार परिस्थिती झाली.