गणेसोत्सवात एक सकाळची पुजा आरती आणि एक संध्याकाळची पुजा आरती केली की उर्वरीत वेळ रिकामा असतो, किंबहुना जाणीवपुर्वक काही वाचनास, चिंतनास वेळ रिकामा ठेवलेला असतो. आज सहज वाचन करताना अजुन काही ऐतिहासिक कविता वाचनात आल्या त्या येथे उधृत करीत आहे.
सदर लेखन दामोदर हरि चापेकर ह्यांनी येरवडा जेल मध्ये असताना लिहिलेले आहे. सर्वप्रथम म्हणजे त्यांचे आडनाव चाफेकर असे नसुन चापेकर असे आहे. हे तिघे भाऊ
१. दामोदर हरि - वय २७,
२. बाळकृष्ण हरि - वय २४
आणि
३. वासुदेव हरि - वय १८.
दामोदर आणि बाळकृष्ण ह्यांनी गणेशखिंडीत रॅन्ड ह्या अधिकार्याचा वध केला. दव्रिड नावाच्या इसमाने चुगली करुन त्यांची नावे सरकार ला कळवली म्हणुन वासुदेव ह्यांनी त्यांच्या "आपटे" नावाच्या मित्राच्या सोबतीने द्रविडचा वध केला . ह्या चौघांनाही तत्कालीन ब्रिटीश सरकारने ताबडतोब फासावर चढवले.
दामोदर ह्यांनी लिहिलेले हे हस्तलिखित १९५५ मध्ये स्वतंत्र भारत सरकारच्या हाती लागले आणि प्रकाशित करण्यात आले. त्यातील ह्या काही कविता :
कविता काव्य , साहित्य दृष्टीने पाहिल्यास त्यात विशेष असे काही दिसुन येत नाही. सहित्यिक मुल्यांच्या तुलनेने पाहिले तर सावरकरांच्या काव्याच्या जवळपासही जात नाहीत ह्या कविता पण ह्या कवितांतुन चापेकर बंधुंचे ज्वलंत देशप्रेम आणि कट्टर सनातनी धर्मप्रेम स्पष्टपणे दिसुन येते !
१)
सुखा आधी दु:ख भोगावे - लोके जैसे जाणुनी सुजने - देश हिताते लागावे ||
क्लेश सोसुनी तप आचरती सोडुनिया सदना मदना प्रभु नामधना रसना सेवी सुख भोगाते टाकुनी सेवटी स्वर्ग सुखाते मुनी पावे ||
शिवाजी राजा होऊनी गेला ज्यात जनी अभिमान मनी सकला सदनी गुणी शुर असा भोगियले बहु क्लेश आधी मग राज्य सुधा आणि यश पावे सुखा||
आर्य बंधुनो देश हितास्तव नित्य झटा करी घेई पटा तरवार वीटा जरी सैन्य कटा स्वधर्म कती निधन पाऊनी भूमी यश मिळवुनी मोजावे ||२)
नका नका भोगु तुम्ही परवशता आंग्लो जनांच्या खाता लाथा नाही तयाची लाज , पाव बिस्कुटे खाऊनी पिऊनी बनला दारु बाज ||
शिवाजी बाजी होऊन गेले गाजविली तलवार वंशज त्यांचे असोनी तुम्ही बनला सगळे नार ||
राव सदाशिव भाऊ पेशवे छातीचे सरदार दिल्ही अटकेवर तो त्याने विक्रम केला फार ||
जीवित्वाचा काय भरवसा तृण ऐसे माना धन्य व्हा जगी देशहितास्तव देऊन माना ||
ह्या दोन्ही कविता "पद" असे लिहिलेल्या आहेत अर्थात ह्या गेय असाव्यात पण किमान मलातरी ह्या चालीत गाता आल्या नाहीत. दुसर्या पदातील शिवाजी महाराज आणि सदाशिवराव भाऊ ह्यांचा गौरवपुर्ण उल्लेख महाराष्ट्राचा इतिहासातील सोनेरी पानांची आठवण करुन देणारा आहे.
पण तथापि चापेकर बंधुंन्ना शिवजयंती उत्सवाविषयी खुप काही आत्मीयता नव्हती, शिवरायांचे चालले दैवतीकरण हे त्यांना खटकत होते . ते स्वतःच स्वतःच्या शब्दात म्हणतात - "शिवाजी महारांजापासुन जे उदाहरण घ्यायचे ते न घेता लहानथोर पोरकट चाळे करतात हे आम्हांस सहन न होऊन खाले दोन श्लोक तयार केले :"
३)शिवाजी महाराज जयंती उत्सव सभेत म्हणलेले श्लोक :
वाक्शौर्योद्भव उच्च वृक्ष सुफला नाही कधी ऐकिले | स्वप्नी स्त्री मुख चुंबनी नच कधी संतानही जाहले |
बोलावे, परी वृष्टीहीनघनसे गर्जु नका हो असे | रंडा निती पराक्रमाविण जनीं , होते तियेचे हसे ||
नाही होत स्वतंत्रता शिवकथा घोटुनी भाटापरी | घ्यावे लागतसे शिवाजी बाजीपरी हे मस्तक स्वहस्तावरी ||
हे जाणोनी तरी अता सुजन हो ह्या खड्ग ढालां हाती | मारा थाप भुजांवरी अरि शिरे तोडूं असंख्यात ती ||
४)श्लोक प्रतिज्ञेचा : हा माझ्या मते चापेकर बंधुंचा सर्वात महत्वाचा श्लोक म्हणता येईल. ह्यातुन त्यांचा ठाम निश्चय दिसुन येतो तसेच कृती शुन्य लोकांना उद्देशुन तुम्ही नुसते बघत बसा आम्ही राष्ट्रकार्य करुन दाखवतो बघा हा टोमणा एकदम वर्मी लागावा असा आहे >
ऐका राष्ट्रीय युध्दभूमीवरी ह्या, प्राणांसी देऊ धका |
जे जे भाषण बोललो बहु जनीं, तो फार्स मानू नका |
धर्मध्वंसक शत्रुवक्षरुधीरा पाडूच भूमीवरी |
मारूनीच मरू आम्ही, तुम्ही स्वयें ऐकाल रांडांपरीं ||
५) गणेश उत्सवातील श्लोक :
अरे मूर्ख हो मर्द झाला कशाला | मिशा मोठमोठ्या धराव्या कशाला ||
न लज्जा तुम्हां भोगता दास्य हाय | करा हो तरी जीव जायां उपाय ||
अरे मारिती वासरे आणि गाई | महा दुष्टचांडाळ जैसे कसाई ||
हरा क्लेष त्यांचे, मरा , आंग्ल मारा | रिकामे नका राहू भूमीस भारा ||
हिंदुस्थान असे जनांत म्हणती लोकास ह्या सर्वही | येथे आंग्ल कसे स्वराज्य करिती जाणा महालाज ही ||
नावाला विसरु नका, दृढ धरा देशाभिमाना मनी | ठोका दंड, उठा , भिडा सुयशया दुष्टाचिया कंदनी ||
होते पुर्वज आमचे दृढ कसे झुंजावया कंदनी | गेले मेळवुनी यशास अपुल्या देशास ह्या रक्षुनी ||
त्यांचे पोटी आम्ही कसे निपजलो भानूस जैसे शनी | नेले राज्य हरुनि अमुचे तरी लज्जा न वाटे मनी ||
आता थोडीशी चिकित्सा करु. चापेकर आपले आहेत, त्यांच्या लेखनाची आपण निर्भीडपणे, कोणतीही भिती न बाळगता चिकित्सा करु शकतो, काय चुकीचे काय बरोबर ह्यावर टिप्पण्णी करु शकतो. इथे कोणत्याही दहशतवादाला घाबरायचे कारण नाही.
ह्या सर्वच कवितांमधुन जाज्वल्य देशभक्ती देशप्रेम ओतप्रोत भरुन वाहात आहे . पण त्याचे मुळ हे खरे सनातन धर्मवरील श्रध्दा हे आहे. ती श्रध्दा इतकी आत्यंतिक आहे की इतरांचे सोडुनच द्या , चापेकर बंधु साक्षात टिळकांच्या विषयी - "टिळक धड सुधारक ही नाहीत आणि स्वधर्मनिष्ठही नाहीत" असे म्हणतात ! हे जरा जास्तच झाले. अर्थात समकालीन लोकांच्या बाबतीत एखादा ग्रेट असेल तर ते आपल्याला तरी कुठे लक्षात येते म्हणा ! टिळक हे आजच्या सनातन परिप्रोक्ष्यातुन ग्रेट आहेत, गीतारहस्य तर अल्मोस्ट शंकाराचार्य ह्यांच्या गीताभाष्य आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ह्यां पेक्षा जास्त तर्कशुध्द आणि लॉजिकल वाटते. पण इथे आपण चापेकर बंधुंना बेनीफीट ऑफ डाऊट देऊयात , त्यांन्ना १८९८ मध्ये फाशी देण्यात आले आणि टिळकांनी गीतारहस्य १९०५ नंतर मडाले तुरुंगवासात लिहिलेला आहे. आणि त्याधी लोकमान्य टिळकांनी केलेल्या काही काही गोष्टी सनातन धर्माला धरुन नव्हता हे म्हणायलाही वाव आहेच.
चापेकर बंधुंनी सुरुवातीलाच आपण लहान असताना केलेल्या नागपुर ते रायपुर ह्या प्रवासात च मनात आलेल्या हिंसक क्रांतीकारक विचारांचे दाखले दिले आहेत, त्यावेळीस त्यांचे वय १५ आणि १२ होते ! फक्त ! इतक्या लहान वयात इंग्रजांच्या विषयी इतका पराकोटीचा द्वेष का निर्माण झाला असावा ह्याला उत्तर नाही , असेही खुद्द दामोदरच लिहुन ठेवतात. असेही नाही कि वडील किंव्वा अन्य पुर्वजांच्याकडुन काहीतरी इंग्रज द्वेषाचे धडे मिळाले असावेत. वडील तर (त्यांच्या वर्णनावरुन) गुळंमुळीत पळीपंचपात्रात खेळणारे ब्राह्मण हरदास वाटतात. त्यांना तर पोरांनी कडक बलोपासना केलेलीही खपत नव्हती.
कोणाला पटो न पटो पण काही तरी पुर्वसंस्कार नावाचा प्रकार असावाच. आणि नंतर लगेच काही वर्षात गणेश उर्फ बाबाराव , विनायक उर्फ तात्याराव आणि नारायणराव सावरकर हे देशप्रेमाने भारलेले बंधुत्रय उदयास यावेत अन त्यांनीही इतकाच पराकोटीचा त्याग करावा ह हा मती गुंग करुन टाकणारा योगायोग आहे !
आता शेवटचा आणि ऑबव्हियस विचार - हेच चापेकर बंधु १९४७ मध्ये जिवंत असते अन माऊंटबॅटन ह्या इंग्रजामुळे देशाची फाळणी होत आहे हे त्यांनी पाहिले असते तर त्यांन्नी माऊंटबॅटन चा वध/ खुन / हत्या / मर्डर केला असता का ? की ह्या फाळणीमुळे देशाला झालेले गँगरीन तब्बल ८०० वर्षांननंतर फायनली एकदाचे कापुन टाकले जात आहे , आता हिंदुंना हिंदु म्हणुन निर्भयपणे जगता येइल ह्या प्रॅक्टिकल / व्यावहारिक विचाराने आनंद साजरा केला असता ?
ह्म्म्म... अवघड प्रश्न आहे.
असो पण ह्या कवितांच्या निमित्ताने चापेकर बंधु ह्यांच्या विषयी वाचणे झाले, त्यांची विचारधारा कळाली, १८१८ ते १९४८ ह्या मोठ्ठ्या ऐसिहासिक पझल मधला एक मिसिंग पीस गवसला ह्याचा मनापासुन आनंद वाटतो!
गणपती बाप्पा मोरया !
_________________________________________________________________________________________________
तळटीप :
संदर्भ : हुतात्मा दामोदर हरि चापेकर ह्यांचे आत्मवृत्त
संपादक : वि. गो. खोबरेकर ,
प्रकाशक : सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
लिंन्कः https://archive.org/details/DamodarHariChaphekar/page/n6/mode/1up?view=t...
प्रतिक्रिया
21 Sep 2023 - 4:42 am | चित्रगुप्त
राष्ट्रभक्तीने भारून गेलेले तरूण, त्यांचे जाज्वल्य विचार, प्रत्यक्ष कृती आणि त्यांचे कवित्व. सगळेच अद्भुत. खालील शार्दूलविक्रीडितातले पद उत्तमच रचले गेले आहे.
देशभरातून अशा अगणित तरूणांची आहुती स्वातंत्र्ययज्ञात दिली गेली. आमच्या पिढीवर मात्र लहानपणी 'बिना खड्ग बिना ढाल'चेच महात्म्य ठसवले गेले.
21 Sep 2023 - 5:20 am | चित्रगुप्त
लेखाचे शेवटी दुव्यात दिलेले 'हुतात्मा दामोदर हरि चापेकर ह्यांचे आत्मवृत्त' हे मुळात मोडीत असलेले बाड 'बाळबोधी' मधे लिहून १९७४ साली प्रकाशित करण्यात आले.
![.](https://html.scribdassets.com/48wqabsnwg6xc7k6/images/1-b06fe3def7.jpg)
सुरूवातीची काही पाने आज वाचली. त्या काळाविषयी अतिशय रोचक माहिती यातून मिळते. दामोदर हरि दररोज १२०० (बाराशे) सूर्यनमस्कार घालणे आणि एका तासात ११ मैल दौडणे असा व्यायाम करीत असत. वडील 'हरि विनायक चापेकर' हे पूर्वी सोलापुरात कलेक्टर आफिसात आणि नंतर तार आफिसात चाकरी करत, परंतु नंतर चाकरी सोडून ते कीर्तनकार झाले. त्यांचे तिन्ही मुलगे कीर्तनात बाजाची पेटी, सारमंडळ आणि टाळ वाजवून साथ देत असत.
त्यांनी जमवलेल्या हत्यारांची यादी/माहिती विस्मयजनक आहे. जिज्ञासूंनी अवश्य हा ग्रंथ वाचावा.
21 Sep 2023 - 8:37 am | Bhakti
करेक्ट हाच फरक आहे.शौर्याने तरुणांना प्रेरणा द्यायला हवी ना ... द्वेषभावनेने राष्ट्राला दुभंग पडतो.
21 Sep 2023 - 1:10 pm | चित्रगुप्त
ऐतिहासिक कवितांच्या लेखमालेचा प्रारंभ उत्कृष्ट झालेला आहे. सांप्रतकाळी बहुतांशी विस्मरणात गेलेल्या साहित्याचा शोध घेऊन ते या ठिकाणी जिज्ञासू वाचकांस उपलब्ध करून देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे असे आम्हास वाटते. या निमित्ताने वाचकांचे ठायी कुतुहल निर्माण होवून ते जुन्या काळच्या क्रांतीकारी, संत, पंत, भक्त, विरक्त, ज्ञानी कवी-लेखकांच्या साहित्याचे परिशीलन करिण्यास उद्युक्त होतील, याविषयी आमचे मनात किमपि किंतु नाही, किंबहुना तसेच होईल याची आम्हास खातरी वाटत्ये आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.
![.](https://cdn.mpcnews.in/wp-content/uploads/2023/06/maxresdefault-6.jpg)
![.](https://i.ytimg.com/vi/sfeeCfhbclI/hq720.jpg?sqp=-oaymwEhCK4FEIIDSFryq4qpAxMIARUAAAAAGAElAADIQj0AgKJD&rs=AOn4CLB-wYOndtQUeKMGcjVNXpxa5BXdwQ)
यापुढील लेखांचे शीर्षकात त्या त्या लेखनकर्त्याचे नाव दिल्यास भविष्यकाळी ते शोधण्यास सोपे पडेल असे वाटते. तसेच दरएक लेखामध्यी त्या लेखनकर्त्याचे आणि पुस्तकाचे चित्र, त्यासंबंधी उपलब्ध असलेली अन्य काही चित्रे-नकाशे, जालावरील साहित्याचे दुवे वगैरे दिल्यास लेखमाला आणखी रोचक, माहितीपूर्ण होईल. आगामी लेखनासाठी शुभेच्छा.
क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र)
चापेकर बंधुंचे जन्म या वाड्यात झाले आणि बालपणही याच वाड्यात गेले. याच वाड्यात त्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहिली, त्यासाठीची खलबतही येथेच पार पडली. त्यांच्या फ़ाशीनंतर दामोदर चापेक़रांच्या वीरपत्नी दुर्ग़ाबाई चापेकर, त्यांच्या अन्य दोन जावा व मुलांना सोबत घेऊन चिंचवड़ येथील या वाडयात राहिल्या.चिंचवड़ येथे राममंदिराच्या समोर हा वाडा आहे. चापेकर समितीने १९७२ मध्ये या वाड्याचा ताबा मिळवून वाड्याच्या विकासकामांना सुरूवात केली.
21 Sep 2023 - 1:19 pm | प्रचेतस
वाड्याविषयी मी पूर्वी येथे अल्पसे लिहिले होते आणि त्याची छायाचित्रे टाकली होती.
21 Sep 2023 - 6:40 pm | स्वधर्म
https://www.youtube.com/watch?v=euDCE4NQ2HE
चापेकर बंधूंबाबत अजून काही माहिती.
21 Sep 2023 - 8:14 pm | प्रसाद गोडबोले
हाच की तो गट क्र. १ आणि २ मधला फरक !
तुम्हाला तर माहीत आहे की सगळं. तुमच्या प्रतिसादावरून दिसत आहेच की तुम्हाला गट क्रं. २ च्या विचारसरणीची व्यवस्थित जाण आहे ते.
उगाच कशाला मला विचारता की व्याख्या काय गटांची म्हणून !
आता पुढचा लेख मोरोपंतांच्या कवितांवर लिहिणार आहे, त्यावरही असेच काहीसे तुमच्या गटाचे प्रतिसाद असतीलच ते तयार ठेवा. अर्थात तयार नसतील तर तुम्ही लागलीच काय प्रतिसाद देणार ह्याची आम्हाला कल्पना आहे आधीच. आम्हाला हे टेम्प्लेट चांगलेच ठाउक आहे आता.
हा हा हा.
21 Sep 2023 - 7:50 pm | अहिरावण
देव, देश आणि धर्मासाठी लाख संकटे छातीवरती झेलून घेणारी माणसे !!
त्या दिडशे वर्षांच्या गुलामीने अशी भली भली माणसे देशाला लाभली ज्यातील एकेका नररत्नांसाठी इतर देशांना शेकडो वर्षे वाट पाहावी लागली.
इतकंच आणि एवढंच क्रेडीट ब्रिटीशांना... बाकी ब्रिटीश जमात जगातली एक नालायक जमात याविषयी कोणतीही शंका आमच्या मनात नाही.
21 Sep 2023 - 8:47 pm | चित्रगुप्त
'गोरे' भारतात आलेच नसते, तर आजचा भारत कसा असता ? असा काथ्याकूट सुरु करावा असा विचार आहे. परंतु त्या आधी थोडा अभ्यासही आवश्यक आहे. बघूया केंव्हा जमते ते. हा काथ्याकूट आणखी कुणी सुरु केला तरी उत्तमच.
21 Sep 2023 - 9:17 pm | कर्नलतपस्वी
नाहीतर ऐ आये(AI) ला सांगा. भारी चित्र मिळेल.
(तंत्रज्ञान मागासवर्गीय कॅट्यागीरीतला तांत्रिक)
22 Sep 2023 - 11:01 am | अहिरावण
नाही मिळणार. ए आय उपलब्ध विदाच्या आधारे काम करते. पाश्चिमात्यांनी गेल्या १०० वर्षांत त्यांचे गोमटे रुप(च) जगासमोर दाखवले आहे.
22 Sep 2023 - 11:11 am | अहिरावण
जगासमोर म्हणजे इंटरनेटवर. कारण ए आय इंटरनेटवरुनच माहिती गोळा करते. आणि पाश्चिमात्यांनी विशेषतः अमेरिकन आणि इंग्रजांनी इंटरनेटवर प्रचंड हुकुमत ठेवलेली आहे.
22 Sep 2023 - 11:00 am | अहिरावण
जरुर करा. त्याआधी वसाहतवादाने केलेले जगाचे नुकसान तपासा, कदाचित फायदे नगण्य आणि नुकसान खुप असा लेखाजोखा यायचा.
21 Sep 2023 - 9:03 pm | चित्रगुप्त
-- हे ब्रिटिश राजकारणी लोकांबद्दल जरी खरे असले तरी अनेक ब्रिटिश चित्रकार, वास्तुकार, कवी, लेखक, तत्वज्ञ, संगीतज्ञ वगैरे वंदनीय आहेत. उदाहरणार्थ खालील चित्र बघा. जॉन कॉन्स्टेबल हा चित्रकार निगर्वी, प्रेमळ, सरळमार्गी, कलानिर्मितीत दंग असा विलक्षण चित्रकार होता, आणि असे हजारो-लाखो लोक प्रत्येक देशात असतात.
![.](https://muralsyourway.vtexassets.com/arquivos/ids/232019-825-auto?width=825&height=auto&aspect=true)
चित्रकारः John Constable (१८२१) तैलचित्र. (51+1⁄4 in × 73 in) Location:National Gallery, London
22 Sep 2023 - 10:59 am | अहिरावण
मी ब्रिटीश जमात असा समुहवाचक उल्लेख केला आहे, ब्रिटीश व्यक्ती असा नाही.
व्यक्तिगत द्वेषाचे काही कारणच नाही. पण जेव्हा ते एकत्रितरित्या राज्यकर्ते, आक्रमक म्हणून वावरतात तेव्हा नालायक असतात.
हेच आणि असेच अमेरीकेला सुध्दा लागु. युरोपीयनांना सुद्धा लागु.
पाश्चिमात्य लोक समुह म्हणून नालायक असतात. विशेषतः आशियाई (त्यात भारत जास्त) लोकांविरुद्ध एक आकस असतो त्यांच्या मनात.
22 Sep 2023 - 2:27 pm | धर्मराजमुटके
पाश्चिमात्य लोक समुह म्हणून नालायक असतात
अगदी ! हेच वर्णन तंतोतंत भारतीयांना देखील लागू होते.
अवांतर किस्सा आणि शंका : वरील धागा आणि चर्चेशी संबंध नाही
मुंबईत (साकीनाका ते घाटकोपर) भागात ब्रिटीशांनी एक पाईपलाईन बांधली होती. ती साधारण १००-१५० वर्षे तरी जुनी असावी. ती एके वर्षी एका ठिकाणी काही कारणास्तव फुटली. ती मुंबई महानगर पालिकेने दुरुस्त केली. तीच पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर साधारण ४-५ वर्षे त्याच जागेवर सतत फुटायची.
ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारती, पुल पुणे-मुंबईत अजुनही दिमाखात उभ्या आहेत मात्र आता बांधलेल्या इमारतींना, पुलांना तेवढे आयुष्य नसते. काय कारण असावे ? तंत्रज्ञान म्हणावे तर मागच्या काळापेक्षा प्रगत झालेय, नवे नवे शोध लागताहेत पन कोणत्याच कामाची २०-२५ वर्षांची खात्री देता येत नाही. नक्की काय कारण असावे ?
22 Sep 2023 - 6:59 pm | अहिरावण
>>>अगदी ! हेच वर्णन तंतोतंत भारतीयांना देखील लागू होते.
असु शकेल. पण भारतीय समुह म्हणून इतर देशांवर, समाजावर आम्ही तुमचे भले करतो म्हणून आक्रमण करत नाहीत.
तुम्ही आमचा धर्म स्विकाराच म्हणून हातात पुस्तक देत नाही की मानेला तलवार लावत नाही.
वसाहतवाद, गुलामी लादत नाहीत.
त्यांना जी काही कृत्ये करायची असतात ती आपल्या देशात करतात.
फरक कळावा.
>>>ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारती, पुल पुणे-मुंबईत अजुनही दिमाखात उभ्या आहेत मात्र आता बांधलेल्या इमारतींना, पुलांना तेवढे आयुष्य नसते.
जुन्या पद्धतीचे बांधकाम आठवण म्हणून राहू द्यावे या विचाराने त्यांचे जतन होत असते.
>>>काय कारण असावे ? तंत्रज्ञान म्हणावे तर मागच्या काळापेक्षा प्रगत झालेय, नवे नवे शोध लागताहेत पन कोणत्याच कामाची २०-२५ वर्षांची खात्री देता येत नाही. नक्की काय कारण असावे ?
आपणच केलेले बांधकाम २०-२५ वर्षांनी गरज आणि आवश्यकता बदलल्याने पुन्हा बांधकाम केले जाते.
आपण रहातो त्या सोसायट्या, घरे सुद्धा रीडेवलपमेंट करतो. पणजोबांच्या काळातले वाडे पाडून फ्लॅट बांधतो.
मात्र तेच गेल्या शतकातील थोर मनुष्यांची निवासस्थाने आपण जतन करतो.
22 Sep 2023 - 7:18 pm | धर्मराजमुटके
पण भारतीय समुह म्हणून इतर देशांवर, समाजावर आम्ही तुमचे भले करतो म्हणून आक्रमण करत नाहीत.
कदाचित भारतीयांत तेवढी ताकद नसावी अशी शक्यता असू शकते काय ?
पाडून परत बांधणे आणि आपोआप १०-१५ वर्षात मोडकळीस येणे यात गल्लत होत असावी बहुतेक. सा. बा. विभागांनी केलेल्या बांधकामांबद्दल विशेषत्वाने.
असो. जाऊ द्या.
22 Sep 2023 - 7:26 pm | अहिरावण
>>कदाचित भारतीयांत तेवढी ताकद नसावी अशी शक्यता असू शकते काय ?
अशी दुस-यावर आक्रमणे करण्याची ताकद असायला हवी हा आदर्श मानणे हे योग्य आहे का?
>>सा. बा. विभागांनी केलेल्या बांधकामांबद्दल विशेषत्वाने.
विषय गहन आहे.
पहीले तो दगड फेकेल ज्याने आयुष्यात पाप केले नाही. - जॉन ८:७-११ (राजा जेम्स प्रत)
जाऊ द्या तर जाऊ द्या.
22 Sep 2023 - 7:34 pm | धर्मराजमुटके
मुळीच नाही पण सामर्थ्यवंताने समोरच्याला अपराधासाठी क्षमा करणे आणि दुर्बलाने समोरच्या अपराध्याचे काही वाकडे करु शकत नाही म्हणून निमूट गप्प बसणे यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक भारतीय समूह आणि पाश्चात्य समूह यांच्या ताकदीत असावा असे प्रथमदर्शनी वाटते.
22 Sep 2023 - 7:48 pm | अहिरावण
इतिहास जेत्यांनी (पाश्चिमात्यांनी) लिहिलेला आहे. त्यांचे जयाचे गुणगान आणि पराजय लपवणे हे ते करणारच.
शे दोनशे वर्षांत अरबस्तानातील वावटल अख्खा युरोप कवेत घेते. तुर्क, मंगोल अख्या जगावर शंभर वर्षांत अधिराज्य गाजवतात. हजार वर्षे लोटून सुद्धा अख्खा हिंदूस्तान अहिंदू झाला नाही. हे हिंदूंनी टक्कर दिली म्हणूनच झाले. ताकद होती.
दिडशे वर्षांच्या आंग्लांच्या, आधीच्या इतर युरोपीय आक्रमकांपुढे सुद्धा आपण हिंदू म्हणूनच शिल्लक राहीलो. ताकद होती म्हणून शिल्लक राहीलो.
मराठे आणि इंग्रज लढाईत दोघांची ताकद समान होती, फक्त नियतीचे दान त्यांना पडले. (आंग्ल समर्थक कितीही मातीचे भांडे, पितळी भांडे वगैरे "खरे" खोटे आलाप काढो).
पाच हजार वर्षापेक्षा जास्त काळ टिकलेली आणी अजुनही कित्येक शतके टिकून रहाण्याची शक्यता असलेली संस्कृती ही शस्त्राने नव्हे तर वृत्तीने निर्माण होते.
अर्थात हे आमचे म्हणणे आहे. फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.
22 Sep 2023 - 8:09 pm | धर्मराजमुटके
तुमचे सगळेच म्हणणे नाकारण्यासारखे आहे असे आमचे देखील म्हणणे नाही :) आवश्यक तिथे गांभीर्य / सहमती दाखवायला / माफी मागायला मला कोणताही अभिनिवेश आडवा येत नाही.
थोडे शब्द बदल करुन म्हणणे मांडतो.
एक आक्रमक वृत्ती असते जी आंग्ल, युरोपिय, तुर्क, मंगोलांमधे आहे. भारतीयांमधे बचावात्मक वृत्ती आहे. आपले आहे ते संरक्षण करणे ह्यात त्यांनी ताकद खर्च केली पण धर्म वाढावा म्हणून विशेष प्रयत्न करणे हिंदू / सनातनी (जे काही म्हणायचे ते म्हणावे) यांना जमत नाही. धर्म वाढवण्यासाठी बळाचा वापर करणे योग्य नाही हे मला देखील मान्य आहे मात्र किरिस्तावांप्रमाणे गोड बोलून, शांततामय पद्धतीने प्रसार करण्यास हरकत नसावी. उलट आपल्याच धर्मातील ३.५ ते ४ लाख बांधवांना आपण एका झटक्यात आपल्यातून कमी केले हे शल्य आहेच.
भारतीय समाजाची अल्पसंतुष्टता, ऐहिक गोष्टींबद्दलची नावड/तुच्छता / जग नश्वर आहे ही विचारधारा हे देखील हिंदु / सनातन धर्माचा प्रसार न होण्याचे एक कारण असावे असे मला वाटते. (आमचेही मत गांभीर्याने घेण्याची गरज नाही).
जाता जाता एक ऐकीव किस्सा :
अलेक्झांडर द ग्रेट याने भारतवर्ष पादाक्रांत केले होते. प्रवास करता करता त्याला एके ठिकाणी एक साधू बसलेला आढळला. केवळ लंगोटीवर बसलेल्या साधूला पाहून अलेक्झांडर त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला मी जगज्जेता आहे. तुला काय हवे ते माग. "बाजूला उभे रहा, तेवढा सुर्यप्रकाश माझ्या अंगावर पडू दे" एवढ्या शब्दावर साधूने जगजेत्त्याची बोळवण केली.
मार्कस ऑरेलियस यांच्या कविता प्रसिद्ध करण्याच्या मुळ उद्देशास हरताळ फासायला नको म्हणून माझे दोन ? शब्द आवरते घेतो.
23 Sep 2023 - 9:57 am | अहिरावण
>>माझे दोन ? शब्द आवरते घेतो.
ओके.
फक्त जाता जाता सहज दिसणारा किस्सा :
आठ दहा वर्षांची मुले भरपुर खेळत, हुंदडत असतात. मस्ती करत असतात. तेच मुल मोठे होते वीस बावीस त्याच्या डोळ्यात स्वप्ने असतात. तो हवी ती जोखीम घेतो, कधी जिंकतो कधी हरतो. तेच मुल जेव्हा पन्नाशीत येते, बायका मुले असतात. जबाबदारीने वागतो. थोडा नरमतो.
कदाचित हाच फरक हजार बाराशे वर्षांपुर्वी उदयास आलेल्या युरोपिय आणि पाच हजाराहून अधिक काळाच्या पोक्त सनातन संस्कृतीत असावा असे वाटते.
पुन्हा तेच सांगुन माझे शब्द आवरते घेतो : हे आमचे म्हणणे आहे. फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही.
22 Sep 2023 - 2:32 pm | धर्मराजमुटके
तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन पुस्तक वाचले. काही म्हणा पण सशस्त्र क्रांती, हिंसा, माझ्या मनास तरी पचत नाही. यात देशभक्तांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. कृष्णाने अर्जुनाऐवजी मलाच उपदेश केला असता तर बरे झाले असते असे कधी कधी वाटते.
22 Sep 2023 - 2:40 pm | चित्रगुप्त
मुळात 'झुंडशाही' हेच मोठे संकट असते. मग ती कुणाचीही असो. एकेश्वरवादी झुंडींनी 'एकत्रितरित्या राज्यकर्ते, आक्रमक म्हणून' अनेक शतके जगभरात काय केले, ते सर्वविदित आहे
वरील वाक्य लिहील्यावर सहज 'झुंडशाही' हा शब्द गुगलल्यावर मिपावरचा २०१० चा एक लेख सापडला:
झुंडशाही म्हणजे देशद्रोहच
https://www.misalpav.com/node/11128