कविता

मी...

सुयशतात्या's picture
सुयशतात्या in जे न देखे रवी...
7 Feb 2013 - 2:47 pm

नियतीने केलेला आयुष्यावर घाव सोसला मी
त्याच घावाच्या साथीत अश्रुंचा माग शोधला मी

एका परिचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी
त्याच स्वप्नाचा विरत जाणारा दु:खद अनुभव घेतला मी

सर्व दु:खे "प्याल्यात" बुडवली मी
व्यसनाच्या अंधःकारात स्वत:ला लोटले मी

मनाच्या तगमगीत आयुष्याचा अंत पाहिला मी
त्याच अंताची निरंतर अपेक्षा करणार मी...

कविता

घर

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
7 Feb 2013 - 10:25 am

या घराला विचारले मी एकदा
असा रिकामा रिकामा असतोस
वाईट नाही वाटत?
क्षणभर विचार करून घर म्हणाले,
नाही, म्हणजे नेहमीच नाही
.
.
म्हणाले या भिंती पाहिल्यास
किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत
इकडे ये, या खिडक्या पहा
आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत
.
.
अन् ते दार बघितलेस
सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक
येणार्‍याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे
वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे
.
.
हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत
मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो

करुणशांतरसकवितामुक्तक

मनमानी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
5 Feb 2013 - 12:39 pm

कळाहीन केसांत माळते रंग उतरली फुले बेगडी
स्वत:च्याच बिंबावर भाळुन हसत रहाते कुणी बापडी

बागेमधल्या नळाखालती निवांत करते मुखप्रक्षालन
स्वस्थपणाने बाकावर मग चालतसे सौंदर्यप्रसाधन

जुनाट, विटक्या बटव्यामधली दातमोडकी फणी काढते
पारा उडल्या काचेच्या तुकड्यात पाहुनी केस बांधते

निळी असावी कधी ओढणी, जरी दिसतसे कळकटलेली
ओढुन घेते मुखावरुन ती, जशी परिणिता कुणि नटलेली

हळूच हसते, जरा लाजते, नजर झुकविते करून तिरकी
गुणगुणते तंद्रीतच आणिक स्वतःभोवती घेते गिरकी

कविता

असता तुझी कृपा ।

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Feb 2013 - 10:42 am

असता तुझी कृपा ।
असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला ।
देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।धृ।।
घरटे कसे रचावे हे ज्ञान पांखरांना ।
माते उरी दुधाचा तू निर्मिलास पान्हा ।।
शय्या कधी फुलांची काटे कधी उशाला ।।१।।

प्रपंची अडचणी येती, मती मूढ होई
दाटे अंधार जीवनी, मन निराश होई
होतोस दीप तू ,सापडे वाट आंधळ्याला
असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला ।
देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।२।।

कविता

बेरीज

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
4 Feb 2013 - 11:55 pm

पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी
झेलण्या केले खुले काळीज मी

भेटुनी जाते त्सुनामीसारखी
मिरवतो आयुष्यभर ती झीज मी

आज स्वप्नांनो, नको तसदी मला
काल कवडीमोल विकली नीज मी

पूर्णता नाही तुला माझ्याविना
मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी

ठरवले आहेस तू उत्तर तुझे,
की चुकीची मांडतो बेरीज मी?

-- उपटसुंभ

मराठी गझलकवितागझल

वेडी आशा अनुदानाची -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
3 Feb 2013 - 11:37 am

आशा मोठी वाईट असते
कुणालाच ती सोडत नसते -
पाऊसधार भुलवुन जाते
धरा कोरडी पहात असते...

गोठ्यामधली वैरण संपुन
गुरेढोरे विकून झाली -
डोळ्यामधल्या पाण्यामध्ये
शिळीच भाकर भिजून गेली...

दुष्काळाचे पडता सावट
शासन सारे झोपी जाते -
बळीराजाची वेडी आशा
अनुदानाची वाट पहाते !
.

करुणकविता

वळवून मान तिने .मधाळ का हसावे?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Feb 2013 - 10:09 pm

वळवून मान तिने .मधाळ का हसावे?
वेडे मन हे ,त्यात त्याने का फसावे ?

कधी हो कधी नाही नेमके काय समजावे?
कधी हसणे कधी रडणे तिचे तिलाच ठावे

गुलाबी जिवणी.,का करावे विभ्रमी चाळे ??
होतो जीव चोळा मोळा, हे तिला का न कळे??

वेळी अवेळी भेटणे,वाट निसरडी,वय कोवळे
कसे समजवू तिला ,मन मुळापासून उन्मळे

खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे
तरी लोटतेस होडी वादळात ,हे आहे का बरे ??

अविनाश

कविता

आई

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
2 Feb 2013 - 6:59 pm

काल रात्री मैत्रिणीबरोबर "आई" या अथांग विषयावर खूप गुज बोलून झाले. सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे शिवाय कविता हा माझा प्रांत नाही. पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. आशा करते कवितेमागील भावना पोचतील.

संस्कार, त्याग, गर्भाशय,
ऊब, दिलासा, अंगाईगीत,
उन्हात वणवणताना मिळालेली
शीतल सावली व झुळूक
सवयी, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण
आणि हो प्रार्थनादेखील.
नाळ, रुजलेली पाळंमूळं व
दाटून आलेला हुंदका सुद्धा

शांतरसकविता

नजीक किनारे

कौस्तुभ आपटे's picture
कौस्तुभ आपटे in जे न देखे रवी...
2 Feb 2013 - 5:53 pm

नजीक किनारे येता कैसी नावच बुडते रे
पैशाच्या फुंकरीने जळते सुर्य विझती रे
कसा पाऊस होतो छोटा
अन पैसा होतो मोठा
हे व्यस्त प्रमाणी अवघड मज ना
समिकरण सुटते रे.....

त्यांनी भुर्रकावे लोणि मी ताकच का प्यावे
दुखणे ऐसे ठणकत रहाते , अवघड जागीचे
ही खोड जीत्याची रे,
त्या मरण कसे यावे.
इथे हरल्या पोथ्याही,
गीता,गाथा , ओव्याही.
कसा मोहासाठी विवेक आपला
गहाण पडतो रे
नजीक किनारे ...

कविता