पाऊस
आज पहाटे लाजत मुरकत,
बरसून गेला पाउस नवथर
तहानलेल्या धरतीला या
स्पर्शून गेली एक खुळी सर
मातीवरती हलकी नक्षी,
पानांवरती रंग ओलसर
मिटलेल्या पंखात अजूनही
नाजूक ओली हळवी थरथर
पागोळ्यांचे पैंजण छुन छुन,
टपटपणार्या ओल्या वेली
हिरवाईची खूण जागवीत
पाऊस येई सोनपावली
मेघ अजूनही विस्कटलेले,
चंद्रकोर ही ओली अजुनी
अन्कुरातले स्वप्न फुलविते
हसरी गंधित मोहक अवनी