(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा.
स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी. यापैकी कोणतंही एक उत्तर पुढच्या इतर प्रश्नांच्या जाळ्यात माणसाला अडकवून जाणारं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि पुढच्या प्रश्नांची उत्तरं यासंबंधात आपल्याच मनात असणाऱ्या अनेक विसंगती/विरोधाभास टिपणं हाच तिचा हेतू. बारकाईनं त्याकडं पाहिलं नाही तर आपण फसलोच.
काश्मीरमधून आलेली महिला, प्राध्यापिका, समाजशास्त्र हा विषय असा योग तसा विरळाच. आणि मग सुरू झाला एक प्रवास. काश्मीर प्रश्नाचं आकलन विस्तारणारा.
---
"मला आठवतं, मी लहान होते. वडील एके दिवशी म्हणाले, बेटा तुला काही वेगळं दाखवतो, चल. आम्ही दोघंही लाल आखाड्यापाशी गेलो. छडी मुबारकचा कार्यक्रम सुरू होता. तिथं मी एका साधूला पाहिलं. एका पायावर तो उभा होता. वडलांनी मला सांगितलं, तो ईश्वराराधना करतो आहे. अशा अवस्थेत तो कितीही दिवस राहू शकतो. त्याच्या ईश्वरभक्तीची तीच शक्ती आहे. मी अचंबित झाले. घरी आले आणि त्याच्यासारखंच एका पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागले..."
सांगता-सांगताच आपण एका कार्यालयात आहोत याचं भानही विसरून ती खुर्चीवरून उठली, उभी राहिली. एक हात कमरेवर ठेवत एक पाय उचलून घेत अंगठा गुडघ्यापाशी आणून एका पायावर ती उभी राहिली. दुसरा हात डोक्याशेजारून थेट वर उभा केला. काहीएक क्षण ती तशीच उभी होती. बोलणंही सुरू होतं.
"हे आत्ता. पण त्यावेळी जमतच नव्हतं. दोन-तीन प्रयत्न केले, तोल जायचाच. मग थांबवून दिला. तो साधू ते कसं करत असेल?...
"त्या साधूला मी पाहिलं होतं तो दिवस अमरनाथ यात्रेच्या आरंभाचा होता. 'ती' यात्रा आता नसते. त्या देवस्थानाचाही एक 'मालीक'च आहे. त्यानंच ते जपून ठेवलं आहे. पण आता आपण 'अमूक इतक्या लाख लोकांनी अमरनाथचं दर्शन घेतले' हे वाचतो, लिहितो. अमरनाथचं शिवलिंग एसी लावून राखण्याचा प्रयत्न केला जातो हे वाचतो... अमरनाथची सारी इकॉलॉजी त्यातून डॅमेज होत गेली हे कळत नसेल कुणालाही? इतके लोक येत नव्हते तेव्हाही होतंच ना ते?..."
---
ठीक आहे. हाही एक भाग आहेच या प्रश्नाचा. अनेकांना ठाऊक असलेला. त्यात संदर्भही ताजाच.
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढते तेव्हा त्यामागं इतर काही गोष्टी असणार हे नक्कीच. तो केवळ श्रद्धेचा भाग नसतो आणि नव्हताही. थोडं साहस त्यात होतंच हे नक्की. या साहसाचाच एक रंग राजकीयही असतो तसाच तो होताही. पण म्हणून काय झालं? क्षणार्धात मनात चमकून गेलेल्या या विचारांतून माझा प्रश्न सुटतो. 'म्हणून काय झालं'चा संदर्भ एकूणच 'काश्मीर'च्या नावाखाली होणाऱ्या प्रच्छन्न हिंसाचाराशी जोडलेला.
बोलणं सुरू असतानाच, तिचा मोबाईल वाजतो. आधी ती पहिला कॉल सायलेंट करते. तरीही पुन्हा तो वाजतो. पुन्हा तोच प्रयत्न. तिसऱ्यांदा पुन्हा तो वाजतो.
"तुम्ही फोन घ्या. बोलून घ्या. आपण थांबू."
"नाही. नको. माझा छोटा भाऊच आहे. त्याला माझी खूप काळजी आहे. सुरक्षेचीच... बोलणं थोडक्यात संपणार नाहीच आमचं... असो... काही दिवसांपूर्वीची ही दुसरी घटना..."
तिचं बोलणं अर्धवटच राहतं कारण पुन्हा मोबाईल वाजतो. "यू बेटर टेक द कॉल अँड टेल हिम दॅट यू आर सेफ अँड सेक्युअर."
ती इतक्या दूर इथं आहे पुण्यात. खरं तर तुलनेनं सुरक्षितच. पण ही अखेर दहशतीचीच भीती आहे. आणि दहशत पुण्यातही असू शकतेच की. ती फोन घेते, भावाशी बोलते. साधारण अंदाज लावून कळतं की, माझं काम सुरू आहे, मी पाचेक मिनिटानं फोन करते असं ती म्हणाली असावी. कारण भाषा तिची. हिंदी नाही, उर्दू नाही.
"हो. मी काय सांगत होते... मी ब्लँक होतेय... हां. श्रीनगरची दुसरी घटना. हीही ग्रेनेडशी संबंधित. माझ्या मुलाच्या शाळेपाशी ग्रेनेड हल्ला झाला. मुलांना घरी आणून पोचवणाऱ्या गाडीच्या चालकानं घरी येऊन मलाच विचारलं, "बेटा कहां है?" आय सेड, "आपकोही मालूम होना चाहीये." मग सगळं काही ध्यानी आलं आणि माझे हातपाय गळाले. तशीच बाहेर पडले त्याच्यासमवेत. मुलाचा शोध सुरू केला. आधी गेले हॉस्पिटलमध्ये. बाहेरच बोर्डावर नावांचा कागद असतो. तो पाहू लागले. खरं सांगते, मला अक्षरं दिसत होती, पण आपण काय वाचतो आहे याचं आकलन होत नव्हतं. थोड्या वेळानं ध्यानी आलं की, आपल्या मुलाचं नाव त्यात नाही..."
ओह. बोर्डावर बाहेरच नावांचा कागद असतो हे शब्द अगदी सहजी तिच्या तोंडून बाहेर आले होते, आता त्याचा खरा अर्थ लक्षात आल्यानं त्या सहजपणाची जाणीव होऊन माझ्या अंगावर काटा आला. असे प्रसंग एरवी एखाद्या मोठ्या अपघातावेळी, लाठीमारावेळी किंवा काही साथ वगैरे असते तेव्हा. तिथं हे नेहमीचंच? अगदी रोज पोलिसांनी काढलेल्या, शहर/जिल्ह्यात घडलेल्या गुन्हे-अपघातांविषयीच्या प्रेसनोटसारखंच? व्यवस्थादेखील सारं कसं शिस्तशीर करत असते नाही...
"त्याचं तिथं नाव नाही यातून धीर थोडाच मिळतो... आमचा मोर्चा शाळेकडं. तिथंही त्याचा पत्ता नाही. माझा जीव खाली-वर होऊ लागला होताच. तेवढ्यात फोन आला, की मुलगा घरी पोचला आहे. कोणा सहृदय माणसानं त्याला आणून पोचवलं होतं...
"मी घरी गेले. मुलाला छातीशी कवटाळून घेतलं तर आधी त्यानं मला काय सांगावं? "मम्मी, माझी पुस्तकं, वह्या... सगळी गेली..." त्याला ही चिंता की आता आई आपल्याला काय म्हणेल पुस्तकं-वह्या गमावल्याबद्दल... आणि मला... मला... मी म्हणाले, जाऊ दे, आपण नवीन वह्या-पुस्तके घेऊ.
"आजकाल ती एलआयसीची जाहिरात लागते ना "और पप्पा खो गये तो...?"... वो देखतेही मुझे यही हादसा याद आता है... फरक इतना है की यहां मेरा बेटा है..."
---
भावनेला हात घालणारी कहाणी. आई, मूल, घातपाती घटना, शोधाची त्रेधा (जी इथं तिच्या नेमक्या शब्दांत मांडलेली नाहीये), जीव आणि वह्या-पुस्तकं या प्रतिमांतून व्यक्त होणाऱ्या दोन जीवांच्या जगण्याच्या जाणीवा... सिमिलर घटना इतरत्रही घडत असतातच. घडलेल्याही आहेत. मुंबईचे आता किती दाखले देता येतील याचा हिशेब नाहीच...
...पण मग हळूच माझ्या लक्षात येतं, आपण जिच्याशी बोलतोय ती एक आई आहे. ती जे सांगते आहे त्यात पवित्रे नाहीत. ती त्या प्रश्नाचं तिच्या, तिथल्या असंख्यांपैकी एक म्हणून असलेल्या, जगण्याशी असलेलं नातं सांगतेय. मी ऐकत जातो.
"मुझे याद है... काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक ग्रेनेड हल्ला झाला. त्यात गुंतलेल्या संशयिताचं नाव मसूद. माझ्या भावाचं नावही मसूद. जस्ट नेमसेक. लष्कर आणि पोलीसांचा ससेमिरा भावाच्या पाठीशी लागला. अवघ्या काही दिवसांआधीच मी अलीगडहून शिक्षण संपवून परतले होते. घरी आल्याचा आनंद दूर, हे नवं संकट समोर आलं होतं. मसूदवर सगळ्या जगालाच चुकवत जगण्याची वेळ आली. त्याचा ठावठिकाणा घरच्या केवळ मला ठाऊक होता. घरीही कोणाला मी बोलले नव्हते. वडिलांनाही नाही.
"असह्य झालं शेवटी. माझा दुसरा भाऊ हैदराबादमध्ये होता त्यावेळी. तो आयपीएस. त्याला सारं कळवलं. धावतपळत तो घरी आला. त्यानं पोलीस आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आधी त्यांनी ते मानलं नाहीच. मसूदला आमच्यासमोर हजर करा असं त्यांनी फर्मावलं, हमे पूछताछ करनी है..."
"वॉज इट पोलीस ऑर आर्मी?" मी.
"आर्मी. राष्ट्रीय रायफल्स... आय रिमेंबर द मेजर बँगींग ऑन द डोअर्स ऑफ माय हाऊस अॅट टू इन द नाईट द प्रिव्हियस डे."
बोलता-बोलता तिचा आवाज चढू लागलेला होता. तिलाच त्याची जाणीव होते. "माफ करा, माझा आवाज चढला आहे. किती नाही म्हटलं तरी मुळात क्लासरूमची सवय आहेच, पण हा विषयच असा आहे की, आवाज चढतोच.
"पुढं हा प्रश्न सुटला. त्यांनी मसूदला बरेच प्रश्न विचारले..."
"दे डिड इंटरॉगेट हिम फायनली..." मी.
"नो. त्यांनी नुसती चौकशी केली आणि सोडलं. तेही एक भाऊ आयपीएस आहे म्हणून. हे दुसऱ्या एखाद्या सामान्य स्त्रीच्या आयुष्यात घडलं असतं तर...?"
---
हेदेखील इतरत्र घडू शकतं. त्याचा संदर्भ त्या एका प्रश्नाशीच जोडता येईल असं नाही. अशी एक कहाणी तर गुलजार यांच्या 'माचीस'मध्ये येऊन गेली आहे. तिथं संदर्भ पंजाबचा होता. त्या चित्रपटावरची के. पी. एस. गिल यांची भयंकर संतप्त प्रतिक्रिया मला आठवते. त्यांनी या चित्रपटाला भंपक ठरवण्याचंच बाकी ठेवलं होतं. पण... तो चित्रपट अगदीच अवास्तव होता असं नव्हतं हे नक्की. इथं या कहाणीत इतर काही तपशील 'माचीस'पेक्षा वेगळे आहेत. भाऊ सुटला आहे. त्या मुद्यावरून इतर कोणी पोलिसांचा किंवा लष्कराचाही सूड घ्यायला निघालेलं नाहीये.
अर्थात, पंजाब आणि काश्मीर यांचे संदर्भही वेगळे, किती नाही म्हटले तरी वेगळेच. इतरत्र आणि काश्मीर यांच्यातील हे असं वेगळेपण हेच काश्मीरचं वेगळेपण? पण तरीही इथं याहून वेगळा एक घटक समोर येतोय. स्त्रीच्या दृष्टीनं या प्रश्नाचं स्वरूप, गांभीर्य वगैरे.
"सर्वाधिक पोळलेली तीच आहे."
अर्थातच! मी मनातच.
"घरात आई म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून..."
ती क्षणभर थांबते. समोर भिंतीकडे एकटक नजर लावते आणखी क्षणभरच आणि बोलू लागते.
"या तिघींपैकी नाही अशी जी आहे तिचे काय?" तिचा प्रश्न आणि उत्तराच्या अपेक्षेनं समोर नजर. मी आणि माझा मित्र पहातोच आहोत.
"ज्यांचा नवरा बेपत्ता आहे, तो जिवंत आहे की नाही याची खबरदेखील नाही, बेपत्ता होऊन सात वर्षं झाली म्हणून जो मेला हे गृहीत धरायचं आहे अशा या आहेत. इसकी सोशल कॉस्ट क्या हो सकती है?"
आम्ही शांतच आहोत. बहुदा ही डिप्लोमॅटिक शांतता असावी आमची. माझ्या लेखी या प्रश्नात सत्यता आहे, आणि त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे या जाणीवेतून आलेला तो मुत्सद्दीपणा असावा.
"सोशल कॉस्ट कितनी है यह समझके बाहर है... आप जरूर आईये एक बार..." अत्यंत आर्जवी स्वर. 'आमच्याइकडं येऊन पहा" हा काहीसा आव्हानात्मक पवित्रा नाही. नेमके या क्षणी तिचे डोळे किंचित पाणावलेले का असावेत हे मात्र समजत नाही.
"त्या मुलींच्या जीवनाचं काय? नवरा आहे की नाही ठाऊक नाही. निर्णय तरी नवा करता येईल का? आपण वाचलेलं असतं, कोणी असा बेपत्ता होता सात वर्षं... म्हणून मृत घोषीत झाल्यानं नवं लग्न होतं... तो प्रकट होतो. मुलीनं काय करायचं? हे विरळा नाही तिथं. अडचण हीच असते बहुतांशी की, बेपत्ता झालेला हा नवरा ना या देशाचा असतो ना त्या... त्याचा कोणीच नसतो. अगदी असंही असतं की तो 'तिकडं' गेलेला असतोही..."
माझ्यातला सोशल डार्विनिझ्म अभ्यासक जागा होतो एक क्षणभरच, 'तीही एक कॉस्ट असावी अशा निर्णयाची...' माझीच मला लाज वाटते.
"असं समजू की तो तिकडं न जाता इकडंच बेपत्ता झाला आहे. स्थिती सारखीच ना. त्याचा कोणी वाली नाहीच. जे असेल ते त्यानं केलेलं असेल किंवा त्याच्यावर लादलेलं असेल. हिचं काय? हिचं हे बेदखल होणं कशात बसवू शकतो आपण? तिच्या अपत्यांचं विचारू नका...'
दुख्तरन ए मिल्लत या संघटनेबाबतच्या माहितीतून ऐकलेल्या कहाण्यांसारखीच ही कहाणी. त्यात पवित्रे बरेच होते. मला एकदम ब्लॅक विडोज वगैरे आठवून जातात. चेचन्यातल्या. पण इथं ही तशी नव्हती समोर येत. येतेय ती केवळ मानवी मूल्य-हानीच्या संदर्भातच.
"आणखीही एक गट आहेच. 'त्यांच्या'कड़ून बळी ठरलेल्या. त्यांच्याकडून म्हणजेच दोघंही. आर्मीभी और दहशतगर्दभी..."
आणखी एक गट असेलच ना? माझ्या डोक्यात माचीस आहेच. प्रेयसीचा प्रियकर? पण मी तो प्रश्न टाळतो.
"एव्हरी कन्फ्लिक्ट... इसमे सबसे जादा भुगतना पडता है औरतोंकोही. एक आदमी... कमसेकम दो और जादासे जादा कितनीभी औरते... मां, बीवी... आगे बहने, भाभी, भाभीया... आदमीभी होते है ऐसेही पॅरॅलल रोल्समें. लेकीन भुगतना पडता है औरतको. क्यूं... ये तो बतानेकी जरूरत नही है..." हे सगळं सांगताना पेनानं टेबलावर कल्पनेतच एक केंद्रबिदू कल्पिला तिने 'एक आदमी' हे शब्द उच्चारताना आणि मग भोवतीनं वर्तुळ आखत गेली...
---
मला आठवतं तिच्या अभ्यासाचा विषय समाजशास्त्र हाच तर आहे. मांडणी चांगलीच होणार या प्रश्नाच्या या बाजूची तिच्याकडून. भावतो तो तिचा प्रामाणिकपणा. पवित्रे न घेण्याचाच पवित्रा. आणि हा तटस्थपणा असूनही समोरच्याच्या हृदयाला हात घालणारं आवाहन. इथं थोडं वेगळेपण आहे काश्मीरचं. अगदी अशा आंतरराष्ट्रीय (आपापल्या धारणेप्रमाणे कोणी दोन म्हणावं, कोणी त्याहून अधिक राष्टं... त्याच अर्थानं आंतरराष्ट्रीय) प्रश्नाचा जवळून अभ्यास मी काही केलेला नाही. पण संघर्षाची जातकुळी थोडी जरी सारखी असेल तर 'सोशल कॉस्ट्स' असं अस्मा ज्याला म्हणते त्या बऱ्यापैकी सारख्याच असतात हा अनुभव. त्यामुळं तिच्या या मांडणीतून काश्मीरच्या वेगळेपणाचं महत्त्व अधोरेखीत होतं. कारण हा प्रश्न आंतरराष्ट्रीय खचितच आहे, तरीही इथले बळी ना या राष्ट्राचे ठरतात, ना त्या. कारण समाजात आलेला दुभंगलेपणा. हा समाज असा नाहीये की, तो या मंडळींपैकी काहींना देशद्रोही ठरवून इतरांना देशप्रेमी - हुतात्मा वगैरे ठरवू शकेल, किंवा उलटेदेखील. कारण समाजच दुभंगलेला असल्यानं असा फैसला एकमुखी होऊही शकत नाही. आणि तो एकमुखी होत नसल्यानं ही कात्री स्त्रीच्या दृष्टीनं अधिक टोकदार होत जात असते.
तसे या बोलण्यात मध्ये अनेक प्रश्न होऊन गेले आहेत. स्त्री म्हणून झाले. तिचा अनुभव म्हणून झाले. काश्मिरीयत म्हणूनही झाले. काश्मिरीयत म्हटल्यावर ती उसळली होती. तिच्या लेखी तेही एक लेबल होतं. सुरक्षितपणे तयार केलेलं. व्यसनी माणसानं व्यसनाचं किंवा त्यामागील तथाकथित कारणांचं तत्त्वज्ञान करावं अशा स्वरूपातलं.
"किसे मालूम है काश्मिरीयत क्या है? क्या हो सकती है?" तिचा सवाल.
मी तिचेच उत्तर तिच्यावर टाकतो, "अमरनाथका 'मालीक'!"
"ये भी काफी नही है. काश्मिरीयत तो मजहबसेभी आगेकी चीज है. लेकीन हुआ ये है की, उसकाभी ताल्लुक मजहबसे जादा जुड गया है... जोडा गया है..."
यापलीकडं स्पष्ट बोलण्यास तिनं नकार दिला असला तरी, मला ते कळतं. काश्मीरच्या विलिनीकरणाच्या इतिहासाचे हे तसे सामान्य भारतीयाच्यादृष्टीने अपरिचित आणि काही विद्वानांसाठी अतिपरिचित मुद्दे आहेत.
तोडगा काय? अगदी अखेरचा प्रश्न.
"शांती."
काय करावं लागेल त्यासाठी?
"जोभी करना है वो करो. वहां... यहां... वैसेही छोडना है तो छोड दो. लेकीन शांती दो. बस्स शांती दो..."
तिला यापुढं बोलतं करणं शक्य नसतं. दीड तास तिला या भावनिक आंदोलनातून नेल्यानंतर ते शक्यच नसतं.
आणखी एकदा चर्चा करूया असं आम्ही ठरवतो. तिच्या, आणि माझ्याही, धावपळीत ते शक्य होत नाही.
तिला आता एक इ-मेल करावी म्हणतोय... इथल्या धावपळीतून शक्य झालं तरच... तिचं उत्तरही, कदाचित, तिच्या तिथल्या धावपळीतून शक्य झालं तरच येईल हेही ठाऊक आहे!
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 12:17 am | बिपिन कार्यकर्ते
मांडलेले बहुतेक वास्तव माहीत होते... पण आज ते असे सामोरे आले... भिडले एकदम. नुसते माहित असणे आणि असं एका प्रत्यक्ष भोगणार्या व्यक्तीकडून थेट ऐकणं यात खूप फरक आहे. तुम्ही ते थेट पोचवलं... म्हणूनच भिडलं.
कोणत्याही संघर्षात स्त्रिया आणि मुलंच होरपळतात. आजच पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन.कॉम मधे स्वातमधे स्त्रिया कशा होरपळत आहेत हे वाचत होतो.
जागतिक स्त्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!!! :(
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 6:29 pm | राघव
मोजक्या शब्दांत गडद वास्तव.
मला एकदम धोखा हा चित्रपट आठवला.. पूजा भट चे चित्रपट तसे मी बघणार नाही, पण बस ने प्रवास करताना "मरता क्या न करता" म्हणून बघीतला. पण खरं सांगायचं तर खूपच चांगला चित्रपट निघाला तो.. या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टीकोन त्यात दिसतो..
मुमुक्षु
9 Mar 2009 - 6:56 pm | सहज
लेख फारच त्रास देउन गेला.