आपल्या आयुष्यात अनेक मार्गदर्शक/शिक्षक असतात. पण थोडेच जण असे काही भक्कम असतात की कितीही झाले तरी दीपस्तंभाप्रमाने सतत ध्येयाची/मार्गाची आठवण करून देतात. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासातील एक महत्वाची व्यक्ती, ज्यामुळे माझ्या सरळ धोपट अभ्यासाला चांगला मार्ग मिळाला, ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे 'जाधव सर’.
माझ्या मोठ्या भावाची ७वी. या वयातल्या मुलांसाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे ' ७वी स्कॉलरशिप'. पप्पांनी आधीच 'जाधव सरांची' भेट घेउन अमेयाचा प्रवेश पक्का केलेला. क्लासचा पहिला दिवस अणि अमेयाला सर खूप आवडून गेले. तो मधुर शांत स्वर, मुलांना त्यांच्या वयाप्रमाने मुद्दा सोदाहरण समजावून सांगणे, चांगली अभ्यासाची पद्धत लावणे, पाठांतर, स्मरणशक्ती जोपसणे, उत्तम वाचन लेखन, उत्तम लोकांचे विचार अशा एक काय अनेक गोष्टी सांगता येतील सरंबददल!
ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी या परिक्षेची सर्वसाधारण ओळख करून देतो। ही परीक्षा म्हणजे ७वीच्या मुलांसाठी डोक्यावरून पाणी. यात फक्त ३ विषय: भाषा, गणित आणि बौद्धिक बुद्दिमत्ता चाचणी.
भाषा हा विषय मराठी,तिची सुंदरता अणि तिचे भाषा विशेष म्हणजेच वाक्यप्रचार, म्हणी आणि सामान-विरुद्ध अर्थ वगैरे वगैरे यांची परीक्षा.
यात उत्तम गुण मिळवणारा मुलगा पुढे जाउन नाव काढणार यात वादच नाही!
गणित ही फक्त 'ड गट' सोडवण्याची परीक्षा, ते पण फक्त ०.७५ मिनिटात १ गणित! यात ला.सा.वि. म.सा.वि, काळ काम वेग, द्वैराशिके-त्रैराशिके, नफा-तोटा, गुण्णोत्तर, सरळव्याज-चक्रवाढव्याज, शेकडेवारी वगैरे वगैरे सामिल होते.
बौद्धिक बुद्दिमत्ता चाचणीमध्ये कूट प्रश्न, सांख्यिक चौकोन, आकृतीतील चौरस-आयतांची संख्या मोजणे, परस्पर संबन्ध शोधणे, पुढील क्रम शोधणे, विजोड संख्या/अक्षर शोधणे, संख्या/अक्षर मनोरा, वर-खाली क्रम ठरवणे आणि त्या आधारित प्रश्नांची उत्तरे देणे वगैरे वगैरे समाविष्ट होते.
जाधव सरांचा एक पेटंट ड्रेस कोड होता तो म्हणजे पांढरा स्वच्छ धुवून इस्त्री केलेला सदरा आणी विजार. त्या शर्टाच्या खिशाला एक चकचकीत निळं शाईचं पेन. त्या पेनाने सर फक्त सही किंवा शेरा लिहित. आकडेमोड किंवा उत्तर लिहायचे असल्यास सर समोरच्याचे पेन मागुन घेत. त्यामुळे सरांच्या पेनाची मोहोर उठवून घेण्यात मुलांची चढाओढ लागे. सरांच्या वर्गात एकच नियम होता तो म्हणजे काही येत नसेल, काही करायचे नसेल तर शांत बसणे. उगीच दंगा घालून बाकीच्यांचा वेळ वाया नाही घालावयाचा! अशी मुले सरांपासुन लांब अगदी शेवटच्या बाकावर बसत. मग सरांचे लक्ष तिकडे गेल्यावर काही तरी करण्याचा आव आणत. मग सर आम्हाला अवघड गणित घालून त्यांचा समाचार घ्यायला जात. मधुनच धपाट्याचा आवाज आला की ओळखायचं चोराला शिक्षा झाली. सगळा वर्ग मग मागे वळून वळून बघायचा. पण सरांनी कधी खडू नाही मारले किंवा बाहेर नाही काढले. खूपच झाले तर ते 'चितळे मास्तरांसारखे' खांदे दाबायचे! पण हे सगळे नियम लागु व्हायचे ते फक्त मुलांना! सरांनी मुलींना शिक्षा केलेली मला तरी आठवत नाही. फारफार तर एकीची जागा बदलून मागच्या ओळीत दुसरीच्याजवळ बसवायचे!
मग काही वर्षानी मी, पप्पा आणि अमेय असे तिघे गेलो सरांकडे, माझा प्रवेश घ्यायला. मी तिथे भाषा शिकलो, गणित शिकलो, अनेक चाचणी परीक्षा दिल्या. शुद्ध मराठी म्हणजे अग्निरथ आवक-जावक नियामक ताम्र पत्रिका, ती कशाशी खातात ते कळले! खूप चांगले चांगले मित्र मिळवले। कूट प्रश्न, बौद्धिक कसरती, २ ते १९ पर्यंतच्या कसोट्या शिकलो! आजवर जे काही यश मिळवू शकलो आहे त्याच्या मूळाशी जाधव सरांनी घातलेला भक्कम पाया हेच कारण आहे.
सर शिकवायचेच खूप मनापासून. त्या शिकण्याच्या वयात अशी कोणी व्यक्ति आदर्श म्हणुन आसपास असणे हेच मोठे भाग्य! सर म्युन्सिपालटिच्या शाळेत शिक्षक आणि हेडमास्टर अशा दुहेरी जबाबदारया पार पाडत! सरांनी इतरांकडे कधीच दुर्लक्ष्य केल्याचे मला तरी आठवत नाही. ज्यावेळी सर निवडक हुशार मुलांना शाळेत आणि घरी बोलवून त्यांना विशेष प्रश्नपत्रिका सोडवायला लावत, जास्तीची तयारी म्हणुन (आजकाल यालाच स्पेशल कोचिंग क्लास असे गोंडस नाव मिळालय!); त्याचवेळी शाळेतून जी कोणी ७वीची मुले असत त्यांना पण बोलवून आमच्या सोबत पेपर सोडवण्यास देत. कारण काय तर त्यांना पण अभ्यासाची गोडी लागावी. त्यात पण अनेक चांगली मुले होती ज्यांना परिस्थितिमुळे खुप शिकणे शक्य होणार नव्हते, सर त्यांना स्वतः मदत देत.
सरांना कोणताच विषय व्यर्ज नव्हता पण सरांचा आवडता विषय होता ’गणित’. वैदिक गणिताशी ओळख झाली ती सरांमुळेच! सर तोंडी आकडेमोड अशी काही करायचे की समोरच्याने तोंडात बोटे घातली पाहिजेत! तीन तीन चार चार आकडी गुणाकार, भागाकार सर तोंडी सांगायचे! संख्येच्या वर्गाची व घनाची सोपी पद्धत सरांमुळेच कळली!
जेव्हा आम्ही सरांच्या शाळेत जात असू तेव्हा त्या जेमतेम चार-पाच खोल्यांच्या शाळेत इतर वर्ग पण चालू असायचे. मग ज्या वर्गात कमी गर्दी असेल तिथे आमचा अभ्यास चालायचा. काही वेळाने तास बदलला आणी शिक्षक येणार नसले तर सर तास घ्यायचे. त्यावेळी सर इतिहास आणि भूगोलाचे प्रश्न विचारायचे!
खूप कमी वेळेला मी सरांना विज्ञान शिकवतांना पाहिलयं. काही वेळा आम्हाला पण त्या वर्गात सामील व्ह्यायची परवानगी मिळायची, मग काय! प्रत्येक प्रश्नाला हात वर! काही काही वेळा सर शुद्धलेखन घालत. मग गणिताच्या वहीत मराठीचा धडा आणि बुद्दिमत्तेच्या वहीत भारताचा नकाशा !
थोड्या थोड्या वेळाने सर बाहेर चक्कर मारून यायचे. शाळेतून पळून जाणारी, बाहेर भटकणारी मुले आणि त्यांचे मित्र हे सरांचे मुख्य लक्ष्य! अनेकदा शेजारच्या शाळेतील उनाड मुलांना सरांनी पकडून स्वत: २ तास तरी वर्गात बसवलयं!
माझा भाऊ ७वीच्या स्कॉलरशिप मध्ये उत्तम गुणांनी चांगल्या ८व्या क्रमांकाने पास झाला. यथावकाशाने मी पण त्याच्या पावलावर पाउल ठेवून १०व्या नंबरात पास झालो. सरांना नमस्कार करायला गेल्यावर सर नेहमीप्रमाणे म्हणाले "यशस्वी भव:"
प्रतिक्रिया
7 Mar 2009 - 8:48 am | विंजिनेर
चांगली ओळख आहे. जाधव सरांचे वैयक्तिक जिवन ह्या लेखात वर्ज्य होते काय? ती ओळखही वाचायला आवडली असती
त्या निमित्ताने आठवले:
वैदिक गणिताचे इंग्रजीमधले पुरीच्या शंकराचार्यांचे पुस्तक आणि याच पुस्तकावर आधारित (सध्या रत्नागिरीला राहत असलेल्या?)दिलीप कुळकर्णींचे सोप्या मराठीतले गोष्टीत गुंफलेले पुस्तक हे शाळकरी दिवसांमधे भुरळ पाडणारे होते. सुट्ट्यांचे कित्येक दिवस पाटी पेन्सील घेउन सोडविलेली गणितं आणि सुट्टी संपली की शाळेतल्या गणिताच्या मास्तरांना अडलेल्या शंका विचारून भंडावून सोडलेले दिवस आठवले :)
अर्थात १२वी नंतरच्या अभ्यासक्रमात वैदिक गणिताचा क्वचित उपयोग होतो त्यामुळे ते मागे पडले ते पडलेच.
असो.
8 Mar 2009 - 10:45 pm | प्रमेय
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
सरांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मुद्दाम लिहिले नाही; खात्री नव्हती आणि जास्त माहितीपण!
खरतर त्यावयात एवढे लक्षात येत नव्हते हेच मूळ कारण.
7 Mar 2009 - 8:44 am | प्रकाश घाटपांडे
अरे वा सुंदर ओळख जाधव सरांची.
असे मुल घडविणारे शिक्षक असले बर वाटतं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Mar 2009 - 9:27 am | बेसनलाडू
आणखी काही अनुभव वाचायला नक्कीच आवडले असते. विशेषतः सरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल.
लेख आमच्या ४ थीच्या स्कॉलरशिपच्या बाईंची आठवण करून देऊन गेला.
(विद्यार्थी)बेसनलाडू
7 Mar 2009 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार
छान ओळख करुन दिली आहेत. सरांचा परिचय आवडून गेला.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
9 Mar 2009 - 12:07 am | सनविवि
मस्तच लिहिलंयस.
(तुझा मित्र संकेत)
9 Mar 2009 - 9:21 pm | प्रमेय
धन्यवाद!
आपल्यासारखे अजून मित्र मिळावे/येथे यावेत हीच ईच्छा!
9 Mar 2009 - 10:05 pm | चतुरंग
असे शिक्षक/शिक्षिका लाभणं म्हणजे गतजन्मीचं पुण्य असं वाटतं. आयुष्यभर न पुसले जाणारे ठसे सोडून जातात ही माणसं!
आमच्या चौथीच्या रसाळ बाईंच्या आठवणी जाग्या झाल्या!
सकाळी १०.३० ते ११.३० असा नेहेमीच्या शाळेच्या आधी एक तास त्या स्कॉलरशिपचा जास्तीचा घेत.
मराठी शिकवायच्या. एखाद्या विषयात आरपार शिरणं काय असतं ते त्यांच्याकडे बघून समजायचं.
म्हणी शिकायच्यात? ३०० म्हणी फळ्यावर स्वतः मोत्यासारख्या अक्षरात लिहून दिल्या होत्या. त्या कशा निर्माण झाल्या, अर्थ काय इत्थंभूत माहिती!
तसेच वाक्प्रचार. व्याकरण. इ.
एकाच वर्षी ओळीनं आमच्या शाळेची १४ मुलं चौथीच्या स्कॉलरशिपला जिल्ह्यात आली होती! डोळ्यात पाणी आलं होतं बाईंच्या, आनंदानं रडल्या होत्या!!
अजूनही नगरला जातो तेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवून येतो.
चतुरंग
27 Mar 2009 - 11:31 pm | Nile
अरे वा! मि हि फिरोदियाचाच आहे! (ई) भेटुन बरे वाट्ले.
जाता जाता एक कल्पना, एक ओळख धागा सुरु करायला काय हरकत आहे? मिपा वरील लोक नक्किच आपल्या कल्पकतेने धमाल आणतील!
10 Mar 2009 - 12:19 pm | यशोदेचा घनश्याम
आम्हालापण जाधव सर होते.(ते हे नव्हे... दुसरे!).
कोणते खास गणित सोडवताना म्हणायचे: "सुंSSदर गणित आहे." गणितांना सुंदर हे विशेषण त्यांच्या तोंडूनच ऐकले. :)
लेख वाचून माझ्या शिष्यवॄत्त्ति परिक्षेच्या आठवणी जाग्या झाल्या.
यशोदेचा घनश्याम
27 Mar 2009 - 3:04 am | प्रमेय
हे वाचणार्या सर्वांचे व प्रतिसाद देणार्यांना मनापासून धन्यवाद.
27 Mar 2009 - 12:04 pm | विशाल कुलकर्णी
खुप छान लिहीले आहेत. ही माणसं खरी देवमाणसं असताता. पडद्यामागे राहुन शांतपणे, निस्वार्थपणे आपलं काम करत राहतात.
मला ४ थीली स्कॉलरशिपच्या परिक्षेत आमच्या येरगुंडे गुरुजींची खुप मदत झाली होती.
इथे पाहा http://www.misalpav.com/node/6837 , सातवा नंबर मिळाला स्कॉलरशिपमध्ये, तेव्हा गुरुजींनी मला एक एअरमेलचं पेन बक्षीस म्हणुन दिलं होतं. नंतर सातवीला असताना श्री. झोपे सर म्हणुन होते, त्यांनी खुप मेहेनत घेतली होती माझ्यावर. जेव्हा स्कॉलरशिप मिळाली तेव्हा सर मला घेवुन प्रत्येक वर्गात हिंडले होते. खुप छान अनुभव होता तो. असे शिक्षक मिळणे यासाठी खरंच भाग्यच लागतं.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)