अॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही.
मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं.
तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला . किआनू रीव्ह्ज आवडता असून, John Wick प्रकरण काही झेपलं नाही. अति हिंसाचार म्हणून चित्रपट पाहणार नव्हतो. पण लय कौतुक ऐकू येऊ लागलं चित्रपटाचं. म्हणजेच रणबीर शेठच्या कामाचं. रणबीर शेठ भारी कलाकार आहेत. वादच नाही, फॅन च आपण. तिकडे दिग्दर्शकाने सांगून ठेवलेले, कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी चित्रपट नाही. कुटुंबासोबत पाहू नका.
ठीक आहे, म्हटलं पाहू तरी आहे काय. इथे होस्टेलवर रूम मध्ये एकटेच बोअर होण्यापेक्षा, तिथं जाऊन बोअर झालें तर बिघडलं काय? पाहू अंदाज घेऊन. चिखलात पण कमळ सापडतच कि. भयंकर रक्तपात पहायचा ही मनाची तयारी करून गेलो आणि बरं झालं राव झेपला picture, काही प्रसंग सोडले तर.
चॉकलेट बॉय रणबीर, ते सपासप, कापाकापी करणारा रणबीर. शेवटचा सीन, डोळयांवर हात आडवा धरत, अर्धा मुर्धा बघितला. नाही झेपत एवढा Violence. हिरो आपला तापट, पुढच्या क्षणी काय करेल नेम नसलेला, गडगंज श्रीमंत. सदोदित सिगारेटी फ़ुंकणारा. (या दिग्दर्शकाचे असलेच हिरो असतात कबीर सिंग पण तसाच) घर, हॉस्पिटल काही असो. हिरोच्या ऍक्शन च्या वेळी background ला वाजणारे भोंग्यासारखे संगीत character अजून गडद करते. हिरोचा बापावर लय जीव. आईशी फार जवळीक दाखवली नाही, बापचं सारी जिंदगी. रणबीर शेठच काम कड्क आहे. तोच picture चा जीव आहे. अवॉर्ड्स घेणार पट्ठ्या. दाढीवाला लुक भारी, मध्ये मध्ये संजुबाबा ची आठवण होते.
रश्मीका मंदाना ठीक. action packed movie मध्ये हिरोईनला किती वाव असणार. एका परीक्षण कर्त्याने तिच्या हिंदीची खिल्ली उडवलेली. असुदे. तिच्या व रणबीर मधला करावा चौथ वाला प्रसंग भारी. मस्त इमोशनल सीन. तिथंच तीला काय तो वाव मिळाला. तसंच शेवटचा अनिल कपूर व रणबीरचा पिता पुत्राचा सीन. भारी यार. लेकाची तळमळ, बापाचं प्रेम-उपरती. मस्तच. अनिल कपूर भूमिकेचा बाज राखून.
बॉबी शेठचं उत्तम काम. रानटी. दाढीवाला लुक भारी. सुरकुत्या दिसू लागल्या हो. आमच्या कॉलेजच्या दिवसातले favourite. गुप्त, सोल्जर क्या बात है! हेअर स्टाईल आम्ही कॉपी केलेली. एक मित्र त्यावरून अजूनही आठवण काढतो. रणबीर ते बॉबी पहिला कट भारी दाखवला आहे दिग्दर्शकाने. एक येडा, त्याच्याएवढा दुसरा येडा असं सुचवल्यासारखं . बॉबी च्या एन्ट्री ला इराणी गाणं आहे. कळत नाही पण ऐकायला छान वाटतं. आणि वेगळ्या संस्कृतीमधले लोक आहेत समजून येते. भाऊला एकही संवाद नाही. पण भाव चांगला खाल्ला आहे. त्याच्या बरोबर असणारा, त्याचा भाऊ सौरभ सचदेव, sacred गेम्स मधला इसा, रोल लहान आहेत पण expression भारी दिलेत.
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
कथेमध्ये twist चांगले पेरले आहेत. रंजकता टिकून राहते. साडेतीन तासाच्या picture मध्ये बोअर करणारे प्रसंग पण आहेत. जसं सुरुवातीच्या रश्मीकाच्या एन्गेजमेण्टचे, रणबीरच्या underwear वरूनचे, आजारी असतानाचे काही प्रसंग. हा मसाला चित्रपट आहे, इथं तर्काला थारा कसा असणार. तरीही गंमत वाटणारे काही, जसे कि रणबीर ला मदत करणारे पंजाबी भाऊबंद, आपल्या कामाला गुन्हेगारी न समजता कुटुंबासाठी एक करिअर समजतात कि काय. किंवा राजधानी दिल्लीतील, सर्वात टॉपच्या उद्योगपतीच्या घरी किंवा इतर दिवसा ढवळ्या इतका खून खराबा होत असताना, कुठलाही सरकारी अधिकारी दिसत नाही. CBI, पोलीस इन्स्पेक्टर राहूदे, एखादा हवालदार पण नाही. तसंच हल्ल्यामागचा सूत्रधार ही लवकर सापडत नाही.
पुढचा भाग यायचे संकेत आहेत. आता नाही थेटरात जायचो. एकेकाळी चार गुंडांशी फायटिंग करणारा हिरो ते सरळ ढळढळीत गळा कापणारा, नव्हे करा- करा गळा चिरणारा हिरो. किती हा बदल, देवा! नाही जमला हा पण सीन उघड्या डोळ्यांनी पाहायला. आम्ही कमकुवत हृदयवालेच. खरा अॅनिमल, हिरो कि व्हिलन तुम्हीच ठरावा.
वेब सिरीज आणि ओटीटी ने लोकांना वाईट सवयी लावून दिल्या. हे गरिबाचं वैयक्तिक मत. पुढच्या भागाचं नाव ऍनिमल पार्क आहे. म्हणजे जुरासिक पार्क सारखे. एक ऍनिमल पाहता पाहता पुरेवाट झाली. पुरा पार्क कोण पाहायचे. कुटुंबा समोरचे बोल्ड सीन, संवाद पाहताना वाटत होतं कि हे झेपत नाही आपल्याला. आपण outdated होत चाललो आहोत. आपल्या वेळच्या ‘सत्या’, ‘कंपनी’ इ. पातळीवरचा हिंसाचार ठीक होता. खैर तो तरी आधीच्या पिढीला आवडला असेल का? असो. नवीन पिढीला, अजून नवीन, अजून अडवान्स हवं, सगळंच!
प्रतिक्रिया
10 Dec 2023 - 3:31 pm | चौथा कोनाडा
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण !
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय !
अगदी योग्य शब्दात घेतली आहे !
13 Dec 2023 - 10:04 pm | निओ
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर !
मराठी ऐकून मलाही तसंच वाटलं होतं .
24 Dec 2023 - 12:26 pm | शशिकांत ओक
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.
11 Dec 2023 - 9:36 am | विअर्ड विक्स
परीक्षण आवडले
असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात ....
कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ...
सगळे one time watch पठडीतले ....
11 Dec 2023 - 12:54 pm | चौथा कोनाडा
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे
11 Dec 2023 - 12:56 pm | चौथा कोनाडा
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे.
आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.
13 Dec 2023 - 10:07 pm | निओ
तुम्ही म्हणताय ते खरंय ... one time watch , माल मसाला इकडून तिकडून copy केलेले
18 Dec 2023 - 3:21 pm | श्वेता व्यास
चित्रपट पाहण्याची हिम्मत नाही पण परीक्षण आवडले.
शेवटच्या परिच्छेदाशी सहमत!