"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात. तरीही याचं लिखाण संपायचं चिन्ह दिसत नाही. आता संपेल, मग संपेल असं करता करता लिखाण लांबतच रहातं. मग पुढच्या रांगेतली पुरुष मंडळी बळेच लिखाण छान आहे असा अभिप्राय देतात आणि पॉपकॉर्न घेऊन बसतात. इकडे लेखकाला 'चेव' चढलेला असतो कारण मान्यवर संपादक मंडळी डोके बडवून घेऊ शकत नसतात. त्यांना ते लिखाण वाचणे (?) भाग असतं. अखेर मिपा सभागृहातील निम्मी अधिक मंडळी यानिमित्ताने (जायचे असो वा नसो ) शांत होण्यासाठी क्रोधागारगृहाचा दौरा करून येतात. तरीही लेखक जोशातच असतो. जगाच्या अंतापर्यंत हे असेच चालू रहाणार असं फील येत असताना केव्हातरी ते रटाळ लिखाण संपलं असं वाटतं. लोकं जोरदार टाळ्या वाजवतात. या टाळ्या लिखाण थोड्या वेळासाठी का होईना संपले म्हणून असतात. पण लेखकाला वाटते आपले मौलिक विचार वाचून वाचक प्रभावित झालेले आहेत. तो पुनः "एक लिहायचं राहिलंच" असं म्हणून तो काहीतरी लेखन जिल्बी टाकतो. हेतू हा की पुनः पुढच्यावेळी कुणाचीतरी खेचायची संधी मिळावी. "हा आता परत कितीवेळ खाणार" या विचाराने लोकांच्या पोटात गोळा येतो. याला नक्की कोणी आयडी मंजूर केला होता याचा शोध सुरु होतो. सगळे संपादक पदाधिकारी ' तो मी नव्हेच' हा पवित्रा घेतात. इकडे 'जगावर सूड उगवणारी' चार दोन माणसे प्रत्येक ठिकाणी असतातच. ती 'त्या' लेखका(?)ला "भाषण छान झालं" असं सांगून इतरांच्या जखमेवर मीठ चोळतात. अथक परिश्रम करून आणि पैसा खर्च करूनही पडद्यामागेच रहाणाऱ्या आणि प्रयत्नपूर्वक देखणा कार्यक्रम करणाऱ्या मालकांच्या मेहनतीवर उपस्थितांच्या चेहऱ्यावरच्या 'कार्यक्रम रटाळ झाला' या अदृश्य भावनेने पाणी फिरते याच्याशी 'त्या' लिखाण (!) करणारास काहीच देणेघेणे नसते.
'सकसलेखनविषय सहस्त्रेषु' म्हणजे काय हे या अर्धवटरावांच्या गावीही नसते. लिखाण करताना केव्हा थांबावे हे ज्याला कळते तोच खरा लेखक असतो!
- संदेश विनास्वाक्षरी , एेच्छिक.
प्रतिक्रिया
21 Aug 2017 - 5:11 pm | ज्योति अळवणी
हा हा हा. मस्त
21 Aug 2017 - 5:29 pm | पुंबा
ठ्ठो.....
अफाट.
21 Aug 2017 - 5:35 pm | पैसा
=))
21 Aug 2017 - 6:05 pm | अमरेंद्र बाहुबली
खी खी खी! :-)
21 Aug 2017 - 7:01 pm | एस
मापं काढलीत की एकदम! :-D :-D :-D
21 Aug 2017 - 7:04 pm | प्रचेतस
=))
21 Aug 2017 - 7:10 pm | दुर्गविहारी
लय हाणलं कि मा.प. ;-). तरी काल वॉर्निंग मिळाली होती.
21 Aug 2017 - 8:27 pm | विजुभाऊ
मूळ धागा आणि त्याचे ईडंबान.... दोन्ही लैच पकावू ......
21 Aug 2017 - 8:47 pm | पिलीयन रायडर
ते तेवढं कॉपीराईट आणि ट्रेडमार्कचं जमवा की!
पण अर्थात लेखकु वाचायला फिरकतही असतील इतर धाग्यांवर असं वाटत नाही.
21 Aug 2017 - 9:06 pm | अभिजीत अवलिया
शक्य आहे. ह्या धाग्याची लिंक 'त्या' धाग्यात प्रतिक्रिया म्हणून टाकायला हवी.
21 Aug 2017 - 9:28 pm | मोदक
डन. :))
21 Aug 2017 - 8:56 pm | धर्मराजमुटके
जुने आणि जाणिते मिपाकर पण आजकाल तेच तेच चर्हाट वळून राहिलेत त्यामुळे नवीन लेखकुंना पाठींबा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.
त्यातल्या त्यात जमल्यास शालजोडीतले हाणावे असा मम मनी विचार येतो पण प्रत्यक्ष कृती करणे टाळावे लागते. न जाणो आपलाच पत्ता कट झाला तर !
कोणत्याही लेखापुढे शुन्य अभिप्राय असु नये असे व्रत म्या धरीले आहे आजकाल :)
21 Aug 2017 - 10:29 pm | मंगेश पंचाक्षरी
कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते, काही लोकांकडे ती ही नसते त्यामुळे साधं एडिट करताना भाषण शब्द राहून गेलाय एका ठिकाणी. अजून आमचे शेकडो लेख येणे आहेत ज्यावर असे काही गरीब पोट भरू शकतील. कॉपी करून का होईना, पास होत रहा.
22 Aug 2017 - 11:21 am | सतिश गावडे
हा लेख दैनिक दुष्काळच्या कोणत्या आवृत्तीत आणि किती तारखेला प्रसिद्ध झाला आहे?
22 Aug 2017 - 11:26 am | माम्लेदारचा पन्खा
विडंबनावृत्ती दि. १२.१२.२०१२ ©®™