फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला.
अमर्याद पसरलेले जंगल होते.
सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती.
मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात
इतर प्राणी जाणे टाळत असायचे.
सीमेची ही सुरवात असावी.
बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात
जनावर जातीच्या सीमा सोडून
मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली.
त्या सीमेला गुहा असे नाव पडले.
पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या
गुहेच्या अपुऱ्या सीमा
आता टोळ्यांच्या सीमा झाल्या.
त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत
ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत
सीमा प्रस्थापित झाल्या.
मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर
मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे
त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या जगातल्या कोणाला
सहजच बघता दिसले.
पृथ्वीनामक टींबावरील जीवांनी
सीमांची बंधने स्वत:ला घालून घेतली आहेत.
हे पाहून समाधानाचा श्वास सोडून ते सीमामुक्त जीव
पृथ्वीवरच्या क्षुद्र जीवांना विसरूनही गेले होते.
इकडे सिमांनी आखलेल्या पृथ्वीवर
मग अपरीहार्यपणे सुरू झाले
सिमातंटे, मारामाऱ्या, लढाया
टोळ्यांनी राज्ये स्थापन केली.
सरदार, मांडलीक, राजे, महाराजे ह्यांनी
देश प्रदेश खंड, नद्या, सागर, हिमखंड आखले.
सीमा घट्टपणे मनांवर कोरल्या गेल्या.
ह्या सीमा कमी नव्हत्या म्हणून की काय,
काळा गोरा, क्षुद्र भद्र, रंक राव,
अनेक सीमांच्या जंजाळात मानवजात गुंफ़ल्या गेली
जंगले, म्हणजे मूळची जनावरांची सीमा,
ती मानवाने ह्याआधी खुप पूर्वीच
स्व:मालकीच्या संपत्तीत सामील करुन घेतली होती.
मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर
मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे
त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या जगातल्या
त्या कोणीतरी पुन्हा एकदा
पृथ्वीनामक टींबावरील क्षुद्र जीवांनी
स्वत:ला सीमांमधे अधिकाधीक गुरफ़टून घेतलेले पाहून
समाधानाचा निश्वास सोडला होता.
वेगवेगळ्या सिमांवर स्वामीत्व गाजवणे
हे मानवसमुहांचे उद्दीष्ट बनले.
सिमांच्या जंजाळात
शक्तीप्रदर्शनाची हौस भागवल्यानंतर देखील
संतुष्ट नसलेला मानव
अंतरीक्षातील गोलकांना सीमीत करण्याची स्वप्ने पाहू लागला.
इतकेच नव्हे, तर त्रीमीती सिमा, काळाच्या सीमा देखील समजाउन
घेण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
अचानक एकदा बघता बघता
त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या दुरच्या जगातल्या त्यांना
पृथ्वीवरच्या उचापती आक्रमकांचे नवीन उद्योग दिसले.
आत्तापर्यंत आपल्या त्रीमीती सिमां मधे सीमीत असणारा मानव
खऱ्या अर्थाने सिमोल्लंघन करण्याचा विचार करू शकणार होता.
एका महाभयानक भविष्याच्या
पाऊलवाटा घालू शकणारे कार्य होते हे.
अणू रेणुंच्याही पलीकडचे अतीसुक्ष्माणू कृत्रीमपणे तयार करून
त्यांचा अभ्यास करण्याचा चंग पृथ्वीवरच्या आक्रमकांनी बांधला होता.
ह्या अणुप्रपिता कणांचे रहस्य जर उलगडल्या गेले असते
तर आतापर्यंत न ओलांडलेली अंतीम सीमा....
म्हणजे काळाची सीमा समजता येण्याची शक्यता देखील
आक्रमक मानवाच्या लक्षात आली होती.
केवळ तीन सिमांमधे बंदीस्त न रहाता
आजवर अनाघ्रात असलेल्या
इतर सीमा समजाऊन घेण्याचा साधा विचार देखील
ह्या आक्रमकांच्या मनात येण्याअगोदर
ह्यांना सीमीत करणे अती आवश्यक होते.
आजवर पृथ्वी नामक टिंबाकडे दुर्लक्ष करणारे
आता खडबडून जागे झाले.
तांतडीने उपाय करून योग्य ती कारवाई करण्यात आली.
बहुआयामी सीमांमधले ते पुन्हा सुखाने निश्च्छींत झाले.
त्यांचा धोका टळला होता.
किंवा त्यांची तशी समजूत तरी होती.
महाराष्ट्र टाईम्स मधील एक बातमी.
नुकताच जिनिव्हात सर्न या वैज्ञानिक संस्थेने बिग बँगचा प्रयोग सुरु केला असल्याचे आपल्यास माहितच आहे. सुरवातीला अतीशीत चुंबकामधे बिघाड झाल्याने प्रयोग दोन महीने स्थगीत झाला होता. हा बिघाड दूर केल्यावर प्रोटॉन कणांचा वेगवान स्त्रोत उत्पन्न करण्यात यश मिळाले होते.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार या प्रयोगात आणखी काही विघ्न उपस्थित झाले असुन प्रयोग अनिच्छीत काळासाठी पुढे ढकलला गेला आहे. नक्की काय झाले असावे याबद्दल अजून माहीती आलेली नाही.
पुर्वी शास्त्रज्ञांनी सांगीतले होते की ह्या प्रयोगात अतीसुक्ष्म कृष्णविवर जरी तयार झाले तरी ते सेकंदाच्या एक बीलीयन भाग काळासाठीच तग धरू शकेल. नुकत्याच झालेल्या नवीन बिघाडामधून असे दिसून आले आहे की सतत वाढत रहाणारे अतीसुक्ष्म कृष्णविवर तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे कृष्णविवर तयार झाले तर पृथ्वीचाच नव्हे तर सुर्यमालेचाही पूर्ण विनाश अटळ आहे.
ह्या शक्यतेचा पूर्ण अभ्यास होईपर्यंत प्रोटॉन किरणांची वेगवान टक्कर घडवण्याचा कार्यक्रम तहकूब करण्यात आला आहे. *************************************************************************************
प्रतिक्रिया
14 Oct 2008 - 10:15 am | अभिरत भिरभि-या
वेगळ्या विषयावरची सुरेख कविता !
14 Oct 2008 - 5:02 pm | विसोबा खेचर
लै भारी कविता...
14 Oct 2008 - 6:33 pm | रामदास
पण असंही वाटलं की दुसर्या एखाद्या लेखन प्रकारात या आशयाची खुमारी आणखी वाढली असती.
अरुणजी ,तुमचे लेखन मी नेहेमी वाचतो .आवडते.
14 Oct 2008 - 8:19 pm | प्राजु
रामदास यांच्याशी सहमत आहे. याची आणखी खुमारी आपण सहज वाढवू शकला असता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Oct 2008 - 6:44 am | अरुण मनोहर
रामदासजी, प्राजू, तुमचा प्रतिसाद विचार करायला लावणारा आहे. व्य. नी. पाठवला आहे.
अरुण मनोहर
15 Oct 2008 - 6:46 am | अरुण मनोहर
टेक्नीकल डीफीकल्टी मुळे हे वाक्य काढता आले नाही.