....आपल्या नव्या को-या 500CCवाल्या रॉयल एन्फील्ड्वरुन धडाडत एक वयस्क सरदारजी बॉर्डरजवळ आले. गाडीवर पाठीमागे दोन भलीमोठी भरलेली पोती बांधली होती. सीमेवरील सजग जवानांनी त्यांना हटकले, थांबवले आणि विचारले 'पीछे बोरियों मे क्या है पाजी?" "लो खुद ही देख लो जी..." म्हणत पोते खाली आदळत सरदारजी म्हणाले "अपणे मुल्क की मिट्टी है भाई, देख लो, सामणे वाली गॉव् मे भाई मकान बनवा रहे है..." जवानांनी पाहिले तो पोत्यांत खरोखरच वाळु होती..जवान बाकी कागदपत्रे व तपासण्या करुन सरदारजींना जाण्याची परवानगी देणार...तोच एकाच्या मनांत ह्या वाळुंतुन मिक्स करुन काही स्मगलिंग तर होत नसेल?? अशी शंका आली आणि त्याने सरदाराला तात्काळ थांबवुन वाळुची मेटल डिटेक्टर व अन्य उपकरणांनी तपासणी केली. मात्र त्यातही अनुचित काहीही आढळले नाही. अन्य जुजबी प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यावर आपले काम आपण चोख पार पाडले या समाधानांत चौकीवरील शिपायांनी सरदाराला जावुन दिले.
दोन/तीन दिवसानंतर पुन्हा हाच प्रकार घडला.. तोच सरदार.. वाळुची दोन पोती.. पुन्हा सर्व तपासण्या.. सीमेपार रवाना...असे सात आठ वेळा झाले.
एकदा चौकीवरील ते तरुण जवान दिवसाभराच्या वर्दीनंतर संध्याकाळी गावांतील एका धाब्यावर जेवावयास गेले.. पहातात तो आपले सरदारजीही तेथे आलेले. आता तशी ओळखही झाली होतीच,पंजाबी अघळपघळ पद्ध्तीने नमस्कार चमत्कार झाल्यानंतर रोटी/सागचा एकत्र आस्वाद घेता घेता एका जवानाला रहावले नाही आणि त्याने मनातली शंका विचारलीच.. "सच बताना पाजी, क्या वाकई मे आप किसी रिश्तेदार के घर के लिये बारबार रेंत लेके जाते हो... या ईस सॅंडमे मिलवाकर कुछ और स्मगलिंग-वग्लिंग का घफ्ला है??
यावर गडगडाटी हास्य करत सरदार म्ह्णाले.. "भाईसाहब, अब बताही देता हुं..अरे काहे की मिट्टी और काहे का मकान??..ओये..मुझे तो उस पार एक नया बुलेट पहुंचाने का 5000 मिलता है, वो भी रोकडा... कल की ट्रीप ही थी, जो मेरा पुरा लॉट मैने भेज भी दिया."…… आणि त्यानी सर्वांसाठी लस्सी मागवली.
अलिकडेच माझ्या एका जेष्ठ क्लायंट्नी कोल ईंडियाच्या समभागांची एकरकमी मोठी खरेदी केली. आता यात नवल म्हणुन जर काही असेल तर वयाने,अनुभवाने मोठे हे सद्गृहस्थ शेअरबाजाराची उत्तम माहिती असुनही बाजारांत नेमकेच काही व्यवहार करतात. त्यांच्या या अचानक केलेल्या शेअर्स खरेदीने राहुल द्रविडने कसोटीतील डावाच्या पहिल्याच चेंडुवर षटकार मारल्यास जे आश्चर्याचे भाव आपल्या मनांत उमटले असते.. तसेच काहीसे माझे झाले. त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेविषयी पुर्ण आदर असल्याने मी "काय साहेब, F.D.चा नाकासमोरील सरळ रस्ता सोडुन आज अचानक् बाजाराच्या आडवळणाला ?? काही खास कारण ??" अशी विचारणा केली तेंव्हा त्यांनी त्यांच्या खास शैलीत मला हा वरील किस्सा ऐकवला...
...."प्रसादजी, हा केवळ जोक आहे, ही सरहद्दीवरील आपल्या जवानांची चेष्टा नाही हो ..अहो, ते आहेत म्हणुन आपण आहोत.." असा खुलासा लगोलग करुन साहेब म्ह्णाले " मला सांगायचे ते हे, की अनेकदा आपल्या साचेबद्ध, झापडबंद विचारसरणीमुळे आपण काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, भांडवली बाजार म्हटले की आपल्याला लॉग टेर्म, अनिश्चितता, नुकसान, धोका.. हेच शब्द् आठवतात पण थोडा वेगळा विचार केल्यास अनेकदा सुनियोजित पद्धतीने, कॅलक्युलेटेड रिस्क घेवुन अल्पावधीतच FD, बॉन्ड्स वा अन्य अशाच पर्यांयांपेक्षा अधिक सरस परतावा मिळवता येतो....आणि मग त्यांनी त्यांची कोल ईंडियाच्या खरेदीमागची भुमिका उलगडली, ज्याला तांत्रिक भाषेंत 'Dividend Stripping' असे म्हणतात. हाच, साहेबांच्याच भाषेंत बोलायचे तर त्यांचा ‘Out of box thinking’ चा 'फंडा' मी तुम्हा वाचक मित्रांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतो..
एखाद्या कंपनीने (वा म्युच्युअल फंडाने ) नफा मिळविणे व या नफ्यापैकी काही भाग आपल्या भागधारकांना (युनिटधारकांना) लाभांश स्वरुपांत वाटणे सर्वश्रुत आहे. मात्र अशा लाभांश वाट्पाच्या कृतिमुळे सदर कंपनी वा फंडाच्या योजनेकडील पैसा हा भागधारकांकडे गेल्याने कंपनी वा फंडाची मालमत्ता अशा लाभांश व कराव्या लागणा-या अन्य अनुषंगिक खर्चांएवढ्या प्रमाणांत ( उदा. लाभांश वितरण कर, Dividend distribution Tax) कमी होते ही बाब अनेकजणांना ठावुक नसते.
बाजार मात्र अशा कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करीत नाही आणि अशा लाभांश वाट्पामुळे कमी झालेली मालमत्ता तो ताबडतोबीने जोखतो आणि हा लाभांश देउन होताक्षणी सदर शेअरची किंमत तितक्या प्रमाणांत कमी झाल्याचे बाजारांत पहायला मिळते.. म्युच्युअल फंडाच्या बाबतीत त्या योजनेचे नक्त मालमता मुल्य(NAV) कमी झाल्याचे दिसते..
असा लाभांश कोणत्या भागधारकांस/युनिट धारकांस मिळावा यासाठी कंपनी वा फंडाने एका विशिष्ट दिवसाची लक्ष्मणरेषा आखलेली असते ज्यास 'Record Date' असे म्हटले जाते. पण प्रकरण येथे संपत नाही कारण आपण विकत घेतलेले शेअर्स आपल्या नावाने नोंदीकृत व्हावे याकरिता आजही काही वेळ लागतो. समभाग हस्तांतरण ही एखाद्याने दुस-याच्या खात्यात पैसे वर्ग करावे, अशी तात्काळ वा थेट प्रक्रिया नाही. सबब आपणास 'Record Date'च्या दिवशी कंपनीच्या भागधारकांच्या यादीत आपले नाव यावे, असे वाटत असल्यास शेअर्स खरेदीचा व्यवहार थोडासा आधीच उरकावा लागतो. व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या ह्या दिवसास X-Date असे म्ह्णतात जी सामान्यपणे 'Record Date' च्या 2/3 सत्रे आधीची तारीख असते.(म्युच्युअल फंडाच्या युनिटसबाबत मात्र ही थेट प्रक्रियाच असल्याने त्यांना X-Date ही संकल्पना लागु होत नाही) थोडक्यांत आपण जर एखादा समभाग त्याच्या X-Date आधी व म्युच्युअल फंडाच्या युनिटस 'Record Date' आधी खरेदी केले, तर आणि फक्त तरच, त्या समभाग/युनिटस प्रती मिळणारे बोनस, राईटस, स्प्लिटस वा डिव्हीडंड व अन्य सर्व ऑफर्स आपल्याला मिळतात.
आता डिव्हीडंड वाटप आणि त्याचा किंमतीवर होणारा परिणाम यांची उदाहरणे पाहुया....TCS ह्या कंपनीने परवाच्या जुन महिन्यांत प्रतिशेअर 2700% म्ह्णजेच रु.27 अंतिम लाभांश वाटप केले ज्याची X-Date होती 06 जुन 2016..आधल्या दिवशी 2646.90 रुपयांवर बंद झालेला हा शेअर दुसर्या दिवशी रु.2611.35 किंवा 35.55रुपये खाली बंद झाला. आपल्या साहेबांनी घेतलेल्या कोल ईंडिया बाबत ही X-Date होती 14 मार्च 2016..प्रतिशेअर 27.40 रुपये लाभांश वाटपाचा प्रभाव लक्षांत घेता या दिवशी या शेअरने 22.20 रुपयांची घट नोंदविली. अर्थात डिव्हीडंड वाटपामुळे कमी झालेला भाव हा बरोब्बर घोषित लाभांशा एवढाच असेल असे नाही कारण शेअरच्या भावांत होणारे दैनंदीन चढ-उतारही त्यात समाविष्ट आहेतच.
कंपनी व्यवसायांतुन नफा मिळविते..तो काही प्रमाणांत भागधारकांमधे वाटते..असे वाटप केल्यानंतर कंपनीची गंगाजळी कमी होत असल्याने कंपनीच्या समभागाच्या किंमतीत ही घट प्रतिबंबित होते... येथपर्यत सारे काही कसे दुरदर्शनवरील एखाद्या रटाळ कौटुंबिक मालिकेसारखे चालु होते...लेकीन अचानक कहानी मे व्टीस्ट आ जाता है, जब 'टॅक्सेशन' नामक व्हीलन की एण्ट्री होती है..एकप्रतलीय युक्लीडियन भुमितीतील सरळ रेषा त्रिमितिय भुमितीमध्ये म्हणे सरळ राहुच शकत नाही (केवळ ऐकिव माहिती, चु.भु.द्या.घ्या.) तसेच एकदा का 'टॅक्सेशन' व्यवहारांत शिरले की सरळ गोष्ट वाकडी व्हायला वेळ लागत नाही..'वडिलांकडुन वारसहक्काने मिळालेल्या पैसे प्रथम नव-याने पत्नीला 'उसने' म्हणुन द्यावे व मिळालेल्या पैशांतुन पत्नीने उभययतांच्या अपत्याच्या नावाने गुंतवणुक करुन मिळालेला फायदा अपत्यांनी सावकाशीने वडिलांस गिफ्ट या स्वरुपांत परत करावा..... करनियोजनाची अशीच काहीशी अगम्य उदाहरणे मला देता येतीलही, पण ती ही वेळ नव्हे. मुळ मुद्द्याकडे वळतो..
घोषित केलेल्या डिव्हीडंडचे वाटप झल्यामुळे एका बाजुस शेअरच्या किंमतीत घट झाली. दुसरीकडे गुंतवणुकदाराचे खात्यांत लाभांश रोख स्वरुपांत जमा झाला, म्ह्णजेच व्यावहारिकदृष्टया त्याच्या आर्थिक/ सांम्पत्तिक स्थितीत खरेतर कोणताही निर्णायक बदल झालेला नाही.. मात्र काही चाणाक्ष मंडळी असे X-Date च्या पुर्वी, म्ह्णजेच लाभांश समाविष्ट असेल्या भावाने शेअर्स खरेदी करुन लाभांश पदरांत पाडावयाचा, आणि मग लगेच हे शेअर्स लाभांशामुळे कमी झालेल्या किंमतीला विकुन 'कागदोपत्री तोटा' झाल्याचे जाहीर करावयाचे, असा द्राविडी प्राणायाम करीत असतात.. आणि हा असा उपद्व्याप करावयाचे कारण म्ह्णजे नफ्यावर भरावा लागणारा आयकर !!!
या आयकराचा विचार करता तोटा 'दाखविणे'च फायदेशीर.. अशी स्थिती अनेकदा उद्भवते.. 20 रुपयां वरील व्यवहारांचे पावतीस 20 पैशाचा रेव्हेन्यु स्टॅंप लावणे आवश्यक असलेल्या काळांत एक व्यापारी 20रु. किंमतीची वस्तु 19.90 रुपयांस विकुन त्याचा (व ग्राहकाचाही) 10 पैसे फायदा करीत असे हे असेच एक जुने उदाहरण..
आता साहेबांनी केलेल्या कोल ईंडियाच्या खरेदीसंदर्भात ही गाणिते कशी लागु होतात पहा... समजा X-Date च्या बरोब्बर आधल्या दिवशी साहेबांनी 319.05 रुपये दराने 100 शेअर्स विकत घेतले, त्यापोटी त्यांना प्रतिशेअर 27.40रु. प्रमाणे 2,740 रु करमुक्त (Tax-Free) लाभांश मिळाला. दुसरे दिवशी त्यांनी हे शेअर्स आधी लिहिल्याप्रमाणे रु.296.85 भावाने विकले व त्यामुळे 2,220 रु. अल्पकालीन भांडवली नुकसान (Short Term Capital Loss) झाल्याचे कागदोपत्री दाखविले. महत्वाचे म्हणजे हे ‘नुकसान’ केवळ कागदोपत्री वा आभासी (notional) तर आहेच, शिवाय ते 'Good cholesterol' सारखे सकारात्मक कार्य करणारे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे कारण हे नुकसान अन्य व्यवहारांत झालेल्या एवढ्याच रकमेवरील अल्पकालीन भांडवली फायद्यावर भरावा लागणारा कर (सध्याचा दर १५%) वाचवेल, किंवा करमुक्त करेल.
थोडक्यांत साधारणतः 32,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर रु.4960 एवढे करमुक्त उत्पन्न ह्या व्यवहारात मिळविण्याचा साहेबांचा मनसुबा आहे जो परतावा कोणत्याही बेंक वा बॉड्स मधील गुंतवणुकीपेक्षा बराच जास्त आहे.
पण प्रकरण एवढे सोपे नाही...एकवेळ मारधाडीच्या हिंदी मसाला चित्रपटाच्या शेवटी पोलिसांची एंट्री चुकेल पण आर्थिक व्यवहार, त्यातही जनसामान्यांचे आणि आयकरवाल्यांचे लक्ष नाही, असे होणे कठीण..ही पळवाट लक्षांत येताच आयकर खात्याने याबाबत एक कोलदांडा घातलाच. आयकर कायद्यातील तरतुदींप्रमाणे आता 'Dividend Stripping' करुन मिळविलेला लाभांश वा दाखविलेले नुकसान हे करमुक्ततेकरिता वापरायचे झाल्यास अशी खरेदी लाभांशवाटप दिनांकाच्या किमान 03 महिने आधी अथवा विक्री 09 महिने नंतर करणे आवश्यक आहे !!!
सहाजिकच अशी गुंतवणुक अगदीच अल्पकालीन करणे शक्य नसल्याने करबचतीचे हे साधन वापरताना कंपनीचा पुर्वेतिहास, बाजारातील कामगिरी व बाजारातील अनिश्चितता यांचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तीन महिन्यानंतर आपण खरेदी केलेल्या समभागाचा भाव जर खरोखरीच खाली आला तर होणारे नुकसान हे आभासी नसुन खरेखुरे असेल याची जाणीव सदैव ठेवुन त्या दृष्टिने शक्यतो ब्ल्यु-चीप,निर्देशांकाचा भाग असलेल्या कंपनींनाच प्राधान्य द्यावे.
'Dividend Stripping' करण्यासाठी शेअर्सपेक्षाही म्युच्युअल फंडसचा वापर अधिक होतो. याचे कारण म्ह्णजे फंडास एखाद्या योजनेत होत असलेला फायदा वा त्याची कामगिरी NAV वरुन दररोज कळत असल्याने लाभांशाचा अंदाज बांधणे सोपे असते. त्याहीपेक्षा, अनेकदा फंड्स वा त्यांचे प्रतिनिधी असलेले माझ्यासारखे गुंतवणुक सल्लागारच योजनेची विक्री वाढविणेकरीता डिव्हीडंडची तारीख व प्रमाण याबद्दल खात्रीशीर आगावु माहिती अनाधिकृत पण राजरोसपणे देत असतात. अगदी अलिकडे एका गुंतवणुकदाराने माहितीच्या म्युच्युअल फंडात 140 कोटी रुपये गुंतवुन मजबुत डिव्हीडंड गटवुन वर 50 कोटींचे बंपर 'नुकसान' झाल्याचे दाखविल्याची श्री मनोज नागपाल यांनी लिहिलेली सत्यकथा जिज्ञासुंनी अवश्य वाचावी. आकडेवारी (स्त्रोत-Daily Mint) सुचविते की अप्रिल 14 ते ऑक्टोबर 15 या काळांत साधारणतः 25,000 कोटी रुपयांचा वापर या हेतुने केला गेला व 8467 कोटी रुपयांचा 'तोटा' झाल्याचे दाखविण्यांत आले, यावरुन या विषयाची व्याप्ती लक्षांत यावी. अशा मोठ्या व्यवहाराना पायबंद बसावा या हेतुने भविष्यांत लागु होणा-या General Anti Avoidance Rules (GAAR) मध्ये रु 03 कोटींवरील फायद्याच्या रक्कमेचे व्यवहार अंतर्भुत करण्यांत आले आहेत जेणेकरुन बीग शॉट्सना ही पळवाट उपलब्ध असणार नाही.
अर्थांत ‘आम्ही जर कधी बाजारांत व्यवहारच करतच नाही.तर अल्पकालीन भांडवली फायदा होणे, त्यावर कर भरणे आणि तो वाचविण्यासाठी हे सव्यापसव्य करणे याची शक्यताच नाही…’ असा आक्षेप नोंदविला जाईल याची मला कल्पना आहे. ह्या प्रकाराच्या व्यवहारांतुन झालेले आभासी नुकसान फक्त भांडवली स्वरुपाच्या फायद्यावरील कर वाचविण्यासाठीच उपयोगी आहे आणि पगार, व्याज वा अन्य उत्पन्नासाठी त्याचा वापर करता येणार नाही हे खरे असले, तरी कधीतरी विकत घेतलेल्या बॉन्ड्स वरील व्याजापोटीही असा भांडवली नफा उदभवु शकतो. दुसरे म्हणजे असे नुकसान आजच्या तारखेला न वापरल्यास पुढील आठ वर्षांपर्यंत कधीही वापरता येते. अर्थात, येत्या आठ वर्षांत भांडवली फायदा झाल्याची एकही घट्ना माझ्या बाबतीत घडणार नाही याची खात्री (वा दृढ्निश्चय??) असलेल्या सर्व वाचकांची त्यांचा वेळ वाया घालविल्याबद्दल मी क्षमा मागतो.
अगदी अश्शाच पद्ध्तीने बोनस वाटप पुर्ण झाल्यानंतरही समभागाची किंमत कमी होते आणि आपल्याला 'Bonus Stripping' चा वापर करुन कृत्रिम वा आभासी तोटा दाखवुन कर वाचवता येतो. केवळ माहिती म्हणुनच, शिफारस म्हणुन नव्हे, सांगावेसे वाटते की सघ्या हिंदुस्थान पेट्रो.(HPCL) ने बोनस जाहिर केला असुन त्याची 'Record Date' 15 सप्टेंबर आणि X-Date 14 सप्टेंबर आहे.. म्हणजेच 13 सप्टेंबपर्यंत शेअर्स घेतल्यास बोनस शेअर्स मिळतील...
आपणा सर्वाना दोन परिच्छेद आधी लिहिलेल्या GAAR च्या तरतुदी लागु होवोत अशा माझ्या शुभेच्छा आहेतच, मात्र तसे नसल्यास आपणही ''Dividend/Bonus Stripping' चा भरपुर परंतु अभ्यासपुर्वक वापर करुन अवश्य कर वाचवावा असे मी आपणास सुचवेन.
प्रतिक्रिया
17 Aug 2016 - 10:10 am | टिके
ह्या अत्यंत नवीन आणि वेगळ्या पैलूंची माहिती दिल्याबद्दल आभार !!
17 Aug 2016 - 10:51 am | मार्मिक गोडसे
सोप्या भाषेत छान माहीती. शुभेच्छा आवडल्या.
17 Aug 2016 - 11:38 am | फुंटी
छान लेख ..अजून येऊद्या..
17 Aug 2016 - 11:58 am | खाबुडकांदा
अर्थांत ‘आम्ही जर कधी बाजारांत व्यवहारच करतच नाही.तर अल्पकालीन भांडवली फायदा होणे, त्यावर कर भरणे आणि तो वाचविण्यासाठी हे सव्यापसव्य करणे याची शक्यताच नाही…’ असा आक्षेप नोंदविला जाईल याची मला कल्पना आहे. ह्या प्रकाराच्या व्यवहारांतुन झालेले आभासी नुकसान फक्त भांडवली स्वरुपाच्या फायद्यावरील कर वाचविण्यासाठीच उपयोगी आहे आणि पगार, व्याज वा अन्य उत्पन्नासाठी त्याचा वापर करता येणार नाही हे खरे असले, तरी कधीतरी विकत घेतलेल्या बॉन्ड्स वरील व्याजापोटीही असा भांडवली नफा उदभवु शकतो. दुसरे म्हणजे असे नुकसान आजच्या तारखेला न वापरल्यास पुढील आठ वर्षांपर्यंत कधीही वापरता येते. अर्थात, येत्या आठ वर्षांत भांडवली फायदा झाल्याची एकही घट्ना माझ्या बाबतीत घडणार नाही याची खात्री (वा दृढ्निश्चय??) असलेल्या सर्व वाचकांची त्यांचा वेळ वाया घालविल्याबद्दल मी क्षमा मागतो.
हा पॅरा सर्वाधिक आवडला. एकूण लेख ही छान. असेच लेखन येवूंद्या.
17 Aug 2016 - 12:03 pm | सुबोध खरे
येत्या आठ वर्षांत भांडवली फायदा झाल्याची एकही घट्ना माझ्या बाबतीत घडणार नाही याची खात्री (वा दृढ्निश्चय??)
आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो कि नाही ते माहित नाही
परंतु दुराग्रहाचा मात्र होतो -- खगोलशास्त्रज्ञ दा कृ सोमण
17 Aug 2016 - 12:04 pm | गंम्बा
भागवत साहेब - ह्या सर्वात एक शंका आहे.
कंपनी डीव्हीडंड देते तेंव्हा तिला १५% टॅक्स भरायला लागतो. म्हणजे भागधारकाला जरी २० रुपये डीव्हीडंड मिळत असला तरी कंपनीला खर्च २३ रुपये इतका होतो. म्हणजे कंपनीचे मुल्य २३ रुपयानी कमी होत असणार. शॉर्ट टर्म गेन टॅक्स पण १५ % च आहे. मग ह्या सर्व सव्यापसव्यातुन डीव्हीडंड टॅक्स चे गणित धरले तर कीती फायदा होइल?
17 Aug 2016 - 12:37 pm | शुभां म.
धन्यवाद सर अत्यंत उत्तम माहिती सहज शब्दात दिल्याबद्दल........................
असेच तुमचे मार्गदर्शन मिळावे हीच अपेक्षा............................
17 Aug 2016 - 1:31 pm | एस
फारच छान माहिती. धन्यवाद!
17 Aug 2016 - 2:40 pm | प्रसाद भागवत
आपली शंका रास्त आहे. आपण म्हणता तसा DDT चा मुळ दर हा 15% नसुन तांत्रिक भाग बघीतला तर तो 15/85=17.647 आहे. मात्र सर्वसाधारणतः सर्वाधिक दराने (30% आणि अधिक) कर भरणारे करदातेच ह्या भानगडींत पडतात असे मानले तर त्यांच्यासाठी हा व्यवहार फायद्याचाच ठरतो.. दुसरीकडे जितका DDT जास्त तेवढी किंमतीत घट जास्त आणि घट जेवढी जास्त, तेवढा आधीच्या झालेल्या नफ्यावरील सेट ऑफ जास्त..त्यामुळे ही अधिकची घट तशी तोट्याची ठरत नाही...
केवळ करमुक्त लाभांश मिळवायचा तर लाभांश मिळाल्यानंतर ०९ महिने तो समभाग विकता येत नाही..एवढे दिवस वा कायम बाजारात रहाण्याचा घोका पत्करयाचा नसेल तर ह्या मेथडने ०३ महिन्यांत कार्यभाग साधता येतो.
याशिवाय लेखांत म्हणल्याप्रमाणे अनेकदा non equity oriented schemes मध्येही असा फायदा होते जेथे STCG चा दर अधिक आहे.
17 Aug 2016 - 2:51 pm | गंम्बा
पण शॉर्ट टर्म गेन टॅक्स सर्वांना १५ टक्केच असतो ना.
17 Aug 2016 - 3:12 pm | प्रसाद भागवत
या व्यवहारांत कर वाचण्याच्या दोन बाजु आहेत.. (१) करमुक्त लाभांश मिळविणे (२) त्याचे वेळी Notional Loss दाखवुन तो Short Term Gains मध्ये वळता करुन घेणे..
म्हणजेच या व्यवहारांत एकुण वाचणारा कर (1) 30% +(2) 15% अस एकुण 45% आहे उलट भरावा लागणारा कर (DDT स्वरुपांतील) 17.647% आहे ज्याचा प्रभाव (effect) एकदाच आहे..
DDT चा विचार करमुक्त लाभांश मिळविताना होणारा सीमांत (marginal) फायदा ठरविताना केला जातो (30% -17.647% ) आणि एकदा हा व्यवहार फायद्याचा ठरतो असे लक्षात आले की मग दुसर्या भागांत पुन्हा DDT चा विचार करण्याचे कारण नाही.
जर एखाद्यास भराव्या लागणारय कराचा दर कमी असल्यास त्याचे बाबत DDT भरुन लाभांश मिळविणे फायद्याचे नसेल. म्हणुन मी तसे म्हटले आहे..
17 Aug 2016 - 4:26 pm | पगला गजोधर
आपले शेअर मार्केट संदर्भातील लेखं, नेहमीच वाचतो, कारण ते अतिशय उपयुक्त माहिती पुरवतात.
कृपया आणखी लिहीत चला.