शेअर बाजारांतील तेजी-मंदी : खेळ मनोव्यापारांचा

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
6 Feb 2014 - 9:49 pm
गाभा: 

शेअर बाजाराचे पार्‍यासारखे चंचल स्वरुप आणि त्यातील सतत हेलकावे खाणारे समभागांचे भाव, हे आपल्या सगळ्यांसाठीच एक अनाकलनीय विश्व आहे. सर्वसामान्यपणाने बाजार मुलतः मागणी-पुरवठा या तत्वावर आधारित असतो हे खरे असले तरी मग मुळांत मागणी वा पुरवठ्याच्या प्रमाणांत सारखे बदल का होतात हा प्रश्न उरतोच, आणि या प्रश्नाची अनेक उत्तरे असली तरी गुंतवणुकदारांची मानसिकता हे या घडामोडींमागील एक प्रबळ कारण आहे हे निश्चित.

बाजाराचे खरे तर स्वतःचे असे कोणतेही स्वरुप नसते वा त्याला त्याची अशी स्वतःची दिशाही नसते. कोणीसे म्हटले आहे त्या प्रमाणे The market is the sum of the total wisdom ...and the ignorance...of all of those, who deal in it. बाजाराचे उसळी घेणे वा कोसळणे ह्याला बाजाराचे दैनंदिन व्यवहारांत भाग घेणारे लक्षावधी मानवी मेंदुच कारणीभुत असतात. प्रा. डॅनियल हॉवर्ड यांनी या संदर्भांत 'टोळ्या वा झुंडींची मनोवृती-‘herd mentality' असा काहीसा उग्र् शब्द्प्रयोग केला आहे, पण अशी सामुहिक मनोवृतीच त्यांच्या मते बाजाराचे स्वरुप ठरविते.

बाजाराची दशा आणि दिशा ही प्रामुख्याने आर्थिक आणि त्याच बरोबर राजकीय, सामाजिक व इतर अशाच घटकांवर वा घडणार्‍या घटनांवर अवलंबुन असते हे नक्कीच बरोबर, पण शेवटी ह्या सर्व घटकांचे विश्लेषण करुन ते सकारात्मक आहेत की नाहीत हे ठरविणारी, नायाधिशांच्या भुमिकेत असणारी, दुसरी तिसरी कोणीही नसुन, आपल्यासारखी लक्षावधी मानवी मनेच असतात, हे आपण येथे विचारांत घेतले पाहिजे. बहुतेकदा हा सारा अपेक्षांचा खेळ असतो. म्हणजेच पहा, एखादा विद्यार्थ्यास एस.एस.सी ला 88% गुण मिळाले ---हा झाला त्याचा वास्तविक निकाल, पण पुढे तो चांगला की वाईट हे त्याच्याकडुन असलेल्या अपेक्षांवर अवलंबुन आहे. आता जर त्या विद्यार्थ्याकडुन गुणवत्ता यादी समकक्ष गुणांची अपेक्षा असेल, तर ह्या निकालाने तो निराश होईल, या उलट एखादा सर्वसामान्य विद्यार्थी अशा निकालाने कमालीचा खुष होईल.

अनेकदा आकडेवारीनुसार खुप चांगले निकाल देऊन सुद्धा बाजारात कंपनीच्या समभागाने गटांगळ्या खाणे आणि कधीकधी विक्री वा नफ्याचे सुमार आकडे जाहीर करुनही एखाद्याने बाजारांत भाव खाऊन जाणे, या मागचे तर्कशास्त्र हेच असते. या प्रकारचे मला आठवणारे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कारगिल युद्ध, सन 1999 मध्ये जेंव्हा आपली मने या युद्धाने झाकोळली होती, नेमक्या त्याच मे ते जुलै मधील कालावधीमध्ये शेअर बाजाराने जवळ्जवळ 30% ईतकी घसघशीत वाढ नोंदविली. तेजी व मंदी प्रथम बाजारांत की आधी आपल्या मनांत---- हा आधी अंडे की कोंबडी?? या कूटप्रश्नाएवढाच अवधड प्रश्न आहे. अधिक स्पष्टीकरणार्थ एक उदाहरण पाहुया-

एका शहरांत विविध खाद्यपदार्थांची अतिशय प्रसिद्ध गाडी चालविणारा एक विक्रेता असतो. (सोयीसाठी त्याला दत्ता म्हणु या) दुकान सकाळी अगदी नास्त्याच्या वेळेवर सुरु करुन दररोज संध्याकाळी उशीरा पर्यंत विविध रुचकर पदार्थ गरमागरम विकावयाचे हा त्याचा उपक्रम गेली अनेक वर्षे अव्याहतपणे चालु असतो. अंमळ उशीरा गेले तरीही ताजे, स्वच्छ आणि टेस्टी पदार्थ हमखास मिळणारच, या त्याच्या ख्यातीने दुरदुरहुन खवय्ये मंड्ळींची पाउले त्याच्या गाडीकडे निश्चिंतपणाने वळत असतात.

असेच एके दिवसाअखेरीस दत्ताचा बालपणीचा एक स्कॉलर आणि उच्चशिक्षणामुळे परदेशांत नोकरी करणारा वर्गमित्र अचानकपणे त्याच्या गाडीवर गप्पा मारण्यासाठी येतो. सुरवातीची ख्यालीखुशाली झाल्यावर गप्पांची गाडी ‘कसे काय चाललेय धंदा-पाणी ??’ या मुद्यावर येते. दिवसाच्या कारभारानंतर धंद्याच्या आवराआवरीत मग्न दत्ता पुढे लागणार्‍या सामानाच्या यादीचा विचार करत असतो नेमके तेंव्हाच, त्याचा परदेशस्थ मित्र एकीकडे पावभाजी हाणत --- विकसित राष्टांत कशी मंदी आली आहे, लोकांच्या नोकर्‍या कशा जात आहेत याचे वर्णन करतो आणि शेवटी "बघ हो, भारत काही दुर नाही या सगळ्यापासुन, ---जरा सबुरीनेच घे, उगाच जास्त माल आणुन पैसे अडकवुन बसु नकोस, येणारे दिवस खराब आहेत रे SS बाबा' असा सल्ला देतो.

झाले, आपला हुषार, शिकलेला, मोठा साहेब झालेला, मित्र सांगतोय म्हणजे त्यात नक्की काहीतरी तथ्थ्य असणार, उगीच भानगड नको, तशीही महगाईही भारीच वाढली आहे, म्हणुन दत्त्ता त्याच्या दैनंदीन गरजेपेक्षा थोडेसे कमी सामान आणु लागतो. परिणामी त्याच्या कडील पदार्थ दररोज 20/30 मिनिटे आधीच संपु लागतात. दुकान अर्धा तास आधी बंद होऊ लागल्याने उशीरा येणारा ग्राहकवर्ग दुरावतो. ग्राहकांची अशी कमी झालेली संख्या पाहुन दत्ताची 'मंदीबाईचा गाडा दारापाशी आला आहे' याची बालंबाल खात्री होते आणि अधिक सावधगिरीचा उपाय म्हणुन तो यादीतील सामानाचे वजन आणखी घटवतो.-----

अशाच तह्रेने ज्या प्रमाणे कुठेतरी क्षीण पणाने जन्माला आलेला प्रवाह पुढे जाऊन झरा ओहोळ आणि नदी बनु शकतो तसेच मनामनांत रुजलेल्या तेजी/मंदीच्या कल्पना पुढे विशाल स्वरुपात प्रकटताना दिसतात. साथीच्या रोगाप्रमाणे ही मानसिकता ही अनेकदा संसर्गजन्य असते. यातुनच बाजाराच्या भल्या-बुर्‍याला कारणीभुत अशा लोभ अथवा भीती या भावनांचा उद्रेक आणि कधेकधी अतिरेक होऊन बाजार असंतुलीत होतो पण गंम्मत म्हणजे. यातुनच बाजारात समतोल प्रस्थापित होण्याची प्रक्रिया,(जी अगोदरच्या भावनेच्या बरोब्बर विरुद्ध असते) तत्क्षणी नव्याने सुरु होते. संक्रमणाच्या या स्थितीला 'Overturn Mania' असे म्हटले जाते. ....... जहाजाच्या एका भागात अल्पसे पाणी झिरपते आहे या संशयाने प्रवासी त्या कोपर्‍यापासुन विरुद्ध दिशेस एकत्रित होऊ लागतात, मात्र काही काळाने जहाजाच्या एकाच टोकास बहुसंख्य प्रवासी जमल्याने जहाज कलंडण्याचा धोका उद्भवतो जो आधीच्या झिरपणार्‍या पाण्यापासुनच्या त्रासापेक्षा अधिक आहे याची जाणिव होऊन प्रवासी परत उलट्या दिशेने निघतात, हा या संज्ञेमागचा अर्थ आहे.

अर्थात सामान्य स्थितीत, अशा जमलेल्या गर्दीपैकी प्रत्येकाच्या परिस्थितीच्या आकलनाची, धोका पत्करण्याची पातळी व एकुणातच निर्णयक्षमता वेगवेगळी असल्याने हे दिशा वा पक्षबदल एकाच वेळी होत नाहीत. बाजारांत तेजी मंदीच्या लबकाला गती देणारे असे अक्षरशः अब्जावधी मेंदु एकाच वेळी भाग घेत असल्याने, अत्यंत अल्पकाळातही त्याच्या अशा स्वतंत्रपणे केलेल्या विचारांचा परिपाक म्हणुन मागणी/पुरवठा हे समीकरण सातत्याने बदलत रहाते, ज्याचे प्रतिबिंब भावपातळीत पडलेले दिसते.

या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातुनच सर्वकालीन महान अर्थशास्त्रज्ञ जॉन केन्स यांनी बाजारांत वावरणार्‍या अल्पकलीन गुंतवणुकदाराची तुलना वर्तमानपत्रांतील पर्याय निवड स्पर्धेमध्ये वाचकांची सर्वाधिक मते मिळविणार्‍या सौदर्यवतीस मत देऊन भेटवस्तुस पात्र होणार्‍या वाचका बरोबर केली आहे. आणि या पार्श्वभुमीवर बाजारांत यशस्वी होण्याचा एकच गुरुमंत्र सुचविला आहे , तो म्हणजे "बाकीच्यांचे अंदाज काय असतील, - याचा अचुक अंदाज बांधावयास शिका'

जाता जाता A Mathematician Plays the Stock Market या विक्रमी खपाच्या पुस्तकात लेखक श्री. जॉन पावलोस यांनी बाजारांतील तेजी-मंदीची चक्रांचा उलटफेर कसा चालु रहातो या्च विषयला अनुषंगुन दिलेले एक सुंदर उदाहरण आपणा वाचकांना संगितल्या खेरीज रहावत नाही. लेखक एका महाविद्यालयांत घेत असलेल्या अभ्यासवर्गांत प्रत्येक दिवसाअखेर एक परिक्षा होत असे. लेखकाने उत्तर पत्रिकेच्या शेवटी एक ठ्ळक चौकोन छापला आणि बाजुला दोन सुचना लिहिल्या (1) ह्या चौकोनात फुली (cross) मारल्यास विद्यार्थ्थास 10 अतिरिक्त गुण देण्यांत येतील आणि (2) महत्वाचे म्हणजे एकुण विद्यार्थ्थापैकी निम्यापेक्षा अधिक जणांनी अशी फुली करण्याचा पर्याय निवडल्यास मात्र अशा प्रत्येकाच्या गुणसंख्येतुन 10 गुण वजा करण्यांत येतील.

लेखक पुढे सांगतात -पहिल्यांच दिवशी काही जणांनी फुली मारली आणि सहजी 10 अतिरिक्त गुण मिळवले, दुसर्‍या दिवशी व नंतर फुली मारणार्‍याची संख्या वाढली. लवकरच तिने 50% ची लक्ष्मणरेषा ओलांडली आणि त्या दिवशी फुली मारणार्‍याच्या नशिबी बक्षिसाऐवजी शिक्षा आली. मग मात्र कोणीच फुली मारावयास तयार होईना, आणि मग जेव्हा कोणीच फुली मारत नाही असे सगळ्यांच्या लक्षांत आले ---- मला वाटते, पुढील गोष्टीचा 'एक चिमणी आली---दाणा घेउन गेली' हा नीरस प्रकार मी सांगावयास नको.

जागेअभावी तुर्तास इतकेच, पुढे याच विषयानुरुप अधिक समिकरणे सोडवायचा विचार आहे. पाहुया जमते का ते.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Feb 2014 - 9:55 pm | मुक्त विहारि

"पुढे याच विषयानुरुप अधिक समिकरणे सोडवायचा विचार आहे. पाहुया जमते का ते."

जमवाच जमवा. म्हणजे, अजुन लिहा.

पु.भा.प्र. (पुढील भागाच्या प्रतिक्षेत)

ज्ञानव's picture

6 Feb 2014 - 10:45 pm | ज्ञानव

जास्तीत जास्त लिहा....सोदाहरण लिहिण्याची पद्धत अप्रतिम.

लेखन आवडले...
असेच अजुन लिहा. :)

आदूबाळ's picture

6 Feb 2014 - 11:59 pm | आदूबाळ

छान लिहिलं आहे.

रँडम वॉक थियरी आणि २०१३ चा नोबेलविजेता युजीन फामाच्या कार्याबद्दलही वाचायला आवडलं असतं.

वादग्रस्त इलियट वेव्ह प्रिन्सिपलबद्दलही. (ज्ञानवजी याबद्दल सांगू शकतील असं वाटतंय.)

जेपी's picture

7 Feb 2014 - 6:23 am | जेपी

आवडल .

मारकुटे's picture

7 Feb 2014 - 9:53 am | मारकुटे

चांगला लेख.

माल लेके बैठ जावो असं सांगणार्‍या आमच्या एका मित्राची आठवण आली. हल्ली तोच बसला आहे असे कळते. असो.

सुधीर's picture

7 Feb 2014 - 3:51 pm | सुधीर

Behavioral economics वर वाचनिय पुस्तकं असतील तर नक्की सुचवा.

उपाशी बोका's picture

7 Feb 2014 - 9:45 pm | उपाशी बोका

Thinking fast and slow हे Behavioral Economics and Psychology (मानसशास्त्र) साठी अतिशय सुंदर पुस्तक आहे.
डॅनियल काह्नेमन यांचे हे पुस्तक आहे. डॉ. काह्नेमन यांना "Prospect Theory"साठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

सुधीर's picture

8 Feb 2014 - 10:13 am | सुधीर

अ‍ॅमेझॉन वर या पुस्तकाची (Thinking fast and slow) सुरुवातीची काही पानं आणि रिव्हू चाळले. इंटरेस्टींग आहे (खास करून टू सिस्टीम्स ज्यावर त्यांनी लिहिलयं). वाचायचा पुस्तकांच्या यादीत नोंद घेतली आहे. सहा महिन्यांनंतर पुस्तक कुठे मिळते ते शोधेन.

अवांतरः या लेखकाचा टेड.कॉम वर हा व्हिडीओ पाहिला होता खूप मागे आणि त्याखाली लिहिलेल्या काही प्रतिक्रियाही खूप आवडल्या होत्या.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Feb 2014 - 4:44 pm | प्रकाश घाटपांडे

लेख आवडला. शेअर बाजाराचे व्यसन लागून अनेकांच्या मेंदूचा भुगा होतो.अंदाज व वास्तव यात फूटबॉल होतो.

प्रसाद भागवत's picture

7 Feb 2014 - 5:27 pm | प्रसाद भागवत

मुक्त विहारि, ज्ञानव, मदनबाण, आदूबाळ, जेपी, मारकुटे, सुधीर आणि प्रकाश घाटपांडे - सर्वांना धन्यवाद.
@ आदूबाळ- सुरवातीला तरी तांत्रिक विष्लेष्णापेक्षा गुंतवणुक्दारांच्या मानसिकतेशी निगडीत लिखाण करावे म्हणतो. त्यामुळे ईलियट, फिबोनाकी, कॅडल्स, हॅमर ई. पासुन जरा दुर आहे मात्र randomness, exuberance, reminiscence... यावर लिहुया

@ सुधीर - प्रयत्न करतो

@ प्रकाश घाटपांडे - ओह, मला वाटले फलज्योतिष चिकित्सा मंडळाक्डॅ यावर अक्सीर ईलाज असेल.

प्रसाद भागवत's picture

7 Feb 2014 - 5:28 pm | प्रसाद भागवत

मुक्त विहारि, ज्ञानव, मदनबाण, आदूबाळ, जेपी, मारकुटे, सुधीर आणि प्रकाश घाटपांडे - सर्वांना धन्यवाद.
@ आदूबाळ- सुरवातीला तरी तांत्रिक विष्लेष्णापेक्षा गुंतवणुक्दारांच्या मानसिकतेशी निगडीत लिखाण करावे म्हणतो. त्यामुळे ईलियट, फिबोनाकी, कॅडल्स, हॅमर ई. पासुन जरा दुर आहे मात्र randomness, exuberance, reminiscence... यावर लिहुया

@ सुधीर - प्रयत्न करतो

@ प्रकाश घाटपांडे - ओह, मला वाटले फलज्योतिष चिकित्सा मंडळाक्डॅ यावर अक्सीर ईलाज असेल.

उपाशी बोका's picture

7 Feb 2014 - 9:50 pm | उपाशी बोका

खूप छान लेख लिहिला आहे.

विअर्ड विक्स's picture

7 Feb 2014 - 11:22 pm | विअर्ड विक्स

लेख आवडला ......
पुलेशु

उपास's picture

8 Feb 2014 - 12:37 am | उपास

उदाहरणे आणि समजवायची हातोटी उत्तम!
सद्ध्या जिओपार्डी ह्या टीव्हीवरील खेळामध्ये गेम थिअरीचा वापर करुन पैसे कमवणार्‍याची चांगलीच चर्चा सुरू आहे माध्यमांत.. :)

जेपी's picture

8 Feb 2014 - 7:07 am | जेपी

शेअर बाजार वर आधारीत एक व्ह्रच्युअल गेम साईट आहे .
www.moneybhai.com
खेळुन बघा .

खुप मोठ्ठा आणि महत्वाचा विषय घेतलाय. चांगला प्रयत्न आहे, काहीतरी नवीन माहिती मिळेल अशी आशा बाळगतो. महत्त्वाचे म्हणजे काही भल्या बुऱ्या पद्धती(प्रघात)वरही लिहा, ज्यातून सर्वांचे प्रबोधन घडेल.
धन्यवाद.

मोहन's picture

8 Feb 2014 - 12:48 pm | मोहन

+१
पुढचा भाग लवकर येवू द्या.