शेअरबाजार: 'Brexit'....बेगाने डायव्होर्स से अब्दुल्ला परेशान ??

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
29 Jun 2016 - 8:14 am
गाभा: 

इतके दिवस माझा आणि कदाचित माझ्यासारख्या ब-याच जणांचा 'EXIT' शी संबंध होता तो थिएटर्स मधील दरवाज्यांवरील लाल अक्षरांत लिहिलेला एक शब्द म्हणुन.... मात्र गेले 03/04 दिवसांत ‘BREXIT’ या त्याच्या नव्या ‘डेंजर’ भावंडाने सगळीकडे धुमाकुळ घातलाय. पार BBC, CNN पासुन ते नवग्रह यंत्राची प्रतिष्ठापना, वास्तुशास्त्र, आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस... असे विषय बातम्या म्हणुन कव्हर करणा-या सगळ्या चॅनेल्सनीही या विषयाला वाहुन घेतले आहे. हे ‘Brexit’ नामक प्रकरण काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतील या विषयावर चर्चा झडु लागल्या असुन त्यातुन माझ्या काही जाणकार मित्रांनी यामुळे '(ब्रिटिश पौंड घसरल्यामुळे) विंबल्डनची बक्षीसाची रक्कम 10% कमी झाल्याने नोवाक,राफेल, रॉजर सारखी मंडळी नाराज होतील'..., 'जेम्स बॉडला आता पासपोर्ट्च्या रांगेत उभे रहावे लागेल'… ‘ईंग्लीश भाषेंतुन आता E व U हे स्वर कमी होवुन फक्त तीनच स्वर रहाणार..’ अशी विधाने सोशल मिडियांतुन सार्वत्रिक करुन करुन या विषयाचे सामाजिक, आर्थिक, राजकिय पैलु नजरेस आणुन दिले. पण त्यातही माझ्या एका जवळच्या मित्राने जेंव्हा मला कबुली दिली की 'Brexit' हे एक बिस्कीट असावे असा त्याचा समज होता…, तेंव्हा माझी खात्री पटली की या विषयावर अजुनही काही विवेचन आवश्यक आहे….

मग धीर करुन मला शेअरबाजार या विषयांतीलच अत्यल्प माहिती असल्याने मी त्याबद्दल न बोलता मागे का रहावे ?? हा विचार करुन फक्त या विषयावरील मर्यादित दृष्टिकोन मांडावयाचे ठरवले आहे..

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर त्याच्या परिणामांची जाणिव सर्वांनाच होवु लागली होती.. युरोपमध्येही लोकशाहीचे आणि पुर्ननिर्माणाचे वारे वहात होते. तेथील डझनावारी लहान लहान देश अगदी एकमेकांना खेटुन आहेत अशी भौगोलिक स्थिती, आणि प्रत्येकालाच असलेली कामगार, भांडवल, तंत्रज्ञानाची मोठी निकड… शिवाय भविष्यांत राजकीय वा अर्थिक ताकद वाढविणे.. अशा अनेक कारणांनी ह्या राष्ट्रांनी एकजुट करावयाचे ठरवुन करुन त्यातून युरोपियन महासंघाची (EU) निर्मिती झाली.

ह्या महासंघाचे वर्णन करावयाचे म्ह्णजे आपल्याकडील राजकारणांत अस्तित्वात असलेल्या आघाड्यांच्या कडबोळ्याचे उदाहरण अगदी फिट्ट बसेल..आधी एकमेकांबद्दल अविश्वास, कटुता ..पण मग आवश्यकतेनुसार आघाडी.. त्यात अनेक उप आघाड्या, गट उपगट, प्रत्येकाचे स्वतःचे असे काहीतरी वेगळे अस्तित्व पण पुन्हा एक किमान सामायिक कार्यक्रम (Minimum Comman Programme)...येथेही तसेच होते..एकच चलन असणारे, एकच व्हीसा असणारे, फक्त आयात निर्यातीसारखे आर्थिक धोरणापुरतेच एकत्र..असे एक ना अनेक त-हेचे घटक यात होते.. ब्रिटनची (UK) गोष्ट आणखीनच वेगळी होती, तो युरोपियन युनियन मध्ये होता परंतु युरोग्रुप व शेंजेन ग्रुपमध्ये नव्हता ...

पन्नाशी/साठीच्या दशकांत उदयांस आलेल्या ह्या महासंघाने सुरवातीच्या काळांत चांगलीच प्रगती केली. सभासद राष्ट्रांमधील आर्थिक, करविषयक कामगार, वाहतुक व दळणवळण या बाबत धोरणे आखुन सुसुत्रता आणली.

मात्र कालांतराने प्रत्येक देशाचा आकार स्ंस्कृती, अर्थकारण, समस्या ह्या वेगवेगळ्या असल्याने उपलब्ध साधनसामुग्रीचे वितरण, स्त्रोत्रांचे वाटप यावरुन कुरबुरी सुरु झाल्या. काही विकसीत देशांना त्यांच्या प्रगतीवर अन्य कमकुवत सदस्यांमुळे मर्यादा येतात असे वाटु लागले, दरम्यान सन 2008 मधील मंदीनंतर EU ची कामगिरी अमेरिका वा अन्य मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेने निराशजनक होती. युरोपिय मध्यवर्ती बेंक ही या कालावधीत व्याजदर् विषयक परिणामकारक निर्णय घेवु शकली नाही. त्यातुनच हा महासंघ म्हणजे एक आवळ्या भोपळ्याची मोट आहे…, ग्रीससारख्या राष्ट्रांच्या दिवाळखोर धोरणांना सांभाळत आपण बाकीच्यांना किती दिवस पोसायचे??... ही भावना अधिकच ठळक केली. थोडक्यांत आपल्याकडील एकत्र कुटुंबपद्धतीत एखाद्या स्वयंपुर्ण, कमावत्या मुलाला अन्य भावंडांबद्दल वाटते तसेच येथेही होवु लागले...

युरोपियन महासंघातील सद्स्य राष्टांमध्ये एका देशांतुन दुसरीकडे मुक्त प्रवेश आहे, यातुन वैध वा अवैध मार्गाने ब्रिटन सारख्या राष्ट्राकडे मोठ्या प्रमाणांत निर्वासित जावु लागले. यामुळे प्रचंड परंपरावादी व स्ंस्कृतीप्रिय असलेले ब्रिटिश, त्यातही जेष्ठ मंडळी, नाराज झाली होती. या सगळ्याचा प्रचंड उहापोह झाल्यानंतर या प्रश्नावर ब्रिटिश पंतप्रधान श्री. कॅमेरुन यांनी निवडणुकपुर्व दिलेल्या आश्वासनास जागुन तेथे सार्वमत घेतले आणि त्या सार्वमतात जनतेने 'ब्रिटनने युरोपिय महासंघातुन बाहेर पडावे' असा ऐतिहासिक निर्णय दिला... ज्याचा उल्लेख माझ्यासारखे सगळे हौशे नवशे गवशेही ‘Brexit’ असा करतात.

ही घोषणा होताच जगभरांतील बाजार शेअरबाजार, करन्सी बाजार, वस्तु विनिमय..सगळेच गडगडले.. मात्र भावनेच्या आहारी जावुन गुंतवणुकीविषयी काहीतरी बरा वाईट निर्णय घेण्यापुर्वी आपण पुढील मुद्दे विचारात घ्यावेत, असे मला आवर्जुन सांगावयाचे आहे.

(1) EU मधुन बाहेर पडण्याचा UK चा निर्णय म्हणजे एका दुकानांतुन शर्ट पसंत नाही म्हणुन बाहेर पडण्याइतका चट मंगनी.. प्रकारचा व्यवहार थोडाच आहे ?? हा अंमलात यायला ह्या सार्वमताला ब्रिटिश संसदेची मान्यता मिळाल्यानंतर किमान दोन वर्षांची पुर्वसुचना एवढा अवधी लागेलच लागेल. त्यानंतर तो अंमलात येईल. समजा तो दोन/अडीच वर्षांनी अगदी अमलात आलाही.....याचा अर्थ असा नाही की सध्या त्या उपखंडांतुन व्यापार करणा-या आपल्या कंपन्या उदा (टाटा समुह, मदरसन वा इन्फोसिस ई) चा व्यवसाय पुर्णपणे बंद होईल. जास्तीत जास्त तो काही प्रमाण घटेल.. पण उत्तम कंपन्या यावर काहीतरी मार्ग काढणारच असे मानावयास काय हरकत आहे?? याचाच अर्थ हा की या कंपन्याच्या नफा वा उत्पन्न मिळविण्याच्या ‘आजच्या’ क्षमतेवर लगेच काहीही परिणाम होणार नाही..या पार्श्वभुमीवर एका दिवसांत जवळपास 02 लाख कोटींच्या बाजारमुल्याचे (capitalization) नुकसान ही एक आततायी प्रतिक्रिया आहे असे मला वाटते.

(2) माझ्या आकलनानुसार हा जनमतसंग्रह होण्याआधी 8/10 दिवसांतील कल (poll) हे जरी Remains ची शक्यता अधिक असल्याचे वर्तवित होते तेंव्हाही बाहेर पडण्याची शक्यता कायमच 40% वा आसपास होती.. याचाच अर्थ हा अगदीच एकतर्फी वा अनपेक्षित निर्णय आहे आहे असे नव्हे. या निर्णयानंतर आजही ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर द्विधा आहे. असे जनमतसंग्रह घेणे ही तेथील संस्कृती आहे मात्र या माध्यमांतुन मिळालेले अशाच महत्वपुर्ण विषयांवरील कौल संसदेने अमान्य केल्याच्याही घट्ना सागता येतात. दरम्यान हे लिखाण करीत असतानाच ब्रिटनमधील ३० लाख लोकांनी स्वाक्षरीसह एक याचिका काढली असून त्यात ब्रेग्झिटचे जनमत दुसऱ्यांदा घेण्याचे आवाहन केले आहे असे कळते. या याचिकेवर आता त्यावर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थात या, EU मधुन बाहेर पडण्याचा निर्णयाबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता नगण्य आहे असेच माझे मत आहे मात्र EU बरोबर होणा-या 'वाटाघाटी' हा भाग महत्वपुर्ण ठरेल व यांतुन काही सुवर्णमध्य वा सकारात्मक तडजोड निघु शकेल...

(३) अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आपली अर्थव्यवस्था वा बाजार यांवरील असलेला पगडा हा युरोपियन अर्थव्यवस्थांच्या तुलनेने जास्त आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेवरील 2008/9 मधील संकटामुळे जागतिक झालेली मंदीची समस्या किंवा 2001 मधील ट्वीन टॉवर्स वरील हल्ला ह्या घटनांमुळे निर्माण झालेले संकट आजच्या प्रश्नापेक्षा अधिक तीव्र होते असे मला वाटते. एवढेच काय सन 1997/1999 दरम्यानचे आधी पुर्व आशियाई देशांतील अर्थसंकट, मग लगोलग रशियाला त्यांचे राष्ट्रीय कर्ज फेडण्यात आलेले अपयश, अमेरिका-ईराक संघर्ष, आणि अलिकडेच उद्भवलेला ग्रीसच्या दिवाळ्खोरीचा प्रश्न... असे 'आता काही खरं नाही...' प्रकारातील बागुलबोवा मी स्वतः अनुभवले आहेत. आपण आपली अर्थव्यवस्था आणि अर्थातच बाजार त्या अडचणींतुनही कसा काय सहीसलामत बाहेर पडला हे या प्रसंगी पहाणे धीर देणारे ठरेल. आपल्या राष्ट्रीय उत्पादनापैकी जवळजवळ 65/70% उत्पादन हे देशांतर्गत गरजा भागविण्यातच खर्च होते हे या मागचे खरे ईंगित आहे.

(4) या Brexit बाबतच्या घटनेमुळे वस्तु धातु बाजारांत, विषेषतः तेल व औद्योगिक उपयोगाचे धातु, यांच्या किंमतीत येवु घातलेली तेजी काही काळ थांबेल, ज्याचा आपल्या उद्योगांना फायदाच होईल. याशिवाय येवु घातलेले नवीन RBI गव्हर्नर व्याजदरांत कपात करण्याची शक्यता अधिक आहे, शिवाय मान्सुन व GST यासरखे मुद्दे ही बाजारांत उत्साही वातावरण आणु शकतात.

अर्थात Brexit ही एखादी सहजी दुर्लक्ष करण्यासारखी घट्ना आहे किंवा त्याचे काहीच आर्थिक दुष्परिणाम नाहीत असे मी कधीही म्ह्णणार नाही. ती निश्चितच एक ऐतिहासिक घटना आहे ज्याचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दुरगामी परिणाम होतील. आर्थिक संदर्भांत बोलावयाचे तर EU आणि UK ह्या दोघांच्या राष्ट्रीय उत्पन्नांत घट होईल जी एक नकारात्मक बाब आहे. या दोन्ही समुहांच्या चलनांची किंमत घसरेल. त्यामुळे या समुहांकडुन केली जाणारी निर्यात स्वस्त झाल्याने (कमी दराचे त्यांचे चलन उत्पादनासाठी वापरुन तुलनेने महाग चलन किंमत म्हणुन मिळवित असल्याने) ती रोखण्यासाठी अन्य देशही आपल्या चलनाचे अवमुल्यन करण्याची शक्यता निर्माण होईल ज्यातुन चलनविषयक अस्थेर्य वाढेल. येथे त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्ह्णजे आपल्याकडे सध्या परकीय चलनाचा साथा पुरेसा आहे. तरीही या असुरक्षित वातावरणांत जागतिक गंतवणुदार भारतासारख्या उदयोन्मुख (immerging) बाजारांतील गुंतवणुकीबाबत आखडता हात घेण्याचीही शक्यता आहे.

ह्या सगळ्याची गोळाबेरीज पहाता Brexit हा मुद्दा ज्याने प्राणहानी व्हावी असा वर्मी बसलेला घाव नसुन फारफार तर एक मोठा ओरखडा असु शकेल. या मुद्द्यावरुन आपल्या बाजारांतील पडझड ही बाजारावर सतत राज्य करणा-या भीती (Fear) व लोभ (Greed) या पैकी भीतीची पकड अधीक तीव्र असते या निष्कर्षाची प्रचिती असावी.

सहाजिकच आपल्या बाजाराच्या या घटनेवरील प्रतिक्रियेचे वर्णन 'बेगाने तलाक से अब्दुल्ला....' असेच करावयास हवे. - प्रसाद भागवत

प्रतिक्रिया

माहितीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद :)

प्रमोद देर्देकर's picture

29 Jun 2016 - 8:56 am | प्रमोद देर्देकर

मस्त लेख. अजुन काही जाणकारांच्या प्रतिक्षेत विषेशत: गॅरी ट्रुमन यांच्या.

सतिश गावडे's picture

29 Jun 2016 - 9:16 am | सतिश गावडे

मस्त खुसखुशीत आणि तरीही ब्रेग्झिटची भानगड नेमकेपणाने समजावणारा माहितीपुर्ण लेख.

राजाभाउ's picture

29 Jun 2016 - 9:49 am | राजाभाउ

+१
अगदी असेच म्हणतो सर.

खेडूत's picture

29 Jun 2016 - 10:28 am | खेडूत

१११
खरंय....!

पगला गजोधर's picture

29 Jun 2016 - 5:56 pm | पगला गजोधर

पार BBC, CNN पासुन ते नवग्रह यंत्राची प्रतिष्ठापना, वास्तुशास्त्र, आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस... असे विषय बातम्या म्हणुन कव्हर करणा-या सगळ्या चॅनेल्सचे, ‘BREXIT’ ची, आपल्या बाजारावर होणाऱ्या संभाव्य प्रतिक्रियेचे वर्णन, ....बेगाने डायव्होर्स से अब्दुल्ला परेशान", असेच करावयास हवे.

+१०००००
प्रसादजी छान लेखं ...

भंकस बाबा's picture

29 Jun 2016 - 11:07 pm | भंकस बाबा

तरिही प्रसादजी आपल्या आयटी, मोटार उद्योग यांना या बाबीचा चांगलाच दूरगामी फटका बसणार आहे. Eu आणि uk यातून काहीतरी सुवर्णमध्य काढतील या विधानाशी 100% सहमत.
शिवाय यात बसलेली पाचर म्हणजे स्कॉटलैंडचे eu मधे रहाण्याचे मत, हां मुद्दा पुढे कळीचा ठरू शकतो.

बोका-ए-आझम's picture

30 Jun 2016 - 12:04 am | बोका-ए-आझम

अवमूल्यनामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी ब्रिटिश शिक्षण स्वस्त होऊ शकेल कदाचित, पण पुढे नोकरी मिळवणं कठीण होणार आहे.