शेअरबाजारः तळनिश्चिती (Bottom Formation ) ओळखण्याचे काही आडाखे

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
27 Aug 2015 - 1:48 pm
गाभा: 

'नदीचे मुळ आणि संन्यासाचे कुळ कधी शोधु नये'.... ही म्हण अर्थातच पुराणकालीन असावी, नाहीतर कालानुरुप मला त्यात 'नदीचे मुळ, संन्यासाचे कुळ आणि बाजाराचा तळ' अशी भर टाकायला आवडली असती. पुराणांतील कथापात्रे जशी कधी सुक्ष्म तर पळभरांत विराट रुप धारण करु शकतात,निमिषार्धात एका रुपांतुन दुसर्याव रुपांत जातात....बाजाराचे ही तसेच आहे, मुळात बाजाराच्या अंगी हजार हत्तींचे बळ असते आणि वर क्षणार्धात रुप बदलण्याची क्षमता, यामुळे त्याच्या हालचाली ह्या सर्वसामान्यांच्या कल्पनेपेक्षा वेगवान आणि अतर्क्य असतात आणि पुन्हा एकदा पुराणांतील उदाहरण द्यावयाचे तर बाजारांत नव्याने आलेल्या सामान्य गुंतवणुकदाराची अवस्था ही मयसभेत प्रवेश केलेल्या द्रौपदी सारखी होते, जेथे पाणी म्हणुन वाटते तेथे जमीन असते आणि जमीन भासते तेथे पाणी... तसे मंदी म्हणुन काही करावयास जावे तर बाजार तेजीची चिन्हे दाखवावयास लागतो आणि तेजी आहे असे मानुन काही उद्योग करावा तर लगेचच मंदी सुरु होवुन प्रकरण अंगलट येते.. बाजारात वारंवार उद्भवणार्याौ तेजी मंदीच्या लाटा अनेकदा पाहुनही तेजी संपुन मंदी नकी केंव्हा सुरु होईल(वा उलट..)याचा अंदाज बांधताना भल्याभल्यांच्या नाकातोडात पाणी गेल्याचे पहावयास मिळाले आहे.

अशा अनेक अनुभवाअंती शेवटी 'बाजाराच्या उतरणीने (वा मंदीने) तळ गाठला किंवा तेजीने शिखर गाठले हे कसे ओळखावे??' या कुट प्रश्नाच्या उत्तरार्थ एक 'सोपा' सल्ला या तथाकथित तज्ज्ञ मंडळींनी दिला आहे................... 'अशा तेजीमंदीच्या फेर्यांलचा अचुक तळ वा शिखर शोधण्याचा कधीही प्रयत्न करु नका' हाच तो मौलिक सल्ला. दुरदर्शनवरील एका सुप्रसिध्द मालिकेतील एक सहाय्यक आपल्या वरिष्ठाकडे पाहुन म्हणतो "सर,लगता है,ये जिंदा नही है" त्यावर ते वरिष्ठ अधिकारी चेहरा थोडा गंभीर, विचारमग्न करुन काही वेळाने म्हणतात "ओ हो, इसका मतलब है, ये मर गया है"... वाचकांना वरील तज्ज्ञ सल्ला याच तोडीच्या निरर्थकपणाचा वाटणार याची मला खात्री आहे.

ज्याप्रमाणे आपल्याला फायदा होण्याची शक्यता जवळजवळ शुन्य आहे असे माहित असुनही केवळ भाबड्या आशेपोटी आपल्यातला प्रत्येकजण आयुष्यांत एकदातरी लॉटरीचे तिकिट विकत घेतोच, तसेच बाजारातील घसरणीनंतर त्याचा तळ किंवा निच्चांक शोधुन नेमक्या त्याच बिंदुला खरेदी करण्याच्या मोहापासुन कोणी क्वचितच स्वतःला परावृत्त करु शकले असेल. या अशा अनेक चाचपण्यांतुन अथवा शोध मोहिमांतुन समुद्रमंथनातुन मिळालेल्या रत्नांप्रमाणेच काही आडाखे गुंतवणुकदारांना मिळाले आहेत, अशाच माझ्या पहाण्यांतील काही उपयुक्त संकेतांचा काहीं वेध घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे. चला,नमनालाच घडाभर तेल नको. मुद्द्यांकडे वळतो-

सर्वसामान्यतः बाजारात खरेदी व विक्रेचे प्रमाण हे तोडीस तोड किंवा संतुलीत असणे आवश्यक असते मात्र अनेकवेळा तेजीच्या आवेगाने वा विक्रिच्या तडाख्याने बाजार प्रमाणाबाहेर एका विषिष्ट बाजुस झुकतो. मंदीच्या आवर्तनांत बेसुमार विक्री झाल्याने तो एकाहुन एक खालच्या भावपातळ्या दाखवु लागतो व लवकरच Oversold स्थितीत पोहोचतो. ज्या प्रमाणे वातावरणांत एखादे ठिकाणी 'कमी दाबाचा पट्टा' निर्माण झाला की तेथील हे असंतुलन भरुन काढण्यासाठी आजुबाजुला असलेले ढग साचु लागुन पाउस पडण्याची स्थिती बनते, तसेच बाजाराच्या अशा Oversold स्थितीकडे खरेदीदार आकर्षित होतात व भाव वाढु लागतात... सबब Oversold स्थिती ओळखणे ही तळनिश्चिती शोधण्याची पहिली पायरी आहे.

तांत्रिक विष्लेष्कांचा अशी Oversold (किंवा Overbought) स्थिती ओळ्खण्याचा सर्वाधिक परिचित असा निर्देशांक(Indicator) आहे तो म्हणजे 'RSI' (Relative Strength Index). हा निर्देशांक समभागाच्या मागील (उदा. 14 दिवसांच्या) भावाच्या तुलनेत सध्याच्या वाढीचा/घटीचा वेग गुणोत्तर स्वरुपांत सांगतो. हे गुणोत्तर 70% पेक्षा अधिक असल्यास समभाग Overbought आणि 30% कमी असल्यास तो Oversold आहे असे मानण्यांत येते.

माझा एक अतिशय निष्णात विष्लेषक मित्र निफ्टीची Oversold स्थिती ओळखण्यासाठी त्यातील अंतर्भुत 50 समभागांची स्थिती तपासतो. दिवसअखेर तो या 50 समभागांची 42 दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक भाव असणारे(A) व या सरासरीपेक्षा कमी भाव असणारे(B) अशा दोन भागांत विभागणी करतो.(A)मधील कंपन्यांच्या संख्येतुन(B) यादीतील संख्या वजा केल्यास मिळणारे उत्तर जेंव्हा -30 पेक्षा अधीक असते म्हणजेच निफ्टीमधील अंतर्भुत 50 समभागांपैकी किमान 40 समभाग त्यांच्या गेल्या 42 दिवसांच्या सरासरीच्या खाली जातात, ही निफ्टीची Oversold वा खरेदीयोग्य स्थिती समजण्यांत येते.(कोणत्याही समभागाची अशी विषिष्ट दिवसांची दैनंदिन सरासरी, वा RSI गुणोत्तर अनेक आर्थिक विषयांवरील साईटसवर उपलब्ध आहे.) बाब मित्राच्या वैयक्तीक व्यावसायिक कौशल्याशी निगडित असल्याने मी या पद्धतीविषयी खाचखोचांसह, सविस्तर लिहिणार नाही, मात्र ही एक अत्यंत परिणामकारक पद्ध्त आहे, हे मी स्वानुभवावरुन सांगतो.

जपानी लोकांनी अनेक शतकांपुर्वी बाजाराचा भविष्यकालीन वेध घेण्यासाठी शोधलेले 'कॅडलस्टीक्स'(Candlesticks) चे तंत्र आजही या विषयांतील एक सर्वाधिक लोकप्रिय तंत्र आहे. दिवसाभरांतील (१)उघड्ताना, (२)बंद होताना,(३) सर्वोच्च व (४)निच्चांकी या चार भावपातळ्यांच्या आधारे बनलेल्या कांड्यामधील('कॅडल्स) काही विषिष्ट आकृतीबंधांच्या आधारे या तंत्रात बाजाराविषयीचे भविष्यकालीन निष्कर्ष काढले जातात.जसे हस्तरेषा सामुद्रिकानुसार हातावर सुर्य,शंखादी चिन्हे आढळल्यास त्या व्यक्तीच्या नशीबी 'राजयोग' असतो असे म्हणतात ना, काहीसे त्याप्रमाणेच.
या आकृतीबंधांना 'क्रोज,सोल्जर्स,हॅमर,स्टार...'अशी लक्षवेधक नावेही आहेत मात्र खोलांत न जाता आता आपल्या पाणबुड्याच्या भुमिकेत (तळ शोधण्याच्या) उपयुक्त अशा 'डोजी' या प्रकाराचाच आढावा आपण घेणार आहोत.

या जपानी 'Candlesticks' तंत्राप्रमाणे जेंव्हा आलेखावर (charts) (1) प्रथम एका दिवशी मोठी घसरण होवुन बाजार दिवसातल्या निच्चांकाजवळ बंद होतो(Black Candle) (2)पुढच्याच दिवशी बाजार दिवसभरांत खालच्या वा वरच्या दिशेने मोठ्या हालचाली करतो मात्र बंद होताना सकाळी उघडलेल्या भावपातळीच्या जवळपासच बंद होतो(Doji Candle) (3) आणि पुढच्याच म्हणजे तिस-या दिवशी बाजार आधल्या दिवशीच्या सर्वाधिक भावापेक्षाही वर (Gap up) उघडतो, व दिवसभर तेजीत राहुन आणखी वर बंद होतो(White Candle)...या स्थितीस 'Morning Star Doji' असे म्हणतात.

(1)मंदीच्या भावनेने बाजारात वेग घेतल्यानंतर बाजार वेगाने खाली येवु लागतो, तेजीवाल्यांचा प्रतिकार पुर्ण मोडुन तो दिवसाअखेर मोठी घट दाखवत बंद होतो... (2)मात्र या मंदीचाही जेंव्हा अतिरेक झाल्याचे जाणवते आणि आता यापेक्षा बाजार खाली जाणे अवघड आहे अशी भावना बळावते तेंव्हा आधी मंदीच्या कळपांत असलेले भिडु आपली बाजु बदलायला सुरवात करतात आणि दुसर्या दिवशी तेजी/मंदवाल्यांच्यात निकराची रस्सीखेच होवुन दिवसाच्या सुरवातीचा व बंद होतानाची भावपातळी सारखीच रहाते... याचाच अर्थ आता विक्रीचा जोर मंदावला असा घेतला जातो. (3) बाजारात 'पळा पळा, कोण पुढे पळे तो..' ही नेहमीचीच गोष्ट आहे. मंदीवाले कमकुवत होत आहेत हे पाहुन अनेक जण आपली बाजु बदलतात आणि तिसर्या दिवशी बाजार पुर्णपणे तेजीवाल्यांच्या कह्ह्यात जातो. असे या आकृतीबंधाचे ढोबळ्मानाने आकलन आहे. अभ्यासुंनी अधिक माहितीकरिता Candlestick Charting Explained हे श्रीमान ग्रेग मॉरिस (Greg Morris) यांचे पुस्तक तपासावे.

व्यावहारिक दृष्ट्या बोलावयाचे तर गेल्या चार पाच महिन्यात दोन वेळा निफ्टी आजच्याच,म्हणजे 8000च्या जवळ आला असता दोन्हीही वेळा हीच 'Morning Star Doji' ची स्थिती आलेखावर पहायला मिळाली व तेथुन निर्देशांकाने परत तेजीचा मार्ग अवलंबला आहे.

श्री, मार्क फिशर यांनी लिहीलेल्या 'दी लॉजिकल ट्रेडर' या पुस्तकांत तळनिश्चिती झाल्याचे लक्षण म्हणुन 'सुशि रोल' (Sushi Roll) नावाने एक आकृतीबंध दिला आहे. सलग 02 आठवड्यांची (05 दिवसांच्या) तुलना करुन दुसर्याळ आठवड्यांत बाजाराने सुरवातीस पहिल्या आठवड्यांतील निच्चांकापेक्षा खाली जावुन नंतर आधीच्या आठवड्यातील सर्वोच्च पातळीच्यावर साप्ताहिक बंद नोंदविला तर लेखकाच्या मते ते तळनिश्चिती (Bottom Formation) चे लक्षण आहे.

'How to Make Money in Stocks' या पुस्तकांचे लेखक विल्यम ओनिल(William O'neil) यांनी समभागाच्या गेल्या 10 दिवसांतील हालचालींवरुन ही प्रक्रिया उलगडुन दाखवली आहे.त्यांच्यामते संभाव्य तळ पातळी गाठल्यानंतर पुढील सलग तीन दिवस बजाराने त्या तळपातळीच्या वर तसेच आधल्या दिवशीच्या बंद पातळीपेक्षाही वर भाव दाखवला आणि पुढील सलग 10 सत्रांत सरासरीपेक्षा अधिक व्यवहार होवुनही पहिल्या दिवशीची तळ पातळी सुरक्षित राहिली...तर अशी भावपातळी खरेदी करण्यास सुरक्षित मानावी.

याशिवाय VIX म्हणजे (Market Volatility Index) हा ही तळनिश्चिती शोधमोहिमेतील एक उपयुक्त घटक आहे. हा निर्देशांक गुंतवणुकदारांचे व्यवहारावंवरुन त्यांचे मनांतील चलबिचल किती आहे ते ठरवतो असे ढोबळ्मानाने म्हणता येते. गुंतवणुक दारांचे मनांतील आशा निराशांचे प्रतिबिंब या निर्देशांकांत दिसतत असल्याने VIX ची अतिश्य वाढलेली पातळी म्हणजे निराशेचा परमावधी असे समजुन सर टेंपल्टन याच्या Principle Of Maximum Pessimism' च्या तत्वानुसार ही खरेदीसाठीची योग्य वेळ असु शकते. जिज्ञासुं करिता आपल्या निफ्टीबाबतच्या VIX ची माहिती येथे मिळु शकेल. http://www.nseindia.com/companytracker/charting/images/IndiaVIX/VIX.png

येथे जाताजाता बाजारस्थितीविषयक आणखी एक मजेदार संकल्पनेबद्दल मला लिहायला हवे, बाजार जर प्रमाणाबाहेर सलग खाली आला तर तेथुन तो थोडासा वर जातोच. यालाच तात्रिक परिभाषेत 'The Dead Cat Bounce' म्हणतात. अगदी मेलेले मांजरही उंचावरुन जोरात खाली आपटल्यास थोडेतरी उसळतेच (पण म्हणुन काहे ते जिवंत आहे असे समजायचे नसते) असा याचा अर्थ. तेंव्हा बाजाराने दाखविलेली सुधारणा ही खरोखर कल बदल (Trend Reversal) आहे की फक्त एक अल्पकालीन DCB.. हे ठरवावे लागते अर्थात हे ठरवणे हे सध्या चालु एका लोकप्रिय मराठी सिरियलमधील नायिकेच बाळंतपण आधी होईल की तिच्या वडिलांची वर्षानुवर्षे रखडलेली पायाची शस्त्रक्रिया?? हे सांगण्याइतकेच अवघड आहे.

या उपर, सर्वाधिक महत्वाचे म्हणजे वर उल्लेखलेलली सुत्रे ही फक्त'संकेत' देतात. 'काळ्या दगडावरची रेघ',वा 'हमखास यशाची गुरुकिल्ली' वगैरे स्वरुपातील हे तोडगे नव्हेत. बाजार खरेदीयोग्य झाला आहे का या प्रश्नाच्या उत्तराकरिता या आडाख्यांचा वापर करणे 'अंदाज पंचे दाहोदरसे' निर्णय घेण्यापेक्षा निश्चितपणे चांगले असले आणि यांचा योग्य पद्ध्तीने ऊपयोग हा यशाची शक्यता नकी वाढविणारा असला तरी केवळ एखाद्याच निष्कर्षावर विसंबुन, तारतम्य भाव न बाळगता निर्णय घेणे म्हणजे वेधशाळेच्या ईशार्याबरहुकुम पाउस वागतो असे मानण्यासारखे आहे. कोणावर किती विश्वास ठेवावा हे आपले आपणच ठरवायचे आहे, नाही का??

प्रतिक्रिया

प्रसाद भागवत's picture

27 Aug 2015 - 1:50 pm | प्रसाद भागवत

(१)आलेखांच्या एक/दोन आकृत्या अपलोड होवु शकल्या नाहीत. संपादक मंडळाने कृपया मदत करावी.
(२)बाजारांतील वेगवान घडामोडी आणि इनकम टॅक्स रिटर्न भरावयाची संपत आलेली मुदत... सबब येता काहीकाळ लेखावरील प्रतिक्रियांस प्रतिसाद देणे कठीण दिसते आहे क्षमस्व.- प्रसाद भागवत

मराठी_माणूस's picture

27 Aug 2015 - 2:06 pm | मराठी_माणूस

चांगली माहीती.

ह्या संकल्पनेंच्या सहाय्याने सध्या आपल्या बाजराची स्थिति काय आहे हे सांगता येईल का ? बाजार अजुन खाली जाईल का ? कींवा बाजारचा तळ गाठुन झाला आहे इत्यादी

पगला गजोधर's picture

27 Aug 2015 - 3:44 pm | पगला गजोधर

sushi

सुबोध खरे's picture

27 Aug 2015 - 7:14 pm | सुबोध खरे

यातील कोणतेही आडाखे वापरून कोणीही व्यक्ती "कायम" यशस्वी झालेल्या आजतागायत आढळत नाहीत. कारण समभागांचा व्यापार हा मानवाच्या मनोव्यापाराबरोबर हेलकावे खात असतो. त्यामुळे तो कसा व्यवहार करेल हे ब्रम्हदेवालाही सांगणे शक्य नाही.
उदा नेस्ले चा समभाग कंपनीच्या मूळ व्यवहारात कोणताही बदल न होता
४ ऑगस्ट ला ६३५३ रुपये होता
५ ऑगस्ट ला ६८५३ होता आणी
६ ऑगस्ट ला ६४८८ होता. या हेल्काव्याला कोणते परिमाण लावणार
या नंतर १२ ऑगस्ट पासून तो ६२०० ते ६०२५ या अभिसिमेत लटकत आहे.
कालच्या मंदीत त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही.
गेली आठ वर्षे मी बाजाराचा अभ्यास करीत आहे. तज्ञ लोक सांगतात तसे SIP ( SYSTEMATIC INVESTMENT PLAN क्रमबद्ध गुंतवणूक आखणी) करण्याच्या पेक्षा बाजार पडलेला असताना घेतलेलं समभाग मला स्वतःला ( आणी माझ्या काही मित्रांना) जास्त पैसे देऊन गेले आहेत/ देत आहेत.
यासाठी आपला स्वतःचा बाजाराचा अभ्यास पाहिजे आणी थोडा धोका पत्करण्याची तयारी पाहिजे. बाजार खाली पडत असताना आणी परत चढत असताना आपण थोडे थोडे पण चांगले समभाग घेतले तर ते SIP पेक्षा जास्त परतावा देतात.बाजाराचा ताल कुठे आहे हे वॉरन बफेटन सुद्धा सांगता येत नाही( असे त्यांनीच लिहिले आहे).
आपण विकत घेतल्यानंतर समभाग खाली पडले तर आपल्या छातीत धड धड होत असेल किंवा आपला रक्तदाब वाढत असेल तर आपण यापासून लांब राहणे बरे. मुदतठेव किंवा सरकारी कर्जरोखे ई कधीच "पडत" नाहीत. तसेच माणूस दर चार दिवसांनी त्याची आजची किंमत किती हे पाहायला जात नाही. पण तसे सर्व जण बाजाराच्या बाबतीत करत असतात.
याचा दुसरा भाग म्हणजे जेंव्हा बाजार फार तेजीत असतो तेंव्हा हेच समभाग आपण थंड डोक्याने विकणे आवश्यक असते. कारण अजून चढेल अजून चढेल असे करताना तो पटकन केंव्हा पडतो हे आपल्याला नक्की समजत नाही आणी आपण मिळणारा नफा हातचा घालवून बसतो.
वरील सर्व गोष्टींचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणी त्यातून मी शिकतो आहे.
वि. सु. -- मी कोणत्याही अर्थ सल्लागाराचा सल्ला घेत नाही/ घेतलेला नाही. बरेचसे अर्थसल्लागार मला चाकोरीबद्ध आढळले.
बेजबाबदारी ( DISCLAIMER) - माझे अर्थविषयक कोणतेही शिक्षण झालेले नसून मी अर्थ सल्लागारहि नाही. मी कोणालाही अर्थविषयक सल्ला देत नाही( विकत किंवा फुकट). मी माझ्या घामाच्या पैश्याचा वापर करून मिळवलेले थोडे फार ज्ञान आहे त्याचा गुंतवणुकीसाठी केलेल्या उपयोगाचा अनुभव येथे लिहित आहे.त्यामुळे तुमच्या घामाच्या पैशासाठी माझ्या अनुभवाचा उपयोग होईल असे कोणतेही विधान मी करीत नाही.

मी-सौरभ's picture

28 Aug 2015 - 3:43 pm | मी-सौरभ

लेख छान आहे.

सामान्य गुंतवणूकदारांनि फार तांत्रिक बाबी न बघता फक्त चांगल्या (ब्लु चीप) समभागात गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणूकीसाठीचे स्टॉपलॉस आणि टार्गेट पाळले तर ते बर्‍यापैकी पैसे कमावू शकतात असे मला वाटते.

एस's picture

27 Aug 2015 - 7:18 pm | एस

उपयुक्त माहिती.

मित्रहो's picture

27 Aug 2015 - 11:07 pm | मित्रहो

मला वाटते बाजाराचा तळ किंवा शिखर शोधण्याचा प्रयत्न करनेच चुकीचे आहे. बाजार घसरला की चांगले शेअर पण घसरतात आणि दिर्घ गुंतवणुकदारांसाठी ते फायद्याचे असते. शेअरची किंमत दोन गोष्टीने ठरते एक तर कंपनीचा परफॉर्मन्स आणि बाजारातले सेंटीमेंट. पहीला भाग हा शास्त्रोक्त आहे आणि त्याची गणिते मांडून गुंतवणुक करु शकतो परंतु दुसऱ्याला काहीही कारण नसते. पहीले गणित जर सांगत असेल की कंपनी चांगली करतेय तेंव्हा तेच करने योग्य असते बाजार काहीही म्हणो. आता चायना मधे जे काही झाले त्याचा आणि नेस्लेचा काहीही संबंध नाही. कोणी लावतोच म्हटले तर चायनाची आयात किंमत वाढल्याने नेस्लेचे प्रॉडक्ट घेणारे कमी होीती वगेरे. याचा नेस्ले इंडीयाचा कितपत संबंध हा भाग निराळा. उद्या ओबामाला दोन शिंका जास्त आल्या म्हणून साऱ्या अमेरीकन कंपन्यांचे शेअर पडले तर नवल नाही.
हा खेळ मोठे गुंतवणुकदार आणि संस्था खेळत असतात. शेवटी काय शेअर मार्केट ही साइन वेव्ह आहे, लाइन जर झूम केली तर त्यात सुद्धा साइन वेव्ह दिसते. बाजाराचा तळ आणि शिखर शोधण्यापेक्षा स्वतःच स्वतःता तळ आणि शिखर ठरवायचे त्यात अधिक शहाणपणा आहे असे मला वाटते.

जय's picture

28 Aug 2015 - 3:14 pm | जय

share market बद्दल अतिशय उद्बोधक माहिती मिळाली

स्थितप्रज्ञ's picture

7 May 2016 - 11:33 pm | स्थितप्रज्ञ

तुमची उदाहरण लैच झकास बुवा....एकदम फिट्ट बसत्यात डोक्यात....

प्रसाद भागवत's picture

9 May 2016 - 1:07 pm | प्रसाद भागवत

धन्यवाद..