अलिकडेच ईस्त्रायल ह्या राष्टाची गुप्तहेर संघट्ना 'मोसाद' अन्य देशांतील अशाच संघटनांपेक्षा अधिक प्रभावी का आहे याबद्दल एक मनोरंजक गोष्ट वाचनात आली. त्या संघटनेशी संबंधीत एका तज्ज्ञाच्या मते 'मोसाद' ही सदैव जागरुक असते आणि अशी अविरत जागरुकता बाणविण्याचे एक महत्वाचे कारण आहे तो म्हणजे ते पाळत असलेला एक नियम 'The 10th man rule'!!...हा नियम असा की या संघटनेच्या सर्वोच्च सुरक्षा समितीत 10 सदस्य असतात जे बहुमताने सर्व सुरक्षाविषयक निर्णय घेतात. मात्र गंमतीची गोष्ट म्हणजे जेंव्हा एखादी विपरित गोष्ट वा संभाव्य धोका होणारच नाही याची समितीतल्या 09 जणांची खात्री होते, तेंव्हा 10व्या सदस्याला ती 'होणारच' असे मानुन त्यावर उपाययोजना करावी लागते. यामुळेच काही अकल्पित अघटीत घटना, ज्याला पाश्चात्य संस्कृतीत 'Black Swan Event'असे संबोधले जाते, घडली तरीही ती योग्य पद्धतीने निपटता येते.
ह्या वैषिठ्यपुर्ण निर्णय प्रक्रियेमुळे मला सर जॉन टेंम्पल्टन यांचे 'Contrary Investing' विषयावरील विचार आणि त्यात दिलेले अगदी असेच उदाहरण आठवले. या निमित्ताने ते आपल्याला सांगुन जमल्यास त्यांच्या विचारांचा थोड्याफार प्रमाणांत आढावा घेण्याचा प्रयत्न करतो.
सर जॉन टेंम्पल्टन (1912-2008) हे गुंतवणुक जगतातील एक सर्वकालीन महान नाव....प्रस्थापित भावनांच्या पलिकडे जावुन विचार करणे, वा प्रवाहविरोधी गुंतवणुक करण्याच्या शैलीमुळे ते गुंतवणुक जगास सुपरिचित आहेत. सन 1939 मध्ये जेंव्हा जग दुस-या महायुद्धाच्या खाईत होरपळत होते, या महाशयांनी अमेरिकन शेअर बाजारांत मंदीच्या भाकितंची पर्वा न करता काही हजार डॉलर्सची गुंतवणुक केली आणि पुढील चारच वर्षांत ती गुंतवणुक त्यांना चौपटीपेक्षा अधिक परतावा देवुन गेली.या प्रसंगातुन नावारुपास आल्यानंतर त्यांनी सदैव Contrary Investing या कल्पनेचा पाठपुरावा केला..
समजा, आपण वैद्यकीय सल्ला घ्यायला एका डॉक्टरकडे गेला आहात, मात्र डॉक्टरने केलेले निदान व दिलेला सल्ला आपणास काहीसा रुचला नाही...आपण 'सेकंड ओपिनियन' साठी आणखी एका डॉक्टरकडे जाता.. तो ही अगदी पहिल्या डॉक्टरने केलेलेच निदान करतो, अगदी पहिल्यांदा मिळालेलाच वैद्यकीय सल्ला आपणास परत एकदा मिळतो...कल्पना करा असे पुढे आणखी आठ वेळा होते. दहापैकी दहा डॉक्टरांचे वैद्यकीय निदान एकच असते...अशा परिस्थितीत हे निदान व त्या अनुषंगाने दिलेला सल्ला मानण्यास पर्यवाय नसावा.
आता प्रसंग क्र. 02...आपण शेअरबाजारात खरेदी करावी का?? वा कोणता शेअर घ्यावा..याबाबत सल्ला घ्यायला एका तज्ज्ञाकडे गेला आहात, तेथे तुम्हाला मिळालेला सल्ला आपणास काहीसा रुचला नाही.आपण दुसरा,तिसरा...असे दहा वेगवेगळे तज्ज्ञ गाठता जे संयोगाने आपल्याला अगदी तोच सल्ला (उदा..सध्या खरेदी करु नका अथवा 'क्ष्'हा समभाग घ्या) देतात. आपण काय करावे ??...
हा दाखला देवुन सर टेंम्पल्टन म्हणतात, शेअरबाजारांतील गुंतवणुकी संदर्भांत जर बाजारातील बहुतांशी लोक एकच मत व्यक्त करीत असतील तर आपण नक्कीच त्याकडे दुर्लक्ष करुन त्याच्या विरुद्ध कृति करा. जर 10 पैकी 10 जणांच्या मते एखादा समभाग खरेदी करणे योग्य असेल तर याचाच अर्थ त्या शेअरची किंमत आधीच वाढलेली असण्याची शक्यता जास्त आहे. अगदी त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे तर "In all probability, if the experts all agree, there way is the right way to do a thing, but the very nature of the investment selection process turns the scenario topsy-turvy!!!"
काही वैचारिक वाद अगदी पुरातन आहेत जसे आयुर्वेद वि. ॲलोपॅथी. तसाच आपल्या या क्षेत्राताल वाद म्हणजे Techinicals की Fundamentals...हे Techinicals वाले सातत्याने आपल्याला प्रवाहाबरोबर जाण्याचा (Trend is your friend) सल्ला देतात. "थांबा, Don’t try to catch a falling knife.." असे तांत्रिक विश्लेषकांचे म्हणणे असते तर त्याला उत्तर म्हणुन श्री बॅरॉन रॉथशिल्ड यांचे तितकेच सुप्रसिद्ध 'Buy, when there’s blood in the streets.' हे वाक्य ‘फंडामेंटलीस्ट’ लोकांची विचारसरणी स्पष्ट करते.. अर्थात या मोठ्यांच्या वादात सामान्याने न पडणेच योग्य. 'टिळक आणि आगरकर यांची भांडणे म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती, आपण फक्त दुरुन पहावयाच्या...' असे स्व. श्री राम गणेश गडकऱ्यानी आपल्या 'एकच प्याला' या नाटकात म्हटले आहे, ते खरेच आहे.. सर टेंम्पल्टन हे मात्र या वादात बाजाराच्या तांत्रिक अभ्यासकडे दुलक्ष करताना दिसतात.त्यांच्या मते You must be a fundamentalist to be really successful in the market."
याच सर टेंम्पल्टन यांनी 'Principal of Maximum Pessimism' अर्थात 'सर्वाधिक नैराश्याचे तत्व' ही मांडले, अधोरेखित केले आहे. पुन्हा एकदा त्यांचेच शब्द उधृत करावयाचे झाल्यास "..to get a bargain price,you got to look for where the public is most frightened & pessimistic". या तत्वाचे पालन न केल्याने काय होते याचे काही अनुभव अस्मादिकांचे व्यावसायिक कारकिर्दीत जरुर आले आहेत.
साधारण २० एक वर्षापुर्वीची गोष्ट, बाजारांतील एक प्रमुख कंपनी असलेल्या ITC च्या देशभरांतील विविध कार्यालयांवर परकीय चलनाची गडबड केल्याच्या आरोपाखाली कस्टम्स व प्रवर्तन निर्देशनालय(ED) यांनी धाडी घालुन कंपनीचे प्रमुख संचालकांबरोबरच तीचे 'आयकॉनिक'चेअरमन श्री.देवेश्वर यांना तडकाफडकी अटक केली आणि या सगळ्यांना एका पोलिस चौकीत पुर्ण रात्र डांबुन ठेवले...
अतिशय स्वच्छ व उत्तम व्यवस्थापनासाठी नावाजलेल्या कंपनीवरील या कारवाईमुळे तेंव्हा आपल्याकडील आर्थिक जगतात मोठी खळबळ उडाली. शेअरबाजारात सहाजिकच ITC च्या भावाने गटांगळ्या खाल्या.
नेमक्या याच वेळी मी,एका जाणत्या ब्रोकरच्या सल्ल्यामुळे माझ्या तिर्थरुपांच्या रिटायर्मेंट्च्या पैशांतील काही भाग ITC मध्ये गुंतवण्याच्या बेतांत होतो. पण झाला प्रकार पाहुन ‘बरे झाले,...या भानगडींत पडलो नाही ते’ असे म्हणुन मी ITC मध्ये पैसे न गुंतविल्याबद्दल भगवंताचे आभार(??) मानले.
पुढे काही काळाने तेंव्हाच्या Intelligent Investor या अतिशय उपयुक्त मासिकांत 'Contrarian/Scandal Investing' या विषयावर ITC कंपनीचे हेच उदाहरण घेवुन एक अतिशय उत्तम लेख प्रसिद्ध झाला,त्यात सर टेंम्पल्टन यांच्या या विचारांचा हवाला देवुन ब्ल्यु-चीप कंपन्यांबाबत अशा आलेल्या संधी सोडु न देता बेधडक गुंतवणुक करावी असा मतितार्थ होता, मी त्याने प्रभावितही झालो, पण तो पर्यंत वेळ निघुन गेली होती.सांगावयास 'खेद' होतो की मधल्या काळांत ह्या कंपनीने प्रतिवर्षी 25% हुन अधिक वाढ तीही चक्रवाढीने (CAGR) दाखवली असुन माझ्याकडील आलेखांच्या(charts) आधारे बोलावयाचे झाले तर आजचा भाव तेंव्हाच्या साधारण 35 पट आहे.(शिवाय दरवर्षीचा 400/500% लाभांश वेगळाच!!!)..म्हणतात ना 'आगे बुद्धी वाणीया,पीछे बुद्धी.. ते हे असे.
पण संधी ही काही एकदाच येणारी गोष्ट नव्हे..पुढचा प्रसंग मुंबईवरील अतिरेकी हल्याच्या काळप्रहराशी संबंधित आहे.सांगतो..
सन 2008,.. दोनच दिवसांपुर्वीच्या प्रसंगाने सर्द सुन्न होवुन मी आता पुढे काय?? असा प्रश्नार्थक चेहरा करुन कार्यालयांत बसलो होतो तितक्यात माझा सदाबहार मित्र अमित प्रकटला. व्हरांड्यातुनच येतानाच त्याने ‘वर दोन स्पेशल पाठव रे.."अशी समोरच्या चहावाल्याला दिलेली ऑर्डर एकुन मी केलेला अधिक त्रासिक चेहरा त्याच्या नजरेतुन सुट्ला नव्हता. "कितना सोचोगे? जो हो गया..." त्याचे जीवनविषयक सुपरिचित तत्वज्ञान सुरु झाले.(घाबरु नका, मी ते तुम्हाला सांगणार नाही) थोड्यावेळाने चहावाला पोरगा येताना दिसतो तोच अचानक "काय रे, ताजमध्ये किती रुपयाला मिळत असेल चहा?? काही अंदाज??" अमितने मला (गुगली+यॉर्कर) टाकला. हतबुद्ध मी काही बोलणार तोच "नाही... म्हटले आत्ता ताजचा शेअर 36 रुपयाला मिळतोय म्हणुन विचारले" असा खुलासा ही झाला. भानावर आलेल्या मी मग या कालच्या हल्ल्यात ताजचे किती नुकसान झाले असावे, आता यापुढे कोणी परदेशी नागरिक ताजमध्ये उतरताना कसा 100 वेळा विचार करतील... याचा पाढा वाचावयाला सुरवात केली तेंव्हा "सोSSड रे, हे बघ, टाटांचे गुडविल माहित आहे मला आणि जगालाही, आणि नुकसानीचे म्हणशील ना, तर हॉटेलचा विमा नसेल काय उतरवला??...,तुझे राहु दे, माझ्यासाठी 500 ईंडियन हॉटेल (ताज हॉटेलची मालकी असलेली कंपनी) घे या भावांत..." त्याने मला झुरळासारखे झटकले आणि साहेब सौदा करुन थोड्यावेळाने निघुनही गेले.
आज साडेसहा वर्षांनंतर (गेले दोन वर्षे कंपनीच्या अतिशय खराब कामगिरीनंतरही) ही गुंतवणुक तिप्पट झाली आहे.
पुढे लगेच महिन्या दोन महिन्यांत (07 जानेवारी 2009) असाच आणखी एक 'ऐतिहासिक' दिवस उजाडला. श्री. रामालिंगम राजु यांनी एका पत्राद्वारे आपल्या कृष्णकृत्यांची कबुली दिल्याने सत्यम कॉम्प्युटर्स या कंपनीचा समभाग दिवसाभरांत 75 हुन अधिक ट्क्य्यांनी आपटला!!!..या अभुतपुर्व घटनेमुळे आम्ही भांबावलेल्या अवस्थेत असतानाच एरवी किरकोळ दिसणा-या श्री. पटेल काकांचा 'सीना' 56 (की किती??) ईंच 'चौडा' आहे हे त्या दिवशी कळले, जेंव्हा त्यांनी त्या दिवशी बेधडकपणाने सत्यम चे शेअर्स 40 रुपयांत घेवुन पुढे चार वर्षांतच तिप्पट किंमत वसुल केली.
असेच लवासावरील कारवाईचे प्रकरण ऐन भरात असताना (2013 साली) माझ्या एका बड्या अशीलांनी अचानक कार्यालयात येवुन या प्रकल्पाशी संबंधित हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शन्स या कंपनीचे हजारो समभाग 09 रुपयांच्या आसपास विकत घेतले.(आज, लिहिते वेळीचा भाव साधारण 28 रुपये).तडकाफडकी आणि अत्यंत आत्मविश्वासाने त्यांनी केलेला हा सौदा पाहुन मला माझ्या एका सहका-याने हळुच विचारले "हे साहेब काय टेक्नीकल आहेत?? की.... "ते पोलिटिकल आहेत" मी म्हणालो... विषय तेथेच थांबला
श्रीमान जॉन टेंम्पल्टन सरांच्या 'Principal of Maximum Pessimism' चा अन्व्यार्थ अधिक स्पष्ट करणारी ही काही उदाहरणे होत.
अर्थात हे असे 'दे धडक, बेधडक' वागणे दिसते तेवढे सोपे नाही हे आहेच. वरील उदाहरणांसारखीच किंमत 'सपाट' झालेल्या कंपन्याची उदाहरणेही (एम एस शुज पासुन असंख्य NFBCs आणि नंतरच्या हिमाचल फ्युच्युरिस्टिक्स वर्गातल्या कंपन्या) कमी नसावीत. लेखाच्या सुरवातीस उल्लेखलेल्या, सर टेंम्पल्टन यांनीही कारकिर्दीच्या सुरवातीस खरेदी केलेल्या 104 समभागांपैकी तब्बल 39 कंपन्या दिवाळखोरीत गेल्या हे येथे लक्षांत ठेवले पाहिजे. पुढे अनुभवांतुन सर टेंम्पल्टन हे एक प्रख्यात 'व्हॅल्यु इन्व्हेस्टर' बनले आणि त्यांच्या समभाग निवडीचा प्रमुख आधार हा एखाद्या कंपनीची भविष्यात मुल्य(Value) निर्माण करण्याची क्षमता हा असे.
तेंव्हा सर टेंम्पल्टन यांची तत्वे बाजारात यश मिळविणेचे दृष्टिने अत्यंत उपयुक्त असली तरीही वाचकांनी ती अंमलात आणण्यापुर्वी त्यांच्या गुंतवणुक शैलीचा सखोल अभ्यास केल्याशिवाय तळ गाठलेला प्रत्येक समभाग, खाली आलेला आणि स्वस्त दिसेल तो प्रत्येक् समभाग, हा खरेदीची सुवर्णसंधी आहे असे समजुन अनाठायी घाई न दाखविलेलीच बरी. कंपनीचे व्यवस्थापन, व्यवसायाचे प्रारुप (model) अशा गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष द्यावयास हवे असे मी सुचवेन. टाटांच्या ईंडियन हॉटेलच्या खरेदीने जसा फायदा मिळाला,...मल्यांच्या किंगफिशरनेही तसाच मिळेल याचा काय नेम?
सर व्हीव्ह रिचर्ड्स एखाद्या वेगवान गोलंदजाचा चेंडु पुढे येवुन सीमापार भिरकावुन देताना पहायला अतिशय सोपे वाटले तरी त्याआधी अशा महान फलंदाजाचे डोळे, मेंदु आणि एकुणातच शरीराची कार्यक्षमता, कौशल्य व समन्वय हे अद्भुत असल्यानेच हे शक्य होते याची जाणीव असणे ईष्ट होय. अन्यथा नुसतीच आक्रमकता दखविल्यास आपल्यासारख्यांचा त्रिफळा उडण्याचीच शक्यता जास्त असेल. खरे की नाही??
प्रसाद भागवत (20 मे 2015)
प्रतिक्रिया
30 Jun 2015 - 3:36 pm | प्रसाद भागवत
खरे म्हणजे माझ्या 'शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??' या धाग्याच्या थोडेच आधी केलेले हे लिखाण आहे. विषयावर बरीचशी चर्चा आधीच्या मॅगी प्रकरणांत झाली आहेच.... संपादक मंडळीस विनंती आहे की हे दोन्ही धागे 'Link' करुन मला मदत करावी.
30 Jun 2015 - 3:52 pm | एस
कालच्या 'ग्रेझिट' प्रकरणात आपल्या शेअर बाजारांतही पडझड झाली तर ह्या थिअरीनुसार काही चांगले समभाग कमी किंमतीत मिळण्याची शक्यता आहे.
30 Jun 2015 - 7:33 pm | द-बाहुबली
जर का खरच गडगडाटीला सुरुवात झाली सेल तर गुंतवणूकीसाठी सुवर्णसंधी निर्माण होत आहे हे नक्कि. पण हा गडगडाट साधारण पुढील दोन महीने सपोर्ट-रेझीस्टन्सचा खेळ खेळत झाला पाहिजे. महामंदी सुरु होइल. अन तीच योग्य वेळ असेल.
30 Jun 2015 - 3:59 pm | पगला गजोधर
मस्त मस्त मस्त ....
विशेषतः मोसादच्या 10 व्या माणसाच्या नियमाच्या उल्लेखाने कांही जुन्या स्मृती जागवल्या, तदुअपि ग्रीस संकटकाळी समयोचित लेख.
30 Jun 2015 - 8:03 pm | उगा काहितरीच
वा आवडला लेख.
30 Jun 2015 - 8:08 pm | आनंदराव
मस्त लेख
लेखकाचा या विषयातील अभ्यास दिसुन येत आहे.
अत्यंत माहितीपुर्ण लेख
आभार!
30 Jun 2015 - 8:22 pm | अनुप ढेरे
छान लिहिलय.
2 Jul 2016 - 12:32 pm | खाबुडकांदा
जे पी असोसिएट्स बाबत अशी काही शक्यता आहे का ? सध्या मातीमोल भावात मिळत आहे व कुमार मंगलम बिर्ला त्यात रस घेतायत अशी बातमी आहे. काय करावे ?
2 Jul 2016 - 12:39 pm | प्रसाद भागवत
नो आयडिया. कळल्यास माहीती देतो.
2 Jul 2016 - 6:19 pm | विअर्ड विक्स
जे पी असोशिएट्स कर्जात डुबलेली कंपनी आहे. डे ट्रेडर साठी चांगली . व्हॉल्युम बरे असते. गुंतवणुकीसाठी घेत असाल तर एव्हढ्यात तरी नको.