शेअर बाजारः चीन..घसरण…. संकट की संधी'

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
27 Aug 2015 - 1:31 pm
गाभा: 

'बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते'.....चीनी आक्रमणासंदर्भातील कवि कुसुमाग्रजांच्या ह्या ओळी शाळेंत वाचल्याक्षणीच मी अक्षरशः थिजुन गेलो होतो. मधल्या काळांत थोडासा अप्रासंगिक झालेला हा संदर्भ काल पुन्हा आठवला. समोर ट्रेडिंग स्क्रीनवर टपकणारा लाल रंग, क्लायंटसचे चिंतातुर फोन्स यामुळे काहीसा अस्वस्थ होवुन 'भिंतीचे' तट पेटुन उठले, सदन चीनचे कोसळते…..रक्त 'शांघाय काम्पोझीट'चे, 'सेन्सेक्स' वरती ओघळते' अशी तोडकी मोडकी रचना जुळवत असतानाच नाही म्हणायला व्हॉट्स-अप वर एक मेसेज आला "Global mkt crash will not last long......... After all...it is made in China..☺☺☺' असो. मुद्यावर येतो.

सध्या जगभरांतील सर्वच प्रमुख बाजारांत तीव्र घसरण चालु आहे.आणि प्रत्येक बाजाराची स्थिती आणि प्रकृति वेगळी असली तरीही चीनची अर्थव्यवस्था आणि चीनचा शेअर बाजार यांना लागलेली उतरती कळा हे या जागतिक पडझडीमागचे प्रमुखतम कारण आहे, याबद्दल कोणाचे दुमत दिसत नाही. (मुलभुत अर्थशास्त्राचा अभ्यास नसल्याने मी मात्र हा लेख 'शेअर बाजारासंदर्भात लिहिणार आहे हे स्पष्ट करावयास हवे.)

जुनच्या मध्यास 5200 च्या जवळ झेपावलेला चीनचा 'शांघाय काम्पोझिट' हा निर्देशांक हा लेख लिहिताना 3000 च्याही खाली धडपडत होता, म्ह्णजेच गेल्या महिन्या दोन महिन्यांत त्यात जवळपास 40% घट नोंदविली गेली. चीनची अर्थव्यवस्था मागील काही वर्षे सतत 10% वा अधीक वेगाने वाढ नोंदवत होती जी त्या काळांत अतुलनीय होती, सहाजिकच तेथे जागतिक गुंतवणुकीचा ओघ प्रचंड प्रमाणांत वाढला होता. मात्र गेल्या काही महिन्यांत तेथे मंदीची चिन्हे दिसु लागली. नेहमी होते तसे, प्रथम रियल ईस्टेट्च्या किंमती घसरायला सुरवात झाली, निर्यात मंदावली, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 7% पर्यंत खाली आला बाकीचे आर्थिक निकषही कमकुवतपणाकडे अंगुली निर्देश करतच होते. http://www.ndtv.com/video/player/ndtv-special-ndtv-profit/chinese-realty... जीम चॅनोस नावाच्या एका प्रख्यात बाजार विष्लेष्काने देलेली ही मुलाखत जिज्ञासुंनी जरुर पहावी. श्री राघव बहल यांचे 'The Amazing Race Between China's Hare and India's Tortoise' हे पुस्तकही या संद्रभात वाचनीय आहे.

भरीस भर म्हणुन 'चीन मिडिया एक्स्प्रेस' वा 'सिनोफॉरेस्ट' यासारख्या अमेरिकेत नोंदणीकृत अनेक चीनी कंपन्यांनी त्यांच्या हिशेबांत मोठे गैरेप्रकार केल्याचे उघड झाले. चीनमधील बॅंकानी प्रचंड प्रमाणावर 'छुपी' कर्जे दिली आहेत जी बुडित खाती जावु शकतात अशा बातम्या येवु लागल्या, एकुणातच चीनमधील गुंतवणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेअरबाजार हा अशा घटनांची नोद सर्वात आधी घेत असतो. देशोदेशींच्या बाजारांत गुंतवणुक करणार्यां मोठ्या वित्तीय संस्था ह्या राष्ट्रभक्ती वा अन्य कोणतेही भावनात्मक बंध पाळत नाहीत, गुंतवणुकीतुन होणारा फायदा व त्यात असलेली जोखीम हाच त्यांच्या गुंतवणुकविषयक निर्णयांचा आधार असतो. सहाजिकच स्वतःच्या गुंतवणुकीबद्दल अतिसावध अशा मोठ्या संस्थागत गुंतवणुकदारांनी 'जब जहाज डुबने लगता है...'स्टाईलने चीनच्या शेअर बाजारांतुन काढता पाय घेण्यास सुरवात केली.

खरेतर अशी तेजी/मंदीची चक्रे हा अर्थव्यवस्थेचाच अपरिहार्य भाग आहे. शेअर बाजारात तर असे चढ उतार वारंवार होत असतात, अशा प्रवाहांना नैसर्गिकपणे प्रकटु देणे आणि लुप्त होवु देणेच योग्य, मात्र चीन हा एक कम्युनिस्ट देश आहे, प्रत्येक गोष्टीत सरकारी नियंत्रण आणण्याची त्यांची सवय म्हणा किंवा मोठ्या प्रमाणांत जागतिकीकरण झालेला शेअर बाजार ही संकल्पनाच तुलनात्मकरित्या नवीन असल्याने अशा मंदीच्या तडाख्याचा पुर्वानुभव नाही म्हणा, चीनची शासकिय यंत्रणा लगोलग बाजारांत हस्तक्षेप करण्यास सरसावली. व्याजदर कमी करणे, शेअर्स विकत घेण्यासाठी कर्जे देणे, ब्रोकर्सकडे ठेवावे लागणारे मार्जिन कमी करणे, कंपन्यांचे प्रमोटर्स वा स्थानिक वित्तीय संस्थांना शेअर्स विकण्यास बंदी करणे,सरकारी पेन्शन फंडसना बाजारांतुन खरेदीची मुभा देणे...असे एकामागुन एक तीव्र स्वरुपाचे उपाय करुन बाजारांतील घसरणीस कृत्रिमपणे अटकाव करण्याचे प्रयत्न सुरु झाले.

मात्र असा हस्तक्षेप म्हणजे 'रोगापेक्षा उपाय भयंकर' प्रकार आहे हे यापुर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. जेंव्हा सन 1929 मधे अमेरिकन शेअरबाजारांत अशीच वेगाने पडझड होवु लागली तेंव्हा प्रख्यात बॅंकर जे.पी. मॉर्गन आणि अमेरिकतील अन्य काही आघाडीचे वित्तीय संस्थाचालक यांची बैठक होवुन बाजार सावरण्यासाठी असेच काही उपाय ठरविण्यांत आले. मंदी थोपविण्याठीचा हा असाधारण उतारा जालिम ठरणार अशी सर्वांनाच खात्री असतानाच. पुढच्याच सोमवारी अमेरिकन बाजार 13टक्क्यांनी सडकुन आपटला, एवढेच नव्हे तर पुढे तीनच आठवढ्यांत आणखी 34% पडला… अगदी अलिकडील उदाहरण म्हणजे 2008 साली देशांतील अराजकतेच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानी बाजारांतही अशीच बंधने घालण्यात आली तेंव्हाही हेच झाले, नंतर पाकिस्तानी बाजार जवळपास 50 टक्के कोसळले. बाजारांतील सहभागी लोकांची मानसिकताच जर बाहेर पडण्याची अहे तर 'बाहेर पड्ता येणार नाही' अशी सक्ती काय कामाची?? 'पेनकिलर' घेवुन तात्पुरते दुखणे थांबवणे कधीच रुग्णाच्या हिताचे नसते हीच बाब येथेही लागु पडते.

दरम्यानच्या काळांत राक्षसी उत्पादनक्षमतेमुळे पडुन राहु लागलेल्या मालाची निर्यात सोपी व्हावी म्हणुन चीनच्या मध्यवर्ती बॅकेने आपल्या चलनाची किंमत अन्य चलनांच्या बाबतीत मुद्दाम कमी केली. चलनाच्या अवमुल्यनाबद्दलच बोलावयाचे तर हे अभुतपुर्व वगैरे पाऊल नसुन चीनने असे यापुर्वीही (1990) केले आहे.मात्र तरीही सरकार, मध्यवर्ती बॅकेच्या अशा टोकाच्या भुमिकेमुळे परिस्थिती सुधारायचे राहिले दुर उलट ‘दाल मे कुछ काला है’ अशी भावना प्रबळ होवुन घबराट पसरली, जगभरांतील धातुबाजार गडगडले, चीन यापुढेही अशीच आततायी भुमिका घेवुन चलन युद्ध सुरु करेल की काय अशा भितीने शेअर बाजारही कोसळले..

आपल्या बाजाराच्या निर्देशांकातही जोरदार घसरगुंडी होवुन तो वर्षभरांतील सर्वात खालच्या पातळीवर आला. अशा वेळी आपण,एका किरकोळ गुंतवणुकदाराने काय करावयास हवे ?? याचे सर्वप्रथम आणि सर्वसामान्य उत्तर कोणताही निर्णय तातडीने वा भावनेच्या भरांत घेऊ नये हे आहे. बाजारांत किमान मध्यमकालीन तळनिश्चिती झाली आहे काय हे तपासुन मगच खरेदीचा निर्णय करावा, उलट शेअर्स विकावयाचे असल्यासही अशा तीव्र मंदीतही एखादी अल्पकालीन तरी उसळी येते (ज्याला तांत्रिक परिभाषेंत Dead Cat Bounce म्हणतात) तीची वाट पहावी. शेजारील घरात दुरुस्ती, मोडतोड, ठोकाठोक चालु असली म्हणजे आपल्याला त्रास होणे अपरिहार्यच आहे, कदाचित भिंतीला एखाद्दुसरा तडा जाणे वा ढपला उडणे ही शक्य असतेच, पण म्हणुन आपण काय करतो

लेखांत उल्लेख केलेल्या पार्श्वभुमीवर बाजाराच्या ताज्या स्थितीचे विष्लेषण करावयाचे झाल्यास बाजाराचे दीर्घकालीन PE गुणोत्तर तपासुन पहावे लागेल. निर्देशांकातील प्रत्येक कंपनी (येथे 'निफ्टी' मधील समाविष्ट 50 कंपन्या) तिच्या एका समभागामागे कमावित असलेला नफा आणि 'निफ्टी 'चा चालु बाजारभाव यांचे गुणोत्तर म्हणजेच 'निफ्टी'चे पी/ई गुणोत्तर होय. म्हणजेच एखाद्या शेअरचा भाव हा तो कमावित असलेल्या नफ्याच्या किती पट आहे हे याची तुलना म्हणजे हा पी/ई चा आकडा होय. हे गुणोत्तर जितके कमी तितके चांगले. या संदर्भांत आपल्या येथील IDFC या म्युचुअल फंडाच्या अभ्यासाप्रमाणे गेल्या 15 वर्षांत पी/ई गुणोत्तर 16 ते19 दरम्यान असताना निर्देशांकाने सरासरी 17.6% परतावा दिला आहे आणि जेंव्हा पी/ई गुणोत्तर 16 पेक्षा कमी होते, हा परतावा सरासरी 22.1% इतका मिळाला आहे. वाचकांचे कुतुहल चाळविण्यापुर्वीच सांगतो,आत्ता, हा लेख लिहित असताना NSE च्या अधिकृत संकेत स्थळाप्रमाणे निफ्टीचे (बंद भाव 7809) पी/ई गुणोत्तर 21.63 आहे. लक्षात घेण्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा हा, की हे गुणोत्तर काढताना आवश्यक असलेला कंपन्याचा प्रति समभाग नफा हा दर तीन महिन्यांनी (कंपन्यांचे तिमाही निकाल जाहिर झाल्यानंतर) बदलतो. सहाजिकच येत्या निकलांनंतर कंपन्यांच्या नफ्यांत होणारी वाढ लक्षांत घेता हे गुणोत्तर आणखी कमी होईल. अशा स्थितीत एकीकडे निर्देशांकाचा सध्याचा घसरणीचा कल व दुसरीकडे प्रति समभाग नफ्यांत होणारी वाढ पहाता IDFC म्युचुअल फंडाच्या वरील निकषावर बाजार नजीकच्याच काळांत मध्यमकालीन खरेदीसाठी योग्य या प्रवर्गात जावु शकेल.

याशिवाय VIX (Market Volatility Index) हा ही अशा निर्णयप्रक्रियेतील एक उपयुक्त घटक आहे. हा निर्देशांक गुंतवणुकदारांचे मनांतील चलबिचल किती आहे ते ठरवतो असे ढोबळ्मानाने म्हणता येते. गुंतवणुकदारांचे मनांतील आशा निराशांचे प्रतिबिंब या निर्देशांकांत दिसत असल्याने VIX ची अतिशय वाढलेली पातळी म्हणजे निराशेचा परमावधी असे समजुन सर टेंपल्टन याच्या Principle Of Maximum Pessimism' च्या तत्वानुसार ही खरेदीसाठीची योग्य वेळ असु शकते. निफ्टीबाबत बोलावयाचे तर सर्वसाधारणतः अर्थसंकल्प वा निवड्णुकीचे निकाल, असे बाजार प्रभावित करु शकतीलसे पुर्वनिर्धारित कार्यक्रम नसणार्याण कालावधीत जेंव्हा जेंव्हा VIX ची पातळी 30+ होते, तेंव्हा बाजाराने तळ गाठल्याचे दिसते. लेख लिहितेवेळी ही पातळी 28.13 आहे. http://www.nseindia.com/companytracker/charting/images/IndiaVIX/VIX.png.

बाजारावर परिणाम करणार्या मुलभुत घटकांची सरस निरस स्थिती पाहिल्यास चीनमधील या घडामोडींतुन भारतीय अर्थव्यवस्थेस काही फायदेही संभवतात. कमॉडीटी बाजार खाली आल्याने लोखंड, ॲल्युमिनियम वा तांबे यासारखे औद्योगिक उत्पादनाकरिता लागणार्या् कच्च्या मालाच्या किंमती कमी होतील. यातुनच चलफुगवट्यावर (इन्फ्लेशन) नियंत्रण येवुन व्याजदर कापातीची शक्यता वाढेल. तेलाचे घटलेले दर हा आपल्या अर्थव्यवस्थेस होणारा सर्वात मोठा फायदा आहे. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घटल्याने (आणि तेलाची किंमत डॉलर्मध्ये चुकती करावी लागत असल्याने) आपण तेलाचे भाव कोसळ्ल्याचा फायदा पुर्ण स्वरुपात घेवु शकत नाही हे खरेच, पण नेमक्या याच गोष्टीमुळे आपल्याकडील निर्यातप्रधान कंपन्याना फायदाही होईल. एकुणांत अर्थव्यवस्थेतील तुट कमी होईल, जे फार महत्वाचे आहे.

अशी नियंत्रित तुट, अन्य देशांपेक्षा सातत्याने अधिक असणारा विकासाचा दर, एकुण कर्जाचे जी.डी.पी च्या तुलनेने असलेले प्रमाण (चीनच्या बाबतीत एकुण कर्जे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 280% हुन जास्त आहेत. भारताचे हेच प्रमाण 82% आहे.) अर्थव्यवस्थेचा आकार व स्थिरता पहाता भारतीय बाजाराकडे पहाण्याचा जागतिक वित्तीय गुंतवणुकदारांचा दृष्टिकोण सकारात्मक राहील असे मानावयास पुरेपुर जागा आहे.

याचा अर्थ आपल्याकडे सारे काही आलबेल आहे वा आपल्या अर्थव्यवस्थेस कोणत्याही समस्या नाहीत ,असा अजिबात नाही, मात्र निवडणारासाठी कोणी काळा उडीद असेल तर आपण गोरी उडीद डाळ आहोत म्हणा हवे तर, आणि म्हणुन सापेक्षतेच्या निकषांवर, 'पंत गेले, राव चढले' या न्यायाप्रमाणे, येत्या काळांत गुंतवणुकीचा पहिला पर्याय म्हणुन आपली निवड करणे सोपे जावे अशी माझी अटकळ आहे..

एकदा दोन मित्र जंगलांतुन जात असताना अचानक त्यांना दुरुन येणारा एक वाघ दिसतो. दोघांचीही पाचावर धारण बसते, दोघेही अक्षरशः गर्भगळीत होतात. मात्र पुढच्याच क्षणी त्यातील एक जण घाईघाईने सॅकमधील स्पोर्ट्स शुज पायांत चढवुन पळायची तयार्री करायला लागतो. दुसरा त्याला म्हणतो "अरे कशाला ही धडपड?? कितीही झाले तरी आपल्याला थोडेच त्या वाघापेक्षा फास्ट पळता येणार आहे??" तेंव्हा दुसरा उद्गारतो "....ए बाबा, मला वाघापेक्षा नव्हे, फक्त तुझ्यापेक्षा जास्त जलद पळायचंय, बास्स'......मी वर जे म्हटले त्याचा अन्वयार्थ हा आहे. आपली अर्थ्व्यवस्था निर्दोष, परिपुर्ण, समस्याविहिन नसेलही,(आणि खरे तर कोणतीही तशी नसतेच)...ती इतरांच्या तुलनेत बरी असावी एवढेच.

या विवेचनांतुन मी भारतीय बाजारांत दीर्घकालीन गुंतवणकीबद्दल मी नक्कीच आशावादी असलो आणि सध्याची चालु घसरण ही अशा गुंतवणुकीस असलेली सुसंधी मानत असलो, तरीही आंधळेपणाने, तडकाफडकी लगेचच खरेदीचे मोहिमेवर निधुन एका झटक्यांत सगळा माल घेवुन कार्यक्रम आटपावा, असे मला सुचवायचे नाही. 'Patience is a virtue for a investor.' कोणीसे म्हटले आहे ते खरेच आहे. 'The early bird catches the worm...' हा म्हणीचा अर्धा्च भाग आहे हे लक्षांत ठेवल्यास "but the Second Mouse Gets the Cheese” ही उर्वरीत अनुभुतीही येवु शकेल.

नवीन गुंतवणुकदारांनी S.I.P चा मार्ग जरुर अवलंबावा. आपल्याकडे म्युचुयल फंड्सच्या माध्यमांतुन काही वैषिष्ठ्यपुर्ण योजना आहेत ज्या बाजारांतील अशा तीव्र चढउतारांपासुन गुंतवणुकदारांचे रक्षण करु शकतात. या योजनांना ढोबळमानाने 'Hybride Schemes' असे म्हणतात. या योजनांत वर उल्लेखलेल्या PE वा PBV सारख्या अतिशय प्रभावी घटकांचा आढावा घेवुन स्वयंचलित पद्ध्तीने योजनेतील 'ईक्विटी'चे प्रमाण बदलते ठेवले जाते. (1)ICICI Prudential Balanced Advantage Fund (2)Franklin India Dynamic PE Ratio Fund वा (3) Principal Smart Equity Fund ही या प्रकारांतील काही नावे होत. या योजनांची कार्यपद्द्धती, त्यांच्या कामगिरीची कारणमिमांसा व त्यांचा परिणामकारक वापर कसा करुन घ्यावा याची चर्चा जागेअभावी पुन्हा केंव्हा तरी........

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

27 Aug 2015 - 1:38 pm | पगला गजोधर

आता लेखं वाचतो.

प्रसाद भागवत's picture

27 Aug 2015 - 1:40 pm | प्रसाद भागवत

बाजारांतील वेगवान घडामोडी आणि इनकम टॅक्स रिटर्न भरावयाची संपत आलेली मुदत... सबब येता काहीकाळ लेखावरील प्रतिक्रियांस प्रतिसाद देणे कठीण दिसते आहे क्षमस्व.- प्रसाद भागवत

खेडूत's picture

27 Aug 2015 - 2:06 pm | खेडूत

माहितीपूर्ण लेख.

आता इतर मान्यवरांच्या प्रतिक्षेत.

आम्ही तर सालाबादप्रमाणे ऑन लाईन रिटर्न फाईल केला.

तुमचे अशील करू शकत नसतील तर ती तुमच्यासाठी एक संधी आहे. :)

(ह. घ्या: औद्योगिक आणि व्यापारी लोकांचेही तुम्ही भरत असणार म्हैतेय)

बाकी मस्तपैकी रिटन फिटन भरून निवांत या - आम्ही अधिक माहितीची वाट पाहूत. जमल्यास थोडे म्यु. फंड घेऊन ठेवू.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2015 - 1:45 pm | श्रीगुरुजी

>>> शेअर बाजारः चीन..घसरण…. संकट की संधी'

माझ्या दृष्टीने ही संधी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2015 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही हिंदीतली "संकट की संधी" आहे :)

सुबोध खरे's picture

28 Aug 2015 - 11:01 am | सुबोध खरे

फारच छान लेख.
"चीनच्या पडझडीचा सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर होणारा दूरगामी परिणाम" याबद्दल विस्तृत लेख टाकावा अशी आपणास नम्र विनंती.

मदनबाण's picture

28 Aug 2015 - 11:15 am | मदनबाण

वाचतोय... चीन चे शेअर मार्केट हे जगातले २ रे सर्वात मोठे मार्केट आहे,आणि २०१५ मधील जवळपास सर्व गेन्स या मार्केट क्रॅश मधे वाइप आउट झाल्याचे समजते आहे. २ दिवसांनपूर्वी उदयन मुखर्जींचा लेख मला आवडला होता.
China is a beast no one understands; hold your cash: Udayan
यातला मला सर्वात आवडलेला भाग खाली देत आहे.

Right now what you are hearing from people is basically predisposition. The bullish (investors) will tell you to buy this dip as nothing has changed and India is in a great macro position. The bears will say this is the big breakdown the world was waiting for the last three years and all hell is going to break loose from hereon. However, that is not an insight into the problem. That is basically whether you are bullish or bearish and you are laying out your prediction based on that.
think that is not an accurate kind of hypothesis to go with. So my submission is — and it is not a very helpful one I will say at this point in time — that at the first cut you should not rush out to implement a strategy. Give it a little bit of time. This market is not going to run away; that much is clear. We are not going to 9,100 day after tomorrow, I think that all of us understand that. So when there is no rush, I think you need to just calm down a little bit, not trade every day, not try and catch every short covering bounce or short every rally. This might be slightly bigger than what we have got used to over the last six-nine months. I hope it is a transient phase. So far we have no evidence that the bull market has turned but I think it would be prudent to give it a few days to figure out how big this problem is.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

प्रसाद भागवत १९८७'s picture

28 Aug 2015 - 11:25 am | प्रसाद भागवत १९८७

मस्त माहितीपूर्ण लेख दादा

सुबोध खरे's picture

28 Aug 2015 - 11:30 am | सुबोध खरे

कुणी याचं उत्तर देईल का?
मी जेंव्हा एखादा समभाग घेतो त्यानंतर तो धाड~कन पडतो.
आणी मी एखादा समभाग घेणार म्हणून विचार करत असतो पण घेत नाही नेमका तोच समभाग जोरदार चढत जातो.
हे असं का होतं?
--एक सामान्य गुंतवणूकदार

तुषार काळभोर's picture

28 Aug 2015 - 12:10 pm | तुषार काळभोर

१) आपण तिकीट खिडकी जवळ पोचल्यावर तिकीट देणार्‍याची जेवायची वेळ का होते?
२) एकाहून अधिक रांगा असताना, जर आपण पटपट सरकणार्‍या रांगेत गेलो, तर आपली आधीची रांग जास्त जोरात सरकू लागते.
३) आपण पावसाळ्यात छत्री/रेनकोट न घेता बाहेर पडल्यावर आपण बाहेर असतानाच्या वेळेत पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते.

पगला गजोधर's picture

28 Aug 2015 - 12:18 pm | पगला गजोधर

तुमच्या-माझ्या सारखे रिटेल इन्वेस्टर, जेव्हा शेअर घेतो त्यानंतर ते कोसळतात, व एखादा शेअर विकावा तर त्याच्या पुढच्या आठवड्यापासून नेमका तोच वर शेअर वर चढायला लागतो, असा अनुभव बऱ्याचवेळेला बऱ्याचजनांना आलेला असेलच.
यामागचा करता-करविता फक्त 'तो' असतो, आणि आपण त्याच्या ह्या रंगमंचावर कळसूत्री बाहुल्या प्रमाणे वागत असतो.

'तो' म्हणजे ब्रोकर…हेच लोकं तेजी मंदीचे सापळे रचतात, त्यात सर्वसामान्य माणूस लोभ अथवा भीतीच्या प्रभावामुळे अडकतो.

बाबा पगलानंदजी गजोधरवासी

काळा पहाड's picture

28 Aug 2015 - 11:47 pm | काळा पहाड

कारण अगदी सरळ साधं आहे. तुम्ही एखादया गोष्टी वर विचार तेव्हाच करता जेव्हा त्याच्या बद्दल किंवा त्या सेक्टर बद्दल काही तरी चांगली बातमी तुमच्या कानी येते. उदाहरणार्थ, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये भारत इन्व्हेस्ट करणार हे जाहीर होतं तेव्हा तुम्ही ट्रान्स्पोर्ट, ऑटो, स्टील आणि सिमेंट बद्दल विचार करू लागता. वाईट बातमी ही, की ट्रेडर्स ना ही माहिती पहिल्यापासून असते कारण ते त्या बातमी चा तिच्या इन्सेप्शन पासून पाठपुरावा करत असतात. त्यांना असं वाटलं तर किंवा हवा लागली की सरकार असा निर्णय घेईल, तेव्हापासून ते इन्व्हेस्ट करायला लागतात. तुमचा विचार पक्का होई पर्यंत मार्केट मधला ट्रेंड पक्का झालेला असतो आणि ट्रेडर्स नी फायदा कमावलेला असतो. तुम्ही विकत घेता तेव्हा विकायची वेळ झालेली असते आणि मग शेअर्स विकून फायदा कमावला जातो आणि एक महाग पडलेला शेअर तुमच्या कडे शिल्लक असतो. सर्वसामान्य आणि बहुतांश लोकांचं असंच असतं. त्यात काही नवीन नाही. ट्रेंड ओळखण्याइतका वेळ आपण शेअर मार्केट ला देवू शकत नाही. आपण ट्रेंड फॉलोअर्स असतो, ट्रेंड सेटर्स नाही, त्यामुळे असं होतं.

राघवेंद्र's picture

2 Sep 2015 - 1:43 am | राघवेंद्र

+१

आदूबाळ's picture

28 Aug 2015 - 11:31 am | आदूबाळ

छान लेख!

उत्तम लेख. असेच अजूनही लेखन सातत्याने मिपावर करावे ही विनंती!

कलंत्री's picture

31 Aug 2015 - 1:41 pm | कलंत्री

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4962612588047060657&Se...पैलतीर&NewsDate=20150824&Provider=मूळ लेखक : रामचंद्र गुहा; अनुवाद सुधीर काळे&NewsTitle=नेहरु आणि चीन: एका अपयशाची चिकित्सा

वरील सकाळमधील लेख वाचनीय आणि मननिय असा आहे.

ब़जरबट्टू's picture

31 Aug 2015 - 1:52 pm | ब़जरबट्टू

अर्थात तुमचे सर्व लेख वाचनियच आहेत..

असेच मार्गदर्शन करत राहा.. :)

मित्रहो's picture

31 Aug 2015 - 5:08 pm | मित्रहो

छान माहीती दिली

अभिजीत अवलिया's picture

31 Aug 2015 - 5:28 pm | अभिजीत अवलिया

अतिशय माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.