शेअरबाजारः भुकंप पुन्हा पुन्हा होतात का ?? किंवा भुकंप पुन्हा पुन्हा का होतात??

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
8 May 2015 - 5:56 pm
गाभा: 

04 मार्च 2015 रोजी दिवसांतर्गत 9119 ह्या आपल्या सर्वाकलीन सर्वोच्च पातळीवर गेलेला आपल्या शेअरबाजाराचा निर्देशांक नंतरच्या काळांत मात्र घसरु लागला आणि गेल्या महिनाभरापासुन (15 एप्रिल) ह्या घरसणीने अधिक तीव्र स्वरुप घारण केले आहे. कालची बंद पातळी गेल्या अदमासे 04 महिन्यांतील नीच्चांकी पातळी आहे.

एखादा मोठा भुकंप होवुन गेल्यानंतर तसा भुकंप घडविण्यासाठी कारणीभुत ठरणारा दाब वा Energy पुन्हा लगे्च निर्माण होणे शक्य नसल्याने जरी छोटे धक्के (after shocks) परत परत जाणवले, तरी पहिल्यासारख्या मोठ्या धक्क्यांची पुनरुक्ती होण्याची शक्यता खुप कमी असते असे कोठेसे वाचले होते. (चु.भु.द्या.घ्या.) मात्र बाजारांतील 'भुकंपाच्या' बाबतीत नेमकी याच्या उलट स्थिती दिसते. एक मोठी पडझड बाजारांत मंदीची नवीन आवर्तने सुरु करते असे नेहमी पहायला मिळते. बाजाराची ही मानसिकता 'COCKROACH THEORY' या नावाने ओळखली जाते. ज्याप्रमाणे आपल्याला घरांत दिसणारे एखादेच झुरळ तेशी अनेक झुरळे आजुबाजुला नक्की असल्याची कल्पना देते, तसेच बाजारांत (अर्थातच अचानक) झालेली अशी घसरगुंडी पुढे आणखी वाईट बातम्यांचे ताट वाढुन ठेवले आहे याची खुणगाठ असते....When there is a bad news to the public, there may be many more related negative events that have yet to be revealed.

याचेच प्रत्यंतर म्हणुन की काय, सर्वोच्च पातळी गाठल्यापासुन सुरु झालेल्या घसरणीचा तपशील पाहिला तर त्यापासुन आजपर्यंत झालेल्या 42 सत्रांतील 09 वेळा बाजार एकाच दिवशी 01 टक्यापेक्षा अधिक प्रमाणांत (म्हणजेच 09 वेळा जवळ जवळ 100 अंकांनी) पडला आहे. गाठलेल्या शिखरापासुन तो 10% खाली आला आहे. सहाजिकच आता पुढे काय?? ह्या महिनाभराच्या कालावधीतील 09 वेळा झालेल्या 'सफाई' कारवाईतुन 'झुरळां'चा सफाया झाला असेल की नाही?? हा नेहमीचाच प्रश्न आहेच.

"थांबा, Don’t try to catch a falling knife.." असे कोणीसे म्हटले आहे, असे कोणी मंदीवाले म्हणणार असतील.. तर त्याला उत्तर म्हणुन बॅरॉन रॉथशिल्ड यांचे तितकेच सुप्रसिद्ध 'Buy, when there’s blood in the streets.' हे वाक्य तेजीवाल्यांच्या दिमतीला आहेच. थोडक्यात काय, स्व. सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे 'एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे! हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे?'..अशी स्थिती आहे.

मान्सुन बाबतचे प्रतिकुल अंदाज, निर्देशांकातील कंपन्यांचे अपेक्षाभंग करणारे निकाल,विदेशी गुंतवणुकीवरील टॅक्स बाबत घेतलेले निर्णय असे घटक या मंदीला कारणीभुत आहेत वगैरे कारणांची जंत्री मांडुन मुलभुत विष्लेषण (Fundamental Analysis) कराण्याचा मानस होता पण सकाळीच ऑफिसात आलेल्या आलेल्या एका क्लायंट्ने 'In Fundamentals, you first lose your funds and then you lose your mental....' अशी विचारमौक्तिके मला ऐकवल्याचा परिणाम म्हणुन कंपन्यांचे वार्षिक निकाल,त्यांचे ताळेबंद वा परदेशी गुंतवणुकदरांना आयकर खात्याने बजावलेल्या नोटीसा यावर काही लिहिण्यापेक्षा थोडे तांत्रिक विष्लेषण करु पहातो.

बाजाराचे तांत्रिक विष्लेषण करण्याच्या प्रसिद्ध जपानी 'Candlestics' तंत्राप्रमाणे जेंव्हा आलेखावर (charts) (1) प्रथम एका दिवशी मोठी घसरण होवुन बाजार दिवसातल्या निच्चांकाजवळ बंद होतो(Black Candle) (2)पुढच्याच दिवशी बाजार दिवसभरांत खालच्या वा वरच्या दिशेने मोठ्या हालचाली करतो मात्र बंद होताना सकाळी उघडलेल्या भावपातळीच्या जवळपासच बंद होतो(Doji Candle) (3) आणि पुढच्याच म्हणजे तिस-या दिवशी बाजार आधल्या दिवशीच्या सर्वाधिक भावापेक्षाही वर (Gap up) उघडतो, व दिवसभर तेजीत राहुन आणखी वर बंद होतो(White Candle)...या स्थितीस 'Morning Star Doji'असे म्हणतात.

अशी रचना बाजारांतील विक्रीचा जोर मंदावला असुन मंदीवाल्यांकडुन सुत्रे तेजीवाल्यांकडे जात आहेत असे सुचित करते (का??... हे या तीन दिवसांतील भावपातळ्यांचे वरील वर्णन वाचल्यास अधीक स्पष्ट होईलच)

महत्वाचे हे,की गेल्या चार पाच महिन्यात फक्त दोन वेळा निफ्टी आजच्याच, म्हणजे 8000 पातळीच्या जवळ आला असता दोन्हीही वेळा हीच 'Morning Star Doji' ची स्थिती आलेखावर पहायला मिळाली व तेथुन निर्देशांकाने परत तेजीचा मार्ग अवलंबला आहे.

आजही (दि, 06/07/08 मे दरम्यान) पुन्हा अशीच रचना होताना दिसते आहे.यावरुन बाजाराने तळ (Bottom) गाठला आहे असे म्हणावयाचे का??...तुम्हाला काय वाटते?? -प्रसाद भागवत

प्रतिक्रिया

एस's picture

8 May 2015 - 6:37 pm | एस

सहमत.

बेकार तरुण's picture

8 May 2015 - 7:07 pm | बेकार तरुण

लेख आवडला.
टेक्निकल नसल तरि एक लिंक पेस्ट करत आहे, फ्लोस विषयि आहे, मला चांगला वाटला लेख म्हणुन देत आहे

http://www.business-standard.com/article/opinion/akash-prakash-exit-fiis...

आदूबाळ's picture

8 May 2015 - 7:24 pm | आदूबाळ

>>जेंव्हा आलेखावर (charts) (1) प्रथम एका दिवशी मोठी घसरण होवुन बाजार दिवसातल्या निच्चांकाजवळ बंद होतो(Black Candle) (2)पुढच्याच दिवशी बाजार दिवसभरांत खालच्या वा वरच्या दिशेने मोठ्या हालचाली करतो मात्र बंद होताना सकाळी उघडलेल्या भावपातळीच्या जवळपासच बंद होतो(Doji Candle) (3) आणि पुढच्याच म्हणजे तिस-या दिवशी बाजार आधल्या दिवशीच्या सर्वाधिक भावापेक्षाही वर (Gap up) उघडतो, व दिवसभर तेजीत राहुन आणखी वर बंद होतो(White Candle)...या स्थितीस 'Morning Star Doji'असे म्हणतात.

असं का होतं पण?

लॉरी टांगटूंगकर's picture

8 May 2015 - 8:29 pm | लॉरी टांगटूंगकर

असं का होतं पण ????

+१

प्रसाद भागवत's picture

8 May 2015 - 9:06 pm | प्रसाद भागवत

(1)मंदीच्या भावनेने बाजारात वेग घेतल्यानंतर बाजार वेगाने खाली येवु लागतो, तेजीवाल्यांचा प्रतिकार पुर्ण मोडुन तो दिवसाअखेर मोठी घट दाखवत बंद होतो... (2)मात्र या मंदीचाही जेंव्हा अतिरेक झाल्याचे जाणवते आणि आता यापेक्षा बाजार खाली जाणे अवघड आहे अशी भावना बळावते तेंव्हा आधी मंदीच्या कळपांत असलेले भिडु आपली बाजु बदलायला सुरवात करतात आणि दुसर्या दिवशी तेजी/मंदवाल्यांच्यात निकराची रस्सीखेच होवुन दिवसाच्या सुरवातीचा व बंद होतानाची भावपातळी सारखीच रहाते... याचाच अर्थ आता विक्रीचा जोर मंदावला असा घेतला जातो. (3) बाजारात 'पळा पळा, कोण पुढे पळे तो..' ही नेहमीचीच गोष्ट आहे. मंदीवाले कमकुवत होत आहेत हे पाहुन अनेक जण आपली बाजु बदलतात आणि तिसर्या दिवशी बाजार पुर्णपणे तेजीवाल्यांच्या कह्ह्यात जातो. असे या आकृतीबंधाचे ढोबळ्मानाने आकलन आहे.

हा मध्यमकालीन कलबदल दर्शविणारा संकेत असुन मंदीच्या मोठ्या आवर्तनानंतर आढळल्याच त्याची खरे ठरण्याची शक्यता जास्त असते. शिवाय केवळ या बरोबरच काही आणखी 'पॅटर्न्स'नी कलबदलाच्या संकेताची पुष्टी केली अथवा नाही हे पहाणेही आवश्यक ठरते.

जाता जाता... हवामान शास्त्राप्रमाणे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की पाउस पडतो,हस्तरेषा सामुद्रिकानुसार हातावर सुर्य,शंखादी चिन्हे आढळल्यास त्या व्यक्तीच्या नशीबी 'राजयोग' असतो असे म्हणतात. पण असा पट्टा वा चिन्हे का निर्माण होतात हे सांगणे थोडेसे कठीणच नाही का??

सुबोध खरे's picture

8 May 2015 - 8:30 pm | सुबोध खरे

गमतीची गोष्ट -- शेअर बाजाराचे तांत्रिक विश्लेषक हे अत्यंत बेभरवशाचे लोक आहेत असे माझे मत झाले आहे. याची पुष्टी देणारा एक विदा माझ्या कडे आहे. सुदर्शन सुखानी नावाच्या या तांत्रिक विश्लेषकाने ३० मार्च ला इंडिया सिमेंट हा समभाग अतिशय चांगला आहे आपल्याजवळ ठेवा विकू नका( RIPE FOR BIG RALLY) असा सल्ला दिला. १ एप्रिल ला हा समभाग अत्यंत बे भरवशाचा असल्याने विका म्हणून सल्ला दिला( FOR THE NEXT SIX MONTHS OUTLOOK IS HAZY )
आणी ६ एप्रिल ला हाच समभाग विकत घ्या (कारण पुढच्या सहा महिन्यात हा जोरदार चढेल) असा सल्ला दिला.
पाच सहा दिवसात तीन परस्पर विरोधी सल्ले गुंतवणूकदाराना(INVESTOR) (सट्टेबाजाना TRADER नव्हे) दिले आहेत. हे सल्ले मनी कंट्रोल या वेब साईट वर दिले होते (ते त्यांनी आता काढून टाकले आहेत)
असे असताना आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाने कुणावर भरवसा ठेवावा.
शेअर बाजारात माझे मत एकच आहे -ऐकावे जनाचे आणी करावे मनाचे
ता क-- कुणाला वरील विदा हवी असेल तर WHATS APP वर मी पाठवू शकतो. मला ९८१९१७००४९ वर संपर्क करा.

सुधीर's picture

8 May 2015 - 9:00 pm | सुधीर

तांत्रिक (टेक्निकल) विश्लेषणावर माझाही विश्वास नाही.

प्रसाद भागवत's picture

8 May 2015 - 9:48 pm | प्रसाद भागवत

@डॉ.साहेब.... मी स्वतःला 'तांत्रिक विष्लेषक' समजत नाही आणि अन्य कोणाही विष्लेषकाचे समर्थन करण्याचा माझा हेतु नाही हे आधीच स्पष्ट करतो. याशिवाय आपण केलेल्या 'शेअर बाजाराचे तांत्रिक विश्लेषक हे अत्यंत बेभरवशाचे लोक आहेत,.... या विधानामागे आपला मोठा अभ्यास असणारच अशी खात्रीही आहे तरीही असे वाटते की केवळ एखादे उदाहरण देवुन संपुर्ण पेशाला संशयास्पद ठरवायचेच झाले तर मग तसे कोणत्याही व्यवसायाबाबत बोलता येईल.

जाता जाता आपला रोख तांत्रिक विश्लेषक 'जमातीवर' आहे आणि तो तांत्रिक 'विश्लेषण' शास्त्रावर नाही असे मानतो.

बेकार तरुण's picture

9 May 2015 - 8:56 am | बेकार तरुण

डॉ साहेब, एक सांगु का, सुदर्शन सुखानि आणी तत्सम अश्वनि गुजराल यांचे टेक्निकल ऐकतहि जाउ नका.
बैठकिचा गाणारा आणी गल्लभरु गाणारा यात जो फरक असतो, तोच इथेहि आहे. ह्या लोकांच्या स्वताच्य ब्रोकरेज आणी अ‍ॅड्वायसरि फर्म्स असतात आणी त्याचे पद्धतशीर मार्केटिंग करायला हे लोक स्वता सी एन बीसी ला पैसे देउन टी व्ही वर येत असतात. आणी ते कधिच त्यांचा खरा मनी मेकींग फॉर्म्युला टी व्ही वर फुकटात सांगत नाहित हे आपण लक्षात घेतल पाहिजे.
तसच अनेक प्रणाली प्रमाणे (इन्व्हेस्टमेंट स्टाईल) टेक्निकल ही पण एक प्रणालि आहे. बाजारात कोणतिच एक प्रणाली सगळ्यांना सदैव यश देत नाहि. उदा. बफेट साहेबांना फॉलो करत अनेक जण व्हॅल्यु इन्व्हेस्टिंग करतात, पण भारतात मला तरि ५ ६ माहित आहेत जे यशस्वी आहेत.
तुम्हाला ह्या बाजारात पैसे बनवायचे असतिल तर तुम्हि म्हणता तस आपल्याला जे झेपतं, समजतं, आणी पटत तेच कराव. फक्त जे करु ते का केलं ह्याचं उत्तर स्वताला पक्कं माहित हवं. थोडक्यात - one should know his risk reward in every trade that he enters. if not, then one shouldnt enter the trade and rather keep money in fixed deposit. जेव्हा आपण कोणाचंतरि ऐकुन खेळायला जातो तेव्हाच सक्क्सेस प्रॉबाबिलिटि कमि आहे, हे स्वताला माहित पाहिजे, तरच तसं कराव.

प्रसाद१९७१'s picture

11 May 2015 - 3:12 pm | प्रसाद१९७१

डॉक्टर साहेब - ज्याला कुठल्याही शेयर चे किंवा मार्केट चे उद्या, पुढच्या ३-६ महीन्यात, पुढ्यच्या वर्षात काय होणार हे जर माहीती असेल तर तो स्वता लागले तर कर्ज घेउन पैसे नाही का घालणार? दुसर्‍यांना सल्ले विकतोय म्हणजेच त्याला त्याच्या सल्ल्या बद्दल काडीचीही खात्री नाही.

प्रसाद भागवत's picture

11 May 2015 - 3:23 pm | प्रसाद भागवत

(१) राहिली गोष्ट विश्लेषकांची... टीव्ही वर झळकणार्या महानुभावांबद्दलचे आपले मत बरोबरही असु शकेल, मात्र आपल्या आधीच्या पोस्ट मध्ये आपण 'तांत्रिक विश्लेषक' असा उल्लेख करुन संभ्रम निर्माण केला आहे. आपले म्हणणे जरी खरे मानलेही, तरी आपण दिलेल्या उदाहरणांत 'तांत्रिक विश्लेषणाचा' काहीही संबंध नाही. ते फक्त एका तथाकथित निष्णात विश्लेशकाचे मत आहे ते देताना कोणतेही तांत्रिक विश्लेषण करुन दिलेले नाही.

(२) 'शेअर बाजारात माझे मत एकच आहे -ऐकावे जनाचे आणी करावे मनाचे.....' खरे तर.हा न्याय केवळ शेअरबाजारापुरताच नव्हे तर आयुष्यातील सर्वच निर्णयांनाच लागु होत नाही काय??. आणि 'करावे मनाचे' म्हणजे 'मनाला वाटेल ते करावे' असे नाही. मग हे 'मनाचे' योग्यपणे करण्यासाठी जो अभ्यास,पुर्वतयारी, करावी लागते, त्यासाठीच या वेगवेगळ्या विष्लेषण पदध्ती उदयास आल्या आहेत. त्यांच्याही निश्चितपणाने मर्यादा आहेत आणि या मर्यादेत राहून जर आपण तांत्रिक विश्लेषण शास्त्राचा वापर केला तर त्याचा नक्की फायदा होतो.(हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.)

(३) शेअर बाजारात नवमध्यमवर्ग उतरतो आपले हात पोळून घेतो आणि नुकसान करून बाहेर पडतो. - माझ्या कै. पणजोबांपासुन ते आजतागायत कोणीही,(माझे आजोबा, वडील आई, आत्या, मामा, मावश्या ई.) शिक्षकाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पेशांत नाही. शेअर बाजारातील व्यवसाय हा स्मगलिंग एवढा्च धोकादायक... अशा वातावरणांत सुरवात करुन, या क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभुमी वा आर्थिक पाठबळ नसताना मी गेले २४ वर्षे या व्यवसायांत आहे, अगदी हजारो नव्हे पण किमान शेकडाभर नवमध्यमवर्गीन गुंतवणुकदार माझ्या प्रयत्नांनी बाजाराकडे वळले व आजही सुखाने बाजाराशी संलग्न आहेत. सहाजिकच आपल्या मताकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोण स्वानुभवावर आधारित आणि वेगळा आहे.

मराठी मध्यम वर्गास सारखे सावधपणाचे सल्ले देणे हे संसर्गजन्य रोगांच्या वेळी होणा-या अतिरेकी प्रचारासारखेच नाही काय?? जरी त्यातील तपशील बरोबर आणि हेतु प्रामाणिक असला तरी त्यातुन अनावश्यक भीती वाढीस लागुन अतिम परिणाम अनेकदा नकारात्मक होतो असे माझे भाबडे मत आहे.

बाकी आपले वय, अनुभव आणि कर्तुत्व वादातीत आहे आम्हा मिपाकरांना मार्ग्दर्शन करण्याचा आपल्याला हक्क्च आहे.आपल्या प्रतिक्रियांचे स्वागतच आहे. गैरसमज नसावा.

सुबोध खरे's picture

11 May 2015 - 3:41 pm | सुबोध खरे

भागवत साहेब
दुर्दैवाने एक चांगला सल्लागार गाठण्यापेक्षा लोक बाजारातील उडती खबर ऐकून पैसे गुंतवतात आणि आपले हात पोळून घेतात.PEOPLE BUY ON RUMOUR AND SELL ON NEWS.
मुळात आर्थिक सल्लागाराला पैसे द्यावेत हेच कित्येक लोकांना पटत नाही याचीकारणे अनेक आहेत. १) मी सर्वात शहाणा हे पहिले कारण, २) त्याची खात्री काय हि भीती, ३)लोभ आणि भय या दोन्हीच्या कात्रीत सापडलेला माणूस एका रात्रीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो पण १५ ते २० टक्के स्थिर उत्पन्न मिळेल सांगणार्या सल्लागाराला पैसे देण्याची वृत्ती दिसत नाही. ४) बर्याच लोकाना वाटते कि हि सर्व माहिती जालावर उपलब्ध आहे मग मी पैसे का मोजायचे?
मला विचाराल तर कुणालाही फुकट सल्ला कधीही कोणालाही देऊ नका.(अगदी स्वतःच्या सासर्यानाही).माझे स्वतःचे विचाराल तर मी माझ्या निवृत्तीच्या वेळेस मिळालेले भविष्य निर्वाह निधीचे पैसे शेअर बाजारात गुंतवले.डोक्यावर घराचे आणी दवाखान्याचे कर्ज घेऊन निवृत्त झालो. ( मला निवृत्ती वेतन नाही) बायकोला सांगितले कि हे पैसे बुडाले असे समज. तुझ्या दोन वेळच्या जेवणाची सोय करीन हि धमक माझ्यात आहे. आता स्वताच्या पैशाने व्यवहार करून मी येथपर्यंत आलो. म्हणून मी कुणालाही काहीच सल्ला देत नाही. हा नाक्यावर चर्चा करण्याचा(TEA TIME TALK) विषय नाही.

टवाळ कार्टा's picture

8 May 2015 - 9:04 pm | टवाळ कार्टा

शिस्तीत sip करावी

पगला गजोधर's picture

9 May 2015 - 1:58 pm | पगला गजोधर

म्हणजे कोल्हापूर साइड का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2015 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

फंडामेंटल्स (मूलभूत तत्वे) :

कंपनीचा दीर्घकालीन फायदा-तोटा त्यांच्या फंडामेंटल्सवर बराचसा अवलंबून असतो यात संशय नाही.

परंतू कंपनीच्या समभागांचे बाजारभाव खरेदीदारांच्या मानसीकतेवरही (हाव आणि भय; greed and fear) बराचसे अवलंबून असतात. म्हणुनच...
(१) काही कारणाने बाजारभाव पडू लागले की उत्तम फंडामेंटल्स असलेल्या आणि त्या कारणाशी तडक संबंध नसलेल्या कंपन्याचे भावही खाली जातात... तर
(२) काही कारणाने बाजारभाव वर जाउ लागले की उत्तम फंडामेंटल्स नसलेल्या आणि त्या कारणाशी तडक संबंध नसलेल्या कंपन्याचे भावही वर जातात.

त्यामुळे, फंडामेंटल्स महत्वाचे असले तरी त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून न राहता त्यांचा बाजाराच्या मानसिकतेबरोबर विचार करून...
(अ) पहिल्या उदाहरणातील परिस्थितीत असलेले समभाग खरेदी करावे
(आ) फंडामेंटल्स सबळ नसणारे समभाग खरेदी करू नयेत. पण, जर ते अगोदर खरेदी केले असतील तर दुसर्‍या उदाहरणातील परिस्थितीत शक्य तेवढा फायदा वसूल करण्यासाठी अथवा तोटा कमी करण्यासाठी ते विकून टाकावे (booking a profit or reducing loss)...
ही युद्धनीति बहुदा यशस्वी ठरते.

तुमच्या गुंतवणूकीशी लग्न करू नका (Do not marry your investments.) :

याचा वाक्याचा साध्या भाषेतला अर्थ असा की कोणतीही खरेदी "मरेपर्यंत विकणार नाही" या मानसिकतेने केली तर ती गुंतवणूक राहत नाही तर भावना बनते. उदा. जे तुम्ही विकायचा विचारही करू शकत नाही असे स्वतःचे राहते घर, दागीने, इ तुमच्या मालकीच्या आणि अभिमानाच्या वस्तू नक्कीच असतात पण त्यांना गुंतवणूक समजू नका... कारण जर जी गोष्ट तुम्ही कधी विकणारच गोष्ट तिची किंमत कितीही पटींनी वाढली तरी ती केवळ तुमच्या (सुखकारक) भावनेत राहते, पण ती वसूल केली जात नाही.

थोडक्यात, ज्या गोष्टी तुम्ही (instruments) फायदातोटा पाहून विकत घेऊ शकता आणि फायदातोटा अथवा गरज पाहून विकू शकता केवळ तेवढ्याच गोष्टी तुमच्यासाठी गुंतवणूक होऊ शकतात.

=========

'In Fundamentals, you first lose your funds and then you lose your mental....'

हे वाक्य फार्फार आवडलं. =))

उगा काहितरीच's picture

9 May 2015 - 8:42 am | उगा काहितरीच

आवडला लेख !

सुबोध खरे's picture

9 May 2015 - 10:00 am | सुबोध खरे

@ भागवत साहेब
तांत्रिक विश्लेषण हे शास्त्र आहेच परंतु ते हवामान्खात्यासारखे १०० % भाकीत वर्तवू शकत नाही याचे कारण मानवी मनोवृत्ती हि हाव, लोभ, भीती, आणि बेभरवशीपणा याचे मिश्रण असल्याने मानवी मनोवृत्तीचे नक्की विश्लेषण होऊ शकत नाही. या मर्यादेत राहून जर आपण तांत्रिक विश्लेषण शास्त्राचा वापर केला तर त्याचा नक्की फायदा होतो.
राहिली गोष्ट विश्लेषकांची-- बेकार तरुण यांनी लिहिल्याप्रमाणे हे लोक आपली पोळी भाजण्यासाठी शेअर बाजारात समभाग अक्षरशः खेळतात. एक उदाहरण म्हणून बेडमुथा नावाचा एक समभाग त्यांनी बाजारात उतरवला त्यावेळेस जो तो बेड मुथा बद्दल बोलत होता. याचे कार्यालय मुलुंड पूर्वेला गवाणपाडा येथे एका इमारतीत होते. ते प्रत्यक्ष पाहिल्यावर मला हा सर्व चावटपणा लक्षात आला. हा १० रुपयाचा समभाग ११० ला उघडला हा चढवत चढवत त्यांनी २८६ पर्यंत नेला स्वतःचे समभाग विकून त्यांनी फायदा कमावला आणि आता २०१२ पासून गेली तीन वर्षे हा समभाग रुपये पाच ते रुपये २० यात हेलकावे खात आहे. अशीच अजून अनेक उदाहरणे मी पाहत आलो आहे.
ज्या नवीन मध्यम वर्गीय गुंतवणूक दारांनी या डांबरट लोकांचे ऐकून यात पैसे गुंतवले त्यांचे भांडवल सुद्धा परत मिळणार नाही अशी परिस्थिती करून ठेवली आहे. बर्याच लोकांचे वर्तमानपत्र किंवा मासिके वाचून शेअर बाजारात पैसे गुंतवले पाहिजेत असे प्रबोधन केले जात असताना मोठा मराठी मध्यम वर्ग या लोकांच्या चावट पणामुळे भ्रमनिरास होऊन शेअर बाजाराकडे पाठ फिरवताना दिसतो आणि परत बँकेच्या मुदत ठेवेत पैसे गुंतवताना दिसतो. ( निदान मुद्दल तरी सुरक्षित राहील या भावनेने)
येथे या गोष्टी आणण्याचे मुळ कारण हे आहे कि शेअर बाजारात नवमध्यमवर्ग उतरतो आपले हात पोळून घेतो आणि नुकसान करून बाहेर पडतो. मग नवीन पिढी येते हात पोळून परत बाहेर पडते. असा परिणाम मी गेली २० -२५ वर्षे पाहत आलो आहे. मिपा वर अनेक सदस्य नसलेले लोक हि वाचन करत असतात त्यांना सावध करण्यासाठी हा प्रपंच.
बाकी एक्का साहेबांचे विवेचन फारच छान आहे (Do not marry your investments.) :किंवा In Fundamentals, you first lose your funds and then you lose your mental.
आपणा सर्वाना धन्यवाद

पिवळा डांबिस's picture

9 May 2015 - 12:00 pm | पिवळा डांबिस

मिपा वर अनेक सदस्य नसलेले लोक हि वाचन करत असतात त्यांना सावध करण्यासाठी हा प्रपंच.

इसके लिये डॉक्टरसाहब, हम आपकी दाद देतें हैं|
आम्ही काही वर्षांपुर्वी मिपावर हाच सल्ला दिला आणि लोकांच्या पोटभर शिव्या खाल्ल्या!!!! :)
अरे लोकं आयुष्यभर मेहेनत करून एकाधदोन करोडचा फंड जमवतात, त्यांना कसं सांगायचं की ह्या शेअरमध्ये गुंतवा आणि त्या शेअरमध्ये गुंतवा म्हणून?
आणि उद्या त्यांना घाटा आला तर ते पाप कुणी डोक्यावर घ्यायचं?
धंदेवाईक सल्लागारांची गोष्ट वेगळी, आधुनिक वाल्या कोळीच ते!!!!
:)

सुबोध खरे's picture

9 May 2015 - 12:45 pm | सुबोध खरे

पि डां साहेब
माझ्या दवाखान्याच्या शेजारच्याच विंग मध्ये माझा शेअर ब्रोकर आहे. तेथे बाजार चढत असेल तर हवशे, नवशे आणि गवशे लोकांची गर्दी असते. मी क्वचित कधी तेथे जातो. दोन वर्षापूर्वी एकदा तेथे बसलो असता मला दवाखान्यातून मिस्ड कॉल आला मी लगेच उठलो तर एक वरिष्ठ नागरिक म्हणाले डॉक्टर बसा हो आता बाजार चढतो आहे.
मी त्यांना विचारले साहेब मी डॉक्टरी शिकायला साडे अकरा वर्षे घेतली. त्यानंतर आज त्याविषयात माझ्याकडे २० वर्षाचा अनुभव आहे. या बाजाराबद्दल माझे शिक्षण किती - शून्य आणि वर त्यातिल अनुभव किती सात वर्षे. मी जो रुग्ण पाहायला जातो आहे तो मला जे पैसे देऊन जाणार आहे तो माझा नक्की मिळणारा नफा. शेअर बाजारात सट्टा खेळणे मला झेपणारे नाही. मी पैसे गुंतवतो आणि थंड बसतो १४-१५% नफा मिळाला. बस झाले.
मी तुम्हाला पंचतंत्रातील एक गोष्ट सागतो. एकदा एका लांडग्याने एक गाढव धरले आणि तो त्याला खाणार तर गाढव त्या लांडग्याला म्हणाले. माझ्या मागच्या पायात काटा मोडला आहे. तो तू काढून टाक म्हणजे मला खाताना तुला त्रास होणार नाही. या सल्ल्यावर तो लांडगा काटा कुठे आहे ते पाहायला गेला असता गाढवाने सणसणीत लाथ मारली ज्यामुळे लांडग्याचे सर्व दात पडले. तेंव्हा तेथून जाणारा एक कोल्हा त्या लांडग्याला म्हणाला तुझ्या बापाने तुला खाटकाचा धंदा शिकवला होता तो सोडून वैद्याचा धंदा करायची काय गरज होती? बरी अद्दल घडली.
असेच आहे माझा मूळ धंदा डॉक्टरीचा तो व्यवस्थित करतो मग पुढे पाहू.

hitesh's picture

11 May 2015 - 5:30 am | hitesh

..

भागवत सर, बाकीच्यांचं सोडा, मला सल्ला द्या... सध्या अजून 3-4 महिने शोर्ट सेलिंग चा सीजन दिसतोय, तर मला सेन्सेक्स मधले तुमच्या अत्यंत पसंतीचे 6 शेअर सांगा हो, लोंग टर्म (10 वर्ष कालावधी गुंतवणुकी)करिता.

प्रसाद भागवत's picture

11 May 2015 - 3:51 pm | प्रसाद भागवत

जर आपण 10 वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवुन पैसे गुंतवु पहात असाल तर आपणास एखाद्या विशिष्ट शेअरसाठी निवड प्रक्रिया अवलंबण्याची गरज नाही. आपण निफ्टीच्या ईंडेक्स फंड मध्ये पैसे गुंतवावे आणि निश्चिंत व्हावे, असे मी सुचविन..

मात्र प्रत्येकास प्रत्येक गुंतवणुकीसाठी एवढा दीर्घकालीन विचार करणे जमेलच असे नाही. आता माझेच पहा ना, माझे प्रतिमाह किराणामाल आणि दुघाचे बील ई. याच व्यवसायावर अवलंबुन असल्याने दीर्घकालीन गुंतवणुक तत्वांवर विश्वास असुनही प्रत्येकवेळी असा दीर्घकालीन विचार नाही करता येत. 'मरणानंतर स्वर्ग मिळवुन देणार्या धर्मापेक्षा जिवंतपणी भाकरी देणारा धर्म मला अधिक जवळचा वाटतो..' असे एका प्रख्यात तत्व्वेत्याने म्हटले आहे. तसे दहावर्षांनंतरची उज्ज्वल स्थिती पहायला जगायला हवे असेल तर मधल्या काळांत काहीतरी कमवायलाच हवे.तेंव्हा मध्यमकालीन(वर्षभराच्या कलावधीसाठी) गुंतवणुक नीती ही तितकीच आवश्यक ठरते. मी अशा अल्प/मधयम्कालीन गुंतवणुकीसाठी( डे ट्रेडिंग नव्हे) सध्या ICICI Bank आणि Reliance Ind. या दोन समभागांची निवड केली आहे.

अतिशय महत्वाचे म्हणजे हा माझ्यापुरता मी घेतलेला निर्णय असुन कोणासही दिलेला सल्ला नाही. हे मी का केले याची कारणे मी येथे देण्यात वेळ घालवणार नाही. यातुन किती नफा होईल (खरेतर नफा होईलच) याचीही कसलीही हमी नाही

मराठी_माणूस's picture

11 May 2015 - 4:35 pm | मराठी_माणूस

निफ्टीच्या ईंडेक्स फंड मध्ये पैसे गुंतवावे

म्हणजे निश्चित कुठे ? कोणती ए एम सी, फंडाचे नाव काय ?

प्रसाद भागवत's picture

11 May 2015 - 5:22 pm | प्रसाद भागवत

कोणतीही चालेल. त्यातल्या त्यात मोठी गुंतवणुक (corpus) असलेली योजना अधीक चांगली. उदा. Goldman Sachs Nifty Exchange Traded Scheme...(गुंतवण्यापुर्वी योजनेची संपुर्ण माहिती, तीची संभाव्य धोकापातळी व अन्य बाबी समजावुन घ्या. अशा योजनांत नफ्याची कोणतीही हमी कोणीही देत नाही याचीही नोंद घ्या)

सुनील's picture

12 May 2015 - 8:00 am | सुनील

१० वर्षे हा फारच मोठा कालावधी झाला. ३-४ वर्षांकरीता म्हणाल तर, फ्रँकलीन टेम्पल्टनच्या इक्विटी किंवा युटीआयच्या एमएनसी फंडाचादेखिल विचार करावा.

(हा गुंतवणूक सल्ला नाही!)

पगला गजोधर's picture

11 May 2015 - 4:22 pm | पगला गजोधर

निफ्टीच्या ईंडेक्स फंडात गुंतवणूक हा एक चांगलाच सल्ला आहे. (तुम्ही इ टी एफ म्हणत आहात असे मी इथे गृहीत धरतो)

प्रसाद भागवत's picture

11 May 2015 - 5:33 pm | प्रसाद भागवत

होय.बरोबर...आणि हो, मला 'सर' म्हणुन संबोधल्याने अवघडायला होते हो. ..

पगला गजोधर's picture

13 May 2015 - 12:10 pm | पगला गजोधर

सेन्सेक्स ३० मधल्या शेअर्सचा, विश्वसनीय रिअलटाइम ऑनलाईन PEG रेशो (पी इ ग्रोथ) कोठे पाहायला मिळतो ?? किंवा कसा मिळवायचा याबद्दल आपण मार्गदर्शन करू शकाल काय ?

* जुना प्रतिसाद संपादित केला आहे

प्रसाद भागवत's picture

13 May 2015 - 10:28 am | प्रसाद भागवत

PEG रेशो संदर्भात आपल्या 'रिअलटाइम ऑनलाईन' ह्या विषेषणांनी माझा थोडासा गोंधळ उडालाय. एखाद्या समभागाचा(share) भाव, त्याचे उपार्जन(EPS) यांचे गुणोत्तर म्हणजे PE रेशो होय. आणि ह्या गुणोत्तराला पुन्हा EPS मधील वाढीच्या दराने भागणे म्हणजे PEG रेशो येतो.

आता या सर्व आकडेमोडीत अशा समभागाचे उपार्जन(EPS) हा एक महत्वाचा घटक आहे जो प्रत्येक ०३ महिन्यानी जाहीर होतो. याचच अर्थ असा की हा PEG रेशो दर ०३ महिन्यांनीच बदलतो. तेंव्हा असा बर्यापैकी स्थिर असलेल्या घटकाच्या (factor)पडताळणीसाठी 'रिअलटाइम ऑनलाईन' आकडेवारीची गरज आहे काय??. ही माहिती अशा पद्धतीने उपलब्ध असलेली मी पहिलेली नाही मात्र काही ब्लॉग्जवर अशी आकडेवारी नियमितपणे येत असते. मला मिळाली तर अवश्य शेअर करेन. असो. (आपण जर आधी पहिले नसतील तर) खालील दुवे अवश्य पहावे. http://people.stern.nyu.edu/adamodar/New_Home_Page/lectures/peg.htm
http://www.fool.com/investing/general/2008/09/19/dismantling-the-peg-rat... .धन्यवाद.

पगला गजोधर's picture

13 May 2015 - 12:12 pm | पगला गजोधर

:)

"एफिशिअंट मार्केट हायपोथेसिस" नुसार बाजार जर "विक फॉर्म एफिशिअंट" असेल तर टेक्निकल अ‍ॅनालिसिस "जास्तीचा" फायदा देऊ शकणार नाही. (समभागांच्या किंमतीत भूतकाळातल्या किंमती आणि आकार-व्हॉल्यूम समाविष्ट असतात). बाजार जर "सेमी स्ट्राँग फॉर्म एफिशिअंट" असेल तर फंडामेंटल अ‍ॅनालिसिसही "जास्तीचा" फायदा देऊ शकणार नाही. (समभागांच्या किंमतीत पब्लिक इन्फो समाविष्ट असते). प्रश्न हा उरतो, मार्केट एफिशिअंट असते का दरवेळी? आणि दरवेळी मार्केट पार्टीसिपंट्स रॅशनल डिसिजन मेकर्स असतात का? याचं उत्तर बिहेविअरल फिनान्स मध्ये आहे. हे निश्चित की बाजार इक्विलिब्रिअम कडे नेहमी सरकत राहतो. फंडामेंटल अ‍ॅनालिसिस माझ्या मते तर योग्य आहेच, पण इकॉनॉमि आणि इंडस्ट्रीचं (पोर्टर्सच्या ५ फोर्सेसला अनुसरुन) अचुक वा जवळ जाणार चित्र जो पाहू शकतो तो चांगला पैसा लाँग टर्म मध्ये कमवू शकतो असे मला वाटते. "बाय राईट सिट टाईट" यावरही काही लोकांचा विश्वास आहे. बाजार नेहमी पुढल्या घटना गृहित धरणरा असल्याने (फॉर्वर्ड लुकींग) बर्‍याचवेळा व्हॅल्यूएशन इतके स्ट्रेच असते की गूड फंडामेंट्ल्स आणि गूड ग्रोथ प्रॉस्पेक्ट असलेल्या कंपन्या खरेदी करताना धाकधूक होते (नेहमीचाच व्हॅल्यू विरूद्ध ग्रोथ तिढा). त्यामुळे व्हॅल्यूएशन्स लाही खूप महत्त्व आहे असेही मला वाटते.

काही प्रतिशब्द आयत्या वेळेला सुचले नाहीत. क्षमस्व..:(

अगा आयायायायायायायाया..बाबो !!!
काहीतरी समजेल असं बोला की हो ...

सुधीर's picture

13 May 2015 - 2:26 pm | सुधीर

थोडा धिसडघाईत लिहिलाय... :( इतर मिपाकर कदाचित माझ्यापेक्षा चांगले समजवू शकतील....

थोडक्यात इतकचं की, व्हॅल्यूएशन्स (योग्य किंमत शोधणं) हे फंडामेंटल वा टेक्निकल्स अ‍ॅनालिसिस पेक्षा अधिक महत्वचं आहे असं मला वाटतं.

वॉरन बुफे स्टाईल काय ? सुधीरसर !

सुधीर's picture

13 May 2015 - 5:47 pm | सुधीर

बहुतेक हो. ग्रोथ स्टॉकची वाजवी पेक्षा जास्त असलेली किंमत न्याय्य वाटत असेल तर ग्रोथ स्टॉक्स खरेदी करण्यासही हरकत नाही.

बेकार तरुण's picture

14 May 2015 - 2:42 pm | बेकार तरुण

आपण म्हणता ते बरोबर आहे सुधीर साहेब. पण "एफिशिअंट मार्केट हायपोथेसिस" ही कन्सेप्ट खूपच पुस्तकी आहे.
तसच आपल पोर्टर्सच्या ५ फोर्स तत्व वापरण अत्यंत महत्वाच आहे. भारता सारख्या मार्केट मधे व्हॅल्यु इन्व्हेस्टिंग करणं फारस शक्य नाहिये. ह्याला २ ३ मुख्य कारण आहेत. त्यातिल उदा साठि आपण जर एच डि एफ सी किंवा नेस्ट्ले हे शेअर्स पाहिले तर असं लक्षात येईल कि हे २हि अनेक वर्ष फंडामेंटल द्रुष्ट्या महागच आहेत. पी ई बघा अथवा पी बी. पण तरिहि ह्या कं मधे लोकानि परतावा मिळवला आहेच. ते महाग आहेत कारण प्रेडिक्टेबल ग्रोथ, क्वालिटि मॅनेजमेंट, तसच पोर्टर नुसार की कॉम्पिटिटिव्ह अ‍ॅड्व्हन्टेजेस वगैरे आहेत.
बर्याच वेळा ग्रॉथ स्टॉक्स मधे हि तत्वे वापरुन खरेदि करावि (लाँग टर्म फायद्या साठि). तसहि योग्य किंमत आणी योग्य वेळ साधण फारच अवघड गोष्ट असते. आणि ग्रॉथ मार्केट मधे तर अजुनच.
व्हॅल्यु इन्वेस्टिंग वाचायला खूप छान आहे, पण ते अमलात आणणं तितकच अवघड आहे. भारतात खूपच कमी वेळा अश्या संधी मिळतात आणी त्यावेळि त्याचं सोनं करायला खूपच हिंमत पाहिजे. भिति आणी हाव ह्या भावनांना बाजुला ठेवुन इन्व्हेस्ट करण जवळ जवळ अशक्य असतं. कारण संधी मिळेल तेव्हा चोहोबाजुला भितिचं वातावरण असत, आठवा निफ्टी @ ४४०० !!
तेव्हा थोडक्यात चांगली मॅनेजमेंट, आपल्याला कळेल असा धंदा आणी सस्टेनेबल लाँग टर्म अ‍ॅडव्हांटेज असलेल्या कं मधे पैसे गुंतवावेत. टाटा ग्रुप कं हे एक उदा असु शकतं
ही पूर्ण पणे माझी मते आहेत, कुठलाहि सल्ला नाहि. काहि शब्द ईंग्रजीच वापरले आहेत, त्याबद्दल माफी मागतो, पण मला मराठि शब्द वापरण्यापेक्षा अर्थ पटकन कळायला ईंग्रजी योग्य वाटले.

सुधीर's picture

14 May 2015 - 4:16 pm | सुधीर

ती कॉन्सेप्ट पुस्तकीच (आदर्श) आहे यात वाद नाही. भावनांचा खेळ असतोच. सगळेच जण दरवेळेला तार्किक निर्णय घेत नसतात.
"व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट विदीन ग्रोथ स्टॉक्स" हे मी गृहीत धरलं होत. म्हणूनच मी वर हेही म्हटले आहे.
"ग्रोथ स्टॉकची वाजवी पेक्षा जास्त असलेली किंमत न्याय्य वाटत असेल तर ग्रोथ स्टॉक्स खरेदी करण्यासही हरकत नाही."
व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट म्हणजे सरसकट स्वस्तातली कंपनी असे मला अभिप्रेत नाही. ग्रोथ कंपन्या प्रिमिअम (अधिकची किंमत) मध्ये उपलब्ध आहेत. येवढचं म्हणणं आहे की ते प्रिमिअम न्याय्य आहे का ते ही पाहिले पाहिजे. सेक्टर लिडर्स कंपन्यांचे प्रिमिअम कधीच कमी होणार नाही जर सेक्टरची एक्सपेक्टेड ग्रोथ इकॉनॉमिच्या एक्सपेक्टेड ग्रोथ पेक्षा जास्त असेल. अशा कंपन्या विथ प्रिमिअमच खरेदी कराव्या लागतात.

बेकार तरुण's picture

14 May 2015 - 4:28 pm | बेकार तरुण

अ‍ॅग्रीड
मार्केट मधे अनेक स्ट्रेटेजीज असतात, आणी काहि प्रमाणात सगळेच परतावा मिळवतात. आपण काय निवडवे ते आपल्यावर असते.

कपिलमुनी's picture

13 May 2015 - 5:33 pm | कपिलमुनी

हा जे सांगेल त्याच्या उलट करत रहावे , फायद्यात रहाल .
मी आणि अजुन काही मिपाकराम्च्या प्रत्यक्ष अनुभवावरून सांगत आहे

बफेट बाबा म्हणतो की सगळी अंडी एकाच बास्केट मध्ये ठेऊ नये !

१. पण पूर्ण कुटुंबाच पोट भरल्यावर माझ्याजवळ जर एकंच अंड शिल्लक राहत असेल आणि मला ते बास्केट मध्येच ठेवायचं असेल तर कोणती बास्केट निवडावी ?
२. जर ५-६ अंडी असतील तर वेगवेगळ्या बास्केट्स कश्या निवडाव्या यासाठी काही बेसिक नियम आहेत का ?
३. डे ट्रेडिंग न करता जर वर्षानुवर्षे (साधारण १० वर्षे) शेयर्स जमा करायचे असतील तर बफेट बाबाचा नियम मानावा का ?
४. घरातले काही जुजबी खर्च (महिन्याचा भाजीपाला किंवा मोबाईल बिल किंवा तत्सम काही ) शेयर मार्केटच्या भरवश्यावर निभवायचे असल्यास काही निवडक बास्केट्स आहेत का ?

शेयर मार्केटच्या अस्थिरतेबाबत अस्मादिकांना कल्पना आहे. वरील प्रश्न फक्त ढोबळ अंदाज यावा यासाठी विचारले आहेत.

सुधीर's picture

14 May 2015 - 4:27 pm | सुधीर

४ थ्या प्रश्नासाठी इक्विटी क्लास योग्य नव्हे, त्यासाठी फिक्स्ड इन्कम योग्य आहे. असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक गुंतवणुकीला ध्येय आणि काल मर्यादा असायला हवी तरच कुठला बास्केट (कुठला अ‍ॅसेट क्लास) योग्य आहे हे अधिक योग्यरीत्या ठरवता येईल.

पगला गजोधर's picture

14 May 2015 - 4:33 pm | पगला गजोधर

१. प्रसाद यांनी त्यांच्या मागील लेखातील प्रतिक्रियेत जे सांगितले, ते क्र. १ साठी मी सजेस्ट करतो

गजोधर साहेब, मी अन्यत्र लिहिलेल्या लेखमालिकेतील हा एक लेख आहे अन्य लेखांत आपण विचारेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी येथे काही भाग पुन्हा टाकतो......" साधारणतः 20/22 वर्षांपुर्वी, माझ्या बाजाराशी ओळ्ख होण्याच्या सुमारास एका वयस्क आणि यशस्वी दलाल असलेल्या गुजराथी गृहस्थांच्या कार्यालयांत मी नित्यनेमाने जात असे, त्यांच्याकडे आलेल्या अनेक अशीलांना ते देत असलेला कानमंत्र, जो मला स्वतःलाही मोठ्या प्रमाणांत फायदेशीर ठरला आहे, आज परिस्थितीनुरुप थोडेसेच बदल करुन मी आपल्याबरोबर आनंदाने शेअर करतो. या तोडग्याप्रमाणे (हा त्यांचाच खास शब्द बरं का) (1)वर्षभरांत आपण करणार असलेली गुंतवणुक साधारणतः 14/15 'मुहुर्ताच्या' दिवसांत समप्रमाणात विभागा..हे दिवस अगदी कोणतेही असुद्यात, म्हणजे आपण मानतो ते साडे-तीन शुभ मुहुर्त, वा कुटुंबातल्या सदस्यांचे वाढदिवस, आपल्या वैयक्तीक आयुष्यांतील एखादा विषेष दिवस वा असेच काही.. सामान्यतः हे निवडक दिवस पुर्ण वर्षभर विखुरलेले असावेत ईतकेच. म्हणजे अगदी एका आठ्वड्यात 2/3 असे नसावेत. (2) आता आपले जीवन ज्या दैनंदीन व्यवहार्य गोष्टींशिवाय अपुर्ण आहे किंवा ज्या उत्पादनांशिवाय आपले जीणे मुश्कील होईल असे आपणास वाटते, अशी गुंतवणुकीची तितकीच( मुहुर्ताच्या दिवसां एवढी) मात्र निरनिराळी क्षेत्रे निवडा . उदा. औषधे, लोखंड, वहाने, वीज, बॅंकिंग ई. (३) मग अशा प्रत्येक क्षेत्रातली बाजारांत असलेली 'अग्रगण्य' कंपनी निवडा. उदा. लोखंड म्ह्टल्यास टाटा स्टील, बॅंकिंग मधुन स्टेट बॅक (वा ICICI किंवा HDFC बॅक ही असु शकेल) शेवटी तुमची पसंती महत्वाची. (3) आणि आता प्रत्येक मुहुर्ताच्या दिवशी आपल्या निवडलेल्या टीम मधला एक शेअर क्रमाक्रमाने विकत घ्या.. दॅट्स ऑल.!!!..., शेटजींच्या मते दिवस कोणतेही असोत आणि टीममधील प्लेयर्स कोणतेही, पैसा 'बनविण्यासाठी' या सारखी सोपी पध्द्त नाही, मला सांगावयास हवे की मी व्यक्तीशः या प्रतिपादनाशी पुर्णतः सहमत आहे. अर्थात या पद्ध्तीत फक्त अग्रगण्य वा ब्ल्यु- चीप कंपन्यांचीच निवड टीममध्ये होवु शकते हे मी पुन्हा एकदा ठसवु ईच्छितो. या शिवाय, तीन चार वर्षांनी अगदी आवश्यकता वाट्ल्यास (2) प्रमाणे निश्चित केलेले मुळ प्रभाग किंवा टीममधील एखादा भिडु यांत संतुलन साधण्यासाठी एखादा बदल करणेही उचित ठरते

२. क्र. १ प्रमाणे

३. पास

४. अजिबात नाही.
घरातले सर्व खर्च, कर्तव्ये, हफ्ते, जीवनविमा / इतर विमा, इ/पी पी फ, इमरजन्सी फंड, वैगरे बाबींची सोय झाल्यावरच …उरलेले अंडे या बास्केट मधे ठेवण्याच्या विचार मनात आणावा…

प्रसाद भागवत's picture

14 May 2015 - 7:30 pm | प्रसाद भागवत

@आकाशकंदील, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
(१) पुट कॉल(PCR) रेशो हा प्रत्येक दिवशी वेबसाईट्वर अपलोड केला जातो. मात्र आपणास Real Time म्हणजे दिवसांतर्गत हवा असल्यास मी तसा पाहिलेला नाही. वैयक्तीक मी ऑपशन्स मध्ये नेहमी ट्रड करीत नसल्याने अशी आकडेवारी मिळविण्याचा प्रयत्न केला नाही.
याउपरही केवळ PCR रेशो हा बाजाराचा निर्णायक कल सांगण्या कामी तितकासा उपयोगी नसावा असे माझे मत आहे. जर असलाच तर पुट कॉल ओपन ईंटरेस्ट(PCROI) रेशो हा अधीक उपयुक्त आहे असा माझा अनुभव आहे. माझ्या निरिक्षणाप्रमाणे त्याचे एका टोकाला जाणे हे बाजाराची overbought/oversold स्थिती दाखवते.(सहाजिकच हा रेशो कसा काढावयाचा???- माझा एक सहकारी माझ्याकरिता हे काम करतो)
(२) ईंट्रा डे ट्रेडिंग साठी आम्ही तपासलेल्या RSI च्या वेगवेगळ्या parameter मध्ये 02 कालावधी करिता 90/10 गुणोत्तर अधिक यशस्वी ठरते असे पाहिले आहे. मात्र पोझिशनल ट्रेड्स (आपण करित असलेले) करिता 14 कालावधींचे 70/30 हेच गुणोत्तर असावे असे मला वाटते. अर्थात ऑपशन्स ट्रेडींग मध्ये RSI पेक्षाही PCROI अधीक चांगले निष्कर्ष देईल असे वाटते

(३) मुळ लेखांत सांगितलेले Candlesticks तंत्र वापरण्याकडे माझा अधिक कल आहे. शिवाय Moving Av. ही सोपे आणि परिणामकारक तंत्र आहे.

पगला गजोधर's picture

15 May 2015 - 2:06 pm | पगला गजोधर

(३) मुळ लेखांत सांगितलेले Candlesticks तंत्र वापरण्याकडे माझा अधिक कल आहे. शिवाय Moving Av. ही सोपे आणि परिणामकारक तंत्र आहे.

जरा १०-१२ कॅन्डलस्टीक चे थंबरूल / पॅटर्न (परिणामकारक तंत्र) शिकवणा आम्हालापण सोप्याभाषेत ….

प्रसाद भागवत's picture

17 May 2015 - 9:48 pm | प्रसाद भागवत

मला नक्कीच आवडेल. एका पॅटर्नचा उल्लेख मुळ पोस्ट मध्ये आलाच आहे. जसे जसे संदर्भ येतील, मला लिहायला आवडेल.

प्रसाद भागवत's picture

18 May 2015 - 11:55 am | प्रसाद भागवत

@आकाशकंदील,गजोधर साहेब,...याशिवाय आपण स्वतःला विशिष्ट साचेबद्ध विचारसरणीत गुंतवुन ठेवण्यापेक्षा आजुबाजुला घडत असलेल्या अनेक गोष्टींकडॅ लक्ष देणे, अष्टावधानीपणा दाखवणे जास्त योग्य... उदा. आपल्या रिझर्व्ह बॅंकेकडुन होणारे लिलाव... या बाबतचा माझा हा व्हॉटसअप वर पाठविलेला हा संदेश पहा...

In an 'interesting' development.... the 20 and 30 year RBI bonds auctioned, Around Rs. 2,600 cr. of bond could not find buyers & thus the auction was the first “devolving” auction in FY 2016.
This will make the 'rate cut' case stronger.

Time to buy 6400 calls???- Prasad Bhagwat

मार्मिक गोडसे's picture

18 May 2015 - 12:17 pm | मार्मिक गोडसे

ऑक्शन आज ३.३० नंतर होणार आहे ना?

६४०० चा कॉल?

प्रसाद भागवत's picture

18 May 2015 - 12:43 pm | प्रसाद भागवत

गोडसे साहेब, असे RBI च्या बॉंड्सचे ऑक्शन्स दर आठवड्याला होतात. मी झालेल्या ऑक्शन्स बद्दल लिहिले आहे हे स्पष्ट आहे.
६४०० चा कॉल?...येथे संदर्भ निफ्टीच्या कॉलबद्दल आहे. आकाशकंदील यांनी मुख्यत्वेकरुन Index Options बद्दल शंका विचारल्याने हा एक सर्वसाधारणपणे दिलेला संदर्भ आहे. महत्वाचे म्हणजे हा येथील वाचकांना दिलेला गुंतवणुक सल्ला नाही.

मार्मिक गोडसे's picture

18 May 2015 - 3:01 pm | मार्मिक गोडसे

ओ.के.
शिकावू गडी आहे. मला वाटले ८४०० कॉलच्या ऐवजी तुम्ही ६४०० चा कॉल टाईप केला.
मला साहेब नका म्हणू , फक्त मार्मिक म्हणा.

प्रसाद भागवत's picture

18 May 2015 - 4:00 pm | प्रसाद भागवत

ओह्,,,चुक एकदम मान्य. मला ८४०० कॉल असेच म्हणावयाचे होते मार्मिकराव. आणि हो, मी ही तसा शिकावुच आहे हो...शिकणे थांबले की सगळेच संपले. पुन्हा एकदा दुरुस्तीबद्दल धन्यवाद.

काळा पहाड's picture

18 May 2015 - 4:41 pm | काळा पहाड

६४०० चा कॉल बाय कराच भागवत साहेब. लँड अ‍ॅक्विझिशन बिल पास नाही झालं तर तीच पाळी येणार आहे.

प्रसाद भागवत's picture

18 May 2015 - 5:46 pm | प्रसाद भागवत

पहाडसाहेब, तांत्रिकदृष्ट्या हा कॉल 28 तारखेलाच कालाबाह्य होईल. आणि तसेही मंदी अपेक्षीत असल्यास कोणताच कॉल घ्यायला नको, एकतर कॉल विकायला हवा किंवा पुट घ्यायला हवा.
पण आपल्या भावना समजल्या.बाजार कसे वागेल हे कोणीच सांगु नये आणि अशा जाहिर ठिकाणी तर त्याची चर्चा म्हणजे नकोच नको हे पुर्णपणे पटुनही मी आपल्या मताशीही असहमत आहे. धन्यवाद.

मला शेअर मार्केट चे शुन्य ज्ञान आहे, जर गुंतवनुक करावयाची असल्यास.. अभ्यास कश्या पद्धतीने करावा.. काहीच माहीनी नाही.. साईट्स कुठल्या ते ही माहिती नाही..

तुमचे मागिल २ लेख पण वाचले आहेत..

अनुप ढेरे's picture

19 May 2015 - 2:41 pm | अनुप ढेरे

https://www.valueresearchonline.com/

ही साइट कंसिडर करा. छान आहे.

सिरुसेरि's picture

19 May 2015 - 3:44 pm | सिरुसेरि

नुकतेच युलिप मधील गुंतवणुक याबद्दल एका सल्लागाराशी बोलणे झाले . हि व्यक्ती एजंट नसुन एका इन्शुरन्स कंपनीमध्येच कामाला आहे . त्यांच्याशी बोलण्यातुन अशी माहिती मिळाली की , युलिप योजनांचे नवे स्वरुप ,झालेले नवे बदल हे गुंतवणुकीसाठी खुप फायदेशीर आहे . अलोकेशन चार्जेस आता खुप कमी झाले आहेत . त्यामुळे जास्तीत जास्त फंड हा युनीट्स मध्येच गुंतवला जातो . हे नविन बदल विचारात घेता युलिप मधे गुंतवणुक करावी का ? सध्या कुठल्या युलिप योजना चांगल्या आहेत .

प्रसाद भागवत's picture

19 May 2015 - 5:22 pm | प्रसाद भागवत

पुरेशा किंमतीचे विमा संरक्षण देणारी टर्म पॉलिसी (यथायोग्य रायडर्ससह) घेल्यानंतर अन्य कोणत्याही विमा पॉलिसीचा गुंतवणुकीच्या दृष्टिने विचार करु नये असे मी सांगेन. (मात्र आपण जर अशी युलिप घेणारच असाल, तर मीही एक ब-यापैकी अनुभवी इन्शुरन्स उत्पादने विकणारा सल्लागार आहे.)

प्रसाद भागवत's picture

22 May 2015 - 8:40 pm | प्रसाद भागवत

खरे म्हणजे ही माझी व्यावसायिक बाब आहे आणि ती जाहीर करावयास हवी असे नाही. मात्र एका पोस्ट्मध्ये अनावधानाने आणि तेही अप्रत्यक्षरित्या निफ्टीचे कॉल घ्यावे असे माझ्याकडुन सुचविले गेले, वास्तविक हा कोणताही गुंतवणुक सल्ला नव्हता, तरीही त्यानंतर काही सदस्यांनी तसे सौदे केल्याचे मला कळविले. सहाजिकच केवळ या वेळेपुरती ‘अपडेशन्स’ द्यावी असे मनांत आहे.

मी निफ्टीचे या ( मे) महिन्याचे 8400 स्ट्राईकचे कॉल्स 58/60 या दरम्यान घेतले होते. निफ्टी हा या सौदेपुर्तीपर्यंत 8500च्या भावपातळी जवळ घोटाळेल असा अंदाज मी बांधला होता. आज निफ्टीची मला अपेक्षित भावपातळी आल्याने व या पातळीच्या वर जाण्यास निफ्टीस होणारा प्रतिकार पहाता मी घेतलेले सर्व कॉल्स 108/110 रुपयांस विकले.

मी या फोरमवरुन केलेले लिखाण हे सर्वसामान्य स्वरुपाचे व बाजारविषयक गैरसमज दुर व्हावेत आणि बाजाराकडे सर्वसामान्य गुंतवणुक्दार आकर्षित व्हावेत यासाठी आहे. ह्या लिखाणांतुन मी कोणताही वेचक स्वरुपाचा खरेदी/विक्रीचा सल्ला देत नाही वा माझे लिखाण सल्ला म्हणुन मानले गेल्यास त्यातुन कोणताही नफा होईल वा नफा होईलच याचीही कोणतीही खात्री मी देत नाही वा तशी माझी जबाबदारीही नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी..