हुश्शार छोकरी
[म्हटले तर छोट्यांची; म्हटले तर मोठयांची गोष्ट! कथेतल्या छोकरीचे एकदम लग्न होते. ती राणीही होते..... सर्बियन लोककथेचा हा स्वैर अनुवाद , बालदिना निमित्त! शैशव जपलेल्या, जपू पाहणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.]
आटपाट नगरात एक हुश्शार छोकरी रहायची.राजापेक्षा हुशार. त्याच्या दरबाऱ्यापेक्षाहुशार. तिच्या बापाला छोकरीचा अभिमान वाटायचा. म्हणायचा, ‘सगळ्या राज्यात माझी छोकरी हुश्शार!’
राजाला ते कळले. त्याने बापाला बोलवून घेतले. विचारले,
‘तुझी छोकरी सगळ्या राज्यात हुश्शार?’
‘होय, महाराज! आहेच ती!’
राजाने कोडे घातले. ‘ही अंडी घरी ने. तुझ्या छोकरीला यातनं कोंबडीची पिल्लं काढून दाखव म्हणावं! तिनं तसं केलं तर, तिला सोनंनाणं देईन. अन नाही जमलं तर, तुला शंभर फटके देईन!’
बाप घरी आला. छोकरीला सगळी हकीकत सांगितली. तिने क्षणात ओळखले, कि अंडी उकडलेली आहेत! तिने आयडिया केली. बापाच्या हातात उकडलेल्या बियांची पिशवी दिली. म्हणाली, ‘ज्या रस्त्यावरून राजा जातो, तिथे जा. राजा जवळ येताच मी सांगते तसं म्हणा आणि या बिया पेरायला लागा!’
छोकारीने सांगितले तसे बापाने केले. बिया पेरता पेरता मोठ्ठ्याने म्हणू लागला,
‘देवा देवा! या उकडलेल्या बिया रुजू देत. भलं मोठ्ठ पीक येऊ देत!’
राजानं ते ऐकलं. त्याला आश्चर्य वाटलं.
‘उकडलेल्या बिया कुठं उगवून येतात का? कोण तो मूर्ख? आणा रे त्याला इकडे!’
या बापाला राजाने एकदाच पाहिलेलं. त्यामुळे ओळखता आलं नाही.
म्हणाला, ‘उकडलेल्या बिया कधी रुजतील का? त्यातून कधी पीक येईल का?’
बाप आदबीने म्हणाला, ‘महाराज म्हणतील ते खोटं कसं असेल? उकडलेल्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतील तर, या बियातून पीक का नाही येणार?’
राजाने त्या बापाला ओळखले. म्हणाला, ‘तुझी छोकरी खरंच हुशार दिसते. हे तागाचे दोन धागे घे! तुझ्या छोकरीला म्हणावं , एका मोठ्ठ्या जहाजासाठी यापासून एक शीड विणून दे. हे जर तिनं केलं, तर तिला निम्मं राज्य देईन. नाही केलं तर तुला हजार फटके देईन!’
दुसऱ्या दिवशी छोकारीने बापाच्या हातात, फूटभर लाकूड दिलं. म्हणाली, ‘हे महाराजांकडे घेऊन जा. त्यांना म्हणावं, आधी या लाकडापासून मोठ्ठं जहाज तयार करा. मग त्या मापाचं शीड काय मी लग्गेच बनवून देईन!’
छोकरीनं सांगितलं तसं बापानं केलं.
आता मात्र राजाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. तिला दरबारात हजार राहण्याची आज्ञा दिली.
हुश्शार मुलीने स्वतः च्या हाताने कातलेले जाडेभरडे कपडे घातले. पायात साध्या चपला घातल्या. पण हाय! छोकरी म्हणजे गुलाबाचं फूल! राजाला पार आवडून गेली. तरी राजा तो राजाच! त्याला तिच्या हुशारीची प्रत्यक्ष परिक्षा पहायची होती.
त्याने हुकमी आवाजात विचारले, ‘ सगळ्यात दुरून येणारा पण आख्ख्या जगाला ऐकू जाणारा आवाज कोणता?’
छोकरी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली, ‘वीज! तिचा आवाज आकाश पृथ्वी व्यापून उरतो!’ मग अदबीने झुकून विनम्रपणे म्हणाली, ‘...आणि महाराज, आपले हुकुम, आपल्या आज्ञा!..... ज्या क्षणार्धात सगळ्या राज्यात पोहचतात.त्यांची तत्काळ अंमलबजावणी होते!’
छोकरीचे असले उत्तर ऐकून राजा पुरता विरघळून गेला. तिला लग्नाची मागणी घातली. राणी होशील का, असे विचारले. हुश्शार पोरगी धीट होती. म्हणाली, ‘तुम्ही श्रीमंत, मी गरीब. तुमचं जगणं निराळं, माझं निराळं! न जाणो, तुम्हाला माझा कधी एकदम राग येईल. तुम्ही फटक्यात मला, माहेरी धाडाल . अशावेळी माझी एक अट असेल!’
‘ती कोणती?’
‘माहेरी जाताना, मला इथली एक प्राणप्रिय गोष्ट घेऊन जायची परवानगी असावी!’
‘दिली!’
मग त्या हुश्शार छोकरीचे आणि राजाचे थाटामाटात लग्न झाले. हुश्शार छोकरी आता, बुद्धिमान राणी झाली. राजाच्या बरोबरीने राज्य करू लागली. काळ पुढे सरकत होता, आणि एके दिवशी......
राजाराणीला मेजवानीला जायचे होते. दुसऱ्या राज्यातले बडे पाहुणे येणार होते. पण झालं काय की राणीचा साजशृंगार काय आटपेना! बुद्धिमान असली म्हणून काय झालं, साजशृंगार करू नये असं थोडंच असतं? तिचे काही आवरेना. अन इकडे उशीर झाला म्हणून राजा रागावला.
रागाच्या भरात ओरडलाच! ‘ते दागदागिने आणि भरजरी कपडेच तुला इतके आवडतात ना? तेच तुझ्यासाठी मौल्यवान आहेत ना? जा! तेच घे अन चालती हो तुझ्या माहेरी!’
बुद्धिमान राणीने ते ऐकले. तिला खूप दु:ख झाले. तिने राजाला विनंती केली, ‘मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. पण आजची रात्र मला इथेच राहू दे. तुमच्या बरोबर जेवू दे!’
रागात असला तरी, राजाचा राणीवर भारी जीव! ‘ओके’ म्हणाला. राजाच्या नकळत राणीने सरबतात झोपेचे औषध घातले. कसलीही शंका न घेता, राजाने मुकाट्याने सरबत घेतले अन थोड्याच वेळात एकदम गाढ झोपी गेला.
मग राणीने झोपलेल्या राजाला आपल्या माहेरी घेऊन जायची, सेवकांना आज्ञा दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला जाग आली. आपण या शेतकऱ्याच्या झोपडीत कसे म्हणून त्याला आश्चर्य वाटत होते. त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याची राणी तिच्या माहेरच्या जाड्याभरड्या कपड्यांत साधेपणाने उभी होती.
‘या सगळ्याचा अर्थ काय?’ संतापाने राजाने विचारले.
राणीतल्या हुश्शार छोकारीने उत्तर दिले, ‘ पतिराज! तुम्ही मला लग्नाआधी वचन दिले होते. जर तुम्ही मला कधी माहेरी धाडलेत, तर मी माझी प्राणप्रिय गोष्ट सोबत नेऊ शकेन!’
‘हो!’ राजा अजून घुश्श्यातच.
‘माझी प्राणप्रिय गोष्ट तुम्ही आहात. म्हणून इथे येताना मी तुम्हाला घेऊन आले!’
आता एवढ्या मधाळ, निष्ठावान उत्तरावर कुठला राजा भाळणार नाही? राजाला स्वत:च्या रागाचा राग आला. राणीच्या प्रेमावर परत जीव जडला. तिला घेऊन तो परत राजवाड्यात गेला.
तेव्हापासून ती हुश्शार छोकरी राज्यातल्या घराघरात राज्य करतेय!
प्रतिक्रिया
14 Nov 2015 - 10:06 am | एस
:-) ही कथा आधी वाचली होती. हा स्वैर अनुवाद एकदम गोष्टीवेल्हाळ असा सुंदर झाला आहे! छान. फक्त ते 'छोकरी' ऐवजी 'मुलगी' करायला हवं. म्हणजे ते लग्न वगैरे खटकणार नाही.
14 Nov 2015 - 10:39 am | शिव कन्या
एकदम मान्य. बर्याचदा हे मनात आले.
पण का कोण जाणे केले नाही.
कंटाळा केला भौतेक टंकणार्या मुलीने!:)))
14 Nov 2015 - 10:45 am | मांत्रिक
वाह! छान. आवडली कथा. तुमच्यामुळे देशोदेशीच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या छोट्या पण रंजक, अर्थपूर्ण कथा वाचायला मिळत आहेत, त्याबद्दल खूप खूप आभार...
14 Nov 2015 - 11:39 am | रातराणी
मस्त! खूप आवडली कथा!
14 Nov 2015 - 12:46 pm | शलभ
मस्तच
14 Nov 2015 - 12:52 pm | अविनाशकुलकर्णी
आवडली
14 Nov 2015 - 1:05 pm | माहितगार
+१ आवडली
14 Nov 2015 - 2:02 pm | एक एकटा एकटाच
मस्त मजा आली वाचायला
14 Nov 2015 - 2:50 pm | स्वामी संकेतानंद
मस्त मस्त!
14 Nov 2015 - 3:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
सहिच!!! लोककथा अन बालसाहित्य ह्याची एक खासियत असते लेखनातला निरलस भाव! अप्रतिम कथा . खुप आवडली.
14 Nov 2015 - 3:49 pm | मितान
आज बालकथा हवीच होती !
मस्त गोष्ट !!!!
14 Nov 2015 - 4:42 pm | सस्नेह
गोड निरागस कथा !
14 Nov 2015 - 4:48 pm | बोका-ए-आझम
पुनःप्रत्ययाचा आनंद देणारी कथा!
17 Nov 2015 - 10:47 am | नाखु
अर्थात
14 Nov 2015 - 6:20 pm | मुक्त विहारि
बालकथा आवडली..
14 Nov 2015 - 7:24 pm | विवेकपटाईत
सुंदर बोध कथा आवडली
14 Nov 2015 - 8:04 pm | तुमचा अभिषेक
शेवटचे राजाला बरोबर नेणे, आधी वाचलेली बहुधा ही कथा.
मस्त आहे पण :)
14 Nov 2015 - 8:56 pm | मनीषा
हुश्शार छोकरीची कथा छानच आहे .
या कथेचे ताप्तर्यं - गरीब असो की राणी, हुश्शार असो की आणखी काही ... प्रत्येक स्त्री ला वेषभूषा, केशभूषा इ. जामानिमा करताना जरा जास्ती वेळ लागतोच . :ड
(मला वाटते मी अशीच कथा बीरबल - बादशहा आणि बेगम यांची ऐकली/ वाचली होती . )
14 Nov 2015 - 11:13 pm | शिव कन्या
:) सोच अपनी अपनी!
14 Nov 2015 - 9:15 pm | पैसा
ही गोष्ट वाचली आहे आधी. पुन्हा वाचायला तेवढीच मजा आली!
14 Nov 2015 - 11:34 pm | शिव कन्या
होय पैतै. लोककथा, परिकथांमध्ये बर्याचदा कूट असते. ते सोडवणारे पात्र बुद्धिमान असते. शेवटी त्याला त्याबद्दल बक्षिशी पण मिळते....अशी साधारण कथांची धाटणी असते. प्रत्यक्षातील absurd शेवट सहसा तिथे नसतो. सुखांत असतो. म्हणूनच या कथा जीवाला विसावा देतात. तपशीलाच्या फरकाने अशा कथा देशोदेशी आहेतच. वाचली असणं अगदी सहज आहे!
14 Nov 2015 - 9:25 pm | पियुशा
आवडली :)
15 Nov 2015 - 7:50 am | अजया
गोड निरागस कथा.खूप आवडली. :)
15 Nov 2015 - 12:01 pm | बासुंदी
सेम कथा अकबर बिरबल पुस्तकात आहे
16 Nov 2015 - 2:29 pm | मीता
खूप आवडली. :)
16 Nov 2015 - 4:02 pm | मधुरा देशपांडे
:)
16 Nov 2015 - 5:09 pm | उगा काहितरीच
:-) :-) :-)
16 Nov 2015 - 11:50 pm | दिवाकर कुलकर्णी
छान.मस्तच !