दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
11 Oct 2013 - 3:45 am

गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो.
देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा देवी नऊ दिवस अनुष्ठानाला बसली नि विजयादशमीदिवशी ह्या महिषासुराचा वध केला (चूकभूल द्या घ्या.)

जास्त प्रस्तावना न करता ह्या दुर्गोत्सवाच्या निमित्तानं मागे गणपती आरतीचा आपण विचार केला तसा देवीच्या आरतीचा विचार करण्याचा प्रयत्न करुया.
सुखकर्ता दु:खहर्ता लेखामध्ये म्हटल्याप्रमाणंच आरती प्रेम असे पर्यंत, अंतःकरणपूर्वक, एकाग्र होऊन, आर्ततेनं आळवली जावी.

आरतीचा विचार करुया.
दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी|
वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी ||१||
जयदेवी जयदेवी महिषा सुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जयदेवी || धृ||

त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही|
साहि विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्तालागि पावसी लवलाही ||२||
जयदेवी जयदेवी ....

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेषापासुनि सोडी, तोडी भवपाशा|
अंबे तुजवाचोनि कोण पुरविल आशा, नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ||३||
जयदेवी जयदेवी ....

आरती कुणी रचली ह्याबाबत थोडा प्रवाद असावा. नरहरी हे नाव आरतीत येतं. नरहरी सोनार खरंतर शिवाचे भक्त. विठठलाच्या कमरेचा हार बनवण्याचं निमित्त होऊन दोन दैवतामधलं अद्वैत उमजलं अशी कथा आपल्याला परिचित आहे. कदाचित अशी अनुभूति आल्यानंतर त्यांनी ती आरती रचली असावी. कुणी म्हणतं रामदासस्वामींनी रचलेली आरती आहे. रचनाकार कुणीही असला तरी मुळातच दोघेही अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे भक्त व तत्त्वज्ञ असल्यानं आपण त्याबाबत जास्त विचार न करता ‘आम खाने के पीछे’ जाऊया.

आरती कोणी रचली ह्याबाबत न करता कुणाची आरती केलेली आहे ह्याचा विचार करता आरती देवीची आहे हे मात्र नक्की समजून येतं. मात्र ह्याबाबत थोडा सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे.
नेमकी आरती कुणाची केली आहे? हल्ली दहा दिवस बाजारात येणार्‍या आठभुजा असलेल्या, देखण्या, प्रमाणबद्ध मूर्तीची, देवळात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीची की आणखी कशाची?
कधीकधी शब्द थोडे पुढंमागं करुन बघितले की आपल्याला नेमकं विषयाचा गाभा काय ते कळतं.
'जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी' असं म्हटलेलं आढळतं.
इथं एक विशेषण दिसतं... सुरवरईश्वरवरदा.
सुरवरांनाच काय म्हणजे देवतांनाच काय तर ईश्वरालाही वर देणारी, शक्ती प्रदान करणारी अशी जी कुणी ती ही शक्ती आहे. तिची ही आरती आहे.
असं काही असतं का हो? थोडं मागं जाऊ. कुठंच काहीच्च नव्हतं तेव्हा! कधीतरी काहीतरी हालचाल झाली नि सृष्टी निर्माण झाली. चराचराची व्यवस्था अत्यंत पारदर्शकपणं चालवली जाणारी व्यवस्था म्हणजे ईश्वर. तो सृष्टीबरोबर उत्पन्न होतो नि तिच्याबरोबरच लय देखील पावतो. मानवी आयुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रचंड मोठ्या 'स्केल'वर हे सगळं सुरु असतं. त्यामुळं मानवी मनाला त्याचा विचार तेवढ्या मोठ्या पातळीवर करताना तसाच व्यापक विचार करावा लागतो.
अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी तरी 'आहे' ना?) म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे. (बाकी मतांतराला वाव आहेच.)

ज्या शक्तीमुळे ईश्वराला कार्य करण्याचं बळ मिळतं, त्या त्या अनुरुप कार्य करणार्‍या देवतांना (कार्यानुसार नाव ब्रह्मा, विष्णू, महेश नि इतर ) ताकद मिळते (उत्पत्ती- निर्माण करणं, स्थिती- सांभाळणं नि लय- संहार करणं) त्या सगळ्याचा विचार आपल्याला एका 'सुरवरईश्वरवरदा' ह्या शब्दातून करता येतो. तिला आपण मानवानंच माऊलीरुप, मातारुप मानून तिची पूजा करता यावी म्हणून सगुणात आणली. इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली. पाकिटात असलेला कागदाचा फोटो जसा आपल्या आईवडलांची आठवण करुन देतो तसं ही मूर्ती मला त्या भगवद्शक्तीची आठवण करुन देणारी असली पाहिजे.

आणखी एक शब्द आहे महिषासुरमर्दिनी. वर म्हटल्याप्रमाणं पुराणात कधीतरी एक महिषासुर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देत होता नि त्याला देवीनं मारलं. आपण देवीचा जयजयकार म्हणून गप्प बसावं का? की ह्या महिषासुराचा नि माझा काही संबंध आहे का? तर ह्याचं उत्तर आहे असं आहे.
महिष म्हणजे रेडा. रेडा हे घोर अज्ञानाचं प्रतिक आहे. अज्ञान म्हणजे अशिक्षितपण, अक्षरओळख नसणे. शालेय अभ्यास नसणं ह्या अर्थानं अज्ञान नाही. तर मी कोण? माझं जन्माचं प्रयोजन काय? ध्येय काय? ते समजण्यासाठी काय करावं लागतं? ह्या सगळ्याबद्दलची जाणीव नसणे म्हणजे अज्ञान. त्या दृष्टीकोनातून बरेच लोक अज्ञानी ठरतात. इथं आपण त्रागा करु शकण्याची दाट शक्यता आहे. मात्र ही वस्तुस्थिती आहे. जगण्याची उद्दिष्टं अनेक असू शकतात, ती वेळेनुसार, कालानुरुप बदलू शकतात, बदलावीत. मात्र ध्येय एकच असावं ते म्हणजे आत्मशोध. मी नक्की कोण आहे नि काय मिळवायचंय ह्याचा विचार करुन त्याचा पाठपुरावा करणं हे माणसाच्या आयुष्याचं ध्येय आहे. (शब्दांची अदलाबदल केली 'एक्स' ला वाय नि वाय ला एक्स म्हटलं तरी चालू शकेलच. अर्थ बदलत नाही)

तर अशा ह्या अज्ञानरुपी रेड्याला मारुन आपल्यामध्येच आत असणारी ही दुर्गामाता आपल्याला प्रसन्न होऊ शकते. त्या दृष्टीनं 'महिषासुरमर्दिनी' ह्या नावाचा विचार करण्याची गरज आहे.

वरच्या शब्दांचा पुरेपूर अर्थ समजला की पुढची आरती समजायला मदत होते.
देवीला दुर्गा म्हणताना ह्या प्रपंचाला, संसाराला दुर्घट असं म्हटलेलं आहे. दुर्ग म्हणजे किल्ला नि दुर्गा म्हणजे त्याची किल्लेदार अशा अर्थानंही विचार होतो. ज्याप्रमाणं एखाद्या कारागृहाचा प्रमुख असतो तशी जणू ही दुर्गा आहे नि हा जो संसार रगाडा आहे तो म्हणजे कारागृह आहे. बाहेर पडायचं तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किल्लेदारालाच पटवणे, त्याच्या मर्जीतलं बनणे.
म्ह्णून म्हणतात, दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ... तुझ्या कृपेशिवाय हा संसाराचा भार खूप अवघड आहे.
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी... इथं पुन्हा थांबायची गरज आहे. काय आहेत हे शब्द?
अनाथनाथ अंबा म्हणजे कुणी अनाथाश्रम उघडलेली एन जी ओ नाही! खरंतर, कोण अनाथ आहे? करुणा म्हणजे काय? विस्तारी म्हणजे? आहे का मुळात करुणा? विस्तारी म्हणजे विस्तार कर, वाढव म्हणजे काय?
इथं थोडा पारमार्थिक विचार आहे. 'तुझिया वियोगे जीवित्व आले' असं समर्थ रामदास म्हणतात. अत्यंत आनंदाचा, सुखाचा अनुभव हेच ज्याचं स्वरुप आहे असा मी, मूळस्वरुपाला विसरलो नि जीवभाव घेऊन जन्म पावलो. एखाद्या अत्यंत श्रीमंत, यशस्वी माणसाचा मुलगा अपघातात स्मृती घालवून बसल्यानं भीक मागू लागतो तसा मी खरा आतमध्ये आनंदरुपच असताना सुखासाठी बाहेरच्या सुखांच्या मागं लागतो नि 'अनाथ' बनतो.

काल सचिन रिटायर झाला. क्रिकेट तेच, खेळ तोच, नियम तेच पण मला आता आनंद वाटेना. सुख खेळात आहे की माझ्या बघण्यात? मी रानावनात अडकून बसलोय, मला प्रचंड भूक लागलीये नि समोर एक सुंदर स्त्री मला आलिंगन द्यायला येतेय. सुख वाटेल? तीच गोष्ट दुसरीकडून. एका अत्यंत गरीब नि ओबड्धोबड दिसणार्‍या झोपडीत मला शिळी भाकरी नि चटणी मिळाली तर मला ती अत्यंत चांगली वाटेल.
सुख नक्की कुठं आहे नि ते कसं मिळेल हे न समजल्यानं मी अनाथ, पोरका, दीनवाणा झालो आहे. अशा अनाथांची नाथ अशी ही अंबा आपली करुणा विस्तारुन मला पदरात घेऊ दे. करुणा उत्पन्न करुन का नाहीत म्हणत हो? कारण करुणा आधीपासूनच आहे आपल्या लक्षात येत नाहीये. एका बीजापोटी उत्पन्न होणारी अनेक कणसं माणसाच्या आवाक्यातलं काम नाहीये ना? हीच ती करुणा. जगण्याला आवश्यक प्रत्येक गोष्ट ह्याच पृथ्वीवरुन आपण हजारो वर्षांपासून घेत आलेलो आहोत. आजचं चकचकीतपण आपल्याला ते विसरायला भाग पाडतंय एवढंच.
ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार तरी कमी होईल.

पुढं जाऊन 'वारि वारि जन्ममरणाते वारि हारि पडलो आता संकट निवारी' असं म्हणतात. पुन्हा तेच आहे. वारि वारि म्हणजे हे माते तू ह्याचं निवारण कर. हारि पडलोय- कंटाळलोय. संकटाचं निवारण कर.
जन्माला आल्यापासून आपण काय किंमत देऊन काय कमावतो ह्याचा विचार करता 'सुख कमी नि दु:ख जास्त' असाच विचार पक्का होतो. मिळणार्‍या सुखामागे देखील किती कष्ट असतात ह्याचा विचार करता हे कधीतरी संपावं हा 'वास्तववादी' विचार डोकावल्यावाचून राहत नाही. त्यामुळंच ह्या जन्ममरणाच्या फेर्‍यातून सोडव ही विनंती करावी लागते.
मात्र जेव्हा विनंतीच्या मागे; काय विनंती, कुठं करायची, नि कशी करायची हा नेमका विचार असेल, तेव्हा त्या विनंतीचा निश्चितच पाठपुरावा होतो नि जे मिळवायचं ते मिळवलं जातं. गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणं अशी भगवंताच्यी, शक्तीच्या निश्चित रुपाची मांडणी समोर आली की माणूस निर्भय बनतो नि त्याला संकट हे संकट ह्या स्वरुपात न वाटल्यानं ते आपोआप निवारलं जातं. दृष्टीकोनच बदलून जातो.

पुढच्या कडव्यांमध्ये बरीचशी वस्तुस्थिती, थोडासा अर्थवाद नि स्तुती आहे. 'त्रिभुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी (वेद) श्रमले परंतु (त्यांना तुझ्याबद्दल) न बोलवे काही, साही (शास्त्रं) विचार करुन करुन (जणू प्रवाह)पतित झाले , (अशी) ते तू भक्तालागि पावसी लवलाही.' आज देखील 'विज्ञान' (तंत्रज्ञान नव्हे) सृष्टीच्या उत्पत्तीचा, त्या मूळ शक्तीचा मूलगामी विचार करत आहे. थांगपत्ता लागायला अजूनही तयार नाही. त्याच अनुषंगानं चारी वेद, साही शास्त्रे वर्णन करु शकत नाहीत असं मानलं गेलं आहे. मात्र अशी तू भक्तासाठी मात्र तातडीनं धावून येतेस. अट 'भक्त' असण्याची आहे.

प्रसन्न वदन अशा हे देवी तू आम्हाला प्रसन्न हो.
संसारक्लेषापासून सोडवून, भवपाश तोड.
इथं परत थांबावं लागतं. त्रागा करुन सोडव म्हणणं आहे की मोकळं कर? भवपाश तोड म्हणजे एखादा दोर कुर्‍हाडीने तोडल्यासारखं तोड असं आहे का?

तर ह्या भवपाशाचं स्वरुप जेव्हा समजेल तेव्हा त्याचक्षणी गळून पडणारा अशा स्वरुपाचं आहे. समजायला थोडं अवघड वाटतं मात्र उदाहरणानं समजेल. एखाद्या बैलाला अथवा गाढवाला लहानपणापासून एखाद्या खुंटीला दोरीनं बांधलं तर तो सुटून जाण्याचा प्रयत्न सुरुवातीला करत करत नंतर दोरी नि खुंटी दिसली की शांत उभं राहून प्रयत्न टाळतो. तसं सातत्यानं 'माझेपणा' नि 'मी' पणाच्या दोरांनी माणूस इतका अडकला जातो की ते बंधन, तो पाश सुटता सुटत नाही.

एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली. प्रतिकूलसंवेदनात दु:खम. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो. मात्र देवीच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर एका घराच्या जाण्यानं असं काय हळहळ करायची? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार कर्माचा सिद्धांत ह्या एका 'अझम्शन' ने सुटतो. इथं लक्षात घ्यावं की दुसर्‍याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता'योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं. इथं कुठलाही निराशावाद नाही. हा कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत.
असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात. भव म्हणजे संसार. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन,तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे.

१. हे असं नेमकं कसं होतं त्याबद्दल सर्व संतांचे पाय पकडावे लागतात.
२. ऋणनिर्देश : डॉ. श्री. द. देशमुख ह्यांचे प्रवचन.

मांडणीसंस्कृतीधर्ममुक्तकव्युत्पत्तीसमाजजीवनमानप्रकटनविचारशुभेच्छामतसंदर्भ

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

11 Oct 2013 - 6:18 pm | अनिरुद्ध प

एक प्रष्ण आहे,आपल्या म्हनण्या प्रमाणे समजा असे मान्य करुया की भक्तिमार्ग भोन्गळ आहे,कर्म मार्ग सुद्धा त्याच तोडीचा आहे,योग मार्ग त्या बद्दल मी पूर्ण अज्ञानी आहे,मग आपला मार्ग कुठला आहे जो सहजसुन्दर आणि सर्वसमावेषक आहे?जो माझ्या सारख्या अतिसामान्य व्यक्तीने अवलम्बला म्हणजे त्याला 'स्व'चा बोध होइल?

त्याला 'मी' मार्ग असे म्हणतात.

सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ॥

अनिरुद्ध प's picture

11 Oct 2013 - 6:42 pm | अनिरुद्ध प

असे एखाद्याला अडवुन त्यान्ची मते लाटण्याचा प्रयत्न करु नये,हा जर त्यानी आपल्याला वकिलपत्र (प्राणी तसेच पक्षीनामक आयडीला घाबरुन्)तर मात्र बोलणेच खुन्टले.

प्रचेतस's picture

11 Oct 2013 - 6:44 pm | प्रचेतस

=))

अनिरुद्ध प's picture

11 Oct 2013 - 12:25 pm | अनिरुद्ध प

तसेच समयोचित विवेचन,
एक प्रष्ण,हारी पडणे = कन्टाळणे का हार (पराजीत अवस्था) मानणे?

आपला अर्थ अधिक सयुक्तिक आहे.
कदाचित हरुन हरुन कंटाळलो असं म्हणू शकतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Oct 2013 - 12:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्यारे बुवा,

साष्टांग दंडवत.

आरती म्हणताना अर्थाकडे लक्ष द्यायला कुठे वेळ असतो? निम्म लक्ष प्रसादावर आणि बाकिचे..... जाउदे

या पुढे निदान सुखकर्ता दुखहर्ता आणि दुर्गे दुर्गट या दोन आरत्या म्हणताना तरी तुम्ही शिकवलेला अर्थ लक्षात घेउन आरती म्हणु.

अजुन एक आरती सुचवावीशी वाटते " त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा" बघा कधी जमेल तेव्हा.

पिशी अबोली's picture

11 Oct 2013 - 12:51 pm | पिशी अबोली

मस्त... :)
बाकी दुर्गेचे 'प्रसनावदना' रुप ऐकून मला आमच्या गोव्यातील 'शांतादुर्गे'चीच आठवण येते. शिव आणि विष्णू यांच्या युद्धात मध्यस्थी करणारी, त्यांना शांत करणारी शांतादुर्गा हे खरोखर मनोहर रुप आहे दुर्गेचे.

अभ्या..'s picture

11 Oct 2013 - 1:07 pm | अभ्या..

आई राजा उदे उदे
सदानंदीचा उदे उदे
येळकोट येळकोट घे.
.
.
(सध्या फक्त तुळजापुरातील आईसमोरील दानपेटी घोटाळ्याने व्यथित) अभ्या :(

बॅटमॅन's picture

11 Oct 2013 - 2:45 pm | बॅटमॅन

(सध्या फक्त तुळजापुरातील आईसमोरील दानपेटी घोटाळ्याने व्यथित)

नक्की काय झालं रे?

मुक्त विहारि's picture

11 Oct 2013 - 1:44 pm | मुक्त विहारि

मस्त

पटले....

पैसा's picture

11 Oct 2013 - 5:56 pm | पैसा

सुरेख विवेचन!
दुर्गा म्हणजे आदिशक्ती. मानवी संस्कृती निर्माण झाली तेव्हा सगळ्यात सुरुवातीच्या निसर्गातील शक्तींबरोबर देवता म्हणून माणसाने स्वीकारलेली सृजनाची शक्ती. सृजन करणारी माता हा त्या आदिवाशांसाठी चमत्कारच होता. जगभर विविध ठिकाणी सापडलेल्या सगळ्यात जुन्या टेराकोटा मूर्तींमधे मातृदेवतेचा समावेश आहे.

रा चिं. ढेर्‍यांनी मातृशक्तीबद्दल फार विस्ताराने संशोधन करून "लज्जागौरी" मधे लिहिलं आहे. माता, नव्याचे सृजन करणारी धरणी यांना माणसाने एकाच रूपात पाहिले. या धरित्रीची वारूळ रूपात पूजा सुरू केली. अजून गोव्यात ही सांतेर पुजली जाते. ही आपलीच माता आपल्या सगळ्या संकटांचे निवारण करते म्हणून सर्वोच्च मानली गेली.

कालाबरोबर सांतेरीचं रूपांतर शांतादुर्गेत झाले. तिच्या अनेक कहाण्या रचल्या गेल्या. संकटसमय येताच भरण पोषण करणारी माता दुर्गा-चंडिकेचे रूप घेऊन संकटनिवारण करते. म्हणून तिची सगळ्याच रूपात पूजा केली जाते. ही प्रतीकात्मक पूजा लक्षात घेतली पाहिजे.

तसा नवरात्र हा नव्या धान्याबद्दल आनंद व्यक्त करायचा सण. त्यानिमित्त देवीची पूजा तशी सयुक्तिकच मानली पाहिजे. सर्वत्र मातृरूपाने भरण, पोषण, संरक्षण करणार्‍या स्त्रीशक्तीला वंदन करणारी ही आरती आहे. तिची आठवण नवरात्रात केल्याबद्दल धन्यवाद!

धन्या's picture

11 Oct 2013 - 6:21 pm | धन्या

या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||

अनिरुद्ध प's picture

11 Oct 2013 - 7:28 pm | अनिरुद्ध प

+१११ सहमत

अत्रुप्त आत्मा's picture

11 Oct 2013 - 9:00 pm | अत्रुप्त आत्मा

+१११
जयंती मंगला काली भद्र काली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते।।
__/\__

प्यारे१'s picture

11 Oct 2013 - 9:10 pm | प्यारे१

आपले देखील आभार .
जास्त लिहीता आलं नव्हतं याबद्दल.

अर्धवटराव's picture

11 Oct 2013 - 11:32 pm | अर्धवटराव

आणि अर्थबोध देखील छान जमलाय प्यारेजी.

देवीची सगुण रुपात पुजा कधि सुरु झाली, निसर्ग पुजेलाच पुढे पार्थीव रुप कसे आले, त्याला केवळ मानसशास्त्रीय आणि उत्सवप्रियता एव्हढाच आधर आहि आणखी काहि... अनेक प्रश्न आणि अनेक उत्तरं. आपण कुठल्या नजरेने बघतो यावर उत्तर अवलंबुन आहे. रा.चि. ढेरे वगैरे मंडळी या पुजापद्धतींचा इतिहास तपासतात, तंत्रमार्गी या देवता मंत्ररुपाने वास करतात असं म्हणतात, तर टेंबे स्वामींसारखे महात्मे या देवी-देवतांशी अगदी मानवी पातळीवर प्रत्यक्ष संबंध ठेवतात व तसेच त्यांच्याशी संभाषण, व्यवहार करतात. असं खरच करता येतं का हे तपासायला त्या महात्म्यांना शरण जाण्याखेरीज इतर पर्याय नाहि.

सुधीर's picture

12 Oct 2013 - 10:50 am | सुधीर

सुंदर, लेख आवडला.

मृत्युन्जय's picture

12 Oct 2013 - 10:59 am | मृत्युन्जय

खुपच सुंदर लिहिले आहेस रे प्यार्‍या :)

मोदक's picture

12 Oct 2013 - 11:27 am | मोदक

हेच बोल्तो!!! :-)

पिलीयन रायडर's picture

12 Oct 2013 - 11:47 am | पिलीयन रायडर

मी सुद्धा हेच बोल्ते...!

अर्थ समजून घेऊन आरती म्हणली तर बरंच आहे. मग इतका आरडाओरडा करायची गरज नसते हे लोकांना निदान समजेल तरी.
रोचक लेख.

दादा कोंडके's picture

12 Oct 2013 - 12:16 pm | दादा कोंडके

लेख आणि प्रतिसाद आवडले नाहीत.

प्यारे१'s picture

12 Oct 2013 - 12:46 pm | प्यारे१

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Oct 2013 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

चिंता नसावी. ते तुमचे समर्थकच दिसताहेत. हा केवळ तुमचा "टीआर्पी" वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ;) असा आमचा समज आहे :)

लेख आणि प्रतिसाद आवडले नाहीत.

का आवडले नाहीत ते टंकायचे थोडे कष्ट घ्या की दादा. :)

अर्थ समजून घेऊन आरती म्हणताना बरे वाटते अर्थबोध करून दिल्याबद्दल प्यारे काकांचे आभार .

प्यारे१'s picture

12 Oct 2013 - 4:52 pm | प्यारे१

गावडे साहेब आभारी आहे.

:)

अक्षया's picture

12 Oct 2013 - 6:45 pm | अक्षया

मस्तच !! :)

प्यारे१'s picture

12 Oct 2013 - 7:02 pm | प्यारे१

सर व सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे हार्दिक आभार.

यशोधरा's picture

12 Oct 2013 - 10:07 pm | यशोधरा

सर कोण?

जोशी 'ले''s picture

13 Oct 2013 - 11:59 am | जोशी 'ले'

मस्त लिहलय प्यारे,....धन्यवाद आरतीचा भावार्थ आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल... काल कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात आरतीच्या वेळेस उपस्थित रहायचे भाग्य मला मिळाले त्या वेळेस तुमचा हा लेख प्रत्येक कडव्याच्या वेळेस मनात घोळत होता..
बाकि जशी ज्याची त्याची समज,जाण वगेरे वगेर... ;-)

जोशी 'ले''s picture

13 Oct 2013 - 12:21 pm | जोशी 'ले'

मस्त लिहलय प्यारे,....धन्यवाद आरतीचा भावार्थ आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल... काल कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात आरतीच्या वेळेस उपस्थित रहायचे भाग्य मला मिळाले त्या वेळेस तुमचा हा लेख प्रत्येक कडव्याच्या वेळेस मनात घोळत होता..
बाकि जशी ज्याची त्याची समज,जाण वगेरे वगेर... ;-)