गुडबाय मि. चिप्स

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
9 Sep 2013 - 4:27 pm

नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल.

छोट्या आकारातली शे - सव्वाशे पाने वाचायला असा कितीसा वेळ लागणार. एका बैठकीतच संपवले. इतका मंत्रमुग्ध झालो की लगोलग दुसर्यांदा वाचले आणि मग जाणवले की कथानायकाचे नावच संपुर्ण पुस्तकात नाही. गुडबाय मि. चिप्स ही चिपिंग आडनावाच्या एका मनस्वी शाळामास्तरची हलकीफुलकी कहाणी. यात दु:ख असले तरी औषधापुरते, संहार असला तरी केवळ उल्लेखापुरता, कारुण्य असले तरी आकंठ समाधानाची झालर असलेले. पुस्तकाचा मुख्य रस निर्भेळ नि:स्वार्थी निर्वाज्य प्रेम एका शाळामास्तरचे त्याचे विद्यार्थ्यांसाठीचे. चिपिंगचे सगळे विश्व त्या एका शाळेभोवती आणि त्याच्या विद्यार्थ्यांभोवती गुंफलेले.

तसे पाहता चिपिंग किंवा जो कालंतराने चिप्स म्हणुनच ओळखला जाऊ लागला तो काही कोणी विद्वज्जन नाही, तो उपजत आदर्श शिक्षकही नाही, कुठल्याही महान विचाराने प्रेरीत होउन किंवा जगाला बदलण्याचे उद्दिष्ट ठेवुन तो शिक्षकही झाला नाही. चिप्स युगप्रवर्तक नाही. तो केवळ एक शिक्षक आहे. हाडाचा शिक्षक. त्याच्या आणि त्याच्या फक्त मुलांच्या असलेल्या (Boys Only) शाळेच्या ब्रूकफिल्डच्या नात्याची वीण इतकी घट्ट विणली आहे की चिप्स जणू केवळ शिकवण्यासाठीच आणि ते सुद्धा ब्रूकफिल्डसाठीच जन्मला असावा.

आपण असामान्य नाही हे चिप्सने खुप आधीच स्वीकारले आहे. ठराविक मर्यादेत आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम उदात्त जे जे काही आहे ते देणे आणि त्यांच्यातुन एक उत्तम सज्जन माणूस घडवणे एवढेच चिप्सचे उद्दिष्ट. कदाचित ते ही नाही. गुडबाय मि. चिप्स मधला चिप्स कदाचित कुठल्याच ध्येयामागे न धावता आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करणारा एक अतिशय उत्तम शिक्षक आहे. गुडबाय चिप्स ही एकाचवेळेस सामान्य आणि असामान्य असणार्या एका प्रामाणिक शिक्षकाची कहाणी आहे.

पुलं म्हणतात तसे, फणस पिकल्याशिवाय त्यातला गोडवा कळत नाही तसाच हा चिप्स सुद्धा वाढत्या वयाने अधिकाधिक गोड, समंजस आणि परिपक्व होत जातो. शिक्षक हा ज्या काळात फक्त एक शिक्षक होता, घोड्यांच्या शर्यतीतला जॉकी नव्हता त्या कालखंडाचा एक जिवंत साक्षीदार म्हणजे चिप्स. ज्या काळात शिक्षक खाजगी शिकवण्या न घेता शाळेतच जीव तोडुन शिकवत, ज्या काळात शिक्षक टक्केवारीच्या शर्यतीत मुलांना पळवण्यापेक्षा एक सुजाण नागरिक बनवण्यावर भर देत, ज्या काळात शिक्षक शाळेत जाउन पाट्या टाकण्याला पाप आणि विद्यादानाला पवित्र कार्य समजत, ज्या काळात शिक्षकि हा पेशा किंवा व्यवसाय नसून एक ध्येय होते त्या काळाचा एका साक्षीदार म्हणजे चिप्स.
१८४८ साली जन्मलेला चिप्स १८७० पासून पुढची ४३ वर्षे ब्रूकफ़िल्डशी जोडला गेला. त्या दरम्यान त्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली, अनेक मुख्याध्यापक पाहिले, शाळेतली अनेक परिवर्तने पाहिली, एकाच घराण्याच्या ३ पिढ्या शाळेत शिकलेल्या पाहिल्या. आज्याचे, बापाचे आणि शाळेत नव्याने दाखल झालेल्या पोराचे असे सर्वांचे शाळेतले प्रताप त्याने विद्यार्थ्यांना ऐकवले. एका प्रकारे तो त्या शाळेच्या इतिहासाचा एका बिनीचा शिलेदार होता, शाळेच्या इतिहासाशी नाळ जोडणार एका जिवंत दुवा.

इतर कुठल्याही शिक्षकासारखा चिप्स कारकीर्दीच्या सुरुवातीला बुजरा असतो, मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरुन तो थोडा कडक होतो, वयानुपरात्वे थोडा पोक्त आणि कुशल आणि मग वयाच्या ४८ वर्षी आपल्या निम्म्या वयाच्या कॅथरीनशी लग्न शाल्यानंतर तिच्या सळसळत्या तरूण उत्साहाचा परिपाक म्हणुन कदाचित थोडा खेळकर, मिश्कील आणि खट्याळ होतो. कॅथरीन त्याच्या आयुष्यात तोपर्यंत अभावानेच असलेले हास्य आणि आनंद होतो. तिच्या सहवासात त्याची विनोदबुद्धी विकसित होते. ती त्याला बदलाला सामोरे जायला शिकवते आणि परिस्थितीप्रमाणे बदल स्वीकारायलाही शिकवते.

कॅथी कर्मठ आणि रुढीप्रिय चिप्स च्या आयुष्यात तरूण आणि आधुनिक बदल घडवुन आणते. ति मि. चिपिंगला "चिप्स" बनवते. तिच्या आगमनाच्या आधी चिप्स हा केवळ एक शिक्षक असतो. मात्र चिप्स एक समाज घडवणारा शिल्पकार आहे आणि त्याच्यात एक सुजाण नागरिक घडवण्याची क्षमता आहे हे त्याला कॅथीच पटवुन देते. त्या आधी चिप्स ने त्याच्यापेशाकडे या दृष्टीकोनातुन कधीच बघितलेले नसते. हाच चिप्स तरूण मुख्याध्यापक राल्स्टनच्या शिकवण्याच्या पद्धतीत काळानुरुप बदल घडवण्याच्या सुचनेला मात्र धुडकावुन लावतो. बदल स्वीकारण्याच्या बाबतीत तो एकाच वेळेस उदारमतवादी आणि आडमुठा आहे. एका कालखंडीय स्थित्यंतराचा तो पिकलेला साक्षीदार आहे. त्यामुळेच राल्स्टन जेव्हा त्याला त्याच्या जुनाट शिक्षणपद्धतीमुळे काढु इच्छितो तेव्हा शाळेच्या ३ पिढ्या त्याच्या बाजुने उभ्या राहतात. उनपाऊस आणि वादळाचे धक्के सोसत उभ्या असलेल्या एका वटवृक्षासारखा तो त्या शाळेच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या उज्ज्वल इतिहासाचा आणि परंपरेचा मानबिंदु असतो.

त्याच्या कारकीर्दीत चिप्सच्या आयुष्यात शिकवण्यापेक्षा जास्त महत्वाचे कधीच काहीच नसते. पहिल्याच बाळंतपणात कॅथी आणि तिचे नवजात अर्भक दोन्ही दगावतात तेव्हा चिप्स उन्मळुन पडतो पण त्याही परिस्थितीत तो त्याचे नेहमीचे वर्ग नेहमीच्याच सफाईने घेतो. एप्रिल फूल निमित्त त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याला कोरी पत्रे पाठवलेली असते. पण त्या अप्रिल फूलच्या दिवशी नियतीनेच इतकी मोठी फसवणूक केलेल्या चिप्सच्या ध्यानात तो विनोद येतच नाही. चैत्राची ती दुपार चिप्सला फसवते आणि आयुष्याच्या पन्नाशीत इतक्या मोठ्या दु:खानेही खचुन न जाता व्रतस्थपणे शिकवत राहुन चिप्स नियतीला फसवतो.

महायुद्धादरम्यान सगळे शिक्षक युद्धावर रुजु होतात तेव्हा चिप्स परत एकदा शाळेत रुजु होतो. यावेळेस मुख्याध्यापक म्हणुन. पण केवळ हंगामी मुख्याध्यापक. मुख्याध्यापक होण्याएवढी आपली शैक्षणिक अर्हत नाही या मुद्द्यावर तो ठाम असतो. अशाच एका दुपारी महायुद्धादरम्यान आकाशातुन जर्मन विमाने शाळेच्या आवारात बाँब ओकत असताना चिप्स अधिक उमेदीने शिकवत राहतो. त्याच्यातली विनोद बुद्धी एका ब्रिटिश माणसाला साजेश्या पद्धतीने त्या रणधुमाळीत चढत्या भाजणीने प्रखर होत जाते. बाहेर इंग्लिश सैनिक प्राणपणाने लढत असतात आणि आत चिप्स प्राणपणाने शिकवत असतो. तोच ध्यास, तेच ध्येय, तेच सत्व. युद्धकाळात रणांगणावर हुतात्मा झालेल्या माजी विद्यार्थ्यांची नावे चिप्स रोज वाचुन दाखवतो, सगळेच जण नेहमीच हेलावत असतात. पण चिप्स चे दु:ख त्या हुन मोठे असते. त्या नावामागचे चेहरे त्याने स्वतः शिकवलेले असतात. ती माणसे त्याने स्वतः घडवलेली असतात. अश्याच एका सकाळी चिप्सला शाळेतला त्याचा जुना सहकारी शिक्षक रणभूमीवर पडल्याची दु:खद बातमी कळते. चिप्स पश्चिम आघाडीवर धारातीर्थी पडलेल्या जुन्या सहकार्याला सुद्धा आदरांजली वाहतो, सर्वांना वहायला लावतो. लोक कुजबुजतात 'पश्चिम आघाडीवर कुठे ब्रिटिश लढताहेत? तिथे तर जर्मन्स आहेत.' चिप्सच्या लेखी एक जर्मन असला तरी तो एक ब्रूकफिल्डचा शिक्षक असतो, एक लढवय्या, एक समाज घडवणारा शिल्पकार. बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात.

युद्ध संपल्यावर चिप्स आपल्या निवृत्त जीवनात परततो. तरीही तो कधीच शाळेपासुन वेगळा होउ शकत नाही. सतत नविन शिक्षकांच्या, नविन विद्यार्थ्यांच्या सहवासात असतो. नविन विद्यार्थ्यांना दरवर्षी घरी बोलावुन एका आजोबाच्या मायेने त्यांना चहा आणी केक खायला घालतो. त्याचे विनोद शाळेचा एक अन्मोल ठेवा असतो, वयाच्या अधिकाराने तो शाळेतुन बाहेर पडुन उमराव, सरदार, अधिकारी झालेल्यांना देखील मिश्कीलपणे ४ गोष्टी सांगु शकतो. ब्रूकफिल्ड मध्ये चिप्सला सगळेच माफ असते.

कॅथी गेल्यानंतर कैक वर्षांनी, कदाचित अडीच दशकांहून आधिक काळ गेल्यानंतर एका एक एप्रिलला शाळेतले जुने विद्यार्थी एका नविन विद्यार्थ्याला 'लिनफर्डला' चिप्सने बोलावले आहे असे सांगुन त्याच्याकडे पाठवतात. त्यामागचा विनोद समजुन घेउन चिप्स त्याला खरेच बोलावले आहे हे भासवुन केक खायला घालतो. त्याच्याबरोबर गप्पा मारतो. त्याच दिवशी चिप्स तापाने फणफणतो. अखेरच्या घटका मोजत असताना त्याच्या आजुबाजुला एक जुना सहकारी, नविन मुख्याध्यापक (नविन म्हणजे १५ वर्षापुर्वी रुजु झालेले) आणि त्याची केयरटेकर असते. ते चिप्सच्या अयशस्वी खाजगी जीवनाविषयी आणि जन्मतः दगावलेल्या मुलाबद्दल बोलत असतात. त्यावेळेस चिप्सला मात्र शाळेच्या हजेरीपटातल्या याद्यांच्या याद्या आठवत असतात 'पेटिफर, पोलेट, पोर्सन....' , 'हार्पर, हॅस्लेट, हॅटफील्ड……..' , 'बोन, बोस्टन, बोवी…….'. अर्धवट ग्लानीतुन जागा होउन चिप्स म्हणतो "कोण म्हणते मला मुले नाही झाली? मी तर हजारो मुलांचा बाप आहे. आणि गंमत म्हणजे सगळे मुलगेच."

चिप्स एक शिक्षक म्हणुन जगतो आणि मरतानाही तो एक शिक्षकच असतो. हाडाचा शिक्षक. त्याच्या पेशाशी, पेशाशी म्हणण्यापेक्षा कर्माशी तो इतका एकरुप होतो की शाळेबाहेर त्याला जीवनच नसते. त्याच्या श्रद्धांजलीनिमित त्याचा सहकारी शिक्षक म्हणतो "चिप्सना ब्रूकफिल्ड कधीच विसरणार नाही." सगळ्याच गोष्टी अखेर विस्मरणात जातात. पण ही गोष्ट तशी खरी असते. लिनफर्ड असेपर्यंत तरी चिप्स विसरला जाणार नाही. कारण तो सगळ्यांना सांगेल " ते जाण्याच्या आदल्या संध्याकाळी तर त्यांनी मला चहा पाजला"

गुडबाय मि.चिप्स खरे पाहता एक सरळ साधे पुस्तक. कुठलाही महान उपदेश करण्याचा उद्देश नाही किंवा काही नाट्यमयता नाही. चिप्स केवळ विद्यार्थी घडवतो आणी या प्रवासात स्वतः घडत जातो. त्याच्या या कारकीर्दीचा गुडबाय मि. चिप्स म्हणजे एक ह्रिद्य, निखळ धांडोळा.

पुस्तकातले काही संदर्भ, काही मजकूर, ग्रीक लॅटिन भाषेतुन केलेल्या काही कोट्या हे स्थलकाल बांधील असल्याने आपल्याला उमजत नाही. तरीही पुस्तकाचा निर्भेळ आनंद लुटण्यात त्याचा अडसरही होत नाही. कारण थोड्याफार फरकाने मागच्या शतकाच्या सुरुवातीला हाडाचे शिक्षक सगळीकडे असेच होते. निर्वाज्य आनंदासाठी एकदा मि. चिप्स वाचाच

**************************
गुडबाय मि. चिप्स
मूळ लेखनः जेम्स हिल्टन
अनुवादः योगेश काणे
प्रकाशकः भारत बुक हाउस
किंमतः रु. ६५/- (पेपरबॅक)

**************************

वाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानशिक्षणमौजमजाआस्वादसमीक्षालेखशिफारसमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

9 Sep 2013 - 4:51 pm | यशोधरा

मस्त लिहिले आहेस! आवडले.

पैसा's picture

9 Sep 2013 - 5:05 pm | पैसा

काही भाग करुण वाटले पण तरीही सकारात्मक संदेश देणारे पुस्तक आहे हे नक्की!

सुरेख परिचय रे मृत्युन्जया.

चिगो's picture

9 Sep 2013 - 6:00 pm | चिगो

पुस्तक वाचायला प्रवृत्त करणारे लेखन.. आवडले. पुलंचे 'चितळे मास्तर' आठवले .. पुस्तक वाचावेच लागेल आता..

आतिवास's picture

9 Sep 2013 - 7:09 pm | आतिवास

हा चित्रपट पाहिला आहे आणि एक अतिशय सुंदर चित्रपट म्हणून तो स्मरणात आहे. पुस्तक नक्की वाचेन.

पिंपातला उंदीर's picture

9 Sep 2013 - 7:52 pm | पिंपातला उंदीर

सुंदर

बॅटमॅन's picture

9 Sep 2013 - 9:08 pm | बॅटमॅन

सुंदर परिचय!!!!!

मुक्त विहारि's picture

9 Sep 2013 - 9:20 pm | मुक्त विहारि

सुंदर परिचय!!!!!

विजुभाऊ's picture

9 Sep 2013 - 10:30 pm | विजुभाऊ

चांगले पुस्तक दिसतय. भारत भेटीत नक्की घेईन. परीचयाबद्दल थ्यान्क्स

सागर's picture

10 Sep 2013 - 12:22 am | सागर

मृत्युंजया

सुरेख परिक्षण लिहिलंयस रे. घेऊन टाकीन हे पुस्तक लवकरच.

चित्रपट पाहिला आहे, छान आहे
परिक्षण सुरेख..
लवकर पुस्तकही वाचेन

प्रमोद्_पुणे's picture

10 Sep 2013 - 2:04 pm | प्रमोद्_पुणे

पुस्तक परिचय..नक्कीच वाचेन :)

विटेकर's picture

10 Sep 2013 - 3:14 pm | विटेकर

धन्यवाद , चांगल्या पुस्तकाचा तितकाच चांगला परिचय करुन दिल्याबद्दल !

प्यारे१'s picture

13 Sep 2013 - 11:13 pm | प्यारे१

चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

kalpana joshi's picture

10 Sep 2013 - 2:14 pm | kalpana joshi

छान,लिहल आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Sep 2013 - 5:29 pm | निनाद मुक्काम प...

अरे हे तर परदेशातील चितळे मास्तर
चांगली माहिती ,उत्कृष्ट लेख

सुरेख परिचय, पुस्तक नक्कीच शोधतो व वाचण्यासाठी घेतो.

नाखु's picture

14 Sep 2013 - 3:51 pm | नाखु

मार्मिक आणि निर्लेप परिक्षण

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2013 - 1:47 pm | स्वाती दिनेश

परिचय आवडला,
स्वाती

बॅटमॅन's picture

16 Sep 2013 - 2:08 pm | बॅटमॅन

अवांतरः हा परिचय वाचून अल्फोन्स डॉडेट नामक फ्रेंच लेखकाची द लास्ट लेसन ही अप्रतिम कथा आठवली. आठवीला इंग्रजीला होती. अर्धवट वाचूनच चटका लागला, मग नंतर कैक वर्षांनी पूर्ण वाचली.

शुचि's picture

16 Sep 2013 - 6:25 pm | शुचि

वा!!! अप्रतिम परीचय.