जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का?
प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपलं थोडं बरं वाटावं म्हणून 'नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा' अशी समजूत घातलेली आहे. 'अटकेवरी जेथील तुरंगि जल पिणे, तेथ अडे काय जलाशय नदाविणे' या ओळींतूनही देशाच्या कोरडेपणाविषयीच भावना व्यक्त होतात. त्यात थोडासा, 'आम्ही कोरडे असलो म्हणून काय झालं, आम्हाला फरक पडत नाही' असा स्वर आहे. मरहट्ट या नावातूनच कोणीतरी हट्टाकट्टा, फटाफट रट्टे हाणणारा डोळ्यासमोर येतो. तर सांगायचा मुद्दा काय, आपण मराठी लोक हे राकटपणाबद्दल प्रसिद्ध आहोत. हे चित्र बदलायला हवं.
पण म्हणजे नक्की काय करायचं?
एखादी गोष्ट मुळापासून बदलायची म्हणजे फार कष्ट असतात. राकटपणाची प्रतिमा बदलायची तर खरोखर राकटपणा टाकून देऊन मऊ, मृदू, नाजूक होण्याची गरज नाही. प्रतिमा लाइज इन द आइज ऑफ द बिहोल्डर असं कोणीतरी आंग्ल कवी म्हणून गेलेला आहेच. तेव्हा स्वतः आंतर्बाह्य बदलण्याचे त्रास कशाला घ्यायचे? निव्वळ आपलं बाह्य रूप बदललं की झालं. मग लोकांना आपण रासवट वगैरे वाटणार नाही. तेच तर साधायचं आहे.
हे बाह्य रूप कसं बदलायचं?
सोप्पं आहे. बाह्य रूप बदलणं म्हणजे खरोखर सगळ्यांनी नटरंगमधल्या अतुल कुलकर्णीसारखं पैलवानापासून सुरूवात करून नाच्यापर्यंत रुपडं बदलायचं करायचं असं मी म्हणत नाही. मराठी माणसाचं बाह्य रूप म्हणजे तो अथवा ती (पाशवी शक्तीही अस्तित्वात आहेत याची दखल) जी बोलतो अथवा बोलते ती भाषा. त्या भाषेला जर पैलवानासारखं लंगोट लावून आखाड्यात घुमवण्याऐवजी गोंडस कपडे घालून तुणतुणं वाजवायला लावलं तर निश्चितच मराठी भाषिकांची प्रतिमा बदलेल.
आत्ताच हा प्रश्न का उपस्थित झाला?
एकेकाळी आपल्या अस्मिता एखाद्या किल्ल्याच्या बुरुजासारख्या दणकट होत्या. या नव्या युगात किल्ले गेले, बुरुज ढासळले तशा त्याही कोमल आणि नाजूक झालेल्या आहेत. काप गेल्यावर शिल्लक राहिलेली भोकं उघडी पडून नाजूक व्हावी तशा. गेली काही वर्षं आपल्या सांस्कृतिक जीवनात अतिरेकाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जेम्स लेन प्रकरणी होणारी तोडफोड असो, की आनंद यादवांवर आणि ह. मो. मराठेंवर आलेली क्षमा मागायची पाळी असो, की आंबेडकरांच्या व्यंगचित्राबाबतचा वाद असो. विशिष्ट अस्मिता कुरवाळणं, त्यांना खतपाणी घालणं, व त्यामुळे इतर अस्मिता दुखावणं हे वाढत चाललेलं आहे. प्रश्न असा येतो की साध्या पिसानेही ओरखडा उमटून जखमा होऊ शकणाऱ्या अस्मिता दुखवाव्याच का? मुळात जर अभिनिवेशहीन भाषा वापरली, नाजूक विषयांपासून दूरच राहिलं, तर कशाला दुखावतील कोणाच्या अस्मिता? तेव्हा विचारशुद्धी आणि भाषाशुद्धी झाली तर आपल्यासमोर उभे रहाणारे कित्येक प्रश्न चुटकीसरसे नष्ट होतील. यासाठी जहाल किंवा कोणालाही दुखावणारी भाषा टाळणं हे निकडीचं झालेलं आहे.
पटलं. पण हे कसं साधावं?
भाषा हे आपल्या जीवनाचं महत्त्वाचं अंग आहे. आपण बोलतो, लिहितो, संवाद साधतो ते भाषेतूनच. एकमेकांना टपल्या मारतो, चिमटे काढतो तेही भाषेतूनच. इथपर्यंत असतं ते ठीक आहे. पण त्यापुढे जाऊन मुद्दे संपल्यावर गुद्द्यांवर उतरतो, लाथाळ्या करतो, तिरकस शब्दांच्या नखांनी बोचकारे काढतो. वैचारिक विषयांवर भावनिक होऊन जहाल भाषेत लिहितो... हे थांबवायला हवं. पण ते थांबवण्यासाठी आधी ओळखता आलं पाहिजे. यु कॅनॉट कंट्रोल व्हॉट यु कांट मेजर. पूर्वीच्या काळी प्रकाशनाची माध्यमं मर्यादित होती. जे काही प्रकाशित व्हायचं ते प्रशासकांच्या पूर्वानुमतीनंतरच व्हायचं. त्यामुळे असले प्रकार जरा कमी व्हायचे. मात्र आजचा जमाना संस्थळं, ब्लॉग्ज, ऑनलाइन वर्तमानपत्रांचा आहे. इंटरऍक्टिव्ह माध्यमांमुळे कोणीही उठून काहीही लिहू शकतो. घरची कामं सांभाळून संपादन करणाऱ्या संपादकांना हे सगळं शोधता येईलच असं नाही. त्यासाठी आम्ही नवीन प्रोग्राम तयार केलेला आहे. त्याचं नाव आहे 'जहालभाषाचिकित्सक'
नक्कीच रोचक वाटतंय. त्याचं काम कसं चालतं?
आम्ही मराठीतल्या शब्दांना, वाक्प्रचारांना जहालपणाची रेटिंग्ज दिलेली आहेत. एखाद्या लेखात अशा शब्दांचं प्रमाण किती आहे, यावरून आम्ही लेखाचा जहालपणा ठरवतो. तसंच लेखात जिथे जिथे पातळी सोडून लेखन केलेलं असेल ती वाक्यं हायलाइट करतो. भाषाशुद्धीचिकित्सक ज्याप्रमाणे अशुद्ध लेखन हायलाइट करतो, तसंच. संपादकांना एका क्लिकने ती आक्षेपार्ह वाक्यं काढून टाकून लेख शुद्ध, सौम्य करता येतो. तसंच मधुपर्यायोक्तीची सोय करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ एखाद्या अग्रलेखाचा मथळा 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा असेल तर तो बदलून 'धोरणाचा पुनर्विचार करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची सरकारला अजिजीची विनंती आहे' असा आपोआप करता येईल. किंवा 'भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी' हे बदलून 'भले तर देऊ अंगीचा अंगरखा नाठाळाला विनवू नमवुनि माथा' असं होईल. अशाने समाजजीवनात वारंवार होणारे संघर्ष याने टळतील. कारण प्रश्न मराठी लोकांच्या भाषेचा नाही. वैचारीक किंवा तथ्यात्मक लेखन करतांना वाचक विचार आणि तथ्याकडे आकृष्ट व्हायला हवा, भावनांच्या आवेगात नव्हे. असले भावनांचे आवेग असलेले लेखन मी म्हणतो तेच खरे आहे आणि तुम्ही ते मानलेच पाहिजे अशा धाटणीचे होते. वाचकांनी विचार करुन निर्णय घेतलेला बरा, त्यासाठी भाषाशैली भिन्न वापरावी. लेखन कोणते आहे याच्याशी सुसंगत लेखन शैली असावी.
वा. पण या शब्दांच्या जहालपणाची प्रतवारी कशी ठरवली जाते?
'जहालभाषाचिकित्सक'ची कार्यपद्धती हे ट्रेड सीक्रेट आहे, त्यामुळे फार खोलात जाऊन प्रणाली सांगता येणार नाही. पण साधारण कल्पना देतो. आम्ही अगदी अक्षरांच्या पातळीवर जातो. मराठी भाषेत ठ, ड, ण, ट, र, अशी अनेक कर्णकटू व्यंजनं मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मराठी या शब्दातच र आणि ठ ही अगदी राठ वाटणारी, कठोर अक्षरं आहेत. ठार, रट्टा, दगड, हाणणे, मारामारी, तक्रार, कटकट, बंड, दणदणीत, कठोर, दणका वगैरे उदाहरणांवरून हे स्पष्ट होतं. याउलट बंगाली किंवा गुजराथी भाषांमध्ये सगळे ग, ल, त, ब अशी गुलगुलीत, गुळगुळीत, गुबगुबीत अक्षरं वापरली जातात. त्यामुळे त्या भाषांमध्ये गोडवा येतो. गुजराथी लोक व्यापारात पुढे आणि मराठी लोक मागे पडण्यामागे या भाषेतल्या गोडव्याचा मोठा हात आहे. मराठी भाषेत खरखरीत, रखरखीत, कोरडे ठणठणीत, असे अनेक शब्द आहेत. त्यांच्यातल्या अक्षरांप्रमाणे जहालपणा वा कोरडेपणा ठरवायला मदत होते.
वाक्प्रचारांबद्दल थोडं सांगता येईल का?
शब्दांचा जहालपणा जसा अक्षरांवरून ठरतो, तसा वाक्प्रचारांचा जहालपणा हा त्यातल्या शब्दांवरून ठरतो. म्हणजे तिच्यायला, च्यायला, च्यामारी वगैरे शब्द ब्लॅकलिस्टमध्ये आहेत. ते शब्द असलेले वाक्प्रचार आपोआपच हायलाइट केले जातात. ब्राह्मण हा शब्द बहुतेक वेळा त्या विशिष्ट जमातीला दूषणं देण्यासाठीच वापरला जातो. तेव्हा तसली वाक्यंही ताबडतोब संपादकांच्या नजरेस आणून दिली जातात. बामन असा शब्द असेल तर आख्खा लेख ताबडतोब बाद होतो. 'शिवाजी' हा शब्द नुसता आला - त्याआधी छत्रपती शिवाजी किंवा किमान त्यानंतर महाराज आलं नाही - तर लगेचच रेड फ्लॅग उभारला जातो. एकेरीत उल्लेख आला तर ते वाक्यच भडक लाल रंगात संपादकांसमोर सादर होतं. प्रत्येकच पूजनीय व्यक्तिमत्व - मग ते लोकमान्य टिळक असो, बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा महात्मा गांधी असोत - नुसत्या नावाने आले तर लेखकाचा उद्देश त्यांचा अवमान करण्याचा आहे हे चिकित्सक प्रणालीत गृहित धरलं जातं, आणि संपादकांनी ते तपासून पाहिल्याशिवाय लेखाला प्रसिद्धी मिळणार नाही अशी सोय करता येते. किंवा संपादकांना इतके कष्ट घ्यायचे नसतील तर ते सन्मानदर्शक शब्द आपोआप घालण्याची सोयही त्यात आहे. राजकीय पक्षांबद्दलचे उल्लेखही सोबर भाषेत येतील याची काळजीही या प्रणालीत घेतलेली आहे. विशेषतः भाजपा आणि मनसे यांच्याविरुद्ध काही लोक अकारण भडक भाषा वापरताना दिसतात. त्यामुळे या पक्षांना भाषाशुद्धीकरणाबाबत विशेष झुकतं माप देण्यात आलेलं आहे. एकंदरीतच भाषा छचोर होऊ नये असा प्रयत्न आहे. कारण छचोर भाषेमुळे विषयाचं गांभिर्य कमी होतं. भाषणांत अशी भाषा असेल तर 'काय धाडसी वक्ता आहे हो!', 'सॉल्लीड फोडला/झोडला एकेकाला. मानलं पाहिजे बुवा!' अशी प्रतिक्रिया ऐकू येते. भाषणांत/लेखनांत, मांडण्याचा प्रयत्न केलेल्या मुख्य विषयावर श्रोत्यांमध्ये/वाचकांमध्ये चर्चा होताना दिसत नाही. व्यक्तीचं कौतुक होतं. विचारांना चालना मिळत नाही.
हम्म्म.. या चिकित्सकाचा कुणाकुणाच्या लेखनावर परिणाम होईल?
हे परिणाम दूरगामी असतील. वितंडवाद घालणाऱ्या कुठच्याही लेखकाच्या लेखनावर होईल. उदाहरणार्थ 'गाय हा उपयुक्त पशू आहे' हे वाक्यच घ्या. गोमातेला परमपूज्य मानणाऱ्या हिंदूंच्या भावना दुखावणारं हे विधान असल्याचं जहालभाषाचिकित्सकात लगेच नोंदलं जाऊन ते वाक्य बदललं जाऊन 'गाय ही हिंदूंना देवस्थानी आहे. तिच्या पोटी तेहतीस कोटी देव वसतात. तिचं मूत्र आणि विष्ठा हीही हिंदूंना पूजनीय आहे. ती दूध देते, त्यावर अनेक बालकं पोसली जातात. म्हणून ती उपयुक्त असली तरी मातेसमान पूजनीय आहे.' असं बदललं जाईल. म्हणजे मूळ वाक्याचा गाभा तोच राहिला, पण गायीविषयी असलेल्या हिंदूंच्या भावनांचा अनादर होऊ दिला नाही. यातच जहालभाषाचिकित्सकाचं बलस्थान आहे. एकेकाळी सावरकर, फुले, आगरकर इत्यादींनी अत्यंत जहाल भाषेत समाजसुधारणेबाबत मतं मांडली. पण त्या जहाल भाषेमुळे नक्की काय साधलं? काही नाही. त्याऐवजी वेळीच त्यांच्या भाषेवर चिकित्सक लावून त्यांची भाषा मवाळ, मृदू केली असती तर बरं झालं नसतं का? समाजाच्या अंगावर शाब्दिक कोरडे ओढून त्यांनी जागृती करण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने केला. पण हेच काम मऊ, मुलायम पिसं फिरवून समाजाच्या अंगावर गुदगुल्या करून साधता नसतं आलं का? निश्चित आलं असतं. चाबकाचे फटके कोणाला आवडतात? कोणालाच नाही. गुदगुल्यांनी कोणाला हसू येत नाही? सगळ्यांनाच येतं. मग तुम्हीच सांगा, काय जास्त परिणामकारक?
मग कुठच्या लेखकांवर याचा परिणाम होणार नाही?
अतिशय चांगला प्रश्न आहे. या जहालभाषाचिकित्सकाची डेव्हलपमेंट करताना आम्हाला आदर्श लिखाण म्हणजे काय, याची उदाहरणं फीड करण्याची गरज पडली. आम्हाला अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे लेखक सापडले. साने गुरुजी, प्रवीण दवणे आणि व. पु. काळे हे तीनच लेखक आम्ही आदर्श म्हणून वापरले. त्यामुळे त्यांचा जहालतेचा स्कोअर शून्य येईल. ना. सी. फडक्यांचं ललित लेखनही त्या चाचणीवर बऱ्यापैकी उतरतं. दुर्दैवाने संत ज्ञानेश्वर सोडले तर बाकी संत वाङमय थोडा जहालपणा बाळगून आहे. तुकाराम महाराज तर अनेक ठिकाणी फ्लॅग होतात. संत रामदासही मूर्खांविषयी बोलतात तेव्हा जहालच होतात. या सर्वांच्या लेखनाचं शुद्धीकरण करण्याचाही आमचा दूरगामी प्रकल्प आहे. मराठी भाषेतून जेव्हा तळतळाट, थयथयाट, टीका, चुका काढणं, तिरकस बोलणं, कोणाला दोष देणं, कोणाला टाकून बोलणं, कोणाला राग येईल असं बोलणं... हे सगळं निघून जाईल, इतिहासातूनही पुसलं जाईल तोच मराठी भाषेचा सुवर्णक्षण असेल. मग एकवेळ अशी येईल की शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला हे हिंदू-मुसलमान तेढ वाढवणारं आहे हे लक्षात ठेवून 'शिवाजी महाराज व अफझलखान यांच्यातल्या वाटाघाटी फिसकटल्यामुळे खानाचं आतडं तीळतीळ तुटलं. आणि त्या धक्क्यानेच त्याचा मृत्यू झाला.' असं विधान येईल. मग का होतील दंगे?
काही शेवटचे शब्द?
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रमाण भाषेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. भाषाशुद्धीचिकित्सकाने या प्रमाण भाषेचा उपयोजन सुकर केलं. हे बदल आवश्यक असले तरी क्रांतिकारक नव्हते. जहालभाषाचिकित्सकाद्वारे आम्ही मराठी भाषेत, व त्यातून मराठी समाजजीवनात आमूलाग्र क्रांती करणार आहोत. भाषेतील वैषम्ययुक्त शब्द, वाक्प्रचार नष्ट करून राज्यीय, राष्ट्रीय व जागतिक एकात्मतेला हातभार लावत आहोत. ज्यावेळी जगातली प्रत्येक व्यक्ती साने गुरुजी, प्रवीण दवणे व व. पु. काळे यांच्या लेखनाप्रमाणे बोलेल, लिहील व वागेल तो खरा सुदिन. तो दिवस दूर असला तरी असाध्य नाही. जहालभाषाचिकित्सकामुळे तो दिवस जवळ आणण्याचं साधन आपल्याला मिळालेलं आहे.
(श्रेयअव्हेर http://www.misalpav.com/comment/427419 या लेखावरचे काही प्रतिसाद शब्दशः वापरले आहेत)
प्रतिक्रिया
8 Oct 2012 - 8:09 am | जोशी 'ले'
'शिवाजी महाराज व अफझलखान यांच्यातल्या वाटाघाटी फिसकटल्यामुळे खानाचं आतडं तीळतीळ तुटलं. आणि त्या धक्क्यानेच त्याचा मृत्यू झाला.'
:-) :-) :-)
चिकित्सा बिग्रेड सारखी संघटना सुरु करणेत यावि हि अजिजिचि विनवनी ;-)
8 Oct 2012 - 8:22 am | श्रावण मोडक
भावना पोचल्या. :-)
8 Oct 2012 - 8:31 am | पाषाणभेद
मिपावरील अनेक लेख अन प्रतिक्रिया मला भाषाशुद्धीचिकित्सकाने चिकित्सीत करून बदलावयाच्या आहेत. हा एक प्रकल्प मला हाती घ्यायचा आहे. हा भाषाशुद्धीचिकित्सक ऑनलाईन उपलब्ध असण्याची काय शक्यता आहे?
8 Oct 2012 - 9:28 am | चौकटराजा
पन जेंन्ना ष्टाईल म्हून वाकडं लिवायची विच्चा आसंल तेना पकडनार काय ?
8 Oct 2012 - 7:37 pm | राजेश घासकडवी
तुम्ही भाषाशुद्धीचिकित्सक आणि जहालभाषाचिकित्सक यांच्यात गल्लत करत आहात बहुतेक. भाशुचि शुद्धलेखन आणि व्याकरणातल्या चुका तपासतो. तो वापरण्यास मिपावर तरी एकेकाळी जवळपास बंदी होती. जभाचि वर देखील बंदी असावी असं लेखन एके काळी दिसायचं, पण आता परिस्थिती बदलली आहे बहुतेक.
काही उदाहरणं देऊ शकाल का? जभाचि ट्रायल बेसिसवर नक्कीच आत्ता उपलब्ध करून देता येईल.
8 Oct 2012 - 11:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण हे असं मुळमुळीत काहीतरी बोललं तर लोकांचं आपल्याकडे लक्ष कसं जाणार? आणि तसं झालं नाही तर आपण काय बोललो हे लोकं कसं ऐकणार? लोकांनी ऐकलंच नाही तर आपण प्रसिद्ध कसे होणार?
काहीतरीच ब्वॉ तुमचं, गुर्जी!
अवांतरः तुमच्या लिखाणात शुद्धलेखनाच्या चुका अपेक्षित नव्हत्या. उदा: वैचारीक, गांभिर्य. निदान 'इक' आणि 'ऊन-हून' हे पंचमीचे प्रत्ययतरी चुकवू नको हो!
8 Oct 2012 - 7:46 pm | राजेश घासकडवी
'माझ्या अश्रूंना हसू नका. त्यांच्यात जग परिवर्तन करण्याची शक्ती आहे' हे थोर लेखक साने गुरुजींचं विधान तुम्हाला ठाऊक नाही काय? मी तर म्हणतो की महात्मा गांधींनी आपल्या मुळुमुळू बोलण्यातूनच जनशक्ती एकवटली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि प्रसिद्धीचं काय सांगता? लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा भगतसिंग वगैरेंची नावं भारताबाहेर माहीत तरी आहेत का?
उगाच भलत्या गोष्टींवरून आमची षष्ठी करू नका. एकतर मिपावरती शुद्धलेखनाच्या चुका वैग्रे काढणं हे तुमच्यासारख्या जुन्याजाणत्या सदस्यांना शोभा देत नाही. 'मराठी अभिव्यक्तीसाठी असलेलं मराठमोळं संस्थळ' आहे हे. इथे तुमच्या सदाशिवपेठी प्रमाण भाषेचा वरचष्मा तुम्ही गाजवण्याचा प्रयत्न करता? आणि बरं, या चुका दाखवूनच द्यायच्या असतील तर नाना चेंगट आणि पेठकर काकांशी बोला. त्यांचे प्रतिसाद जसे च्या तसे चोप्य पस्ते केलेले आहेत.
9 Oct 2012 - 1:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गांधीजी जगभर प्रसिद्ध आहेत, पुण्याला येणारे परदेशी पाहुणेही आगाखान पॅलेसला घेऊन जाण्याचा आग्रह धरतात वगैरे मान्य आहे.
निदान हिंदाळलेलं मराठीतरी लिहू नका. विभक्ती प्रत्यय मराठीत शब्दाला चिकटूनच येतात. 'जसेच्या तसे' असं लिहीताना मराठीत 'जसेच्या' हा एकच शब्द समजतात. प्रमाण मराठी असो नाहीतर बोलीभाषा!
जहाल भाषेमुळे मराठी मनुष्याची बदनामी होऊ नये म्हणून जपतोस, तसाच शुद्धलेखनही जप हो श्याम.
9 Oct 2012 - 11:41 pm | आनंदी गोपाळ
ई त आ, त ई आ
उन हून, उन हून पासून
हे दोन्ही पंचमीचे प्रत्यय???
11 Oct 2012 - 9:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गैरसमज झालाय.
ऊन-हून हे पंचमीचे. इक प्रत्ययाला सामान्य नाव काय आहे हे विसरले. गांभीर्य या शब्दाचं व्याकरणच विसरले.
8 Oct 2012 - 11:12 am | प्रसाद प्रसाद
प्रत्येकच पूजनीय व्यक्तिमत्व - मग ते लोकमान्य टिळक असो, बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा महात्मा गांधी असोत - नुसत्या नावाने आले तर लेखकाचा उद्देश त्यांचा अवमान करण्याचा आहे
या यादीमध्ये आदरणीय महामहीम श्रीमती सोनिया गांधी, राजकुमार राहुल गांधी आणि समस्त जीवित मृत गांधी परिवार (महात्मा गांधींशी सबंधित नसलेला) तसेच गेलाबाजार अजित पवार आणि मोठे पवार साहेब व कुटुंबीय यांची नावे नसल्याबद्दल जाहीर णिषेध.
बाकी मस्त लेख.
8 Oct 2012 - 12:46 pm | चेतन माने
हे म्हणजे मिसळीत फक्त फरसाण दिल्यासारखं झालं !!!
8 Oct 2012 - 12:58 pm | कवितानागेश
कधी करणार इन्ष्टॉल ?
9 Oct 2012 - 6:32 pm | राजेश घासकडवी
तुमचं नवीन संपादक मंडळ जेव्हा मागेल तेव्हा ताबडतोब इन्स्टॉल करून देऊ. हाकानाका...
10 Oct 2012 - 6:12 pm | कवितानागेश
..मागेल तेव्हा ताबडतोब इन्स्टॉल करून देऊ..>>
आप कतार मे हैं| कृपया प्रतिक्षा करें| :)
बाकी नंबर ऑफ उपप्रतिसाद्स बघून जुन्या ३ आयडींची प्रकर्षानी आठवण होतेय. ;)
8 Oct 2012 - 1:37 pm | सस्नेह
भाषाचिकित्सकची आयडिया लै भारी.
पण मिपाला हा एडिटर लावला तर मिसळीचा कटच गायब होईल ना..!
8 Oct 2012 - 5:10 pm | शुचि
+१
8 Oct 2012 - 7:35 pm | बॅटमॅन
मिसळीचा कट गायब करण्याच्या या कटामुळे लै कटकट होईल ;)
8 Oct 2012 - 2:11 pm | राजघराणं
:-) सलाम.
8 Oct 2012 - 3:03 pm | गणपा
प्रोग्राम तयार आहे म्हणता, मग याच्या चाचण्या पार पडल्या असतीलच.
अन्य कुठल्या कुठल्या संस्थळावर हा चिकित्सक कार्यरत आहे? असल्यास तिथले रिझल्ट कसे आहेत?
याविषयी ही थोडी माहिती मिळाल्यास उत्तम.
:)
9 Oct 2012 - 7:17 pm | राजेश घासकडवी
पण बिटा टेस्ट साइटची आंतर्गत माहिती किंवा नाव जाहीर न करण्याच्या बोलीवरच हे टेस्टिंग झालेलं असल्यामुळे ती माहिती उपलब्ध करून देऊ शकत नाही. पण एक उदाहरण नाव न घेता सांगू शकतो. एका नामांकित ब्रिगेडच्या साइटने आपल्या मूळ लेखांवर जभाचि लावून तयार झालेले नवीन लेख दुसऱ्या साइटवर टाकलेले आहेत. त्या साइटला नोबेलचं शांतता पारितोषिक देण्याचा गंभीरपणे विचार चालू असल्याचं स्टॉकहोमच्या आंतर्गत वर्तुळांतून खात्रीलायकरीत्या समजलेलं आहे.
बाकी इथे मार्केटिंग करण्यामागे आम्ही 'मागणी तिथे पुरवठा' हे तत्व लावलेलं आहे. जहाल भाषेला विरोध करण्यामध्ये मिपा आणि मिपाकरांनी काही भरीव पावलं उचललेली आहेत. दोन वर्षापूर्वी अत्यंत जहाल भाषा सर्रास खपवून घेतली जात असे. त्याउलट आता ज्या सौम्यतेच्या निकषाचा आग्रह धरला जातो ते पाहून मिपा किती प्रगल्भ झालेलं आहे हे चटकन लक्षात येतं. जहालपणाचा सामना करण्यासाठी अवलंबलेलं कडक आधिकारिक धोरणही याचीच ग्वाही देतं. किंबहुना जे लोक जहाल भाषा वापरत त्यांचंच हृदयपरिवर्तन होऊन आता ते मवाळ भाषेचा आग्रह धरतात यातच सारं काही आलं.
9 Oct 2012 - 7:29 pm | गणपा
हा हा हा. झालं की मग काम फत्ते.
सुंठी वाचुन खोकला जात असेल तर हे विकतचं सॉफ्टवेयर कशाला गळ्यात मारुन घ्यायचं.
नै का? ;)
11 Oct 2012 - 6:22 am | राजेश घासकडवी
चला, खोकला म्हणजे काय याबद्दल संपादक मंडळात एकमत असेल तर मग प्रश्नच मिटला. ;)
काय भाऊ? पैशाबद्दल एक अवाक्षर तरी काढलं का मी? ऑ ऑ? उगाच भलतेसलते शब्द माझ्या तोंडी घालू नका शेठ.
9 Oct 2012 - 7:33 pm | नितिन थत्ते
>>अवलंबलेलं कडक आधिकारिक धोरणही
एकदम (डांबिसकाकांचं) आंबवलेलं वरण आठवलं.
8 Oct 2012 - 10:52 pm | सोत्रि
गुर्जींच्या मराठी भाषेच्या मवाळपणाच्या पराकोटीच्या आंतरिक तळमळीबद्दल, त्यांचा चावडीवर सोकाजीनानांच्या हस्ते एक गुळमट चहा देऊन सत्कार करण्यात यावा असा प्रस्ताव मांडतो.
स्वगतः सोक्या, गुर्जींचा हा लेख, ह्या जभाचिमधून पास होऊन इथे आल्यासारखा वाटतोय, नाही?
- (जहाल ब्रिगेडी) सोकाजी
8 Oct 2012 - 11:18 pm | आशु जोग
भाषेला सौलभ्य प्रदान केल्यास आकलनास सुलभ होइल
असो
साधी सोपी सरळ ओघवती भाषा त्यामुळे लेख हृदयाला भिडला
9 Oct 2012 - 10:42 pm | सुहास..
जहाल मोड >>> *त्यागिरी<<<< ( कोण म्हणतं जहालाथ हा शब्द नाही ते ....भाडोपराव ;) )
मवाळ मोड >> माझे एक मित्र आहेत, सध्या बायकोच्या जिवावर जगतात, त्यांनी ठराविक असे विधायक काम केलेले नाही, उगा आपलं तंबाखु चघळत, चव्हाट्यावर, काही चौकडी जमवित, ईकडे तिकडे काड्या करणे हा मुख्य उद्योग ! स्वताच्या गावात तर कुत्र, डुक्कर आणि मांजर विचारत नाही पण दुसर्याच्या गावातल्या हॉटेल मध्ये चान चान जेवण बनविण्यार्या काकांना नावे ठेवणे हा लघूउद्योग !! स्वताच्या गावात मनासारख चालता देखील येत नाही, आणि दुस॑र्या गावात ऊंदीर मारायच्या विभागात देखील कोणी ठेवणार नाही , मला सांगा या मित्राच काय बंर कराव ? <<<<<
सल्लादेवुनी गारकर्ते
धन्यवाद !
10 Oct 2012 - 5:28 pm | यशोधरा
LOL! LOL!
12 Oct 2012 - 4:59 pm | दादा कोंडके
ही कल्पना आवडली, पण 'रटाळकविताचिकित्सक' असला तर बोला. ;)