लूज कंट्रोल...
२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..
लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.
या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..
नाटकाचे कथासूत्र...
तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०... त्यातल्या एकाचे आईवडील बाहेरगावी गेलेले असल्याने धिंगाणा करायला उरलेले दोघे मित्र त्याच्या घरी राहायला आले आहेत. नाटक सुरू होताना एक जण खिडकीतून समोरच्या बिल्डिंगमधलं तरूण जोडपं प्रेमचेष्टा करताना दिसतंय का ते पाहण्याच्या प्रयत्नात... पण ते जोडपं शॉपिंगला बाहेर गेलंय, परत आल्यावर लक्ष ठेवू, वगैरे संवाद होतो... नंतर संवादाची गाडी एकूणच आसपासची वाढती कामुक आव्हाने, सिनेमा नट्या, जगाच्या मानाने आपण किती मागे आहोत ( फ़िनलंडमधल्या तरूणांचे सेक्सच्या पहिल्या अनुभवाचे सरासरी वय आहे १९ बर्षे... आणि आपण तिच्यायला असे"!!!)..अजून लग्नाला इतका अवकाश अहे आणि आपण तोपर्यंत .... वगैरे वगैरे मार्गाने जात असताना तिघांचे एकमत होते की आपण हा अनुभव आता घेतलाच पाहिजे.
त्यातल्या एकाचा एक अनुभवी (!) मित्र एका "व्यावसायिक" PSW ला ओळखत असतो, त्याला फोन करून हे (हो नाही करत, स्वत:जवळ पुरेसे पैसे आहेत का बघत ) तिची अपोइंटमेंट घेऊनही टाकतात. ... मग असे करू, तसे करू वगैरे खूप अंदाज आणि ती येते...
( या सार्यांची अपेक्षा की एखादी कॉलेजकन्यका येईल... पण येते एक मध्यमवयीन स्त्री).. मग सगळे गांगरून जातात आणि काहीही न करता तिच्याबरोबर सीडीवर इक्बाल सिनेमा पाहतात, आणि तिला पैसे देऊन निरोप देतात.....
....
मग पुन्हा एकाला समोरच्या इमारतीत त्या फ़्लॆटमध्ये लाईट दिसतो .." ते जोडपं आलंय परत... " ... "बघावं काय?" असा विचार करत दोघे उठतात पण "नकोच ते" असं म्हणत परत झोपतात..
पडदा ...संपलं नाटक..
______________________________________
माझे मत : आपल्याला नाटक पाहताना आवडलं ...
औटस्टेंडिंग, विचारप्रवर्तक वगैरे नव्हते तरीसुद्धा त्यात गंमत होती.. कलाकारांनी छान कामे केली होती... सुरुवातीच्या सेक्सबद्दलच्या कुतुहलाचे संवाद छान लिहिले होते... काही क्षणी नाटक अगदीच चीप होतंय की काय अशी मला भीती निर्माण होता होता परत कंट्रोल व्हायचे. ... हे निपुणमधल्या दिग्दर्शकाचे कौशल्य ... ( हे असले संवाद मी लिहू शकलो नसतो , हे ही खरे) पण आता नाटकाचा विषयच हा आहे तर काय करणार ? (आता इतकी नैसर्गिक गोष्ट आहे ही, पण पूर्वी तर त्याबद्दल कुठेच बोलायचे नाही, चर्चा नाही,
अर्धवट माहिती इकडून तिकडून मिळवलेली .. आताच्या तरूण मंडळींकडे आंतरजालासारखा माहिती स्त्रोत आहे हे बरे....)
मला वाटतं मी हे नाटक सुमारे १२५ लोकांबरोबर पाहिलं... त्यात साधारणपणे ३ ग्रुप दिसले.
त्यात एक ग्रुप - पुढे बसून जोराजोरात खिदळणारे, प्रचंद दाद देणारे अगदी २० २२ वर्षांचे कॊलेजियन... कारण हे सारे अगदी त्यांच्या मनातले , त्यांच्याच वयाची पोरे सांगताना दिसताहेत.
दुसरा ग्रुप ... ( माझ्यासारखा ) तीस पस्तीसच्या आसपासचा , त्यातल्या एका मित्राशी बोललो , तो डोळे मिचकावत म्हणाला, " कुतुहल, अंदाज, आनंद वगैरे त्या त्या वयात ठीक आहे पण शेवटी यांनाही कळेलच की नंतर की ...म्हणजे ...वाटतं तेवढं ...हं... " आणि मान हलवत हसला.
तिसरा ग्रुप ... पन्नास- पंचावन्नचा ज्यांची मुले मुली वीशीत आहेत असे... यांचे चेहरे थोडे चिंताग्रस्त दिसले.... काही स्त्रिया तर वैतागलेल्या दिसल्या... ( हे काय घाणेरडं वगैरे? घरात वेश्या बोलावताय?")
मला तर पुण्यातल्या शनिवार पेठेत आपण हा प्रयोग पाहिला, यावर थोडा वेळ विश्वास बसेना....
प्रयोग नाटकाच्या विषयाशी प्रामाणिक होता? हो.
बहुसंख्य प्रेक्षकांनी एन्जॊय केला? हो.
कलाकारांची कामे मस्त.... आधी मारे वाघासारखी गप्पा मारणारी पोरं ती आल्यानंतर शेळी होतात ते बेष्ट...
________________________
( आता दुसर्या बाजूने विचार केल्यावर वाटतं , समजा तिथे खरंच कॊलेजची १८ वर्षांची PSW आली असती तर काय झाल असतं? मध्यमवयीन स्त्री येणं आणि यांनी काहीच न करणं , ही नाटककाराच्या दृष्टीनं एक पळवाट झाली की सांगायला, " बघा माझी पात्रे वाईट नाहीत हो, काहीही न करता त्यांनी फ़क्त सिनेमा पाहिला"... मग एवढंच करायचं होतं तर इतक्या धीट विषयाला हात घालून ऐन वेळी पळवाट कशाला काढली ? तिथे खरी मजा आली असती की आलेली १८ वर्षांची मुलगी यातल्या एकाची मानलेली गर्लफ़्रेंड आहे.... मग खरी मजा आली असती...मग यांची बोलती बंद झाली असती, "तुम्ही मुलं जर तिला बोलवू शकता तर त्याच न्यायाने मी ती असू का नये??"
असा एक संवाद लिहून पाहू म्हणतो, सराव म्हणून...कोणी लिहिणार का ?)
_____________________________
प्रतिक्रिया
18 Jun 2008 - 5:33 pm | भडकमकर मास्तर
त्यातला सुरुवातीची एक कॉमेंट आठवली..
एक जण खूप दु:खी होऊन अगदी जेन्यूइनली म्हणतो," पूर्वी बालविवाह होते ते फार बरं होतं राव "...
अगदी छप्परतोड लाफ्टर मिळाला होता या कॉमेंटला... :)) :)) :))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
18 Jun 2008 - 5:40 pm | आंबोळी
मास्तर नेहमि प्रमाणेच तुम्हि छान परिक्षण केलय. पण तुमच्या इतर परिक्षणांच्या मानाने हे जरा तुटक आणि (तुमचा नेहमीचा सिद्ध)हात आखडून लिहिलय असे वाटते.
पण एकंदर मजा आली. शेवटी उपस्थीत केलेली शंका (१८ वर्षांची मुलगी आली आसती तर?)ही रास्तच. (आयला कस सुचत हो तुम्हाला?)
>>असा एक संवाद लिहून पाहू म्हणतो, सराव म्हणून...कोणी लिहिणार का ?
लिहायला जमेल की नाही शंका आहे. पण करुन बघायला हरकत नाही ;) (नाटक हो.... ते बोलावणे वगैरे नाही. ह.घ्या.)
--आंबोळी
18 Jun 2008 - 5:59 pm | II राजे II (not verified)
मास्तर नेहमि प्रमाणेच तुम्हि छान परिक्षण केलय. पण तुमच्या इतर परिक्षणांच्या मानाने हे जरा तुटक आणि (तुमचा नेहमीचा सिद्ध)हात आखडून लिहिलय असे वाटते.
असेच म्हणतो !!!
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय का मजा
18 Jun 2008 - 6:17 pm | वाचक
आवडलं.
पण मला वाटत त्या मुलांच बावरुन जाण हे त्यांच्या मनातल्या पूर्वग्रहांमुळे होत असाव. 'मजा करायची ' म्हणजे एखादी तरुण मुलगीच हवी अशा क्लिशे मनोभूमिकेतून ते अपेक्षा करत असल्यामुळे आणि वयाने थोड्या मोठ्या स्त्रीला 'अशा' भूमिकेत पहायची सवय / तयारी नसल्यामुळे गडबड उडाली असेल.
पण विषय मस्त आहे.
19 Jun 2008 - 2:57 am | भाग्यश्री
ह्म्म.. नाटक बोल्डच आहे.. एव्हढीश्शी मुलं असं दिग्दर्शित वगैरे करतात, बसवतात, त्याचे अनेक प्रयोग होतात, कौतुक आहे!
मी नाटक पाहू शकले नाही.. माझ्या मैत्रिणिचा भाऊ आलोक राजवाडे याचे हे सगळे वर्गमित्र..! निपुण्,अमेय वगैरे.. बहुधा आलोक पण त्यात बॅक्स्टेजला होता..
मला नाटकाबद्द्ल फार नाही बोलता येणार.. पण जाता जाता आलोक बद्द्ल सांगते.. मी त्याला तो ३-४थी मधे असल्यापासून पाहतीय.. कॉलेज मधे आल्यापासून रंगभूमीवर भलताच फोफावलाय तो! ftii च्या विद्यार्थ्याने केलेल्या डोक्युमेंट्रीमधे त्याने काम केले, आणि त्या फिल्मला बर्लिन महोत्सवात ज्युरी ऍवॉर्ड मिळाले.. सद्ध्या त्याचे 'बेड के नीचे रेहनेवाली' हे हिंदी नाटकही गाजत आहे..
एकंदरीत ही टीम अफाट आहे! काय काय प्रयोग चालु असतात त्यांच्या नाटकांचे.. कधीतरी बघायची इच्छा आहे.. तो पर्यंत तुमचे रिव्ह्युज वाचून समाधान मानेन! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
19 Jun 2008 - 8:51 am | भडकमकर मास्तर
एकंदरीत ही टीम अफाट आहे!
हो..या वयात असा धीट विषय नियंत्रणात ठेवू शकणार्या ,"लोक काय म्हणतील ?" वगैरे विचारांनी मागे न हटता आपल्याला पटलंय ते करणार्या या टीमचं कौतुकच करायला पाहिजे...
( निपुणची "सायकल" एकांकिका सुद्धा मस्त धावली होती...)...
आलोकने मुख्य भूमिका केलेला एक दीर्घांक पाहिला होता, २००७ जानेवारीत , चांगलं काम करतो तो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Jun 2008 - 7:14 am | मेघना भुस्कुटे
वा, मस्त आहे कल्पना. मला आवडेल प्रयत्न करायला. उद्याच लिहिते... बाकी परीक्षण नाटकापेक्षा जास्त आशय आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यांचं वाटलं. (आपली त्यालाही हरकत नाहीच म्हणा!) येऊ द्या अजून...
19 Jun 2008 - 9:00 am | विसोबा खेचर
"तुम्ही मुलं जर तिला बोलवू शकता तर त्याच न्यायाने मी ती असू का नये??"
आयला मास्तर! हा विचार भन्नाटच आहे! क्या बात है....:)
साला, एखादा जर ओलरेडी गर्लफ्रेन्ड असताना मित्रांसोबत खुशाल रंडीबाजी करू पाहात असेल तर त्या मुलीचाही विचार योग्यच म्हणायला पाहिजे! मास्तर, तुम्ही लिहाच पुन्हा नव्याने हे नाटक! :)
मेघनाताई काय लिहितात याचीही उत्सुकता आहे! :)
आपला,
(नाट्यवेडा) तात्या.
19 Jun 2008 - 11:41 am | सुमीत भातखंडे
असेच म्हणतो.
बाकी परिक्षण उत्तम.
19 Jun 2008 - 5:52 pm | निरंजन मालशे
डॉक्टर !!! लिहाच या विषयावर
होउन जाउ दे!!!