भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
11 Jun 2008 - 7:16 pm

'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता. स्वतः लेखकही होता. त्याने अनेक पुस्तकेही लिहिली. या पुस्तकांचे विषयही अगदी शिल्पशास्त्रापासून ते साहित्यापर्यंत आहेत. भोजाविषयी उत्सुकता खूप दाटली होती. आणि एक दिवस अचानक धारला कूच केले.

धार हे पवारांचे संस्थान. पण ते अगदी अलीकडचे. त्याही आधी ते परमार वंशाच्या राजा भोजची राजधानी होते. या धार नगरीतच एकीकडे जसा दुसर्‍या बाजीरावाचा जन्म झालेला किल्ला भग्नावस्थेत इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन उभा आहे. त्याचवेळी गावाच्या दुसर्‍या भागात हिंदू-मुसलमानांमधील रक्तरंजीत संघर्षाचे डाग घेऊन 'भोजशाळा' उभी आहे. भोजशाळा. दोन वर्षांपूर्वी या भोजशाळेवरून हिंदू- मुसलमानांमध्ये झालेला संघर्ष माहिती होताच. त्यामुळे धारमध्ये आल्यानंतर या शाळेला भेट देणे क्रमप्राप्तच होते. गावाच्या एका कडेला भाजीबाजाराच्या पाठिशी ही भोजशाळा आहे.

शाळेला लागूनच मशीद आहे. शिवाय कब्रस्तानही. शाळेच्या आवारात कुंपण घातले आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था अगदी कडक. सगळी तपासणी करून आत सोडतात. आत गेल्यानंतर तर चक्रावलोच. मंदिराच्या भिंतीला अगदी खेटून मशीद. प्रत्यक्ष भोजशाळेत प्रवेश करतानाही कडक तपासणी झाली. आत गेलो. चार बाजूंनी मंडप असलेली मधले आवार मोकळे असलेली इमारत म्हणजे भोजशाळा. जवळपास हजारेक वर्ष जुनी. पुरातत्व खात्याने या शाळेतील खांब पूर्वीसारखे वाटतील असे उभे केलेले आहेत. भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही. उलट तिथल्या वास्तुशिल्पाला छेद देईल असे न शोभणार्‍या काळ्या संगमरवरी दगडात आयते मात्र कोरलेली आहेत.

या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत. विद्यादानासाठी राजा भोजने बांधलेली वास्तु आता धार्मिक वादात अडकली आहे. विद्येचा वारसा जपण्याऐवजी वाद रंगला आहे, याने मन व्यथित झाले.
------------------------
राजा भोजाविषयीच्या माहितीत भोजपूरचा उल्लेख आला होता. हे भोजपूर म्हणजे भोपाळपासून जवळपास १८ किलोमीटरवर आहे. इथे म्हणे त्याने मोठे शिवमंदिर उभारण्याचे काम हाती घेतले होते. शिवाय एक मोठा तलाव बांधायला घेतला होता. या तलावाची रचना अशी केली होती की नैसर्गिक पद्धतीने पाणी फिरून येईल. हे मंदिर बघण्याची आस होती. सांची पाहून आल्यानंतर भोपाळमध्ये मुक्काम केलाच होता. दुसर्‍या दिवशी भोजपूरला निघालो. 'मध्य प्रदेश सडक परिवहन निगम'च्या अनुबंधित ट्रेवल्स बसने प्रवास करण्याचे 'दिव्य' पार पाडत अखेर आम्ही भोजपूरला पोहोचलो. एका टेकडीवर हे मंदिर आहे. मूळ मंदिर तर पार पडून गेले आहे. पण पुरातत्व खात्याने मूळ वाटावे असे मंदिर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. 'भिंत खचली कलथून खांब गेला'चा अनुभव पहाताना आला. मंदिर पुष्कळच भव्य आहे. त्याचे तुकडे जोडून ते रचण्याचा प्रयत्नही दिसून येतो. वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वांत उंच शिवलिंग या मंदिरात आहे. हे शिवलिंगही तुटले होते. पुरातत्व खात्याने जोडून ते उभारले आहे. मंदिरासमोर छुटपूट मंदिरे आहेत. त्याचे मस्तपैकी व्यावसायिकरण झाले आहे. मुख्य मंदिरात मात्र पुरातत्व खात्याने कोणतीही पूजा करायला बंदी घातलीय ही समाधानाची बाब. आजूबाजूला छान हिरवळ आहे.

त्याकाळी राजा भोजने बांधलेल्या तलावाचा अंदाज येतो. राजा भोज आजारी असताना येथे आला होता. विशिष्ट प्रकारे पडणार्‍या पाण्याने अंघोळ करावी असा सल्ला त्याला वैद्याने दिला होता. म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारा तलाव बांधला गेला होता. या तलावाचे बांधीव काठ आजही दिसून येतात. भोजपूरला येण्याआधीच त्याच्या संरक्षक भिंती दिसतात. त्यावरून तो किती मोठा असावा याचा अंदाज येतो. पण आता तलाव म्हणून काहीही शिल्लक नाही. इथेही मुस्लिम आक्रमकांनी मोठी भूमिका बजावली. होशंगाबादने हा तलाव मध्ययुगात फोडून टाकला होता. त्यामुळे त्यात पाणी साठणे बंद झाले. आता तर भौगोलिकच बदल भरपूर घडले आहेत.

हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत. मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं. इंदूरचे संग्रहालय मध्यंतरी पहायला गेलो. त्यावेळी हजार, दोन हजार वर्षांपूर्वीच्या मूर्ती सरळ इमारतीच्या बाहेर ठेवलेल्या दिसल्या. पावसात त्या भिजत होत्या. तीच स्थिती धारच्या किल्ल्यातील किमती सामानाची आणि मांडूतल्या मौल्यवान शिल्पांची. लोकांची बेपवाई तर बोलायला नको. इंदूरमध्ये रहाणार्‍या अनेकांना भोजपूर माहित नाही. आम्ही भोजपूरला जातो, गेलो हे सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्हांसहित विविध भाव पाहूनही त्रास व्हायचा. आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो. एकुणात काय हे सगळं पाहिल्यानंतर उगाचच उदास होऊन परतलो.

कलासंस्कृतीदेशांतरइतिहाससमाजजीवनमानभूगोलविचारबातमीअनुभवमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

ध्रुव's picture

11 Jun 2008 - 7:24 pm | ध्रुव

सुरेख लेख.
या जागेत शुक्रवारी १ ते ३ या वेळेत हिंदूंना यायची बंदी असते. त्याचवेळी मंगळवारी दिवसभर मुसलमान येऊ शकत नाही. एरवी सगळ्यांना यायची मुभा आहे. हे व्हायचे कारणही उभय धर्मातला संघर्षच. एका शुक्रवारी वसंत पंचमी आली. हा या भागात फार मोठा सण आहे. त्या दिवशी उत्सव करण्यासाठी हिंदू उत्सुक होते. पण मुसलमानांचाही त्या दिवशी नमाज. दोघांत संघर्ष झडला आणि त्यातून रक्त सांडले. त्यातून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली. तरीही अधुनमधून चकमकी झडतच असतात. इथे असलेले सुरक्षा रक्षकही स्थानिक नाहीत. ते कुणालाही फार वेळ थांबू देत नाहीत.

ह्म्म हे सांगीतले ते बरे झाले. म्हणजे पुढच्या वेलेला जर कधी तिकडे जायची वेळ आली तर लक्षात ठेवायला.

हा सगळा छिन्नविच्छिन्न इतिहास पाहून फार वाईट वाटलं. हजार वर्षांच्या वास्तुही आपल्याकडे धड राहू शकल्या नाहीत.
सहमत आहे. हजार कशाला अहो ४०० वर्षापुर्वीचे टिकले नाही (इंग्रजांची कृपा) तर हजार वर्षापुर्वीचे अवघडच आहे.

बाकी तुम्ही फोटो नक्कीच काढले असतील या जागांचे. जर चिकतवाना इथे अथवा लिंक पाठवा.
--
ध्रुव

कवटी's picture

11 Jun 2008 - 7:25 pm | कवटी

अत्यंत माहितीपूर्ण लेख. आवडला.
आपल्या इतिहासाचीच जर आपल्याला माहित नसेल, तर वर्तमानात तरी आपण कसे जगतो असा प्रश्न पडतो.
खरे आहे. एक जुनी म्हण आठवली.
"इतिहासातून आपण फक्त एकच शिकतो ते म्हणजे 'इतिहासातून आपण काहीही शिकत नाही'..."

भोचकराव आजुन येउ द्या.

प्रभाकर पेठकर's picture

11 Jun 2008 - 7:29 pm | प्रभाकर पेठकर

वर्णन अतिशय सुंदर आणि स्थानमहात्म्याविषयी उत्सुकता वाढविणारे आहे. एकदा पाहून आले पाहिजे.
अभिनंदन.

मदनबाण's picture

11 Jun 2008 - 8:12 pm | मदनबाण

भोचकराव्,,ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...
बर्‍याच वेळा इंदूरला आलो आहे,,राजवाडा,शिशमहल इ. पाहिले आहे,पण या स्थळाबद्दल माहित नव्हते !!!!!
परत इंदूरला येण्याचा योग आला तर याही ठिकाणी भेट देण्याचा जरुर प्रयत्न करीन.....

मंदिरांचे पडलेले अवयव पाहून व्यथित व्हायला होतं.
भग्न झालेले द्वारावरचे हत्ती,,विद्रुप झालेल्या नर्तिका....असे प्रकार बर्‍याच ठिकाणी पहावयास मिळतात आणि हे कलावैभव गतकाळात किती रम्य असेल हा विचार मनात घोळत राहतो...खरच हे सर्व व्यथितच करणार आहे..

(शिल्पकला प्रेमी)

मदनबाण.....

प्रियाली's picture

11 Jun 2008 - 8:32 pm | प्रियाली

भोचकराव लेख आवडला.

भोजशाळा म्हणजे खरे तर सरस्वतीचे मंदिर. थोडक्यात त्याकाळचे विद्यापीठ. पण तिथे आता सरस्वतीचा साधा फोटोही नाही.

ज्या मूर्ती आणि ऐतिहासिक वस्तू भारतात सापडत नाहीत त्या कुठे मिळतात हे वेगळे सांगायला नकोच, तर अनेकांच्या मते ही मूर्ती ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. परंतु ब्रिटिश म्युझियमच्या संकेतस्थळावर ही माहिती मिळाली.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2008 - 9:38 pm | बिपिन कार्यकर्ते

भोचकराव, लेख आवडला. तुमची इतिहासाबद्दलची आस्था आणि मुद्दाम अशी स्थळे जाऊन बघणे वगैरे ग्रेट. बाकी आपण भारतियांच्या इतिहासाबद्दलच्या आस्थेबद्दल काय बोलावे? किंबहुना बोलूच नये. विशेषतः परकिय आक्रमकांनी केलेल्या अत्त्याचारांबद्दल तर नकोच नको. आणि हा प्रश्न केवळ मुसलमान शासकांनी केलेल्या प्रकारांबद्दल नाही आहे. आता तर पूर्ण स्वातंत्र्य आहे, भारत हा एक प्रगत देश होतो आहे. आपण हा वारसा जपण्यांबद्दल काय करतो? शून्य.

People who dont respect History soon become part of it...

बिपिन.

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 11:34 pm | विसोबा खेचर

भोचकगुरुजी,

आपले लेखन नेहमीच सुरेख असते! हा लेखही अतिशय चांगला उतरला आहे.

एकंदरीतच जुन्या वास्तूंबद्दल आपली बेपर्वाई पाहिली की वाईटही वाटतं आणि संतापही येतो.

असो, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेखन वाचायला आवडेल. आपला हा लेख म्हणजे मध्यप्रदेशाची एक छानशी सफर घडवणारा आहे.

माझी एक विनंती -

एकदा आपल्या लेखणीतून आम्हाला मांडू, महेश्वरी, जबलपूर घडवून आणा बुवा! ही सगळी माझी अत्यंत आवडती स्थानं आहेत. उज्जैन-इंदौरबद्दल तर बोलायलाच नको.

९२ की ९३ साली शरदातल्या पौर्णिमेच्या रात्री जबलपूरचा हो अनुभव घेतला आहे त्याची याद आजही तेवढीच सुखद आहे! कुठल्याश्या एका डाकबंगल्यात उस्ताद शाहीद परवेजची रंगलेली सतार आजही कानात साठवलेली आहे.

अहो काय सांगू तुम्हाला भोचकगुरुजी, ऐकायला आम्ही फक्त इनमिन तिघंचौघच जण! जबलपूरच्या पौर्णिमेची रात्र, मस्त माहोल जमून आला होता आणि रात्री सव्वा बारा, साडे बाराच्या सुमाराला शाहीदभाईंनी मला प्रश्न केला,

"क्या बजाए अब?"!

"उस्तादजी, अगर आपका मूड हो तो कौशीकानडा बजाईये! बस, इस वक्त सिर्फ वही राग का माहोल जमा है"

अशी मी फर्माईश केली!

माझ्या फर्माईशीला,

"अरे, क्या केहेने!"

अशी दाद देत शाहीदभाईंनी जो कौशीकानडा जमवला होता म्हणता! क्या बात है!

आपला,
(जबलपूरप्रेमी)
तात्याभैय्या देवासकर,
बापूभैय्या देवासकरांची कोठी, इंदौर.

भोचक's picture

12 Jun 2008 - 10:37 am | भोचक

तात्या,

तुमची आज्ञा शिरसावंद्य. मांडू, महेश्वर, सांचीबद्दल लिहायचंच आहे. मांडू इतकं सुंदर आहे, की ते नेमकेपणाने मांडणं हेच आव्हान आहे. अप्रतिम जागा आहे ही. आयुष्यात एकदा तरी मांडू पाहिलंच पाहिजे. शिवाय इतरही काही जागा आहेत. जबलपूर, ग्वाल्हेर हा भाग फिरायचा आहे. मुख्य म्हणजे बुंदेलखंड पहायची जाम इच्छा आहे. बघू या कसं जमतंय ते. बाकी तुमचा जबलपूरचा अनुभव अप्रतिम. एवढ्या मोठ्या कलावंतांचे सानिध्य लाभणं हे भाग्यच. तुम्ही त्या अर्थाने खरोखरच भाग्यवान आहात.

नीलकांत's picture

12 Jun 2008 - 10:55 am | नीलकांत

पवारांचे धार असं म्हणून आम्ही धार मार्गे मांडूच्या (मांडवगढ) च्या किल्याला भेट द्यायला गेलो होतो ते आठवतं. किल्ला पाहण्याची उत्सुकता असल्यामुळे धारच्या सरस्वती मंदीराला भेट द्यायचे राहीले. त्याच काळात जवळच झाबुआ जिल्ह्यात शबरी कुंभ मेळ्याची तयारी चाललेली होती असं वातावरण धार मधे होतं.

मांडूच्या संग्राहलायाची अवस्था खरोखर भोचकराव म्हणतात तशीच आहे. स्थानिकांची अनास्था आपल्याला नाराज करावी इतपत आहे. बाकी मांडूच्या किल्ल्यावर एक शिवलिंग आहे. तेथे एक शिलालेख आहे, की इस मंदिर को मोगलो द्वारा उध्द्वस्त किया गया था. मराठा सरदार पेशवा बाजीराव ने इसका जिर्नोध्दार करवाया. हे वाचून खुप छान वाटलं.

नीलकांत

आनंदयात्री's picture

12 Jun 2008 - 2:38 pm | आनंदयात्री

छान लेख भोचकराव. या वारश्यांची अशी अवस्था पाहुन खरच वाईट वाटते.