काय झाले होते त्या दिवशी.............
काल शेवटचा दिवस होता कविता लिहायचा. १/२ दिवसात पहिल्या तीन क्रमांकाच्या कविता शोधायचा प्रयत्न करतोय. नशिबाने हे अत्यंत अवघड काम मला करायला लागणार नसून, दुसरे कोणीतरी करणार आहे. त्या व्यक्तीचे नाव त्यांच्या विनंतीवरून जाहिर करण्यात येणार नाही.
हा फोटो मी गोव्यात चापोरा किल्ल्यावर घेतला. पणजी पासून साधारणतः २२ कि.मी अंतरावरचा हा किल्ला, आदिलशहाने बांधला व पोर्तूगिजांनी बळकावला, अर्थात मराठ्यांच्याही तो ताब्यात होता ४/५ वर्षे.
या किल्ल्यावर जायला पायथ्यापाशी गाडी जाते.
त्या दिवशी आम्ही या किल्ल्याला जायचे म्हणून निघालो अर्थात बरोबर कॅमेरा होताच. पायथ्याला जाताना आमच्या समोर एक युगूल स्कुटरवर जात होते."काय कपडे घालतात हे लोक " असा आमच्या बायकोने शेराही मारला. तेवढ्यात त्या दोघांचा आवाज एकदम चढलेला ऐकू आला. काय झाले म्हणून रस्त्यावर जे काही थोडे फार लोक होते, त्यांनी एकदम चमकून तिकडे बघितले. तर ती तरूणी आणि तो तिचा मित्र एकदम जोरजोराने भांडायलाच लागले. तिने एकदम स्कुटरला ब्रेक मारला आणि मलाही तेच करावे लागले. गोव्यात असल्यामुळे भांडायचा विशेष मूड नव्हताच, पुण्यात हे झाले असते तर गोष्ट वेगळी. त्या दोघांना तेथेच सोडून आम्ही किल्ल्यावर गेलो. वर पोहोचायला अवघा अर्धा तास लागला असेल. वर मनसोक्त फोटो काढून झाल्यावर परत निघालो आणि ही मुलगी येथे बसलेली दिसली. मला फोटो काढायचा मोह आवरेना आणि तिला विचारल्याशिवाय तसे करणे योग्यही वाटेना. म्हटले तिचा जर मूड खराब असेल तर ती नाहीच म्हणणार आणि ते योग्यही होतेच. पण म्हटले विचारून बघू. हो म्हटली तर एक चांगला फोटो तयार होईल.
"Excuse me ! Can I take one snap while you are sitting there ?
डोळ्यातले पाणी पुसत आणि बेफिकीरीने हवेत हात उडवत ती म्हणाली
"Take" . बहुदा स्पॅनिश किंवा फ्रेंच असावी...
मी कॅमेरा ट्रायपॉड वर चढवून सज्ज करणार तेवढ्यात ती जागा सोडून आमच्यापाशी आली, बायकोला "हाय !" म्हणाली.
"But you promise me you will pray for me !"
याला संदर्भ बहूदा तिने मगाच्या भांडणानंतर घेतलेल्या निर्णयाशी असावा.
मला काय बोलावे कळेना.
"Yes I will. Certainly" मी म्हणालो. बायकोनेही संमतीदर्शक मान हलवली. एवढे बोलून ती परत आपल्या जागेवर जाऊन बसली.
ना तिने परत आमच्याकडे वळून बघितले ना तिने आमचा निरोप घेतला ना तिने त्या फोटोची प्रत मागितली.
आम्हीही तिच्या विचारात व्यत्यय न आणता त्या तणावग्रस्त वातावरणात भावनांचा स्फोट होण्याच्या भितीने , आमच्या समोर तिला अवघड वाटू नये म्हणून त्या तेथून बाहेर पडलो व खाली यायला निघालो. त्या काही क्षणांच्या नाट्यात आम्हीही असे गुंतून गेलो होतो की खाली येताना आम्ही दोघेही गप्प. आमच्या दोघांच्याही मनात तिच्या बद्दल अपार कणव भरून राहिली होती आणि मनात तिचे भले व्हावे, ती सुखी व्हावी अशा प्रार्थना.
त्यावेळी आठवलेली गाण्याची ओळ मला आजही आठवती आहे.....तटातट काळजाचे हे तुटाया लागती धागे............ती आता सुखात असेल, तिला पाहिजे ते मिळाले असेल अशी आजही परमेश्वराजवळ प्रार्थना.
या फोटोवर ज्या कविंनी कविता लिहिल्या त्या सर्व कविंना माझे मनापासून धन्यवाद. ज्यांनी त्या वाचून प्रोत्साहन दिले त्यांचेही आभार मानतो.
खाली सगळ्या कविता एकत्र करून स्लाईड शो टाकत आहे. परत एकदा त्या एकदम वाचून आनंद घ्यावा अशा या कविता आहेत हे निश्चित.....
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
21 Oct 2011 - 9:50 am | मी-सौरभ
म्हंजे बर्याच जणांनी तिची भावना आपल्या कवितेत अचूक पकडली होती... :)
निकालाच्या प्रतिक्षेत...
21 Oct 2011 - 10:59 am | मन१
पारितोषिक जाहिर होण्याच्या प्रतिक्षेत.
अवांतरः-
१९६२ ची मालिका पुढे लिहायला कधी घेताय?
21 Oct 2011 - 11:32 am | वपाडाव
अगदी असेच म्हणतो....
जकु,
एक प्रश्न :: मायेनं तिच्या डोक्यावरुन हात फिरवुन तिला शांत हो असं म्हणावं नाही वाटलं का?
अर्थात मला हे माहिती की ही वेळ तशी नव्हती, पण तरीही गिव्ह इट अ थॉट?
21 Oct 2011 - 12:05 pm | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिले आहे. दुसर्या प्रश्नांकित वाक्याच अर्थ मला पामराला कळाला नाही.
//पण तरीही गिव्ह इट अ थॉट?//
याचा अर्थ १ - मी या गोष्टीत हे विचार करून घालावे. याचे उत्तर असे आहे की ही रचीत गोष्ट नाही.
दुसरा अर्थ २ - यावर विचार करा.....आता त्यावर विचार करून काय उपयोग ?
21 Oct 2011 - 12:10 pm | भक्ति
किती सुन्दर ...
फोटो ... विचार ... कविता अन त्यान्चे compilation ...
मस्त !!!
21 Oct 2011 - 12:38 pm | मोहनराव
सगळ्या कविता छान आहेत. यातुन चांगल्या निवडणे मोठे कठिण काम आहे.
तरी निकालाच्या प्रतिक्षेत!!
21 Oct 2011 - 9:23 pm | पैसा
बर्याच जणांनी कवितेत हा मूड बरोबर पकडला होता, याचाच अर्थ हा की तुम्ही त्या क्षणाला बरोबर टिपलं आहे. अत्यंत यशस्वी चित्र आणि कॅमेर्याचा प्रभावी वापर!
1 Nov 2011 - 11:52 am | वपाडाव
ली माउचे हबिणंदण....