Sonar of Thoughts !
जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि त्यात बुडालेली ही मुलगी.
मी काढलेला एक फोटो, गोव्यात. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (Oxford : Ghalib Life & Letters हे पुस्तक).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही. :-)
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
12 Oct 2011 - 7:52 pm | प्रचेतस
कविता वगैरे काही लिहिता येत नाही मला, पण फोटो मात्र अतिशय सुरेख आलाय.
12 Oct 2011 - 8:07 pm | प्रभाकर पेठकर
फोटो मात्र अतिशय सुरेख आलाय
'आलाय' म्हणण्यापेक्षा 'काढला आहे' म्हणा. कारण 'आलाय' मध्ये कॅमेराचा मोठेपणा आहे तर 'काढला आहे' मध्ये छायाचित्रकाराच्या कौशल्याचा सत्कार आहे.
12 Oct 2011 - 8:10 pm | प्रचेतस
फोटो चांगला काढला आहे असेच म्हणायचे आहे.:)
12 Oct 2011 - 8:14 pm | प्रभाकर पेठकर
होय, कल्पना आहे मला.
उगीच जरा जाणवले ते आपल्यापर्यंत पोहोचविले.
12 Oct 2011 - 7:58 pm | गणेशा
प्लीज फोटो, पिकासा थ्रु द्याना.
दिसत नाहिये. .
12 Oct 2011 - 8:10 pm | जयंत कुलकर्णी
बघा हे दिसते का !
12 Oct 2011 - 8:02 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय मस्त छायाचित्र.
क्रुद्ध वादळे मनात साही,
एकही नौका सागरात नाही,
नसे कोणाची साथ आज ही,
अशी कशी ही करूण भैरवी...करूण भैरवी.
विश्वासघाताने प्रेमभंग झाल्यामुळे मनात संतापाची वादळे उठली आहेत. निदान समुद्रकिनारी मनाला शांती लाभेल असे वाटले पण तोही, एखादीही नौका नसल्याने, फार उदास उदास दिसतो आहे. आज एकटेपणाची भावना आहे साथीला कोणीच नाही. एका रम्य प्रेमकथेची ही करूण भैरवी आहे.
12 Oct 2011 - 8:08 pm | धन्या
मुळ फोटो आणि हा कल्पनाविलास, दोन्ही :)
12 Oct 2011 - 8:14 pm | जयंत कुलकर्णी
आपणही प्रयत्न करावा ही विनंती..... पुस्तक मस्त आहे.....:-)
12 Oct 2011 - 8:14 pm | जयंत कुलकर्णी
मस्त ! टाळ्यांची स्मायली.........
12 Oct 2011 - 8:20 pm | गणेशा
मस्त ओळी प्रभाकर जी .. पुढे लिहा अजुन.
@ जयंत जी,
मस्त फोतो, दिसला (लहान आकारात आहे, पण दिसला हे महत्वाचे.. )
लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
12 Oct 2011 - 8:23 pm | जयंत कुलकर्णी
त्याच्यावर क्लिक केले तर मुळ मोठा फोटो दिसेल. तो जरूर बघावा त्याशिवाय आपल्याला ओळी स्फुरणार नाहीत. :-)
12 Oct 2011 - 8:32 pm | गणेशा
येथे पिकसा पण ब्लॉक आहे हो [:)]
पण त्यातील फोटो मिपा वर दिसतात मला.
असो त्या छोट्याश्या फोटोवरुन्च लिहितो..
पुस्तका साठी नाही.. तुमच्यासाठी ...
अवांतर :
तुमच्या या विषयामुळे अश्याच चित्र कविता असणार्या माझ्या " आई.." ह्या विषयावरील कविता पुन्हा द्याव्यात असे वाटते आहे..
नक्कीच आवदतील तुम्हाला.. त्या सर्व चित्र कविता आहेत , फक्त हे अजुन सआंगितले नव्हते.. प्रत्येक कविता ही एक वेग़ळी थीम वेगळे चित्र आहे ..
मला आता कविता लिहिताना त्याच ओळी आठवत आहेतम त्यामुळे मुद्दाम वेगळे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
आता या नंतर जो रिप्लाय देयीन ती कविताच असेन [:)]
12 Oct 2011 - 11:23 pm | मन१
अर्थवाही आणि चित्रदर्शी रचना आवडली...
12 Oct 2011 - 8:14 pm | अविनाशकुलकर्णी
पुस्तका ऐवजी दुसरे काहितरी ज्याने मनातिल वादळे शांत होतिल असे बक्षीस असावे..
असे भित भित सुचवत आहे..
12 Oct 2011 - 8:24 pm | जयंत कुलकर्णी
मग तुम्ही लिहिणार आहात का ? :-)
12 Oct 2011 - 8:26 pm | मितभाषी
छान फोटो.
12 Oct 2011 - 9:03 pm | गणेशा
नयनांच्या बांधावरती
शांत सागर गहिरा
आठवांच्या वाटेवरती
मेघांचा सावळा पसारा
सुन्न संध्यासमयी
हा खेळ सावल्यांचा
भिरभिरनार्या नजरांनी
मनपक्षी शोधती किनारा
भासांचे प्रवाह स्तब्ध
कळेना माझे प्रारब्ध
दूर क्षितिजावरती
सूर्य निशब्द मावळणारा
- शब्दमेघ(गणेशा)
(मला दिसलेले छोटे चित्र : खोल सागर, मुलगी, मेघ;
कलर : ब्लॅक & व्हाईट म्हणुन संध्या समय/ दुपार्/सकाळ हे कळाले नाही, मी संध्यासमय घेवुन लिहिली, जर मुळ फोटोत ते स्पष्ट आणि वेगळे असेन तर तशी नविन कविता देईन))
12 Oct 2011 - 9:26 pm | गणेशा
समुद्राच्या सुक्ष्म लाटेवरती
मन माझे स्वार होती
सुन्न किनार्यावर आज
अस्पष्ट असंख्य वार होती
तरल स्वप्नांचा ईमला
वाळुसम मज भासती
एकाच लाटेसरशी
स्वप्नभंग पावती
मेघांच्या आडुन किरणांची
अबोल आकंती नांदी
ओघळणार्या आसवांची
मावळणारी कांती
- शब्दमेघ
12 Oct 2011 - 9:31 pm | जयंत कुलकर्णी
मस्त ! दोन्हिही छान !...........मला १ जास्त भावली....
12 Oct 2011 - 9:35 pm | गणेशा
धन्यवाद !
मलाही पहिलीच आवडली.
ओफिसमधुन जाता जाता दूसरी लिहिली सहज.
गुड नाईट, निघतो आहे १५ मिनिटात आता
12 Oct 2011 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा
माझाही एक प्रयत्न---आमची प्रेरणा-संदिप खरे यांची ही कविता,,,मी हजार चिंतांनीही डोके खाजवतो आणी अर्थातच तीची सलीलदांनी लावलेली चालही,,,कारण तीच चाल मनात असतांन्ना ही खालील कविता सुचली आहे...
मी शोधत आहे अजुन काही वाटाही
हा हुषार मजला म्हणतो अता टाटाही
मज ठाऊक आहे लहान होते जेंव्हा
हा बिलंदय्राही असाच होता तेंव्हा
आता मी आजहि पुन्हा तशी ती नाही
हा अथांग मजला हसूनी देतो ग्वाही
आयुष्य म्हणाले वर्षे सरली काही
तारुण्यही नुकते वळून मागे पाही
वाय्रावर माझी आता उडते बाही
तो हसून उडवी शंख शिंपले काही
आता तो मजला खुणवी खोल अथांगं
मज मिठीत घेण्या वारा देई बां$$ग
पण अजूनी का मन म्हणते माझे नाही
मी शोधू म्हणता उमगत...काही...नाही
हा पहिल्या पासुन असाच आहे द्वाड
मनी दावी स्वप्ने अंबट काही गोड
आता तर मनी मी ठरवीत आहे काही
हा किती बोलवो पुन्हा यायचे नाही
कधी होइल आता पुन्हा आजची सांज
मज ठाऊक नाही घालीन कुठला बांध
या इथवर पुन्हा वळून येणे नाही
ही शपथ घेतली कितिदा?...अठवत नाही....
13 Oct 2011 - 4:43 am | अभिजीत राजवाडे
कविता छान जमली आहे.
13 Oct 2011 - 7:34 am | जयंत कुलकर्णी
अरे व्वा........
13 Oct 2011 - 12:41 pm | मी ऋचा
सुप्पर!!
13 Oct 2011 - 1:28 pm | अत्रुप्त आत्मा
अभि,,,ज.कु. आणी,,,मी ऋचा... तिघांचेही आभार... :-)
12 Oct 2011 - 11:28 pm | इंटरनेटस्नेही
एकदम द वर्ल्डक्लास फोटो. कीप ईट अप!
13 Oct 2011 - 12:17 am | आत्मशून्य
बापरे , कविता काय लिहणं जमणार ? मलातरी फोटॉकडे बघून ग्रीक कथांमधील समूद्रकिनारी असलेल्या देवळांच्या पायर्यावरील अपोलो देवतेची आठवण येतेय... आणी देवा बद्दल काही लिहायच म्हणजे... तो विनोद नाहीका ठरणार इथं ?
13 Oct 2011 - 4:32 am | अभिजीत राजवाडे
जयंतराव,
उत्तम प्रकाशचित्र!!!
त्यातली रचना आणि पोत मनाला भावतो आहे.
मी मुक्तछंदात हे प्रकाशचित्र पाहुन मला जे सुचल ते प्रकाशचित्रावरच उमटवले आहे. माफ करा. तुमच्या प्रकाशचित्र मी तुमच्या अनुमती शिवाय वापरलं. जर तुमची हरकत असेल तर मी हे प्रकाशचित्र काढुन फक्त शब्द इथे प्रकाशित करतो. कवितेवरील तुमचा अभिप्राय अवश्य कळवावा.
13 Oct 2011 - 7:36 am | जयंत कुलकर्णी
छान आहे.............कविता चित्रावर टाकायची कल्पना मस्त........ हे चित्र डेस्कटॉपवर मस्त दिसते........... फक्त सगळ्यांनी ते आपल्यापाशीच ठेवावे ही विनंती......
13 Oct 2011 - 9:23 am | अभिजीत राजवाडे
खुप खुप आभार,जयंतराव!!!
13 Oct 2011 - 11:59 am | गवि
13 Oct 2011 - 12:06 pm | जयंत कुलकर्णी
//सर्व साक्षी सागराच्या पापणीला ओल नाही.................//
क्या बात है !........
मी लिहावं म्हटल तर एक ओळ सुचेल तर शप्पत ! आणि येथे कितीतरी लोकांनी चांगले लिहिलंय, खरंच दैवी देणगीच म्हणायला हवी ती.........
13 Oct 2011 - 6:50 pm | निनाद मुक्काम प...
@मी लिहावं म्हटल तर एक ओळ सुचेल तर शप्पत ! आणि येथे कितीतरी लोकांनी चांगले लिहिलंय, खरंच दैवी देणगीच म्हणायला हवी ती....
सहमत
पद्यात लिहिणे म्हणजे दैवी देणगी .
आम्ही ह्याबाबतीत कर्मदरिद्री
मात्र फोटोवर कविता मस्त दिसत आहे .
सध्या येथे तीन दिवस सतत पाऊस पडत आहे .
त्या वातावरण हा धागा एकदम फिट्ट बसला आहे .
13 Oct 2011 - 12:08 pm | गणेशा
अप्रतिम .. खुप्च आवडले.
आतापर्यंत येथे आवडलेल्या ओळी..
अबिजित तुझे चित्र दिसले नाहि.
13 Oct 2011 - 3:09 pm | प्रभाकर पेठकर
श्री. गवि साहेब,
छायाचित्रातील वातावरणास अजिबात न विस्कटवता, मोजक्याच चार ओळींमध्ये अतिशय परिणामकारक शब्दांची निवड करून, चित्रनायिकेच्या भावभावनांना कवितारुपात चितारण्यात आपण यशस्वी झाला आहात.
अभिनंदन.
13 Oct 2011 - 5:17 pm | चिगो
फक्त चार ओळींत जादू केलीत, गवि... अतिशय सुंदर आणि समर्पक.. छा गये !!
जयंतजी, अत्यंत सुंदर फोटो काढलाय तुम्ही..
दोघांचेही अभिनंदन..
13 Oct 2011 - 12:13 pm | इरसाल
फोटो अप्रतिम.
मला कवितेत एवढी गती नाही.
पण उगाचच गोरिला चित्रपटात गोरिलाच्या हातावर उदास बसलेली नायिका आठवली.(पाठीमागचा खडक म्हणजे गोरिला भासतोय आणि खालचे कातळ त्याचा हात).
13 Oct 2011 - 12:48 pm | नन्दादीप
अप्रतिम फोटो .
कविता वगैरे आपल्याला जमत नाही. पण फोटो मात्र अssssssssप्रतिम......
बाकी तुम्हाला एका ऐवजी २-३ पुस्तके घेवून यावी लागणार बहुतेक....
13 Oct 2011 - 1:37 pm | विकाल
.........ऐलतिरी करूण किती शांत माझी वादळे...,
नित संग तुझा अन संथ अशी साथ रे...!
किती कोवळा किनारा कल्पिला कसा रे..
अन आज असे आटले अश्रू अपरिमित रे...!
परतूनी येशील नित्यनवा तू हीच आस रे....
या नभांनी आक्रमिले... अन उन्मुक्त देहाला..
तुझ्या जलधारांची आस रे.....!!!
13 Oct 2011 - 1:48 pm | जयंत कुलकर्णी
//.........ऐलतिरी करूण किती शांत माझी वादळे..., //
शांत वादळे.........मस्त विरोधाभास. तसेच ऐलतरावर आहेत ही. समोर शांत गहिरा खोलपणा आहे ......
तसेच जलधारांची ऐवजी जलधारांचीच असे म्हटले तर...
क्या बात है, सुंदर !
13 Oct 2011 - 3:37 pm | गणेशा
विकाल मस्तच रे ..
जयंत जी तुमच्या धाग्यामुळॅ खुप मजा आणलेली आहे.
मागे एकदा जिप्सिं बरोबर असे बोलणे झालेले होते
13 Oct 2011 - 6:41 pm | तिमा
फोटो छान, त्याच्यावरच्या कविता छान, एकंदर धाग्यातल्या प्रतिक्रियांवरचे सुसंस्कृत वातावरण छान !
मिपाचा प्रवास असाच चालू राहू दे.
14 Oct 2011 - 8:19 am | जयंत कुलकर्णी
नमस्कार,
मिपावर अशाही धाग्याचे १०० प्रतिसाद होतात्/होतील हे बघून बरे वाटले आणि काव्य शास्त्र विनोदेन.........याची आशा वाटली............
हे लिहिल्याबद्दल आपलेही आभार !
13 Oct 2011 - 2:32 pm | ५० फक्त
माझा एक प्रयत्न (श्री. वल्ली श्री प्यारे व कविवर्य मनराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कविता करण्यात आलेली आहे, हे लक्षात घेउन प्रतिसाद द्यावेत),
किती वेळ झाला इथे बैसले मी
तो म्हणाला मला की
इथुन दिसतातच डॉल्फिन नामी
दहा मिनिटेच घालुन बसा मांडी
तो म्हणाला मला की
येतिल डॉल्फिनच्या झुंडी
म्हणाले मी आता वाट फार पाहिली
तो म्हणाला मला की
होय रात्र खास जाहिलि
मला वाटलेच होते मी फसणार आहे
तो म्हणाला मला की
बाराची गाडी सुटणार आहे.
13 Oct 2011 - 2:42 pm | अत्रुप्त आत्मा
बाराची गाडी सुटणार आहे. बाबो...बाबो...क..ह..र... फाट फुट फट्याक... ;-) ख-ह-प-लो :-D
13 Oct 2011 - 2:44 pm | धन्या
जे न देखे रवी ते देखे कवी असं जे म्हणतात ते यामुळेच.
बाकी सारी दुनिया त्या चित्राकडे पाहून व्याकुळ भैरवी आणि आर्त विराणी गात असताना तुम्ही मात्र चक्क खुसखुशीत आणि तरीही शेवटचं कडवं वाचून अंगावर रोमांच उमटवणारी कविता लिहिलीत.
मान गये उस्ताद. :)
13 Oct 2011 - 9:54 pm | प्रचेतस
५०फक्त रॉक्स.
13 Oct 2011 - 3:07 pm | किसन शिंदे
हॅहॅहॅ...:D
एकदम खुसखूशीत कविता..
13 Oct 2011 - 4:22 pm | गणेशा
पहिलाच प्रयत्न छान आहे...
रात गई सो बात गई ! ह्या हिशोबाने पुन्हा आज नविन कल्पनेने ह्या चित्रावरती एक कव्फिता करावी म्हणतो..
खुप दिवसानी असे मनापासुन लिहावेशे वाटते आहे..
आलोच ५ मिनिटात
अवांतर : एका पेक्षा जास्त कविता देत असल्याबद्दल क्षमस्व. तसे काव्त्य विभागात शकयतो लवकर माझ्या कविता देत नाही मी.. पण येथे तो संयम झाकुन ठेवावा म्हणतो आहे.. म्हनुन एक कविता आज देतोच..
13 Oct 2011 - 9:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त.
-दिलीप बिरुटे
13 Oct 2011 - 4:30 pm | गणेशा
सूर्यबिंबाविन क्षितिजावरती दाटलेला मेघकल्लोळ ...
पुसट तुझ्या वाटेवरती, भासांचाच फक्त लोळ ...
सरसरत्या मोहक क्षणांचा साठलेला पर्णकल्लोळ ...
आठवांच्या अभिषेकास, आसवांची नाजुक ओळ ...
नजरेच्या आकाशावरती थरथरलेला भावकल्लोळ ...
भिजलेल्या समुद्रावरती, सैरभैर विचारांची टोळ ...
----- शब्दमेघ
13 Oct 2011 - 5:07 pm | धन्या
झक्कास...
फक्त तो "लोळ" शब्द मात्र खटकला. लोळ म्हटलं की आगीचा लोळ आठवतो. आणि इथं विझल्याची भावना आहे. :)
13 Oct 2011 - 5:13 pm | गणेशा
वाटेवरती उडणार्या धुळीस-फुफाट्यास पण लोळ च म्हणतात ना ?
मला तसे वाटले म्हणुन लोळ शब्द लिहिला..
तसे नसेल तर शब्द बदलला जाईन
13 Oct 2011 - 5:33 pm | मनीषा
माझी एक कविता , पण ती आधी लिहिलेली आहे.
हे छायाचित्र पाहताना मला ती आठवली ...
पानावर हिरव्या ओल्या
थेंब हळू थरथरतो
आकाशी मेघ काळा
मग दूर दूर जातो ।
लाटांवर सळसळतो
गर्द केशरी वर्ख
अन मनातही उपजतो
आठवांचा विखारी डंख ।
थबकते सांज क्षणभर
निळसर जलाशयावर
हळुवार एक उसासा
निसटतो तप्त धरेतून ।
चमकतो गगनी तारा
अन शीळ घुमवितो वारा
डोळ्यात माझ्या अवचित
झाकोळ कुठुनसा येतो ।
13 Oct 2011 - 8:44 pm | जयंत कुलकर्णी
आपण केलेली आहे ना मग हरकत नाही जूनी असली तरीही. मी हा फोटो का घेतला, तेव्हा काय झाले होते हे मी सर्व नंतर लिहीणार आहे. पण एक सांगतो सगळ्यांच्या भावना अत्यंत त्याच आहेत ज्या त्या तरूणीच्या मनात होत्या......किंवा असतील. याला म्हणतात विषयाची एकरूप होणे........
छान कविता. उत्तम !
14 Oct 2011 - 9:51 am | ५० फक्त
'पण एक सांगतो सगळ्यांच्या भावना अत्यंत त्याच आहेत ज्या त्या तरूणीच्या मनात होत्या.'
हे जर माझ्या कवितेविषयी असेल तर मला एक पेश्शल बक्षिस पायजेल त्यासाठी.
14 Oct 2011 - 10:39 am | जयंत कुलकर्णी
आम्ही तुम्हाला एक पेशल बक्षीस देऊ पण ते यासाठी नाही................... :-)
13 Oct 2011 - 6:48 pm | पैसा
या निमित्ताने मस्त काव्य कट्टा झाला हा!
13 Oct 2011 - 8:49 pm | कवितानागेश
पाहता खोल डोहात, मोती जरी मिळाले,
या कातळास माझ्या, सजवू कसे परी मी.
थांबले मेघ तिथेच, नभ अचंबित पाहे,
डोळ्यास रुक्ष माझ्या, भिजवू कसे परी मी.
13 Oct 2011 - 8:54 pm | जयंत कुलकर्णी
माझे काम अवघड होत चाललेले आहे. बहुदा मला ते कोणातरी तज्ञ व्यक्तीला द्यावे लागणार असे दिसते. असो. तसेही करता येईलच.........
:-)
13 Oct 2011 - 10:21 pm | शानबा५१२
आपण दोघेच असायचो जेव्हा इथे,
तेव्हा समुद्रात वादळे असायची.
आज समुद्रही शांत अन तूही नाही आहेस,
पण मनात वादळे उठलेत.
14 Oct 2011 - 8:51 am | जयंत कुलकर्णी
चारोळी छान !
उठली आहेत असे पाहिजे होते का ?
13 Oct 2011 - 11:06 pm | jaypal
वरील कविता सुध्दा. हा फोटो बघत बघत २/३ वेळा शोभाताई घुरटुंची " माजीया प्रियाला प्रीत कळेना" ऐकली आणि
अजुनही मस्तपैकी संमोहीत झाल्या सारख वाटतय
सगळ्यांचे धन्यवाद :-)
13 Oct 2011 - 11:52 pm | ज्ञानेश...
जयंतराव, फारच सुरेख फोटो आहे ! हॅट्स ऑफ !!
कविता वगैरे सुचणे कठीण आहे, पण हे वाचल्यानंतर माझ्याच काही ओळी आठवल्या-
"अवेळी अशा आज कोणाकडे जायचे?
कुठे घेऊनी आपले हे रडे, जायचे?
मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली..
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे...
तळ्याएवढा शांत मीही तटी व्हायचो,
तरी स्तब्ध पाण्यात काही खडे जायचे !!"
14 Oct 2011 - 8:55 am | जयंत कुलकर्णी
// मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली..
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे...//
आवडले. कितीही लिंपा तडे हे जातातच. नाहीतर ओलावा संपत आल्यावर, असलेले हे मोठे होतात.
14 Oct 2011 - 12:10 am | वाहीदा
समंदर की गहराई ..
उदासी का मंजर..
चुप सा यह आसमान..
आश्ती चारोओर और यह सैलाब मेरे दिलमें !
ले चल तू मुझे दूर कहीं..
उछलती हुए मछलीयोंकी तरह...
ए जिंदगी, सिमटले तू मुझे अपनी आगोश मे,
पिछे छुट जायेंगे यादोंके भंवर,
हट जायेंगें यह काले बाद्ल
थम जाएगी यह रात यहीं
उफ़क पर एक शाम का सितारा सिर्फ़ रह जाएगा..
एक नया सवेरा, एक नया उजाला लिए
लेकर आएगी एक सुबह नवेली
जाना हैं मुझे उस पार..
राह दिखायेंगी मुझे यहीं सोच नई
(आश्ती : शांती, सैलाब : वादळ,
उफ़क : क्षितीज
आगोश : आलिंगन)
~ वाहीदा काझी
(उर्दू-हिंदीत लिहील्याबध्दल दिलगीरी कारण तेच पटकन सुचले )
14 Oct 2011 - 12:59 am | अनामिक
बहोत खुब वाहीदा! आप तो बडी छुपी रुस्तुम निकली!!
14 Oct 2011 - 2:28 am | अभिजीत राजवाडे
क्या बात है वाहिदा.
अत्यंत भावपुर्ण, अर्थमय तरल कविता.
एखाद मस्त गाण एकताना जी मजा येते अगदी तसच वाटल.
आभार.
14 Oct 2011 - 6:04 pm | तिमा
वाहीदाजी,
सुंदर कविता लिहिली आहे आपण. उर्दुमुळे एक वेगळेच वजन येते काव्याला. अभिनंदन.
14 Oct 2011 - 10:00 pm | मन१
आवडले.
वरची मनीषाचीही कविता आवडली.(बाय द वे उर्दुत लिहिलेल्या प्रकाराला कविता म्हणता येते का?)
एकूनातच नुस्ता फोटो देउन एकाहून एक लिहायला लावणार्या जयंतरावांची कल्प्नाही भन्नाट
14 Oct 2011 - 10:52 pm | वाहीदा
बाय द वे उर्दुत लिहिलेल्या प्रकाराला कविता म्हणता येते का?
उर्दूत कवितेला नज्म(Nazm) म्हणतात .
बाकी जयंत सरांची कल्पना खरंच भन्नाट , मला तर सगळ्यांच्याच कविता आवडल्या !!
14 Oct 2011 - 2:30 am | अभिजीत राजवाडे
मी आणखी एक कविता सादर करत आहे. अभिप्राय कळवावा हि विनंती.
14 Oct 2011 - 10:32 am | गणेशा
अभिजीत जी तुमच्या काव्यचित्र मला दिसत नाहि हो ...
14 Oct 2011 - 5:07 pm | अभिजीत राजवाडे
.
14 Oct 2011 - 2:51 am | बहुगुणी
उस बेहेतरीन तस्वीर को चार चांद लगा दिये आपके लफ्ज़ोंने!
तुमच्या शब्दांचंच हे स्वैर मराठी रुपांतरः
14 Oct 2011 - 10:57 pm | वाहीदा
बहुगुणीकाका, जयंत सर, अनामिक, अभिजीत राजवाडे,तिरसिंगराव घाणेकर, मनोबा खरंच मनापासून आभार !
बहुगुणी काका तुम्हीच माझ्या नज्म ला चार चांद लावले , तिचे स्वैर मराठी भाषांतर मस्तच !
यह तुम्हारी नवाजिशे-करम, जो मेरे नज्म को चार चांद लगा दिए
वरना इस नाचीज को कोई इतनी आसानी से समझ न पाता....
शुक्रिया !!
नवाजिश : kindness
करम : favour , generosity
नाचीज : तुच्छ , petty, trivial
14 Oct 2011 - 9:16 am | प्रिया ब
दूर दूर वर काहीच दिसत नाही....
दिसत आहे फक्त निळंशार पाणी...
टक लावून बसले आहे मी तुझ्या वाटेकडे
विश्वास आहे मला येशील तू परत जरी असशील क्षितिजापलिकडे..
~~ प्रिया
14 Oct 2011 - 9:58 am | प्रभाकर पेठकर
कसा घसरला पाय?
का न आवरले संस्कारांनी?
तूही फिरविलीस पाठ
कलंकिनी ठरविले समाज नजरांनी.
हा अथांग सागर,
घेई सामाऊन आज मजला,
भरले नयन आकाशाचे,
असहाय्य वाटे आज त्याजला.
खंबीर हा पत्थर पाठीशी,
परंतु निश्चल, निरुपयोगी ह्या क्षणाला
ढाळेल चार अश्रू तोही
कळली जर मम व्यथा त्याजला
जाते सोडून जग हे,
नकोच ती स्वार्थी नाती,
विषण्ण, उद्विग्न मन माझे,
विझेल ज्योत अन उरेल कृष्ण वाती.
14 Oct 2011 - 10:31 am | गणेशा
वहिदा, ज्ञानेश, प्रभाकर, शानबा
आल्या आल्या तुमचे लेखन वाचायला मिळाले आज.
अप्रतिम लिहिलेले आहे.
वहिदा खुपच उत्तुंग काव्य ..
गविंच्या कवितेनंतर या थीम वर तुमची कविता सर्वात जास्त भावली...
प्रभाकर जी,
मला वाटते या धाग्यावर तुम्हीच पहिली कविता लिहिली आहे , ती पुर्ण मोठी लिहिना अजुन.. छान आणि वेगळेच शब्द आहेत त्यात...
14 Oct 2011 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर
तुम्हीच पहिली कविता लिहिली आहे , ती पुर्ण मोठी लिहिना अजुन..
प्रयत्न करतो आहे आवडल्यास प्रतिसादावे..
----oOo----
मी प्रेमवेडी
दिलास आधार प्रथम जीवनी,
पुलकित झाले किती मन्मनी,
तूझीच झाले प्रथम प्रथमदर्शनी,
सुवर्णप्रेम तव विश्वास मनी.
दिल्या-घेतल्या प्रेमशपथा,
किती बांधले मनात इमले,
सख्या म्हणाल्या प्रेमवेडी मी अन्,
किती प्रेमवीर दु:खात बुडाले.
फुले बहरली प्राजक्तांची,
ओंजळ भरली प्राजक्तांनी,
प्राजक्तांची प्रसन्नता मज,
प्राजक्तांनी अर्पण केली.
असा कसा रे बदललास अचानक....
असा कसा रे बदललास अचानक,
मोहात कुणाच्या गुंतलास अचानक,
तुझीच होते, तूझी न राहिले,
क्षणात सारे प्रेमविश्व जळाले.
आज ह्या क्षणी....
क्रुद्ध वादळे मनात साही,
एकही नौका सागरात नाही,
नसे कुणाची साथ आज ही,
अशी कशी ही करूण भैरवी...
अशी कशी ही करूण भैरवी...
14 Oct 2011 - 11:04 am | गणेशा
एक जुनी कविता येथे देण्याचा मोह होतो आहे पुन्हा !
सागराचे नीर दर्पण | विखुरले नभांकण |
वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत ||
ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी |
स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत ||
धरणीची ग्लान झोप | मेघांचे सूरेल गीत |
उसवले श्वासधागे | अंतरात ||
छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप |
शब्दांध झाली आसवे | आठवात ||
---- शब्दमेघ
14 Oct 2011 - 11:09 am | योगप्रभू
तुमच्या विनंतीला मान देऊन मी एकदम मला स्फुरलेल्या ३ कवितांच्या पहिल्या दोन ओळी टाकतोय. त्या आवडल्यास आख्खे काव्य टाकण्याचीही माझी तयारी आहे. तेवढं पुस्तकाचं लक्षात असू द्या. :)
१) जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहाते
२) सागर किनारे दिल ये पुकारे
तू जो नही तो मेरा कोई नही है
३) मै एक सदी से बैठी हूं
इस राह से कोई गुजरा नहीं
14 Oct 2011 - 11:29 am | जयंत कुलकर्णी
तुमच्या स्पर्धेत मीही आहे.............
यूँ न रह रह कर हमें तरसाईये
आइये आ जाईये आ जाईये...
फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर मेरी आग़ोश में गिर जाईये
मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
अपनी दुनिया छोड़ कर आ जाईये
ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
जी में आता है यहीं मर जाये
-सागर निझामी.
14 Oct 2011 - 11:32 am | प्रचेतस
ने मजसी ने परत मातृभूमीला...
सागरा प्राण तळमळला, तळमळला. सागरा...
--स्वातंत्र्यवीर सावरकर.
14 Oct 2011 - 11:33 am | जयंत कुलकर्णी
हो एका दृष्टीने हे ही बरोबर आहे......
14 Oct 2011 - 4:12 pm | वपाडाव
ह्या धाग्यावर पैला प्रतिसाद आहे.....कवितेचा प्रयत्न उद्यापर्यंत करतो.....
पण मला एक गाणे आठौले ते म्हणजे....
तु बिन बताये मुझे ले चल कहीं,
जहां तु मुस्कुरायें मेरी मंझिल वहीं !!
14 Oct 2011 - 11:22 pm | वाहीदा
=)) =)) =))
15 Oct 2011 - 10:58 am | योगप्रभू
वाहिदाजी,
माझ्या प्रतिसादातील गंमत समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
हसण्यासाठी जन्म आपुला.
14 Oct 2011 - 12:52 pm | ५० फक्त
जयंत सर, माझा अजुन एक प्रयत्न, थोडासा दुबळा आहे मान्य, पणं समोर दिसणा-या चौकटी तोड्ण्याचा छंदच लागलाय हल्ली.
इथंच बसले होते आई बाबा
मि मागच्या बागेत झोक्यावर
मोठा आला वारा तेंव्हा
माझ्या झोक्याएवढा
बरोबर एक उंच लाट
..............................
मी केवढी ओरडले होते
त्या लाटेकडे बघुन
जी गेली माझ्या...
आई बाबांना घेउन
किती वर्षे झाली मला
इथं येउन बसते
तीच लाट पुन्हा एकदा
येईल म्हणुन फसते
येणा-या प्रत्येक लाटेला
एकच निरोप देते
आई बाबाना परत आणा
नाहीतर मी येउ का तिथे ............