पराभवाचे श्राद्ध - १
पराभवाचे श्राद्ध - २
स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताच्या पहिल्या सेनादलप्रमूखाने, जनरल सर रॉबर्ट लॉकहार्ट यांनी आपल्या पंतप्रधानांना, म्हणजे पं. नेहरूंना एक अहवाल सादर केला. त्यात त्यांनी भारतीय सेनादलाचे विस्तारिकरण व आधुनिकीकरण यांच्या योजनांचा विचार मांडला होता. पं. नेहरूंनी मोठ्या बाणेदारपणे जे उत्तर दिले, ते ऐकून तो जनरल मनातल्या मनात छद्मी हसला असेल. नेहरू म्हणाले “ आम्हाला असल्या कसल्याही योजनांची गरज नाही. आम्हाला कोणापासुन कसलाही धोका नाही. You can scrap the Army” (हे वाक्य मुद्दाम आहे तसे दिले आहे.) आणि अंतर्गत बाबींसाठी आमचे पोलीसदल समर्थ आहे.
एवढेच बोलून ते थांबले नाहीत तर त्यांनी १९४७ साली सेनादलाची संख्या २८०,००० वरून १५०,००० वर आणायचे आदेश दिले. हे कमी होते की काय म्हणून १९५०-५१ सालात चिनशी संबंध तनावपूर्ण होण्यास सुरवात झालेली असताना त्यांनी सेनादल मोडीत काढायचे म्हणून ५०,००० सैनिकांना घरी पाठवले.
युद्धे जिंकणार्या सेनानींनी ते युद्ध आधीच जिंकलेले असते. उरते ती फक्त लढाई. जे सेनानी युद्ध हरतात ते फक्त लढाई करतात आणि शेवटी हरतात.
दुबळे असल्याचे सोंग आणा आणि त्याचा दुराभिमान वाढवा.
सगळी युद्धे ही गनिमी काव्यानेच जिंकता येतात, म्हणून आपली जेव्हा आक्रमणाची तयारी झालेली असते तेव्हा त्यांना आपली काहिच तयारी नाही असे वाटले पाहिजे. आपली ताकद वापरतांना आपण स्वस्थ बसलो आहोत असं त्यांना वाटले पाहिजे. आपण जवळ येऊ तेव्हा त्यांना आपण दूर आहोत असा भास व्हायला पाहिजे. जेव्हा आपण दूर असतो तेव्हा त्याला असे भासले पाहिजे की आपण फारच जवळ आलो आहोत......
- सन् त्झू सन ५०० ख्रिस्तपूर्व.
जेव्हा शत्रू आक्रमण करतो तेव्हा माघार घ्या. जेव्हा तो थांबतो तेव्हा त्याच्या भोवती घिरट्या घाला, त्याला हैराण करा. तो हैराण झाल्यावर त्याच्यावर हल्ला करा. तो माघार घेईल तेव्हा त्याचा पाठलाग करा आणि त्याला नष्ट करा.....
- माओ.
मित्रहो, पहिले दोन भाग वाचल्यानंतर आपल्याला वरील वाक्यांचा अर्थ चांगला कळला असेल.
आपले त्यावेळचे संरक्षणमंत्री श्री. कृष्णमेनन ज्यांच्या माथी या पराभवाचे खापर फोडण्यात आले त्यांच्याबद्दल थोडेसे.. किंवा पुष्कळसे.
हे सगळे वाचून आपल्या मनात साहजिकच हा प्रश्न उभा राहतो की १९६२ साली असे काय झाले, चुकले, की आपल्याला दारूण पराभव पत्करावा लागला ? ब्रिटिशांनी तर आपल्या येथे चांगली राज्यव्यवस्था लाऊन दिली होती( तुलनेने). जवळ जवळ त्याच राज्यपद्धतीने त्यांनी दुसरे महायुद्ध जिंकले होते मग असे काय झाले की आपण हे युद्ध हरलो ? याचे खरे कारण आहे की व्यवस्था चांगली असली तरीही जी माणसे ती चालवतात, ती जास्त महत्वाची असतात. ती जर डगमगली किंवा ती जर अनिर्णयक्षम असतील तर ती व्यवस्था काय करणार ? आपल्या सैनिकांबद्दल सर्व साधारणपणे जगात चांगलेच बोलले जाते. अर्थात ज्यांना सैनिक, लष्कर, त्याच्या हालचाली, त्यांची युद्धे इत्यादी विषयातले कळते त्यांच्यापैकी एकाही माणसाने भारतीय सैनिकांबद्द्ल अपशब्द काढलेले आढळून येत नाही. या पराभवाच्या मागच्या अनेक कारणांपैकी एक होते - लष्कराच्या निर्णय घ्यायच्या प्रक्रियेत राजकारण्यांनी केलेली लुडबूड. ती १९६२ सालाच्या अगोदर पासुनच चालू होती. युद्ध, सेना व त्यांच्या हालचाली हे सगळे एक शास्त्र आहे हे समजून घ्यायलाच कोणी राजकारणी तयार नव्हते. युद्ध हे एकाच अतिविद्वान, हुशार माणसाचे काम नाही तर हा अनेक जमिनीवर पाय असणार्या अनेक माणसांचा एकत्रीत प्रयत्न असतो. एक माणूस मग तो कितीही विद्वान असो, किंवा लोकप्रिय असो, वा शक्तिमान असो त्याच्या एकट्यावर युद्ध सोडले की त्या युद्धात काय होणार हे सांगायला विशेष प्रयास पडत नाहीत. एकाच माणसाच्या लहरीवर राष्ट्रीय धोरण सोडले की काय होऊ शकते याचा चिनचे आक्रमण हा उत्तम नमूना आहे. हे असे कधीही होऊन देता कामा नये. हे एकदा मान्य केले की मग पुढचा प्रश्न उभा राहतो की पं. नेहरू आणि श्री. कृष्णमेनन यांचा हा अमानवी दबदबा कसा काय तयार झाला. यासाठी आपल्याला त्या आधी काय परिस्थिती होती हे जाणून घ्यावे लागेल.
ब्रिटीश राज्यपद्धतीच्या जवळपास असणारी राज्यपद्धती आपण स्विकारली त्यात तर एक दोन माणसाच्या हातात सगळा कारभार जावा असे काहीच नव्हते. पण १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं नेहरूंच्या हातात सत्ता आली आणि त्यांची मते आणि विचारसरणीच, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, राष्ट्रीय धोरणे ठरवू लागले. श्री. मेनन येईपर्यंत तर संरक्षण खात्याला असा एकही मंत्री मिळाला नाही की जो पं. नेहरूंसमोर संरक्षणदालाच्या मागण्या समर्थपणे मांडू शकेल किंवा त्यांना पटवून देऊ शकेल. सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर या खात्याला धोरण ठरवायच्या प्रक्रियेत फारच छोटी भुमिका देण्यात आली. जवळ जवळ नाहीच. एकच धोरण आता अमलात आणण्यात येऊ लागले ते म्हणजे “ त्यांना सगळे कळते. ते करतील ते खरे आणि बरोबर. त्यांना विचारा ! इ...”
पहिले संरक्षणमंत्री होते सरदार बलदेवसिंग. यांना हे पद मिळाले याचे कारण इतर प्रमूख नेत्यांना या पदात विशेष रस नव्हता. रस नसण्याचे मुख्य कारण म्हणजे या पदाने लोकांसमोर सातत्याने चमकता येत नव्हते व नेहरूंबरोबर वर्तमानपत्रात सारखी छबी झळकवता येत नव्हती. बरं नेहरूंनीसुद्धा कॉंग्रेसच्या पलिकडे जाऊन एखाद्या तज्ञ माणासाला या जागेवर नेमण्याचा प्रयत्न केला नाही, नाहीतर त्या काळात श्री. कुंझरूंसारखी माणसे उपलब्ध होती. हे इतर खात्याच्या बाबतीत ठीक होते पण संरक्षण खात्याच्या बाबतीत हे फार महाग पडले. हे गृहस्थ एका श्रीमंत घराण्यातून आले होते आणि सुखवस्तू होते. किचकट कामाची यांना ना आवड होती ना सवय. त्यांचे सचिव श्री. पटेल यांनी लवकरच सर्व सूत्रे स्वत:च्या हातात घेतली. त्यावेळचे लष्करप्रमूख जनरल करिआप्पा हे एक अत्यंत कुशल व अनुभवी सेनानी होते. त्यांचे या पटेलांशी बिलकूल पटत नव्हते. सरदार बलदेवांनी या दोघांमधील गैरसमज कमी करण्याचा काडीचाही प्रयत्न केला नाही हे सत्य आहे. थोडक्यात हा मनुष्य हे मंत्रालय सांभाळायला लायक नव्हता. संरक्षणमंत्री पद हे संभाळायला फार अवघड ! एका बाजूला नागरी, बिनलष्करी आधिकारी आणि एका बाजूला अत्यंत कष्टाने अनुभव घेत खालच्या पदावरून हळू हळू वरच्या पदावर पोहोचणारे, आणि या प्रवासात तावून सुलाखून निघणारे, लष्करी अधिकारी. या सगळ्यांना सांभाळून घ्यायचे म्हणजे फार मोठी ताकद लागते, जी या माणसाकडे नव्हती. हळू हळू हे मंत्रालय पं नेहरूंच्या कार्यालयाच्या ताटाखालचे मांजर झाले. एक चांगला माणूस चुकीच्या वेळेस चुकीच्या खुर्चीवर, असे या माणसाचे वर्णन करायला हरकत नाही.
यानंतर संरक्षणमंत्री झाले श्री. गोपालस्वामी ऐय्यंगार. हे एक पूर्व आय.सी.एस. आधिकारी होते. अत्यंत थंड डोक्याने काम करणारे, शिस्तप्रीय आणि अत्यंत बुद्धिमान असे गृहस्थ होते. दुरदैवाने यांचा हा पदाधिभार स्विकारल्यावर काही महिन्यातच मृत्यू झाला.
यांच्यानंतर संरक्षणमंत्री झाले श्री. कैलासनाथ काटजू. हे मंत्रीमंडळात कायद्याचे मंत्रालय सांभाळत होते. त्यांना तातडीने संरक्षण मंत्रालय देण्यात आले. हे राजकारणात व व्यवस्थापनात चांगले अनुभवी होते पण कॉंग्रेसची परिस्थिती सांभाळायला त्यांना दोन/तीन वर्षातच मध्यप्रदेशात पाठवण्यात आले. या गृहस्थाने काहीही वाईट व मंत्रालयाचे नुकसान होईल असे काम केले नाही पण काही भले होईल असेही काम केले नाही. कॉंग्रेसच्या परंपरेला अनुसुरून यांनी वयाच्या ७५ वर्षांचे असताना सुद्धा जनतेची सेवा करायचे ठरवले होते आणि त्यासाठी ते निवडणूकीला उभे राहिले होते. दुर्दैवाने (सुदैवाने) जनतेने त्यांना नाकारले व त्यांच्या या सेवेत अखेरचा खंड पडला. तसेही त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासाठी त्यांनी मोल वसूल केले होते. आपल्या संरक्षणदलाची अवस्था यांच्या काळात फारच म्हणजे सगळ्यात शोचनीय झाली होती. पाकिस्तानने अमेरिकेच्या मदतीने जे त्यांच्या संरक्षणदलाचे आधुनिकीकरण चालवलेले होते ते लक्षात घेऊन यांनी कसलीही योजना आखली नाही.
श्री. महावीर त्यागी नावाचे एक कॉंग्रेसचे कटकटी मंत्री होते. लोकसभेमधे अनेकदा चित्रविचित्र प्रश्न विचारून मंत्र्यांना अडचणीत पकडण्यामधे यांचा हतखंडा होता. यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांना एखादे मंत्रीपद देणे भाग होते. संरक्षणमंत्रालयाखेरीज अशा माणसासाठी कोणते मंत्रालय सापडणार ? यांना ते मंत्रीपद देण्यात आले. या माणसाने एक महत्वाचे :-; काम केले ते म्हणजे खादी उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी सैनिकांसाठी या उद्योगाकडून जड खादीची ब्लॅंकेटस् खरेदी केली. दुसरे म्हणजे याने त्या काळात हिंदीमधून (लेखी) आदेश देण्यास सुरवात केली जी फारच थोड्याजणांना समजत असत. यांना जनरल्सच्या गराड्यात रहायला फार आवडत असे. त्यांना लंबीचौडी भाषणे देण्यात हे धन्यता मानत असत. या पदावरून हटवून श्री.महावीर त्यागी यांचे पुनर्वसन पुनर्वसन खात्यात करण्यात आले आणि शेवटी आपले नायक श्री. कृष्णमेमन यांना संरक्षणमंत्री करण्यात आले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर श्री. कृष्णमेनन यांच्या या नेमणूकीबरोबर अजून एक आनंदाची बातमी सेनादलांना मिळाली ती म्हणजे सेनादलाचे प्रमूख म्हणून जनरल थिमय्या यांची निवड झाली. एका बुद्धिमान संरक्षणमंत्री आणि एक अनुभवी जनरल यांच्या मार्गदर्शनाखाली सेनादलांना उर्जीत अवस्था प्राप्त होईल अशी सर्वांना आशा वाटू लागली. श्री. कृष्णमेनन हे एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता. त्यांच्या तारूण्यातले दिवस त्यांनी इंग्लंडमधे घालवले होते ( १९२४ ते १९५२) नेहरूंशी चांगले जमण्याचे हेही एक कारण होते.
श्री. कृष्णमेनन -
श्री. कृष्णमेनन हे उच्चशिक्षित, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी मिळवली होती आणि पदवीनंतरचे शिक्षण त्यांनी लंडन विद्यापिठातून घेतले होते. एवढेच नव्हे तर डॉक्टरेट ग्लासगो विद्यापिठातून. या शिक्षणामुळे त्यांना आतंरराष्ट्रीय राजकारणाची चांगली ओळख होती. कॉंग्रेसमधील इतर मंत्रीगणात हे सगळे फारच उठून दिसणारे होते हे निर्विवाद !.
इंग्लंड्मधेही त्यांनी भारताच्या बाजूने आपला लढा चालूच ठेवला होता. ब्रिटिश राजकारणातही त्यांनी प्रवेश मिळवला होता आणि त्यांना लेबर पार्टीमधून तेथील पार्लमेंटमधे प्रवेश करायचा होता. आणि त्यांची वाटचाल बघाता ते त्यांना अशक्य होते असे वाटत नाही. दुर्दैवाने परदेशात उमेदीची वर्षे काढल्यामुळे त्यांची भारतातल्या जनतेशी आणि त्यांच्या पुढार्यांशी असलेली नाळ तुटली होती. लंडनमधे असताना ते एका प्रकाशनसंस्थेसाठी काम करत असताना पं. नेहरूंचे साहित्यिक प्रतिनिधी म्हणू काम करत होते त्यामुळे भारताच्या भावी पंतप्रधानांची मर्जी संपादन करण्यात त्यांना यश आले किंवा ते त्यांनी मिळवले असे म्हणायला हरकत नाही. नेहरूंनाही त्यांच्या कॉंग्रेसमधील इतर लोकांपेक्षा हा सुशिक्षित आणि परदेशी माणूस फारच आवडला. दोघांचाही भारताचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजवाद उपयोगी पडेल असा ठाम विश्वास होता. दोघांचा फॅबियन समाजवादावर विश्वास होता. फॅबियन सोसायटीचा हा समाजवाद म्हणजे, समाजवाद तर आणायचा पण क्रांती वगैरे मार्गाने नव्हे तर सावकाश जनतेला शहाणे करून. ही त्या काळात ब्रिटनमधे स्थापन झालेली एक चळवळ होती. कॉंग्रेसमधील इतर सामन्यजनांच्या तुलनेत दोघेही मनाने परदेशीच होते. त्यांची विचारसरणी व राहणीमानही परदेशी होते आणि दोघांनाही भारतातील त्यावेळेची स्थिती मान्य नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यावर पं नेहरूंनी त्यांच्या या मित्राला इंग्लंडमधे राजदूत म्हणून नेमले. १९४८ साली त्यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोरे जावे लागले ते जीपच्या खरेदीत. सेनादलांनी ही वाहने खराब गुणवत्तेच्या कारणाने नाकारली पण त्यांना आपल्या पंतप्रधानांनी ती वाहने स्विकारायला लावली. एवढेच नव्हे तर त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना ताबडतोब संरक्षणखात्याचा मंत्री म्हणून मंत्रीमंडळात सामील करून घेण्यात आले. नेहरूंनी त्यावेळेस लोकसभेत जे उत्तर दिले ते वाक्य भारताच्या राजकीय इतिहासातील फार महत्वाचे वाक्य आहे. त्या वाक्याचा शेवटचा अर्थ असा आहे की जनतेच्या दरबारात आम्ही निर्दोष आहोत कारण त्यांनी आम्हाला निवडून दिले आहे. ते उत्तर असे होते “ हे प्रकरण व त्याची चौकशी आता बंद करण्यात आलेली आहे. कारण त्या वाहनांचे पसे अगोदरच देण्यात आलेले आहेत. विरोधकांनी त्यांना पाहिजे असेल तर आता हा प्रश्न पुढच्या निवडणूकीत जनतेच्या दरबारात उपस्थित करावा व न्याय करून घ्यावा. “ सध्या हेच उत्तर आपले राजकारणी देत असतात हे आपण पाहिले असेलच.
आपल्या इंग्लंडमधील कामगिरीनंतर त्यांना भारताच्या युनोमधील शिष्टमंडळाचे उपप्रमूख म्हणून पाठवण्यात आले. यामुळे त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. आंतरराष्ट्रीय समूहापुढे भाषणे देणे, वेगवेगळ्या कार्यक्रमात चर्चा करणे यासाठी ते ओळखले जाऊ लागले. त्यांच्या या काळातील कामगिरीचे वर्णन न्युयॉर्क टाईम्सच्या श्री. रोझेनाथॉल यांनी फक्त एका वाक्यात फार छान केले आहे. ते म्हणतात “ श्री मेनन यांनी स्वत: नाव कमावले पण त्यांच्या देशाचे घालवले” याला संदर्भ होता पं नेहरूंच्या तटस्थ भूमिकेचा. श्री. कृष्णमेनन यांनी आमसभेत पं. नेहरुंची ही भुमिका फार प्रभावीपणे मांडली त्याला उद्देशून हे वाक्य लक्षात घ्यायला लागेल. भारतातील सुशिक्षितांचे कृष्णमेनन हे आवडते वक्ते होते, युनोच्या आमसभेतील त्यांची भाषणे, ज्यात ते युरोपिअन देशांवर कोरडे ओढत, ते भारतातील समाजवादी विचारांच्या जनतेला फारच आवडत. खरे तर त्यांच्या या कटू बोलण्याने भारताविषयी बरेच गैरसमज त्या समुहात पसरले व त्यांची भारताबद्दल वाटणारी सहानभूती उतरणीला लागली. याच काळात त्यांनी हंगेरीच्या आणि सुएझच्या बाबतीत ज्या परस्परविरोधी भुमीका स्विकारल्या त्याबद्दलही बरीच टिका झाली.
त्यांच्या परराष्ट्रमंत्रालयात असताना त्यांनी जे काम केले त्यामुळे त्यांना त्या मंत्रालयाचे कायम सदस्यत्व मिळाले असे म्हणायला हरकत नाही. याच वेळेस त्यांची संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक झाली आणि त्यांनी दोन्ही कामात लक्ष द्यायला सुरवात केली. याच्यात दोन्ही भुमिकांची बरीच सरमिसळ होऊ लागली. बाहेर जो उद्धटपणा आणी कडवट बोलणे चालवून घेतले जात होते ते आता साध्यासुध्या सैनिकांना सहन करणे अशक्य होत चालले.
श्री. कृष्णमेनन हे अत्यंत हुषार पण फाटक्या तोंडाचे होते. हाताखालच्या लोकांना ते मूर्ख, बिनडोक समजायचे. पं. नेहरू शांतपणे पुढच्याचे म्हणणे तरी ऐकून घेत असत व सहजपणे खोडूनही काढत असत. पण श्री. मेनन यांना आक्रस्तळेपणा करायची सवय होती. समोरच्या आधिकार्यांच्या अंगावर कागद्पत्रे फेक, त्यांच्या अंगावर त्यांच्या हाताखालच्या लोकांसमोर ओरडणे अशा गोष्टी ते सहज करत आणि त्याबद्दल त्यांना कसलाही खेद वाटत नसे. रात्री बेरात्री आधिकार्यांना घरी फालतू चर्चेसाठी बोलवणे हा त्यांचा एक छंदच होऊन बसला होता. याचा परिणाम वरीष्ठ अधिकारी त्यांना टाळू लागले. सेनादलातील सगळ्या पद्धतशीर आखीव प्रक्रियांचा त्यांना तिरस्कार वाटे. ले. जनरल मेंझीस यांनी त्यांच्या पुस्तकात असे म्हटले आहे की एखाद्या बैठकीत जर एखाद्या आधिकार्याने काही शंका उपस्थित केल्या तर ते त्याला सहजपणे कोर्टमार्शलच्या धमक्या देत. त्यांच्या विरोधातील सेनाअधिकार्यांना अत्यंत हीन पातळीवर उतरून ते त्यांना मनस्ताप देत. श्री. खुशवंतसींग यांनी त्यांची अशीच एक युक्ती सांगितली आहे. जेव्हा एखाद्या सभारंभात जाण्यासाठी गाडी येई तेव्हा हे पटकन ड्रयव्हरच्या शेजारची जागा पटकावयाचे. आता जनरलच्या पदाच्या अधिकार्याची पंचाईत व्हायची. मागे बसावे तरीही चूक. मग ते बिचारे त्या चालकाला उतरवून स्वत: गाडी चालवायला बसायचे आणि त्यांच्याबरोबर गप्पागोष्टींसाठी ते असे करत आहेत असा आव आणायचे. ही युक्ती ते नहमीच वापरायचे. मग आपले हे संरक्षणमंत्री, बघा, एक जनरल माझी गाडी चालवतोय अशा तोर्यात वावरायचे. हे सगळे चालवून घेतले जायचे कारण साहेबांना पं. नेहरूंचा आशिर्वाद होता.
श्री. कृष्णमेनन यांना मंत्रीमंडळात आणि त्याच्याबाहेर अनेक शत्रू होते. खाजगी उद्योगांवर त्यांचा अविश्वास जाहीर होता. त्यांच्या नेहरूंच्या जवळकीने ते इतर मंत्र्यांना आवडत नसत. त्याचा परिपाक म्हणून त्यांच्यात आणि अर्थमंत्री श्री. मोरारजी देसाई यांच्यात कमालीचे वित्तुष्ट आले आणि त्याचा परिणाम सेनादलाची हेळसांड होण्यात झाला. पं नेहरूंनी या दोघांनाही वठ्णीवर आणायचा मुळीच प्रयत्न केला नाही ही एक शोकांतिका आहे.
ज. थिमय्या -
त्याकाळातील सैनिकांचे लाडके ज. थिमय्या ज्यांना ब्रिटीश सेनाधिकारीसुद्धा मानत होते त्यांनी श्री. कृष्णमेमन यांना विरोध दर्शवायला सुरवात केली. श्री. कृष्णमेमन यांनी आता सेनाअधिकार्यांच्या बदल्या इ.... गोष्टीतही लक्ष घालायला सुरवात केल्यामुळे प्रकरण भलतेच चिघळले...............
जयंत कुलकर्णी.
क्रमश:
प्रतिक्रिया
10 Oct 2011 - 11:09 pm | यकु
ज्या गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात त्या अतिशय उत्तम प्रकारे मांडल्या आहेत; अर्थात यावर पुन्हा वेगळे प्रतिवाद येणारच नाही असं नाही.
बर्याच वेळा सगळीकडेच (आणि विशेषतः राजकारणात) 'वरिष्ट' पातळी किंवा 'वरुन ठरलंय' हे जसंच्या तसं कुठलाही आडफाटा न येता पुढं चालू रहातं.. ( राजकारणात सत्ता आणि इतर ठिकाणी एक्झिक्युटीव्ह पॉवर्सची कमाल !) उदाहरण म्हणजे खुद्द मुंबईत किंवा मंत्रालयात घडणार्या रोजच्या घडामोडीवरील पेपरमधून येणार्या बातम्यांवर लक्ष ठेवलं तरी वारं कुठून वाहतंय आणि ते कोण वळवतंय हे लक्षात येतं.. पण इतर शहरात असणार्या लोकांना ( उदा. औरंगाबादला असताना बातम्या वेगळ्याच दिसतात....... मुंबईत थोडे दिवस जरी राहिलं तरी मुंबईच्या बातम्यांचा वेगळाच अर्थ दिसू लागतो... पदावर बसलेल्यांचे वेगळेच (खरे) चेहरे दिसतात ) मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबई व दिल्लीसारख्या ठिकाणी घडलेल्या घटनेची नीट संगती लागत नाही....
तुम्ही त्या काळच्या घडामोडींचं तुमच्या पध्दतीने विश्लेषण केलं आहे जे बर्याच बाबतीत सुसंगत आहे..
बाकी काही विशिष्ट सदस्यांचे मौन सुटले असेल तर प्रतिवादाच्या प्रतिक्षेत आहेच.. :)
11 Oct 2011 - 1:19 am | अर्धवटराव
मी सुद्धा मौनव्रताच्या सांगतेची वाट बघतोय...
(बोलबचन) अर्धवटराव
10 Oct 2011 - 11:21 pm | पैसा
वाचतेय. सगळ्या गोष्टींचा अंतिम परिणाम युद्ध हरण्यात झाला हे शल्य कायम राहीलच.
10 Oct 2011 - 11:32 pm | निनाद मुक्काम प...
मेनन ह्यांच्या विषयी चांगली माहिती मिळाली .
चांगली लेखमाला आहे .
पु ले शु
11 Oct 2011 - 4:17 am | Pain
हा भागही फार आवडला. उत्तम !
11 Oct 2011 - 9:10 am | पिंगू
मेनन यांच्याबद्दल खुशवंतसिंग यांच्या चरित्रात बरेच काही वाचले आहे. त्यामुळे ती माहिती इथे अधिक संदर्भाने येईल अशी आशा बाळगतो. बाकी लेखमालिका मात्र बरीच माहितीपूर्ण असल्याचे निरिक्षण नोंदवतो. पुढील भाग लवकर प्रकाशित कराल याची आशा बाळगतो.
- पिंगू
11 Oct 2011 - 10:01 am | मन१
मौनव्रत सुटायच्या प्रतिक्षेत.
11 Oct 2011 - 10:04 am | प्रचेतस
अतिशय उत्तम लेखमाला.
पुढच्या भागांची वाट बघतोय.
11 Oct 2011 - 10:38 am | इरसाल
अरे देवा.
म्हणजे आता पर्यंत माहित असलेली माहिती हिमनगाचा एक छोटासा टवका आहे म्हणायचा तर.
कुलकर्णी साहेब तुम्ही नेहमी उत्तमच लिहित आलात. छान लेखमाला.
अश्याच अभिमानास्पद सेनेतील काही कर्नल, मेजर लोकांबरोबर काम केल्याचा मला आता आनंद होता/आहे.
11 Oct 2011 - 10:41 am | रत्नागिरीकर
हा भागही आवडला.... पु.भा.प्र.
Himalayan Blunder, विकत घेतलय.....
चिन्मय कामत
11 Oct 2011 - 10:48 am | वसईचे किल्लेदार
वाचत रहावेसे साहित्य. आपल्या अभ्यासाला आणी लेखणीला सलाम.
11 Oct 2011 - 11:51 am | चावटमेला
आपल्या आधीच्या लेखांप्रमाणेच हा लेख सुध्दा वाचनीय आहे. खरोखर, आपला अभ्यास खूप मोठा आहे.
पुलेशु
11 Oct 2011 - 11:59 am | मराठी_माणूस
खुप नवीन माहीती मिळत आहे. डोळे उघडले जात आहेत. धन्यवाद.
11 Oct 2011 - 12:11 pm | शाहिर
इतके अभ्यासू लेखन मि पा करांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभारी आहे ..
खुप चांगली लेखमाला !!
11 Oct 2011 - 2:06 pm | इष्टुर फाकडा
असेच म्हणतो !!!
11 Oct 2011 - 2:06 pm | llपुण्याचे पेशवेll
चिच्चा कहाँ गये हमारे चिच्चा कहाँ गये?
11 Oct 2011 - 7:37 pm | जयंत कुलकर्णी
:-)
श्री नितीन यांची वाट बघू नका ! :-)
त्यांची मते जगजाहीर आहेत, आणि मला मते नाहीत त्यामुळे मी काही त्यांच्याशी वाद घालणार नाही.
या धाग्यावर करमणूक नाही फक्त माहीती आहे..... :-)
True but Joking !
11 Oct 2011 - 8:54 pm | मन१
कुणाचीही मते जगजाहिर असली तरी चर्चेच्या अनुषंगाने आलेली मुद्देसूद आणि अभ्यस्त मते वाचायला मला नक्कीच आवडतील; मग मला ती पटोत अथवा न पटोत, पण त्यातली ससंदर्भ माहिती उपयुक्त ठरते. कित्येकदा दुसर्याने दिलेले विरोधी संदर्भ आपलीच मते पारखून घेण्याची सुवर्णसंधी म्हणून मी पाहतो. अर्थात तुम्हीच दोन्-तीनदा ह्या मालिकेत चर्चा करित बसणार नाही असे लिहिल्याने दुसरी बाजू मांडणारे कुणीच आता समोर येणार नाही हे दिसतेच आहे. ह्याच गोष्टीचे आणि माझी संधी हुकल्याचे मला तीव्र दु:ख होते आहे.
मालिका एकांगी का असेना सुरु रहावी ही इच्छा.
अवांतरः-
फाशी अशी शिक्षा असावी की नसावी, भारत्-पाक संबंध, मुंबईतले बाँब्स्फोट, त्यावरची कारवाई वगैरे बद्दलचे त्यांचे काहिही मला कधीच पटले नाही. पण तिकडून आलेल्या माहितीकडे मी कधी दुर्लक्ष केले नाही. जमेल तेव्हढे दुवे वगैरे बघत असतोच. असो.
11 Oct 2011 - 10:07 pm | जयंत कुलकर्णी
मनराव काही वेळा जरा विनोदाने घ्या की राव ! असो.
//अर्थात तुम्हीच दोन्-तीनदा ह्या मालिकेत चर्चा करित बसणार नाही असे लिहिल्याने दुसरी बाजू मांडणारे कुणीच आता समोर येणार नाही हे दिसतेच आहे.//
येथे मते मांडायला कोणालाही कसलिही बंदी नाही. त्यामुळे आपल्या सर्वांचे शिक्षण होईलच याची मला खात्री आहे. फक्त मला सांगा मी लिहू की माझी मते मांडत बसू की वाद घालत बसू ? दोन्ही मला वेळेअभावी जमेल असे वाटत नाही.
आणि एक विनंती. जरा धीर धरा. मी या विषयावर सर्व बाजूने लिहीणार आहे अगदी चिनच्या बाजूनेही. त्यामुळे घाईघाईने मते मांडलीत तर आपलाच वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
थंडा करके खाओ...... :-)
12 Oct 2011 - 8:59 am | Pain
त्यांच्या प्रतिसादांमध्ये सामान्य लोकांचा बुद्धिभेद करणे हा एकच उद्देश दिसतो. मागे इंद्राज पवारांच्या एका धाग्यावरही हेच झाले होते. तुम्ही पाहू शकता. २-३ दा अनुभव घेतलात की तुमचेही मत लेखकासारखे होईल.
12 Oct 2011 - 9:44 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. :)
12 Oct 2011 - 10:42 am | सुनील
जर आपल्यापेक्षा वेगळे मत मांडण्याला बुद्धिभेद करणे म्हणत असतील तर, तसे करण्यात "स्वयंघोषित देशभक्त" जालावर संख्येने जास्त आहेत, असे माझा अनुभव सांगतो!
असे "बुद्धिभेद" करण्याचे प्रसंग घडूनही इतर सदस्यांच्या मतात फरक पडत नाही असेही माझा आठ वर्षांचा जालीय अनुभव सांगतो!
13 Oct 2011 - 4:23 am | Pain
तुमच्या पहिल्या वाक्याचा नीट अर्थबोध होत नाही किंवा तो टोमणा चुकलेला आहे. असो.
वेगळ्या किंवा विरोधी मताला विरोध नाही, कधीही नव्हता आणि नसेल.
बुद्धीभेदाचा शब्दकोषातला अर्थ पहा. चुकिचे किंवा संदर्भभ्रष्ट (out of context? ) माहितीचे तुकडे दिशाभूल करण्याच्या हेतूने देण्याचे काम या आयडीने केले आहे. इंद्राज पवार किंवा सदर लेखकाने हे प्रयत्न हाणून पाडले आहेतच पण प्रत्येक वेळी हेच करत बसायला त्यांना वेळ नसू शकतो किंवा कंटाळा येउन शकतो. शिवाय त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. म्हणून ते टाळावे या लेखकाच्या मताशी मी सहमत आहे.
11 Oct 2011 - 9:10 pm | llपुण्याचे पेशवेll
या धाग्यावर करमणूक नाही फक्त माहीती आहे.....
सहमत.
True but Joking !
पुनश्च सहमत. :)
11 Oct 2011 - 2:09 pm | मनीषा
खूप चांगली माहीती आणि लेखन..
लेखमाला नेहमी प्रमाणेच वाचनीय .
11 Oct 2011 - 7:37 pm | तिमा
लेख आवडला. त्यातील मुद्देसूद व तपशीलवार माहिती आवडली. मीही त्या काळात पेपर वाचत होतो पण मेनन यांच्याबद्दल इतकी माहिती मला नव्हती.
त्यावेळेस निवडणुकीला मेनन उभे राहिले होते तेंव्हा टाईम्स मधे आलेली मोठी जाहिरात अजून आठवते.
गो फॉर गोल्ड स्पॉट अँड व्होट फॉर मेनन!!!
11 Oct 2011 - 9:02 pm | अप्पा जोगळेकर
अजिबात थांबू नका. प्रत्येक लेख वाचत आहे. धक्कादायक सत्ये उजेडात आणत आहात. त्याबद्दल आभार.
11 Oct 2011 - 10:27 pm | जयंत कुलकर्णी
अप्पाजी,
मी कसला उजेडात आणतोय ! ही सगळी बर्याच पुस्तकातून उपलब्ध आहेत फक्त मी ती सगळी माहिती सुसंगत, क्रमवारीने लावतोय व आपल्या सर्वांच्या समोर ठेवतोय. अर्थात मी हे सगळे वाचले आहे का ? तर हॊ हे मी अनेक वर्षं वाचतोय आणि माझ्या भाषेत लिहितोय. ( माझे नशीब की ती आपल्या सर्वांना आवडतेय ).
पण आपण वाचत आहात यासाठी आपल्याला मनापासून धन्यवाद. माझे असे स्पष्ट मत आहे की तरूणांनी हे सगळे वाचून मतदान करावे. ( मी भा.ज.पा किंवा कुठल्याही पक्षाचा नाही असलोच तर कधी काळी (१९६९) नक्षलवादाला माझी खूपच सहानभूती होती हे खरे आहे. पण आता सगळ्यापासून दूर आहे.
आता मी सोकाजीलॉजी :-) व फिलॉसॉफीचा भक्त आहे. ( जे काही समजतय तेवढे)
12 Oct 2011 - 8:31 am | Pain
सर्वच पक्ष/ उमेदवार भ्रष्ट असल्याने "मतदान करा" हे आपले म्हणणेही हलकेच घेतो.
12 Oct 2011 - 4:06 pm | जयंत कुलकर्णी
त्यातल्या त्यात आपण निवड करू शकतो.............
12 Oct 2011 - 10:44 am | सुनील
माझे असे स्पष्ट मत आहे की तरूणांनी हे सगळे वाचून मतदान करावे.
तरुणांनी ५० वर्षांपूर्वीच्या घटनांवरून अडीच वर्षांनी होणार्या निवडणूकीत मतदान करावे, हे आवाहन रोचक आहे!
लेखमाला वाचतो आहेच.
12 Oct 2011 - 5:04 pm | जयंत कुलकर्णी
आपल्याला मला शब्दात पकडायचे असेल तर आपण म्हणताय ते बरोबर आहे. असे म्हणता येईल की ५० वर्षांपूर्वींच्या ते काल पर्यंतच्या घटनांवरून शिकून, साधकबाधक विचार करून, देशाच्या हिताचे ज्यांचे धोरण असेल त्यांच्या बाजूने, आपल्याला जर जास्त त्रास होत नसेल तर, मतदान करावे. मला वाटते आता रोचकपणा जरा सुसह्य झाला असावा......
चुकीच्या दुरूस्तीसाठी धन्यवाद....... पण मला वाटते सामान्य वाचकाला मला काय म्हणायचे आहे ते कळले असावे. "They have exactly read between the lines" तरीही जमेल तेचढी शक्यतो काळजी घेत जाईन.... अर्थात आपण आहातच त्यामुळे लेखन तसेच रहायची भीती नाही.
अर्थात काँग्रेसमधेही चांगली माणसे होतीच... १९६५ साली यशवंतरावांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली/सांभाळली ते एकदा लिहेन... पण चांगल्या माणसांना तेथे काय वागणूक मिळते हेही आपल्याला माहीत आहे...
13 Oct 2011 - 8:01 am | अप्पा जोगळेकर
ही सगळी बर्याच पुस्तकातून उपलब्ध आहेत फक्त मी ती सगळी माहिती सुसंगत, क्रमवारीने लावतोय व आपल्या सर्वांच्या समोर ठेवतोय.
याबद्दल विशेष आभार. आम्हाला ही माहिती आयतीच उपल्ब्ध होते आहे.
माझे असे स्पष्ट मत आहे की तरूणांनी हे सगळे वाचून मतदान करावे.
४९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आणि त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेउन आजचे मतदान करणे चूक आहे. आजच्या मतदानाला गेल्या पाच फार फार तर १० वर्षात घडलेल्या घटना जोडाव्यात हे ठीक.
13 Oct 2011 - 9:48 am | जयंत कुलकर्णी
या वाक्याचा आपण चुकीच्या पद्धतीन अर्थ लावताय. याचा अर्थ आहे की अशा घटनांचा आभ्यास करून व असे होणार नाही याची काळजी घेण्यासाठी विचार करून मतदान करावे. शब्दशः अर्थ काढू नये.
11 Oct 2011 - 9:25 pm | ईन्टरफेल
वाचतो आहे
वाह वाह
वाचतोय
वाच वाच
मझ्या मित्राला सांग्नार
लै मोठाल बॉ तुंम्हि
सैनिका बद्द्ल काय बि
लिवता येत नाय
स्वारी .............
11 Oct 2011 - 10:34 pm | आत्मशून्य
दोन दीवसापूर्वीच सन् त्झू च आर्ट ओफ वॉर (लिओनल गील्स ने भाषांतरीत केलेलं) २० रूपायला विकत घेतल होतं जून्या पूस्तक विक्रेत्यांकडून...... मजा येतेय वाचायला, फारच प्रॅक्टीकल आहे.
बाकी पराभवाच्या श्राध्दा बद्दल काय बोलायचं... अजून एक पानीपत टळलं याचा आनंद मानायचा की दूखः .. अजून ठरत नाही...
12 Oct 2011 - 10:13 am | Pain
आत्ता हा नवीन लेख सापडला-
http://www.esakal.com/esakal/20111009/5757769963334614283.htm
25 Mar 2014 - 11:43 pm | खटपट्या
अतिशय धक्कादायक
12 Oct 2011 - 10:27 am | प्यारे१
ऐ मेरे वतन के लोगों... ६२ च्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांवर लिहिलेल्या या गीतामुळे नेहरुंच्या डोळ्यात पाणी आलेलं म्हणतात.
नक्राश्रू कशाला म्हणतात रे भौ?
12 Oct 2011 - 11:36 am | निनाद मुक्काम प...
नितीन थत्ते ह्यांनी त्यांची मते मला खव मध्ये दिली आहेत व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा मी प्रयत्न केला आहे .
माझ्या मते लोकशाहीत सर्व विचारांचे स्वागत केले पाहिजे .अर्थात आपल्या विचारसरणीच्या विरुध्ध विचार आपल्याला नेहमीच स्वतःचे परीक्षण करू शकतो .सत्तेसाठी उपोषणं चे महात्म्य कसे जपायचे असते . ह्यांचे मूर्तिमंत उदाहरण नेहरू होते त्यांचीच री ओढत सध्या मनमोहन ह्यांनी तत्कालीन महात्म्याला विशेष पत्रं पाठवून सत्तेपासून वंचित करू नका असे आर्जव केले आहे .
12 Oct 2011 - 3:14 pm | सुहास झेले
हा भाग सुद्धा तितकाच माहितीपूर्ण... पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!
13 Oct 2011 - 11:40 am | किसन शिंदे
आपल्या सैन्यदलाविषयीची रोचक माहीती समोर येतेय..
श्री. कृष्णमेनन यांचे व्यक्तीमत्व हे त्यांचा वरील फोटो पाहिल्यावर लगेच लक्षात येते.
पु.भा.प्र..
14 Dec 2011 - 8:47 pm | सुधीर कांदळकर
आजपर्यंत लष्करी दृष्टिकोनातले लेखन वाचले होते. राजकीय बाजू इतक्या तपशिलातून प्रथमच कळते आहे. अजूनपर्यंत तरी बर्यापैकी तटस्थ वाटली.
पुभाशु
सुधीर कांदळकर