.....................................
फुफाटलेल्या उन्हातून घरी परत येताना मग माझी विचारांची लाईन जोरात चालू झाली. नाकाच्या टोकावर कचकचीत घामाघूम झालेला ब्राऊ हातभर जीभ काढून माझ्या सोबत धापा टाकत चालत होता. कितीही भेलकांडत चालला असला तरी चेहरा एकदम खूष दिसत होता.
घरी पोचल्यावर मी आणि ब्राऊ व्हरांड्यातच फरशीवर बोचे टेकले. फरशी अजून थंड होती त्यावर ब्राऊची लाळ सांडायला लागली. सुट्टी असल्यामुळे मला तसा काही उद्योग नव्हताच. सुट्टी नसली तरी आम्हाला कोणालाच तसा काही उद्योग नसतोच. इल्लिसिट बिहेवियर पिक्चर खाडे थेटरला लागला होता. पोस्टर बर्याच ठिकाणी निळे पॅच मारुन लावलं होतं. म्हणजे नक्कीच बरेच सीन असणार. परांजप्याला घेऊन एरवी मी नक्की गेलो असतो पण आज मनातून जाम फाटली होती. जाधवशी काल सरळसरळ राडा झाला होता. आत्तापर्यंत तोंडाने झालं होतं जे काय व्हायचं ते. आता मात्र जाधव मला सोडणार नव्हता. ते सगळं आठवून मग घरातून बाहेर पडायला मन मागेना. रस्त्याकडे बघत असताना एकदम मोमीन सीडी हंड्रेडवर येताना दिसला. मला कोणीतरी आलं म्हणून बरं वाटलं. मोमीन तसा प्रयोगशाळेखेरीज इतर कशात माझ्यासोबत नसतो. परांजप्यासारखा तो माझ्या भानगडींमधे तर मुळीच पडत नाही. आल्याआल्याच पायरीला पाय टेकत मोमीन बोलला, "केळ्या, जाधव भेटलेला आत्ता.."
"काय बोलत होतं बेणं?", मी ताठरलो आणि विचारलं.
"काय नाय..तू सांभाळून रहा जरा. उगाच जास्ती भानगडीत पडू नको.."
"काय झालं सरळ बोल ना मोम्या.."
"काय नाय. तो विचारत होता तुझ्याबद्दल. म्हणजे कराटे क्लासमधे तुझी तयारी काय आहे वगैरे विचारत होता."
मला काही कळेना पटकन.. "म्हणजे काय?"
"अरे उद्या काहीतरी राडा करायचा असला की तुझ्या साईडला क्लासमधली पोरं येतील काय ते बघायला बघत होता, माझ्याशी बोलून.."
"मग तू काय बोल्लास?", मी थरथरत विचारलं.
"मी काय नाय बोललो. तू सरांच्या खास मर्जीत आहेस असं बोलून आलो त्याला. जरा टरकलेला वाटला. तू काय घाबरु नको पण ज्यास्ती भानगड उकरु नको त्याच्याशी."
मला सगळं कळून चुकलं होतं. जाधव मुद्दाम मोमीनशी बोलून मला मेसेज पोचवायला बघत होता की माझी मार खाण्याची वेळ आली आहे. साले तसे प्लॅन्सही चाललेत. पाप्याची मदत जाधवाला झाली तर मी संपल्यात जमा होतो. आता घराबाहेर पडण्याचीही सोय राहिली नव्हती. कधीही एकदम जाधव आणि पाप्या त्याच्या टोळक्याला घेऊन माझ्या रस्त्यात मधे उभे राहणार होते. आमचं गाव लहान. त्यात सगळे भाग निर्जनच. जाऊन जाऊन जाऊ कुठे.
मला खूपच घाम फुटला. मोमीनने जरी जाधवला कराटेसरांचं सांगितलं होतं, तरी ते खरं नव्हतं. सर माझ्या बाजूने कसले, उलट मराठेला फसवून त्यांनी घाणच केली होती. तरी पण मला काहीतरी करुन स्वतःला वाचवायला हवं होतं. जाधव काहीच करणार नाही असं समजणं हा मूर्खपणा होता, कारण त्याला असंच करताना आम्ही आत्तापर्यंत बघत आलो होतो. चेन घेऊन मारामार्या करणारी राडेबाज पोरं साली. त्यांच्यापुढे आपण काय शाटमारी करणार.
मला सगळं बाकीचं बाजूला ठेवून कराटेसरांची मदत घ्यायला लागणार होती. नीट विचार केला तर त्याला हरकतही नव्हती आणि इलाजही नव्हता. मराठेने माझी काशी घातलीच होती. सरांकडे एवढी मेहनत केली ती मराठेसाठी. आता ती नसली तरी कमीतकमी तेवढ्या मेहनतीचा फायदा असा न तसा करुन घ्यायलाच हवा होता.
मी ब्राऊला पुन्हा साखळीला लावून हाती घेतला आणि त्याच्या सोबत क्लासकडे चालायला लागलो. ब्राऊ हातात असताना मला भीती खूपच कमी होती. कारण ब्राऊ खरोखर भरपूर थोराड आहे आणि त्याला बघून कोणी जवळ येणं शक्यच नाही.
कराटे क्लासकडे जाताना ब्राऊ भलताच उत्तेजित झाला होता. लसालसा जीभ आतबाहेर होत होती. पुढच्या दिशेने खेच तर जबरीच होती. स्वतःच्याच त्या राक्षसी खेचीमुळे ब्राऊचा गळा दाबला जाऊन त्याचे श्वास अडकत होते.
मग माझ्या लक्षात आलं की कराटे क्लासवरूनच पुढे बेगमच्या घराचा रस्ता होता. आणि मग ब्राऊच्या धसमुसळेपणाचं कारण लगेच समजलं.
क्लासच्या वळणावर रस्ता सोडला आणि ब्राऊने बेगमच्या घराच्या दिशेने जबरदस्त खेचायला सुरुवात केली. त्याला आयमायवरुन शिव्या देत उलटा ओढत कराटेक्लासकडे वळवला. क्लासच्या कंपाउंडच्या खांबालाच त्याची साखळी बांधली आणि आत गेलो. बेगमकडे जायचं नाही हे लक्षात आल्यामुळे ब्राऊच्या चेहर्यावर विश्वासघात झाल्याचा स्टॅम्प उमटला होता. बांधताक्षणीपासून त्याने भुंकाळ्या मारायला सुरुवात केली. तेव्हा त्याला एक कानफटात दिली आणि आत गेलो.
आत नशीबाने सर होतेच.
"काय रे केळकर?"
नेहमीप्रमाणे खरखरीत आवाजात त्यांनी हटकलं.
सरांना तशी जाधवविषयी कल्पना होतीच. सरांच्या सांगण्यावरुन मुतनाळनेही त्याला पाहिला होता. तसं तर जाधव मराठेच्या मागे असल्याची बत्तीही मी सरांच्या पार्श्वभागात घुसवून दिली होती..ती जळत असणारच.
या सगळ्यामुळे मी जास्ती लांबड न लावता थेट सरांना सांगितलं की जाधव माझ्या पाळतीवर आहे आणि राडा करायचा चान्स बघतोय. तेवढ्याने सर पेटले नसते, म्हणून हेही सांगितलं की जाधवाने मराठेचा काल गॅद्रिंगच्या गर्दीत हात धरलान म्हणून. त्याने हात तर धरलाच होता चान्स मारण्यासाठी. मी खोटं तर बोलत नव्हतो. शिवाय माझी मराठेला प्रपोज मारण्याची स्टोरी त्यांना सांगण्याएवढा मी येडा नव्हतो.
तरीही अपेक्षित प्रश्न आलाच, "तुझ्या मागे एवढा का लागलाय तो? काय झालंय खरं सांग.."
मी सटपटलो. खरं सर्वच सांगितलं की झाला बल्ल्या..पण अगदी सगळं लपवणं हाही मूर्खपणा होता.
"नाही सर.. काल त्याने माझ्या गिटारच्या शोमधे फटाके लावले.."
"फटाके लावले?", खरखर वाढली.
"म्हणजे मी कायतरी म्हणजे अम्..माझं कायतरी मराठेसोबत आहे असं तो धरुन बसलाय..त्यातूनच तो असली फालतूगिरी करतोय सर..", मी काहीतरी गोलमाल बकलो.
"तुला आवडते काय ती मराठे?", खर्रकन प्रश्न आला.
माझा घसा पूर्ण कोरडा झाला...
(........टू बी कंटिन्यूड)
प्रतिक्रिया
19 Jul 2011 - 4:27 pm | धन्या
गिटारचा नॉस्टाल्जिया मनात असतानाच वल्लीच्या कृपेने ब्राऊ हाती लागला...
आणि पब्लिक डीमांड बोलके चक्क दुसरा भाग हजर... धन्स वल्ली.
गवि, ब्राऊसुद्धा गिटारसारखंच भारी आहे, "भ" ची बाराखडी वापरत आयुष्य शिकवणारं... मस्तच !!!!
- धनाजीराव वाकडे
19 Jul 2011 - 4:32 pm | किसन शिंदे
खरोखरच वल्लीच्या सततच्या फॉलोअप मुळेच आज ब्राऊ वाचायला मिळाला..
धन्यावाद वल्ली!
पु भा प्र....गवि.
19 Jul 2011 - 4:41 pm | सुधीर
मागल्या २ ही लेखांची लिंक दिलात तर उत्तम होईल. सुरुवात चुकली होती.
19 Jul 2011 - 5:00 pm | जाई.
सुरेख लेखन
हाही भाग ऊत्तम
19 Jul 2011 - 5:04 pm | मृत्युन्जय
साला त्या जाधवड्या ला गाड रे एकदा. प्रत्येक कथेत आपला तुझ्या मागे लागलेला असतो. बाकी छान लिहिले आहे. दोन्ही भाग आजच वाचले.
19 Jul 2011 - 5:11 pm | गणेशा
हा ही भाग अप्रतिम झाला आहे ...
पण म्हणतात ना माणुस कधीच समाधानी नसतो ..
त्यामुळे आनखिन येवुद्या
19 Jul 2011 - 5:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त मस्त गवि... मजा आली... लय भारी झालाय हा पण भाग!!
19 Jul 2011 - 6:19 pm | स्मिता.
आमच्या आग्रहाखातर ब्राऊचा पुढचा भाग तात्काळ वाचायला दिल्यबद्दल गविंचे आभार.
आता पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत ;)
19 Jul 2011 - 6:44 pm | प्रचेतस
धन्यवाद गवि.
आमच्या आग्रहाच्या विनंतीला मानून तुम्ही तत्परतेने पुढचा भाग टाकल्याबद्दल.
बाकी हा भागही तेव्हढाच जबरदस्त. क्षणोक्षणी हास्याचे फटाके फुटताहेत.
आता पुढचे भाग पटापट येउ द्यात.
20 Jul 2011 - 10:15 am | स्पा
हेच म्हणतो
19 Jul 2011 - 6:46 pm | रेवती
वाचतिये.
19 Jul 2011 - 6:49 pm | मराठे
मस्त
19 Jul 2011 - 7:17 pm | आनंदयात्री
एक नंबर हो गविशेठ !! नेहमीप्रमाणे आवडले .. बेष्ट झालाय हा भाग. आता पूढल्या भागाला उशिर नका लाउ प्लिज.
20 Jul 2011 - 9:53 am | मनिष
पुढच्या भागाची वाट पाहतोय. :-)
19 Jul 2011 - 7:37 pm | प्रभो
ब्येस्ट हो गवि...लवकर येऊ द्या पुढचा भाग.
19 Jul 2011 - 7:47 pm | स्वैर परी
ह. ह. पु. वा.
पुढचे भाग हि येउ द्या पटपट ! :)
वाचतिये!
19 Jul 2011 - 8:36 pm | पैसा
हा पण भाग आवडला.. फक्त २ भागांच्यामधे मधे खूप वेळ गेला तो जरा कमी करा बुवा!
19 Jul 2011 - 9:18 pm | मिसळ
गवि, जबर्दस्त लिहिताय. पू. भा.च्या प्र.
19 Jul 2011 - 9:58 pm | ५० फक्त
मस्त हो गवि पुढचा भाग लवकर येउ द्या आता
19 Jul 2011 - 11:57 pm | मेघवेडा
हाहाहा.. मजा आली.. पुभाप्र
20 Jul 2011 - 12:07 am | कवितानागेश
मस्त.
20 Jul 2011 - 8:55 am | रणजित चितळे
बेस्ट
पुढचा भाग लवकर द्या
20 Jul 2011 - 9:33 am | प्रीत-मोहर
पुभाप्र
20 Jul 2011 - 11:22 am | शिल्पा ब
छान. शिव्या मात्र अगदी करकरीत हो!!!
20 Jul 2011 - 4:33 pm | विजुभाऊ
झकास रे .
तुझ्या लेखनत सु शीं ची झलक दिसते. धिस इज काँप्लेमेन्ट
20 Jul 2011 - 6:01 pm | मनराव
मस्त,
पूढच्या भागाच्या प्रतिक्षेत.........
***मिपा वाचक***
21 Jul 2011 - 6:10 am | निनाद
मस्तच!