.....................
या सगळ्यामुळे मी जास्ती लांबड न लावता थेट सरांना सांगितलं की जाधव माझ्या पाळतीवर आहे आणि राडा करायचा चान्स बघतोय. तेवढ्याने सर पेटले नसते, म्हणून हेही सांगितलं की जाधवाने मराठेचा काल गॅद्रिंगच्या गर्दीत हात धरलान म्हणून. त्याने हात तर धरलाच होता चान्स मारण्यासाठी. मी खोटं तर बोलत नव्हतो. शिवाय माझी मराठेला प्रपोज मारण्याची स्टोरी त्यांना सांगण्याएवढा मी येडा नव्हतो.
तरीही अपेक्षित प्रश्न आलाच, "तुझ्या मागे एवढा का लागलाय तो? काय झालंय खरं सांग.."
मी सटपटलो. खरं सर्वच सांगितलं की झाला बल्ल्या..पण अगदी सगळं लपवणं हाही मूर्खपणा होता.
"नाही सर.. काल त्याने माझ्या गिटारच्या शोमधे फटाके लावले.."
"फटाके लावले?", खरखर वाढली.
"म्हणजे मी कायतरी म्हणजे अम्..माझं कायतरी मराठेसोबत आहे असं तो धरुन बसलाय..त्यातूनच तो असली फालतूगिरी करतोय सर..", मी काहीतरी गोलमाल बकलो.
"तुला आवडते काय ती मराठे?", खर्रकन प्रश्न आला.
माझा घसा पूर्ण कोरडा झाला...
हे असलं काहीतरी सर विचारतील याची जराशीही कल्पना मी केली नव्हती. आणि त्यांनी थेट धाडकन हो किंवा नाही यापैकी एक उत्तर असलेला प्रश्न टाकला होता..
"हो.. म्हणजे..उम्..आहे.. आवडते जरा..", मी बुडबुडलो..म्हणजे पहिला हो तेवढा एकदम निघून गेला होता आणि पुढचे बुडबुडे सारवासारवीचे होते.
सरांनी दात काढले.
आयला.. सरांना पहिल्यांदाच हसताना बघितलं..
"अरे मग बोलायचं न तसं मला स्पष्ट काय ते.. लपवतोस कशाला..", सरांच्या आवाजातली खरखर एकदम कमी झाली होती.
मी एकदम गळालोच. एकतर सरांना माझं सिक्रेट कळलं होतं. तेही अनपेक्षितपणे.. आणि त्यातून ते वर मला दिलासा देत होते. सगळंच अघटित.
"बोल.. तिच्याशी जमलंय का तुझं? .. की अजून बुळ्यागत बसलायस फिरत?"
"अँ..म्हणजे सर.. मी बोललेलो तिला एकदा.."
"काय ते सरळ विचारलंस की उगाच घातलीस शेपूट ऐनवेळी..?", सर असलं काही बोलताहेत आणि तेही मराठे आणि माझ्याविषयी या विचाराने मी मूढावस्थेत पोचलो होतो.
"अम.. मी सरळ विचारलेलं सर. फ्रँक विचारलेलं.."
"मग काय म्हणाली ती?"
"नाही सर. म्हणजे नाहीच म्हणाली.. तिचं दुसरीकडे आहे म्हणून..", आणि मी जीभ चावली. कारण सरांचा पुढचा प्रश्न मीच धोंड्यासारखा स्वतःच्या पायावर सोडला होता. तो तसा पडलाच..
"कोणाशी आहे तिचं दुसरीकडे? अँ?"
आता काहीही लपवण्याची वेळ निघून गेली होती. कोणीतरी खोटानाटा इसम मराठेचा दिलवर म्हणून ऐनवेळी उभा करणं मला शक्य नव्हतं..
"सर ती.. म्हणजे.. तुमचं नाव घेत होती.." एवढं कसंतरी बोललो आणि सारवासारवीची तीव्र गरज येऊन आदळली.. मग मोठा श्वास घेऊन सुरु केलं, "म्हणजे सर.. मला माहीत आहे की तुमची फॅमिली आहे. तुमच्याकडून तसं काही नसणार.. पण तिला मी म्हटलं की काही असलं तरी आपली काहीच हरकत नाही. म्हणजे सर मी कोण हरकत घेणार. मॅच्युरिटी कमी आहे हो तिची सर.. म्हणून असेल..म्हणजे तसा तुमचा दोघांचा खाजगी प्रश्न आहे सर.."
"चूप बस रे..बडबड बंद कर", सर जोरात ओरडले आणि मी तोंडात बूच लावले.
"हे बघ केळकर.. तुला म्हणून सांगतो. क्लासमधे बोलू नको. पण तुमच्या वयात आम्हीही केले रे असले प्रकार..आता मी चाळिशीचा आहे..मला त्या पोरीच्या मनात काय आहे ते माहीत आहे..."
"सर. म्हणजे.. तुम्हाला.."
"हो.. मला माहीत आहे ती माझ्यात इन्व्हॉल्व आहे ते. तिला मी पहिल्यांदा त्यावरुन समजावायला गेलो तेव्हा ती दोन दिवस उपाशी राहिली..घरच्यांना काय ते कळेना.. तेव्हा ते माझ्याकडे आले. तिची आई मला म्हणाली, 'तुम्हीच बघा सर असं काय करतीय ते'..तेव्हा नंतर तिला मी क्लासच्या आधी स्वतः हाताने खायला घातलं तेव्हा खाल्लंन..त्यानंतर मी तिला काही बोलत नाही. ती पण विचारत नाही."
मला मराठेचं एकदम वाईट वाटलं. घशात गोळा येऊन दुखायला लागलं. सरांसमोर रडू न येण्याचा प्रयत्न करायला लागलो पण असल्या बाबतीत आपल्या हातात शाट काही नसतं. त्यामुळे एकदम पाणी आलंच. बाहेर ब्राऊ परत भुंकाळ्या फोडायला लागला. ते निमित्त करुन मी बाहेर आलो. आधी डोळे पुसले. कारण माझे डोळे भरलेले असले की त्या भिकारचोटाला लगेच दिसतात आणि लागतो कुईं कुईं करायला. मग तो चाटाबिटायला लागला आणि स्वत:ही रडायला लागला की माझ्या डोळ्यांचं पूर्ण धरणच फुटतं. म्हणून मी कधी ब्राऊसमोर रडत नाही.
ब्राऊच्या ढुंगणावर फटका देऊन त्याला गप्प केला. तेवढ्यात सर चालत मागे येऊन उभे राहिले होते. त्यांनी माझे डोळे बघितले आणि एकदम खांद्यावर हात टाकून जवळ घेतलं. सर बुटके असल्याने नीट जमत नव्हतं पण तरी त्यांच्या खांद्यावर डोकं टेकून रडू येऊ दिलं.
"अरे केळकर. गप्प हो आधी. अरे आपल्या क्लासचा पोरगा आहेस आणि रडतोस कसला बाईगत?", सर पाठीवर थोपटत म्हणाले.
मग पुढे म्हणाले, "हे बघ.. तुमचं जमलं तर मला आनंदच आहे. ती पोरगी मूर्ख आहे..ती काहीतरी डोक्यात घेऊन बसलीय्..पण होईल हळूहळू सारखं..तू नाद सोडू नको..मी करतो तुला मदत.."
मला एकदम भरूनच आलं. मी यातल्या कशाकशाची अपेक्षा इथे येताना केली नव्हती. सरांविषयी मला सोयीचा असा नालायकपणाचा निष्कर्ष काढून मोकळा झालो होतो.
मग एकदम हलकं वाटायला लागलं. मी घशातला गोळा गिळून सरांना म्हटलं, "सर, तो जाधव माझ्यामागे सुटलाय तोपर्यंत मला कुठे जायला सेफ वाटेना झालंय..तो आज माझ्या मित्राला आपल्या क्लासविषयी विचारत होता. म्हणजे मोठा राडा करण्याचा प्लॅन असणार.."
सर एक क्षण विचार करत उभे राहिले. मग मला म्हणाले चल.. कुत्रा घरी बांधून ये.. मग आपण जाऊ त्याला भेटायला.
"कोणाला सर?"
"जाधवला.. समजावतो त्याला मी बरोबर..चल जाऊन ये परत लगेच"
मी अत्यंत एक्साईट होऊन थरथरत्या हाताने ब्राऊची साखळी सोडली. परतीच्या वाटेवर त्याला उद्या बेगमला भेटवण्याचं प्रॉमिस केलं. त्याला तसाही पुन्हा बेगमशी भेटवायचा होताच..कारण एकाहून जास्त वेळा भिडवले तर फळण्याची शक्यता वाढते असं राणे म्हणाले होते.
(टू बी कंटिन्यूड..)
प्रतिक्रिया
20 Jul 2011 - 4:26 pm | मी ऋचा
जे ब्बात! दमाद्दम पुढचा भागही टाकला आनि तो पण नेहमी सारखाच झक्कास! बढिया!
20 Jul 2011 - 4:30 pm | गणेशा
वेगळा, कहानीला कलाटनी देणारा भाग ...
आवडला..
हा भाग आवडला .. पण आता हळु हळु कहानी शेवटापर्यंत सरकणार आहे असे वाटुन वाईट वाटले, असे वाटते ही कादंबरी संपुच नये..
20 Jul 2011 - 6:20 pm | वपाडाव
एकदम असेच म्हंतो....
20 Jul 2011 - 4:38 pm | स्वाती दिनेश
ब्राऊ १ आधी शोधून वाचला, (म्हणजे, लिंक उघडून वाचला, :) )
मग २रा आणि ३ रा भागही लगोलग वाचले..
पुढचे भाग असेच लिंक तुटू न देता टाका..
मजा येते आहे वाचायला..
स्वाती
20 Jul 2011 - 5:05 pm | स्पा
जबर्या....
याच स्पीड मध्ये टाका पुढचा भाग..
जाधव ची धुलाई बघायला आय मीन वाचायला डोळे तरसलेत ;)
20 Jul 2011 - 5:13 pm | इष्टुर फाकडा
लेह लेह लेह खतरनाक !!! भारीच आवडलेलं आहे...लवकर पुढचा भाग येउदे आणि आमची भेगम '!' फळू दे :D
20 Jul 2011 - 5:17 pm | असुर
गवि,
एकदम टेन्शन तुटून तार खांबावर लोंबकळल्यावर कसं वाटेल ना, तसं झालं की वो!!!
अजून २-३ ट्विस्ट्सच्या तयारीत दिसताय असं म्हणायला हरकत नाही! :-)
--असुर
20 Jul 2011 - 6:03 pm | शाहिर
परकराची नाडी तुटून लोंबकळल्यावर कसं वाटेल ना, तसं झालं !!
20 Jul 2011 - 5:37 pm | धमाल मुलगा
मला काय खरं दिसेना हां. ते केळ्या तिच्यायला खातंय बहुतेक दोन्हीकडून रट्टे.
त्यातल्या त्यात ब्राऊचं समाधान झालंय हा तेव्हढा एक सुखांत..सध्यापुरता. ;)
20 Jul 2011 - 5:43 pm | धन्या
एकदम खतरनाक आणि नाट्यमय कलाटणी...
मस्तच !!!
- धनाजीराव वाकडे
20 Jul 2011 - 5:53 pm | यकु
अहाहा!!
काय सीन आहे गवि... आता चित्रपटांची कशी काशी झालीय यावर बोलू नका तुम्ही..
आपल्याकडून तुम्हाला एक आख्खी आरसी लागू..
20 Jul 2011 - 5:59 pm | रेवती
अरेच्च्या!
कलाटणी?
वाचतिये.
20 Jul 2011 - 8:06 pm | प्रचेतस
कथानकाला एकदम कलाटणीच.
इतक्या लवकर तुमचा पुढचा भाग येईल असे वातलं नव्हता.
तुमचे ब्राऊ आणि पराशेठचे भन्नाट एकदम स्विंगमध्ये सुरु झाल्यामुळे आम्हा वाचकांना पर्वणीच.
20 Jul 2011 - 8:17 pm | आनंदयात्री
बेष्ट. साला ब्राउ ३ पाहिलं अन म्हटलं आज सालं केळ्या काय झोल करतय बघुया. तर आज नेमकं सरांसमोर हगलं ! सर पण एक नंबर गुरुघंटाल दिसतोय.
पौगंडावस्थेतलं निरागस पोरगं छान रंगवलय गविंनी. मजा येतिये.
20 Jul 2011 - 10:28 pm | जाई.
कहानी मे ट्विस्ट
हाही भाग उत्तमच
20 Jul 2011 - 11:47 pm | साती
सहीच चाललीय कथा.
लवकर लवकर पुढचे भाग टाका.
21 Jul 2011 - 1:57 am | वारा
गवी तुमच्या कथा फारच मजेशीर आहेत..
आपण तर तुमच्या लिखाणाचे फॅन झालो आहोत..
तुमच सगळ लिखाण वाचतोय..
हा भाग पण मस्त.....
21 Jul 2011 - 6:13 am | निनाद
अगदी डोळ्यासमोर उभे करताय!
21 Jul 2011 - 7:42 am | ५० फक्त
जाम भारी चाललंय गवि, मजा आली वाचायला.
21 Jul 2011 - 10:26 am | मिसळलेला काव्यप्रेमी
जाम भारी बोल!!
मजा आला.
म्होरं??
21 Jul 2011 - 11:11 am | प्यारे१
मस्त रे ब्राऊ, आपलं हे , गविभाऊ !!!
21 Jul 2011 - 11:47 am | मृत्युन्जय
दुसर्या आणि तिसर्या भागाचा स्पीड मस्त जमलाय. और आन्दो.
21 Jul 2011 - 4:52 pm | आचारी
एकदम जबरा !!