सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
चित्रगुप्ताची कैफ़ियत
दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान : भाग १.
नमस्कार मंडळी,
मी चित्रगुप्त...... होय होय, तोच तुमच्या पाप-पुण्यांचा झाडा राखणारा चित्रगुप्त....
खरंतर दैवी योजनेप्रमाणे तुमची-आमची गाठ तुमच्या मृत्यूनंतरच पडायची, पण नारद मुनींकडून हे मिपाचं कळल्यावर वाटलं, की चला, करूया जरा गप्पा तुमच्याशी....
आज आम्ही आमची ही कैफ़ियत तुमच्यासमोर अगदी मोकळेपणाने मांडणार आहोत, त्याला कारणही तसंच आहे.....
म्हणजे असं बघा, की आमचं ब्रीदवाक्य म्हणजे "पडे रहो" वा फ़ारतर "पडे रहो मुन्नाभाई" असं. कसलीही दगदग आम्हांस नको.
परंतु तुम्ही मनुष्यप्राण्यांनी आम्हाला अगदी बेजार करून सोडलंय बघा. हजारो वर्षांपासून तुमच्या उचापतींचा हिशेब ठेवून ठेवून आमचं पार कंबरडं मोडलंय. केव्हा निवृत्त होऊन या कटकटीतून सुटका होत्ये, असं झालंय. या कामी तुम्ही मिपाकरच काही मदत करू शकता, या आशेने हा खटाटोप करतोय...
अहो, इथे मी एकटा. चपरासी मंडळी तुमच्याकडूनच शिकून युनियन करून बसलेली. तिकडे तुम्ही संगणक वगैरेंचे शोध लावून तुमच्या लांड्या-लबाड्या झटदिशी करून मोकळे होता, आणि इथे हिशेबाच्या वह्यांचे गठ्ठे हलवता हलवता आमचा जीव मेटाकुटीला येतो. इथे यमपुरीत कसला संगणक आणि कसलं काय. अहो, यमदूतांना अजून फासांसाठी नायलॊनच्या दोर्या सुद्धा दिलेल्या नाहीत. तुमच्या इस्पितळांमध्ये अनेकजण मरणोन्मुख अवस्थेत महिनोन महिने पडून का असतात, तर यमदूतांकडल्या जुनाट काथ्याच्या दोर्या झिजून नीट काम करेनाशा झाल्यात म्हणून. तुमची डॉक्टर मंडळी उगीचच काहीतरी कारणे सांगत बसतात.
........... चला, तुम्हाला आमची सगळी हकीगत सुरुवातीपासून नीट सांगतो...............
अगदी सुरुवातीला स्वर्ग - पृथ्वी - नरक असं काही नव्हतं. फक्त नन्दनवनच होतं. सर्वत्र हिरवळ, थंड रुचकर पाण्याचे झरे, फळांनी लगडलेली झाडं, वस्ती फक्त देव, यक्ष, गंधर्व, अप्सरा वगैरेंची. आम्हाला चित्रकलेची आवड, त्यामुळे रंभा, मेनका, ऊर्वशी, तिलोत्तमा वगैरे आमचेकडून हौसेने चित्रे काढवून घेत. तेव्हा अमक्याची बायको अमुकच, असलेही काही नियम नव्हते.....थोडक्यात म्हणजे सगळं कसं सात्त्विक, "आल ईज वेल" असं होतं. खूपच सुखाचे दिवस होते ते.....
पण पुढे कुणीतरी म्हणे ज्ञान वृक्षाचं फळ चाखून नवीनच काहीतरी 'गुप्त ज्ञान' मिळवलं, मग काय विचारता, बघता बघता नाना लफडी कुलंगडी होऊन नंदनवनाची लोकसंख्या अतोनात वाढली. यावर काहीतरी तातडीची उपाययोजना करणं भाग होतं. मग ब्रम्हदेव, विष्णू, शंकर, इंद्र, वगैरेंची बैठक होऊन असं ठरलं, की यापुढे तीन वस्त्यांमध्ये विभागणी करायची, म्हणजे या लफडी- कुलंगडीवाल्यांना तातडीनं नवग्रहांपैकी पृथ्वी या ग्रहावर पाठवायचं, अगदीच अधम मंडळींसाठी नरक म्हणून वस्ती पाताळलोकात स्थापन करायची, आणि शुद्ध, सात्त्विक मंडळींनीच काय ते नंदनवनात राहायचं.
पृथ्वी वरील लोकांना एका नवीनच "मृत्यू" नामक अवस्थेद्वारे पुन्हा नंदनवनात येण्याची सोय केली गेली, परंतु त्यासाठी त्यांना तिकडे उत्तम, सात्त्विक जीवन जगून, पूर्ण शुद्ध होऊन कैवल्यावस्था गाठणे गरजेचे होते. या कामी मार्गदर्शन करण्यासाठी मुद्दाम भगवान पातंजली यांनी पृथ्वी वर जाण्याचे ठरवले.
ही सर्व नवीन व्यवस्था सुरळीतपणे चालवण्यासाठी पुष्कळ जणांची नियुक्ती केली गेली. यमराज हे जात्याच फार हुशार आणि न्यायी, म्हणून ते एकंदरीत विभाग-प्रमुख म्हणून, तर आमचे हस्ताक्षर सुंदर, म्हणून पृथ्वी वरील लोकांच्या सर्व अधम-उत्तम कृत्यांचा झाडा दररोज लिहून ठेवण्याचे काम आमचेकडे आले.
इथे त्या गॉड आणि अल्ला यांनी मात्र वेगळाच पवित्रा घेतला. हे रोजच्या हिशेबाचं लफडं सांभाळण्यापेक्षा पुढे कधीतरी "निवाड्याच्या दिवशी" काय ते बघू , तोपर्यंत स्वस्थ राहायचं, असं ठरवलं. तोपर्यंत पृथ्वी वरील त्यांच्या मृत लोकांनी जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत वाट बघत पडून राहायचं म्हणे.
आमच्या विभागाकडे मात्र मनुष्याचा देह भस्मीभूत झाल्या झाल्या ताबडतोब त्याच्या कृत्यांचा हिशेब करून त्याची रवानगी स्वर्गात अथवा नरकात करण्याची जबाबदारी आली.
झालं. गेले ते दिवस. (अहो, म्हणजे 'दिवस गेले' असं म्हणायचं नाही आम्हाला, रम्य दिवस संपले, असं).
........अरेरे...नुकती कुठे तुम्हाला आमची सर्व हकीगत सांगायला सुरुवात केली, आणि तिकडे कुणी महत्त्वाचं गचकलंय, ताबडतोब ये, असा यमराजांचा निरोप आला.....तेव्हा आता पुढील गोष्ट पुढील अंकी..........
तुमचा
चित्रगुप्त
प्रतिक्रिया
25 Mar 2010 - 11:38 pm | शुचि
छान मांडणी. रोचक.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
26 Mar 2010 - 12:24 am | मी-सौरभ
-----
सौरभ :)
26 Mar 2010 - 1:19 am | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय हो...............
बिपिन कार्यकर्ते
27 Mar 2010 - 6:23 pm | चित्रगुप्त
प्रिय संपादक महोदय,
खालील वाक्यात मुळात आम्ही "पतंजली' असे लिहिले होते, तेच बरोबर होते...मूळ नाव "पतंजली" असे असून त्यांच्या योगास मात्र "पातंजलयोग" असे संबोधण्यात येते.
हे ते वाक्य:
..........या कामी मार्गदर्शन करण्यासाठी मुद्दाम भगवान पातंजली यांनी पृथ्वी वर जाण्याचे ठरवले..........
27 Mar 2010 - 6:59 pm | प्रियाली
पातंजली :) - अच्छा! शुद्धलेखन असे सुधारतात होय.
जबरी संपादक आहेत. बाकी ते शुद्धलेखन कसे सुधारतात हे अद्याप कळले नव्हते, ते आता कळले. नाहीतर आम्ही आपले इमाने-इतबारे इतके दिवसआमचे अशुद्धलेखन सुधारत होतो.
27 Mar 2010 - 8:47 pm | प्रमोद देव
मानलं बुवा ह्या संपादकांच्या शुद्धलेखनाच्या उपक्रमाला. ;)
खरं आहे..ऋषींचं नाव आहे पतंजली...आणि त्यांनी बनवली म्हणून ती पातंजल योगसूत्रं. बर्याच जणांचा ह्यात नेहमी घोळ होतो.
27 Mar 2010 - 8:54 pm | Nile
हा हा हा हा! =))
अति तिथे माती काय? ;)
27 Mar 2010 - 7:43 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्ताना सांगण्यापर्यंत साक्षात नारदमुनींना मिपाची भुरळ पडली!
धन्य हो! तात्या व मिपाकर हो!!
लौकर नव्हे लवकर (नाहीतर शुद्धलेखनाचे गुण काटले जायचे!) यमधर्मांनी आपल्या रेड्याला आरामात रवंथ करण्याची आज्ञा करून फासाची दोरी(नाडी?) बाजूला टाकून मिपावरून लेखनाला बोरू हात घेतला तर काय होईल!!!
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत