स्वैपाकघरातून पत्रे १

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
19 May 2018 - 8:21 am

अन्नपूर्णा,
(तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.)

आज म्हटलं तुला लिहावंच. अगं, जी कामं मी एकटी करायची, ती करण्यासाठी तू हा केवढा महागाचा सुऱ्यांचा सेट घेऊन आलीस! छोटी, मध्यम, मोठी. एक हे कापायला, एक ते चिरायला, एक बारीक बारीक तुकडे करायला! कम्माल आहे बाई तुम्हा आत्ताच्या बायांची!
आमच्या जमान्यात अस्सं नव्हतं हो! एकदा का तुझ्या सासूने मला एका मांडीखाली घेतलं कि सगळं सगळं चिरून व्हायचं! खोबरं खोवून, मिरची बारीक चिरून, कांदा तर पाहिजे तसल्या आकारात, मऊ टोमाटो, वाळलेल्या खोबऱ्याचे अवघड तुकडे, झालंच तर गूळसुद्धा चिरून व्हायचा पुरणासाठी! पण आता काय, एकीचे काम चार जणी थांब, अशी गत.

तू नवी नवरी. हौसेने आलीस स्वैपाकघरात. सासूला म्हणालीस, ‘काय मदत करू? कांदा चिरू?’ तुझी सासू म्हणजे देवमाणूस, म्हणाली, ‘कांद्याने डोळ्यात पाणी येईल गं बाई! त्यापेक्षा या चार हिरव्या मिरच्या चिरून दे,’ त्यावेळी तुझी माझी पहिली भेट झाली. तू घेतलेस मला तुझ्या नवख्या मांडीखाली. पण तुला ना मला नीट धरून ठेवता आले, ना माझ्यावर सडपातळ मिरच्यांचे बारीक काप करता आले! ....आणि वैतागून तू ते वाक्य म्हणालीस, ‘अहो आई, या विळीचा स्क्रू ढिला झालाय.’ मला अस्सा राग आला होता तुझा.... तुझं बोटच चिरायच्या विचारात होते मी! पण तुझ्या सासूकडे पाहून माझ्या पात्याची धार मनात ठेवून गप्प बसले.
पण काळ थांबतो का? तुझी सासू गेली. सत्ता तुझ्या हातात आली आणि तू मला तडक ही कोपऱ्यातली जागा दाखवलीस. असू दे. माझा स्क्रू ढिलाच झालाय ना! असू दे.... पण तुझ्या या डझनावारी सूऱ्या आहेत ना... यांचीही धार बोथट होईल, मूठ निसटेल .... मग बघशील माझ्याकडे एकदा. पण नाही हो, ढिम्म हलायची नाही मी तेव्हा....

..... तसा राग नाही गं.... जुने जाऊन नवे येणारच. पण जुन्याचा स्क्रू ढिला का होतो, याचा विचारच कुणी करत नाही, म्हणून हे पत्र लिहावे लागले. बाकी तू समजशीलच.

तीच तुझ्या सासूच्या जमान्यातील,
विळी.

शिवकन्या

मांडणीवावरसंस्कृतीपाकक्रियावाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

भारीच आवडलं. पूर्णपणे पटलं! मला पण या विळी च्या भविष्याची चिंता लागलेली असते. " माझ्यामाघारी हिचं काय होणार??" :) :D

शिव कन्या's picture

19 May 2018 - 1:25 pm | शिव कन्या

:)))

मुळात ही कल्पनाच फार मस्त आहे. आवडले पत्र.
(या अगोदरही अशी पत्रे लिहिलीत का फेबूवर? वाचनात आल्यासारखे वाटतेय. फोटोसहीत होते.)

प्राची अश्विनी's picture

19 May 2018 - 12:09 pm | प्राची अश्विनी

हो, फेसबुकवर वाचलेय. कल्पना सुंदर आहे.

शिव कन्या's picture

19 May 2018 - 1:28 pm | शिव कन्या

होय, ही पत्रमालिका आहे. आपल्या स्वैपाकघरातील विविध भांडी अन्नपूर्णेला पत्र लिहितात, अशी ही एकंदर कल्पना आहे.

ही पत्रे, फेसबुकला माझ्या wall वर होती, आणि 'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेज साठीही ही दिली होती.

आपल्या चौफेर वाचनाला आणखी शुभेच्छा.

कंजूस's picture

19 May 2018 - 12:42 pm | कंजूस

शालेय निबंध? स्वगत छान.

शिव कन्या's picture

19 May 2018 - 1:30 pm | शिव कन्या

वयाने मोठे झाल्यावर परत शालेय निबंध जमतो का बघायचे. :-)

वाचत असल्या बद्दल आभार.

विजुभाऊ's picture

19 May 2018 - 5:03 pm | विजुभाऊ

मस्तच लिहिलय हो

फुटूवाला's picture

19 May 2018 - 6:21 pm | फुटूवाला

छान लेख आहे !!
विळी - स्वयंपाकघरातली
ईळी - कडब्याच्या पेंढ्या कापायची
आणि विळत - चाबकाच्या तुटाटीला वसन काढायला वापरायची.

शिव कन्या's picture

20 May 2018 - 9:58 pm | शिव कन्या

अरे वा! हे माहिती नव्हतं.

नवी माहिती. धन्यवाद.

दुर्गविहारी's picture

19 May 2018 - 10:11 pm | दुर्गविहारी

छान लिहीलयं. बाकीचे अवजारे यांच्या उ द्या. :-)

शिव कन्या's picture

20 May 2018 - 9:59 pm | शिव कन्या

होय, बाकीची पण अवजारे येणार हळूहळू.

वाचत असल्याबद्दल धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

21 May 2018 - 7:00 am | चित्रगुप्त

छान. पुढील भागात आणखी कोण कोण येणार याची प्रतिक्षा आहे.
विळीला 'पावशी' पण म्हणतात (बहुतेक अमरावतीकडील भागात).
..

शिव कन्या's picture

25 May 2018 - 9:56 am | शिव कन्या

इतकी माहितीपूर्ण चित्रे इथे डकवल्या बद्दल आभार.

हे शब्द माझ्या साठी नवे.... आवडले.