गणपत वाणी, सतत मागणी.
विड्या ओढून थकलेला गणपत वाणी
कवितेच्या छपराखाली
अलंकार गोळा करताना मला दिसला.
म्हणाला,
'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता
कोण कवी वापरतो?
तसा एखाद दुसरा हौशी असतो
नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?'
त्याला एकदा मालक म्हन्ले,
'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही
काव्यापेक्षा कवित्व जड
आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात
कवितेला हाणून पाडतात.
गणप्या, आता तुझं काम एकच,
अलंकार काढायचे, अन
कविता वाळत टाकायची.'
'मग काय होईल मालक?'
पिंक टाकीत मालक म्हन्ले ,
' काय होईल?
अरे, मग
काय वास्तवदर्शी,
सत्याचे खोल भान, कित्ती खर्र
वा, वा! अरे बापरे, आई गं
असं म्हणत गर्दी गोळा होईल.
मग कवितेचा खप होईल.
.....आणि तिचा खप झाल्याशिवाय
तुला बिड्या कुठून मिळणार?'
'मालकाचं बरोबर होतं.
मालकाचं नेहमीच बरोबर असतं...
तर एकूण सगळं असं आहे......'
मी विचारलं,
'ठिक गणू, पण काढून फेकलेले अलंकार
परत का गोळा करतोयस?'
काडीने दात कोरत
हाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला,
'काळ बदलेल,
मालक बदलेल,
सत्य किती अंगावर येतेय म्हणत
हेच लोक आरोळ्या ठोकतील,
तेव्हा अलंकाराच्या शोधात
वेडे कवी फिरत इथेच येतील,
तेव्हा, हा गणपत वाणी
कविता झटकून
अलंकार विकेल....'
मी त्याच्याकडे पहात राहिले....
इतक्यात,
'आलो मालक'
म्हणत गणपत वाणी
कविता खांद्यावर टाकून निघून गेला.
शिवकन्या
प्रतिक्रिया
2 Apr 2018 - 8:05 pm | नाखु
(धूर)काडीची कविता.
कोपर्यावरचा वाचक नाखु पांढरपेशा
2 Apr 2018 - 8:29 pm | चांदणे संदीप
अलंकाराच्या शोधार्थ फिरणारे अनेक वेडे कवी निर्माण होवोत!
आमेन!
Sandy
3 Apr 2018 - 12:31 am | एस
रूपके आणि चेतनगुणोक्ती छान वापरले आहेत.
9 Apr 2018 - 9:54 am | चौथा कोनाडा
वाह, मस्तच !
एका वेगळ्या प्रकारचा उपहास !
हे भारीय !
11 Apr 2018 - 12:57 am | रातराणी
खूप आवडली!!
11 Apr 2018 - 10:20 am | वीणा३
तुमच्या कविता खूप वेगळ्या असतात, लिहीत रहा.
11 Apr 2018 - 11:31 am | अंतरा आनंद
मस्तच कविता आहे. खूप आवडली.
आहा!
11 Apr 2018 - 8:51 pm | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तार
14 Apr 2018 - 4:36 am | सत्यजित...
ज ब र द स्त!
17 Apr 2018 - 7:52 am | मारवा
फारच सुंदर आणि मजेदार कविता आहे.
आवडली.
17 Apr 2018 - 2:59 pm | पिलीयन रायडर
सुरेख!