माझे अपहरण ...
मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे..
मी वाट पहात, दबा धरून बसलेय.
मला माझेच अपहरण करायचे आहे..
कुत्रा माग काढणार नाही,
भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही,
गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही,
शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही,
नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही,
कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही,
....... असे सगळे जुळून आले कि ,
मी माझेच अपहरण करेन ....
स्वतःतून बाहेर पडून मी
निर्धास्तपणे चालू लागले कि,
झडप घालून मी माझ्यावर पोते टाकेन
माझी झटापट झटापट होईल,
पोत्याचे तोंड करकचून आवळले कि
मी आपोआप गुदमरेन,
हळूहळू माझी धडपड मंद होईल,
मग मी मलाच उचलून
खांद्यावर टाकेन.....
मग मी मला लपवून ठेवेन.
स्वतः कडेच खंडणी मागेन....
खंडणी दिली तर माझी सुटका करीन
नाही केली तर जीवानिशी मारीन.....
धमक्या देईन, वाट पाहीन.
खंडणी देण्याची ऐपत नाही,
पोत्यात बंदिस्त राहण्याची शक्ती नाही,
असे एकंदर दिवस आले कि ,
माझी उलघाल होईल, डोके फुटून जाईल,
हे पण अपहरण फसले असे वाटून उदास होईन,
थोडे दिवस मी सगळ्यांना दोष देईन,
माझ्या अपहरणात काय चूक राहिली?
शोध घेईन.....
पुढच्या वेळेस मी काळ्या काचेची कार, मास्क, पिस्तुल घेऊन तयारीत राहीन,
मी बाहेर पडले कि
पुन्हा नव्याने माझे अपहरण करेन...
यंदा तरी माझे अपहरण यशस्वी होवो
आणि
मला माझ्यातली खंडणी मिळो.
-शिवकन्या
प्रतिक्रिया
15 Mar 2018 - 6:39 am | तिमा
शिव शिव शिव!!!
15 Mar 2018 - 7:01 am | चांदणे संदीप
असं होतं कधीकधी. आपल्या मनात काहीतरी करण्याचं आहे पण ते तसं करता येतं नाही मग आपण नकळत दबा धरून बसतो पुढच्या संधीच्या शोधात. आपलेच अपहरण ही कल्पना कदाचित त्यातूनच आकारास येत असावी.
तुम्हांला तुमच्यातली खंडणी लवकरात लवकर मिळो हीच त्या मिपावरच्या काळ्या मावशीकडे प्रार्थना! ;)
Sandy
15 Mar 2018 - 7:55 am | आनन्दा
ईस्कटून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
एक कवीचं हे जाणू शकतो
15 Mar 2018 - 8:35 pm | शिव कन्या
इस्कटून सांगायचा मस्त प्रयत्न..... मला ही हे नव्याने उमगले. अनेक अर्थ असूच शकतात. धन्यवाद.
15 Mar 2018 - 1:07 pm | एस
चमत्कृतीपूर्ण कल्पना.
बादवे, आमेन! :-)
15 Mar 2018 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा
15 Mar 2018 - 3:54 pm | अनिंद्य
स्वतःकडे मागायची खंडणी
आणि
त्यामुळे होणारी सुटका दोन्ही एकच -
मुक्ती, Freedom !
15 Mar 2018 - 3:55 pm | माहितगार
कविता समजण्यास वेळ लागला तरी बहुधा समजली (किंवा तसा माझा गैर समज असेल ) आणि पोचल्यासारखी वाटली. कवितेत अजून काही बाजू येण्याच्या शिल्लक नाही ना असे वाटून एखादी कविता पाडण्याची संधी आहे का वाटून गेले . बहुतेक एक कविता पाडावी म्हणतो योग केव्हा येईल माहित नाही.
16 Mar 2018 - 2:23 pm | आनन्दा
इथे पण निसटत्या बाजू आहेतच का
16 Mar 2018 - 3:36 pm | माहितगार
एकदा स्वभाव छिद्रान्वेषी झाला की सगळीकडे सारखाच नै का :) बाकी निसटत्या आणि सुटलेल्या/राहीलेल्या/शिल्लक मध्ये अल्पसा फरक असावा असे वाटते
15 Mar 2018 - 8:36 pm | शिव कन्या
माहितगाराला पाडायला..... म्हणजे कविता पाडायला किती वेळ लागतो असा! घ्या पाडायला.... वाचू आम्ही.
16 Mar 2018 - 3:37 pm | माहितगार
एक नै रतीबाच्या दोन दोन जिलब्या झाल्या. प्रेर्ना आपल्याकडेच :)
15 Mar 2018 - 9:48 pm | पिवळा डांबिस
मुक्तक आवडलं.
स्वतःच स्वतःचं अपहरण करण्याची कल्पना छान आहे.
15 Mar 2018 - 10:24 pm | सुखीमाणूस
मला लागलेला अर्थ
काहितरी नवीन शिकण्याचा ध्यास व तळमळ म्हणजे अपहरण.
आणि त्यासाठीचे करावे लागणारे कष्ट म्हणजे खंडणी.
जर यश नाही मिळाले तर प्रयत्न वाढवावे लागणारच.....
15 Mar 2018 - 11:12 pm | चौथा कोनाडा
+१
16 Mar 2018 - 9:56 am | ज्ञानोबाचे पैजार
पहिली संदीपची....
आता रविवारी या दोन्ही कवितांवर "उतारा" घेणे आले
पैजारबुवा,
16 Mar 2018 - 10:50 am | जव्हेरगंज
मस्तच की!!
16 Mar 2018 - 4:35 pm | निशाचर
कविता आवडली.