वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल द्रविड - The wolf who lived for the pack

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
11 Jan 2018 - 4:35 pm

प्रिय राहुल,

४५ व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! वन ब्रिक अ‍ॅट अ टाईम मध्ये तुझ्या कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता... आज जरा पुढे जाऊन मन मोकळं करावं म्हणतो.

एकतर तू क्रिकेट खेळत नाहियेस हेच पटत नाही बघ. बॅटिंग करताना तू ४५ वर पोहोचेपर्यंत समोरच्या गोलंदाजांनी हत्यारं म्यान केलेली असायची. सिनेमातल्या डॉक्टरनं "अब इनको दवा की नहीं दुवा की जरूरत है" सांगितल्यावर नातेवाईकांचे होतात तसे चेहरे करून "फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे" असा कर्मयोगी विचार करून बिचारे गोलंदाजी करत राहायचे. कारण ४५ धावांवर पोचलेला राहुल द्रविड म्हणजे दगडावरच्या शेवाळ्यापेक्षा चिकट. मग बोलर्ससाठी फक्त वाट पाहाणे... की कधीतरी हा माणूस चुकेल आणि बाद होईल.

शोएब अख्तरला तू बाद करायला सर्वांत अवघड फलंदाज वाटायचास.
ब्रायन लारा एकदा म्हणाला होता "माझा जीव वाचवण्यासाठी कोणाला बॅटिंग करावी लागली तर मी राहुल द्रविडला निवडीन."
साक्षात मॅथ्यु हेडन म्हणला "हे आजुबाजुला जे थोतांड चालतं त्याला अ‍ॅग्रेशन म्हणत नाहीत. तुम्हाला आक्रमकता बघायची आहे? राहुल द्रविडच्या डोळ्यांत बघा!"
सिद्धू म्हणाला "राहुल द्रविड टीमसाठी काचांच्या तुकड्यांवरूनसुद्धा चालत जाईल"

क्रिकेटच्या देवाच्या नशीबी सुद्धा "असं" कौतुक आलं नसेल. Your are in the league of your own."द वॉल", "मिस्टर डिपेण्डेबल" वगैरे अभिधानं तुला चिकटली ती उगाच नाही.

Dravid

तसं तुझ्या फलंदाजीत काही आकर्षक नव्हतं रे! लारा, मार्क वॉ, संगकारा सारखे अफलातून कलाकार तुझे समकालीन. तुझ्याच संघात सचिन, सौरव, सेहवाग आणि आकर्षक फलंदाजांचा बादशहा लक्ष्मण. आम्हाला "eye candy" फलंदाज भरपूर होते. पण एखाद्या स्टेजवर ऐश्वर्या, दीपिका, प्रियांका वगैरे सौंदर्यखनींच्या मेळ्यात विद्या बालनच्या डोळ्यांतली चमक उठून दिसावी तसा ह्या आक्रमक फलंदाजांच्या जमान्यातसुद्धा तुझा भक्कम बचाव उठून दिसायचा. भक्कम बचावातली आक्रमकता आम्हाला दाखवली ती राहुल द्रविडने. तुझा बचाव म्हणजे अहिंसा नव्हती. त्यात लाखोंच्या पर्शियन फौजेसमोर उभ्या ठाकलेल्या लियोनायडसची हिंमत होती. आक्रमण कितीही आकर्षक असूदे ... मजबूत बचावातली "खोली" त्याला नाही. बायको एरवी कितीही जीन्स टॉप वापरूदे... पण नवरा तिच्या प्रेमात पडतो तो तिला पाडव्याला नऊवारीत, नाकात नथ आणि निवडकच दागिन्यांत पाहूनच. क्रिकेटचं म्हणून जे काही "सौंदर्य", "नजाकत", "ठहराव" आहे ना... तो फक्त तुझ्यामुळे मित्रा! हिरव्यागार विकेटवर, ढगाळ वातावरणात, आग ओकणार्‍या वेगवान गोलंदाजापुढे पाय रोवून उभं राहातानाचा तुझा आत्मविश्वास, तुझा डौल, तुझा आब पाहिल्यानंतर कोणाची बिशाद तुला अनाकर्षक म्हणण्याची. क्रिकेटच्या मैदानावर बुद्धिबळाचा डाव मांडण फक्त आणि फक्त तुलाच शक्य होतं रे! खडतर परिस्थितीचा आमचा "बेंचमार्क" म्हणजे राहुल द्रविड. "राहुल द्रविडला सुद्धा खेळता नसतं आलं" अशी परिस्थिती म्हणजे अवघडपणाची शीव सोडून फलंदाज अशक्यपणाच्या हद्दीत शिरला.

आणि वर तुझी विनम्रता आणि आजकाल फार फार विरळा दिसणारा गुण म्हणजे नि:स्वार्थीपणा! टीमची गरज म्हणून राहुल ओपनिंगला आला... टीमची गरज म्हणून कर्णधार झाला... टीमची गरज म्हणून विकेटकीपर झाला आणि आता तर कोच झाला. बीसीसीआयनं जर का आजवर सर्वांत महत्त्वाचा निर्णय कोणता घेतला असेल तर तुला अंडर १९ संघाचा प्रशिक्षक नेमण्याचा. ह्या पोरांवर क्रिकेटचेच नाही तर आयुष्यभर साथ देतील असे वागण्याचे "संस्कार" करायला तुझ्यापेक्षा योग्य माणूस सापडलाच नसता.

Queue

तू आम्हाला परफेक्ट टायमिंगनी मारलेल्या स्ट्रेट ड्राईव्ह पलिकडचं सौंदर्य दाखवलंस. षटकार खेचण्याच्या पलिकडची ताकद दाखवलीस. आणि आता आम्हाला दिसतो तो पोरांच्या सायन्स एक्झिबिशनला बाकीच्या पालकांबरोबर रांगेत शांत उभा असलेला राहुल द्रविड. अत्यंत नम्रपणे बंगलोर विद्यापीठाची डॉक्टरेट नाकारताना "मी ती एक दिवस माझ्या कष्टाने मिळवीन म्हणणारा राहुल द्रविड. केव्हिन पीटरसनला ईमेलमध्ये स्पिनर्सना खेळण्याचे नुस्के सांगणारा राहुल द्रविड. पाकिस्तानी क्रिकेटपटू महंमद हाफिजबरोबर हसतमुखाने सेल्फी काढणारा राहुल द्रविड. मृत्युशय्येवरच्या तरुणाला स्काइपवरून धीरच नाही तर प्रोत्साहन देणारा राहुल द्रविड. १९ वर्षांखालील टीमच्या पोरांना पंखांखाली घेणारा राहुल द्रविड. एक अविस्मरणीय असं Bradman Oration देणारा राहुल द्रविड. ह्याचसाठी... तुझ्या क्रिकेटसाठी आणि क्रिकेटपलिकडच्या तुझ्यासाठी.... आमच्यासाठी तू भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेस!

तो आन दो राहुल द्रविड! आम्ही तुझ्याकडून शिकलो... आमची पोरंही शिकतील.

Happy birthday!

Farewell

व्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणक्रीडामौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

11 Jan 2018 - 5:18 pm | मुक्त विहारि

लेख आवडला....

प्रचेतस's picture

11 Jan 2018 - 5:36 pm | प्रचेतस

सुंदर लेख.

तसं तुझ्या फलंदाजीत काही आकर्षक नव्हतं रे!

ह्याच्याशी मात्र असहमत, स्पिनर्सला खेळतानाचं त्याचं विलक्षण पदलालित्य, पेसर्सला मारलेले पूल, हूक, स्क्वेअरकट्स, ड्राईव्हज भीषण सुंदर.

हेच म्हणणार होतो.

लेख आवडला.

तुषार काळभोर's picture

11 Jan 2018 - 6:36 pm | तुषार काळभोर

स्पिनर्सला खेळतानाचं त्याचं विलक्षण पदलालित्य, पेसर्सला मारलेले पूल, हूक, स्क्वेअरकट्स, ड्राईव्हज भीषण सुंदर.

इतकंच काय, त्याचा 'लीव्ह' सुद्धा सुंदर असायचा...

फारएन्ड's picture

11 Jan 2018 - 6:58 pm | फारएन्ड

सही! शुभेच्छा राहुल द्रविड ला!

द्रविड च्या अनेक मेमरीज आहेत पण त्याची सर्वात लास्टिंग मेमरी आता आहे ती त्याची २०११ ची इंग्लंड टूर. त्याआधी २००७ च्या वर्ल्ड कप च्या निराशेनंतर तो कसोटीतही बराच काळ चाचपडत होता. एक दीड वर्ष लागले त्याला पुन्हा जुना फॉर्म मिळायला. २००८ व २०१० च्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सिरीज (त्याच्या लेव्हलच्या मानाने) भाकड गेल्या. मग पुन्हा फॉर्म मधे आला आणि एक दोन वर्ष चांगला खेळला. पण तरीही जेव्हा भारताने २०१०-११ मधे द. आफ्रिके मधे कसोटीत प्रथम क्रमवारी मिळवली, त्यात त्याचा फार हातभार नव्हता. संघात तो उठून दिसत नसे तो थोडा(च) काळ. मग मधल्या काळात भारताने वर्ल्ड कप जिंकला, त्यातही तो नव्हता.

तेव्हा कसोटी मधे नं १ व वन डेज मधे कप जिंकलेला, अशा स्थितीतून भारताचा बाकी संघ एक्दम शैथिल्य आल्यासारखा पूर्ण आउट ऑफ फॉर्म गेला. वेस्ट इंडिज मधे बरे खेळले पण नंतर इंग्लंड मधे बाकी जवळजवळ सर्व अपयशी ठरले. मात्र अशा वेळेस उभा राहिला तो फक्त द्रविड. आधी विंडिज मधे शतक मारून तो पुन्हा फॉर्म मधे आला होता. मग इंग्लंड मधे तर त्याने ४ कसोटीत ३ शतके मारली. पण प्रत्यक्ष धावसंख्येपेक्षा तेथील स्विंग व एकूणच हवामानात कसे खेळावे याचे धडे तो सर्वांना देत होता. आजूबाजूला बाकीचे किरकोळीत उडत असताना अक्ष्ररशः प्रत्येक डावात इंग्लिश बोलर्स ना त्याची विकेट मिळवायला खूप मेहनत करावी लागली. त्यावेळचे विकेट्स चे वर्णन वाचले तरी लक्षात येते की बहुतांश वेळा बोलर ने किंवा बॉल ने काहीतरी करामत केल्याने त्याची विकेट उडाली आहे. द्रविड बद्दलचा आदर त्या सिरीज मधे द्विगुणित झाला.

त्यानंतर तो थोडाफार खेळला. त्याची बहुधा शेवटची लक्षणीय इनिंग म्हणजे मेलबर्न ला डिसेंबर २०११ मधली सचिन बरोबर शतकी भागीदारी. दोघेही अतिशय सुंदर खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या ३३३ ला उत्तर देताना भारत २१४/२ वर होता आणि सचिन आणि द्रविड क्रीज वर होते. त्यावेळची इयान चॅपेल ची "ominous signs for Australia!" ही कॉमेण्ट अजूनही लक्षात आहे. दुर्दैवाने रिची बेनॉ च्या कॉमेण्ट्स सारखी ती कॉमेण्ट म्हणजे एक "भाकित" नव्हते :) तेथून दोघेही आउट झाले आणि २१४/२ वरून भारत २८२ ऑल आउट.

अंडर-१९ चा प्रशिक्षक त्याला करणे हा फार चांगला निर्णय आहे.

वरुण मोहिते's picture

11 Jan 2018 - 6:59 pm | वरुण मोहिते

जियो राहुल द्रविड!!

अप्रतीम लेख ! जुग जुग जिओ राहूल !

संदीप चित्रे's picture

11 Jan 2018 - 9:50 pm | संदीप चित्रे

माझ्या फेसबुकवर मी ह्या लेखाची मिपाची लिंक शेअर केलीय इतका हा लेख आवडला आहे.

संदीप चित्रे's picture

11 Jan 2018 - 9:50 pm | संदीप चित्रे

माझ्या फेसबुकवर मी ह्या लेखाची मिपाची लिंक शेअर केलीय इतका हा लेख आवडला आहे.

फेरफटका's picture

12 Jan 2018 - 12:12 am | फेरफटका

राहूल द्रविड वर लेख वाचणं, त्याची इनिंग बघणं हे सगळच एका रिलिजियस रिच्यूअल प्रमाणे आहे माझ्यासाठी. पण द्रविड वरचा लेख त्याच्या टेस्ट इनिंग इतका भरभक्कम लिहायचा. वाचता वाचता संपून गेला!!! छ्या!! द्रविड वर फिल्म बनवावी आणी त्याच्या टी-२० इनिंग बद्दल दाखवावं असं वाटलं.

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2018 - 2:14 am | टवाळ कार्टा

तो देव नाही पण देवमाणूस आहे

नावातकायआहे's picture

12 Jan 2018 - 8:10 am | नावातकायआहे

लेख आवडला.

मूकवाचक's picture

12 Jan 2018 - 9:04 am | मूकवाचक

क्रिकेटच्या एका महारथीबद्दल तितक्याच तोलामोलाचा लेख. अप्रतिम!

सुमीत भातखंडे's picture

12 Jan 2018 - 3:29 pm | सुमीत भातखंडे

सुंदर लेख

माधुरी विनायक's picture

12 Jan 2018 - 5:02 pm | माधुरी विनायक

छान लेख. खूप दिवसानंतर क्रिकेटविषयी, खेळाडूविषयी वाचायला मिळालं. फारएन्ड यांचा प्रतिसादही छान..

राघव's picture

12 Jan 2018 - 5:05 pm | राघव

आज जेव्हा आफ्रिकेत आपली टीम चाचपडत खेळतांना दिसते, तेव्हा या महारथ्याची हटकून आठवण होतेय! सलाम!!

शलभ's picture

12 Jan 2018 - 9:41 pm | शलभ

खूप छान लेख.
ते Bradman Oration खूपच मस्त. कसलं भारी स्पीच आहे. त्या लिंकसाठी खूप धन्यवाद.
ह्या स्पीच ची लिंक आहे का. फक्त लिखाणाची.

प्रमोद देर्देकर's picture

12 Jan 2018 - 9:58 pm | प्रमोद देर्देकर

माझा आवडता खेळाडू. लेखन मस्तच.
अजुन सीरिज़ मध्ये लिहा ना कोणीतरी राहुलबद्दल.

पैसा's picture

12 Jan 2018 - 10:27 pm | पैसा

सुरेख लेख! समकालीन खेळाडूंचा स्वार्थीपणा बघता राहुल द्रविड फारच वेगळा उठून दिसतो!

श्रीरंग's picture

14 Jan 2018 - 7:20 am | श्रीरंग

जबरदस्त लिखाण, जेपी! प्लीज, प्लीज, "एका खेळीयाने" मालिका पुन्हा सुरू करा. फेल्प्स, फेडरर, जॉर्डन, इत्यादींबद्दल तुम्ही लिहिलेलं वाचायला खूप आवडेल!